मायबोली प्रशासकांना खुले पत्र

Submitted by कॉपरमाईन on 3 November, 2015 - 11:58

मान्यवर मायबोली प्रशासक,

सप्रेम नमस्कार,

गेल्या सुमारे चार-साडेचार महिन्यांपासून मी www.maayboli.com या संस्थळावर सदस्य आहे. मायबोलीचे सदस्यत्वं मी एका विशीष्ट हेतूने घेतले होते. वेगवेगळ्या भाषांतील संस्थळांवर विविध क्षेत्रातील लोकांचा असलेला वावर, त्यांची अभिव्यक्ती, संस्थळाच्या माध्यमातून जाणिवपूर्वक आणि अजाणतेपणी पसरवण्यात येत असलेले विचार आणि या सगळ्यात संस्थळाच्या अधिकारीवर्गाची भूमिका त्यांचा तौलानिक अभ्यास करण्याची कामगिरी माझ्या टीमवर सोपवण्यात आलेली आहे. टीममधील मराठी सदस्यांपैकी एक म्हणून माझ्यावर एकंदर ३ मराठी संस्थळांचा अभ्यास करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. मायबोली हे त्यापैकीच एक संस्थळ.

एक मराठी संस्थळ आणि त्यावर असलेलं साहित्यं आणि माहिती म्हणून मायबोली इतर काही मराठी संस्थळांच्या तुलनेत निश्चितच उजवी आहे यात शंका नाही. अनेक वेगवेगळ्या विषयांवरील विपुल लेखन - कथा, कादंबर्‍या, चिंतनात्मक लेख, पाककृती, वैद्यकीय, गिर्यारोहण, आरोग्य, पर्यावरण आणि निसर्ग संवर्धन अशा विविध विषयांवरील प्रचंड माहिती मायबोलीवर आहे. अनेक वेगवेगळ्या विषयावरील कविता, मराठी गझला, विडंबनं यांचीही इथे रेलचेल आहे. अनेक सदस्यांचं सकस लेखन मायबोलीवर आहे. केवळ वाचनमात्रं असलेल्या सदस्यांनाही निखळ वाचनाचा आनंद देऊन जाईल असं भांडार इथे आहे. अनेक मराठी कार्यक्रमांवरचे आणि खासकरुन बथ्थड मालिकांवरचे धागे आणि चित्रपट परिक्षणं ही चार घटका करमणूकही आहे.

मायबोलीवरील माझा सदस्यत्व कालावधी केवळ साडेचार महिन्यांचा. मायबोली हे संस्थळ म्हणून सुमारे पंधरा वर्षांपेक्षा जास्त कार्यरत असल्याने आधी घडून गेलेल्या कित्येक घटनांची मला कल्पना असणं शक्यं नव्हतं. यासंदर्भात जाणून घेण्यासाठी मी अनेक मायबोली सदस्यांशी संपर्क साधला. काही अपवाद वगळता बहुतेकांनी अतिशय आपलेपणाने मदत केली. वसुधैव कुटुंबकम् या उक्तीला जागणारे अनेक मराठी सृजन जगभरात पसरलेले आहेत हे चित्रं खूप आश्वासक आहे.

वरवर पाहता हे चित्रं खूप सुंदर आहे, परंतु....

ग्रूपिझम अर्थात कंपूबाजी हा न टाळता येण्याजोगा आजार मायबोलीला आहेच!

एखाद्या विशिष्ट प्रदेशातील, किंवा शहरातील लोकांचा ग्रूप असणं हे अनपेक्षित नाही, उलट परदेशांत असल्यास अशा ग्रूप्सच्या माध्यमातून आपल्या आसपास असलेले आपल्या मायभूमीतले लोक भेटणं हा अशा ग्रूप्सचा मोठा फायदा असतो. एखाद्या नवीन प्रदेशात आपण जात असल्यास तिथे आधीपासूनच राहत असलेल्या लोकांची ओळख असणं, त्यांच्याकडून माहिती मिळणं हा मोठा आधार असतो. विशेषतः तिथे राहण्याचा कालावधी लांबचा असल्यास ही माहिती फार महत्वाची ठरू शकते. दुर्दैवाने मायबोलीवरच्या ज्या दोन-तीन ग्रूप्समध्ये या माहितीची चौकशी केल्यावर एकच उत्तर मिळालं - गूगल करा! गूगल कोणालाही करता येईल, गूगलवर माहितीही मिळेल, परंतु वर्षानुवर्षे तिथे राहत असलेल्यांचे अनुभव गूगलपेक्षा मोलाचे असणार नाहीत का?

ग्रूपिझमचा दुसरा उबग आणणारा प्रकार म्हणजे अर्थातच राजकारण!

मायबोलीवरील अनेक सदस्यांचं चरण्याचं राखीव कुरण म्हणजे राजकारणाला वाहिलेले धागे, अड्डे, कट्टे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. देशातील काँग्रेस आणि भाजप या दोन प्रमुख पक्षांना तन-मनाने अर्पण असलेले लोक जो काही धुमाकूळ घालतात ते पाहिल्यावर पुलं च्या पाळीव प्राणी या लेखातील - एकमेकांवर भुंकण्यात म्युन्सिपालटीचे सदस्य कुत्र्यांनाही हार जात नसल्याने कुत्र्यांना आपल्या मर्यादांची जाणिव असेल याबद्दल मला खात्री आहे या वाक्याची आठवण झाल्याशिवाय राहवत नाही.

तुम्ही आमच्या पक्षाचे समर्थक नाही ना, मग चालते व्हा पाकिस्तानात ही भाजप समर्थकांची जनरल विचारसरणी काय, किंवा भाजपचे सरकार आल्यापासून सर्वस्व लुटलेल्या सिंध्याप्रमाणे उर बडवत फिरणार्‍या आणि शेंडा-बुडखा नसलेले आरोप करत सुटणार्‍या काँग्रेस समर्थकांची विचारसरणी काय, दोन्हीही सारख्याच नाहीत काय? महत्वाचं म्हणजे काँग्रेस किंवा भाजप यांचे समर्थक नसलेलेही इतर लोक अस्तित्वात असू शकतात आणि ते आम आदमी पार्टीछाप पक्षाच्या भजनी मंडळात नसू शकतात हेच मुळात राजकीय धाग्यांवरच्या महाभागांना मान्य नाही तिथे काय बोलणार? कोणतीही चर्चा मग ती राजकीय असो वा नसो कोणत्याही मुद्द्यावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप, मोदी विरुद्ध सोनिया किंवा राहुल गांधी, दीड वर्ष विरुद्ध ६५ वर्षांचा हिशोब यावर आणण्याची आवश्यकता आहे का? राजापेक्षा राजनिष्ठच जास्तं कडवे असतात आणि बाटगा हा सर्वात जास्तं धर्मनिष्ठ असतो या उक्तीचं वरचेवर प्रत्यंतर देणार्‍या या धाग्यांचा सामान्यं सदस्यांना किती उबग येत असेल याचा हे आक्रस्तळी सदस्य कधीतरी विचार करतात का? मुळात आत्मपरिक्षण नावाचा काही प्रकार असतो हे किती जणांच्या गावी आहे? दुर्दैवाने एकेकाळी चांगलं लेखन करणारे लोकही राजकारणाच्या या विकाराला बळी पडले आहेत. अभिव्यक्तीचा अभिनिवेश न राहता आवेश संचारला की काय होतं याचं उत्तम उदाहरण म्हणून राजकारणाच्या धाग्यांकडे बोट दाखवता येईल.

राजकीय धाग्यांचा दुसरा प्रकार म्हणजे अत्यंत साळसूदपणे नवनवीन जातीय वाद निर्माण करणे आणि त्याला चलाखीने ब्राम्ह्ण विरुद्ध अब्राम्हण, हिंदू विरुद्ध मुस्लिम, ३ टक्के विरुद्ध इतर, पिढ्यानपिढ्यांचे अत्याचार याचं वळन देऊन त्याबद्द्ल पद्धतशीरपणे बुद्धीभेद पसरवणे. यात तरबेज असलेले अनेक सिद्धहस्त सदस्य मायबोलीवर आहेत. जातीभेदाला विरोध करण्याच्या नावाखाली प्रत्येक प्रतिक्रियेत चलाखीने जातीयवाद पसरवण्याच्या त्यांच्या हातोटीपुढे अनेकांनी हात टेकले आहेत. त्यांच्याच जोडीला देशविघातक अतिरेकी तत्वज्ञानाचं समर्थन करणारे आणि एम आय एम सारख्या पक्षाचे छुपे आणि उघड समर्थकही इथे आहेत. मायबोलीच्या माध्यमातून समाजात तेढ निर्माण करणारे विचार आपण पसरवत आहोत हे यांच्या गावी तरी नाही, किंवा समजून-उमजून हे विचार पसरवणं सुरु आहे. सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने अत्यंत घातक असलं तरी आमचा हेतू साध्य होतो आहे ना? मग बास!

मायबोलीवरील सर्वात उबग आणणारा आणि संतापजनक प्रकार जर कोणता असेल तर तो म्हणजे इथल्या सदस्यांवर करण्यात येणारे वैयक्तीक हल्ले. एखाद्या सदस्यावर आपल्या जुन्या विरोधकाचा डुप्लिकेट आयडी असल्याचा आरोप करणं हे तर अगदीच क्षुल्लक वाटावं अशी एकापेक्षा एक अश्लाघ्य वक्तंव्य इथे केली जातात. एकमेकांचे संस्कार जाहिररित्या काढले जातात, मनोरुग्ण, विकृत, भिकारचोट (नाईलाजाने लिहावं लागत आहे) असल्या शेलक्या विशेषणांची बरसात असतेच, परंतु सदस्याच्या वैयक्तीक, वैद्यकीय आणि कौटुंबिक परिस्थितीवरुनही अत्यंत अपमानास्पद शब्दांत संबोधनं दिली जातात जी केवळ तिरस्कारणीय आहेत. दोन दिवसांपूर्वीच पाहण्यात आलेला एक प्रकार म्हणजे एका अत्यंत गलिच्छा शिवीशी साधर्म्य दाखवणारं संबोधन पंतप्रधानांसाठी वापरणं आणि ते कसं योग्यं आहे याचं निरर्गल समर्थन करणं! समोरच्या व्यक्तीविषयी आपल्याला काहीही माहित नसताना त्याच्याबद्दल काहिही बरळण्याची ही हिणकस मानसिकता कधी सुधारणार आहे का? आपण स्वतः गेंड्याच्या कातडीचे आहोत म्हणून समोरचाही तसाच असेल, आपल्या विकृतीमुळे त्याला त्रासच व्हावा ही इच्छा असल्यामुळे हे लोक सुधारण्यापलीकडे गेलेले आहेत हेच खरं!

या सगळ्या प्रकारात प्रशासक म्हणून आपण काही अंशी तरी अपयशी ठरलेले आहात असं खेदाने नमूद करावसं वाटतं. मायबोलीवर चाललेल्या तमाशांमुळे आज कित्येक जुने सदस्य एकही वाक्यं लिहीण्यास धजावत नाहीत. कारण कोण कसला अश्लाघ्य वैयक्तीक आरोप करेल याची काहिही शाश्वती नाही. असल्या प्रवृत्तींना वेळीच आवर घालण्यात आपल्याला फारसं यश येत नाही हे वेळोवेळी दिसून आलं आहे. प्रशासक मंडळातील काही सदस्यं हे वरकरणी आपण निष्पक्ष असल्याचा आव आणत असले तरी एका विशिष्ट कंपूच्या कारवायांकडे हे लोक डोळेझाक करतात हे लपून राहिलेलं नाही.

मायबोलीच्या एका जुन्या जाणत्य सदस्याशी झालेल्या चर्चेअंती त्यांनी व्यक्तं केलेलं मत मायबोलीच्या सद्यस्थितीबाबत भाष्यं करुन जातं. त्या म्हणाल्या, "आजकाल मायबोलीवर असतं काय? तेच ते राजकारणावरचे धागे, तीच कंपूबाजी आणि तमाशे! मायबोलीवर येण्याची आजकाल इच्छा होत नाही! लाज वाटते असल्या लोकांची आणि त्यांच्या विचारांची!"

अद्यापही वेळ गेलेली नाही असं निदान माझं वैयक्तीक मत आहे. प्रत्येकाने - अगदी प्रशासकांपासून सामान्य सदस्यांपर्यंत आत्मपरिक्षण करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक बाबतीत आपलंच मत शेवटचं हा हेका सोडायला हवा! विघातक प्रवृत्ती सर्वत्र असतात, परंतु त्यांना प्रबळ होऊ द्यायचं का मायबोलीचं सकस साहित्य आणि माहितीचं भांडार म्हणून अस्तित्व टिकवून ठेवायचं हे शेवटी आपल्याच हाती आहे.

मायबोलीवरील अनेक धाग्यांवर असलेल्या माझ्या पोस्ट्स या त्यावर काय प्रतिक्रीया येतात हे आजमावण्यासाठी लिहीलेल्या होत्या. त्यामागे कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. तसाच तो या पत्रातही तो नाही. यापुढे कोणत्याही धाग्यावर माझी पोस्ट दिसणार नाही.

आपली नम्र
वैष्णवी धारप

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>> लिम्ब्या तू कोणत्याही पाटीला दाद देणार नाहीस कारण तुला खात्री आहे तुझे (च) बरोबर असते <<<<<
असच काही नाही हं हूडा.... दाद द्यावी लागतेच रे..." मागल्या विलेक्शनच्या आधी" असे म्हणलय मी वर.... येतय ना लक्षात? आता मोदी फेल गेले अस्ते तर केवढ्याला पडले अस्ते?? नै का? "हिसाबच" निघाला अस्ता आम्चा..... Wink नशिब आमचे थोर बर.... तर तेव्हाही पंख आवरुनच घेतले होते म्या.... Proud

तुज्या वाक्याचा उर्वरित भाग..... "कारण तुला खात्री आहे तुझे (च) बरोबर असते " परसेप्शन की कायतरी म्हणतात ते हेच का?

हुडा, बघु, तुझी सूचना, प्रयत्न करु तसा. जसा जमेल तसा.

बाकी असल्या आयड्या उडवणे हा उपाय होऊ नाही शकत.
उलट मी असल्या आयडी व त्यामागच्या व्यक्तिंचे आभारच मानतो, की ज्या धोक्याबद्दल सांगायला राहुदेच, असे काही असते, वा भारतात असे काही घडते आहे हे सांगायला मला गेल्या दहा वर्षात जमले नाही, उलट माबोवरीलच एका जुन्याजाणत्या आयडीने दहाबारा वर्षांपूर्वी मला विचारले होते की "लिम्ब्या तुला कुठे दिस्तोय जातीयवाद.... तुझे आपले कैतरीच".
तर मला माझ्या सूक्ष्म दृष्टीला दिसणारा बोचणारा तो जातीयवाद/ब्राह्मणद्वेष्टेपणा, आता हिमालयासारखा "मोठ्ठा" करुन दाखविल्याबद्दल, व त्यामुळे तमाम जन्तेला आपसुकच सावध केल्याबद्दल मी उलट या ब्रिगेडी/कम्युनिस्ट आयडीन्चे आभारच मानतो. Proud

(मी नेहेमीच सकारात्मक विचार करतो...... म्हणुनच आभार मानु शकतो. बाकी कैक जण त्यांच्या शब्दाला शब्द फोडत अन त्यांच्यासारखाच आक्रस्ताळी प्रतिसाद देऊ लागतात.... मी तसे कधीच करत नाही/करणार नाही. मी वाईटातल्या वाईटातुनही "चांगलेच" हुडकुन/उपसुन काढीन अन त्याच चांगल्याने त्याच वाईटावर मात करीन. आजवर तसेच तर करत आलो आहे..... Happy )

सुनियाद, अहो धाग्याचा विषय काये, अन तुम्ही इथे असा कसल्यातरी भितीने पांढर्‍याफिटुक्क पडलेल्या कुठल्यातरी अशक्त आजारी स्त्रीचा फोटो का डकवताय? Proud आहे का काही विषयाचा अन त्या फोटुचा संबंध?

>>स्वतः काड्या करायच्या, वरतून बोंबा मारायच्या. कंटीन्युअसली आम्हा चार लोकांच्या मागे लागल्यासारखे >>वागायचे, ही या अभद्र कंपूची उबग आणणारी ओंगळवाणी सवय आहे. गेल्या काही दिवसांत यांनी वाहत्या >>पानांवर घातलेला गोंधळ पाहिला तर सगळ्यांनाच हे समजेल. (स्क्रीनशॉट्स आहेतच.)
>>सरळ चर्चा करताच येऊ नये अशी काळजी घेऊन विखार पसरवणार्‍या या कंपूने माबोची वाट लावलेली आहे, हे >>सांगण्यासाठी खूप दिवसांनी आज इथे लिहिले आहे.

स्वतःच केलेल्या गोष्टी इतरांनी केल्या असे लिहिता ?
असो, अजुनही दोन्ही गटांनी हे सर्व थांबवा. कारण तोडणे सोपे, जोडणे अवघड.

कसल्यातरी भितीने पांढर्‍याफिटुक्क पडलेल्या कुठल्यातरी अशक्त आजारी स्त्रीचा फोटो >>>> Biggrin

स्वतःच केलेल्या गोष्टी इतरांनी केल्या असे लिहिता ?
असो, अजुनही दोन्ही गटांनी हे सर्व थांबवा. कारण तोडणे सोपे, जोडणे अवघड.
<<

कट्टा कंपूतील "निष्पक्ष" महेश, खोटे किती बोलणार आहात? जनाची नसेल तरी मनाची ठेवावी असे म्हणतात मराठी भाषेत.

रॉहू, तुमची मागच्या पानावरची ३.३६ ची पोस्ट परफेक्ट आहे.
जी मंडळी ह्या पत्रातला हेतू महत्वाचा आहे, पत्र कुणी लिहिलंय हे महत्वाचं नाही हे सुचवतायत त्यांच्याकडेही काही उपाय दिसत नाहीत इथल्या प्रॉब्लेम्सवर. दुर्लक्ष करणं हा उपाय असेल तर तोच बरेच जणं अवलंबतात ज्यांना चिखलात उतरायची, अंगावर उडवून घ्यायची आवड नाही.

त्यापेक्षा अशा शोची तिकिटे खरेदी न करून असे बीबी ओस पाडावेत असे मी सुचवीन.... >> रॉहू हि टोळधाड इतर बाफांवर पण येत असते हो. क्रिकेट सारख्या बाफावर पण येऊन गेली. तेंव्हा नुसते इग्नोर करा लिहिणे सोपे असले तरी फक्त वाचणार्‍यांचाच नाहीतर सिरीयसली काही लिहिणार्‍यांचाही प्रश्न आहेच कि.

रॉहू +१
असामी, टोळधाड आली की काय हा प्रॉब्लेम आहे.
पण सोल्युशन म्हणजे
१. admin ने पोस्ट नी पोस्ट मोडरेट करणे : शक्य नाही.
२. तिकडे लिहिणाऱ्यां सेन लोकांनी कडक शब्दांत समज देणे. जी दिली जाते. तरीही लोक थांबत नाहीत. त्यावर admin कडे तक्रार. केली तरी राउंड ट्रीप टाईम बराच असतो आणि रिअल टाईम रिस्पोन्स शक्य नाही, हे सगळेच मान्य करतात.
३. त्या पोस्ट कडे दुर्लक्ष करून सिरीयस लोकांनी लिहिणं चालू ठेवणं. जे तू म्हणतोयस अनोयिंग आहे आणि लोक डिस्करेज होतात.
४. सगळ्यात जालीम उपाय दिसतो, तो म्हणजे अशा लोकांना (नोट लोकांना. आयडीना नाही, पोस्टना नाही) वाळीत टाकणे. जे अनेक इंतेलेक्चूअल लोकांना कदापि शक्य नाही. कारण जर मुद्दा महत्त्वाचा आहे तर कोणी लिहिलाय हे का बघा भले ती व्यक्ती नोईस क्रीयेटिंग, न्युसंस असेल तरी आपण ४२ न्द चान्स द्यायला जातोच. कारण व्यक्ती कधीही वाईट नसते, प्रवृती असते आणि ब्ला ब्ला ब्ला.
५. मग शेवटचा पर्याय, १-३ करून जे जे होईल ते ते पहावे. आपल्या कोशात जावे, मजा करावी. जोक करून हसावे.
पोप्कोर्ण खावे. कंटाळा आला, वेळ असला की पूर्वीचे दिवस करून टिपं गाळावी. झालं.

असामि, हे क्रिकेटचे मला उद्देशुन असणार तुम्हाला सचिनच्या मागे नाचायचे तर नाचा इतरांनी नाचावे असा आग्रह का? मोदीला काही बोलले तरी टिका, सचिन हा सुमार प्लेयर वाटला तरी टिका काय चाललेय काय?तुमच्या मताप्रमाणे जग चालत नाही तुम्हाला ज्या गोष्टि चांगल्या वाटतात त्या इतरांच्या द्रुष्टिने टाकाउही असु शकतात.

क्रिकेट सारख्या बाफावर पण येऊन गेली. तेंव्हा नुसते इग्नोर करा लिहिणे सोपे असले तरी फक्त वाचणार्‍यांचाच नाहीतर सिरीयसली काही लिहिणार्‍यांचाही प्रश्न आहेच कि.>> +१. राजकारणाच्याच काय पन खेळ, चित्रपट आणि इतर बीबींवरही अनेकदा असले ट्रोल्स येऊन नाचून जातातच. कितीही इग्नोर करायचं म्हटलं तरी यांच मूर्खपणा इतरांनी का सहन करावा?

हुडांच्या पोस्टी एकदम सौ टका आहेत. खरंच कळकळ असेल तर वर लिहिलेला लेख डिलीट करून तिथे त्या पोस्टी डकवा असं मी सुचवेन Happy

रच्याकने, काही लोकं विशिष्ठ अजेंडा घेउन येतात आणि शक्य तेवढा गोंधळ जमेल तिथे घालतात. त्यात इतर नव्या-जुन्या आयड्यांनी काय डोंबलाचं आत्मपरीक्षण करायचं नक्की?

सचिन हा सुमार प्लेयर नाही, पण एका विशिष्ट टप्प्यानंतर तो आत्मकेंद्री झाला हे मत कपिलदेव ने आता बोलून दाखवलं आहे. तो आजवरचा सर्वश्रेष्ठ भारतीय फलंदाज आहे. मात्र ब्रॅडमॅनशी तुलना करून त्याच्याही पेक्षा तो श्रेष्ठ असल्याचं त्या काळात भक्तांनी लिहीलेलं होतं जे काही अल्पसंख्य लोकांना पटलेलं नव्ह्तं. अशांच्या मतांचं काय करावं हा एक प्रश्न सर्व प्रकारच्या सोशल मीडीयावर जाणवतो. अनेकांना आपलं म्हणणं निट मांडता न येणं हा एक प्रॉब्लेम असू शकतो.

फेसबुक वर काही लोकांच्या वॉल या सुंदर चर्चांची स्थळं झालेली आहेत. विशेष्तः बाबा या नावाने प्रसिद्ध असलेले लेखक सतीश तांबे आणि सुनील तांबे या तांबेद्वयाकडून उत्साही तरुण लोकांना सांभाळून घेणं पाहण्यासारखं असतं. त्यांना अश्लाघ्य भाषेत दूषणं देणारे आज त्यांचे फॅन्स आहेत. इथले अनेक लोक त्यांच्या मित्रयादीत असल्याने सगळं इथे रिपीट करण्याची आवश्यकता नाही. नवीन येणारे लोक काही गुहीतकं घेऊन येत असतात, त्याच्याशी विसंगत असं काही त्यांना येऊन धडकलं की ते सैरभैर होतात. भावनिक होऊन बरसतात, पण त्यांचं विचारचक्र चालू असतं. कुठे ना कुठे जे योग्य आहे त्याने परिणाम साधायला सुरूवात केलेली असते. त्यांना जर वेळ दिला आणि दिशा दिली तर यातले कित्येक लोक आपली गृहीतकं सोडताना दिसतात.

आकस असणे हे मूळ दुखणे आहे, यावर मात करणे अवघड आहे. पण करता येऊ शकेल का ? कारण त्यामुळे ब-याच चांगल्या गोष्टी घडून येऊ शकतील.

जे वास्तवातले राजकारण आहे तिथे एवढा गोंधळ चालतो तर धाग्यावर होणारच ज्यांना ह्या गोंधळाची एलर्जी आहे त्यांनी त्या धाग्यावर येउन स्वताला मनस्ताप का करून घ्यावा.धागे वाचायची उत्सुकता तर असते वर प्रतिक्रिया द्यायची खुमखुमी असते हे सारे करुन सवरुन वर रडायचे हा काय गोंधळ माजलाय मायबोलिवर.
आपला कट्टा नि अड्डा ह्यावर काहिही गोंधळ होवो ते धागे वाचायचे कोणावरच बंधन नसते. तुम्हाला जे आवडते ते वाचा इतर धागे उघडणे हे बंधनकारक आहे का? मलातरी बर्याच प्रतिक्रिया ह्या अरण्यरुदन टाइप वाटल्या.

असामि, हे क्रिकेटचे मला उद्देशुन असणार >> सचिन तेंडूलकर, आचरेकर ह्यातल्या बोल्ड केलेल्या भागाबद्दल तुम्ही मते व्यक्त केली असतील तर हो खचितच तुम्हाला उद्देशून होते.

भाषा सभ्य असणे म्हणजे लिखाण सकस असल्याची पावती नव्हे. सतीश वाघमारे नामक एक लेखक शिवराळ भाषेत लिहीतात. पण ती त्यांची लहानपणापासूनची भाषा आहे. भाषाशुद्धी सोडा, त्यांच्या पोस्टमधलं लिखाण किती कसदार आणि दमदार असतं हे दिव्यमराठी, मायमराठी आणि पुण्यनगरी या दैनिकांच्या वाचकांना चांगलेच माहीत आहे. ज्यांची भाषा तुपाळ नाही ते वरणभात संस्थळांवर लिखाण करत नाहीत. अशांना लिहीते करण्यासाठी काही करण्याची गरज आहे का ? असे प्रयत्न केले तर सक्रीय नसणा-यांना ते संस्थळ आपले वाटेल का ?

माझ्या आठवणीप्रमाणे एकदोन सदस्य इथे ग्रामीण (शिवराळ?) भाषेत लिहीतात. त्यांची ती नेहमीची भाषा आहे. त्यांना प्रशासनाने टोकलेलं नाही हे महत्वाचं.

असामि, हे क्रिकेटचे मला उद्देशुन असणार >>
हे बरोबर कळतं. आणी गोडबोले, बापट, जोशी, साने एवढी आडनावे घेउन लिहीलेल्या खोडसाळ गोष्टी ब्राह्मणांना उद्देशुन नाही म्हणता?
जाउद्या, वर्मावर बोट ठेवलं की लगेच बिहार ला पळ काढणार तुम्ही, त्यामुळे थांबावे इथेच!

लिंबूटिंबू
इतकी सुंदर बाई तुम्हाला काहीतरी सांगतेय, तर तुम्ही तिला आजारी, पांढुरकी म्हणताय, म्हणजे तुमची आवड तरी काय म्हणावी नेमकी ?

विश्वामित्राच्या जागी तुम्ही तपश्चर्येला बसला असता तर मेनकेला कंपल्सरी व्हीआरएस घ्यायला लावली असती इंद्राने... : Proud

हलकेच घ्या हो

पगारे परत एकदा क्रिकेट बाफावर "सचिन तेंडूलकर, आचरेकर ह्यातल्या बोल्ड केलेल्या भागाबद्दल तुम्ही मते व्यक्त केली असतील तर" तुम्ही ट्रोल आहात. तुमचे तुम्हीच ठरवा. अमक्याला किंवा तमक्याला काय वाटते ह्यांने काय कप्पाळ फरक पडतोय.

ऋन्मेषच्या धोनिवरच्या धाग्यावर सचिनबद्दल आपली चर्चा झाली होती त्याबद्दल बोलताय ना?

असामी,

क्रिकेटच्या धाग्यावर येऊन क्रिकेटबद्दलच (भले न पटणारी पण विषयाशी निगडीत) मते मांडण्यात आली तर त्याला टोळधाड आली असे म्हणता येईल का? Happy मी पगारे सचिन तेंडुलकरबद्दल जे बोलत होते त्याला अनुसरून विचारत आहे.

एक शंका विचारायची आहे. हे एकुणच सर्वांना उद्देशून आहे.

समजा:

एक आय डी आहे. तो आय डी राजकीय, धार्मिक, इतिहासविषयक, जातविषयक, संस्कृतीविषयक धाग्यांवर अतिशय तीव्र बोचर्‍या भाषेत प्रतिसाद देतो. मात्र काही विशिष्ट धाग्यांवर माहितीपूर्ण प्रतिसाद देतो.

तर त्या माहितीपूर्ण प्रतिसादांची प्रशंसा करण्यात मायबोलीकर हात राखून ठेवत नाहीत.

मग तोच आय डी जेव्हा स्फोटक, चिथावणीखोर, आकसयुक्त वगैरे लिहितो तेव्हा त्याबाबत नकारात्मक मतप्रदर्शन करण्याबाबत तेच मायबोलीकर का उदासीन राहतात?

मला वाटते की कॉपरमाईन ह्यांनी काढलेला हा धागा एक चांगला धागा आहे. ह्याचे कारण असे की गेली दोन वर्षे जे ओंगळवाणे स्वरूप वारंवार दिसत आहे त्यावर किमान चर्चा होत आहे. आशूचँप ह्यांच्या 'विखार' आणि नंदिनींच्या 'कृपया लक्ष द्या' ह्या धाग्यांवर अश्या स्वरुपाची चर्चा काही प्रमाणात झाली होती पण तेथे 'स्कोअर्स सेटल करण्याचा प्रयत्न करणे' हे जरा अधिक झालेले होते (बहुधा). ह्या धाग्यावर विशिष्ट आय डीं बद्दल बोलणे अत्यल्प प्रमाणात झाले आहे आणि होत असलेल्या चर्चेत अमितव ह्यांनी वर जसे उपाय सुचवले आहेत तसे काही उपायही सुचवले जात आहेत.

कोणत्याही ओंगळवाण्या चर्चेत प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे सामील असणार्‍यांव्यतिरिक्तचे जे आय डी मायबोलीवर इतर ठिकाणी सक्रीय असतात त्यांचीसुद्धा अश्या चर्चांबाबत काहीतरी ठोस भूमिका असायला हवी अश्या मताचा निदान मी आहे. नुसतेच 'वाद नकोसे झाले आहेत' अशी भूमिका नव्हे तर ते वाद नकोसे व्हावेत ह्यासाठी त्या चर्चेत येऊन चर्चेच्या स्वरुपाबद्दल निषेध नोंदवणे, चर्चेला रुळावर आणणे वगैरे!

रॉबीनहूड ह्यांच्या दोन पोस्ट्स फार आवडल्या. लिंबूटिंबू ह्यांच्या सर्व पोस्ट्समधील एक विधान आवडले की 'चिन्ह - नग्नता' वगैरेसारख्या विषयांवर पराकोटीचे वाद होऊनही आज सर्रास दिसते ती चर्चेची पातळी गाठली गेलेली नव्हती.

जे अश्या विषयांबाबत आणि चर्चांबाबत तटस्थ असतात त्यांनी खरंच ह्यापुढे तटस्थ न राहता चर्चेची पातळी खालावताना दिसल्यास चर्चेत सहभागी होऊन निदान निषेध तरी नोंदवावा असे आपले मला वाटते.

चु भु द्या घ्या

-'बेफिकीर'!

>>इतिहास, धर्म, राजकारण, जात व सामाजिक विषय हे पाच विषय काही काळ बंद करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने विचारात घेतला आहे किंवा कसे हे कळाले तर आवडेल. स्मित
>>
हे विषय बंद करण्या ऐवजी सुसंस्कृत, सभ्य , सदभिरुचीपूर्ण आयडींनी त्यात भाग घेण्याचे बंद करणे व ते बी बी ओस पाडणे अधिक चांगले आणि प्रॅक्टिकल होईल नाही का? <<

"आम्हाला वगळा गतप्रभ झणी होतील साप्ताहिके..." हे केशवकुमारांचं विडंबन आठवलं...

हे बीबी ओस पाडायचं ठरवलं तर इथे येउन वाचायचं काय? घरगुती गप्पा? या असल्या उपायापेक्षा रोग परवडला... Happy

मीही जातो तिथे भागही घेतो पण हे फार वाईट चाल्लेय किंवा याचा फार त्रास होतो अशी माझी तरी तक्रार नाही.कारण मायबोलीच्या सदस्यांचे कॉम्पोजिशन लक्षात घेता हे अगदी ऑब्वि अस अहे. ज्या वेळी मला वटेल हे फार त्रास दायक आहे तेव्हा मी तिथे जायचे बंद करीन. >>> देवा ! विठठला !! रॉबीनहुड , तुमच्या सारखं सगळ्यांना जमो हीच विठ्ठ्ल चरणी प्रार्थना . Wink

<<<<अगदी स्पष्ट शब्दात सांगायचे झाले तर या सर्व गदारोळाची सुरूवात ही हिंदू, ब्राह्मण, संघ, भाजप, सावरकर, इ. द्वेष्ट्या लोकांनी केलेली आहे. त्यांनीच अतिशय तिरकस भाषा चालू केलेली होती, अशाने वाद वाढत गेलेले आहेत. विरोधी विचार मांडूच नयेत असे नाही पण भाषा उगाचच विखारी असू नये.>>>>

असे काही मला वाटत नाही. गदारोळ करणारे लोक कशावरूनहि गदारोळ करतातच. १५ वर्षांपूर्वी पण असेच गदारोळ व्हायचे. त्या वेळचे विषय तर अत्यंत क्षुल्लक असत. बरीच वैयक्तिक टीका पण होत असे, पण त्याकडे गंमत म्हणून बघून कुणि रागावत नसे.

यामुळेच मायबोली खूप फोफावली!

नंतर मात्र ती भारतात पोचली. मग भारतातील महत्वाच्या प्रश्नांवर इथे चर्चा होणारच.

त्यातली भाषा भारतातले लोक जशी बोलतात तशी.

सगळ्यांनीच ब्राह्मणांनी केलेले नियम पाळावे ही बर्‍याच लोकांना अत्यंत अन्यायकारक गोष्ट वाटते.

ब्राह्मण हा शब्द व ब्राह्मण म्हणवणारे या सगळ्यांना मारून टाकावे असे वाटण्याइतका त्यांना राग आला आहे. तसा प्रयत्न त्यांनी १९४८ साली केला पण. अजून त्याला यश आले नाही, पण राग अजून आहे,

त्यांच्या अकलेनुसार ते वागतात.

चांगले वागणे योग्य, चांगली भाषा योग्य हे ब्राह्मणांनी म्हंटले म्हणून ते सर्व त्यांना त्याज्य.

जसे तेंडूलकरला जग उत्तम फलंदा़ज समजते, पण कुणा ब्राह्मणाने तसे लिहीले की यांना राग येणार!
श्री. छत्रपति शिवाजी महाराज यांचे गुरू दादोजी होते असे दोनशे वर्षे सर्वांनी मानले. पण नंतर ते ब्राह्मण होते असा शोध लागल्यावर त्यांच्यावर टीका. भाषा ब्राह्मणांना आवडणार नाही अशी मुद्दाम.

तर त्यांच्या भाषेकडे दुर्लक्ष करा. काही लाखो प्रतिसादातून एखादा तरी विचार करण्याजोगा निघेल अशी आशा बाळगा.

शेवटी जग हे असेच आहे हो, मायबोली हे एक केवळ मराठी बोलणार्‍या जगभरात पसरलेल्या लोकांचे एक लहान प्रतिक आहे. त्या लोकांच्या जगात शतकानुशतके ब्राह्मणांना मान होता. आता दिवस बदलले.

हे तुकोबा, हे ग्यानबा !
तुम्ही त्यांना त्या वेळी जसे माफ केलेत तशी शक्ती आताच्यांना द्या !!

Pages