सोप्पं कॅरेमल पुडिंग

Submitted by वर्षू. on 28 December, 2011 - 06:01
caramel pudding
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

-१ कप दूध
-१ ब्रेड ची स्लाईस
- १ अंड - अंडं नको असल्यास ब्रेड च्या दोन स्लाईसेस
- दीड कप साखर
- बदामाचे पातळ काप (ऐच्छिक)

क्रमवार पाककृती: 

ही माझ्या आई ची अतिशय सोपी पण सुपर टेस्टी कॅरेमल पुडिंग ची रेसिपी .

कुकर मधे बसेल इतक्या साईझ चं, जाड बुडाचं भांड घ्या. या भांड्यात पाऊण कप साखर घालून ,डायरेक्ट मंद गॅसवर वितळत ठेवा. (नंतर वाफवण्याकरता ते भांड कुकरमध्ये बसायला हवे) .मधून मधून सांडशी ने भांडं उचलून वितळलेली साखर नीट ,एकसारखी पसरवत राहा. साखर वितळवाताना आच मंदच पाहिजे. नाहीतर कॅरेमल पटकन ब्राऊन होऊन्,कडवट लागेल.
साखर वितळून सुरेखसा डार्क सोनेरी रंगाची झाली कि भांडं गॅसवरून उतरून थंड होऊ द्या.
बदामाचे काप घालायचे असल्यास लगेच या कॅरेमल वर नीट पसरा.

कॅरेमल थंड होऊन छान कडक होईस्तोवर दूध, उरलेली साखर (जास्त गोड पुडिंग हवे असल्यास चवीनुसार जास्त साखर घाला), ब्रेड ची स्लाईस (पाण्यात भिजवून मऊ झालेल्या ब्रेड च्या स्लाईस ला घट्ट पिळून ,कडा काढून टाकून घ्या),एक अंड ,एलेक्ट्रिक चर्नर किंवा मिक्सर वर एकजीव करून घ्या.
मिश्रण छान फेसाळ झाले पाहिजे,म्हणजे अंड्याचा वास येणार नाही.
हे मिश्रण ,कॅरेमल वर ओतावे.
आता हे भांडं, कुकरमधे उंच स्टँड ठेवून त्यावर ठेवावे. मग कुकर ला प्रेशर न लावता ,वाफ आली कि मिडियम गॅस वर १५ मिनिटे वाफवून घ्या.
कुकर नीट थंड होऊ द्या. मग पुडिंग चं भांड बाहेर काढून सुरीने चारीबाजूने मोकळं करून घ्या ,ज्या डिश मधे काढायचं असेल ती डिश त्यावर उपडी ठेवा.
आता डिश नीट धरून सुलटी करा.. कॅरेमल पुडिंग अलगद डिशवर येईल.. केक सारखे तुकडे कापून आस्वाद घ्या. थंडी च्या दिवसात मायक्रो मधे वॉर्म करून खाता येते. नाहीतर फ्रीज मधे ठेवून द्या.थंड ही खूप चांगलं लागतं.

वाढणी/प्रमाण: 
तीन जणांकरता
अधिक टिपा: 

हे पुडिंग खरोखरच करायला अतिशय सोप्पं आहे. शुअरशॉट रेसिपीये !! मला सह्ही जमतेय म्हंजे कुण्णालाही सहज जमेल Lol
बदाम रात्रभर भिजत घातले होते. सकाळी सालं पटकन काढता आली. आणी मग लहानशा ड्राय फ्रूट स्लाईसरवर काप केले. सुरेख पातळ होतात,मेहनतीशिवाय!!!

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हाय रीमा Happy
हॉटेल वाले बहुतेक लहान लहान भांड्यात ओतून मोठ्ठ्या अवन मधे बेक करत असावेत..
विचारलं पाहिजे त्यांनाच एकदा..

सिर्फ और सिर्फ तेरे लिये.. >>> कित्ती गोड गं तु वर्षु. थँक्स !

रुनी, कसं कळलं लगेच तुला? खरंच हुश्शार तु.

मने..अजून सपष्ट सपष्ट लिवलंय बघ वर आता..परत संपादित केलंय.. आयला इतकं लिहिलेल्या निबंधातही कधी फेर्फार केले नवते, मार्क्स ची पर्वा न कर्ता Proud Wink

आयला इतकं लिहिलेल्या निबंधातही कधी फेर्फार केले नवते, मार्क्स ची पर्वा न कर्ता >>> Proud

मामी, फोटो टाक. 'कूकरला लावून आले आहे' असं सांगून वातावरणनिर्मिती केली आहेस तू. आता फोटोशिवाय सुटका नाही! Proud

जरा होऊ तर द्या बायांनो. टाकेन फोटू नक्कीच (फोटो काढण्यासारखं झालं तर)
कारण आता मध्येच काढलं तर जरा अजून व्हायला हवं होतं असं वाटलं म्हणून पुन्हा ठेवलय. एकूणात किती आनंदीआनंद आहे हे लक्षात आलं असेलच. Happy

अरे वा.........वर्षू सर्व सुगरणींना उकसवलस बर्का! सगळ्या लगालगा गेल्यात पुडिंग करायला!
छान गं सुगरणींनो............"आणंद" वाटला!

झंपी ... Proud

घ्या, माझ्या सुगरणपणाला कोणाची दृष्ट लागली? चांगलं कुकरला लावलं होतं. ते जरा आधीच बंद केलं गेलं म्हणून पुन्हा लावलं तर त्यावेळी चुकून कुकरला शिट्टीही लावली. ते मला चार शिट्ट्या झाल्यावर ध्यानात आलं कारण तोवर मी मायबोलीवर आले होते आणि एका मायबोलीकरणीशी फोनवर बोलतही होते. मग मात्र कुकर थंड होईपर्यंत थांबले. आतापर्यंत जेव्हा जेव्हा हे पुडिंग केलय त्यात्यावेळी ते तसंच भांड्यातून कापून बाहेर काढलय. पण वर्षुताईचं बघून मारे प्लेट उपडी वगैरे ठेऊन भांडं उलट इ केलं. पण आमचं पुडिंग लै स्मार्टगिरी करून र्‍हायलं ना. ते बरोबर त्या प्लेटमध्येही सुलट जाऊन बसलं. आता हे कसं ते माहित नाही. आणि ते सुलट पुडिंग काही फार प्रेक्षणीय नसल्याने फोटो काढला नाही. एव्हाना अर्धं संपलं आहे. त्यामुळे फोटो नेक्स्ट टाईमला टाकण्यात येईल.

कथा खोटी वाटत असेल तर नीधपला कॉन्टॅक्ट करा. कुकरच्या चार शिट्या ऐकून मी फोडलेल्या किंकाळ्या तिनं फोनवर ऐकल्यात.

मला वाटतं हे सगळं मी मनिमाऊला हसल्यामुळे झालंय Happy

वर्षु तै....

मी पण काल केलं. अंड न घालता. पण ब्रेड ची चव काही गेली नाही. जायफळ घातलं तरी पण. बाकी झालं चांगलं.

धन्स.....

मा>>>मी..................... Uhoh
अगा.. सुलटच कस्काय राह्यलं... भारीच्चेस बाई..
आता रेसिपी टाकली ना कि 'पाककृती पूर्ण होईस्तो माबो वर येऊ नये,माबोकरांशी किंवा कुणाशीही फोन्वर गप्पा ठोकायला बसू नये इ.इ. तळटीपा टाकीन Wink
मनीमाऊ ने वाचलं ना तर अशी हसेल आता ती बघ!!! Proud
@मोकिमी... नेक्ष्ट टायमाला अंड घालून कर्बा!!!!

मनीमाऊ ने वाचलं ना तर अशी हसेल आता ती बघ!!! Dushta Ananad2.gif

मामी, Dushta Ananad.gif

मामी, Light 1 Happy गंमत गं. तुझी काही रेसिपी चुकली नाहीए. चवीला मस्तच झालं असणार. आणि मी ते इमॅजिन केलं कि तु उलटं टाकल्यावर ते कसं गुदुगुदु हलुन सुलटं झालं असेल. चल संपव. एंजॉय माडी!

आज सुटी आणि ३१ डिसे. शिवाय इथे उपलब्ध सामग्रीत होण्यासारखा नवा पदार्थ म्हणून पुडिंग करायला घेतलं.एकटीसाठीच हवे होते म्हणून प्रमाण कमी कमी घेतलं. आणि साखर वितळल्यावर लक्षात आलं की आपल्या गरीबीच्या संसारात मिक्सरही नाही आणि कुकरही. मग एग बीटर आणि चमचा यांनी हात भरुन येईस्तोवर दूधाचं मिश्रण फेटलं.पहिल्याच सूचनेप्रमाणे साखरेचं भांडं बसेल असं दुसरं एक भांडं होतं.त्यात पाणी घालून कसरत करुन पुडिंग करायला ठेवलं. पण वरुन झाकण ठेवल्यावर कळाले की 'कुकर इफेक्ट' येणार नाही. म्हणून बाजूने नॅपकिन लावून वाफ कोंडायचा प्रयत्न केला. या खटपटीत नुसत्या कानांवर तग धरुन राहिलेल्या भांड्याने किंचित मान टाकलेली कळाले नाही. पुडिंग सेट झाल्यावर कळाले की भांडे तिरके होते. डोके थंड ठेवून पुडिंग थंड करायला ठेवले . तर लिक्विड कॅरेमल वर येऊन 'मी आहे, मी आहे' सांगत होते. मग डिशवर भांडे उलटे केल्यावर मजा अशी की कॅरेमलच्या प्रमाणात दूध असूनही भांडे पसरट असल्याने पुडिंग गुबगुबीत व्हायच्या ऐवजी चपटे झाले. शिवाय तिरके झाल्याने उताराच्या दिशेने 'संथ वाहते कॅरेमल' असे विलोभनीय दृश्य ओटातटावरून दिसत होते. चवीला अत्यंत सुंदर झाले यात शंका नाहीच. एखाद्याला एप्रिल फूल करायचे असल्यास ते पुडिंगचे चपटे त्रिकोण पपईच्या फोडी म्हणून खपवता येतील.पण खरा चमत्कार तर पुढेच आहे. पुडिंग ओतल्यानंतरही १ सेंमी उंचीचे बाळ कॅरेमल आपल्या आईला सोडायला तयार नाही असे कळाले! तर त्या कॅरेमलात पाणी घालून पाक करुन त्यात पुर्‍या सोडणे हा पुढचा प्रयोग आहे. इच्छुकांनी सुरुवात चुकवू नका, शेवट बुडवू नका.
* प्रत्येक पदार्थ त्याचे नशीब भांड्यावर लिहून आणतो.
* नाटकातील सर्व घटना या काल्पनिक नसून सत्यघटनाच आहेत. त्याचा त्या वेळी हजर असलेल्या स्वयंपाकघरातल्या जिवंत व्यक्तीशी कोणताही संबंध नाही. मिक्सर नसणे, कुकर नसणे, भांडी पसरट असणे या गोष्टींचा नवशिकाऊंच्या बालमनावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
* पुडिंग ला पपई दाखवणारे फोटो देऊन पुडिंगचा अपमान करायचा नाही म्हणून फोटो मागू नये.
* कोणताही पदार्थ दिसतो तितका सोपा नसतो.
धन्यवाद.
Proud

Biggrin

किती चिवट सुगृहिणी आहेस आशूडी. कुकर नाही कळताच दुध-अंड्याचं मिश्रण मी तरी तसंच पिऊन टाकलं असत ब्वा! मग नंतर कॅरॅमलची काळजी करत बसले असते. Proud

वर्षुताईच्या कृपेनं (चुकुन कुरापतीनं म्हणणार होते) सगळ्यांचा सुग्रणपणा उतू चाल्ललाय बहुधा. धन्य हो!

वर्षु-नीलताई,
मी देखील पुडींग ट्राय केले. आपण दिलेल्या कृतीबरहुकुम सुरुवातीला सगळे यथासांग पार पडले पण जेव्हा पुडींगची उचलबांगडी करायची होती तेव्हा फक्त कॅरॅमलचा थर भांड्याला चिकटून राहीला व उरलेला थर बाहेर निघून आला. काय चुकले असेल समजत नाही पण आत्ताच वरची पोस्ट वाचली आशुडीची म्हणून लिहावेसे वाटले. मी परत तो वरचा निघून आलेला थर भांड्यात ठेवून फ्रिज करायला ठेवले आहे व आता चमच्याने कॅरॅमल जरास्से खरवडून मग थोडे थोडे संपवत आहे. काय चुकले असेल?

अगदी बरोब्ब्ब्ब्ब्बर ! मी केलं तर असंच होणार.. म्हणून म्या करनारच न्हाई... Proud केरॅमल तसंच रहाणार आणि नुस्ता पांढरा गोळा तेवढा येणार ! Proud आता तो खरवस समजून खा.

सुमेधाव्ही. सेम पिंच.

माझं पुडिंग चांगलं अर्धा तास कूकरमधे ड्यान्स करत होते. (आईच्यान, कूकरमधून ताक धिनाधिन आवाज पण येत होता) पण तरी ते थलथलीतच झाले. शिवाय कॅरेमल भा.ण्ड्यात राहिलं ते वेगळंच. नवर्‍याने चमच्याने खरवडून खायचा प्रयत्न केला ते जमलं नाही म्हणून त्यात पाणी घालून ठेवलय. Happy मी पुडिंग्मधे बटरस्कॉच इसेन्स घातलेला. (असंच लहर म्हणून. आणल्यापास कधीच कुठल्या पदार्थात वापरलेला नव्हता) छान चव आली आहे. चमच्याने खाता येतय पण तुकडे पडत नाहीयेत. आता थंड व्हायला फ्रीझमधे ठेवलं आहे.

वर्षू, माझ्यामते एक कप दूध, साखर आणि एका अ.ण्ड्याला एका ब्रेडची स्लाईस कमी पडतेय. मी पुढच्या वेळेला अजून ब्रेड स्लाईस घालून करून बघेन म्हणतेय.

>>साखर वितळून सुरेखसा डार्क सोनेरी रंगाची झाली कि भांडं "लगेच"गॅसवरून उतरून थंड होऊ द्या>><<

वरचे वाक्यामध्ये "लगेच" शब्द घातला तर असे कॅरमल तळाशी चिकटणे होणार नाही.
बर्‍याच वेळ ठेवले की पाक होतो साखरेचा व कडक होवून चिकटतो पाक ते कॅरमल न रहाता. मग क्यासे क्या ह्प गया असे प्रश्ण पडतात. Proud

अरे देवा... वरच्या प्रतिक्रिया पाहून माझीच रेसिपी चुक्लीये काय अशी शंका येऊ लाग्लीये Proud
आशुडी..लई भारी प्रयोग.. Rofl Rofl Rofl

सुमेधाव्ही.. थोडासा जाड थर असेल कॅरेमल चा तर थोडासा तळाला चिकटतोच्..पण तरी पुडिंग सुलटं केलं तर पुडिंगला व्यवस्थित लेयर येतो कॅरेमल चा..
Lol आता मला भारतात आलं कि माझा प्वाइंट प्रूव करायला मामी च्या किचन मधे प्रात्यक्षिक द्यावं लागणारे बहुतेक.. Wink त्याशिवाय मामी काय सोडायची नाय मला...

Pages