मायबोली प्रशासकांना खुले पत्र

Submitted by कॉपरमाईन on 3 November, 2015 - 11:58

मान्यवर मायबोली प्रशासक,

सप्रेम नमस्कार,

गेल्या सुमारे चार-साडेचार महिन्यांपासून मी www.maayboli.com या संस्थळावर सदस्य आहे. मायबोलीचे सदस्यत्वं मी एका विशीष्ट हेतूने घेतले होते. वेगवेगळ्या भाषांतील संस्थळांवर विविध क्षेत्रातील लोकांचा असलेला वावर, त्यांची अभिव्यक्ती, संस्थळाच्या माध्यमातून जाणिवपूर्वक आणि अजाणतेपणी पसरवण्यात येत असलेले विचार आणि या सगळ्यात संस्थळाच्या अधिकारीवर्गाची भूमिका त्यांचा तौलानिक अभ्यास करण्याची कामगिरी माझ्या टीमवर सोपवण्यात आलेली आहे. टीममधील मराठी सदस्यांपैकी एक म्हणून माझ्यावर एकंदर ३ मराठी संस्थळांचा अभ्यास करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. मायबोली हे त्यापैकीच एक संस्थळ.

एक मराठी संस्थळ आणि त्यावर असलेलं साहित्यं आणि माहिती म्हणून मायबोली इतर काही मराठी संस्थळांच्या तुलनेत निश्चितच उजवी आहे यात शंका नाही. अनेक वेगवेगळ्या विषयांवरील विपुल लेखन - कथा, कादंबर्‍या, चिंतनात्मक लेख, पाककृती, वैद्यकीय, गिर्यारोहण, आरोग्य, पर्यावरण आणि निसर्ग संवर्धन अशा विविध विषयांवरील प्रचंड माहिती मायबोलीवर आहे. अनेक वेगवेगळ्या विषयावरील कविता, मराठी गझला, विडंबनं यांचीही इथे रेलचेल आहे. अनेक सदस्यांचं सकस लेखन मायबोलीवर आहे. केवळ वाचनमात्रं असलेल्या सदस्यांनाही निखळ वाचनाचा आनंद देऊन जाईल असं भांडार इथे आहे. अनेक मराठी कार्यक्रमांवरचे आणि खासकरुन बथ्थड मालिकांवरचे धागे आणि चित्रपट परिक्षणं ही चार घटका करमणूकही आहे.

मायबोलीवरील माझा सदस्यत्व कालावधी केवळ साडेचार महिन्यांचा. मायबोली हे संस्थळ म्हणून सुमारे पंधरा वर्षांपेक्षा जास्त कार्यरत असल्याने आधी घडून गेलेल्या कित्येक घटनांची मला कल्पना असणं शक्यं नव्हतं. यासंदर्भात जाणून घेण्यासाठी मी अनेक मायबोली सदस्यांशी संपर्क साधला. काही अपवाद वगळता बहुतेकांनी अतिशय आपलेपणाने मदत केली. वसुधैव कुटुंबकम् या उक्तीला जागणारे अनेक मराठी सृजन जगभरात पसरलेले आहेत हे चित्रं खूप आश्वासक आहे.

वरवर पाहता हे चित्रं खूप सुंदर आहे, परंतु....

ग्रूपिझम अर्थात कंपूबाजी हा न टाळता येण्याजोगा आजार मायबोलीला आहेच!

एखाद्या विशिष्ट प्रदेशातील, किंवा शहरातील लोकांचा ग्रूप असणं हे अनपेक्षित नाही, उलट परदेशांत असल्यास अशा ग्रूप्सच्या माध्यमातून आपल्या आसपास असलेले आपल्या मायभूमीतले लोक भेटणं हा अशा ग्रूप्सचा मोठा फायदा असतो. एखाद्या नवीन प्रदेशात आपण जात असल्यास तिथे आधीपासूनच राहत असलेल्या लोकांची ओळख असणं, त्यांच्याकडून माहिती मिळणं हा मोठा आधार असतो. विशेषतः तिथे राहण्याचा कालावधी लांबचा असल्यास ही माहिती फार महत्वाची ठरू शकते. दुर्दैवाने मायबोलीवरच्या ज्या दोन-तीन ग्रूप्समध्ये या माहितीची चौकशी केल्यावर एकच उत्तर मिळालं - गूगल करा! गूगल कोणालाही करता येईल, गूगलवर माहितीही मिळेल, परंतु वर्षानुवर्षे तिथे राहत असलेल्यांचे अनुभव गूगलपेक्षा मोलाचे असणार नाहीत का?

ग्रूपिझमचा दुसरा उबग आणणारा प्रकार म्हणजे अर्थातच राजकारण!

मायबोलीवरील अनेक सदस्यांचं चरण्याचं राखीव कुरण म्हणजे राजकारणाला वाहिलेले धागे, अड्डे, कट्टे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. देशातील काँग्रेस आणि भाजप या दोन प्रमुख पक्षांना तन-मनाने अर्पण असलेले लोक जो काही धुमाकूळ घालतात ते पाहिल्यावर पुलं च्या पाळीव प्राणी या लेखातील - एकमेकांवर भुंकण्यात म्युन्सिपालटीचे सदस्य कुत्र्यांनाही हार जात नसल्याने कुत्र्यांना आपल्या मर्यादांची जाणिव असेल याबद्दल मला खात्री आहे या वाक्याची आठवण झाल्याशिवाय राहवत नाही.

तुम्ही आमच्या पक्षाचे समर्थक नाही ना, मग चालते व्हा पाकिस्तानात ही भाजप समर्थकांची जनरल विचारसरणी काय, किंवा भाजपचे सरकार आल्यापासून सर्वस्व लुटलेल्या सिंध्याप्रमाणे उर बडवत फिरणार्‍या आणि शेंडा-बुडखा नसलेले आरोप करत सुटणार्‍या काँग्रेस समर्थकांची विचारसरणी काय, दोन्हीही सारख्याच नाहीत काय? महत्वाचं म्हणजे काँग्रेस किंवा भाजप यांचे समर्थक नसलेलेही इतर लोक अस्तित्वात असू शकतात आणि ते आम आदमी पार्टीछाप पक्षाच्या भजनी मंडळात नसू शकतात हेच मुळात राजकीय धाग्यांवरच्या महाभागांना मान्य नाही तिथे काय बोलणार? कोणतीही चर्चा मग ती राजकीय असो वा नसो कोणत्याही मुद्द्यावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप, मोदी विरुद्ध सोनिया किंवा राहुल गांधी, दीड वर्ष विरुद्ध ६५ वर्षांचा हिशोब यावर आणण्याची आवश्यकता आहे का? राजापेक्षा राजनिष्ठच जास्तं कडवे असतात आणि बाटगा हा सर्वात जास्तं धर्मनिष्ठ असतो या उक्तीचं वरचेवर प्रत्यंतर देणार्‍या या धाग्यांचा सामान्यं सदस्यांना किती उबग येत असेल याचा हे आक्रस्तळी सदस्य कधीतरी विचार करतात का? मुळात आत्मपरिक्षण नावाचा काही प्रकार असतो हे किती जणांच्या गावी आहे? दुर्दैवाने एकेकाळी चांगलं लेखन करणारे लोकही राजकारणाच्या या विकाराला बळी पडले आहेत. अभिव्यक्तीचा अभिनिवेश न राहता आवेश संचारला की काय होतं याचं उत्तम उदाहरण म्हणून राजकारणाच्या धाग्यांकडे बोट दाखवता येईल.

राजकीय धाग्यांचा दुसरा प्रकार म्हणजे अत्यंत साळसूदपणे नवनवीन जातीय वाद निर्माण करणे आणि त्याला चलाखीने ब्राम्ह्ण विरुद्ध अब्राम्हण, हिंदू विरुद्ध मुस्लिम, ३ टक्के विरुद्ध इतर, पिढ्यानपिढ्यांचे अत्याचार याचं वळन देऊन त्याबद्द्ल पद्धतशीरपणे बुद्धीभेद पसरवणे. यात तरबेज असलेले अनेक सिद्धहस्त सदस्य मायबोलीवर आहेत. जातीभेदाला विरोध करण्याच्या नावाखाली प्रत्येक प्रतिक्रियेत चलाखीने जातीयवाद पसरवण्याच्या त्यांच्या हातोटीपुढे अनेकांनी हात टेकले आहेत. त्यांच्याच जोडीला देशविघातक अतिरेकी तत्वज्ञानाचं समर्थन करणारे आणि एम आय एम सारख्या पक्षाचे छुपे आणि उघड समर्थकही इथे आहेत. मायबोलीच्या माध्यमातून समाजात तेढ निर्माण करणारे विचार आपण पसरवत आहोत हे यांच्या गावी तरी नाही, किंवा समजून-उमजून हे विचार पसरवणं सुरु आहे. सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने अत्यंत घातक असलं तरी आमचा हेतू साध्य होतो आहे ना? मग बास!

मायबोलीवरील सर्वात उबग आणणारा आणि संतापजनक प्रकार जर कोणता असेल तर तो म्हणजे इथल्या सदस्यांवर करण्यात येणारे वैयक्तीक हल्ले. एखाद्या सदस्यावर आपल्या जुन्या विरोधकाचा डुप्लिकेट आयडी असल्याचा आरोप करणं हे तर अगदीच क्षुल्लक वाटावं अशी एकापेक्षा एक अश्लाघ्य वक्तंव्य इथे केली जातात. एकमेकांचे संस्कार जाहिररित्या काढले जातात, मनोरुग्ण, विकृत, भिकारचोट (नाईलाजाने लिहावं लागत आहे) असल्या शेलक्या विशेषणांची बरसात असतेच, परंतु सदस्याच्या वैयक्तीक, वैद्यकीय आणि कौटुंबिक परिस्थितीवरुनही अत्यंत अपमानास्पद शब्दांत संबोधनं दिली जातात जी केवळ तिरस्कारणीय आहेत. दोन दिवसांपूर्वीच पाहण्यात आलेला एक प्रकार म्हणजे एका अत्यंत गलिच्छा शिवीशी साधर्म्य दाखवणारं संबोधन पंतप्रधानांसाठी वापरणं आणि ते कसं योग्यं आहे याचं निरर्गल समर्थन करणं! समोरच्या व्यक्तीविषयी आपल्याला काहीही माहित नसताना त्याच्याबद्दल काहिही बरळण्याची ही हिणकस मानसिकता कधी सुधारणार आहे का? आपण स्वतः गेंड्याच्या कातडीचे आहोत म्हणून समोरचाही तसाच असेल, आपल्या विकृतीमुळे त्याला त्रासच व्हावा ही इच्छा असल्यामुळे हे लोक सुधारण्यापलीकडे गेलेले आहेत हेच खरं!

या सगळ्या प्रकारात प्रशासक म्हणून आपण काही अंशी तरी अपयशी ठरलेले आहात असं खेदाने नमूद करावसं वाटतं. मायबोलीवर चाललेल्या तमाशांमुळे आज कित्येक जुने सदस्य एकही वाक्यं लिहीण्यास धजावत नाहीत. कारण कोण कसला अश्लाघ्य वैयक्तीक आरोप करेल याची काहिही शाश्वती नाही. असल्या प्रवृत्तींना वेळीच आवर घालण्यात आपल्याला फारसं यश येत नाही हे वेळोवेळी दिसून आलं आहे. प्रशासक मंडळातील काही सदस्यं हे वरकरणी आपण निष्पक्ष असल्याचा आव आणत असले तरी एका विशिष्ट कंपूच्या कारवायांकडे हे लोक डोळेझाक करतात हे लपून राहिलेलं नाही.

मायबोलीच्या एका जुन्या जाणत्य सदस्याशी झालेल्या चर्चेअंती त्यांनी व्यक्तं केलेलं मत मायबोलीच्या सद्यस्थितीबाबत भाष्यं करुन जातं. त्या म्हणाल्या, "आजकाल मायबोलीवर असतं काय? तेच ते राजकारणावरचे धागे, तीच कंपूबाजी आणि तमाशे! मायबोलीवर येण्याची आजकाल इच्छा होत नाही! लाज वाटते असल्या लोकांची आणि त्यांच्या विचारांची!"

अद्यापही वेळ गेलेली नाही असं निदान माझं वैयक्तीक मत आहे. प्रत्येकाने - अगदी प्रशासकांपासून सामान्य सदस्यांपर्यंत आत्मपरिक्षण करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक बाबतीत आपलंच मत शेवटचं हा हेका सोडायला हवा! विघातक प्रवृत्ती सर्वत्र असतात, परंतु त्यांना प्रबळ होऊ द्यायचं का मायबोलीचं सकस साहित्य आणि माहितीचं भांडार म्हणून अस्तित्व टिकवून ठेवायचं हे शेवटी आपल्याच हाती आहे.

मायबोलीवरील अनेक धाग्यांवर असलेल्या माझ्या पोस्ट्स या त्यावर काय प्रतिक्रीया येतात हे आजमावण्यासाठी लिहीलेल्या होत्या. त्यामागे कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. तसाच तो या पत्रातही तो नाही. यापुढे कोणत्याही धाग्यावर माझी पोस्ट दिसणार नाही.

आपली नम्र
वैष्णवी धारप

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजुन पन्नास वर्षांनी तेव्हांचे गुगल वा अजुन काही सर्चरिझल्टमधे या हिणकस ब्रिगेडी/कम्युनिस्ट आयडींचे लिखाण "इतिहास" म्हणून दाखवेल.... व या लिखाणाचे दाखले देऊन तेव्हांचे ब्रिगेडी (शिल्लक अस्लयास) अजुनच....... अहो रक्तबीजासारखे आहेत हो हे.. नुस्त्या इग्नोरास्त्राने संपणार नाहीत. हे आपले माझे मत बरका, गंभिरपणे घ्याच असे नाही.
<<
<<

सहमत लिंबुदा.

कॉपरमाईन यांनी लिहिलेले सडेतोड पत्र, डुआयड्यांची फॅक्टरी चालवणार्‍या इथल्या एका 'वाहत्या पानाच्या' सदस्यांना चांगलेच झोंबल्यामुळे त्यांचा तिळपापड होणे हे साहजिक आहे.

वैष्णवीताई, आपण कुठल्या (जुन्या-जाणत्या) सदस्यांशी संपर्क साधला होता? त्यांची नावे जाहीर कराल काय?? जर वैष्णवीताई ही नावे जाहिर करण्यास असमर्थ असतील तर त्या सदस्यांनी 'होय, वैष्णवी धारप यांनी माझ्याशी चर्चा केली होती' हे जाहीर करावे.

भरपूर प्रतिसाद आणि मतमतांतरे ! सर्व काही वाचायला जमले नाही.

माझे आपले माझ्यापुरते conclusion एवढेच आहे कि, मायबोली हे राजकीय किंवा सामाजिक विषयावर चर्चा करण्याचे व्यासपीठ नाही (किंवा राहिलेले नाही.) आता येथे केवळ साहित्याचा आस्वाद घेण्याकरता येणे करावे. कथा, कविता वाचाव्या, लिहाव्या आणि निघावे Happy

गप्पांच्या पानांवर जाणे मुश्कील झाले आहे याचा खेद वाटतो. पण त्याला काही पर्याय नाही. पुनर्जन्माची सोय असल्याने प्रशासक तरी काय करणार. Happy

सुनियाद | 4 November, 2015 - 00:04

या धाग्यावर वरील टाईम स्टँप असलेल्या पोष्टीत एक खाजगी इमेल दिलेले आहे. त्याखाली एक मोबाईल नंबर दिलेला आहे. त्या व्यक्तीच्या परवानगी शिवाय त्याचा मोबाईल नंबर जाहीर करणे मायबोलीच्या नियमात व अमेरिकी / भारतीय कायद्यात बसत नसावे असा माझा तरी समज आहे.

तो प्रतिसाद ताबडतोब तिथून काढण्यात यावा ही विनंती.

प्रकु, मी मधुनमधुन कविता आणि स्फुट लिहित असतो. तुमचा विचार छान आहे. माझ्या रंगीबेरंगीला भेट द्या. धन्यवाद.

महेश, सहमती आवर्जुन "जाहिरपणे" सांगितल्याबद्दल धन्यवाद. >> कॉपरमाईन ताई , तुम्हि या आणि अशाच कंपुबाजीबद्दल बोलत असाव्यात.

लोक इथे सर्व्हे कसा केला जातो, केला जावा ह्याबद्दल काय लिहीत आहेत? Uhoh मुळात कॉपरमाईन ह्यांचा सर्व्हेचा दावा बिनबुडाचा आहे हे आमचेही म्हणणे आहेच. पण तो दावा बिनबुडाचा आहे ह्यावरून त्यांना धोपटणे बंद करून मूळ विषयाकडे वळणे आवश्यक आहे.

अनेक वर्ष वाचनमात्र राहून मग माबो वर अ‍ॅक्टिव झाल्यानंतर स्वतःपुरती नियमावली तयार केली:-

१. शक्यतो वाहत्या धाग्यावर न जाणे. कळत-नकळत एखाद्या कंपूचा भाग होण्याची शक्यता तयार होते. स्वतःची तशी इच्छा असो वा नसो.
२. काही आवडलं तर आवर्जुन आवडलं म्हणावं. नाही आवडलं तर सरळ दुर्लक्ष करावं. न जाणो स्पष्ट पणे 'नाही आवडलं' असं लिहिल्यावर आपल्या विरोधी मतातले आयडी (आणि डुआयडी) आपलं खानदान काढायचे ! 'नाही आवडलं' असं आज काल लिहायला लय म्हणजे लय ड्यारिंगबाज असावं लागतं इथे ! Happy

कानाला खडा विषय (जिथे अजाबात काही बोलायचं नाही !) - राजकारण, स्त्री पुरुष समानता, देशी-परदेशी . हे ढोबळ विषय. त्याचे अनेक उप-विषय देखील आहेत, जे दिवसेंदिवस वाढतच जात आहेत.

या लेखाचा सूर आणि बर्‍याच प्रतिक्रिया ह्या गोष्टीची पुष्टी करतात की आजकाल कोणाच्या भावना कश्याने दुखावतील, व एखादा लेख आणि त्यावरच्या प्रतिक्रिया यांचे मुक्तपीठ होईल याचा काही भरवसा नाही. हे ही खरं की अनेकदा अतिरेक होतो, आणि पहिल्या पानावरच्या ७०-८०% धाग्यावर धुमश्चक्रीच चालू असते, विनोदाचा धागाही त्यातून सुटत नाही तेव्हा सरळ १-२ दिवसांचा माबो सन्यास घ्यावा आणि परत यावं .

या गोष्टी प्रशासनाला जाणवत नसतील का? निश्चितच जाणवत असणार.
त्यावर काही उपाय योजना करत नसतील का? बर्‍याचदा आय पी अ‍ॅड्रेस ब्लॉक करणे, मोबाईल नं अनिवार्य करणे, संस्थळ 'पेड' करणे असले उपाय सुचवले गेलेत. त्यावर विचार केला असेलच की प्रशासनाने.
त्यांच्या परीने प्रयत्न करत ही असतील. पण नक्कीच त्यात मर्यादा असणार.

गेल्या काही वर्षांत सोशल मिडियाचे वाढलेले महत्व, आणि त्याचा easy access (mobile internet) ह्यामुळे माहीतीचा (चुकीची/बरोबर, गरजेची/निरुपयोगी सगळ्याच) ओव्हरडोस होतोय, आणि आपण फारच impatient होऊ लागलो आहोत, हे एक कटू सत्य पटल्याने "मनावर ब्रेक, उत्तम ब्रेक". Happy हे धोरण पाळणे.

मित, पटलि तुमची पोस्ट.
>>>> गेल्या काही वर्षांत सोशल मिडियाचे वाढलेले महत्व, आणि त्याचा easy access (mobile internet) ह्यामुळे माहीतीचा (चुकीची/बरोबर, गरजेची/निरुपयोगी सगळ्याच) ओव्हरडोस होतोय, आणि आपण फारच impatient होऊ लागलो आहोत, हे एक कटू सत्य पटल्याने "मनावर ब्रेक, उत्तम ब्रेक". स्मित हे धोरण पाळणे. <<<
हे तर अगदी अगदी.....
नुस्ताच अ‍ॅक्सेस येवढेच कारण नाही, तर जी गोष्ट मी चारचौघांसमक्ष "उघड" बोलू शकत नाही अशा अश्लाघ्य गोष्टी सोशलमिडियावर सरसकट दामटवू शकतो, व तसे करुनही माझे काहीच वाकडे होत नाही (जसे ते चौकातिल सिग्नल तोडणार्‍यांचे कॅमेरे लावुनही काही वाकडे होत नाही) अशी खात्री असल्याने मग जे काय ओकले जाते, त्यास मायबोलीही बळी पडू लागली आहे असे माझे मत.

चला. सगळी झिलकरी मंडळी जमा झाली.

आता तर्रकीर्तन करावेच लागेल. (तर्र माणसांना सांगावे लागते, ते तर्र कीर्तन. स्पेसिफिकली माझ्या पोस्टींना उद्देशून वापरलेला हा बेफिकीर यांनी निर्मिलेला हा गौरवपूर्ण व अजिब्बात वैयक्तिक नसलेला शब्द!)

तेव्हा, मूळ विषय काय आहे, ते बेफिकीर नामक मानभावी आयडी कडून समजावून घ्यावे अशी माझी सर्व माबोकरांना विनंती आहे. यांच्या (पुराव्यसह अनेकदा दाखवून दिलेल्या) महाभयंकर लेखनानंतरही हे महोदय "ओरिजिनल" आयडीने टिकून आहेत, व "मुद्दे" सांगताहेत हे पाहून आजकाल हसूही येईनासे झाले आहे.

तर, यांच्याकडून मूळ विषयाबद्दल न च समजले, तर ते एक "तटस्थ" महेश आहेत, ते सांगतील, किंवा "ब्रिगेडविरोधक" लिंबूराम. यांना जमले नाही, तर एक प्रसाद. म्हणून आहेत, व तिसरे ते बोल्ड अक्षरातले पत्र उडवायला सांगणारे स्वाभिमानी. दोन आणिक नमूने आहेत, त्यातले एक बर्‍याच दिवसांत दिसले नाहीत. पण ते असो.

स्वतः काड्या करायच्या, वरतून बोंबा मारायच्या. कंटीन्युअसली आम्हा चार लोकांच्या मागे लागल्यासारखे वागायचे, ही या अभद्र कंपूची उबग आणणारी ओंगळवाणी सवय आहे. गेल्या काही दिवसांत यांनी वाहत्या पानांवर घातलेला गोंधळ पाहिला तर सगळ्यांनाच हे समजेल. (स्क्रीनशॉट्स आहेतच.)

लेखात आलेला भिकारचोट हा शब्द या कंपूला, (त्याच कंपूत कॉपरमाईन नामक महापुरुषही आहेत) पर्फेक्टली लागू पडतो.

सरळ चर्चा करताच येऊ नये अशी काळजी घेऊन विखार पसरवणार्‍या या कंपूने माबोची वाट लावलेली आहे, हे सांगण्यासाठी खूप दिवसांनी आज इथे लिहिले आहे. बाकी लवकरच इथे टाळे बसेल हा अंदाज आहेच.

सहमत

वरील दीड मायबोलीकर उर्फ e-bliss उर्फ इब्लिस आणि माहीत नाही आणखी किती आणि कोणते - यांनी साळसूदपणे लिहीलेली पोस्ट वाचून अंमळ करमणूक झाली व चोराच्या उलट्या बोंबा या म्हणीची प्रचिती आली. याच पोष्टीत शिवीगाळही झालीच आहे. तर, मायबोलीवर ही वेळ येण्यामागे यांचा कंपू आणि यांचे पहारे किती कारणीभूत आहेत हे सगळ्यांनाच माहीत आहे. तेव्हा त्यात फार तपशीलात न शिरता............

इतक्यात वाहत्या पानांवर का गोंधळ झाले, त्याची सुरवात यांच्याच मुळे झालेली आहे. अ‍ॅडमिनच्या विपुत त्या वेळी तक्रार खाली डकवतो आहे, म्हणजे यांनी कशी आणि किती चिथवणी दिली हे स्पष्ट होईल.

--------------- --------------- --------------- ---------------

आदरणीय अ‍ॅडमिन महोदय

ही विनंती आपला कट्टा या धाग्य संदर्भात आहे.

(१) प्रक्षोभक व वादग्रस्त विधाने
या धाग्यावर श्री गजानन कागलकर म्हणजेच labadkolha11 हे सनातन संस्था,दाभोलकर/पानसरे/कलबर्गी खून, व हिंदू धर्म या अत्यंत संवेदनशील विषयांसंदर्भात वादग्रस्त व प्रक्षोभक व इतरांना उचकावणारी विधाने करत आहेत. सध्याचे वातावरण बघता हे मायबोलीसाठी कायदेशीररित्या खूप अडचणीचे ठरू शकते. तरी आपण आपल्या इच्छेप्रमाणे या आयडींवर योग्य ती कारवाई करावी ही नम्र विनंती.

(२) बातम्या डकवणे:
वर्तमानपत्रातल्या बातम्या (हेडलाईन व लिंक वगळता) कुठेही कॉपी पेस्ट करु नयेत अशा आशयाच्या श्री चिनुक्स यांच्या स्पष्ट सूचना असतानाही या धाग्यावर labadkolha11 व सचिन पगारे हे दोघे वर्तमानपत्रातल्या बातम्या अंशतः किंवा संपूर्णपणे कॉपी-पेस्ट करुन डकवत आहेत.

असे करण्यास त्यांना इब्लिस/e-bliss/दीड मायबोलीकर यांचे प्रोत्साहन आहे. संदर्भासाठी पुढे स्क्रीनशॉट देत आहे. (आणखी बरेच आहेत, इथे फार नको म्हणून संदर्भासाठी हे).

MB IB 1.jpgMB IB 2.jpg

तरी आपल्या इच्छेनुसार आपण या आयडींवर योग्य ती कारवाई करावी ही नम्र विनंती.

--------------- --------------- --------------- --------------- --------------- ---------------

बाकी, या धाग्यावर हेमाशेपो.

पण त्या निमित्ताने गेले काही दिवस/महिने अनेकांना जाणवणारा, त्रास देणारा मुद्दा चर्चेत आला आहे
>>
मायबोलीवर काहीही कशाचाही त्रास नाही. येथे जो जे वांछील तो ते लाहो अशी स्थिती आहे. मुळात असे धागे कोणते ,त्यातील भूमिका आणि कलावंत, त्यांची मते हे सर्वाना नीट ठाउक आहे. त्या खोलीत कचरा आहे हे सगळ्यांना माहीत आहे मग त्या खोलीचे दार का उघडता? उघडता तर उघडता पटकन बंद करून दुसर्‍या खोलीत का जात नाही? जायचे, तिथे स्वतःच्याही काही पिंका टाकायच्या , आणि पुन्हा मायबोलीवर कचरा झाला हो ,हे ओरडण्यात काहीच अर्थ नाही. आता गझलांच्या आणि कवितांच्या बीबी वर प्रचंड हाहा:कार माजलेला आहे हे सगळ्यांना माहीत आहे. मग सदस्यातले ९० टक्के सद्स्य ते धागे उघडून देखील पहात नाहीत . त्यामुळे त्यांना काही त्रास नाही. बाकी पुष्कळ धागे आहेत . रेसिप्या आहेत्म कथा, आहेत, तंत्र आहे. गावांचे देशांचे ग्रुप्स आहेत तिथे ही घाण का नाही कारण तिथले लोक थारा देणार नाही हे ह्या लेखकांना माहीत आहे. आता लिंब्या त्याची सर्वपरिचित विचारसरणी सगळीकडे संधी साधून 'घुसवत' च असतो पण इतरन्बीबीवर प्रतिसाद मिळत नाही मग वाद प्रतिवाद होतच नाहीत.
काय ऐकताय, आवडते चित्रपट, पुस्तके ,भ्रमंती , फोटो, विनोद सर्व काही आहे . ते सर्व सोडून उकिरडा बीबीवरच का जावे ?
मीही जातो तिथे भागही घेतो पण हे फार वाईट चाल्लेय किंवा याचा फार त्रास होतो अशी माझी तरी तक्रार नाही.कारण मायबोलीच्या सदस्यांचे कॉम्पोजिशन लक्षात घेता हे अगदी ऑब्वि अस अहे. ज्या वेळी मला वटेल हे फार त्रास दायक आहे तेव्हा मी तिथे जायचे बंद करीन.

इतर बीबी वर मीनिंगफुल टाईम खर्च ह करा राजेहो.....

लबादकोल्हाची वाक्ये चिथावणखोर होती अए जोशी याम्चे मत आहे.

ती वाक्ये प्रत्यक्ष दिलीत तर जो तो ठरवू शकेल.

लेख वाचला. मुळात कॉपरमाइन यांनी असे सामाजिक परीक्षण करता येते का आणि ते केले तर असे सार्वजनिकरित्या मांडता येते का ह्याची शहनिशा केली असेल असे मला वाटते. शिवाय लेखन तठस्थ वाटत नाही. भजनीमंडळ किंवा इतर कायदेशीर पक्षांबाबत असे शब्द वापरायला नको होतेत. त्या खरच काही सर्वेक्षण वगैरे करत असतील असेही मला वाटत नाही, कारण निष्कर्ष मांडतांनाचा तौलनिक अभ्यास दिसत नाहीये. बाकी मुद्दे मुद्दे काही नवीन नाहीत, अनेकदा मुद्दामुद्दी झाली आहे ह्यावर. पण प्रतिसाद भारी वाटले. प्रतिक्रिया वाचून मला काय द्याच बोला ह्या पिक्चरची आठवण झाली. मकरंद यांनी उभा केलेला वकील तांत्रिक बाबी उभ्या करून पाडण्याचा प्रयत्न केला गेला होता. एकुणात पोस्टींचे २ भागात विभाजन करता येईल. पहिले म्हणजे तांत्रिक दृष्ट्या सर्वेक्षण कसे चुकले ते आणि दुसरे म्हणजे कॉपरमाइन हा कोण्यातरी आयडीचा पुनर्जन्म असल्याने त्यांना काही बोलायचं हक्क नाहीये असे.

आता कॉपरमाइन ह्यांनी वर जे काय निरीक्षणे / निष्कर्ष मांडलेत ते मांडतांना त्यांनी येवं केल त्येव केल हे मांडून बहुतेकांनी त्यांनी जे मांडलाय ते नाकाराण्याचाच प्रयत्न केलाय. काहींनी तर त्यांना अशी उठाठेव करत असतांना संबंधितांना किंवा प्रशासकांना काही का सांगितले नाही असाही मुद्दा मांडला. आजूबाजूचं सगळ मांडल्याशिवाय मी निष्कर्ष मानणार नाही आदी आदी फलाणा ठिकाणा. आपण इतका तांत्रिक त्रागा का करतो?

वैयक्तिक हल्ले सगळ्यात उद्वेगजन्य हे सगळेच मान्य करतात, पण काही प्रतिसादक लोकांनी ह्या आयडीने पूर्वी ह्या आयडीनावाखाली हेच केले होते वगैरे वगैरे लिहिले. मुळात हे ते हेच आहेत हे ह्यांना कसे कळले, मग ह्यांना कळले तर ह्यांनी योग्य त्या पुराव्यानिशी प्रशासकांना सांगून का नाही बघितले? मला आठवते की मी सुरुवातीस प्रतिसाद द्यायचो तेव्हा मलाही कोणाचातरी डुप्लीकेट केल्या गेल होत Wink अर्थात तेव्हा उरलो फक्त आयडी करता ही भावना झाली होती. एका आयडीनेतर सरळ कुठलातरी मेल उचलून चिपकावून दिला. त्या मेल लिहिणार्याने ज्याला लिहिला त्यांच्यासाठीच तो मेल असतो आणि इतर ठिकाणी अश्या खाजगी बाबी सार्वजनिक करायच्या नाहीत, ह्याची साधी जाणीवही नाही?

असो, एकंदरीत काय … रोमात असलेले बरे Happy

वैद्य, कसरतीनंतर थोडी विश्रांती घ्यावी. आगंतुक असली तरी उपयोगी सूचना आहे.

रॉबीनहूड,

गझल आणि कवितांच्या धाग्यावर हाहाकार माजला आहे हे तुमचे विधान नाही समजले. बाकी प्रतिसादातील संदेश जवळपास पटण्यासारखाच आहे, फक्त एका बाबतीत दुमत आहे तेवढे नोंदवतो. वैयक्तीक आकस म्हणून एखाद्याच्या कोणत्याही (कोणत्याही म्हणजे राजकीय, सामाजिक असा विषय अजिबात नसलेल्या व कथा /कविता / ललित अश्या प्रकारच्या निरुपद्रवी असलेल्या) धाग्यावर जाऊन चीड आणणारे प्रतिसाद दिले जातात. तुमच्याच भाषेत म्हणायचे त्या खोलीत कचरा नाही हे सर्वांना ठाऊक असते पण तिथे मुद्दाम कचरापेटी केली जाते. अश्या वेळी शेवटचा उपाय म्हणजे प्रशासकांना कळवणे हाच ना? मग तो तर अनेकजण सातत्याने करतच असतात की?

इतिहास, धर्म, राजकारण, जात व सामाजिक विषय हे पाच विषय काही काळ बंद करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने विचारात घेतला आहे किंवा कसे हे कळाले तर आवडेल. Happy

इतिहास, धर्म, राजकारण, जात व सामाजिक विषय हे पाच विषय काही काळ बंद करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने विचारात घेतला आहे किंवा कसे हे कळाले तर आवडेल. स्मित
>>
हे विषय बंद करण्या ऐवजी सुसंस्कृत, सभ्य , सदभिरुचीपूर्ण आयडींनी त्यात भाग घेण्याचे बंद करणे व ते बी बी ओस पाडणे अधिक चांगले आणि प्रॅक्टिकल होईल नाही का?

टीम बीएचपी सारख काही करता येईल का? तिथे प्रशासक सगळे प्रतिसाद बघत असतात आणि जे त्यांना चुकीचे वाटले ते तत्क्षणी सुधारून घेतले जातात किंवा उडवले जातात.

अर्थात तिथे भरपूर प्रशासक आहेत.

>>>> आता लिंब्या त्याची सर्वपरिचित विचारसरणी सगळीकडे संधी साधून 'घुसवत' च असतो पण इतरन्बीबीवर प्रतिसाद मिळत नाही मग वाद प्रतिवाद होतच नाहीत. <<<<
तुझ्या या पेटत्या काडीला मी हिसकावुन घेऊन पायाखाली चिरडुन टाकतोय.... त्यातल्या ठिणगी सक्कट.. Proud

तिथे प्रशासक सगळे प्रतिसाद बघत असतात आणि जे त्यांना चुकीचे वाटले ते तत्क्षणी सुधारून घेतले जातात किंवा उडवले जातात.

>>>

अहो वेबमास्तर, प्रशासक संस्थापक आपापले उद्योग सांभाळून मराठीच्या प्रेमापोटी हे सगळे उद्योग करताहेत. लषकराच्या भाकर्‍या भाजण्याचाच प्रकार आहेत. आणखी त्याना काय पूर्णवेळ तुमच्या पोष्टी तपासायला सांगणार काय? कशासाठी ? ती अदरवाईज उच्चपदस्थ आणि बिझी माणसे आहेत. मायबोलीस ते देत असलेला वेळ त्यानी इतरत्र वापरला तर त्याना अधिक पैसेही मिळतील. पण एका विषिष्ट उद्देशाने ते ही पदरमोड करीत आहेत. त्याबद्दल आपण त्यांचे ऋणी असले पाहिजे. माझ्या मते ते कोणत्याही विचारसरणीचे प्रसारक, प्रचारक नाहीत. त्या साठी हे संकेतस्थळ चालवलेले नाही. त्यानी पुरेशी लिबर्टी इथे दिलेली आहे. पण आपल्याकडे कोणत्याही व्यासपीठाचा वापर आपल्या प्रचार प्रसारासाठी वापरणारी एक प्रवृत्ती आहेच आहे. सर्वप्रकारच्या माध्यमामध्ये हे घुसून बसलेले आहेत. तसे ते इथे ही आहेत. मायबोलीचा व्याप वाढल्याने अ‍ॅडमिनना वरील मर्यादा आहेतच ..
खरे तर अ‍ॅडमिन फारच उदार आहेत. मिसळपाव ह्या संकेतस्थळाव्र प्रवेश मिळविण्यासाठी मी अनेक प्रयत्न केले पण तिथे असलेल्या तात्या अभ्यंकर नावाच्या गृहस्थानी अजिबात दाद दिलेलि नाही. इथे तर उचल की बोर्ड की काढ आय डी असे स्वातंत्र्य असल्याने प्रश्न निर्माण झाले आहेत !

>>> तिथे प्रशासक सगळे प्रतिसाद बघत असतात आणि जे त्यांना चुकीचे वाटले ते तत्क्षणी सुधारून घेतले जातात किंवा उडवले जातात. अर्थात तिथे भरपूर प्रशासक आहेत. <<<<
हे प्रॅक्टिकल नाही. त्यामुळे आज जे स्वातंत्र्य इथे आहे तेच नाहिसे होईल. वर हुडाने विश्लेषण केलेच आहे.

माझ्या मते क्यामेरा लावलेला असतो तिथे कशी पाटी असते की "यु आर अन्डर सर्व्हिलन्स ऑफ क्यामेरा" तशीच इथेही पाटी हवी "ही साईटही डिपार्टमेंटच्या नजरेखाली/सर्व्हिलन्स खाली आहे" तस झाल तरच काही चाप बसेल या टोळधाडीला.
मागच्या लोकसभा का कुठल्याश्या विलेक्शन आधी या साईटवरची "व्हिजिटर्सची वर्दळ" एकदम प्रमाणाबाहेर वाढल्याची बातमी होती असे पुसटसे स्मरणात आहे.....

हो का? अस अस. बाकीच्या ठिकाणी असे करतात म्हणून मी म्हणालो Happy आता ते हि फोरम्स आहेतच. तिथेही संपादक आपापले उद्योग सांभाळूनच हेही करतात. अर्थात हा एक ओप्शनच होता. हे शक्य नसेल तर त्यापेक्षा इतिहास, धर्म, राजकारण, जात व सामाजिक विषय हे पाच विषय काही काळ बंद करून टाकावेत.

Pages