मायबोली प्रशासकांना खुले पत्र

Submitted by कॉपरमाईन on 3 November, 2015 - 11:58

मान्यवर मायबोली प्रशासक,

सप्रेम नमस्कार,

गेल्या सुमारे चार-साडेचार महिन्यांपासून मी www.maayboli.com या संस्थळावर सदस्य आहे. मायबोलीचे सदस्यत्वं मी एका विशीष्ट हेतूने घेतले होते. वेगवेगळ्या भाषांतील संस्थळांवर विविध क्षेत्रातील लोकांचा असलेला वावर, त्यांची अभिव्यक्ती, संस्थळाच्या माध्यमातून जाणिवपूर्वक आणि अजाणतेपणी पसरवण्यात येत असलेले विचार आणि या सगळ्यात संस्थळाच्या अधिकारीवर्गाची भूमिका त्यांचा तौलानिक अभ्यास करण्याची कामगिरी माझ्या टीमवर सोपवण्यात आलेली आहे. टीममधील मराठी सदस्यांपैकी एक म्हणून माझ्यावर एकंदर ३ मराठी संस्थळांचा अभ्यास करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. मायबोली हे त्यापैकीच एक संस्थळ.

एक मराठी संस्थळ आणि त्यावर असलेलं साहित्यं आणि माहिती म्हणून मायबोली इतर काही मराठी संस्थळांच्या तुलनेत निश्चितच उजवी आहे यात शंका नाही. अनेक वेगवेगळ्या विषयांवरील विपुल लेखन - कथा, कादंबर्‍या, चिंतनात्मक लेख, पाककृती, वैद्यकीय, गिर्यारोहण, आरोग्य, पर्यावरण आणि निसर्ग संवर्धन अशा विविध विषयांवरील प्रचंड माहिती मायबोलीवर आहे. अनेक वेगवेगळ्या विषयावरील कविता, मराठी गझला, विडंबनं यांचीही इथे रेलचेल आहे. अनेक सदस्यांचं सकस लेखन मायबोलीवर आहे. केवळ वाचनमात्रं असलेल्या सदस्यांनाही निखळ वाचनाचा आनंद देऊन जाईल असं भांडार इथे आहे. अनेक मराठी कार्यक्रमांवरचे आणि खासकरुन बथ्थड मालिकांवरचे धागे आणि चित्रपट परिक्षणं ही चार घटका करमणूकही आहे.

मायबोलीवरील माझा सदस्यत्व कालावधी केवळ साडेचार महिन्यांचा. मायबोली हे संस्थळ म्हणून सुमारे पंधरा वर्षांपेक्षा जास्त कार्यरत असल्याने आधी घडून गेलेल्या कित्येक घटनांची मला कल्पना असणं शक्यं नव्हतं. यासंदर्भात जाणून घेण्यासाठी मी अनेक मायबोली सदस्यांशी संपर्क साधला. काही अपवाद वगळता बहुतेकांनी अतिशय आपलेपणाने मदत केली. वसुधैव कुटुंबकम् या उक्तीला जागणारे अनेक मराठी सृजन जगभरात पसरलेले आहेत हे चित्रं खूप आश्वासक आहे.

वरवर पाहता हे चित्रं खूप सुंदर आहे, परंतु....

ग्रूपिझम अर्थात कंपूबाजी हा न टाळता येण्याजोगा आजार मायबोलीला आहेच!

एखाद्या विशिष्ट प्रदेशातील, किंवा शहरातील लोकांचा ग्रूप असणं हे अनपेक्षित नाही, उलट परदेशांत असल्यास अशा ग्रूप्सच्या माध्यमातून आपल्या आसपास असलेले आपल्या मायभूमीतले लोक भेटणं हा अशा ग्रूप्सचा मोठा फायदा असतो. एखाद्या नवीन प्रदेशात आपण जात असल्यास तिथे आधीपासूनच राहत असलेल्या लोकांची ओळख असणं, त्यांच्याकडून माहिती मिळणं हा मोठा आधार असतो. विशेषतः तिथे राहण्याचा कालावधी लांबचा असल्यास ही माहिती फार महत्वाची ठरू शकते. दुर्दैवाने मायबोलीवरच्या ज्या दोन-तीन ग्रूप्समध्ये या माहितीची चौकशी केल्यावर एकच उत्तर मिळालं - गूगल करा! गूगल कोणालाही करता येईल, गूगलवर माहितीही मिळेल, परंतु वर्षानुवर्षे तिथे राहत असलेल्यांचे अनुभव गूगलपेक्षा मोलाचे असणार नाहीत का?

ग्रूपिझमचा दुसरा उबग आणणारा प्रकार म्हणजे अर्थातच राजकारण!

मायबोलीवरील अनेक सदस्यांचं चरण्याचं राखीव कुरण म्हणजे राजकारणाला वाहिलेले धागे, अड्डे, कट्टे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. देशातील काँग्रेस आणि भाजप या दोन प्रमुख पक्षांना तन-मनाने अर्पण असलेले लोक जो काही धुमाकूळ घालतात ते पाहिल्यावर पुलं च्या पाळीव प्राणी या लेखातील - एकमेकांवर भुंकण्यात म्युन्सिपालटीचे सदस्य कुत्र्यांनाही हार जात नसल्याने कुत्र्यांना आपल्या मर्यादांची जाणिव असेल याबद्दल मला खात्री आहे या वाक्याची आठवण झाल्याशिवाय राहवत नाही.

तुम्ही आमच्या पक्षाचे समर्थक नाही ना, मग चालते व्हा पाकिस्तानात ही भाजप समर्थकांची जनरल विचारसरणी काय, किंवा भाजपचे सरकार आल्यापासून सर्वस्व लुटलेल्या सिंध्याप्रमाणे उर बडवत फिरणार्‍या आणि शेंडा-बुडखा नसलेले आरोप करत सुटणार्‍या काँग्रेस समर्थकांची विचारसरणी काय, दोन्हीही सारख्याच नाहीत काय? महत्वाचं म्हणजे काँग्रेस किंवा भाजप यांचे समर्थक नसलेलेही इतर लोक अस्तित्वात असू शकतात आणि ते आम आदमी पार्टीछाप पक्षाच्या भजनी मंडळात नसू शकतात हेच मुळात राजकीय धाग्यांवरच्या महाभागांना मान्य नाही तिथे काय बोलणार? कोणतीही चर्चा मग ती राजकीय असो वा नसो कोणत्याही मुद्द्यावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप, मोदी विरुद्ध सोनिया किंवा राहुल गांधी, दीड वर्ष विरुद्ध ६५ वर्षांचा हिशोब यावर आणण्याची आवश्यकता आहे का? राजापेक्षा राजनिष्ठच जास्तं कडवे असतात आणि बाटगा हा सर्वात जास्तं धर्मनिष्ठ असतो या उक्तीचं वरचेवर प्रत्यंतर देणार्‍या या धाग्यांचा सामान्यं सदस्यांना किती उबग येत असेल याचा हे आक्रस्तळी सदस्य कधीतरी विचार करतात का? मुळात आत्मपरिक्षण नावाचा काही प्रकार असतो हे किती जणांच्या गावी आहे? दुर्दैवाने एकेकाळी चांगलं लेखन करणारे लोकही राजकारणाच्या या विकाराला बळी पडले आहेत. अभिव्यक्तीचा अभिनिवेश न राहता आवेश संचारला की काय होतं याचं उत्तम उदाहरण म्हणून राजकारणाच्या धाग्यांकडे बोट दाखवता येईल.

राजकीय धाग्यांचा दुसरा प्रकार म्हणजे अत्यंत साळसूदपणे नवनवीन जातीय वाद निर्माण करणे आणि त्याला चलाखीने ब्राम्ह्ण विरुद्ध अब्राम्हण, हिंदू विरुद्ध मुस्लिम, ३ टक्के विरुद्ध इतर, पिढ्यानपिढ्यांचे अत्याचार याचं वळन देऊन त्याबद्द्ल पद्धतशीरपणे बुद्धीभेद पसरवणे. यात तरबेज असलेले अनेक सिद्धहस्त सदस्य मायबोलीवर आहेत. जातीभेदाला विरोध करण्याच्या नावाखाली प्रत्येक प्रतिक्रियेत चलाखीने जातीयवाद पसरवण्याच्या त्यांच्या हातोटीपुढे अनेकांनी हात टेकले आहेत. त्यांच्याच जोडीला देशविघातक अतिरेकी तत्वज्ञानाचं समर्थन करणारे आणि एम आय एम सारख्या पक्षाचे छुपे आणि उघड समर्थकही इथे आहेत. मायबोलीच्या माध्यमातून समाजात तेढ निर्माण करणारे विचार आपण पसरवत आहोत हे यांच्या गावी तरी नाही, किंवा समजून-उमजून हे विचार पसरवणं सुरु आहे. सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने अत्यंत घातक असलं तरी आमचा हेतू साध्य होतो आहे ना? मग बास!

मायबोलीवरील सर्वात उबग आणणारा आणि संतापजनक प्रकार जर कोणता असेल तर तो म्हणजे इथल्या सदस्यांवर करण्यात येणारे वैयक्तीक हल्ले. एखाद्या सदस्यावर आपल्या जुन्या विरोधकाचा डुप्लिकेट आयडी असल्याचा आरोप करणं हे तर अगदीच क्षुल्लक वाटावं अशी एकापेक्षा एक अश्लाघ्य वक्तंव्य इथे केली जातात. एकमेकांचे संस्कार जाहिररित्या काढले जातात, मनोरुग्ण, विकृत, भिकारचोट (नाईलाजाने लिहावं लागत आहे) असल्या शेलक्या विशेषणांची बरसात असतेच, परंतु सदस्याच्या वैयक्तीक, वैद्यकीय आणि कौटुंबिक परिस्थितीवरुनही अत्यंत अपमानास्पद शब्दांत संबोधनं दिली जातात जी केवळ तिरस्कारणीय आहेत. दोन दिवसांपूर्वीच पाहण्यात आलेला एक प्रकार म्हणजे एका अत्यंत गलिच्छा शिवीशी साधर्म्य दाखवणारं संबोधन पंतप्रधानांसाठी वापरणं आणि ते कसं योग्यं आहे याचं निरर्गल समर्थन करणं! समोरच्या व्यक्तीविषयी आपल्याला काहीही माहित नसताना त्याच्याबद्दल काहिही बरळण्याची ही हिणकस मानसिकता कधी सुधारणार आहे का? आपण स्वतः गेंड्याच्या कातडीचे आहोत म्हणून समोरचाही तसाच असेल, आपल्या विकृतीमुळे त्याला त्रासच व्हावा ही इच्छा असल्यामुळे हे लोक सुधारण्यापलीकडे गेलेले आहेत हेच खरं!

या सगळ्या प्रकारात प्रशासक म्हणून आपण काही अंशी तरी अपयशी ठरलेले आहात असं खेदाने नमूद करावसं वाटतं. मायबोलीवर चाललेल्या तमाशांमुळे आज कित्येक जुने सदस्य एकही वाक्यं लिहीण्यास धजावत नाहीत. कारण कोण कसला अश्लाघ्य वैयक्तीक आरोप करेल याची काहिही शाश्वती नाही. असल्या प्रवृत्तींना वेळीच आवर घालण्यात आपल्याला फारसं यश येत नाही हे वेळोवेळी दिसून आलं आहे. प्रशासक मंडळातील काही सदस्यं हे वरकरणी आपण निष्पक्ष असल्याचा आव आणत असले तरी एका विशिष्ट कंपूच्या कारवायांकडे हे लोक डोळेझाक करतात हे लपून राहिलेलं नाही.

मायबोलीच्या एका जुन्या जाणत्य सदस्याशी झालेल्या चर्चेअंती त्यांनी व्यक्तं केलेलं मत मायबोलीच्या सद्यस्थितीबाबत भाष्यं करुन जातं. त्या म्हणाल्या, "आजकाल मायबोलीवर असतं काय? तेच ते राजकारणावरचे धागे, तीच कंपूबाजी आणि तमाशे! मायबोलीवर येण्याची आजकाल इच्छा होत नाही! लाज वाटते असल्या लोकांची आणि त्यांच्या विचारांची!"

अद्यापही वेळ गेलेली नाही असं निदान माझं वैयक्तीक मत आहे. प्रत्येकाने - अगदी प्रशासकांपासून सामान्य सदस्यांपर्यंत आत्मपरिक्षण करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक बाबतीत आपलंच मत शेवटचं हा हेका सोडायला हवा! विघातक प्रवृत्ती सर्वत्र असतात, परंतु त्यांना प्रबळ होऊ द्यायचं का मायबोलीचं सकस साहित्य आणि माहितीचं भांडार म्हणून अस्तित्व टिकवून ठेवायचं हे शेवटी आपल्याच हाती आहे.

मायबोलीवरील अनेक धाग्यांवर असलेल्या माझ्या पोस्ट्स या त्यावर काय प्रतिक्रीया येतात हे आजमावण्यासाठी लिहीलेल्या होत्या. त्यामागे कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. तसाच तो या पत्रातही तो नाही. यापुढे कोणत्याही धाग्यावर माझी पोस्ट दिसणार नाही.

आपली नम्र
वैष्णवी धारप

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अशीच धमकी अजुनही कोणीतरी कोणालातरी दिलेली होती. त्यात असे म्हणले होते की "रस्त्याने जाता येता संभाळा"
दोन्ही बाजुंच्या लोकांनी सामोपचाराने कधीच घ्यायचे नाही का ? सतत दोषारोपच करत वादच घालायचे का ?

भारी उदाहरण आहे हा धागा. यातील प्रतिसादांवरून लक्षात येईल की कोण जास्त विखारी आणि आक्रमक आहे आणि कोण सतत सलोख्याचे आवाहन करत आहे.
ज्यांनी मार्च नंतर एकदम नोव्हेंबर मधे मुद्दाम धागा वर आणला त्यांचे आभार. Happy

http://www.maayboli.com/node/50289

आणि त्या फटकाने धमकी दिली कुटे ? वांग्याच्या धागयावर !>>>

त्या वांग्याच्या धाग्याचं पार भरीत झालंय, कुठे नेऊन ठेवलास धागा माझा Lol

सायो यांचं म्हणणं लक्षात आलं. आयडीचा पूर्वेतिहास हा क्रायटेरिया "विचार" अ‍ॅक्सेप्ट करण्यासाठी नसावा. या धाग्यामागचा हेतू साळसूदपणाचा असल्याने आम्ही दूधखुळे नाहीत हे दाखवण्यासाठी जे लिहीलंय ते योग्य आहे. जर या आयडीने व्यवस्थित चाललेल्या आपसातील चर्चेत मांडले असते तर त्यातल्या मुद्यांवर नक्कीच चर्चा झाली असती....

आता बस्स.

काय राव बंद करता हा धागा!

गरज नाही. धागा कुठलाहि असला तरी वाद तेच - भाजप्/काँग्रेस(आहे ना अजून?), ब्राह्मण/ अब्राह्मण. गांधी सावरकर (म्हणजे खरे मूळ गांधी, महात्मा गांधी, आजकालचे नव्हे), इथेच लिहायचे.

अजून काही नाही तर एकमेकांना शिव्या!

छान करमणूक होते -

मला वाटते मायबोलीने सदस्यत्व घ्यायला शंभर डॉलर लावावेत. मुकाट्याने तोलून मापून लिहितील लोक,
मग ते पैसे भरून कुणाला इथे नंगा नाच करायचा असेल तर आम्ही बघू!
निदान अमेरिकेतल्या लोकांना तरी १०० डॉ. ची किंमत कळते. भारतीयांना काय, क्रिकेट नि बॉलिवूड वर हजार कोटी रुपये उधळतात, तिथे शंभर डॉ. किस झाडकी पत्ती! शिवाय दुसर्‍याला वेडे, वाईट म्हंटले की स्वतः आपोआप शहाणे नि चांगले होतो अशी त्यांची समजूत.
निदान मायबोली च्या प्रशासकांना थोडा तरी मोबदला मिळेल! खूप काम करतात बिचारे.

बघा बसल्या जागी मी तीन विषय दिले भांडायला -
१. अमेरिकेतले भारतीय वि. भारतातले. मत्सर, अज्ञान यांच्यामुळे किती विचित्र, हास्यास्पद लिहील्या जाते भारतातून ते वाचून करमणूक होईल.
२. मायबोलीवर सदस्यत्व घेण्यास पैसे असावेत का?
३. क्रिकेट व बॉलीवूडवर हजारो कोटी रुपये खर्च करणे बरोबर की चूक?

आता इथेच विषय निघालेत तर इथेच लिहा. उगाच नवीन धागा काढण्याचे कष्ट कशाला?
सगळे काँप्युटरचे ज्ञान, औषधांचे ज्ञान बाहेरून आयते घेतले तसेच आयता धागा पण!!

काही नाही तर मला शिव्या देण्यातच एक दोन पाने सहज भरतील.

Proud

Lol
>>मला वाटते मायबोलीने सदस्यत्व घ्यायला शंभर डॉलर लावावेत. मुकाट्याने तोलून मापून लिहितील लोक,>> हेच तर मी म्हटलं सुरूवातीला. नुसते तोलून मापून लिहितीलच नव्हे तर एका आयडीबरोबर बाकी डुआयचं लटांबर आणणार नाहीत. दिडक्या मोजायला लागतील तेव्हा किंमत कळेल.

धागा पूर्ण वाचला. नक्की प्रश्न काय आहे हे कळतंय आणि त्यावर हातात असलेले उपाय (दुर्लक्ष करणे, प्रतिसाद न देणे, रोमात राहणे इत्यादी) बरेच सदस्य करतात देखील. पण त्यामुळे प्रश्न समाधानकारक पातळीवर (पूर्णपणे नसला तरी) सुटलाय असं नाहीये. अशावेळी सदस्यत्व सशुल्क करणे किंवा मॉडरेटर्सची संख्या/कार्यवाही वाढवणे असे उपाय असले तरी ते practical नाहीयेत.
मी हे आधी देखील सुचवलं आहे आणि हा उपाय मला योग्य वाटतो. प्रतिसादाला आणि धाग्याला up vote/down vote करण्याची सोय सदस्यांना प्राप्त करून देणे. काही विशिष्ट संख्येपलीकडे down votes गेली की तो प्रतिसाद दिसेनासा होईल म्हणजे त्यावर अधिक वाद होत राहणार नाहीत. सर्व नवीन लेखन बघण्यासाठी latest आणि popular असे दोन पर्याय देता येतील. popular मध्ये सर्वाधिक up votes मिळालेले धागे दिसतील. असेच प्रतिसादांच्या बाबतीत देखील करता येईल. ह्या लोकशाही पद्धतीने होणाऱ्या moderation चा नक्की उपयोग होईल असं मला मनापासून वाटतं.

मी तर आधीच म्हटलं होतं की कुणाच्या खिशातून पैसे गेले असतील तर बिल दाखवून माझ्याकडून घेऊन जावेत. नो प्रॉब्लेम ! Happy

झुक्याला मानलं हं.. एक पैसा न घेता धडाधड एकेका भाषेत बस्तान बसवतंय फेसबुक .

>>निदान अमेरिकेतल्या लोकांना तरी १०० डॉ. ची किंमत कळते. भारतीयांना काय, क्रिकेट नि बॉलिवूड वर हजार कोटी रुपये उधळतात, तिथे शंभर डॉ. किस झाडकी पत्ती
झक्की, येथे तर पुढची पायरी दिसत आहे. इतरांचे पैसे भरायची तयारी.

>>शिवाय दुसर्‍याला वेडे, वाईट म्हंटले की स्वतः आपोआप शहाणे नि चांगले होतो अशी त्यांची समजूत.
हे तर सारखेच खरे करून दाखविले जात आहे.

up vote/down vote करण्याची सोय ........... धागे दिसतील. असेच प्रतिसादांच्या बाबतीत देखील करता येईल.

मला ही कल्पना फार आवडली. माझे संपूर्ण अनुमोदन.
अर्थात मला काही प्रोग्रामिंग करायचे नाही कारण येतच नाही.
पण आशा आहे की कुणि करतीलघे काम. आपण वर्गणि काढू वाटल्यास, काही खर्च असतील तर.

>>>काही विशिष्ट संख्येपलीकडे down votes गेली की तो प्रतिसाद दिसेनासा होईल म्हणजे त्यावर अधिक वाद होत राहणार नाहीत.<<<

मुद्दाम डाऊन व्होट्स देण्याचे प्रकार होऊ शकतील. (कारण व्होट कोणी दिले हे दिसणार नसणार).

ते अप आणि डाऊन काही खरे नाही हो. कंपूबाजी होऊन जास्त अप किंवा जास्त डाऊन मिळणार नाहीत की काय ?

बेफि, किती सदस्यांचा कंपू असेल? Number of down votes required to flag a comment as inappropriate can be kept at a certain higher threshold (which can be decided by trial and error). I do believe the collective conscience of Maayboli members (active and in ROM) will be the best moderator of all.
झक्की, Happy

images[2].jpg

मुद्दाम डाऊन व्होट्स देण्याचे प्रकार होऊ शकतील.
>>

हेच लिहीणार होतो. सदस्याचे मानांकन आणि त्याने केलेले अप / डाऊन व्होट ह्याआधारित अल्गो लिहावे हा माझा फु.स.

ज्याच्या प्रतिसादास जास्त अपव्होट मिळेल त्याचे मानांकन वाढावे आणि जास्त डाऊनव्होट होत गेल्यास त्याचे मानांकन घटावे.

आणि त्या मानांकनावर आधारित फिल्टर देण्यात यावे, जेणेकरून लोकांना ह्या मानंकानावरील लोकांचेच प्रतिसाद दिसतील Happy (हे असे काहीसे ऐसी अक्षरे ह्या साईटवर आहे)

अर्थात नव्या सदस्यांना हे थोडे जिकीरीचे होऊ शकेल. त्यांच मानांकन कसं ठरवायचं हे ठरवावं लागेल Happy

जिज्ञासा, हा उपाय उत्तम आहे. जो अनेकदा सुचवला गेलाय, पण अमलात नाही येऊ शकला. लवकर आणावा ही इच्छा. रेडीट, stack ओव्हरफ्लो, स्ल्याश डॉट आणि हजारो साईट वापरतात असं. आणि कंपूबाजी दोन्हीकडे आहे ना, मग गळ्यातगळे घालून बुडतील. आणखी उत्तमच की. या किती डू आयडी काढताय ते काढा, आणि बुडवा दुसऱ्याला. मस्तच. माझा तरी डीस्ट्रीब्यूटेड इंटेलिजन्सवर विश्वास आहे.

३. क्रिकेट व बॉलीवूडवर हजारो कोटी रुपये खर्च करणे बरोबर की चूक?>>>>>>> येकदम चूक हाये बघा. म्या आजकाल पैसे वाया घालवतच नाय यावर. गेली १५ वर्षे टाकीज ला जाऊनश्यान कुठलाच शिणुमा बघीतला नाय. कशाला त्या नटमोगर्‍यान्वर आपली जिन्दगीची कमाई घालवायची म्हन्ती म्या. उद्या वय झाल तर काय त्यो शारुक, सलमान, अमीर, अक्षय नायतर ती कन्गना, प्रियन्का पेन्शन देनार हाय का मला? ऑ!

smiley-sad031.gif

माझा सध्याच्या मायबोली अभ्यास कमी पडत असेल कदाचित पण एवढं काय झालं सिरियस झालं प्रशासकांना पत्रं लिहिण्याजोगं आणि इतक्या सिरियस तक्रारीच्या सूरात प्रतिक्रिया , मला खरच समजत नाहीये !
जे पत्रात लिहिलेत ते 'सेम ओल्ड' इश्युज आहेत, एवढ्याने इथलं वातावरण प्रदूषित वगैरे झालय असं मला तरी वाटत नाही !
धार्मिक ,जातपात, संस्कृति, राजकारण इ. विषयच असे आहेत जे कुठल्याही सोशल मिडीया प्लॅटफॉर्म वर सेन्सिटिव्हच असणार !
अशा विषयांवरच्या बीबीवर सगळेच सभ्य सुसंस्कृत क्लिन चर्चा करतील ही आपेक्षाच चूकीची आहे!
व्यक्ती तितक्या प्रकृति आणि ओपन टु पब्लिक सोशल मिडिया इज अ‍ॅक्चुअली इनव्हायटींग देम , मोअर अँड मोअर युझर्स इज देअर टार्गेट !
युझर्स वाढतच जाणार आणि सगळेच आपल्या आपेक्षेच्या कल्पनेत बसणं शक्यं नाहीये , काही मूठभर प्रक्षोभक लिहिणारे असणारच कायम असे विषय चर्चेला मिळाल्यावर !
फक्त मायबोलीच नाही, कुठेही जा, ट्विटर- इन्स्टाग्रॅम- फेसबुक सगळीकडे दिसेल हे पण म्हणून अनुक्रमे तिथले प्रशासक कमी पडलेत असं अज्जिबात नाही !
कंपुबाजी, वै.शेरेबाजीला सुध्दा चर्चा करून काहीच सोल्युशन निघणार नाहीये, सगळेच काही न्युट्रल, फरगिव्हिंग किंवा संत बनु शकत नाहीत एखाद्या आयडीची हिस्टरी विसरून न्युट्रल चर्चा करायला !
ज्यांना मागचं विसरून न्युट्रल राहून चर्चा करता येते त्यांनी जरुर करावी पण सगळ्यांकडून ही आपेक्षा कशाला ?
एक्स्ट्रिम केसेस मधे अ‍ॅडमिननी बरेच स्पॅम आयडीज उडवलेत अशा हे नक्कीच पाहिलय, त्यामुळे कारवाई होतेय हे नक्की !
जे आवडत नाही ते इग्नॉअर करा , इथे प्रत्येकासाठी काहीतरी नक्कीच आहे, ज्या विषायावर चर्चा झेपते, ज्या कंपुंमधे आपलं पटतं त्या बीबीज वर जा एवढाच काय तो उपाय आहे :).
जर 100K followers असतील तर सगळे कायम हातात हात घालून एक गृप बनून सलोख्यानी रहाणं प्रॅक्टीकली शक्यं नाहीये, प्रॅक्टिकल आपेक्षा करा सगळ्याच सोशल मिडीयाकडून एवढाच माझा स्टँड !

सहमत

वाहवा, फारच सुंदर !
एवढ्या संतुलितपणे आलेली ही पहिलीच पोस्ट असावी दिपांजली यांची.
तुम्ही जे लिहिले आहे ते योग्य खरेच, पण लक्षात कोण घेतो ?

Pages