मायबोली प्रशासकांना खुले पत्र

Submitted by कॉपरमाईन on 3 November, 2015 - 11:58

मान्यवर मायबोली प्रशासक,

सप्रेम नमस्कार,

गेल्या सुमारे चार-साडेचार महिन्यांपासून मी www.maayboli.com या संस्थळावर सदस्य आहे. मायबोलीचे सदस्यत्वं मी एका विशीष्ट हेतूने घेतले होते. वेगवेगळ्या भाषांतील संस्थळांवर विविध क्षेत्रातील लोकांचा असलेला वावर, त्यांची अभिव्यक्ती, संस्थळाच्या माध्यमातून जाणिवपूर्वक आणि अजाणतेपणी पसरवण्यात येत असलेले विचार आणि या सगळ्यात संस्थळाच्या अधिकारीवर्गाची भूमिका त्यांचा तौलानिक अभ्यास करण्याची कामगिरी माझ्या टीमवर सोपवण्यात आलेली आहे. टीममधील मराठी सदस्यांपैकी एक म्हणून माझ्यावर एकंदर ३ मराठी संस्थळांचा अभ्यास करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. मायबोली हे त्यापैकीच एक संस्थळ.

एक मराठी संस्थळ आणि त्यावर असलेलं साहित्यं आणि माहिती म्हणून मायबोली इतर काही मराठी संस्थळांच्या तुलनेत निश्चितच उजवी आहे यात शंका नाही. अनेक वेगवेगळ्या विषयांवरील विपुल लेखन - कथा, कादंबर्‍या, चिंतनात्मक लेख, पाककृती, वैद्यकीय, गिर्यारोहण, आरोग्य, पर्यावरण आणि निसर्ग संवर्धन अशा विविध विषयांवरील प्रचंड माहिती मायबोलीवर आहे. अनेक वेगवेगळ्या विषयावरील कविता, मराठी गझला, विडंबनं यांचीही इथे रेलचेल आहे. अनेक सदस्यांचं सकस लेखन मायबोलीवर आहे. केवळ वाचनमात्रं असलेल्या सदस्यांनाही निखळ वाचनाचा आनंद देऊन जाईल असं भांडार इथे आहे. अनेक मराठी कार्यक्रमांवरचे आणि खासकरुन बथ्थड मालिकांवरचे धागे आणि चित्रपट परिक्षणं ही चार घटका करमणूकही आहे.

मायबोलीवरील माझा सदस्यत्व कालावधी केवळ साडेचार महिन्यांचा. मायबोली हे संस्थळ म्हणून सुमारे पंधरा वर्षांपेक्षा जास्त कार्यरत असल्याने आधी घडून गेलेल्या कित्येक घटनांची मला कल्पना असणं शक्यं नव्हतं. यासंदर्भात जाणून घेण्यासाठी मी अनेक मायबोली सदस्यांशी संपर्क साधला. काही अपवाद वगळता बहुतेकांनी अतिशय आपलेपणाने मदत केली. वसुधैव कुटुंबकम् या उक्तीला जागणारे अनेक मराठी सृजन जगभरात पसरलेले आहेत हे चित्रं खूप आश्वासक आहे.

वरवर पाहता हे चित्रं खूप सुंदर आहे, परंतु....

ग्रूपिझम अर्थात कंपूबाजी हा न टाळता येण्याजोगा आजार मायबोलीला आहेच!

एखाद्या विशिष्ट प्रदेशातील, किंवा शहरातील लोकांचा ग्रूप असणं हे अनपेक्षित नाही, उलट परदेशांत असल्यास अशा ग्रूप्सच्या माध्यमातून आपल्या आसपास असलेले आपल्या मायभूमीतले लोक भेटणं हा अशा ग्रूप्सचा मोठा फायदा असतो. एखाद्या नवीन प्रदेशात आपण जात असल्यास तिथे आधीपासूनच राहत असलेल्या लोकांची ओळख असणं, त्यांच्याकडून माहिती मिळणं हा मोठा आधार असतो. विशेषतः तिथे राहण्याचा कालावधी लांबचा असल्यास ही माहिती फार महत्वाची ठरू शकते. दुर्दैवाने मायबोलीवरच्या ज्या दोन-तीन ग्रूप्समध्ये या माहितीची चौकशी केल्यावर एकच उत्तर मिळालं - गूगल करा! गूगल कोणालाही करता येईल, गूगलवर माहितीही मिळेल, परंतु वर्षानुवर्षे तिथे राहत असलेल्यांचे अनुभव गूगलपेक्षा मोलाचे असणार नाहीत का?

ग्रूपिझमचा दुसरा उबग आणणारा प्रकार म्हणजे अर्थातच राजकारण!

मायबोलीवरील अनेक सदस्यांचं चरण्याचं राखीव कुरण म्हणजे राजकारणाला वाहिलेले धागे, अड्डे, कट्टे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. देशातील काँग्रेस आणि भाजप या दोन प्रमुख पक्षांना तन-मनाने अर्पण असलेले लोक जो काही धुमाकूळ घालतात ते पाहिल्यावर पुलं च्या पाळीव प्राणी या लेखातील - एकमेकांवर भुंकण्यात म्युन्सिपालटीचे सदस्य कुत्र्यांनाही हार जात नसल्याने कुत्र्यांना आपल्या मर्यादांची जाणिव असेल याबद्दल मला खात्री आहे या वाक्याची आठवण झाल्याशिवाय राहवत नाही.

तुम्ही आमच्या पक्षाचे समर्थक नाही ना, मग चालते व्हा पाकिस्तानात ही भाजप समर्थकांची जनरल विचारसरणी काय, किंवा भाजपचे सरकार आल्यापासून सर्वस्व लुटलेल्या सिंध्याप्रमाणे उर बडवत फिरणार्‍या आणि शेंडा-बुडखा नसलेले आरोप करत सुटणार्‍या काँग्रेस समर्थकांची विचारसरणी काय, दोन्हीही सारख्याच नाहीत काय? महत्वाचं म्हणजे काँग्रेस किंवा भाजप यांचे समर्थक नसलेलेही इतर लोक अस्तित्वात असू शकतात आणि ते आम आदमी पार्टीछाप पक्षाच्या भजनी मंडळात नसू शकतात हेच मुळात राजकीय धाग्यांवरच्या महाभागांना मान्य नाही तिथे काय बोलणार? कोणतीही चर्चा मग ती राजकीय असो वा नसो कोणत्याही मुद्द्यावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप, मोदी विरुद्ध सोनिया किंवा राहुल गांधी, दीड वर्ष विरुद्ध ६५ वर्षांचा हिशोब यावर आणण्याची आवश्यकता आहे का? राजापेक्षा राजनिष्ठच जास्तं कडवे असतात आणि बाटगा हा सर्वात जास्तं धर्मनिष्ठ असतो या उक्तीचं वरचेवर प्रत्यंतर देणार्‍या या धाग्यांचा सामान्यं सदस्यांना किती उबग येत असेल याचा हे आक्रस्तळी सदस्य कधीतरी विचार करतात का? मुळात आत्मपरिक्षण नावाचा काही प्रकार असतो हे किती जणांच्या गावी आहे? दुर्दैवाने एकेकाळी चांगलं लेखन करणारे लोकही राजकारणाच्या या विकाराला बळी पडले आहेत. अभिव्यक्तीचा अभिनिवेश न राहता आवेश संचारला की काय होतं याचं उत्तम उदाहरण म्हणून राजकारणाच्या धाग्यांकडे बोट दाखवता येईल.

राजकीय धाग्यांचा दुसरा प्रकार म्हणजे अत्यंत साळसूदपणे नवनवीन जातीय वाद निर्माण करणे आणि त्याला चलाखीने ब्राम्ह्ण विरुद्ध अब्राम्हण, हिंदू विरुद्ध मुस्लिम, ३ टक्के विरुद्ध इतर, पिढ्यानपिढ्यांचे अत्याचार याचं वळन देऊन त्याबद्द्ल पद्धतशीरपणे बुद्धीभेद पसरवणे. यात तरबेज असलेले अनेक सिद्धहस्त सदस्य मायबोलीवर आहेत. जातीभेदाला विरोध करण्याच्या नावाखाली प्रत्येक प्रतिक्रियेत चलाखीने जातीयवाद पसरवण्याच्या त्यांच्या हातोटीपुढे अनेकांनी हात टेकले आहेत. त्यांच्याच जोडीला देशविघातक अतिरेकी तत्वज्ञानाचं समर्थन करणारे आणि एम आय एम सारख्या पक्षाचे छुपे आणि उघड समर्थकही इथे आहेत. मायबोलीच्या माध्यमातून समाजात तेढ निर्माण करणारे विचार आपण पसरवत आहोत हे यांच्या गावी तरी नाही, किंवा समजून-उमजून हे विचार पसरवणं सुरु आहे. सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने अत्यंत घातक असलं तरी आमचा हेतू साध्य होतो आहे ना? मग बास!

मायबोलीवरील सर्वात उबग आणणारा आणि संतापजनक प्रकार जर कोणता असेल तर तो म्हणजे इथल्या सदस्यांवर करण्यात येणारे वैयक्तीक हल्ले. एखाद्या सदस्यावर आपल्या जुन्या विरोधकाचा डुप्लिकेट आयडी असल्याचा आरोप करणं हे तर अगदीच क्षुल्लक वाटावं अशी एकापेक्षा एक अश्लाघ्य वक्तंव्य इथे केली जातात. एकमेकांचे संस्कार जाहिररित्या काढले जातात, मनोरुग्ण, विकृत, भिकारचोट (नाईलाजाने लिहावं लागत आहे) असल्या शेलक्या विशेषणांची बरसात असतेच, परंतु सदस्याच्या वैयक्तीक, वैद्यकीय आणि कौटुंबिक परिस्थितीवरुनही अत्यंत अपमानास्पद शब्दांत संबोधनं दिली जातात जी केवळ तिरस्कारणीय आहेत. दोन दिवसांपूर्वीच पाहण्यात आलेला एक प्रकार म्हणजे एका अत्यंत गलिच्छा शिवीशी साधर्म्य दाखवणारं संबोधन पंतप्रधानांसाठी वापरणं आणि ते कसं योग्यं आहे याचं निरर्गल समर्थन करणं! समोरच्या व्यक्तीविषयी आपल्याला काहीही माहित नसताना त्याच्याबद्दल काहिही बरळण्याची ही हिणकस मानसिकता कधी सुधारणार आहे का? आपण स्वतः गेंड्याच्या कातडीचे आहोत म्हणून समोरचाही तसाच असेल, आपल्या विकृतीमुळे त्याला त्रासच व्हावा ही इच्छा असल्यामुळे हे लोक सुधारण्यापलीकडे गेलेले आहेत हेच खरं!

या सगळ्या प्रकारात प्रशासक म्हणून आपण काही अंशी तरी अपयशी ठरलेले आहात असं खेदाने नमूद करावसं वाटतं. मायबोलीवर चाललेल्या तमाशांमुळे आज कित्येक जुने सदस्य एकही वाक्यं लिहीण्यास धजावत नाहीत. कारण कोण कसला अश्लाघ्य वैयक्तीक आरोप करेल याची काहिही शाश्वती नाही. असल्या प्रवृत्तींना वेळीच आवर घालण्यात आपल्याला फारसं यश येत नाही हे वेळोवेळी दिसून आलं आहे. प्रशासक मंडळातील काही सदस्यं हे वरकरणी आपण निष्पक्ष असल्याचा आव आणत असले तरी एका विशिष्ट कंपूच्या कारवायांकडे हे लोक डोळेझाक करतात हे लपून राहिलेलं नाही.

मायबोलीच्या एका जुन्या जाणत्य सदस्याशी झालेल्या चर्चेअंती त्यांनी व्यक्तं केलेलं मत मायबोलीच्या सद्यस्थितीबाबत भाष्यं करुन जातं. त्या म्हणाल्या, "आजकाल मायबोलीवर असतं काय? तेच ते राजकारणावरचे धागे, तीच कंपूबाजी आणि तमाशे! मायबोलीवर येण्याची आजकाल इच्छा होत नाही! लाज वाटते असल्या लोकांची आणि त्यांच्या विचारांची!"

अद्यापही वेळ गेलेली नाही असं निदान माझं वैयक्तीक मत आहे. प्रत्येकाने - अगदी प्रशासकांपासून सामान्य सदस्यांपर्यंत आत्मपरिक्षण करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक बाबतीत आपलंच मत शेवटचं हा हेका सोडायला हवा! विघातक प्रवृत्ती सर्वत्र असतात, परंतु त्यांना प्रबळ होऊ द्यायचं का मायबोलीचं सकस साहित्य आणि माहितीचं भांडार म्हणून अस्तित्व टिकवून ठेवायचं हे शेवटी आपल्याच हाती आहे.

मायबोलीवरील अनेक धाग्यांवर असलेल्या माझ्या पोस्ट्स या त्यावर काय प्रतिक्रीया येतात हे आजमावण्यासाठी लिहीलेल्या होत्या. त्यामागे कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. तसाच तो या पत्रातही तो नाही. यापुढे कोणत्याही धाग्यावर माझी पोस्ट दिसणार नाही.

आपली नम्र
वैष्णवी धारप

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नजरेआड करा असं कोणी म्हणत नाहीचे. फक्त हे असलं लिखाण किती बायस्ड आहे ह्याचा प्रत्यय ते कोणी लिहिलय हे कळल्यावर येतो. आता जर हे कोणी लिहिलय त्या अँगलनी वरचं लिखाण वाचायला गेलं तर ज्या ज्या बाबतीत त्यांनी राग व्यक्त केलाय तिथे बर्‍याच वेळा दुसरी बाजू (स्वतःची वाईट बाजू) सोयीस्कररित्या दुर्लक्ष केलेली आढळून येईल. कोर्टात म्हणूनच कधी कधी साक्षीदारांच्या पास्ट कन्विक्शन्स सापडल्या की त्यांच्या साक्षी ग्राह्य धरल्या जात नाहीत.

अमित Happy साधारण सारखीच झाली पोस्ट.

आत्मपरीक्षण प्रत्येकाने केलेच पाहिजे. मान्यच. ते तर त्रिकालाबाधित आहे ना? Happy पण म्हणजे मायबोली संदर्भात नक्की काय, कोणी कसं? बर कोणी केलं नाही तर पोलिसिंग करणार का? कोण? कसं? त्याचे काय परिणाम? आता ढोबळ एरियात शिरतो. ते म्हणतायत ते सगळीकडे दिसतंय, तर हो. पण मग काय करायचं? याचं उत्तर मला तरी समजलं नाही.

प्रयोग म्हणून मांडा किंवा नुसतं मायबोलीबद्दल जिव्हाळा म्हणुन किंवा आकस म्हणून... सध्या एकूण मायबोलीवर गोंधळ आहे हे अनेकांनी इथेच आणि इतरही ठिकाणी मान्य केलं आहेच की. तुमच्यातल्या काहींनी 'दुर्लक्षित करण्याइतकी परीस्थीती हाताबाहेर आहे' अश्या अर्थाचे प्रतिसाद पण दिलेत.
ह्या पत्राचा मूळ मुद्दा, ते कोणी लिहिलं आहे यावर न ठरवता, 'स्टँड अलोन ऑबझरव्हेशन' म्हणून का पहात नाहीयोत आपण?
कारण तसं पाहिलं तरच कदाचित या धाग्यावर 'गरळ ओकणारे प्रतिसाद न येता, काही कनस्ट्रक्टीव्ह प्रतिसाद, मार्ग सुचवणारे प्रतिसाद' येण्याची अपेक्षा ठेवता येईल. नाहीतर कोणत्याही क्षणी हा देखील अजून एक 'भरकटलेला धागा' होऊ शकतो, सध्या मायबोलीवरच्या ट्रेंडला अनुसरून !

बायस्ड का वाटतय , त्यांनी कॉग्रेस भाजप आप व त्यांचे समर्थक सगळ्याना एकच मापदंड लावलाय की. कोणी लिहिलय त्यापेक्षा काय लिहीलय हे महत्वाच नाही का ?
रार +१

अरे ते म्हणजे बळच धुराळा आहे तटस्थ आहोत असं दाखवायला. खरी गोम ह्या असल्या मुद्द्यांमध्ये आहे.

"मायबोलीवरील सर्वात उबग आणणारा आणि संतापजनक प्रकार जर कोणता असेल तर तो म्हणजे इथल्या सदस्यांवर करण्यात येणारे वैयक्तीक हल्ले. एखाद्या सदस्यावर आपल्या जुन्या विरोधकाचा डुप्लिकेट आयडी असल्याचा आरोप करणं हे तर अगदीच क्षुल्लक वाटावं अशी एकापेक्षा एक अश्लाघ्य वक्तंव्य इथे केली जातात. एकमेकांचे संस्कार जाहिररित्या काढले जातात, मनोरुग्ण, विकृत, भिकारचोट (नाईलाजाने लिहावं लागत आहे) असल्या शेलक्या विशेषणांची बरसात असतेच, परंतु सदस्याच्या वैयक्तीक, वैद्यकीय आणि कौटुंबिक परिस्थितीवरुनही अत्यंत अपमानास्पद शब्दांत संबोधनं दिली जातात जी केवळ तिरस्कारणीय आहेत. "

हे बरोबर आहे असं गृहित धरलं तर मग ह्या आयडीनी स्वतः केलेल्या ह्यातल्याच प्रकारांचे काय? ते सुरवातीची ओपनिंग आणी पुढे ते आप, भाजप वगैरे सगळं धुळफेकच वाटते आता.

बुवा, पण तुम्ही 'कोट' केलेल्या पॅरेग्राफ मधे काय चुकीचं लिहिलंय?
हे बरोबर आहे हे गृहीत धरायची गरजच नाहीये, ते होतंच आहे ही फॅक्ट आहे सध्याची.
मग ते इतर अनेक आयडीनी केलं असं म्हणता म्हणता, खुद्द पत्र लिहिणार्‍या आयडीने देखील जेव्हा केलंय तेव्हा 'असं करणार्‍यांची संख्या एकाने वाढली' इतकाच फरक आहे. त्याने 'मायबोलीवर वातावरण गोंधळाचे' आहे ह्या फॅक्ट मधे फरक नाही पडत.

रार आणि श्री आता तुम्हाला एक प्रश्न विचारू का? समजा उद्या इथे त्या स्पार्टाकस ने "वांङमय चौर्य" किंवा "कॉपीराइट्स" या विषयावर लेख लिहिला तर काय होईल ? लोक त्यातल्या मुद्द्यावर लक्ष देतील की आधी त्याला झोडपतील ? किंवा त्याही पुढे जाऊन "वाङमय चौर्याचे गंभीर परिणाम कळावेत म्हणुन एक प्रयोग म्हणूनच मी "ट्रॅप" लावला होता" असं म्हटलं तर ? Happy

च्च, फारच निरागस श्री. कॉपरमाईन ह्यांच्या आत्तापर्यंतच्या इथल्या तिथल्या पोस्टी वाचता ते भाजप समर्थक आहेत असा माझा समज आहे. आत्तापर्यंतचा मायबोलीचा ट्रेंड काय आहे तर काही झालं की लगेच अ‍ॅडमिन विपु गाठून तक्रार करायची. ह्यांनी जरा नवीन आयड्या इंट्रोड्यूस केली आहे. आता इथे खुलं पत्र लिहिल्यामुळे थोडीफार भाजपची तक्रार करणं ही आलंच की आपण किती न्यूट्रल आहोत हे दाखवायला.
पत्रामागचा मूळ हेतू केव्हाच लक्षात आलाय.

बुवा हे सगळ 'गोल्डमाइन' ने लिहील आहे असा विचार करन सगळ्या मुद्यांचा विचार कर.
सायो ह्याबाबतीत मी खरच निरागस आहे समजुन , ह्यामागचा हेतू तरी सांग.

कॉपरमाईन यांना बेनेफिट ऑफ डाउट द्यावा असं मला वाटतं. डुप्डुकेट आय डी चा सुळसुळाट झाल्याने याही कुणाच्या तरी ड्यू आय आहेत असे वाटणे सहाजिक आहे.

लेखातील अनेक शब्द खटकले आणी खुद्द लेखिकेच्याच तटस्थतेबद्दल शंका निर्माण करून गेले.

>> आम आदमी पार्टीछाप पक्षाच्या भजनी मंडळात.

आम आदमी हा आपल्या लोकशाहीतला एक पक्ष आहे आणी त्या पक्षाच्या समर्थकांना आपले मत मांडायचा पूर्ण अधिकार आहे. एखाद्या पक्षाला असे भजनी मंडळ म्हणणे योग्य नाही.

>>एम आय एम सारख्या पक्षाचे छुपे आणि उघड समर्थकही इथे आहेत.

इतर अनेक पक्षा सारखा एम आय एम हाही एक पक्ष आहे. त्याचे समर्थक इथे असतील आणी आपली बाजू मायबोलीच्या धोरणाचा भंग न करता मांडत असतील तर त्यात चूक काय ?

>>परंतु सदस्याच्या वैयक्तीक, वैद्यकीय आणि कौटुंबिक परिस्थितीवरुनही अत्यंत अपमानास्पद शब्दांत संबोधनं दिली जातात जी केवळ तिरस्कारणीय आहेत.

+१

>>प्रशासक मंडळातील काही सदस्यं हे वरकरणी आपण निष्पक्ष असल्याचा आव आणत असले तरी एका विशिष्ट कंपूच्या कारवायांकडे हे लोक डोळेझाक करतात हे लपून राहिलेलं नाही

बेफाम आरोप. तो विशिष्ट कंपू कोणता हे स्पष्ट लिहायला हवे होते.

सुनियाद, तुम्ही कॉपी पेस्ट केलेल्या पत्राचा इथे संबंध काय ?

मैत्रेयी, तर 'वाग्मयचौर्य किंवा कॉपीराईट' वर चर्चा व्हायला हवी. कारण ' आयडी आज आहेत उद्या नाहीत', पण विषय मात्र दीर्घकाळ टिकणारा आणि विचार करण्यासारखा आहे. ज्यावर खरंच चर्चा व्हायला हवी.
मुळात मायबोलीवर एकूणच विषय बघून फार कमी चर्चा होतात, आयडी बघून जास्त !

मी स्वतः काय फार वर्षं माबो वर नाहीये पण या लेखात त्यांनी जो मुद्दा मांडला आहे तो बरोबर आहे असे वाटते. त्यात जर सुरवातीचा पाल्हाळ लावला नसता तर तो अजुन परिणामकारक झाला असता. काही धागे अगदी बघवत नाहीत असे होतात - उगीच वाद चालतात. चांगल्या धाग्यांवर सुद्धा वेगळेच वाद उकरून काढले जातात. आणि इतर संस्थळांवर लेख येताना माबो वर मात्र लोकं लेख टाकू का नको असा विचार करतात म्हणजे कुठे तरी काही तरी कमी राहती आहे. मग ती सदस्यांमध्ये असेल किंवा प्रशासकांमध्ये. शेवटी दोघांनीही आपापल्या बाजू सुधारून वाटावरण स्वच्छ करावे म्हणजे तसेच भरभरून चांगले लेख येतील.

बुवा, पण तुम्ही 'कोट' केलेल्या पॅरेग्राफ मधे काय चुकीचं लिहिलंय?>>>>>>>>अरे? ते तुला चुकीचं वाटत नाहीये. कारण जे मत त्यानी लिहिलय त्याच्याशी तू सहमत आहेस म्हणून. Happy
मला किंवा इतरांना ह्या वर मांडलेल्या मता मध्ये दर्शवलय अशी परिस्थिती नाहीये असं वाटत असेल तर? आणि कोण लिहितय ह्या अत्यंत महत्व आहे कारण लिहिणारी व्यक्ती अनबायस्ड असणे अत्यंत गरजेचे असते नाहीतर ती व्यक्ती स्वतःचा अजेंडा नाही का राबवणार? इकडे हे कॉपरमाईन बळच स्वतःची खदखद घालवायला आता तटस्थ असल्याचा आव आणून ताशेरे ओढू पाहत आहेत त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा?

I think Maayboli prashasan is doing just fine. Its not their responsibility to try and stop the kind of nonsense that goes on some bafas. जिथे जिथे असंसदिय भाषेचा वापर झाला तिथे तिथे त्यांनी कारवाई केलेली आहे.

"या सगळ्या प्रकारात प्रशासक म्हणून आपण काही अंशी तरी अपयशी ठरलेले आहात असं खेदाने नमूद करावसं वाटतं. मायबोलीवर चाललेल्या तमाशांमुळे आज कित्येक जुने सदस्य एकही वाक्यं लिहीण्यास धजावत नाहीत. कारण कोण कसला अश्लाघ्य वैयक्तीक आरोप करेल याची काहिही शाश्वती नाही. असल्या प्रवृत्तींना वेळीच आवर घालण्यात आपल्याला फारसं यश येत नाही हे वेळोवेळी दिसून आलं आहे. प्रशासक मंडळातील काही सदस्यं हे वरकरणी आपण निष्पक्ष असल्याचा आव आणत असले तरी एका विशिष्ट कंपूच्या कारवायांकडे हे लोक डोळेझाक करतात हे लपून राहिलेलं नाही".
What proof does he have when he says that? Its all hearsay or I'd say nonsense. मी नवीन असताना पण हा आरोप एकदा अ‍ॅडमीनवर केलेला आहे की तुम्हे प्रेफेर्न्शियल वागणूक देता म्हणून पण पुढे जेव्हा रुळलो थोडा तेव्हा लक्षात आलं की सहसा योग्यती कारवाई ते नेहमीच करतात.

हो भजनी मंडळ खटकलं.
यांना ४ महिन्यात स्पार्टाकस, बरोबर माहित ज्याच्यावर कारवाई करून अनेक महिने उलटले. यांना साती इ. लोकांच्या प्रतिक्रिया कशा येणार हे माहित आहे. ओके, माहित असू शकतं पण ते हिणकसपणे सांगण त्रयस्थ नाही. अनेक अशा गमती वर सापडतील.

Buvaa you answered your own question. Think about it.

वाग्मयचौर्य, कॉपीराईट विषयावर तेव्हा चर्चा झाली/होऊ शकली असती कारण परफेक्ट वेळ होती. पण लेखक साहेबांनी थातुरमातुर स्पष्टीकरणं देऊन पळ काढला इथून.

आय डोंट थिंक सो श्री. मी लिहिलय की जेव्हा मी रूळलो तेव्हा लक्षात आलं की अ‍ॅडमीन तसं काही करत नाहीत. बेसिकली मी अततायीपणा करत होतो आणि हा आयडी त्यातून बाहेर आला नाही कधीच.

कित्येक जुने सदस्य एक वाक्य लिहायला धजावत नाहीत. मग नको लिहू दे. मूव्ह ओन. 'जुने सदस्य जर धजावत नाहीत तर' ही फ्यालसी आहे. भीती वाटत असेल तर तुमचा काळ संपला, तीच जुनी परिस्थिती कदापि टिकणार नाही, हे प्रत्येकाला जितकं लवकर समजेल तितकं चागलं. हे admin यांनी ही मध्ये सागितलं होतंच की, जुन्या गोष्टी सोडून पुढे जाणार अशा संदर्भात.
आणि admin वर आरोप करणं इ. अजेंडा ठेवून लिहिलंय म्हणायला प्रचंड वाव आहे. बुवा +१.

अरे? ते तुला चुकीचं वाटत नाहीये. कारण जे मत त्यानी लिहिलय त्याच्याशी तू सहमत आहेस म्हणून. स्मित >> बुवा, मग मायबोलीवर गदारोळ आहे, ह्या मताशी तुम्ही सहमत नाही आहात का? तुम्हाला ते मत चुकीचं वाटतंय का?
तसं असतं तर अनेक लोकांनी 'आता सुधारणेच्या पलिकडे आहे त्यामुळे दुर्लक्ष करायचं' अशी मतच दिली नसती.

मी नवीन असताना पण हा आरोप एकदा अ‍ॅडमीनवर केलेला आहे की तुम्हे प्रेफेर्न्शियल वागणूक देता म्हणून पण पुढे जेव्हा रुळलो थोडा तेव्हा लक्षात आलं की सहसा योग्यती कारवाई ते नेहमीच करतात. >> म्हणजे जो आयडी गेले ४- साडेचार महिनेच मायबोलीवर आहे, त्याला हे असं वाटू शकतं हे तरी मान्य आहे ना तुम्हाला ?

धनि, मुद्दा आहे योग्य. इतर बीबी बघता वाट्टेल त्या भाषेत पोस्ट्स पडत असतात. दुसर्‍या संस्थाळांवरून इथे घाण करायची ह्या उद्देशाने हे लोक येत असावेत अशी शंका घ्यायला वाव आहे. अ‍ॅडमिनने पेड मेंबरशीप कराव्यात. कदाचित त्याने थोडा आळा बसेल.

मग नको लिहू दे>>>>>>> Lol काय हा मानेपणा!
जरा रोखठोक वाटलं तरी खरं आहे. जुने सदस्य म्हणजे काय कसलं पर्फेक्शनचं प्रमाण वगैरे आहे का? आणि जुने सद्स्यांना केटर करायला म्हणून थोडीच मायबोली अस्तित्वात आहे?

त्याला हे असं वाटू शकतं हे तरी मान्य आहे ना तुम्हाला ?>>>>>> हो मान्य आहे, फक्त १) हा आयडी/व्यक्ती नवीन नाहीये हे सिद्ध होतय आणि २) नवीन असला तरी लगेच ४ महिन्यात माबो, मेंब्रं, प्रशासक ह्या सग़ळ्यांचं सार काढू पाहतोय जे टोटली वेडेपणाचं आहे.

बुवा, अहो जुनेच नाही नविनही नाही लिहीणार ना जर का आपल्या लेखनावर इतरच गदारोळ होणार असेल तर.

दुसर्‍या संस्थाळांवरून इथे घाण करायची ह्या उद्देशाने हे लोक येत असावेत अशी शंका घ्यायला वाव आहे >> अशी काही कॉन्स्पिरेसी थियरी वापरण्याची गरज वाटत नाही.

आपला मूळ उद्देश आंतरजालावर चांगले मराठी लिहिता वाचता येणे हा आहे. मॉडरेटर्स वगैरे गोष्टी वापरून कदाचीत हे साध्य करता येईल अगदी पेड मेंबरशीप करण्याची आवश्यकता नाही. इतरही सुधारणा करता येतील.

बुवा, जिथे खुद्द तुम्ही स्वतः नवीन असताना अ‍ॅडमीन वर आरोप केला होतात (हे सगळे तुमचेच शब्द आहे, माझे नाहीत) असं म्हणताय. कदाचित तुम्ही वेगळा बीबी काढला नसेल, पत्र लिहिलं नसेल. ह्या ४-४.५ महिने जुन्या आयडीने ओपन पत्र लिहिलं. मार्ग फक्त वेगळाय.

नविनही नाही लिहीणार ना>>>>> नका लिहू ना. इथे आधीही ह्यावर चर्चा झालेली आहे. पबलिक फोरम वर लिहिल्यावर पुढे लोकांच्या उलट सुलट प्रतिक्रिया येऊन काही दंगा होणारच नाही असं तुम्हाला वाटत असेल तर मग तुम्ही पब्लिक फोरम वर लिहायला तयार नाही असं म्हणावं लागेल. लोकं फार दंगा करतात, आम्हाला भिती वाटते लिहायची ही टोटल फुक्याची पुंगाटबाजी आहे! काय साध्य होतं त्यानी? काहीच नाही.

मार्ग वेगळा असला तरी त्यात दिलेलं मट्रेल दिशाभुल करणारं आहे हे ही खरं आहे. इथून पुढेही त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला आणि ते सरळ झाले तर आनंदच आहे.

पुन्हा तेच रार...
धनि, पेड मेंबरशीप असेल तर प्रत्येक आयडी/ सदस्यत्वामागे दिडक्या मोजाव्या लागतील. त्याने तरी लोकांची डोकी जाग्यावर येतील अशी आशा करू शकतो.

गदारोळ आहे, सहमत. तो आवडत नाहीच. वैयक्तिक आरोप तर डोक्यात जातात. पण....
यावर सध्या admin जो उपाय करतात तो आणि तितकाच करावा. असं स्ट्रोग्ली वाटतं. यापुढे जाऊन काही केलं तर ओपन प्ल्यात्फोर्म राहणार नाही, पोलिसिंग इज बिग नो फॉर मी. मला ह्या १० लोकांचे विचार आवडत नाहीत तर त्याच्या पोस्ट (आयडीअली विचार, पण इतका वेळ माझ्याकडे नाही, सुक्याबरोबर ओलं) मी न वाचता उडी मारेन. अश्लाघ्य भाषेत लिहिलं तर तक्रार करीन, admin त्यांना सवड होईल तशी त्याना वाटलं तर कारवाई करतील. मला वाटतं admin नी मध्ये सदस्यत्व घेणं ही बंद केलेलं, ते त्यांच्यापरीने योग्य दिशेत आहेत असं मला वाटतं.
आणखी उपाय असतील तर वाचायला आवडेल.

मायबोलीवर गदारोळ आहे ही फॅक्ट आहे, ती नाकारता येणार नाही , मग ते कोणत्या आयडीने म्हणले असले तरीही ती सध्याची फॅक्ट आहे. माझ्या सगळ्या पोस्ट मधे इतकाच माझा मुद्दा होता आणि राहिल.

मुळात प्रॉब्लेम आयडेंटीफाय केले आणि त्याही पेक्षा अ‍ॅक्सेप्ट केले तर उपाय शोधायची क्वेस्ट तरी सुरु होते...आणि उपाय नक्की आहेत शोधायला गेलें तर.

धनि, आपला मूळ उद्देश आंतरजालावर चांगले मराठी लिहिता वाचता येणे हा आहे. >> नाही मला मायबोलीच ओपन फोरम हेच सगळ्यात अपिलिंग आहे. खराब मराठी चालेल मला. मॉडरेटेड platform झाला की संपलं, आजच्या जगात टिकाव धरणं शक्य वाटत नाही.

दुर्दैवाने अनेक प्रतिक्रीया काय लिहीलं आहे यापेक्षा कोणी लिहीलं आहे या पूर्वग्रहातूनच येत असल्यामुळे धाग्याचा मूळ हेतू बाजूला राहून भलतंच वळण लागत आहे. लेखिकेने विविध धाग्यांवर लिहीलेल्या प्रतिक्रीया या हेतुपुरस्पर लिहील्या होत्या हे स्पष्टपणे सांगूनही साप सोडून भुई धोपटण्याचा प्रकार सुरु आहे.

इतर कोणत्याही वादात पडण्याची इच्छा नाही आणि वेळ त्याहून नाही, परंतु लेखिकेने मांडलेले मुद्दे विचार करण्यास भाग पाडणारे आहेत.

Pages