शब्दाचे योग्य रूप कोणते?

Submitted by चिनूक्स on 20 April, 2009 - 09:29

एखादा शब्द कसा लिहायचा, याबाबत काही अडचण असल्यास कृपया इथे विचारा.

बरेचदा अशुद्ध लिहिले जातात असे काही शब्द -

चूक - बरोबर

१. नेतृत्त्व - नेतृत्व
२. स्वत्त्व - स्वत्व
३. तज्ञ - तज्ज्ञ
४. गणितज्ज्ञ - गणितज्ञ
५. महतम - महत्तम
६. लघुत्तम - लघुतम
७. प्रतिक्षा - प्रतीक्षा
८. गिरीष - गिरीश (गिरी + ईश)
गिरिश ( गिरीवर शयन करणारा)
९. समिक्षा - समीक्षा
१०. मनोकामना - मनःकामना
- मनःशक्ति
- मनःस्वास्थ्य
- मनश्चक्षु
११. पुनर्प्रसारण - पुनःप्रसारण
१२. पुनर्स्थापना - पुनःस्थापना
१३. सहस्त्र - सहस्र
१४. स्त्रोत - स्रोत
१५. क्रिडांगण - क्रीडांगण
१६. प्रसुति - प्रसूति
१७. धुम्रपान - धूम्रपान
१८. कंदिल - कंदील
१९. जिर्णोद्धार - जीर्णोद्धार
२०. उर्जा - ऊर्जा
२१. प्रतिक - प्रतीक
२२. वडिल - वडील
२३. पोलिस - पोलीस
२४. नागरीक - नागरिक
२५. मंदीर - मंदिर
२६. क्षितीज - क्षितिज
२७. जाहीरात - जाहिरात
२८. दृष्य - दृश्य
२९. जीवाष्म - जीवाश्म
३०. अजय (ज्याचा जय होत नाही असा) - अजेय (जो जिंकला जाऊ शकत नाही असा)
३१. अद्ययावतता - अद्ययावत्ता
३२. अनावस्था - अनवस्था
३३. अनावृत्त (पत्र) - अनावृत
३४. अंतस्थ - अंतःस्थ
३५. अपर (इंदिरानगर) - अप्पर
३६. अप्पर (जिल्हाधिकारी) - अपर
३७. अमूलाग्र - आमूलाग्र
३८. अल्पसंख्यांक - अल्पसंख्याक
३९. ऋषिकेश - हृषीकेश
४०. कार्यकर्ती - कार्यकर्त्री
४१. दत्तात्रय - दत्तात्रेय
४२. दुराभिमान - दुरभिमान
४३. देशवासीयांना - देशवासींना
४४. नि:पक्ष - निष्पक्ष
४५. नि:पात - निपात
४६. निर्माती - निर्मात्री
४७. परिक्षित - परीक्षित् (सभोवार पाहणारा), परीक्षित (examined)
४८. परितक्त्या - परित्यक्ता
४९. पारंपारिक - पारंपरिक
५०. पुनरावलोकन - पुनरवलोकन
५१. पौरुषत्व - पौरुष / पुरुषत्व
५२. प्रणित - प्रणीत
५३. बुद्ध्यांक - बुद्ध्यंक
५४. बेचिराख - बेचिराग
५५. मतितार्थ - मथितार्थ
५६. मराठीभाषिक - भाषक
५७. महात्म्य - माहात्म्य
५८. मुद्याला - मुद्द्याला
५९. विनित - विनीत
६०. षष्ठ्यब्दी - षष्ट्यब्दी
६१. सहाय्य - साहाय्य
६२. संयुक्तिक - सयुक्तिक
६३. सांसदीय - संसदीय
६४. सुतोवाच - सूतोवाच
६५. स्वादिष्ट - स्वादिष्ठ
६६. सुवाच्च - सुवाच्य
६७. हत्येप्रकरणी - हत्याप्रकरणी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मराठीत 'क्श' असा माझ्या मते 'ओक्साबोक्शी' या शब्दात(च) लिहिला जातो. असे दुसरे शब्द आत्ता तरी आठवत नाहीत.

क्ष हा मूर्धन्य उच्चार. क् + ष

धन्यवाद क्ष. Happy
क्लिओ Happy

क्लिओ, ओक्साबोक्शी म्हणजे अगदी मरहाट्टी शब्द हुडकला. Happy

बाकी मराठी लिखाणात वापरले जाणारे इंग्रजी शब्द भरमसाठ आठवले - इन्जेक्शन, इन्फेक्शन, परफेक्शन वगैरे.

असत्ये, करत्ये, जात्ये हे शब्द असे लिहीने चुकीचे आहेत असे वाटते. ते असते, करते असेच असायला हवेत.

बहुदा कोब्रांच्या प्रभावामुळे ते तसे लिहीले जातात, खरे रुप असते च आहे हे कोणी कन्फर्म करेल काय?

(तटी देब्रा, कोब्रा वा इतर कुठलाही वाद ह्यात सुरु करायचा नाही, भाषेवर ती बोलनारांचा प्रभाव असतो म्हणून ते वाक्य आहे. )

मला वाटतं देब्रा,कोब्रा पेक्षा ही असत्ये, करत्ये ही भाषा जुन्या काळी वापरली जायची.

करत्ये हे 'करत आहे' / 'करते आहे' चं (अशुद्ध) संक्षिप्त रूप आहे. काही 'करत्ये' लिहितात तर काही 'करतेय' लिहितात. (कों.चा प्रभाव किंवा काय हे माहीत नाही. Happy )

तसंच 'निघाल्ये' हा 'निघाले आहे'चं (अशुद्ध) संक्षिप्त रूप.

हं. मलाही तसेच वाटायचे, पण मी जेंव्हा पहिलेंदा पुण्यात आलो तेंव्हा करत्ये, जात्ये असेच बोलले आणि लिहीले जायचे. ते अशुद्ध आहेत असे वाटायचे, पण खात्री होत न्हवती. Happy म्हणून कन्फर्म केले.

बाकी आधी लिहील्या प्रमाने भाषेवर बोलनार्‍यांचा प्रभाव असतोच. त्यामुळे करत्ये ह्या रुपाला माझा काही विरोध नाही. Happy

'कुणी?' बरोबर असतं कां 'कोणी?' म्हणजे इथे कुणी सांगेल कां? की इथे कोणी सांगेल का?

हे कुठे टाकावे कळत नव्हते, म्हणून ईथे लिहीतोय.

"I never said she stole my money" has 7 different meanings depending on the stressed word

I never said she stole my money - someone else said it
I never said she stole my money - I never said it
I never said she stole my money - I only implied it
I never said she stole my money - I said someone did, not necessarily her
I never said she stole my money - I considered it borrowed, even though she didn't ask
I never said she stole my money - only that she stole money
I never said she stole my money- she stole stuff which cost me money to replace

'कुणी?' बरोबर असतं कां 'कोणी?'>>>>

नाकातुन बोलायचे असेल तर 'कोणी', सरळ बोलायचे असेल तर 'कुणी'.

'अशा' बरोबर की 'अश्या'?

----------------------------------------------------------
राम का गुणगान करिए | रामप्रभू की भद्रता का, सभ्यता का ध्यान धरिए |

'अशा' हे शुद्ध रूप आहे. स्त्रीलिंगी अनेकवचनी रुपासाठी 'अश्या' हे रूप वापरण्याचा प्रघात होता. मात्र नवीन नियमांनुसार 'अशा' , 'तशा' ही रुपे वापरली जावीत.

चिनूक्स, धन्यवाद. इथे आलटून पालटून दोन्ही वापरलेली आढळली तेव्हा विचारले.

----------------------------------------------------------
राम का गुणगान करिए | रामप्रभू की भद्रता का, सभ्यता का ध्यान धरिए |

देदीप्यमान बरोबर का दैदिप्यमान?

मला पहिलं वाटतंय, पण दुसरंही खूप ठिकाणी पाहिलंय.

देदीप्यमान खरे बरोबर. पण आता देदिप्यमान आणि दैदिप्यमान असे दोन्ही लिहिले जाते. ( आधार : मोल्सवर्थ कृत मराठी-इंग्रजी शब्दकोष )

आत्तापर्यंत पुस्तकातून दैदिप्यमान असेच वाचले आहे . तेच बरोबर वाटते पण . अर्थात असं वाटण्याला आधार नाहीये कसला . Happy

पण 'अनावृत' शब्दाविषयी थोडी माहिती लिहितो.

स्वाती, तू दिलेल्या दुसर्‍या लिंकेत 'अनावृत' ('त'ला 'त' न जोडता) असा योग्य शब्द दिला आहे. पहिल्या लिंकेतील मोल्सवर्थाच्या शब्दकोशातली नोंद 'अनावृत्त' हाही ग्राह्य शब्द असला, तरीही त्याचा तिथे नोंदवलेला अर्थ योग्य नाही. कारण खालीलप्रमाणे :

१. झाकलेले/ दडवलेले/ गुप्त अशा अर्थाने शब्द योजायचा झाल्यास 'आवृत' हे विशेषण वापरतात (लक्षात ठेवण्याजोगे : येथे 'त'ला 'त' जोडला नाही; एकट्या 'त'ने शब्द संपतो.). 'आवृत' हे विशेषण (नेमकेपणे सांगायचं झाल्यास कर्मणी भूतकालवाचक धातुसाधित विशेषण) 'आवृ - आवृणोति' या संस्कृत धातूपासून बनले आहे. या धातूचा, म्हणजेच क्रियापदाचा, अर्थ 'झाकणे, वेष्टिणे, दडवणे' असा आहे. त्यापासून क.भू.धा.वि. बनवून 'आवृत' हा 'झाकलेले, वेष्टिलेले, दडवलेले' अशा अर्थाचा शब्द बनतो.
संस्कृतातलं 'आवरणम्' (म्हणजे मराठीतलं 'आवरण') हे साधित विशेषण/नाम याच 'आवृ - आवृणोति' धातूवरून बनलंय. 'आवरण' - 'अनावरण' हे मराठीतले शब्द ओघाने याच धातूवरून आले आहेत. किंबहुना, मराठीतले 'आवरणे' हे क्रियापद 'आवृ - आवृणोति'चा मराठी अवतार. बर्‍याचदा 'आवरणे'चा अर्थ आपण '(वस्तू) नीट-नेटक्या पद्धतीने ठेवणे' असा घेतो; पण त्याचा मूळ अर्थ 'झाकणे, वेष्टणाआड दडवणे' (थोडक्यात झाकपाक करणे Happy ) असा आहे.

अजून एक मासला द्यायचा तर संस्कृतातील सरस्वतीस्तोत्रातील :
"या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता" या चरणामध्ये सरस्वतीला 'शुभ्रवस्त्रावृता' अशा विशेषणानं उल्लेखलंय. 'शुभ्रवस्त्रावृता' = 'शुभ्रवस्त्राने आवृत अशी' एतदर्थाच्या शब्दयोजनेत 'आवृत' या विशेषणाचा अर्थ अप्रत्यक्षपणे ठळक होतो.

२. 'आवृत्त' या विशेषणाबद्दल : 'आवृत्त' ('त'ला जोडून 'त') हे विशेषणही ग्राह्य शब्द आहे; मात्र याचे मूळ वेगळे असल्यामुळे वरील परिच्छेदात विवरलेल्या 'आवृत' या विशेषणापेक्षा याचा अर्थही वेगळा आहे. 'आवृत् - आवर्तते' या मूळ संस्कृत धातूपासून बनलेले कर्मणी भूतकालवाचक धातुसाधित विशेषण म्हणजे 'आवृत्त'. 'आवृत् - आवर्तते' या धातूचा, अर्थात क्रियापदाचा, अर्थ 'क्रमानुसार पुन्हा पुन्हा (काही गोष्टी) घडणे, आवर्तणे' (इंग्लिशीत 'to repeat') असा होतो. या धातूपासून बनलेल्या 'आवृत्त' या क.भू.धा.वि.चा अर्थ '(चक्रनेमिक्रमाने) आवर्तन घडलेले' असा होतो.
संस्कृतातील 'आवृत्ति' हे नाम व त्याचेच मराठीतील प्रतिरूप - 'आवृत्ती' हे नामदेखील 'आवृत् - आवर्तते' धातूपासून बनलेली साधित नामे आहेत (अर्थ : पुन्हा घडलेली घटना; इंग्लिशीत Repetition).

बापू करंदीकरांच्या पत्राच्या संदर्भात 'जाहीर', 'न लपवलेले' अशा अर्थाने विशेषण योजायचे असल्याने 'अनावृत' हेच रूप योग्य ठरते.

आवृत्त या शब्दाचा एक अर्थ enclosed, wrapped असाही आहे. दुसरा एक अर्थ 'बहिणीचा नवरा, म्हणजे मेहुणा' असा आहे Happy अर्थात 'अनावृत पत्र' हाच प्रयोग योग्य आहे.

>> पहिल्या लिंकेतील मोल्सवर्थाच्या शब्दकोशातली नोंद 'अनावृत्त' हाही ग्राह्य शब्द असला, तरीही त्याचा तिथे नोंदवलेला अर्थ योग्य नाही.
फ मग तू दिलेल्या 'आवृत्त' च्या अर्थानुसार 'अनावृत्त' चा अर्थ काय?
>>आवृत्त या शब्दाचा एक अर्थ enclosed, wrapped असाही आहे.
मग बापूंच्या पत्राच्या संदर्भात 'जाहीर', 'न लपवलेले' अशा अर्थाने 'अनावृत्त' का चूक आहे? की 'अनावृत्त' हा शब्दच अस्तित्वात नाही?

दोन चुकीचे लिहीले जाणारे शब्दः अट्टाहास व आंघोळ. त्यांची योग्य रुपे 'अट्टहास' व 'अंघोळ' आहेत.

बर्‍याच वेळा (allowed to go) "जाऊ दिले" हे "जाऊन दिले" असे बोलले/लिहिले जाते. माझ्या मते पहिले बरोबर आहे. तुमचे काय मत?

Pages