समाजात वावरताना आपल्याला अनेक अनुभव येत असतात- काही भले तर काही बुरे. दोन्ही प्रकारचे अनुभव आपल्याला बरेच काही शिकवून जातात. त्यातूनच आपला व्यक्तिमत्व विकास घडत असतो. चांगले अनुभव आपल्याला उल्हसित करतात, तर कटू अनुभव उदास करून जातात. या दोन प्रकारच्या अनुभवांची जर तुलना केली, तर आपल्या लक्षात येईल की चांगल्या अनुभवांची स्मृती ही अल्पकाळ राहते. याउलट, कटू अनुभव मात्र दीर्घकाळ मनात खोलवर दडून राहतात.
हा लघुलेख साहित्य आणि वृत्तमाध्यम क्षेत्रातील अशा काही अनुभवांचा आहे. या प्रांतांत लेखक, संपादक, प्रकाशक आणि वाचक हे महत्वाचे घटक आहेत. त्यांचा एकमेकांशी वरचेवर संबंध येतो. त्यातून या प्रत्येकाच्या खात्यावर बरेच अनुभव जमा होतात. एक वाचक या नात्याने मलाही काही भलेबुरे अनुभव आले. त्यापैकी काही या लेखात लिहितो.
...........
मध्यंतरी एक आरोग्य आणि व्यायामविषयक पुस्तक वाचले. ते चांगले आहे आणि महाराष्ट्रातील एका नामवंत प्रकाशनसंस्थेने प्रकशित केले आहे. पुस्तकाच्या शेवटी काही परिशिष्टे दिलेली आहेत. त्यातील एकात आपल्या शरीराला लागणारी जीवनसत्वे आणि खनिजे दररोज किती लागतात याचा तक्ता आहे. मी तो वाचू लागलो आणि एकदम दाताखाली खडा लागावा अशी एक चूक आढळली. म्हटले ठीक आहे, एखादा मुद्रणदोष असेल. तक्ता पुढे वाचू लागलो. पुन्हा एक घोडचूक दिसली. संपूर्ण दोन पानी तक्ता वाचल्यावर लक्षात आले, की त्यात तब्बल १० तपशिलाच्या चुका होत्या. आरोग्यविषयक पुस्तकात तर त्या अक्षम्य ठरतात. त्या पाहून अस्वस्थ झालो. मग माझ्याकडचे अधिकृत वैद्यकीय संदर्भ पाहून एकवार खात्री केली. अलीकडे वाचनविश्वात उपयुक्त पुस्तकांची चालती आहे. हे पुस्तक त्याच प्रकारातले. तेव्हा त्याच्या पुढील आवृत्त्या निघण्याची शक्यताही खूप. म्हणून असा विचार केला, की आपण त्या चुका बघून स्वस्थ बसण्याऐवजी संबंधित लेखकाला कळवाव्यात. त्या पुढील आवृत्तीत सुधारणे आवश्यक होते.
मग पुस्तकाच्या पहिल्या पानाची मागची बाजू लेखकाच्या पत्त्यासाठी पाहिली. पण तो काही तिथे दिलेला नव्हता. त्यामुळे निराशा झाली. छापील पुस्तकात नियमानुसार फक्त प्रकाशकाचा पत्ता छापणे बंधनकारक आहे; लेखकाचा नाही. लेखकाने प्रकाशकाकडे आग्रह धरल्यास तो छापला जातो, अन्यथा नाही. आता मला नाईलाजाने प्रकाशकाचा पत्ता पाहणे आले. तिथे त्यांच्या टपाल पत्त्याबरोबरच तब्बल ३ इ-मेलचे पत्ते दिलेले होते. त्यापैकी एक खास वाचकांच्या सूचनांसाठी होता. म्हटले वा ! अगदी शिस्तबद्ध संस्था दिसतेय. मला हुरूप आला. मग त्या पुस्तकातील सर्व चुका आणि त्यांची योग्य दुरुस्ती असा मजकूर तयार केला. त्यासोबत योग्य तो वैद्यकीय संदर्भ जोडून त्या प्रकाशकाला इ-मेलने पाठवला. या पत्राची त्यांचेकडून दखल घेतली जावी ही अपेक्षा होती. त्यांच्या उत्तराची वाट पाहू लागलो.
यावर एक महिना उलटला पण त्यांचा काही प्रतिसाद आला नाही. मग मी आधीचीच मेल पुन्हा एकदा स्मरणपत्र म्हणून पाठवली आणि याखेपेस तिच्या दोन प्रती त्यांच्या इतर दोन मेलपत्त्यांवरही पाठवल्या. माझ्या दोन्हीही मेल्स व्यवस्थित ‘पाठवल्या गेल्या’ या सदरात दिसत होत्या. याही घटनेला काही महिने उलटले. कालांतराने मी त्यांच्या उत्तराची अपेक्षा सोडली. आता यापुढची पायरी होती ती म्हणजे त्यांचा फोन क्रमांक मिळवून बोलणे. परंतु याबाबतीतले माझे आधीचे अन्य काही अनुभव तापदायक होते. तरीही आता हिय्या करून फोन केला. तो घेणाऱ्या व्यक्तीने “साहेब बाहेरगावी गेलेत” असे सांगितले. त्यानंतर काही दिवसांनी फोन उचलला गेलाच नाही. मग मी नाद सोडला.
वरील एकतर्फी पत्रव्यवहारानंतर मनात काही प्रश्न आले:
१. ज्या नामांकित प्रकाशनाने त्यांचे ३ इ-मेलचे पत्ते जाहीर केलेले आहेत, ते प्रशासक माझ्या पत्रास उत्तर का देत नाहीत?
२. मुळात त्या संस्थेला येणाऱ्या मेल्स नक्की वाचल्या जातात का?
३. जर प्रकाशकाला फक्त आर्थिक व्यवसायातच रस असेल तर मग वाचकांचे हितासाठी पुस्तकात लेखकाचा पत्ता प्रकाशित केलेला बरा नाही का? खरे तर लेखक त्याच्या मजकुराबद्दल छपाई दरम्यानच अधिक संवेदनशील असायला हवा !
……..
असेच कधीकधी काही अभ्यासाच्या पुस्तकात काही मुद्रणदोष तर कधी घोडचुका सापडल्या होत्या. यात देशी आणि विदेशी अशा पुस्तकांचा समावेश होता. मग संबंधित प्रकाशकाला ती चूक पत्राद्वारे कळवल्यावर परदेशी प्रकाशकांबाबतचे पत्रोत्तराचे अनुभव चांगले होते. ते धन्यवाद देऊन पुस्तकाच्या पुढील आवृत्तीत चूक सुधारण्याचे आश्वासन देत. त्यांचे पत्रोत्तर सौजन्यपूर्ण असायचे.
.......
आता एका नामवंत मराठी दैनिकाचे दोन अनुभव.
एकदा त्यांच्या छापील अंकात “सेफ्टी टँक (म्हणजे safety) मध्ये पडून बालकाचा मृत्यू“ अशी बातमी आली होती. या संदर्भात अनेक सुशिक्षितही “सेफ्टी” हा चुकीचा उच्चार करतात खरा शब्द सेप्टिक (septic) हा आहे. निदान वृत्तपत्राने तरी याबाबतीत दक्ष पाहिजे. या बातमीत त्या चुकीने संपूर्ण अर्थहानी होते. एकतर ती बातमीही दुखःद आणि त्यात ही चूक. वाचल्यावर बराच अस्वस्थ झालो आणि मग त्यांना इ-मेल केली. दुसऱ्याच दिवशी त्यांच्या सहसंपादकांचे दिलगिरीचे उत्तर आले आणि भविष्यात यासंबंधी काळजी घेण्याचे आश्वासन त्यांनी त्यात दिले.
आता याच दैनिकाचा दोन महिन्यांपूर्वीचा एक अनुभव.
सर्वत्र करोनाचे थैमान. त्यावरील बातम्यांचा महापूर. जबाबदार वृत्त माध्यमांनी या विषाणूचा उच्चार ‘करोना’ असा योग्य छापलेला होता. पण प्रस्तुत वृत्तपत्रात तो सातत्याने “कोरोना” असा चुकीचा येत आहे. मी प्रथम शब्दकोशातून खात्री करून घेतली की तो ‘करोना’ ( UK /kəˈrəʊ.nə/ US /kəˈroʊ.nə/) हाच आहे. (अगदी तंतोतंत उच्चार मराठीत छापता येणार नाही, पण पहिले अक्षर खात्रीने ‘क’ च आहे). मग या वृत्तपत्रास इ-मेल केली. प्रतिसाद आला नाही. आठवड्याने पुन्हा ती पाठवली, पण आज अखेर त्यांचे काहीही उत्तर नाही. आणि अर्थातच “को” च छापणे चालू आहे.
गमतीचा भाग म्हणजे काल याच दैनिकात एका नामवंत कवींची कविता छापली आहे. त्यात कवींनी योग्य असा ‘करोना’ हा उच्चार लिहिलेला आहे. परंतु या दैनिकाचा अंकात इतरत्र ‘को’चा खाक्या चालू आहे. बरोबर आहे म्हणा, कवीच्या प्रतिभेत त्यांना संपादकीय हात घालता येणार नाही ! बाकी अन्य काही दृश्यमाध्यमे देखील ‘को’चीच री ओढत आहेत. त्यांचे तर सोडूनच देऊ.
बस, आता मी इतपत प्रयत्न करून स्वस्थ बसतो. फोनबिन जाऊदे, मरूदे हे धोरण.
लष्कराच्या भाकऱ्या भाजाव्यात पण.....
जोपर्यंत आपला हात दुखत नाही, तोपर्यंतच !
..........................................................................................
आता परवा एलॉन मस्क 'नोवा
आता परवा एलॉन मस्क नोवा 'सोटीया' बँक मध्ये तरुणपणी काम करत असल्याचं वाचून जरा डोकं भिरभिरलं
बाकी दोन वडलांचा बाप आणि इतर गोष्टी अचाट आहेत.
दोन वडिलांचा बाप म्हणजे
दोन वडिलांचा बाप म्हणजे माझ्या 'महाभारताच्या नायिका' धाग्यावर हरचंद पालव अभिमन्यूच्या बाबतीत म्हणाले तसं राज बब्बर स्वतःचा उल्लेख स्मीगलसारखा we म्हणून करू शकेल.
दोन वडिलांचा बाप >>
दोन वडिलांचा बाप >>

वावे, राज बब्बरने बी आर
वावे, राज बब्बरने बी आर चोपरांच्या महाभारतात पहिल्या एपिसोडमध्ये भरत राजाचं काम केलं होतं - हा योगायोग नसावा. महाभारतातल्या नात्यांची क्लिष्टता पाहता ती नीट समजू शकणाऱ्या व्यक्तीला, म्हणजे दोन वडिलांचा बाप असलेल्या राज बब्बरला, चोपरांनी जाणून बुजून घेतलं असावं.
हो, हो, राज बब्बर भरत होता
हो, हो, राज बब्बर भरत होता
एखाद्या उपयोगी किंवा गंभीर
एखाद्या उपयोगी किंवा गंभीर बातमीचा अगदीच बँड वाजवायचा शब्द खाऊन

दिव्य मराठी !
दिव्य मराठी !
भयंकर मराठी आहे हे!!! :
भयंकर मराठी आहे हे!!! : कपाळावर हात:
वडिलांचा बाप असलेल्या राज
वडिलांचा बाप असलेल्या राज बब्बरला, >>> चोपडांसारखी दूरदृष्टी कुणालाही नाही
दोन वडिलांचा बाप हे कुठेही फिट होईल.
राज बब्बर भरत होता की ययाति , मला 'मै दिल्ली हूं' मधला ययाति आठवतोयं, चालतयं, तिथेही असंच वार्धक्य देऊन गोंधळ उडवलेला आहे. कुरूवंशात नेहमीच कुछ तो गडबड है
काळजं , बंदाज ... उठाले रे बाबा मोमेन्ट
सर्व भारीच !
सर्व भारीच !
सध्याच्या उदास वातावरणात ही सगळी मंडळी बरीच इनोदनिर्मिती करीत आहेत.
राज बब्बर भरत होता की ययाति >
राज बब्बर भरत होता की ययाति >> मैं दिल्ली हुं मध्ये राज बब्बर ययाति बनून आपल्या पापाचे घडे 'भरत होता'. महाभारतात तो नुसताच 'भरत' होता. असो, फारच विषयाला सोडून चाललंय हे. उगाच लोकसत्तावाले नोकरीत वगैरे ठेऊन घ्यायचे! त्यापेक्षा आपण मूळ मुद्द्यावर येऊ.
ते मी अनु (त्या अनु) ह्यांनी पोस्ट केलेलं कात्रण म्हणजे कमाल आहे! गुगल ट्रान्सलेटलाच कळेल काय प्रकार आहे तो.
सदैव उपदेश डोजरूपी संपादकीय
सदैव उपदेश डोजरूपी संपादकीय लिहीणारे लोकसत्तेचे संपादक गिरीश कुबेरांनाही ही सगळी कात्रणे पाठवा. त्यांचे पत्रकार व अनुवादक लिखाणात किती चुका करतात ह्याचा त्यांनाही उलगडा होईल.
चौथा टप्पा – मुंबई लोकल,
चौथा टप्पा – मुंबई लोकल, धार्मिक स्थळं, जिल्हाबंदी पुढे ढकलली जाऊ शकते.
https://www.loksatta.com/maharashtra-news/ncp-nawab-malik-on-lockdown-in...
इथे क्रियापदामध्ये काही गफलत झाली आहे की माझा गोंधळ होतोय, ते कळत नाही. जिल्हाबंदी पुढे चालूच राहणार असे म्हणायचे असावे ना ?
हो हे वाचलं होतं मीपण.
हो हे वाचलं होतं मीपण.
राहुल बावणकुळेंचं बरोबर आहे. ह्या चुका लोकसत्ता आणि त्या त्या वृत्तपत्रांकडे पोचल्या पाहिजेत. नाही तर काय उपयोग?
ह्या चुका लोकसत्ता आणि त्या
ह्या चुका लोकसत्ता आणि त्या त्या वृत्तपत्रांकडे पोचल्या पाहिजेत. >>>
मी सरासरी ३ आठवड्याला अशी एक तरी इमेल करत असतो. तसे इथे लिहितो सुद्धा.
उपयोग शून्य !
ओह! अवघड आहे.
ओह! अवघड आहे. शंभर अपराध भरले की एक ईमेल करता का?

ई-मेल ही प्राथमिक पायरी आहे.
ई-मेल ही प्राथमिक पायरी आहे.
माझ्यापेक्षाही एक पाऊल पुढे असलेले काही जण थेट संपादकांना ट्विट करत असतात.
परंतु त्यांचाही निराशाजनक अनुभव इथे वाचता येईल :
https://www.misalpav.com/comment/1073057#comment-1073057
काही उपयोग नाही
काही उपयोग नाही
उलट अश्या चुका रिपोर्ट केल्याने जास्त लोक वाचून बातमीचा टीआर पी वाढत असेल
'आत्महत्या' करणे म्हणजे
'आत्महत्या' करणे म्हणजे स्वतःला इजा करण्याचा प्रयत्न यशस्वी होऊन मरणे.

'आत्महत्येचा प्रयत्न' करणे म्हणजे स्वतःला इजा करण्याचा प्रयत्न करूनही जिवंत राहणे.
यातली सगळ्यात वरची बातमीही
यातली सगळ्यात वरची बातमीही भारी आहे.
(No subject)
सुशील कुमारची बातमी वाचून
सुशील कुमारची बातमी वाचून डोकं आपटावं वाटत आहे
किती प्रकारच्या चुका कराव्या एकाच मजकुरात?
ऑनलाईन मराठी वृत्तपत्रे आणि
ऑनलाईन मराठी वृत्तपत्रे आणि त्यांचे फेबुपान हेसुद्धा भयंकर प्रकरण आहे. शुद्धलेखन, तारतम्य वगैरेची अपेक्षा आता ठेवतच नाही पण एकतर अर्थहीन 'बातम्या' आणि त्यात बातम्यांचे शीर्षक 'अमुक अमुक रहस्य', 'जाणून घ्या' किंवा 'वाचून थक्क व्हाल' असे असणे बहुदा कंपलसरी असते.
उदा.
...ही आहे अमुक अभिनेत्याची नवीन बायको - वाचून थक्क व्हाल !
किंवा
....'हे आहे त्या नेत्याचे खरे नाव - जाणून घ्या.
किंवा
.....रूपवान आहे अभिनेत्रीची चुलत सासू - थक्क व्हा / जाणून घ्या
किंवा
.... ग्वाटेमालातील दुसऱ्या लग्नासाठी नवीन नियमाचे रहस्य - जाणून घ्या
यात जाणून घ्या आणि थक्क व्हा हे आलटुनपालटुन वापरले की झाले काम

थक्क झालो बुवा अगदी !!
थक्क झालो बुवा अगदी !!
अजून अशी काही
अजून अशी काही
"ट्विंकल ने पहिल्या रात्री अक्षय ला दिली 'ही' धमकी!!
क्रिकेटर काल्पनिक सिंग च्या मेहुणीची भाची आहे 'ही' हॉट अभिनेती!!
अनिंद्य , थक्क होऊन थकून जाल
यात बातम्या कुठे आहेत नक्की ??! हे तर गॉसिप आहे.

अनिंद्य , थक्क होऊन,थक्क होऊन थकून जाल हे येईल नंतर
संस्कारी सून
जरा सोबर माहितीपूर्ण असेल तर
जरा सोबर माहितीपूर्ण असेल तर मथळा असतो हे जाणून घ्या/ किंवा तुम्हाला हे माहीत आहे का?
आजच्या टुडे सकाळ ला 'खुचपून'
आजच्या टुडे सकाळ ला 'खुचपून' असा शब्दप्रयोग आहे.
खुचपून? म्हणजे नेमकं काय?
खुचपून? म्हणजे नेमकं काय? खुपसून का?
मी सरासरी ३ आठवड्याला अशी एक
मी सरासरी ३ आठवड्याला अशी एक तरी इमेल करत असतो. तसे इथे लिहितो सुद्धा.
उपयोग शून्य ! >>>>>> अगदी खरं आहे.
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र टाइम्स च्या नागपूर आवृत्तीत शब्दकोड्यांत आडव्याऐवजी उभे व उभ्याऐवजी आडवे शब्द दिले होते. मी संपादकांना शब्दकोड्यांमधील चूक दाखवून देणारा सप्रमाण इमेल लिहिला, त्यावर साधे उत्तर सुद्धा आले नाही किंवा दुसऱ्या दिवशीच्या आवृत्तीत चुकीबद्दल तसदी व्यक्त करणारे दोन शब्द ही नाही. शिवाय सध्या एक नवीन व्यक्ती शब्दकोडे देत असते, तिचे ठरलेले दोन शब्द असतात, १. महाराष्ट्राचा अठरावा मुख्यमंत्री २. महाराष्ट्राचा सातवा मुख्यमंत्री.
अहो, ते मुख्यमंत्री होते, अठरावा किंवा सातवा काय लिहिताय? अठरावे किंवा सातवे लिहा.
Pages