मायबोली प्रशासकांना खुले पत्र

Submitted by कॉपरमाईन on 3 November, 2015 - 11:58

मान्यवर मायबोली प्रशासक,

सप्रेम नमस्कार,

गेल्या सुमारे चार-साडेचार महिन्यांपासून मी www.maayboli.com या संस्थळावर सदस्य आहे. मायबोलीचे सदस्यत्वं मी एका विशीष्ट हेतूने घेतले होते. वेगवेगळ्या भाषांतील संस्थळांवर विविध क्षेत्रातील लोकांचा असलेला वावर, त्यांची अभिव्यक्ती, संस्थळाच्या माध्यमातून जाणिवपूर्वक आणि अजाणतेपणी पसरवण्यात येत असलेले विचार आणि या सगळ्यात संस्थळाच्या अधिकारीवर्गाची भूमिका त्यांचा तौलानिक अभ्यास करण्याची कामगिरी माझ्या टीमवर सोपवण्यात आलेली आहे. टीममधील मराठी सदस्यांपैकी एक म्हणून माझ्यावर एकंदर ३ मराठी संस्थळांचा अभ्यास करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. मायबोली हे त्यापैकीच एक संस्थळ.

एक मराठी संस्थळ आणि त्यावर असलेलं साहित्यं आणि माहिती म्हणून मायबोली इतर काही मराठी संस्थळांच्या तुलनेत निश्चितच उजवी आहे यात शंका नाही. अनेक वेगवेगळ्या विषयांवरील विपुल लेखन - कथा, कादंबर्‍या, चिंतनात्मक लेख, पाककृती, वैद्यकीय, गिर्यारोहण, आरोग्य, पर्यावरण आणि निसर्ग संवर्धन अशा विविध विषयांवरील प्रचंड माहिती मायबोलीवर आहे. अनेक वेगवेगळ्या विषयावरील कविता, मराठी गझला, विडंबनं यांचीही इथे रेलचेल आहे. अनेक सदस्यांचं सकस लेखन मायबोलीवर आहे. केवळ वाचनमात्रं असलेल्या सदस्यांनाही निखळ वाचनाचा आनंद देऊन जाईल असं भांडार इथे आहे. अनेक मराठी कार्यक्रमांवरचे आणि खासकरुन बथ्थड मालिकांवरचे धागे आणि चित्रपट परिक्षणं ही चार घटका करमणूकही आहे.

मायबोलीवरील माझा सदस्यत्व कालावधी केवळ साडेचार महिन्यांचा. मायबोली हे संस्थळ म्हणून सुमारे पंधरा वर्षांपेक्षा जास्त कार्यरत असल्याने आधी घडून गेलेल्या कित्येक घटनांची मला कल्पना असणं शक्यं नव्हतं. यासंदर्भात जाणून घेण्यासाठी मी अनेक मायबोली सदस्यांशी संपर्क साधला. काही अपवाद वगळता बहुतेकांनी अतिशय आपलेपणाने मदत केली. वसुधैव कुटुंबकम् या उक्तीला जागणारे अनेक मराठी सृजन जगभरात पसरलेले आहेत हे चित्रं खूप आश्वासक आहे.

वरवर पाहता हे चित्रं खूप सुंदर आहे, परंतु....

ग्रूपिझम अर्थात कंपूबाजी हा न टाळता येण्याजोगा आजार मायबोलीला आहेच!

एखाद्या विशिष्ट प्रदेशातील, किंवा शहरातील लोकांचा ग्रूप असणं हे अनपेक्षित नाही, उलट परदेशांत असल्यास अशा ग्रूप्सच्या माध्यमातून आपल्या आसपास असलेले आपल्या मायभूमीतले लोक भेटणं हा अशा ग्रूप्सचा मोठा फायदा असतो. एखाद्या नवीन प्रदेशात आपण जात असल्यास तिथे आधीपासूनच राहत असलेल्या लोकांची ओळख असणं, त्यांच्याकडून माहिती मिळणं हा मोठा आधार असतो. विशेषतः तिथे राहण्याचा कालावधी लांबचा असल्यास ही माहिती फार महत्वाची ठरू शकते. दुर्दैवाने मायबोलीवरच्या ज्या दोन-तीन ग्रूप्समध्ये या माहितीची चौकशी केल्यावर एकच उत्तर मिळालं - गूगल करा! गूगल कोणालाही करता येईल, गूगलवर माहितीही मिळेल, परंतु वर्षानुवर्षे तिथे राहत असलेल्यांचे अनुभव गूगलपेक्षा मोलाचे असणार नाहीत का?

ग्रूपिझमचा दुसरा उबग आणणारा प्रकार म्हणजे अर्थातच राजकारण!

मायबोलीवरील अनेक सदस्यांचं चरण्याचं राखीव कुरण म्हणजे राजकारणाला वाहिलेले धागे, अड्डे, कट्टे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. देशातील काँग्रेस आणि भाजप या दोन प्रमुख पक्षांना तन-मनाने अर्पण असलेले लोक जो काही धुमाकूळ घालतात ते पाहिल्यावर पुलं च्या पाळीव प्राणी या लेखातील - एकमेकांवर भुंकण्यात म्युन्सिपालटीचे सदस्य कुत्र्यांनाही हार जात नसल्याने कुत्र्यांना आपल्या मर्यादांची जाणिव असेल याबद्दल मला खात्री आहे या वाक्याची आठवण झाल्याशिवाय राहवत नाही.

तुम्ही आमच्या पक्षाचे समर्थक नाही ना, मग चालते व्हा पाकिस्तानात ही भाजप समर्थकांची जनरल विचारसरणी काय, किंवा भाजपचे सरकार आल्यापासून सर्वस्व लुटलेल्या सिंध्याप्रमाणे उर बडवत फिरणार्‍या आणि शेंडा-बुडखा नसलेले आरोप करत सुटणार्‍या काँग्रेस समर्थकांची विचारसरणी काय, दोन्हीही सारख्याच नाहीत काय? महत्वाचं म्हणजे काँग्रेस किंवा भाजप यांचे समर्थक नसलेलेही इतर लोक अस्तित्वात असू शकतात आणि ते आम आदमी पार्टीछाप पक्षाच्या भजनी मंडळात नसू शकतात हेच मुळात राजकीय धाग्यांवरच्या महाभागांना मान्य नाही तिथे काय बोलणार? कोणतीही चर्चा मग ती राजकीय असो वा नसो कोणत्याही मुद्द्यावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप, मोदी विरुद्ध सोनिया किंवा राहुल गांधी, दीड वर्ष विरुद्ध ६५ वर्षांचा हिशोब यावर आणण्याची आवश्यकता आहे का? राजापेक्षा राजनिष्ठच जास्तं कडवे असतात आणि बाटगा हा सर्वात जास्तं धर्मनिष्ठ असतो या उक्तीचं वरचेवर प्रत्यंतर देणार्‍या या धाग्यांचा सामान्यं सदस्यांना किती उबग येत असेल याचा हे आक्रस्तळी सदस्य कधीतरी विचार करतात का? मुळात आत्मपरिक्षण नावाचा काही प्रकार असतो हे किती जणांच्या गावी आहे? दुर्दैवाने एकेकाळी चांगलं लेखन करणारे लोकही राजकारणाच्या या विकाराला बळी पडले आहेत. अभिव्यक्तीचा अभिनिवेश न राहता आवेश संचारला की काय होतं याचं उत्तम उदाहरण म्हणून राजकारणाच्या धाग्यांकडे बोट दाखवता येईल.

राजकीय धाग्यांचा दुसरा प्रकार म्हणजे अत्यंत साळसूदपणे नवनवीन जातीय वाद निर्माण करणे आणि त्याला चलाखीने ब्राम्ह्ण विरुद्ध अब्राम्हण, हिंदू विरुद्ध मुस्लिम, ३ टक्के विरुद्ध इतर, पिढ्यानपिढ्यांचे अत्याचार याचं वळन देऊन त्याबद्द्ल पद्धतशीरपणे बुद्धीभेद पसरवणे. यात तरबेज असलेले अनेक सिद्धहस्त सदस्य मायबोलीवर आहेत. जातीभेदाला विरोध करण्याच्या नावाखाली प्रत्येक प्रतिक्रियेत चलाखीने जातीयवाद पसरवण्याच्या त्यांच्या हातोटीपुढे अनेकांनी हात टेकले आहेत. त्यांच्याच जोडीला देशविघातक अतिरेकी तत्वज्ञानाचं समर्थन करणारे आणि एम आय एम सारख्या पक्षाचे छुपे आणि उघड समर्थकही इथे आहेत. मायबोलीच्या माध्यमातून समाजात तेढ निर्माण करणारे विचार आपण पसरवत आहोत हे यांच्या गावी तरी नाही, किंवा समजून-उमजून हे विचार पसरवणं सुरु आहे. सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने अत्यंत घातक असलं तरी आमचा हेतू साध्य होतो आहे ना? मग बास!

मायबोलीवरील सर्वात उबग आणणारा आणि संतापजनक प्रकार जर कोणता असेल तर तो म्हणजे इथल्या सदस्यांवर करण्यात येणारे वैयक्तीक हल्ले. एखाद्या सदस्यावर आपल्या जुन्या विरोधकाचा डुप्लिकेट आयडी असल्याचा आरोप करणं हे तर अगदीच क्षुल्लक वाटावं अशी एकापेक्षा एक अश्लाघ्य वक्तंव्य इथे केली जातात. एकमेकांचे संस्कार जाहिररित्या काढले जातात, मनोरुग्ण, विकृत, भिकारचोट (नाईलाजाने लिहावं लागत आहे) असल्या शेलक्या विशेषणांची बरसात असतेच, परंतु सदस्याच्या वैयक्तीक, वैद्यकीय आणि कौटुंबिक परिस्थितीवरुनही अत्यंत अपमानास्पद शब्दांत संबोधनं दिली जातात जी केवळ तिरस्कारणीय आहेत. दोन दिवसांपूर्वीच पाहण्यात आलेला एक प्रकार म्हणजे एका अत्यंत गलिच्छा शिवीशी साधर्म्य दाखवणारं संबोधन पंतप्रधानांसाठी वापरणं आणि ते कसं योग्यं आहे याचं निरर्गल समर्थन करणं! समोरच्या व्यक्तीविषयी आपल्याला काहीही माहित नसताना त्याच्याबद्दल काहिही बरळण्याची ही हिणकस मानसिकता कधी सुधारणार आहे का? आपण स्वतः गेंड्याच्या कातडीचे आहोत म्हणून समोरचाही तसाच असेल, आपल्या विकृतीमुळे त्याला त्रासच व्हावा ही इच्छा असल्यामुळे हे लोक सुधारण्यापलीकडे गेलेले आहेत हेच खरं!

या सगळ्या प्रकारात प्रशासक म्हणून आपण काही अंशी तरी अपयशी ठरलेले आहात असं खेदाने नमूद करावसं वाटतं. मायबोलीवर चाललेल्या तमाशांमुळे आज कित्येक जुने सदस्य एकही वाक्यं लिहीण्यास धजावत नाहीत. कारण कोण कसला अश्लाघ्य वैयक्तीक आरोप करेल याची काहिही शाश्वती नाही. असल्या प्रवृत्तींना वेळीच आवर घालण्यात आपल्याला फारसं यश येत नाही हे वेळोवेळी दिसून आलं आहे. प्रशासक मंडळातील काही सदस्यं हे वरकरणी आपण निष्पक्ष असल्याचा आव आणत असले तरी एका विशिष्ट कंपूच्या कारवायांकडे हे लोक डोळेझाक करतात हे लपून राहिलेलं नाही.

मायबोलीच्या एका जुन्या जाणत्य सदस्याशी झालेल्या चर्चेअंती त्यांनी व्यक्तं केलेलं मत मायबोलीच्या सद्यस्थितीबाबत भाष्यं करुन जातं. त्या म्हणाल्या, "आजकाल मायबोलीवर असतं काय? तेच ते राजकारणावरचे धागे, तीच कंपूबाजी आणि तमाशे! मायबोलीवर येण्याची आजकाल इच्छा होत नाही! लाज वाटते असल्या लोकांची आणि त्यांच्या विचारांची!"

अद्यापही वेळ गेलेली नाही असं निदान माझं वैयक्तीक मत आहे. प्रत्येकाने - अगदी प्रशासकांपासून सामान्य सदस्यांपर्यंत आत्मपरिक्षण करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक बाबतीत आपलंच मत शेवटचं हा हेका सोडायला हवा! विघातक प्रवृत्ती सर्वत्र असतात, परंतु त्यांना प्रबळ होऊ द्यायचं का मायबोलीचं सकस साहित्य आणि माहितीचं भांडार म्हणून अस्तित्व टिकवून ठेवायचं हे शेवटी आपल्याच हाती आहे.

मायबोलीवरील अनेक धाग्यांवर असलेल्या माझ्या पोस्ट्स या त्यावर काय प्रतिक्रीया येतात हे आजमावण्यासाठी लिहीलेल्या होत्या. त्यामागे कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. तसाच तो या पत्रातही तो नाही. यापुढे कोणत्याही धाग्यावर माझी पोस्ट दिसणार नाही.

आपली नम्र
वैष्णवी धारप

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol

डपो
प्रकाटाआ

विचारात पडले. ???

प्रो फा ई ल मध्ये पुरुष असं लिहिलंय ना? >>> बरं मग ? तुम्हाला काय म्हणायचे आहे ?

मोबाईलवरून मराठी टाईप केलंय का कधी ?
कानामात्रा देताना तारांबळ होतेच. शिवाय आपोआप करेक्ट होत राहतात शब्द. मी पाडले असंच लिहीलेलं.

;-))

म्हणूनच आयडी अनुषंगाने योग्य तो ब्राउझर वापरत आहोत ह्याची खात्री करून मगच प्रतिसादाचे SAVE बटण दाबावे Light 1 आयडी आणि ब्राऊझर गणितात घाई घाईत गफलत केली की होते कधीमधी अशी गमाडी गंमत !

००७ जेम्स डोवाल प्रमाणे काहीतरी कामगिरी केल्यासारखे काही जण खूष होताहेत. होऊदेत..

आम्हाला वैष्णवी धारपची गंमत समजली ती समजलीच. Lol

खरं आहे. चार वर्षानंतर या आयडीच्या वारसांनी निष्कर्ष मांडणे गरजेचे होते. Lol
पण हा धागा सामान्य ज्ञानात भर टाकत आहे. त्याचा उपयोगही नेमके संदर्भ देताना होत आहे हे ही नसे थोडके.

असंच Lol

<<<अत्यंत गलिच्छा शिवीशी साधर्म्य दाखवणारं संबोधन पंतप्रधानांसाठी वापरणं आणि ते कसं योग्यं आहे याचं निरर्गल समर्थन करणं!>>
मायबोली हे समाजाचे प्रतिबिंब आहे - जे समाजात चालते तेच इथे.
बिचारे प्रशासक - १०० कोटी लोकांच्या समाजाला ते कितीसा आवर घालणार?
अनेकदा आय डींना हाकलून दिले. दुसर्‍या आय डी ने परत येऊन पुनः तोच गोंधळ.
इथे नेहेमीच दोन विरुद्ध मतांची भांडणे चालू असतात. आजकाल जरा राजकारणाचे स्तोम इथे फार माजले आहे.
पूर्वी फक्त निरनिराळ्या विषयांवर खेळीमेळीने गंमतीने "चर्चा" होत.

Pages