मायबोली प्रशासकांना खुले पत्र

Submitted by कॉपरमाईन on 3 November, 2015 - 11:58

मान्यवर मायबोली प्रशासक,

सप्रेम नमस्कार,

गेल्या सुमारे चार-साडेचार महिन्यांपासून मी www.maayboli.com या संस्थळावर सदस्य आहे. मायबोलीचे सदस्यत्वं मी एका विशीष्ट हेतूने घेतले होते. वेगवेगळ्या भाषांतील संस्थळांवर विविध क्षेत्रातील लोकांचा असलेला वावर, त्यांची अभिव्यक्ती, संस्थळाच्या माध्यमातून जाणिवपूर्वक आणि अजाणतेपणी पसरवण्यात येत असलेले विचार आणि या सगळ्यात संस्थळाच्या अधिकारीवर्गाची भूमिका त्यांचा तौलानिक अभ्यास करण्याची कामगिरी माझ्या टीमवर सोपवण्यात आलेली आहे. टीममधील मराठी सदस्यांपैकी एक म्हणून माझ्यावर एकंदर ३ मराठी संस्थळांचा अभ्यास करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. मायबोली हे त्यापैकीच एक संस्थळ.

एक मराठी संस्थळ आणि त्यावर असलेलं साहित्यं आणि माहिती म्हणून मायबोली इतर काही मराठी संस्थळांच्या तुलनेत निश्चितच उजवी आहे यात शंका नाही. अनेक वेगवेगळ्या विषयांवरील विपुल लेखन - कथा, कादंबर्‍या, चिंतनात्मक लेख, पाककृती, वैद्यकीय, गिर्यारोहण, आरोग्य, पर्यावरण आणि निसर्ग संवर्धन अशा विविध विषयांवरील प्रचंड माहिती मायबोलीवर आहे. अनेक वेगवेगळ्या विषयावरील कविता, मराठी गझला, विडंबनं यांचीही इथे रेलचेल आहे. अनेक सदस्यांचं सकस लेखन मायबोलीवर आहे. केवळ वाचनमात्रं असलेल्या सदस्यांनाही निखळ वाचनाचा आनंद देऊन जाईल असं भांडार इथे आहे. अनेक मराठी कार्यक्रमांवरचे आणि खासकरुन बथ्थड मालिकांवरचे धागे आणि चित्रपट परिक्षणं ही चार घटका करमणूकही आहे.

मायबोलीवरील माझा सदस्यत्व कालावधी केवळ साडेचार महिन्यांचा. मायबोली हे संस्थळ म्हणून सुमारे पंधरा वर्षांपेक्षा जास्त कार्यरत असल्याने आधी घडून गेलेल्या कित्येक घटनांची मला कल्पना असणं शक्यं नव्हतं. यासंदर्भात जाणून घेण्यासाठी मी अनेक मायबोली सदस्यांशी संपर्क साधला. काही अपवाद वगळता बहुतेकांनी अतिशय आपलेपणाने मदत केली. वसुधैव कुटुंबकम् या उक्तीला जागणारे अनेक मराठी सृजन जगभरात पसरलेले आहेत हे चित्रं खूप आश्वासक आहे.

वरवर पाहता हे चित्रं खूप सुंदर आहे, परंतु....

ग्रूपिझम अर्थात कंपूबाजी हा न टाळता येण्याजोगा आजार मायबोलीला आहेच!

एखाद्या विशिष्ट प्रदेशातील, किंवा शहरातील लोकांचा ग्रूप असणं हे अनपेक्षित नाही, उलट परदेशांत असल्यास अशा ग्रूप्सच्या माध्यमातून आपल्या आसपास असलेले आपल्या मायभूमीतले लोक भेटणं हा अशा ग्रूप्सचा मोठा फायदा असतो. एखाद्या नवीन प्रदेशात आपण जात असल्यास तिथे आधीपासूनच राहत असलेल्या लोकांची ओळख असणं, त्यांच्याकडून माहिती मिळणं हा मोठा आधार असतो. विशेषतः तिथे राहण्याचा कालावधी लांबचा असल्यास ही माहिती फार महत्वाची ठरू शकते. दुर्दैवाने मायबोलीवरच्या ज्या दोन-तीन ग्रूप्समध्ये या माहितीची चौकशी केल्यावर एकच उत्तर मिळालं - गूगल करा! गूगल कोणालाही करता येईल, गूगलवर माहितीही मिळेल, परंतु वर्षानुवर्षे तिथे राहत असलेल्यांचे अनुभव गूगलपेक्षा मोलाचे असणार नाहीत का?

ग्रूपिझमचा दुसरा उबग आणणारा प्रकार म्हणजे अर्थातच राजकारण!

मायबोलीवरील अनेक सदस्यांचं चरण्याचं राखीव कुरण म्हणजे राजकारणाला वाहिलेले धागे, अड्डे, कट्टे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. देशातील काँग्रेस आणि भाजप या दोन प्रमुख पक्षांना तन-मनाने अर्पण असलेले लोक जो काही धुमाकूळ घालतात ते पाहिल्यावर पुलं च्या पाळीव प्राणी या लेखातील - एकमेकांवर भुंकण्यात म्युन्सिपालटीचे सदस्य कुत्र्यांनाही हार जात नसल्याने कुत्र्यांना आपल्या मर्यादांची जाणिव असेल याबद्दल मला खात्री आहे या वाक्याची आठवण झाल्याशिवाय राहवत नाही.

तुम्ही आमच्या पक्षाचे समर्थक नाही ना, मग चालते व्हा पाकिस्तानात ही भाजप समर्थकांची जनरल विचारसरणी काय, किंवा भाजपचे सरकार आल्यापासून सर्वस्व लुटलेल्या सिंध्याप्रमाणे उर बडवत फिरणार्‍या आणि शेंडा-बुडखा नसलेले आरोप करत सुटणार्‍या काँग्रेस समर्थकांची विचारसरणी काय, दोन्हीही सारख्याच नाहीत काय? महत्वाचं म्हणजे काँग्रेस किंवा भाजप यांचे समर्थक नसलेलेही इतर लोक अस्तित्वात असू शकतात आणि ते आम आदमी पार्टीछाप पक्षाच्या भजनी मंडळात नसू शकतात हेच मुळात राजकीय धाग्यांवरच्या महाभागांना मान्य नाही तिथे काय बोलणार? कोणतीही चर्चा मग ती राजकीय असो वा नसो कोणत्याही मुद्द्यावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप, मोदी विरुद्ध सोनिया किंवा राहुल गांधी, दीड वर्ष विरुद्ध ६५ वर्षांचा हिशोब यावर आणण्याची आवश्यकता आहे का? राजापेक्षा राजनिष्ठच जास्तं कडवे असतात आणि बाटगा हा सर्वात जास्तं धर्मनिष्ठ असतो या उक्तीचं वरचेवर प्रत्यंतर देणार्‍या या धाग्यांचा सामान्यं सदस्यांना किती उबग येत असेल याचा हे आक्रस्तळी सदस्य कधीतरी विचार करतात का? मुळात आत्मपरिक्षण नावाचा काही प्रकार असतो हे किती जणांच्या गावी आहे? दुर्दैवाने एकेकाळी चांगलं लेखन करणारे लोकही राजकारणाच्या या विकाराला बळी पडले आहेत. अभिव्यक्तीचा अभिनिवेश न राहता आवेश संचारला की काय होतं याचं उत्तम उदाहरण म्हणून राजकारणाच्या धाग्यांकडे बोट दाखवता येईल.

राजकीय धाग्यांचा दुसरा प्रकार म्हणजे अत्यंत साळसूदपणे नवनवीन जातीय वाद निर्माण करणे आणि त्याला चलाखीने ब्राम्ह्ण विरुद्ध अब्राम्हण, हिंदू विरुद्ध मुस्लिम, ३ टक्के विरुद्ध इतर, पिढ्यानपिढ्यांचे अत्याचार याचं वळन देऊन त्याबद्द्ल पद्धतशीरपणे बुद्धीभेद पसरवणे. यात तरबेज असलेले अनेक सिद्धहस्त सदस्य मायबोलीवर आहेत. जातीभेदाला विरोध करण्याच्या नावाखाली प्रत्येक प्रतिक्रियेत चलाखीने जातीयवाद पसरवण्याच्या त्यांच्या हातोटीपुढे अनेकांनी हात टेकले आहेत. त्यांच्याच जोडीला देशविघातक अतिरेकी तत्वज्ञानाचं समर्थन करणारे आणि एम आय एम सारख्या पक्षाचे छुपे आणि उघड समर्थकही इथे आहेत. मायबोलीच्या माध्यमातून समाजात तेढ निर्माण करणारे विचार आपण पसरवत आहोत हे यांच्या गावी तरी नाही, किंवा समजून-उमजून हे विचार पसरवणं सुरु आहे. सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने अत्यंत घातक असलं तरी आमचा हेतू साध्य होतो आहे ना? मग बास!

मायबोलीवरील सर्वात उबग आणणारा आणि संतापजनक प्रकार जर कोणता असेल तर तो म्हणजे इथल्या सदस्यांवर करण्यात येणारे वैयक्तीक हल्ले. एखाद्या सदस्यावर आपल्या जुन्या विरोधकाचा डुप्लिकेट आयडी असल्याचा आरोप करणं हे तर अगदीच क्षुल्लक वाटावं अशी एकापेक्षा एक अश्लाघ्य वक्तंव्य इथे केली जातात. एकमेकांचे संस्कार जाहिररित्या काढले जातात, मनोरुग्ण, विकृत, भिकारचोट (नाईलाजाने लिहावं लागत आहे) असल्या शेलक्या विशेषणांची बरसात असतेच, परंतु सदस्याच्या वैयक्तीक, वैद्यकीय आणि कौटुंबिक परिस्थितीवरुनही अत्यंत अपमानास्पद शब्दांत संबोधनं दिली जातात जी केवळ तिरस्कारणीय आहेत. दोन दिवसांपूर्वीच पाहण्यात आलेला एक प्रकार म्हणजे एका अत्यंत गलिच्छा शिवीशी साधर्म्य दाखवणारं संबोधन पंतप्रधानांसाठी वापरणं आणि ते कसं योग्यं आहे याचं निरर्गल समर्थन करणं! समोरच्या व्यक्तीविषयी आपल्याला काहीही माहित नसताना त्याच्याबद्दल काहिही बरळण्याची ही हिणकस मानसिकता कधी सुधारणार आहे का? आपण स्वतः गेंड्याच्या कातडीचे आहोत म्हणून समोरचाही तसाच असेल, आपल्या विकृतीमुळे त्याला त्रासच व्हावा ही इच्छा असल्यामुळे हे लोक सुधारण्यापलीकडे गेलेले आहेत हेच खरं!

या सगळ्या प्रकारात प्रशासक म्हणून आपण काही अंशी तरी अपयशी ठरलेले आहात असं खेदाने नमूद करावसं वाटतं. मायबोलीवर चाललेल्या तमाशांमुळे आज कित्येक जुने सदस्य एकही वाक्यं लिहीण्यास धजावत नाहीत. कारण कोण कसला अश्लाघ्य वैयक्तीक आरोप करेल याची काहिही शाश्वती नाही. असल्या प्रवृत्तींना वेळीच आवर घालण्यात आपल्याला फारसं यश येत नाही हे वेळोवेळी दिसून आलं आहे. प्रशासक मंडळातील काही सदस्यं हे वरकरणी आपण निष्पक्ष असल्याचा आव आणत असले तरी एका विशिष्ट कंपूच्या कारवायांकडे हे लोक डोळेझाक करतात हे लपून राहिलेलं नाही.

मायबोलीच्या एका जुन्या जाणत्य सदस्याशी झालेल्या चर्चेअंती त्यांनी व्यक्तं केलेलं मत मायबोलीच्या सद्यस्थितीबाबत भाष्यं करुन जातं. त्या म्हणाल्या, "आजकाल मायबोलीवर असतं काय? तेच ते राजकारणावरचे धागे, तीच कंपूबाजी आणि तमाशे! मायबोलीवर येण्याची आजकाल इच्छा होत नाही! लाज वाटते असल्या लोकांची आणि त्यांच्या विचारांची!"

अद्यापही वेळ गेलेली नाही असं निदान माझं वैयक्तीक मत आहे. प्रत्येकाने - अगदी प्रशासकांपासून सामान्य सदस्यांपर्यंत आत्मपरिक्षण करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक बाबतीत आपलंच मत शेवटचं हा हेका सोडायला हवा! विघातक प्रवृत्ती सर्वत्र असतात, परंतु त्यांना प्रबळ होऊ द्यायचं का मायबोलीचं सकस साहित्य आणि माहितीचं भांडार म्हणून अस्तित्व टिकवून ठेवायचं हे शेवटी आपल्याच हाती आहे.

मायबोलीवरील अनेक धाग्यांवर असलेल्या माझ्या पोस्ट्स या त्यावर काय प्रतिक्रीया येतात हे आजमावण्यासाठी लिहीलेल्या होत्या. त्यामागे कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. तसाच तो या पत्रातही तो नाही. यापुढे कोणत्याही धाग्यावर माझी पोस्ट दिसणार नाही.

आपली नम्र
वैष्णवी धारप

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>वेगवेगळ्या भाषांतील संस्थळांवर विविध क्षेत्रातील लोकांचा असलेला वावर, त्यांची अभिव्यक्ती, संस्थळाच्या माध्यमातून जाणिवपूर्वक आणि अजाणतेपणी पसरवण्यात येत असलेले विचार आणि या सगळ्यात संस्थळाच्या अधिकारीवर्गाची भूमिका त्यांचा तौलानिक अभ्यास करण्याची कामगिरी माझ्या टीमवर सोपवण्यात आलेली आहे. टीममधील मराठी सदस्यांपैकी एक म्हणून माझ्यावर एकंदर ३ मराठी संस्थळांचा अभ्यास करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. मायबोली हे त्यापैकीच एक संस्थळ.>> हे कुणी सोपवलं होतं तुमच्यावर? तुमच्या कंपनीने? त्याचा रिझल्ट काय?

मलाही तोच प्रश्न पडला. पुढचा सगळा मजकूर एक मत म्हणून वाचायला ठीक वाटतं पण ह्या ओपनींगमुळे मी फक्त एक तटस्थ निरिक्षक म्हणून वावरताना जे जाणवलं ते लिहतेय ह्या स्टान्सला पुढे जरा धक्का बसला कारण केलेल्या निरिक्षणांबाबत तिरस्कारणीय, संतापजनक, उबग आणणारा अशी विशेषणं वापरलेली आहेत जे निश्चितच तटस्थ असल्याचे लक्षण नाही. ती पहिली ओपनिंग डिलिट केली तर खरं एका व्यक्तीची निरिक्षणं आणि त्यावर भाष्य असं स्वतंत्रपणे सुद्धा वाचलं तरी विचार करायला भाग पाडू शकतं हे पत्र.

एक तटस्थ निरिक्षक म्हणून त्यांनी लिहिलं असतं तर राजकीय बीबींवर त्यांची पोस्ट्स दिसायला नको होती. बरं जर त्यांच्या कंपनीने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली असेल तर मायबोलीच्या प्रशासकांना ह्याची कल्पना दिली होती का? नाही तर का नाही?

हे आत्ताच वाचलं >>मायबोलीवरील अनेक धाग्यांवर असलेल्या माझ्या पोस्ट्स या त्यावर काय प्रतिक्रीया येतात हे आजमावण्यासाठी लिहीले>> क्षमस्व, ह्यावर विश्वास ठेववत नाही.

<<या सगळ्या प्रकारात प्रशासक म्हणून आपण काही अंशी तरी अपयशी ठरलेले आहात असं खेदाने नमूद करावसं वाटतं. >>

------- तुम्ही योग्य प्रश्न मान्डलेला आहे, त्यात तथ्य आहे आणि तुमचा मुद्दा योग्य आहे हे क्षणभर मान्य करतो. कृपया प्रशासनाने काय करायला हवे हे (तुम्ही वा इतर) सुचवा अशी माझी विनन्ती आहे.

प्रशासन आणि त्यान्ची टिम वारम्वार प्रयत्न करत असतात, सौहार्द वातावरण ठेवण्यासाठी त्यान्नी अनेकदा कळकळीचे आवाहन केले आहे. अनेक वादग्रस्त बाफ बन्द केले आहेत, टोकाच्या वेळी सदस्यत्व गोठवले आहे... सदस्यत्व गोठवणे परिणामकारक नाही आहे पण मग उपाय काय आहेत ? माझ्यामते ते पुर्ण प्रयत्न करत आहेत पण त्यान्च्या तान्त्रिक मर्यादा आहेत असे प्रकर्षाने जाणवते.

उद्देश्य, ह्या आयडीचे वर्तन ह्या गोष्टीवर मी भाष्य करणार नाही. पण तरीही ह्या गोष्टी बाजूला ठेवून 'मायबोली' कडे पाहिले तर खरंच आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे (लिहिणार्‍यांनी, वाचणार्‍यांनी , वाद घालणार्यांनी, प्रत्यक्ष मैदानात्/चर्चेत न उतरता स्टेडीयम मधे बसून खेळाडुंवर काचेच्या बाटल्या फेकून त्यांची तारांबळ उडताना पाहण्यात गंमत वाटणार्यांनी आणि हे सगळं होऊ देणार्‍या प्रशासनानं देखील) असं मला नक्कीच वाटतं.
आणी यात जुनी मायबोली-नवी मायबोली हा प्रश्नच मांडायचा नाहीये मला.
हा क्लासीक ' हाय व्हॉल्यूम किंवा प्रॉडक्शन स्केल अप प्रॉब्लेम' आहे.

तटस्थ निरीक्षक Happy काहीही हां!
पहिला पॅरा काही च्या काही आहे! बाकी सगळी तुमची मते म्हणून ठीकच.

काही दिवसांपूर्वी मलाही असं वाटायचं की हे सुधारता येईल का? गोंधळाकडे दुर्लक्ष केलं तर तो आपोआप थांबेल का? काही लोकांना वाद घालायचेत, वाढवायचेत. अनेक वेळा विकोपाला जाऊन परत थंड होऊन परत विकोपाला जातात.
सध्या वाटतं काहीही करू नये. जर टिकणार असेल तर टिकेल नाही तर अनेक गोष्टी नामशेष होतात तशीच होईल. प्रशासनाने किंवा कोणीही अती इंटरव्हिन केलं तर फार काही साध्य होणार नाही, सध्या जितकी जरब बसवायचा प्रयत्न होतोय तो अगदी योग्य आहे. इंटरनेट हे जसे फ्री (फुकट न्हवे) आहे, त्यात काळे गोरे असायचेच. अनेक साईट वर १०० जाहिराती असतात, सरावाने लक्ष जात नाही. तसेच झाले लोकांचे की मचुरीटी येईल. ती येतच नसेल तर तेच लोकांना हवे आहे. इक्वीलीब्रीयम होईलच.
मनाप्रमाणे कन्वर्ज करायची कितीही इच्छा असली तरी तसे करणे धोकादायक आणि जवळ जवळ नेहेमी फसणारे असते. आयरनिकली, ठेविले अनंते... Happy

कॉपरमाईन म्हणजे जो मायनस (दोन अक्षरी आडनाव) या आयडीच्या बरोबरीने जागता पहारा हा धागा उडवायला मदत केलेला आयडी इतकंच अंधुक लक्षात आहे. या चार पाच जणांच्या टोळक्याबद्दल अजून काही माहीती हवी असल्यास कळवावे. त्यांनी मायबोलीबद्दल एक पत्र गुपचूप सदस्यांना पाठवले होते आणि मायबोलीवर पुन्हा पाऊल टाकणार नाही अशी घोषणा केली होती. ते हवे असल्यास देता येईल.

अर्थात तशी वेळ येऊ नये. बाकी गरीब लोक फुकटे असतात , ते मेल तर बरेच अशा अर्थाचे हिणकस कमेण्ट अर्जुन आणि क्यु या आयडीद्वारा टाकूनही कुणीही या सदस्यांविरुद्ध पोलिसात तक्रार नोंदवलेली नाही हे लक्षात घ्यावे. इतकेच पुरे.

मायबोलीचे सदस्यत्वं मी एका विशीष्ट हेतूने घेतले होते. वेगवेगळ्या भाषांतील संस्थळांवर विविध क्षेत्रातील लोकांचा असलेला वावर, त्यांची अभिव्यक्ती, संस्थळाच्या माध्यमातून जाणिवपूर्वक आणि अजाणतेपणी पसरवण्यात येत असलेले विचार आणि या सगळ्यात संस्थळाच्या अधिकारीवर्गाची भूमिका त्यांचा तौलानिक अभ्यास करण्याची कामगिरी माझ्या टीमवर सोपवण्यात आलेली आहे. टीममधील मराठी सदस्यांपैकी एक म्हणून माझ्यावर एकंदर ३ मराठी संस्थळांचा अभ्यास करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. मायबोली हे त्यापैकीच एक संस्थळ.>>>

हे अस्ं लिहिण्यासाठी त्या कंपनीकडून परवानगी घेतलीत का? असली सर्वेक्षणे करण्याआधी नॉन डिस्क्लोजर अ‍ॅग्रीमेंट साईन करावं लागतं याची तुम्हाला कल्पना आहे का? सर्वेक्षणाचे निकष जाहीर करण्यासाट्।ई काही विशेष पद्धत असते याची तुम्हाला क्ल्पना आहे का?

कृप्या सर्वेक्षण कुठल्या कंपनीसाठी केलेत आणि त्याचे एकूण निकष काय होते हे सविस्तर लिहा. इतर तीन मराठी संस्थळांची नावे लिहा. तौलनिक अभ्यासाचा उद्देश लिहा.

तटस्थ वैगरे ह्या थापा आहेत.आरक्षणाच्या धाग्यावरचे ह्याचे मत...

कॉपरमाईन:
धार्मिक आरक्षण कितीही टक्के असलं तरी ते रद्दंच करण्यात यावं.
अनेक कॉलेजेस जी धर्मादाय ट्रस्टद्वारा किंवा इतर संस्थांद्वारा चालवली जातात त्यात त्या-त्या धर्मियांचा कोटा असतो, तो ताबडतोब रद्द करण्यात यावा.

दोन उदाहरणं-

मुंबईतील भायखळ्याचं साबुसिद्दीक कॉलेज, ज्यात मुस्लिम विद्द्यार्थ्यांसाठी खास आरक्षण आहे.
मुंबईतीलच बांद्र्याचं थडोमल शाहनी कॉलेज, ज्यात सिंधी विद्यार्थ्यांसाठी खास आरक्षण आहे.

सवलतीत मिळणार्‍या गोष्टींची सवय लागल्यावर तो हक्क वाटू लागतो आणि मग त्यावर गदा आली की आक्रस्तळेपणा सुरु होतो. आरक्षणाबाबत नेमकं हेच सुरु आहे आणि तसंच अनेक प्रकारच्या सबसिडीबद्दल.trong>

त्याशिवाय ह्या तटस्थ व्यक्तिला आप भजनि मंडळ का वाटते? तटस्थपणा वैगरे थापा आहेत

खरेतर अनेक धाग्यांत ह्यांनी हिरिरीने मत मांडली आहेत.

अर्जुन या आयडीचं मत आहे काय कुणाकडे ? ते आणि हे एकच असावेत बहुधा. जागता पहारा या धाग्यावर रोज दुपारी १२ ते ४ या अमेरिकेत रात्र असण्याच्या काळात यांचा चालू असलेला गोंधळ आणि शिवीगाळ विसरले का हे ?

यांच्या मूळ रुपाने पाठवलेल्या विपत्रात खालीलप्रमाणे म्हटलेले आहे.

मी जो नवीन आयडी घेतला होता तो फक्त अ‍ॅडमिन हे ईमेलला उत्तर देत
> नसल्याने त्यांना विपू करण्यासाठी घेतला होता. एक आयडी ब्लॉक केल्यावर
> दुसर्‍या आयडीने संकेतस्थळ वापरण्याइतका निर्लज्जपणा माझ्यात नसल्याने व
> मी माझा स्वाभिमान खुंटीवर टांगून ठेवलेला नसल्याने मायबोली.कॉम
> सोडण्याचा निर्णय घेत आहे.
माझ्या स्वाभिमानापेक्षा गप्पागोष्टी व
> मायबोली.कॉम मोठे नव्हेत.

सदस्य सूज्ञ आहेतच...

मधुकर विनायक देशमुख | 31 May, 2015 - 10:22
दहशतवादाचं उत्तर म्हणून दहशतवाद हा कन्सेप्ट मला पटत नाही.
>>>

मिर्ची,

व्हावे खटासी खट, उद्धटासी उद्धट हे तुकोबांचं वचन तुमच्या कानावर आलं असेल अशी अपेक्षा. माझी आजी सांगायची ती एक म्हण दहशतवाद्यांच्या आणि पाकीस्तानधार्जिण्यांना अचूक लागू पडते.

चांभाराच्या देवाला खेटराचीच पूजा बांधावी लागते, त्याला फुलं वाहून चालत नाही!

>>>> हे मधुकर विनायक देशमुख कोण आहेत हे प्रशासकांइतके कुणाला ठाऊक असणार ? यांच्याविरुद्ध पोलीस तक्रार नोंदवली असती तर हे कुठे असते आज ? सदस्यांच्या शांतपणाचा जास्तीत जास्त गैरफायदा घेऊन स्वतःच कांगावा करण्याचे इतके घाणेरडे उदाहरण दुसरीकडे कुठेही नसेल. सदर पोस्ट भारतातील केंद्रसरकार या धाग्यावर सातव्या पानावर आहे.

मायबोलीवरच्या चर्चांना वाइट वळण लावण्यात इथल्या एकाच सदस्याचा सिंहाचा वाटा आहे, ज्याला काही लोक संस्कृतीरक्षक या टोपणनावाने ओळखतात, तेच ते कुठल्याही नावाने आले तरी ओळखू येणारे.. असो.

याउप्पर फुलस्टॉप.
ज्या हेतूने धागा काढला आहे त्याला खतपाणी पुरवण्याचा कुठलाही विचार नाही.

तटस्थपणा नसेलही, पण मुद्दे बरोबर आहेत.
हे सगळीकडेच सुरु आहे, फेसबुक काय व्हॉट्सॅप काय.
असं व्हायला नकोय, पण प्रशासक काय नि किती करणार, त्यांच्याही मर्यादा असणार.

अमितव यांनी लिहिल्या प्रमाणे मी तर असल्या धाग्यांकडे दुर्लक्ष करतो.

ज्यांनी मनमोहनसिंह यांच्यासारख्या पीएम चा उल्लेख मन्नू शिवाय केला नाही आणि ती चित्रे फॉर्वर्ड करण्यात धन्यता मानली, त्यांनी केंद्रातलं सरकार बदलल्यानंतर त्याचं मूल्यमापन होऊच द्यायचा नाही याचा चंग बांधावा, त्याबद्दल कुणीच काही बोलूही नये का ? ... क्षमस्व या पोस्टबद्दल.

कॉपरमाईन तुमची निरीक्षणे एकवेळ निरीक्षणे म्हणून वाचताही येतील पण तुम्ही जो साळसूदपणे वेड पांघरून पेडगावला जायचा आव आणलाय तो नाही हो पटला.
वर सप यांनी पुरावा दिलेलाच आहे. मायबोलीवर तुम्ही आत्तापर्यंत काय काय प्रतिक्रीया दिल्यात त्या पहण्याचीही छुपी सोय आहे महाराजा!
'गुगल इट' वाला मुद्दा उगाच ओपनिंग स्टॅटमेंट म्हणून टाकून मुळात तुम्हाला राजकारणावरच्या धाग्यांवर टिका करायची आहे हे लक्षात येतच आहे.
मूळात कुठला आय डी लोप पावल्यावर तुमच्या आयडीचा उदय झाला आणि त्या आयडीने तुम्ही काय काय लिहिलेत हे इथे बर्‍याच जणांना माहित आहे.
Happy

Subject: एक वैयत्तिक विपत्र (इमेल) - A personal email
> To:
>
>
> नमस्कार मंडळी
>
> माझ्यावर केलेल्या एकतर्फी कारवाईचा निषेध म्हणून इतःपर कुठलीही विनंती न
> करता मी मायबोली.कॉमला कायमचा राम राम ठोकत आहे.
>
> मला डुआयडीच्या मार्गाने त्रास देणारे आय्डी, वैयत्तिक टिप्पण्या—अगदी
> कुटुंबियांच्या बाबतही—करणारे सदस्य, एका विशिष्ठ जाती-धर्मावर घाणेरड्या
> भाषेत लिखाण करणारे सदस्य, माझ्या व इतरांच्या लेखनावर वैयत्तिक
> टिप्पण्या करणारे सदस्य या सगळ्यांना वारंवार तक्रार केल्यावरही मोकळे
> सोडले गेले व माझ्या व उदयच्या आयडीवर तत्परतेने कारवाई केली गेली.
>
> सत्यमेव जयते (दामोदरसुत) व BCCI ह्या धाग्यांवरचे माझे प्रतिसाद हे
> अजिबात वैयत्तिक नव्हते (त्यातला BCCI चा धागा डॉ. कै.गायकवाड यांनी
> वाचला आहे व ते तसे मला म्हणालेही). असे असताना कुठलीही कल्पना न देता
> तत्परतेने आमचे आयडी ब्लॉक केले गेले.
>
> जेव्हा जेव्हा मायबोलीवरच्या वावरात माझ्याकडून चूक झाली, तेव्हा तेव्हा
> मी संबंधितांकडे दिलगिरी व्यक्त केलीच होती व तसंच कारण असल्यास माफीही
> मागितली होती. पण आता गेल्या काही दिवसात काहीही आक्षेपार्ह झालेलं
> नसताना झालेली ही कारवाई अनाकलनीय आहे. चुका सगळ्यांकडूनच होतात, पण या
> उदाहरणात तरी माझी कुठलीही चूक नव्हती हे मी शपथेवर सांगू शकतो.
>
> मी जो नवीन आयडी घेतला होता तो फक्त अ‍ॅडमिन हे ईमेलला उत्तर देत
> नसल्याने त्यांना विपू करण्यासाठी घेतला होता. एक आयडी ब्लॉक केल्यावर
> दुसर्‍या आयडीने संकेतस्थळ वापरण्याइतका निर्लज्जपणा माझ्यात नसल्याने व
> मी माझा स्वाभिमान खुंटीवर टांगून ठेवलेला नसल्याने मायबोली.कॉम
> सोडण्याचा निर्णय घेत आहे. माझ्या स्वाभिमानापेक्षा गप्पागोष्टी व
> मायबोली.कॉम मोठे नव्हेत.
>
> मायबोलीवरच्या व प्रामुख्याने गप्पागोष्टींवरच्या आपल्या संपर्कामुळे
> आपल्यात जे ऋणानुबंध निर्माण झाले आहेत ते तसेच राहतील. आपण भ्रमणध्वनी,
> विपत्र (ईमेल), व फेसबुक सारख्या माध्यमातून संपर्कात राहूच.
>
> आपला,
> मंदार दि. जोशी
> भ्रमणध्वनी: 9763 556 906

(जर या आयडीने हे पत्र लिहीण्याचा (अति) शहाणपणा सुचला नसता तर हे पत्र इथे दिलं नसतं. यांच्याकडून आलेली शिवराळ भाषेतील पत्रे न देण्याचा निर्णय घेतला आहे.
या पुढे प्रशासनाकडून कारवाई झाली तर आनंदाने व विनातक्रार स्विकार करता येईल. इतके दिवस दोन आयडींनी मिळून केलेल्या बदनामीची थोडीशी भरपाई झालीच तर बरेच.

शुभरात्री.)

नंदिनी,

तुमच्यासारख्या अभ्यासू व्यक्तीकडून अशी प्रतिक्रीया यावी याचं जरा आश्चर्य वाटलं.

गोपनियतेचे निकष, डिस्क्लोजर अ‍ॅग्रीमेंट हे सर्व व्यवस्थित सांभाळून, त्याची काळजी घेऊनच हे सर्व केलेलं आहे. याचे जे निष्कर्ष आहेत ते सांख्यिकी - मॅट्रीक्स स्वरुपात आहेत जे मी इथे दिलेले नाहीत आणि देणारही नाही. इथे मी लिहीलेलं आहे ते केवळ प्रशासकांना उद्देशून लिहीलेलं आहे.

बाकी साती, सचिन पगारे, सुनियाद यांच्या प्रतिक्रीया अपेक्षेप्रमाणेच आलेल्या आहेत.

साती मला कोण समजतात याची मला कल्पना नाही. मागे त्या विठ्ठलना मी थेट स्पार्टाकस असल्याचा साक्षात्कार झाला होता. अर्थात साती मला कोण समजतात याच्याशी मला कवडीचंही कर्तव्य नाही. सुनियाद यांनी थेट मंदार जोशींचं नाव घेतलं! ग्रेट! अर्थात त्यांच्याशीही मला कवडीचं कर्तव्य नाही. बिनबुडाचे आरोप करणं पण ते सिद्ध न करणं या मानसिकतेपुढे काहीही बोलायचं नाही.

मायबोलीवरील हा माझा शेवटचा प्रतिसाद आहे. या पेक्षा दुसर्‍या कोणत्याही धाग्यावर कोणतीही प्रतिक्रीया मी लिहू इच्छित नाही.

पुन्हा एकदा 'काहीही हां'. केवळ प्रशासकांचं लक्ष वेधून घ्यायचं असेल तर इमेल करायचीत ना. इथे ओपनली लिहून मी हे देणार नाही, ते देणार नाही ह्यात काही दम नाही हो.
अर्थात तुमची शेवटी पोस्ट असल्याने या पुढे तुम्ही खरंच तटस्थ निरिक्षकच की.

कॉपरमाईन, निबंध लिहिण्याआधी तुमच्या पूर्वग्रहांच, विचारसरणीचं डिस्क्लोजर केलं असतं तर आवडलं असतं. तुम्हीही त्यातलेच निघालात. धुरळामाईन. Wink पोस्टवाचून वाटलं होतंच, आता खात्री झाली. दोन घटका करमणूक केल्याबद्दल धन्यावाद, मजा करा. Happy

निरीक्षक असो अथवा नसो, लिहिलय मात्र परफेक्ट.
खर तेच लिहिलय की कॉपरमाइनने , काहीना एवढ्या मिर्च्या का zhoम्ब्ल्यात ?

खरं तेच लिहिलंय पण आपण फार कुणी वेगळे आहोत ह्या आविर्भावात. ज्यात तथ्य नाही. मुळात ह्या पत्राबित्रातच काही दम नाही.

एग्जॅक्टली सायो. ज्या बाबतीत वर राग व्यक्त केला गेलाय त्या किंवा त्यापेक्षाही खालच्या पातळीला जाऊन गोष्टी केलेल्या आहेत ह्या आयडीनी त्यामुळे काही अर्थं नाही.

<<मायबोलीवरील हा माझा शेवटचा प्रतिसाद आहे. या पेक्षा दुसर्‍या कोणत्याही धाग्यावर कोणतीही प्रतिक्रीया मी लिहू इच्छित नाही.>>

------- अशी टोकाची भुमिका घेण्यात अर्थ नाही. येथे जरुर या... लेख लिहा, विचार मान्डा... आणि चर्चेत सक्रिय भाग घ्या. Happy

श्री, मला वाटतं तटस्थतेचा आव आणून काहीतरी अंतस्थ हेतू ठेवून लिहिलं की काय लिहिलंय याला अजिबात महत्त्व रहात नाही. अड्डा आणि कट्टा कमीतकमी वेड पांघरून करत नाहीत, हे आज जाणवलं. वरचं प्रकरण जास्तच डेंजरस आहे.

जस्ट क्यूरीयस.
कोणी खरंच एकदा सोशल एक्स्परीमेंट करत असेल तर तितकाही बेनिफीट ऑफ डाऊट दिला जाणार नाही का?
सध्या असे बरेच सोशल, मिडीया एक्सपरीमेंट केले जातात, इतरत्रही. अनेकदा कॉर्पोरेट लाईफ मधे पण. तुमच्याही नकळत , ब्लाईंडेड स्टडीज.

मुळात 'आत्मपरीक्षणाची गरज आहे' हा मुद्दा खराच आहे. आयडीची व्हॅलीडीटी जरी नाकारली, तरी मुद्द्याची/ विषयाची व्हॅलीडीटी नाकारुन चालणार नाहीये.

बरं.
रार, असे एक्सपेरिमेंट्स केले जात असतीलही, पण कॉपरमाईन हा आयडी त्या उद्देशाने इथे आलाय आणि लोकांच्या काय पोस्टस येतील ह्याचा अंदाज वगैरे घ्यायला पोस्ट्स लिहीत होता ह्यावर मी तरी विश्वास ठेवत नाही. माझ्या पोस्ट फक्त नी फक्त ह्याच बीबीला आणि ह्याच आयडीपुरत्या मर्यादीत आहेत.

हेतु काही जरी असला तरी त्यांनी जे लिहिलय ते जवळपास प्रत्येक धाग्यावर दिसतं , हे नजरेआड़ करता येणार नाही. पहिल्यापानापासुन चेक करा.

एकस्प्रीमेंट करत आहेत का नाहीत हा माझ्यामते वादाचा मुद्दाच नाही. करत असतील. मान्य करू.
पण योग्य ते निरीक्षण आणि अनुमान काढायला तो किमान अन-बायस्ड वृत्तीने केलेला असावा, प्रेमीस काय आहे, कोणी कुठे कशासाठी केला, कोणी स्पोन्सर केला, फंडिंग त्रयस्थ आहे का? इ. जर सांगितलं नाही तर सगळाच धुरळा. बर तरीही त्यात खोट आली तर बेनिफिट ऑफ डाउट मी नाही देणार.

Pages