शब्दाचे योग्य रूप कोणते?

Submitted by चिनूक्स on 20 April, 2009 - 09:29

एखादा शब्द कसा लिहायचा, याबाबत काही अडचण असल्यास कृपया इथे विचारा.

बरेचदा अशुद्ध लिहिले जातात असे काही शब्द -

चूक - बरोबर

१. नेतृत्त्व - नेतृत्व
२. स्वत्त्व - स्वत्व
३. तज्ञ - तज्ज्ञ
४. गणितज्ज्ञ - गणितज्ञ
५. महतम - महत्तम
६. लघुत्तम - लघुतम
७. प्रतिक्षा - प्रतीक्षा
८. गिरीष - गिरीश (गिरी + ईश)
गिरिश ( गिरीवर शयन करणारा)
९. समिक्षा - समीक्षा
१०. मनोकामना - मनःकामना
- मनःशक्ति
- मनःस्वास्थ्य
- मनश्चक्षु
११. पुनर्प्रसारण - पुनःप्रसारण
१२. पुनर्स्थापना - पुनःस्थापना
१३. सहस्त्र - सहस्र
१४. स्त्रोत - स्रोत
१५. क्रिडांगण - क्रीडांगण
१६. प्रसुति - प्रसूति
१७. धुम्रपान - धूम्रपान
१८. कंदिल - कंदील
१९. जिर्णोद्धार - जीर्णोद्धार
२०. उर्जा - ऊर्जा
२१. प्रतिक - प्रतीक
२२. वडिल - वडील
२३. पोलिस - पोलीस
२४. नागरीक - नागरिक
२५. मंदीर - मंदिर
२६. क्षितीज - क्षितिज
२७. जाहीरात - जाहिरात
२८. दृष्य - दृश्य
२९. जीवाष्म - जीवाश्म
३०. अजय (ज्याचा जय होत नाही असा) - अजेय (जो जिंकला जाऊ शकत नाही असा)
३१. अद्ययावतता - अद्ययावत्ता
३२. अनावस्था - अनवस्था
३३. अनावृत्त (पत्र) - अनावृत
३४. अंतस्थ - अंतःस्थ
३५. अपर (इंदिरानगर) - अप्पर
३६. अप्पर (जिल्हाधिकारी) - अपर
३७. अमूलाग्र - आमूलाग्र
३८. अल्पसंख्यांक - अल्पसंख्याक
३९. ऋषिकेश - हृषीकेश
४०. कार्यकर्ती - कार्यकर्त्री
४१. दत्तात्रय - दत्तात्रेय
४२. दुराभिमान - दुरभिमान
४३. देशवासीयांना - देशवासींना
४४. नि:पक्ष - निष्पक्ष
४५. नि:पात - निपात
४६. निर्माती - निर्मात्री
४७. परिक्षित - परीक्षित् (सभोवार पाहणारा), परीक्षित (examined)
४८. परितक्त्या - परित्यक्ता
४९. पारंपारिक - पारंपरिक
५०. पुनरावलोकन - पुनरवलोकन
५१. पौरुषत्व - पौरुष / पुरुषत्व
५२. प्रणित - प्रणीत
५३. बुद्ध्यांक - बुद्ध्यंक
५४. बेचिराख - बेचिराग
५५. मतितार्थ - मथितार्थ
५६. मराठीभाषिक - भाषक
५७. महात्म्य - माहात्म्य
५८. मुद्याला - मुद्द्याला
५९. विनित - विनीत
६०. षष्ठ्यब्दी - षष्ट्यब्दी
६१. सहाय्य - साहाय्य
६२. संयुक्तिक - सयुक्तिक
६३. सांसदीय - संसदीय
६४. सुतोवाच - सूतोवाच
६५. स्वादिष्ट - स्वादिष्ठ
६६. सुवाच्च - सुवाच्य
६७. हत्येप्रकरणी - हत्याप्रकरणी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हल्ली एक संतापजनक मराठी ऐकू येते . ते म्हणजे भूतकाळातील प्रसंग सांगण्यासाठी. मी काल तिथे गेलेलो. आम्ही खाल्लेलं. आम्ही पिक्चर पाहिलेला. वगैरे. हे लोण मुम्बई परिसरात जास्त आहे. तिथून ते आमच्याही घरात आले आहे. माझ्या अंगाचा अगदी तिळपापड होतो. सारखं मुलाना दुरुस्त करावं लागतं. ही कुठली भाषा आहे. ? आणि ही एव्ढ्याच कुठून आली.? मी काल तिथे गेलो होतो, आम्ही खाल्लं होतं.आम्ही पिक्चर पाहिला होता. हे योग्य आहे.

तुम्ही बोलता का असली भाषा ? असल्यास का?

अनावृत्त हा शब्द माझ्याकडे असलेल्या शब्दकोशात नाही. अनावृत पत्र ही नोंद मात्र आहे.

अट्टहासप्रमाणे अजून एक योग्य रूप म्हणजे 'कोट्यधीश'. ते कोट्याधीश असं लिहिलं जातं.

मग फ साठी प्रश्न उरले.
त्याच्या मते 'अनावृत्त' शब्द ग्राह्य आहे, त्याचा अर्थ काय?
"आवृत्त या शब्दाचा एक अर्थ enclosed, wrapped असाही आहे" हे खरे असेल तर 'आवृत' चे जसे 'अनावृत' झाले तसेच 'आवृत्त' चे 'जाहीर', 'न लपवलेले' अशा अर्थाने 'अनावृत्त' का चूक आहे?

रॉबिनहूड, कोल्हापूरला गेला नाहीत का कधी? 'कधीतरी एखादी गोष्ट केली होती' या अर्थाने 'गेलेलो, केलेलं, खाल्लेलं' असं बोललं जातं. तिथे ते रुळलेलं आहे म्हणून बोलतात. उगाच फॅड म्हणून तुमच्याकडे उचललं असेल तर तुमचा तिळपापड होणं ठीक आहे. Happy

लालू, संकल्पच्या पोस्टमधे त्याने

>> या धातूपासून बनलेल्या 'आवृत्त' या क.भू.धा.वि.चा अर्थ '(चक्रनेमिक्रमाने) आवर्तन घडलेले' असा होतो.
असं म्हटलं आहे. तेव्हा अनावृत्त म्हणजे मग 'आवर्तन न घडलेले' (पहिलीच आवृत्ती न खपलेले पुस्तक वगैरे :P) असा अर्थ होत असावा.

(मुक्तछंदातल्या कवितांनाही मग अनावृत्त म्हणायला हवं) Happy

आवृत्त = enwrapped, revolved
वृत्ति = परिघ
वृत्त = वाटोळा, वर्तुळ
वृति = कुंपण, संरक्षण करणारे
आवृत्ति = परत परत घडणारे

या वृति शब्दाचा व अनावृत या शब्दाचा संबंध असावा.

>>"आवृत्त या शब्दाचा एक अर्थ enclosed, wrapped असाही आहे" हे खरे असेल तर 'आवृत' चे जसे 'अनावृत' झाले तसेच 'आवृत्त' चे 'जाहीर', 'न लपवलेले' अशा अर्थाने 'अनावृत्त' का चूक आहे?<<
शब्दकोशांमधील नोंदींशिवाय माझ्या माहितीप्रमाणे मी 'आवृ - आवृणोति' आणि 'आवृत् - आवर्तते' या भिन्नार्थी क्रियापदांवरून हे शब्द कसे बनलेत आणि अर्थांच्या संदर्भात कुठली साधित विशेषणे चपखल आहेत, ते मी वरच विवरलंय. आता "आवृत्त या शब्दाचा एक अर्थ enclosed, wrapped असाही आहे" हे विधान खरंच योग्य आहे की नाही, असल्यास - त्यामागचं व्याकरण काय, (नसल्यास - शब्दकोशांमध्येही टायपो घडतात किंवा कसे :फिदी:,) यांवर तू किंवा इतर कुणी जाणत्यांनी प्रकाश टाकल्यास उत्तम! मला या संदर्भात अजून काही तर्कसंगत माहिती मिळाल्यास, ती इथे कळवेनच.

>>तेव्हा अनावृत्त म्हणजे मग 'आवर्तन न घडलेले'
बरोबर. 'अन्' उपसर्गामुळे 'आवृत्त' या विशेषणाचे विरुद्धार्थी विशेषण बनेल. अनावृत्त = न आवर्तलेले.

>>ते म्हणजे भूतकाळातील प्रसंग सांगण्यासाठी. मी काल तिथे गेलेलो. आम्ही खाल्लेलं. आम्ही पिक्चर पाहिलेला. <<

रॉबिनहूड : 'गेलेलो', 'खाल्लेलं', 'पाहिलेला' ही मराठीतली 'कर्मणी भूतकाळवाचक धातुसाधित विशेषणे' (इंग्लिशीत 'past participles'; आपल्याकडचं धातुसाधित म्हणजे इंग्लिशीतलं participle) आहेत. म्हणजे हे शब्द कर्माबद्दल (कारण => कर्मणी) विशेष (कारण => विशेषण) माहिती सांगतात - 'पिक्चर' पाहिलेला, 'वडा' खाल्लेला इत्यादी. सहसा कर्मणी प्रयोगांत कर्ता तृतीया विभक्तीनुसार चालतो (रामाने, सीतेने, लोकांनी वगैरे). 'मी' या सर्वनामाची तृतीया विभक्तीतली रूपे अशी : एकवचन - म्या, मी; अनेकवचन - आम्हांही. यांतील 'आम्हांही' हे विभक्तिरूप सध्या आपण फारसे वापरत नाही, कारण मुळात 'मी' हे सर्वनाम तृतीया विभक्तीत अनेकवचनात वापरायचा आपल्यात प्रघात नाही (म्हणजेच, ही सर्वनामे असलेली वाक्ये सहसा कर्मणी प्रयोगात रचून वापरणे मराठीत फारसे प्रचलित नाही.). पण तरीही कोणी 'मी हा पिक्चर पाहिलेला', 'त्याने अमुकतमुक गोष्ट दिलेली' अशी वाक्ये रचली, तर ती कर्मणी प्रयोगानुसार योग्य आहेत - त्यात कर्माला (पिक्चराला, गोष्टीला) महत्त्व असून कर्त्याला गौणत्व आहे.

मात्र, 'मी काल तिथे गेलेलो' ही वाक्यरचना माझ्या माहितीप्रमाणे योग्य नव्हे. कारण 'जाणे' हे क्रियापद कर्त्याला प्राधान्य दिल्याशिवाय रचणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे हे वाक्य 'मी काल तिथे गेलो होतो' असं पूर्ण भूतकाळात किंवा 'मी काल तिथे गेलो' असं सामान्य भूतकाळात वापरावं लागेल.
तसाच प्रकार 'मी खाल्लेलं' याबद्दल : यात कर्म नसेल, तर हे वाक्य व्याकरणदृष्ट्या अयोग्य आहे. 'मी अमुकतमुक खाल्लेलं' असं ठीक. किंवा 'मी खाल्लं' (सामान्य भूतकाळ) / 'मी खाल्लं होतं' (पूर्ण भूतकाळ) हे पर्याय योग्य ठरतात.

अगदी कर्म वापरूनही ही रचना अयोग्यच. उदा. आम्ही काल किनई वडा खाल्लेला. त्याना म्हणायचं असतं आम्ही काल किनई वडा खाल्ला होता. म्हनजे ही मंडळी खाल्ला होता या अर्थाने 'खाल्लेला' हाशब्द वापरतात.

आम्ही मागच्या आठवड्यात मुम्बईला गेलेलो. म्हनजे गेलो होतो. ते विशेषण म्हणून त्याचा वापरच करीत नाहीत. चक्क क्रियापद म्हणून करत्तत त्यालाच माझा आक्षेप आहे. मुळात गेल्या पाच दहा वर्षात ही अजब मराठी ऐकायला मिळते आहे. भूततकालीन क्रियापदांचाच ही मंडळी लोच्या करताहेत. बम्बैया हिन्दीत जसे 'गयेला है', आयेला है' तसला हा प्रकार....

हो माझा पण असाच एक अनुभव आहे मुंबईतील मराठीबद्दल.
आम्ही आमच्या मित्राकडे गेलो. त्याच्या बायकोनी छान स्वागत केलं.
त्याच्या घरापासुन ५ मिनिटाच्या अंतरावर दुसरा मित्र राहतो.
आम्ही मित्राला भेटुन तासाभरात येऊ असे म्हटल्यावर, वहीणी म्हणाल्या.
ठिक आहे तुम्ही जाउन या, तो पर्यंत मी जेवण करते.
माझी बायको अमरावतीची, तीला धक्काच बसला, ही बाई अशी काय बोलते.
मी क्षणाचा विलंब न करता बायकोचा गैरसमज दुर केला.
मुंबईत जेवन करते=स्वंयपाक करते असा अर्थ होतो.

मुंबईत जेवन करते=स्वंयपाक करते असा अर्थ होतो.

>>> कोकणात पण बर्‍याचदा असाच अर्थ असतो. जेवण बनवणे असा पण शब्दप्रयोग वापरतात.

अमरावतीला काय म्हणतात अशा वेळी? >>> म्माझी रूम मेट अमरावतीची होती. ती मराठीतून बोलली की आम्हाला सम्जायचंच नाही, "अगं मी खाली येऊन राह्यली" अस फोनवर एकदा म्हणाली. आम्ही आपले खालच्या ग्राऊन्डवर शोधतोय. पंधरा मिनिटानी बाईसाहेब येताना दिसल्या/ त्याच्या वाक्याच्या अर्थ "मी खाली येत आहे" असा होता.

बरेचदा अशुद्ध लिहिले जातात असे काही शब्द -

चूक - बरोबर

१. नेतृत्त्व - नेतृत्व
२. स्वत्त्व - स्वत्व
३. तज्ञ - तज्ज्ञ
४. गणितज्ज्ञ - गणितज्ञ
५. महतम - महत्तम
६. लघुत्तम - लघुतम
७. प्रतिक्षा - प्रतीक्षा
८. गिरीष - गिरीश (गिरी + ईश)
गिरिश ( गिरीवर शयन करणारा)
९. समिक्षा - समीक्षा
१०. मनोकामना - मनःकामना
- मनःशक्ति
- मनःस्वास्थ्य
- मनश्चक्षु
११. पुनर्प्रसारण - पुनःप्रसारण
१२. पुनर्स्थापना - पुनःस्थापना
१३. सहस्त्र - सहस्र
१४. स्त्रोत - स्रोत
१५. क्रिडांगण - क्रीडांगण
१६. प्रसुति - प्रसूति
१७. धुम्रपान - धूम्रपान
१८. कंदिल - कंदील
१९. जिर्णोद्धार - जीर्णोद्धार
२०. उर्जा - ऊर्जा
२१. प्रतिक - प्रतीक
२२. वडिल - वडील
२३. पोलिस - पोलीस
२४. नागरीक - नागरिक
२५. मंदीर - मंदिर
२६. क्षितीज - क्षितिज
२७. जाहीरात - जाहिरात
२८. दृष्य - दृश्य
२९. जीवाष्म - जीवाश्म
३०. अजय (ज्याचा जय होत नाही असा) - अजेय (जो जिंकला जाऊ शकत नाही असा)
३१. अद्ययावतता - अद्ययावत्ता
३२. अनावस्था - अनवस्था
३३. अनावृत्त (पत्र) - अनावृत
३४. अंतस्थ - अंतःस्थ
३५. अपर (इंदिरानगर) - अप्पर
३६. अप्पर (जिल्हाधिकारी) - अपर
३७. अमूलाग्र - आमूलाग्र
३८. अल्पसंख्यांक - अल्पसंख्याक
३९. ऋषिकेश - हृषीकेश
४०. कार्यकर्ती - कार्यकर्त्री
४१. दत्तात्रय - दत्तात्रेय
४२. दुराभिमान - दुरभिमान
४३. देशवासीयांना - देशवासींना
४४. नि:पक्ष - निष्पक्ष
४५. नि:पात - निपात
४६. निर्माती - निर्मात्री
४७. परिक्षित - परीक्षित् (सभोवार पाहणारा), परीक्षित (examined)
४८. परितक्त्या - परित्यक्ता
४९. पारंपारिक - पारंपरिक
५०. पुनरावलोकन - पुनरवलोकन
५१. पौरुषत्व - पौरुष / पुरुषत्व
५२. प्रणित - प्रणीत
५३. बुद्ध्यांक - बुद्ध्यंक
५४. बेचिराख - बेचिराग
५५. मतितार्थ - मथितार्थ
५६. मराठीभाषिक - भाषक
५७. महात्म्य - माहात्म्य
५८. मुद्याला - मुद्द्याला
५९. विनित - विनीत
६०. षष्ठ्यब्दी - षष्ट्यब्दी
६१. सहाय्य - साहाय्य
६२. संयुक्तिक - सयुक्तिक
६३. सांसदीय - संसदीय
६४. सुतोवाच - सूतोवाच
६५. स्वादिष्ट - स्वादिष्ठ
६६. सुवाच्च - सुवाच्य
६७. हत्येप्रकरणी - हत्याप्रकरणी

(आधार - व्याकरणशुद्ध लेखनप्रणाली - डॉ. सत्त्वशीला सामंत )

चिनूक्स
हे सगळे शब्द वरचा धागा एडीट करून तिथे टाकणार का, म्हणजे इथे कितीही पाने वाढली तरी चटकन सापडतील कोणालाही.

चिनूक्स, उत्तम!
अजून एक सतत दिसणारी घोडचूक म्हणजे 'ध्द' हे जोडाक्षर. त्याचे योग्य रूप 'द्ध' आहे. (उदा. उद्धव)

पूर्वी एकदा मी एका कार्यशाळेत गेलो होतो. तिथे मास्तरांनी सांगितले की 'इस्त्री' चूक. 'इस्री' बरोबर.
(इ + स् + त् + र + ई : चूक. इ + स् + र + ई : बरोबर)

पण सगळीकडे सर्रास (म्हणजे मी ज्यांना विश्वसनीय समजतो तिथेही) इस्त्री असेच दिसते. खरे काय आहे?

अमरावतीला काय म्हणतात अशा वेळी?>> स्वंयपाक करते असे म्हणतात.

अगं मी खाली येऊन राह्यली" अस फोनवर एकदा म्हणाली>> आमच्या विदर्भातील काही शब्द असे आहेत.
का / कशाला = काऊन
जात आहे = जाउन राहिलो.
येत आहे = येऊन रहिलो.
करत आहे=करुन राहिलो ( So On.....................)

जीडी, मला सहस्रबुद्धे आडनावाबद्दल अशीच शंका आहे. ते सहस्रबुद्धे असं हवं की सहस्त्रबुद्धे असं? सहस्र म्हणजे काय मुळात?

आपट्यांच्या संस्कृत शब्दकोशातील नोंदीनुसार 'सहस्र' ('स'ला 'र' जोडून) या शब्दाची व्याख्या 'सहस्रम् = समानं हसति' अशी दिली आहे. या व्याख्येतील 'हस्' या धातूचा त्याच शब्दकोशातील नोंदीनुसार 'हसणे' या उघड अर्थाशिवाय 'सारखे वाटणे, सदृश भासणे' असाही अर्थ होतो. त्यावरून '(सर्व) सारखेच भासण्याइतपत (मोठा समुच्चय)' असा भावार्थ 'सहस्रम् = समानं हसति' या व्याखेमागे असावा असा माझा कयास आहे. अर्थात, यावर निश्चित माहितीसाठी जाणत्यांनी प्रकाश टाकला, तर उत्तम!

>>पूर्वी एकदा मी एका कार्यशाळेत गेलो होतो. तिथे मास्तरांनी सांगितले की 'इस्त्री' चूक. 'इस्री' बरोबर.
<<

गजा, त्यांचं म्हणणं कदाचित योग्य असू शकेल (अर्थात, शुद्धलेखनाबद्दल जाणत्यांना विचारावं लागेल.), कारण इस्त्री / इस्री हा शब्द 'ijzer' (उच्चार : ऐत्सर (बहुतेक)) या समानार्थी डच नामावरून आपल्याकडे आला. पोर्तुगिजांपाठोपाठ द्वीपकल्पात वलंदेजांचा (डचांची; डचांना मराठेशाहीतील साहित्यात वलंदेज या नावाने उल्लेखलं आहे.) वावर वाढू लागला. त्याकाळात एतद्देशीयांची पाश्चात्यांच्या काही जिनसांशी ओळख झाली.. त्यात ऐत्सरही असावी. Happy
अर्थात, याबद्दल विश्वासार्ह संदर्भ आहेत काय, हे धुंडाळावं लागेल.

फ, इस्त्रि शब्द बरोबर असावा असे दिसते. खालील दुव्यावरून हा शब्द पोर्तुगीजमधून आल्याचे स्पष्ट दिसते आहे. त्यामुळे इस्रिचे लॉजिक जुळत नाही.....
http://books.google.co.in/books?id=3qk-p5hKuccC&pg=PA151&lpg=PA151&dq=is...

प्रसारमाध्यमांतील मजकुरांत/बोलण्यांत आणि लोकांच्या लिहिण्या-बोलण्यांत हल्ली एक अतिशय ढोबळ चूक आढळते. 'ठाकरे', 'मुंडे' वगैरे एकारान्त आडनावांची रूपे 'ठाकरेंनी, ठाकरेंचा', 'मुंडेंचे' अशी चुकीची वापरली जातात. ही रूपे खरं तर 'ठाकर्‍यांनी', 'ठाकर्‍यांचा', 'मुंड्यांचे' अशी वापरायला हवीत.
तशीच गफलत 'जोशी', 'आझमी' (:फिदी:), 'गडकरी' या ईकारान्त आडनावांबाबत दिसत आहे. 'जोशींना', 'आझमींनी', 'गडकरींना' अशी चुकीची रूपे वापरली जातात. त्याऐवजी 'जोश्यांना', 'आझम्यांनी', 'गडकर्‍यांना' अशी योग्य रूपे वापरायला हवीत ('शेतकरी' या ईकारान्त नामाप्रमाणे).

>> 'इस्त्री' हा शब्द पोर्तुगिजीतून आल्याचे स्पष्ट दिसते आहे.<<
धन्यवाद रॉबिनहूड!

'आपण दिलेला वेळ आणि केलेल्या प्रयत्नांबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत.'
'आपण दिलेल्या वेळासाठी आणि केलेल्या प्रयत्नांबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत.'

यामध्ये व्याकरणदृष्ट्या बरोबर कोणते आहे? की दोन्ही बरोबर आहेत?

नाही. 'वेळासाठी' मला बरोबर वाटते. यामागचा संदर्भ एखाद्या कामासाठी दिवसातला काही वेळ(काळ) काढून 'दिला' असा असावा. ११:३० ची वेळ 'दिली' नाही. Happy

Pages