पावसाळा आला आहे. आता कोणत्याही क्षणी भारतात मॉन्सून, व सर्वत्र पावसाच्या कविता सुरू होतील. आम्हाला पावसाबद्दलच्या कवितांचा काही प्रॉब्लेम नाही. मात्र त्याला दिल्या जाणार्या त्याच त्याच उपमांना घाबरून आम्ही वैचारिक छत्री मे महिन्यापासून उघडून बसलो आहो. हा प्रॉब्लेम पावसापुरता मर्यादित नाही. उपमांपासून भले भले सुटलेले नाहीत. "प्रेमाला उपमा नाही, हे देवाघरचे लेणे". असे कोणीतरी गाण्यात म्ह्णताना उपमा नाही करत करत पुलंच्या रावसाहेबांच्या शिवीप्रमाणे पुढच्याच ओळीत एक निसटली आहे हे त्यांच्याही लक्षात आलेले नसावे. तसेच उपमांप्रमाणेच ठोकळेबाज वाक्ये व घटनांचाही सध्या कथांमधे प्रादुर्भाव झाला आहे. कथांमधल्या ठराविक घटनांमधे लोक स्वतंत्र विचार न करता आधीच्या तसल्या(१) कथा वाचून तशीच वाक्ये पुन्हा बोलतात. त्यालाही वेळीच आवर घालणे आवश्यक आहे. त्यामुळे त्याचाही येथे समावेश करण्यात आलेला आहे.
तर एकूण या उपमा(२) व ठोकळेबाजपणापासून समाजाला वाचवणे गरजेचे आहे. परत परत येणार्या त्याच त्याच उपमा म्हणजे जणू परत परत येणारी...<येथे आम्ही उपमा देण्यापासून स्वतःला आवरले आहे. Be the change you want to see in the world असे एक थोर माणून म्हणून गेला आहे>.
तर यानिमित्ताने मराठी साहित्यात वादळाप्रमाणे तुफान बोकाळलेल्या काही उपमांवर व ठोकळेबाजपणावर काही काळाकरिता तरी बंदी घालावी अशी मागणी आम्ही मराठी पद्य व गद्य लेखन परिषदेस करत आहो. काही ठळक उदाहरणे. वाचकांनी अजून द्यावीत ही विनंती:
१. "आज एक माणूस रागावलंय हं!" हे वाक्य कोणीही कोणालाही उद्देशून म्हणायला कोणत्याही माध्यमात बंदी हवी. पुढच्या शतकात मराठीची स्टाईल बदलेपर्यंत. लेखकांना योग्य पर्याय सापडला नाही तर ती रागावलेली व्यक्ती तशीच रागावलेली राहूदेत.
२. "अगं वेडाबाई.." ने चालू होणारी वाक्ये नवर्याने बायकोला किंवा प्रियकराने प्रेयसीला म्हणायला बंदी. विशेषतः आख्खी कथा तिने त्याच्याबद्दल काहीतरी 'लेम' गैरसमज करून घेतल्यामुळे घडल्यावर खुलासा करताना.
३. सध्याच्या सीझन मधे हा मुद्दा तर फारच लौकर तुंबलेल्या पाण्याच्या पाईप्स प्रमाणे साफ करायला हवा:
- पावसाला प्रियकराची उपमा द्यायला पुढची काही वर्षे बंदी. "जस्ट फ्रेण्ड" नावाची म्हंटले तर चालू, म्हंटले तर निरूपद्रवी उपमा काही दिवस चालेल. उलट पुढची काही वर्षे पावसाला प्रेयसीची उपमा देणे बंधनकारक राहू द्यावे.
- मी/ती धरित्री, तो आकाश/पाऊस्/ढग या उपमेला त्याहीपेक्षा जास्त वर्षे बंदी.
- ध्ररतीला हिरवा शालू वगैरे नेसवायला मनाई आहे. तिला मॉडर्न होउ दे जरा. पाचू, मोती वगैरे वैचारिक बँकेच्या लॉकर मधेच राहूदेत काही दिवस.
४. "कॉलेजची ती रंगीबेरंगी वर्षे फुलपाखरासारखी" उडून जायला बंदी. एवढी त्या सृष्टीची हौस असेल तर कोष, सुरवंट वगैरे दुर्लक्षित उपमा वापराव्यात.
५. कथेचा नायक, नायिका कॉलेजमधे असेल तर त्याला कमाल एकाच विषयात प्रावीण्य देता येइल. ते नक्की कोणत्या विषयात प्रावीण्य द्यायचे आहे ते ठरवावे. कोणत्यही विषयातील नोट्स वगैरे एकमेकांना द्यायला सक्त मनाई.
६. कोणावरही 'मनोमन' प्रेम करायला बंदी.
७. "मी स्वप्नात तर नाही ना?" असे कोणीही कोणालाही विचारायला बंदी.
८. भारतातली बरीचशी जनता चहा पीत असताना नायक व नायिका जरा भिजले की तिने "तो फ्रेश हो, मी तोवर छानपैकी कॉफी करते" असे म्हणणे टाळावे.
९. ती मनस्वी, स्वच्छंद, तर तो प्रॅक्टिकल असेल, तर दोघांना वेळीच सावध करून जस्ट फ्रेण्डच राहू द्यावे
१०. "तिने निळ्या रंगाची झिरझिरीत...." पासून सुरू होणारे वाक्य पुढे कितीही संस्कृतीप्रधान असले तरी टाळावे.
११. कथेत कोणत्याही प्रसंगात एका वेळी एकालाच "स्वर्गसुखात नाहता" येइल. या सर्व प्रसंगांमधे पाहिजे तर पुढची काही वर्षे "तेथे दोन फुले एकमेकांवर आपटली" हे दुसर्या एका उपमासृष्टीतील वाक्य वापरावे.
असो. इतर अनेक लिस्ट वाल्या कायद्यांतील तरतूदींप्रमाणे ही लिस्ट "एक्झ्हॉस्टिव्ह" नाही. पण येथील वाचक सहकार्य करून ती जास्तीत जास्त वाढवतील अशी आशा आहे.
(१) तसल्या म्हणजे तसा प्रसंग असलेल्या इतर कथा. "तसल्या" म्हंटल्यावर जे डोळ्यासमोर येते तसल्या नाहीत.
(२) खाण्याच्या उपम्याबद्दल आम्हाला काही राग नाही. मात्र तो ही ठोकळेबाज नसावा.
ह्या निमित्ताने:
ह्या निमित्ताने:
फारएन्ड ह्यांनी अलीकडच्या पत्रकारितेत (निव्वळ वेळ वाढवण्यासाठी) घुस(व)लेल्या शब्दप्रयोगांवरही धागा काढावा अशी विनंती!
उदाहरणार्थ:
निश्चितच!
मोर्चा जो आहे तो काढण्यात जो आहे तो आलेला आहे
ह्या ठिकाणी (हे प्राचीन आहे)
सवाल उपस्थित होत आहे
आपण बघू शकता
वगैरे!!
=====
हल्ली एक प्रकार बळावल्याचे लख्ख आढळते. वाहिनीवरील मूळ बातमीदार एखादी बातमी पूर्ण तपशीलवार सांगतो आणि मग स्थानिक बातमीदाराला विचारतो की तेथे आता काय चालले आहे. तो स्थानिक बातमीदार (निश्चितच, असे म्हणून) जे सांगतो ते तेच असते जे मूळ बातमीदाराने सांगितलेले असते.
ह्याशिवाय, आत्ता संसदेत काय चालले आहे, आत्ता त्या दोघांमध्ये कसली चर्चा चालू असेल असे वाटते वगैरे प्रश्नही विचारले जातात. त्यावर तो स्थानिक बातमीदार 'निश्चितच' असे म्हणून पुढे सांगतो की 3.24 ला त्यांची गाडी आली, 4.13 ला त्यांची प्रत्यक्ष भेट झाल्याचे कळले व आत्ता ते महत्वाची चर्चा करत असून लवकरच आपल्याला समजेल की चर्चेचा विषय काय होता. मात्र राजकारणात भूकंप होण्याची शक्यता आहे की काय असा सवाल उपस्थित होत आहे.
>>>>>>>>तो स्थानिक बातमीदार
>>>>>>>>तो स्थानिक बातमीदार (निश्चितच, असे म्हणून) जे सांगतो ते तेच असते जे मूळ बातमीदाराने सांगितलेले असते.

खरे आहे, पण २४ तास चालणाऱ्या
खरे आहे, पण २४ तास चालणाऱ्या बातम्यांच्या चॅनेलवर ते तरी काय आणि किती वेगळे सांगणार. अजून बातम्या इतक्या ताज्या हव्या असतात कि बातमीदारालासुद्धा ती बातमी केवळ काही मिनिटे अगोदर कळलेली असते. त्यात तो काय चिंतन करणार आणि मनात शब्द जुळविणार? मग जे मनात येते ते बोलून टाकायचे.
Pages