मी वाचलेले पुस्तक - २

Submitted by वरदा on 12 February, 2013 - 09:20

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे. Happy

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lab Girl (Hope Jahren)

हे एका पॅलिओबोटॅनिस्टचं memoir आहे. आणि बॉटनीसंदर्भातलं इतकं सुंदर पुस्तक मी या आधी वाचलेलं नव्हतं.

वनस्पतीजगतातली वाढीची एक-एक स्टेप, त्यातल्या अद्भुत गोष्टी, त्यातले काही महत्वाचे शोध, आणि या सगळ्याची स्वतःच्या सायंटिस्ट म्हणूनच्या प्रवासाशी (वाचकांच्या नकळत) घातलेली सांगड, ही या पुस्तकातली बहारदार गोष्ट आहे.
एका बीजाचा झगडा काय असतो, मुळं-खोडं गेली लाखो वर्षं काय काय करत आलेली आहेत, झाडाचं पान ही काय चीज आहे, झाडं-वृक्षं ही झाडं/वृक्षं का आहेत, इतर सजीव प्राण्यांहून ती वेगळी का आणि कशी आहेत, मातीकडे कसं बघायला हवं, हे पुस्तकात अतिशय रोचक पद्धतीनं सांगितलेलं आहे. त्या वर्णनात काही काही फार सुंदर विधानं आहेत. त्यातल्या अनेक गोष्टी सामान्यज्ञान म्हणून आपल्यालाही थोड्याफार माहिती असतात; तरी त्या अशा पद्धतीनं सांगितल्या गेल्यामुळे वाचताना फार भारी वाटतं. आणि त्याच्या जोडीला अर्थात सायन्सवरचं प्रेम, लहानपणापासून नकळत जपणूक होत गेलेली संशोधक वृत्ती, पी.एचडी.साठीचे प्रयत्न, त्यानंतरची रिसर्च सायंटिस्ट म्हणून वाटचाल, असा हा सगळा प्रवास आहे.

यात लेखिकेला पी.एचडी. रिसर्चच्या दरम्यान भेटलेला सहकारी, बिल, हे पुस्तकातलं एक महत्वाचं व्यक्तिमत्व आहे. दोघांमधलं सहकारी म्हणून असलेलं नातं फार छान दर्शवलं आहे. दोघांच्या स्वभावातले, व्यक्तिमत्वातले फरक, तरी झाडांवर-मातीवर निरतिशय प्रेम असणे, एकमेकांना पूरक पद्धतीनं लॅबमधलं काम करणे, एकमेकांचे जीवाभावाचे मित्र असणे, हे सगळं वर्णन संशोधनकामातलं चांगल्या सहकार्‍यांचं महत्व अधोरेखित करतं.
तीन ठिकाणी लॅब सेट-अप करतानाच्या अडचणी, गमतीजमती, त्यादरम्यानचे दोघांमधले प्रसंग, संवाद वाचायला खूप मजा येते.

वैज्ञानिकांना निधी उभा करताना काय काय अडचणी येतात, हे तिनं हलक्याफुलक्या भाषेत पण स्पष्टपणे सांगितलं आहे. वैज्ञानिक संशोधन हे पुरुषप्रधान क्षेत्र आहे, तिथे आपलं नाणं खणखणीत वाजवताना एका स्त्री-संशोधिकेला किती प्रयास पडतात, हे देखील तिनं स्पष्ट केलं आहे.

हा सगळा प्रवास मांडताना बॉटनीचं बोट कुठेही सुटलेलं नाही; पण बोट आहे म्हणून आख्खा हातच पकडलाय असंही कुठे झालेलं नाही.

पुस्तकाच्या उपसंहारात तिनं झाडांबद्दल काही भाष्य केलंय. सर्वसामान्य लोकांनी झाडा-वृक्षांप्रति आपला दृष्टीकोन कसा ठेवायला हवा, त्यासाठी अगदी साध्या सोप्या गोष्टी कराव्या लागतात, तो सर्व मजकूर म्हणजे पुस्तकाचा कळसाध्याय आहे. उपसंहार संपतो, पुस्तक संपतं तेव्हा ‘वा!’ अशी मनोमन समाधानाची दाद दिली गेली.

पुस्तकातलं लेखिकेच्या प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरीबद्दलचं वर्णन मला जरा ताणल्यासारखं वाटलं, बोअर झालं. पण ते माफ आहे.
पुस्तक मला अतिशय आवडलं.

लॅबगर्ल माझ्याकडे खूपच महिने झाले आहे पण वाचायला मुहूर्त लागत नाहीये. आता हा परिचय वाचून हातात घेतेच असं वाटतंय! Strong reco होता पण काही ना काही कारणाने मागे पडलं हे पुस्तक.

Non-fiction आहे ना ? >>> हो, हो.

जिज्ञासा, स्वाती२, असामी, पुस्तक वाचून झालं की कसं वाटलं ते इथे लिहा.

फार पुर्वी कॅप्टन दिप व्यक्तीरेखा असलेलि काही पुस्तके (सिरिज) वाचली होति पण ती कोणी लिहिली होती, ते आठवत नाही. कोणाला आठवते का ? त्यात पाकिस्तानच्या तळांवर हल्ला करुन ती नष्ट करण्याचि कामगिरी कॅप्टन दिप आणि हवालदार .... करतात.

अनुवादित आहे का हे ललिता प्रिती? >>> याचा मराठी अनुवाद अजून झालेला नसावा. (म्हणजे मला तरी नेटवर कुठे त्याबद्दल समजलं नाही.)

ओके.

कॉलेजमध्ये असताना मराठी अनुवादित 'द सेवन्थ सिक्रेट' वाचलं होतं. ते तेव्हा प्रचंड आवडलं होतं. म्हणून मध्यंतरी नॉस्टॅल्जियातून किंडलवर त्याची इंग्लिश आवृत्ती घेतली. ते पुस्तक नुकतंच वाचलं.
पण जुन्या स्टाइलच्या नरेशनमुळे, कुठेकुठे रिपिटिटिव मजकुरामुळे अधूनमधून चक्क बोअर झालं. Proud

"तुंबाडचे खोत" हे पुस्तक दोन वेळा पूर्ण वाचले आहे आधी काही वर्षांच्या अंतराने. आता परवा सहज वाचायला एखादे पुस्तक शोधत होतो आणि कुतुहलाने पुन्हा उघडले. आता तिसर्‍यांदाही तितकेच ग्रिपिंग आहे. Totally "unputdownable"!

ते दादा खोत वगैरे मंडळी पहिल्यांदा वाचताना टोटल व्हिलन वाटले होते. पण त्यांच्या व्यक्तिरेखेचेही अनेक कंगोरे आहेत हे नंतर वाचताना समजले. यातील नरसू खोत बद्दल वाचताना नेहमी नाना पाटेकर या रोल मधे जबरी फिट्ट बसेल असे वाटते. या पुस्तकावर प्रचंड मोठी सिरीज बनू शकेल. एकाही एपिसोड मधे पाणी न घालता (म्हणजे दादा खोतांची एण्ट्री पाच मिनीटे, त्यावर वाड्यातील सर्वांच्या प्रतिक्रिया असला प्रकार) सुद्धा शंभर दीडशे भाग सहज होतील.

फारएण्ड, मीही अलीकडेच तुंबाडचे खोत तिसऱ्यांदा वाचली Happy Totally "unputdownable" >> अगदीच!! पहिल्यांदा वाचली तेव्हा लायब्ररीतून घेतली होती. पहिला खंड दोन दिवसात परत नेऊन दिला तेव्हा तिथल्या बाईंनी आश्चर्याने 'झाला वाचून?" असं विचारलं होतं. Proud
मलाही वाटतं की एखादा चित्रपट किंवा मालिका चांगली बनू शकेल यावर. अगदी अथपासून इतिपर्यंत दाखवणं अवघड वाटलं तर नरसू खोत या व्यक्तिरेखेला केंद्र धरून मागचं पुढचं दाखवावं. तुम्हाला नाना पाटेकर सुचला तसा मला सचिन खेडेकर सुचला होता नरसू खोताच्या भूमिकेसाठी. नाना पाटेकरही अर्थात चालेलच, तो दादा खोत म्हणूनही फिट बसेल.

या पुस्तकावर प्रचंड मोठी सिरीज बनू शकेल. >>> यावर पूर्वी सिरीयल आलेली. अल्फा मराठी असताना किंवा झीची सुरुवात होती तेव्हा होती. जास्त चालली नाही, लवकर बंद पडली. मागे सह्याद्रीवर पण दाखवलेली तीच, अर्थात किती भाग होते, वाढवले की तेवढेच दाखवले ते माहिती नाही, मी बघितली नव्हती.

त्याचं शुटींगही कोकणात श्री ना पेंडसे यांच्या घरात झालेलं. भाची काम करत होती मधल्या खोताच्या बायकोचं म्हणून मला माहिती.

तुम्हाला नाना पाटेकर सुचला तसा मला सचिन खेडेकर सुचला होता नरसू खोताच्या भूमिकेसाठी >>> माझ्या लिस्ट मधे सचिन खेडेकर गणेशशास्त्री! Happy गोदा म्हणजे मृणाल देव.

सिरीज चांगली बनवली नव्हती का? तुपारे छाप फालतू ष्टोर्‍यांवरच्या सिरीज महिनोन्महिने चालतात आणि हिला स्पॉन्सर मिळाले नाहीत, की इतर अडचणींमुळे बंद पडली?

येस, गोदा मृणाल देवच Happy गणेशशास्त्री म्हणून मला अंगद म्हसकर सुचला होता (मुंबई पुणे मुंबईतला तिचा आधीचा बॉयफ्रेंड अर्णव) तो छान घारा गोरा आहे.

लायब्ररी अ‍ॅपमधे पुस्तके 'प्लेस ऑन होल्ड' केलं की साधारण किती आठवड्यांनी पुस्तक मिळेल हे पण दाखवतात . काही पुस्तके १३-१४ -२० आठवड्यांनी मिळेल असे कळते. एका वेळेस बरीच पुस्तके होल्डवर टाकायची सोय आहे . काहीतरी कमाल मर्यादा असावी पण मी तरी ती अजून गाठलेली नाही. पॉडकास्टवर नाव ऐकले घाल होल्डवर, स्ट्रँडबूक स्टोअर च्या इंस्टाग्राम अकाउंट वर काहीतरी वाचनीय वाटले, घाल होल्डवर असे करत करत ८-१० पुस्तके कायम लाइनीत असतात. ४-६ आठवड्यांनी एखादं पुस्तक मिळालं की नक्की कुठून माहिती मिळाली होती हे विसरते कधी कधी.
अलिकडे ऐकलेली अशी काही पुस्तके

१. द बॉय,द मोल, द फॉक्स अँड द हॉर्स - हे खरेतर वाचायचे पुस्तक आहे - गोष्ट एकदम छोटेखानी आहे. एक लहान मुलगा, एक मोल, एक घोडा आणि एक कोल्हा यांची मैत्री होते , ते एकमेकांशी गप्पा मारतात; एकमेकांना वाचवतात; बर्फातून, दर्‍या खोर्‍यांमधून फिरतात; नदी काठावर, झाडांवर बसून एकमेकांना प्रश्न विचारतात. थोडीशी रिचर्ड बाख यांच्या सुरुवातीच्या काही पुस्तकांची आठवण येते . वाचन पुस्तकाचे लेखक आणि चित्रकार स्वतः चार्ली मॅकसी यांनीच केलं आहे . पुस्तकातल्या प्रसंगाना साजेसं पार्श्वसंगीत आहे ( त्यातलं शांत , संथ संगीत मला एकदम स्पा मधल्या संगीतासारखं वाटलं होतं )
What do we do when our hearts hurt?" asked the boy. "We wrap them with friendship, shared tears and time, till they wake hopeful and happy again.”

What has taught you the most , ग्लास अर्धा भरलेला आहे की रिकामा आहे असे प्रश्न एकमेकांना विचारतात आणि त्याची उत्तरं देतात

नेहमीप्रमाणे आधी पुस्तक ऐकले आणि मग त्याबद्दल शोधले तर २०२० सालचे न्यू यॉर्क टाइम्स बेस्ट सेलर आहे हे कळले. आपा प्रिंट कॉपी मिळवून चित्रं पहावी लागतील.

२. Writers & Lovers by Lily King

हे पण न्यू यॉर्क टाइम्सच्या बेस्ट सेलर लिस्ट वर आहे. या लेखिकेचं आधीचं पुस्तक ( यूफोरिया) पण गाजलेलं आहे.
तिशीच्या दशकात नुकतीच पोचलेली नायिका केसी , कॉलेज संपल्यापासून लेखिका होण्याच्या प्रयत्नात आहे - एक स्पॅनिश बॉयफ्रेंड, रायटर्स रीट्रीट मधे भेटलेला बॉयफ्रेंड, आईचा परदेशात आणि अकस्मात झालेला मृत्यू आणि त्याचा शोक, वाढत चाललेलेल कॉलेज लोन, रेस्टॉरंट्मधे वेट्रेस म्हणून नोकरी आणि त्यातून येणारी आर्थिक ओढाताण, असे बरेचसे बॅगेज वागवत आहे. जमेल तसे त्या सर्वांशी whack-a-mole पद्धतीने डील करत आहे . आणि तिच्या आईच्या क्युबामधल्या बालपणावर आधारित पण काल्पनिक अशी कादंबरी लिहीत आहे.

१९९७ च्या स्प्रिंग/ समर्/फॉल मधली गोष्ट आहे. या सर्व काळात केसीला दोन लव्ह इंटरेस्ट्स भेटतात. सायलस तिच्यासारखाच स्ट्रगलिंग लेखक आहे , दुसरा ऑस्कर - चाळीशीतला , प्रसिद्द लेखक आहे, पत्नीच्या निधनानंतर दोन लहान मुलांना वाढवत आहे. नायिका त्याच्या छोट्या मुलांच्या प्रेमात पडते . पुस्तकात रेस्टॉरंटमधले सहकारी, तिथे येणारे गेस्ट्स, तिचे लेखक मित्र मैत्रिणी असा सगळा गोतावळा भेटतो.

केसीच्या पुस्तकाचं काय होतं, ती दोघांपैकी कोणाची निवड करते हे जाणून घेण्यासाठी वाचा किंवा ऐका ...

कोकणबद्दल वाचायचे तर मी नुकतेच श्री माधव धारप यांचे 'पसारा' वाचले. आत्मचरित्रात्मक पुस्तक आहे. तेव्हा पाली सारख्या लहान गावातून शहरात येऊन शिक्षण घेणे, सरकारी नोकरी करणे हा प्रवास खाचखळग्यांनी भरलेला असणार. पण इतके सकारात्मक लिहीले आहे की असं कृतार्थ जीवन प्रत्येकाला लाभो असेच वाटते. त्यात महत्त्वाचे सणवार कोकणात कसे साजरे केले जायचे ह्याबद्दल एक अख्खा चॅप्टर (प्रकरण) आहे. साधेपणात जी गोडी होती ती आज हरवली आहे पण त्या पुस्तकामुळे ती पुन्हा अनुभवायला मिळाली. (अभियंता म्हणून त्यांचे अनुभव अतिशय मस्त आहेत. पण इथे चालू असलेल्या विषयाला अवांतर होतील म्हणून अधिक लिहीत नाही).

सिरीज चांगली बनवली नव्हती का? >>> बरी होती, फार चांगली वगैरे नाही वाटली मला. मधला भाऊ आवडलेला. तो मेन व्हिलन फार नव्हता आवडला मला, प्रफुल्ल सामंत होते ते. नंतर त्यांनी सह्याद्रीवर स्वामी समर्थ chara पण केलेले. मी सह्याद्रीवर नव्हती बघितली. आधी बघितलेली अल्फा का झी वर पण तेव्हाही पूर्ण नव्हती बघितली. खूप आठवत नाहीये मात्र. ते खोत लहान वयाच्या मुलीशी लग्न करतात, ते बघून सोडली.

गिरीश ओक होते बहुतेक सुरुवातीच्या एपिसोडसमध्ये असं पुसटसे आठवतंय.

https://www.youtube.com/watch?v=LAbxb0hZVZ0

हा पहिला भाग सापडला, तुंबाडचे खोतचा. गिरीजा ओक ती लहान मुलगी, मला आठवत नव्हती. कसली गोड दिसतेय. नाना खोत चांगले असतात, त्यांच्या बायकोचं काम भाचीने केलेलं.

माझ्या लिस्ट मधे सचिन खेडेकर गणेशशास्त्री!
गोदा म्हणजे मृणाल देव>>>> +१
'गोदा' साठी मृणाल देव-कुलकर्णी हा पहिला ऑप्शन..
त्या तयार नसतील तर सोनाली कुलकर्णी (सिनीयर) हा एक.. आणि ते ही जमलं नाही तर इरावती हर्षे..!

नरसू खोतांसारखा उत्तुंग माणूस पेलायला मला सचिन खेडेकर योग्य वाटतात..
आणि
दादा खोतांसाठी महेश मांजरेकर
शिवाय
गणेशशास्त्री तुंबाडकर- सुबोध भावे
जुलाली- राधिका आपटे
बजाजी खोत- गिरीश पांडुरंग कुलकर्णी
बांडे सरकार- मोहन जोशी

Pages