मी वाचलेले पुस्तक - २

Submitted by वरदा on 12 February, 2013 - 09:20

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे. Happy

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथला परिचय वाचून लॅब गर्ल ऐकायला घेतलंय. लेखिकेने स्वतःच वाचलंय पुस्तक. त्यामुळे खरंच एखाद्या वर्गात बसून प्रोफेसरच्या तोंडून त्यांच्या रीसर्चची चित्तरकथा ऐकल्यासारखं वाटतंय. अगदी सुरुवातीला लेखिकेच्या आईला हायस्कूलच्या शेवटच्या वर्षात वेस्टिंगहाउस टॅलेंटसर्च चे उत्तेजनार्थ पारितोषिक मिळते पण स्कॉलरशिप नाही. त्या वर्षीच्या इतर मुलांमधे एकाला नोबेल मिळते आणि एकाला फिल्ड मेडल. स्कॉलरशिप न मिळाल्यामुळे आणि घरची परिस्थिती बेतास बात असल्याने आई कॉलेज सोडून घर संसाराकडे वळते ते ऐकल्यावर इतकं गलबलून आलं.
योग्य वेळी थोडी आर्थिक मदत आणि अ‍ॅकडेमिक निवडीकरता मार्गदर्शन न मिळाल्याचं शल्य काय असतं ते माहित असल्याने आणखीनच वाइट वाटलं वाचून .

नुकतीच स्टोरीटेलवर जयवंत दळवींची महानंदा कादंबरी परी तेलंगच्या आवाजात ऐकली.
कोकणातल्या रवळनाथाच्या देवळातली एक भावीण (देवदासी) म्हणजे कल्याणी. तिची मुलगी महानंदा. बाबुल हा आता मुंबईत कॉलेजात शिकवणारा, पण गावी आजोळ असलेला, लहानपणी तिथे शाळेसाठी बराच काळ राहून गेलेला तरुण मुलगा. नोकरी लागल्यावर तो काही दिवस गावी येतो आणि मानूच्या, म्हणजे महानंदेच्या प्रेमात पडतो. तिची आई, कल्याणीही त्याला आवडते. ती त्याला समाधानी, प्रसन्न, शांत वाटते. याउलट त्याच्या निपुत्रिक मामामामींचं घर मात्र सदैव उदास, नीरस असतं. पुढे अनेक गोष्टी घडतात. म्हटलं तर ही शोकांतिका आहे, म्हटलं तर शेवटी आशेचा किरणही आहे. मात्र एक नक्की, की ऐकून (किंवा वाचून) एक प्रकारचा उद्वेग येतो. एका अंधश्रद्धेपायी आतापर्यंत अशा किती माणसांच्या आयुष्याची राखरांगोळी झाली असेल, असं वाटतं. जोगवा आणि मातीमाय (दिग्द. चित्रा पालेकर) या दोन चित्रपटांची आठवण झाली.
परी तेलंगने छान वाचली आहे कादंबरी. आवाजातले बदल, कोकणातल्या माणसांची हेल काढून बोलण्याची पद्धत, हे छान दाखवलं आहे.

परी तेलंगने छान वाचली आहे कादंबरी. आवाजातले बदल, कोकणातल्या माणसांची हेल काढून बोलण्याची पद्धत, हे छान दाखवलं आहे.
>>> छापिल पुस्तकांच्या बाबतीत मुखपृष्ठ वगैरेंबद्दल लिहिलं जातं तसं ऑडिओ बुक्ससाठी हे मुद्दे महत्वाचे, नाही!
मी आजवर एकही पुस्तक ऐकलेलं नाही, त्यामुळे हे जाणवून मजा वाटली. Happy

Paper Moon (Rehana Munir)

फिजा नावाची मध्यमवर्गीय कॉलेज तरुणी, एकुलती एक, आईबरोबर मुंबईत राहत असते. एक बॉयफ्रेन्ड, ५ वर्षं स्टेडी असलेला. उच्चभ्रू, हिंदू. त्याच्या घरच्यांना ही पसंत असते. पण तो प्रपोज करतो तेव्हा मात्र ती आधी उत्तर टाळते, नंतर नाही म्हणते. (त्याचं नीटसं कारण पुस्तकात स्पष्ट होता होता राहिलंय असं वाटतं.)
फिजाचे वडील तिच्या लहानपणीच घर सोडून गेलेले. (त्याचं कारणही स्टोरीत नीटसं कळत नाही.) त्यामुळे वडिलांबद्दल तिला थोडंफार कुतूहल असलं तरी ती त्यांच्या विचाराने फार ऑब्सेस्ड किंवा नाराज वगैरे नसते.
वडिलांचा मृत्यू होतो. इच्छापत्रात त्यांनी फिजासाठी थोडीफार रक्कम ठेवलेली असते. त्या रकमेतून तिनं एक पुस्तकांचं दुकान काढावं अशी त्यांची इच्छा असते. इथे तिला वडिलांशी काहीतरी कनेक्शन आहे असं जाणवायला लागतं. कारण एकतर त्यांनी तिची आठवण ठेवलेली असते, आणि तिलाही वडिलांप्रमाणे पुस्तकांची खूप आवड असते. हो-नाही करता करता ती तिच्याही नकळत पुस्तकांच्या दुकानाचा विचार करायला लागते.

इथपर्यंत कथानकाची बैठक बर्‍यापैकी जमली आहे. पुस्तकांच्या दुकानाच्या निमित्ताने, ते ही मुंबईत, काहीतरी वेगळं, इंटरेस्टिंग वाचायला मिळेल अशी आपली अपेक्षा होते.
पण तिथून पुढे सगळं सोपं, सहजसाध्य, गुडीगुडी दाखवलंय. तिला हवी ती सगळी चांगली माणसं भेटतात. छुटपुट प्रॉब्लेम्स येतात. आदर्शवादी पद्धतीने सुटतात. पुस्तकांच्या दुकानाची जागा मिळणे, ते दुकान सजवणे, (पेपर मून - दुकानाचं नाव), दुकानाची नंतर येणारी वर्णनं, दुकानाची प्रसिद्धी कशी होत जाते, हे तर सगळं करण जोहरचा सिनेमा बघतोय अशा प्रकारे येतं.
प्रेमाचा त्रिकोण म्हणून एक सो-कॉल्ड मिस्टेरियस तरुण कथानकात येतो. त्याची आणि फिजाची पहिली भेट जरा वेगळ्या पद्धतीने दाखवली आहे. इतरही काही मोजके प्रसंग उल्लेखनीय आहेत. पण तितकेच.

मध्यमवर्गीय नायिका उच्चमध्यमवर्गीय वातावरणात अगदी सहज वावरताना दिसते. दुकानासाठी पुस्तकांची खरेदी करायला थेट लंडन बुक फेअरमध्ये जाते. ते ही एकवेळ ठीक आहे. पण बुक फेअरच्या निमित्ताने २-३ आठवडे तिथे मुक्काम, भटकंती, त्या मिस्टेरिअस तरुणाची तिथे भेट होणे... या टप्प्यावर मला टोटल कंटाळा आला.

लेखनशैली चांगली, सोपी, ओघवती आहे. बांद्रा परिसराचं वर्णन छान आहे. पण निवेदन अगदीच एकरेषीय वाटलं. कितीही प्रयत्न करून स्टोरीशी कनेक्टच होता आलं नाही. एखादा तद्दन बॉलिवूड सिनेमा पाहत असल्यासारखं वाटतं. फिजाच्या भूमिकेत आलिया भट. शेवट करण जोहर स्टाइल नाहीये, इतकाच काय तो फरक.

नेटवर या पुस्तकाला भरभरून रिव्ह्यूज आहेत. त्यामुळे गेल्या वर्षी किंडल डील्समध्ये अगदीच स्वस्तात मिळालं, म्हणून घेऊन ठेवलं होतं. पण पुरता विरस झाला.

वाचणार असाल तर आपापल्या जबाबदारीवर वाचा. Proud

एखादा तद्दन बॉलिवूड सिनेमा पाहत असल्यासारखं वाटतं. >>
भारतीय यंग जन्ता हा एकमेव उद्देश पुढे ठेवुन लिहित असावी. पुढे मागे कोणी सिनेमा करयाल घेतला तर लॉटरी नाहीतर एक तरी पुस्तक लिहिल्याच समाधान.

स्टोरीटेलवर ऐकलेलं अजून एक पुस्तक! आर. के. नारायण यांचं 'द इंग्लिश टीचर'. मराठी अनुवाद उल्का राऊत यांचा आहे. अभिवाचन अतुल कुलकर्णी.
खरं म्हणजे अतुल कुलकर्णीने वाचलं आहे म्हणून मी हे पुस्तक ऐकायला घेतलं Happy त्याच्या अभिनयाइतकाच त्याचा आवाज मला आवडतो आणि अर्थातच त्याने या पुस्तकाचं अतिशय सुरेख अभिवाचन केलं आहे. विविध व्यक्तिरेखा, प्रसंग, मूड यानुसार आवाजात विविध बदल करून वाचल्यामुळे हे वाचन जिवंत झालं आहे.
आता पुस्तकाबद्दल. आर के नारायण यांचं हे पुस्तक त्यांच्या स्वतःच्या आयुष्यातल्या घटनांवर आधारित आहे. कृष्णन हा या कथेचा नायक. मालगुडीमधल्या कॉलेजात इंग्लिश शिकवणारा. ब्रिटिश भारतात असण्याचे दिवस. सुरुवातीला साधं सरळ वाटणारं कथानक पुढे अनेक वळणं घेतं. साधी, लहान लहान वाक्यं, छोट्या छोट्या घटना, प्रसन्न भाषा ही आर के नारायण यांची नेहमीची शैली इथेही जाणवते. जशा घटना घडतात, तशा त्या पुस्तकात आपल्यासमोर येतात. पुढे काय होणार आहे याचा थोडादेखील अंदाज आधी येत नाही. एरवी आपल्या खऱ्या आयुष्यातदेखील असंच घडत असतं. त्यामुळे पुस्तक वाचताना (ऐकताना) आपणही जणू कृष्णनचं आयुष्य जगतोय असं वाटतं.

पुस्तकाचा अनुवादही छान झाला आहे. भाषेत कृत्रिमपणा जाणवत नाही. मूळची प्रसन्न शैली मराठीत छान उतरली आहे.

स्टोरीटेलने मात्र एडिटिंगकडे थोडं जास्त लक्ष दिलं पाहिजे असं वाटतं. वाचताना एखादा शब्द चुकलेला असतो, तो भाग तरी काढून टाकला पाहिजे. इतरही पुस्तकं ऐकताना हे जाणवलं होतं. अर्थात कसलेले कलाकार असल्याने अशा चुका मुळात कमी असतात, पण ज्या असतात त्या काढून टाकायला हव्यात.

Let Me Say It Now (Rakesh Maria)

मुंबईचे सुपर-कॉप राकेश मारिया यांनी आपल्या ३०+ वर्षांच्या पोलीस सेवेतले अनुभव, आठवणी लिहिल्या आहेत. सुरुवातीचं अकोला पोस्टिंग आणि नंतर एकदा रायगड जिल्ह्यातलं अल्प काळाचं पोस्टिंग वगळता त्यांनी कायम मुंबईत काम केलं. आणि त्यातही क्राइम डिटेक्शन हे त्यांचं आवडतं फील्ड होतं.
१९९३ सालच्या मुंबई बाँबस्फोट तपासामुळे ते प्रकाशात आले. तेव्हाचं सगळं वर्णन, तपासाची माहिती, संजय दत्तला त्यांनी अटक केलं त्या आठवणी वाचायला इंटरेस्टिंग आहेत. तेव्हा मी या बातम्या बर्‍यापैकी फॉलो करायचे. ते सगळं पुन्हा आठवलं.
नंतरही मुंबईतले काही स्थानिक गुन्हे, गाजलेल्या केसेस, काही गुन्हेगारांचा इतर राज्यांमध्ये काढलेला थरारक माग, नेपाळ बॉर्डरपर्यंतच्या मोहिमा मुंबईत बसून मॉनिटर करणे, हे सगळं पण भारी आहे. त्यातलं पोलिसी जार्गन (उदा. क्लीन पिक-अप) वगैरेमुळे थ्रिलर सिनेमे पाहत असल्यासारखं वाटतं.
प्रत्येक मोहिमेतले त्यांचे ज्युनिअर सहकारी, कुणाची काय खासीयत होती, क्राइम डिटेक्शनसाठी खबर्‍यांचं जाळं कसं महत्वाचं असतं, हे सगळं त्यांनी खूप छान लिहिलं आहे. (खबर्‍यांचं विस्तृत आणि बारकाईने रचलेलं जाळं यासाठी ते मुंबई पोलीस दलात प्रसिद्ध होते.)

तरी मला कसाबचं त्यांनी केलेलं इंटरॉगेशन, त्याबद्दल त्यांचं म्हणणं, अ‍ॅनालिसिस, अनुभवी पोलिस अधिकारी म्हणून त्यांच्या कमेंट्स याची उत्सुकता होती. तिथे मात्र माझी सपशेल निराशा झाली. २६/११ आणि पुढचे २-३ दिवस पोलीस कमिश्नरांनी मारियांची नेमणूक कंट्रोल रूमला केली होती. तेव्हा त्यांच्यावर प्रसारमाध्यमांमध्ये टीका झाली होती, की गुन्हे अन्वेषणाचा दीर्घ अनुभव आणि मुंबईची खडान् खडा माहिती असूनही ते प्रत्यक्ष मैदानात उतरले नाहीत. तसंच अशोक कामटेंच्या पत्नीने त्यांच्यावर आरोप केले होते की त्यांनी जाणूनबुजून कामटेंना कामा हॉस्पिटलला पाठवलं. या सगळ्यावर त्यांनी पुस्तकात उत्तर दिलं आहे. आणि आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ २६/११ च्या रात्रीचा जवळपास मिनिटा-मिनिटाचा रिपोर्ट लिहिला आहे. पुस्तक म्हणून वाचताना यामुळे विरस होतो.
पुढे त्यांच्या करिअरच्या शेवटी शेवटी शीना बोरा मर्डर केसच्या बाबतीतही त्यांच्यावर आरोप-प्रत्यारोप झाले होते. त्यांची तातडीने बदली झाली होती. ते आरोप त्यांना खूप लागले होते. त्याचंही त्यांनी अति सविस्तर स्पष्टीकरण दिलं आहे. तेव्हाचे पेपरांमधले रिपोर्ट्स, मुख्यमंत्र्यांशी एसएमएसद्वारे झालेलं संभाषण, वगैरे, वगैरे.
पुस्तकाचं शीर्षक बघता असं काही ना काही पुस्तकात असणार याची थोडीफार अपेक्षा होतीच, पण इतकं असेल असं वाटलं नव्हतं.

त्यामुळेच पुस्तक ६००+ पानांचं झालं आहे. ते आणखी जरा आटोपशीर झालं तर वाचायला आणखी मजा येईल.

किंडल प्राइम रीडिंगमध्ये गेल्या महिन्यात हे पुस्तक फुकट मिळालं. म्हणून लगेच वाचलं गेलं. Proud

छान अभिप्राय ललिता-प्रीति. वाचायला आवडेल पुस्तक.

( ९३ च्या बॉम्बस्फोटांवरच्या ब्लॅक फ्रायडे सिनेमात के के मेननने राकेश मारियांचं काम चांगलं केलंय. )

जयवंत दळवींची महानंदा कादंबरी परी तेलंगच्या आवाजात ऐकली.

रेडिओवर खूप पूर्वी नभोनाट्य ऐकलेले. त्या काळचे ओडिओ बुक. आणखी एक म्हणजे कोणार्क देवळाचेही आठवते.

The Kiss Quotient (Helen Hoang)

ऑटिझमशी जवळून परिचय असणार्‍या लेखिकेने ऑटिस्टिक नायिका आणि हँडसम नायकाला घेऊन juicy, steamy, raunchy प्रेमकथा लिहिली आहे. बिलिअनेअर रोमान्स टाइपची पुस्तकं असतात तसं यात नायिका बिलिअनेअर आहे. नायक तिच्या तुलनेत गरीब आहे.
दोघं कोणत्या परिस्थितीत भेटतात ते पाश्चात्य धाटणीचं आहे; मात्र बाकी कथानकात बरेच क्लिशे आहेत, जे आपल्याला बॉलिवूड सिनेम्यांमुळे ठाऊक असतात.
ऑटिझम फक्त तोंडी लावण्यापुरतं घेतलंय. तरी निवेदन ओघवतं आहे.
जड / डोक्याला त्रास देणारी पुस्तकं वाचल्यावर बदल म्हणून हे वाचायला हरकत नाही.

मृत्योपनिषद नावाची हृषीकेश गुप्ते यांची कादंबरी मी स्टोरीटेलवर किशोर कदमच्या आवाजात ऐकली. कादंबरी आणि अभिवाचन, दोन्ही आवडलं. दहा भाग आहेत. रायगड जिल्ह्यातल्या देवमांडला नावाच्या काल्पनिक गावात घडणारं कथानक आहे. वर्णनावरून साधारणपणे रोहा- नागोठणे परिसर डोळ्यासमोर येतो. देवमांडल्यात राहणारे चार प्रतिष्ठित मित्र, वर्षभरापूर्वी त्यांच्या पाचव्या मित्राचा झालेला काहीसा गूढ मृत्यू, तेव्हापासून सुरू झालेल्या अतर्क्य, गूढ घटना, आपापल्या पूर्वायुष्यात घडून गेलेले आधीचे असेच काही अनुभव हे सगळं त्यांना ग्रासू लागतं. पुण्यात राहणाऱ्या मृत्युंजय प्रधान नावाच्या एका लेखकाच्या पुस्तकाशी हे सगळं जोडलेलं असतं. मायबोलीवर नसलेली पण मायबोलीवर खूपच प्रसिद्ध झालेली गानू आजींची अंगाई ही कथाही या कादंबरीचा एक भाग आहे.
सगळं कथानक चांगलं प्रभावीपणे एकत्र गुंफलेलं आहे. पण शेवट अपूर्ण वाटतो. बहुतेक ही स्टोरीटेल ओरिजिनल कादंबरी आहे. पुढचा भाग असल्यास कुठे आहे ते कळलं नाही. जो आहे तोच शेवट असेल तर मात्र तो पुरेसा वाटत नाही.

किशोर कदमचा आवाज म्हटलं की मला तरी पहिल्यांदा आठवतं ते " चक्क डोळ्यांसमोर ऋतू कूस बदलून घेतो. पावसाआधी ढगांमध्ये कुठून गारवा येतो?" Happy त्याचा अभिनय तर आवडतोच. ही कादंबरी ऐकताना त्याच्या अभिवाचनाची ताकद परत एकदा जाणवली.

सिंहासन - अरूण साधू

या कादंबरीत तत्कालीन संदर्भ आहेत कि पुर्णपणे काल्पनीक आहे!

सिंहासन - अरूण साधू
या कादंबरीत तत्कालीन संदर्भ आहेत कि पुर्णपणे काल्पनीक आहे!
>>>

सिंहासन.. आणि शिवाय 'मुंबई दिनांक'ही आहे..
मला तरी पूर्ण काल्पनिक वाटलं नाही ते सगळं..
त्यावेळचे मुख्यमंत्री शिंदे (कदाचित वसंतराव नाईक), अर्थमंत्री दाभाडे (कदाचित बाळासाहेब देसाई), कामगारनेते डिकास्टा (जॉर्ज फर्नांडिस प्लस दत्ता सामंत बहुदा)... आणि ते साहित्य कला संस्कृती वगैरेमध्ये रमणाऱ्या 'आनंदराव' मंत्र्याचं पात्र नाशिकचे 'विनायकदादा पाटील' ह्यांच्यावर बेतलेलं असावं.. अर्थात 'कादंबरी' म्हटल्यावर सगळं जसंच्या तसं नसेलच..
पण त्यावेळच्या राजकारणाचा, विशेषतः कॉंग्रेसच्या पक्षांतर्गत गटबाजीचा, सुप्त सत्तासंघर्षाचा एक चांगला प्लॉट मांडलेला सापडतो साधूंनी... आणि ते सगळं एवढं खोलवरचं आहे की आजचं राजकारण समजा एकदम बदलून गेलेलं असलं तरीही 'सिंहासन' 'मुंबई दिनांक' काही पूर्णपणे इर्रेलिवंट झालेलं नाही आजही..

ह्याच पुस्तकांवर जब्बार पटेलांनी 'सिंहासन' मूव्ही केला होता... निव्वळ अप्रतिम..!

वावे, गुप्ते ची नवी कादंबरी आहे ही?मला फक्त अंधारवारी दैत्यालय कालनिर्णय आणि दंशकाल माहीत आहेत.
मृत्योपनिषद घेऊन वाचते.

अनु, बहुतेक ती स्टोरीटेलवरच फक्त आहे. एक्स्लूजिव्ह. २०१८ ची निर्मिती आहे तिथली. शेवट हाच आहे की अजून पुढे काही आहे हे शोधायला मी गूगल केलं तर त्या पुस्तकाचं नाव इतर कुठे दिसलं नाही. पुस्तकरूपात आली नसावी अजून.

या बाकीच्या कशा आहेत? दंशकाल आणि अंधारवारी आहे बहुतेक स्टोरीटेलवर. मला त्याची एक दिवाळी अंकात आलेली कथाही खूप आवडली होती. एक डिटेक्टिव्ह, काही प्रेमभंग असं काही तरी नाव होतं. हाकामारीचा संदर्भ होता त्यात.

या बाकीच्या कशा आहेत? दंशकाल आणि अंधारवारी आहे बहुतेक स्टोरीटेलवर>>

गुप्तेंच्या सगळ्या पुस्तकांपैकी 'दंशकाल' ही कादंबरी मला अतिशय ताकदीची वाटलेली आहे..! ती अगदी पकड घेणारी, शेवटपर्यंत गुंतवून ठेवणारी आहे.. म्हणजे गुप्तेंनी त्यात ज्या शांत आणि थंड पद्धतीने एका अघोरी भीतीचं वातावरण उभं केलं गेलंय की त्यात गोठून जायला होतं... ह्याच्यामध्ये अंगावर काटा फुलवणाऱ्या भीतीची झलक मिळतेच वारंवार, त्याचा काही विषय नाही ; कारण कुठलीच भीती तशी कायमस्वरूपी टिकत नाही.. पण कादंबरी संपवल्यावर, भीतीच्याही पलीकडे जाऊन, चांगलं काहीतरी वाचल्याचा थरथरता आनंदही मिळतो, असा माझा अनुभव आहे

धन्यवाद पाचपाटील! बघते दंशकाल.
स्टोरीटेलचं एडिटिंग मात्र गंडलेलं आहे! वाचताना चुकलेले शब्द काढून टाकतच नाहीत! मी तिथेही प्रत्येक रिव्ह्यूमधे हे लिहीत असते.

मृत्योपनिषद - स्टोरीटेल >>> छान लिहिलंय.
हृषिकेश गुप्तेंच्या सगळ्या पुस्तकांबद्दल मी कुठे ना कुठे चांगले रिव्ह्यूजच वाचले आहेत. मात्र प्रत्यक्ष पुस्तक अजून एकही वाचलेलं नाही.

वावे, पुस्तक वाचणे आणि ऐकणे - यावर फोकस ठेवून आणखी सविस्तर काहीतरी लिही की. आवडेल वाचायला. Happy

Snowblind (Ragnar Jónasson)

आइसलँडच्या पार उत्तरेकडचं एक दुर्गम गाव. कादंबरीचा नायक पोलीस ऑफिसर आहे. त्याला पहिलंच पोस्टिंग या गावात मिळतं. गावातलं पोलीस स्टेशन अगदी लहानसं, स्टाफ अगदी मर्यादित. एकूण फक्त ३ जण. कारण तिथल्या हेडच्या म्हणण्यानुसार nothing happens here.
गावात एक हौशी नाटक कंपनी असते. ती मंडळी दरवर्षी एक नाटक लिहून बसवून गावात सादर करत असतात. नाटकातले कलाकार, लेखक, दिग्दर्शक हीच कथानकातली मुख्य पात्रं आहेत.
गावात २ मृत्यू होतात. एक अपघाती, एका परीने आसपास माणसं असताना. दुसरी आत्महत्या, संशयास्पद वातावरणात. पोलीस प्रमुख दोन्ही मृत्यू त्या-त्या रकान्यात टाकतो. पण नायकाला काही बारीकसारीक गोष्टी खटकत असतात. तो आडूनआडून तपास सुरू करतो.

वर्षातला बराच काळ त्या भागात बर्फ आणि प्रचंड थंडी असते. अगदी कुंद वातावरण असतं. देशातल्या दक्षिण भागात वाढलेला नायक, त्याला हे वातावरण घुसमटून टाकत असतं. ही नोकरी स्वीकारली ती चूक झाली का हा विचार त्याला छळत असतो. त्याची मनाची अस्वस्थता कथानकात चांगली गुंफली आहे.
प्रचंड बर्फवृष्टी झाल्यामुळे गावात येणारा एकमेव रस्ता बंद झालेला असतो. विमानसेवाही बंद असते. या गोष्टी वेगळ्या प्रकारे नायकाच्या पथ्यावर पडतात. एक-एक सूक्ष्म धागेदोरे त्याच्या हाती यायला लागतात.
कथानक अगदी संथ गतीने उलगडत जातं. बर्फवृष्टीमुळे व्यवहार ठप्प झालेल्या दुर्गम जागी जगण्याचा जो वेग उरतो तोच कथानकातही उतरवला आहे. पुस्तकातली ही बाब मला सर्वात आवडली.
स्कँडी-थ्रिलर्समध्येही हवामान, ऋतू, वातावरण हे कथानकात खूप डॉमिनन्ट असल्याचं दिसतं. टोकाच्या हवामानाला बाजूला सारून तिथली कथानकं रचणे अवघड जात असावं. (जसं आपल्याकडे राजस्थानातली गोष्ट सांगताना वाळवंट, त्याचा रखरखीतपणा त्यात हटकून येतोच. किंवा कोकणातला पाऊस.)

थ्रिलर्सची वेगळी ट्रीटमेंट - म्हणून या टाइपची पुस्तकं मला आवडली. (आतापर्यंत २ च वाचली आहेत म्हणा.)

नाटक कंपनी, त्यातली प्रमुख पात्रं, यामुळे मला 'खामोश' सिनेमाची (अमोल पालेकर, शबाना आझमी, नसिरुद्दीन शाह) अधूनमधून आठवण होत होती.

'डार्क आइसलंड' ही पाच की सहा पुस्तकांची सिरीज आहे. ऑनलाइन रिव्ह्यूजवरून तरी ती चिकार गाजलेली वाटते. त्यातलं हे इंग्रजीत अनुवाद झालेलं पहिलं पुस्तक. (मूळ आइसलँडिक सिरीजमधलं हे दुसरं पुस्तक आहे.)

ललिता-प्रीति धन्यवाद. वाचनालयात दिसताहेत. मागवतो.
मुलांना वाचायला ठीक आहेत का?

मुलांना वाचायला ठीक आहेत का? >>>
हे पुस्तक कॉलेजवयीन मुलांना वाचायला ठीक आहे तसं. एका पात्राच्या तरुण वयातल्या सेक्शुअल अ‍ॅब्युजच्या नकोशा आठवणी एका ठिकाणी येतात. पण त्याचं स्पष्ट वर्णन असं नाहीये. एका ठिकाणी एक्स्ट्रा-मॅरिटल अफेअरमधला एक सीन आहे. तिथेही अगदी ग्राफिक वर्णन नाहीये.
मात्र पुस्तकाच्या संथ गतीमुळे मुलांचा पेशन्स टिकेल की नाही सांगता येत नाही. Lol

मी वाचलेलं दुसरं पुस्तक या सिरीजमधलं नाही. पण नॉर्डिक थ्रिलरच आहे - A Grave For Two. (मागच्या पानांमध्ये कुठेतरी मी त्याबद्दल लिहिलं आहे.)

दंशकाल मला जरा इरोटीक हॉरर वगैरे वाटली.आवडली नाही आणि मोठी वाटली.
पण बऱ्याच जणांना खूप आवडली आहे.
गुप्ते सुरुवात करणार असल्यास थेट दंशकाल ने न करता अंधारवारी,कालनिर्णय,दैत्यालय ने केलेली बरी.
लेखकाची स्टाईल ओळखीची झाली की मग दंशकाल पचवता येईल.

भरत, किंग ची आठवण येते.नक्कीच.पण गुप्ते यांची स्वतःची एक शैली आहे.कोकण,आणि थोडे आधुनिक संदर्भ. हे सर्व छान गुंफतात. त्यामुळे गानू आजीची अंगाई किंग च्या ग्रॅमा वर थोडी आधारित असली तरी नव्याने घाबरवून जाते.

रागोव चा सरकार 1 गॉडफादर वर लूजली बेस आहे.सुरुवातीला तसे स्पष्ट सांगितलेही आहे.पण तरीहि त्यातल्या ठाकरे मिक्स ने तो एक वेगळा उत्तम अनुभव बनतो.तसं आहे ते.किंग चे सालेम्स लॉट,आर,(का एन),शायनिंग वाचूनही लुचाई,अंधारवारी,आनंद महल वाचण्यातली उत्कटता(हे जोडाक्षर हल्ली गुगल इंडिक गंडवतं. अपडेट टाकायला हवा.) किंचितही कमी होत नाही.

गुप्ते आवडलेल्या कथा
दैत्यालय
नशकाप्रमराश्री
अंधारवारी
कथेत जास्वंदी नाव असलेली,अमक्या टॉवर चे जिने चढताना आलेल्या अनुभवांची(नाव विसरले.किंवा तो नशकाप्रमराश्री चाच एक भाग आहे.
कालनिर्णय मध्ये आहे एक, नाव आठवत नाही,मुलगी आणि वडिलांचा कड्यावरून अपघात होतो ती.

हाकामारी कल्पनेवर गुप्ते कथा अजून वाचण्यात आली नाही,पण धारपांची चंद्राची सावली जबरदस्त आहे.

ओह
मग मी वाचली ती अजून वेगळी 5 अक्षरी आहे.त्यात कथा आहेत.
काहीतरी छान नाव आहे.
(आता गुगल केले.मी वाचलेली कथा घनगर्द मध्ये आहे बहुधा)
म्हणजे कालनिर्णय किंग च्या वन पास्ट मिडनाईट(लँगोलियर्स) वर आधारित असू शकेल.वाचते.हार्ड कॉपी नकोय.इ बुक आहे का कुठे विकायला?

दिवाळी अंकात आलेल्या गोष्टीत हाकामारीच्या अफवेचा उपयोग करून घेतलेला आहे. अमानवीय अस्तित्व वगैरे नाहीये त्या कथेत. सस्पेन्स आहे.
मी स्टीफन किंग वाचलेला नाही. नारायण धारप अलीकडेच वाचलेत. पण गुप्तेंची शैली मलाही आवडते. कोकणातली पार्श्वभूमी असली तरी टीपिकल तळकोकण, मालवणी भाषा वगैरे नसते कारण पार्श्वभूमी उत्तर कोकणाची आहे. (म्हणजे मला तळकोकण आणि मालवणी भाषेशी काही प्रॉब्लेम नाही, पण हे वेगळं छान वाटतं वाचायला)

हो अगदी विशाखा.
मलाही बोलीभाषेत वाचायला खूप जड जातं.कोअर मालवणी, अहिराणी, नागपुरी (आणि इतर) बोलीभाषात ८०% पेक्षा जास्त कंटेंट असेल तर स्किप मारते.
बोलीभाषेतला नाटक, सिनेमा पहायला मात्र आवडतं, पांडगो इलो रे नाटक मालवणीतच सुंदर होतं. बहुतेक बोलीभाषा वाचून प्रोसेस करण्याइतके मोटर स्किल्स नसावे.

Pages