लहान मुलांचे आजार

Submitted by admin on 1 July, 2008 - 05:31

नमस्कार,

माझा मुलगा आता ३ महीन्यान्चा होईल. मला दुध जास्त आले नाही आणी जे होते ते बन्द झाले. मायबोलीवरील सर्व उपाय करुन पाहीले. त्यामुळे सध्या तो फोर्म्युला घेत आहे. डॉक्टरान्च्या मते त्याला ते सुट होत आहे व त्याची वाढही योग्य होत आहे.
पण हल्ली तो कमी पितो, कदाचीत चवीला कन्टाळून असेल. तर मला त्याला वरचे अन्न सुरु करावयाचे आहे. यावर कोणी मला मार्गदर्शन करु शकाल का?
माझ्या घरच्यान्च्या मते मी त्याला डाळ-तान्दळाची भरड दुधातून द्यावी. प्लीज मला मदत करा.

धन्यवाद,
मनप

डाळ- तांदूळाची भरड जराशी लवकर वाटतेय हो.
दुधात शिजवलेली नाचणी, मॅश्ड फळं (हळूहळू एकेक सुट होईल तसं), भाज्यांच्या स्टॉकचे पाणी.
दूध बदलायला आम्ही आधी टोन्ड मिल्क, मग हळूहळू गायीचं दूध- असं चालू केलं होतं.
डाळ- मुगाची डाळ (सालाशिवाय) पचायला सर्वात हलकी. त्याचा आणि तांदळाचा रवा काढून, तो शिजवून देणं चालू केलं होतं. आधी डाळ कमी, तांदूळ जास्त, नंतर नंतर सम प्रमाण. मग त्यात भाज्या घालत जाणे. दुधात शिजवलेला अगदी मऊसर गुरगुट्या भात- ६व्या महिन्यापर्यंत चालू केला होता.

इकडे अमेरिकेत बाळांना चार महिन्यापर्यंत सॉलिड अन्न देत नाहीत. चार पूर्ण झाले की बाळांचं राइस सिरियल मिळतं ते फॉर्म्युला किंवा आईच्या दुधात मिसळून १ - दीड टेस्पून दिवसातनं एकदा असं सुरु करायला सांगतात. कुठलाही नवा प्रकार देताना आठ दहा दिवस थांबून मग दुसरा पदार्थ द्यावा. सुरवातीला एक -दोन टेस्पून इतकाच देऊन पहावा.

राइस सिरियल, नंतर ओट्स सिरियल, व्हीट सिरियल, नंतर उकडून मॅश केलेल्या भाज्या , नंतर फळं असा क्रम सांगतात.

साधारण सहा महिन्यांनतर डाळ, तांदूळ वेगळे कोरडे भाजून , भरड दळून, मऊ शिजवून भरवता येतील.

भारतातही चार महिन्याचा झाल्यावरच सॉलिड अन्न देतात. फॉर्म्युला बनवताना अगदी चिमटीभर साखर घालून बघा. तसेच राइस सेरिअल पण सुरु करु शकता. पण सर्व डॉक्टरांच्या सल्ल्याने करा. त्यांना बाळाची तब्येत जास्त ठावुक असणार.

तसेच डॉक्टर हा एक निर्दयी मनुष्य आहे आणि माझे बाळ उपाशी असताना सुद्धा त्याची वाढ नीट होते आहे वगैरे म्हणतोय असे विचार मनात येऊ देऊ नका Wink

इथे पहा- http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/84801.html
नवीन मायबोलीत 'लहान मुलांचा आहार' असा धागा आहे. तसाच 'लहान बाळांचा आहार' असा एक सुरु करुन कृपया तिथे लिहा.

रैना, शोनू, सिन्ड्रेला आणि मदत समीतीचे मनापासून धन्यवाद.
मी काही दिवस थांबून राईस सिरियल सुरु करेन.

रैना, तुम्ही सांगीतले तसे डाळ-तांदळाचा रवा शिजवून द्यायला मला आईने सांगीतले.

>>तसेच डॉक्टर हा एक निर्दयी मनुष्य आहे आणि माझे बाळ उपाशी असताना सुद्धा त्याची वाढ नीट होते आहे वगैरे म्हणतोय असे विचार मनात येऊ देऊ नका
हा हा!! बिलकूल नाही, बाळाची डॉक्टर खरच चांगली आहे. आणि विचार म्हणाल तर हाच की,पहिलच बाळ आहे आणि ईथे घरापासून आणि घरच्यांपासून दुर त्याच्या संगोपनात काही कमी नको रहायला.

सगळ्यांचे पून्हा एकदा धन्यवाद!!
- मनप

नमस्कार,

माझी मुलगी ४ वर्षाची आहे. नुकतीच तिचा चेक अप झाला. त्यात डोळ्याची एक टेस्ट घेतली. आणि त्यात उजव्या आणि डाव्या डोळ्याच्या मापात काही फरक निघाला त्यामुळे त्यानी स्पेशलिस्ट कडे जायला सांगितले आहे.
ही टेस्ट (अँब्लियोपिया) साठी केली होती. यात एका डोळ्याने नीट दिसत नाही. आणि काही वर्षे झाल्यानंतर त्या डोळ्याची पाहण्याची सवय कमी होते त्यामुळे मेंदु असे समजतो की त्या डोळ्याचे सिग्नल्स नीट नाहीत. आणि त्या डोळ्याकडुन येणारे सिग्नल्स प्रोसेस करत नाही.
इंटरनेट वरुन मिळालेल्या माहितीनुसार यावर उपाय म्हणजे ज्या डोळ्यात प्रॉब्लेम आहे त्या डोळ्याला जास्तीत जास्त पाहण्याची सवय करणे. (त्यासाठी चांगल्या डोळ्याला काही काळ पॅच लावणे) किंवा लेन्स.
(स्पेशलिस्ट कडुन आल्यावर आणखी लिहिनच पण)..कुणाला याचा अनुभव आहे का?
हे जास्त टीवी पाहण्याने होउ शकते का?

कुणाला माहिती असेल तर कृपया लिहाल का?

धन्यवाद.

टीपः आम्ही न्यु जर्सीत आहोत आणि आमच्या डॉक्टरानी ही टेस्ट करायला सांगितली आहे. (३र्‍या वर्षी केली तेव्हा ठीक होते आता ४थ्या वर्षी हा प्रॉब्लेम निघाला. आम्ही इतर काही ओळखीच्याना विचारले तर त्यांच्या डॉक्टरानी त्याना अशी काही टेस्ट सांगितली नव्हती). भारतात ही टेस्ट करतात का?

माझ्या ओळखीत एका लहान मुलीला अशाच प्रकारची काही कंडिशन होती/आहे .. lazy eye असं नाव कळलं होतं मला त्याचं .. बाकी फार माहिती नाही .. काही specific माहिती हवी असल्यास विचारून सांगता येईल ..

धन्यवाद रुनी, सशल, आणि मृण्मयी..

मीही लेझी आय बद्दल वाचले आहे. वाईटातुन चांगले एवढेच आहे की लवकर कळल्यामुळे ट्रीटमेंट लवकर सुरु करता येइल.

-----------
अपडेटः (४-सप्टेंबर २००९)
आम्ही तिला पेड ऑप्थाल्मोलॉजीस्ट कडे नेउन आणले..ती म्हणाली काही प्रॉब्लेम नाही. तिच्या लाँग साईट मधे किंचीत दोष आहे पण तो वयाप्रमाणे आपोआप ठीक होतो..सी यु आफ्टर २ ईअर्स.. Happy

सल्ल्याने मदत केलेल्या सगळ्यांचे धन्यवाद!

नमस्कार - लहान मुलांना होणार्‍या एक्झीमा, अ‍ॅक्ने बद्दल काय करता येईल?
[हायड्रोकोर्टिसोन लाउनही ते जात नाही].

नकुल, mild eczema असेल तर बेबी अविनो लावल्याने मदत होते असा माझा अनुभव आहे. माझ्या मुलाच्या पेडीनेही तेच लावायला सांगितलंय. खूप असेल तर मात्र गरज असेल तेव्हा टॉपिकल स्टिरॉईड्स शिवाय गत्यंतर नाही, हा स्वानुभव.

माझ्या ( अमेरिकेत रहाणार्‍या ) पुतण्याला सांगितलेले काही उपाय
आंघोळ रोज घालू नये.
सुती कपडे(च) घालावेत
बाळाला सांभाळणार्‍यांनी पण सुती कपडे घालावेत. पर्फ्युम. स्ट्राँग वासाचे क्रीम वगैरे टाळावेत. पेट्रोलियम जेली सगळ्यात बेस्ट. नाहीतर युसेरिन / आक्वाफोर ही क्रीम्स.
घरात तळण / फोडण्यापण टाळायला संगितल्या होत्या ते अपार्टमेंट मधे होते तोपर्यंत.

गरज लागेल तसे हायड्रो कॉर्टिझोन लावावे. तो वर्षाचा झाल्यावर पोटात घ्यायची पण काही औषधे दिली होती- विचारुन सांगेन.

नकुल,

आम्ही आमच्या पेड ला "हायड्रोकोर्टीझोन" बद्दल विचारले होते. (त्यात स्टेरॉईड असतात मग कसे लावायचे इ.)
त्याच्या म्हणण्याप्रमाणे यात स्टेरॉईडचे प्रमाण खुप कमी असते आणि यात जे स्टेरॉईड असते ते धोकादायक स्टेरॉईड पेक्षा वेगळ्या प्रकारचे असते. (तरीही कमी लावलेले चांगले).

अ‍ॅक्वाफोर पेक्षा आम्हाला त्याने वॅसलीन (पेट्रोलीयम जेली) लावायला सांगितले होते. (वर शोनु ने दिलेले उपायही अगदी करेक्ट आहेत).

तुमचे बाळ किती लहान आहे? काही वेळा लहान वयात स्कीन खुप सेन्सिटीव असते म्हणुन त्रास होतो (जास्तकरुन गरम वातावरणात) पण नंतर तो आपोआप कमी होत जातो (औषधाशिवाय).

माझा मुलगा लहान असताना अमेरिकेत केलेले काही उपाय:
कमीत कमी कपडे घालणे - तो घरात फक्त diaper आणि onesie घालून असायचा.
उन्हात रोज काही मिनिटे तरी घालवणे
बाहेर जाताना फक्त सुती कपडे
त्याचे कपडे धूण्याचा साबण बदलून woolite वापरायला सुरुवात केली
थंडीच्या दिवसात humidifier लावणे
कॉर्टिझोन क्रीम किंवा प्रिस्क्रिप्शन स्टिरॉईड लागल्यास ३-४ दिवसच वापरायला डॉक्टरांनी सांगितले होते.

तरीही त्याला अधुनमधून एक्झिमा होत होताच, पण ३-४ वर्षाचा झाल्यावर पूर्णपणे बरा झाला, डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे.

मला वाटतं इथेच उपचार लिहीण्यापेक्षा इथे फक्त लिंक द्यावी. नाहीतर इथेही मोठा अरकाईव्ह निर्माण होईल आणि पुन्हा सगळ्या व्याधींवरचे उपचार शोधत बसावे लागतील.

वॅसलीन चांगलंच. पण उन्हाळ्यात नक्कीच चांगलं नाही. थंडीत त्याचा उपयोग जास्त चांगला होतो. उन्हाळ्याकरता माझ्या मुलीच्या dermat तिला लोशन टाईपचं औषध दिलं होतं ज्याने तिची स्किन ड्राय व्हायची नाही. त्याचं नाव आत्ता आठवत नाहीये. नंतर इथे टाकेन.

नमस्कार,

माझा बाळ आता ५ महिन्याचा होइल. ईथल्या बदलत्या हवामानामूळे की कश्याने माहीत नाही त्याला कालपासून सर्दी झाली आहे. तसा तो खेळतो आहे, पण नाकात सर्दी जमा होत आहे आणि शिन्का व कोरडा खोकला येतो. तसेच थोडी कण़कण आहे अंगात. रात्री हिरवी शी केली. मी त्याला बाळगूटी देते रोज. कृपया कोणी काही उपाय सांगेल का?
आजकाल तो तोंडात बोटे, कापड (अगदी अंगावरचे सुद्धा)असे सतत घालत असतो. त्यामूळे Infection झाले असेल का?

काळजी करू नका. (बाळं फार घाबरवतात!) हिरवा रंग इन्फेक्शनमुळे असू शकतो. एकदा डॉक्टरला दाखवून आणा. बाळगुटी बंद करा काही दिवस. (त्यातल्या एखाद्या गोष्टीमुळे त्रास होत असेल तर सांगता येत नाही.)

मृण्मयी,अश्वीनी धन्यवाद!!

मृण्मयी, आताच डॉक्टरच्या ऑफीसला फोन केलेला. बाळाच्या डोळ्याभोवती (डोळ्याच्या आत स्वच्छ आहे)लाल होउन डोळ्यातून पाणी येत होते, व फक्त डोके थोडे उष्ण होते, म्हणुन घाबरून केला फोन. त्यांनी ताप आला किंवा पाण्याचे प्रमाण वाढ्ले तर उद्या बोलावले आहे.
त्याची सकाळची शी नॉर्मल पिवळी होती.

अश्वीनी, तुम्ही पाठवलेल्या लिन्क्स पाहील्या. एवढ्या लहान बाळासाठी गुटीच सुचवली आहे तुम्ही, जी मी देत आहे. साधारण किती वेढे देऊ हे सुचवाल का? मृण्मयी म्हणाली तसे गुटीतील एखादी गोष्ट बाधत नसावी ना.

साधारण १०-१५ वेढे दे. सुंठ, वेखंड इ. उष्ण गोष्टींचे ५-६ च वेढे दे.
गुटीमध्ये तू काय काय देते आहेस?

>>आजकाल तो तोंडात बोटे, कापड (अगदी अंगावरचे सुद्धा)असे सतत घालत असतो. त्यामूळे Infection झाले असेल का?
शक्य आहे. त्याच्या आजुबाजूच्या सर्व गोष्टी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न कर. पाणी उकळून कोमट केलेलं दे.

धूळीची पोलन ची अ‍ॅलर्जी मुळे पण सर्दी होउ शकते. रान्गत असेल तर जमीन दिवसातून दोनदा पुसणे बन्धन कारक. डेटोल घालून. जास्त कड्क डिसिन्फेक्टंट ने त्रास होउ शकतो.

अमेरिकेतील कारपेट्वाले घर असेल तर ते वॅक्युम करावे लागेल. कारपेट मध्ये अतोनात जन्तू, धूळीचे कण
माइट्स अड्कून राहतात. हे सर्दी डोळे यासाठी. घरी कुत्रा मान्जर असेल तर त्याच्या केसानी बाळाना त्रास होउ शकतो.

पर्फ्युमस, डीओ स्प्रे याने पण. ते सर्व दूर ठेवावे.

अश्विनी , मी त्याला गुटीतील सर्व २० औषध देते. साने फार्मसीची बाळगुटी वापरते.
अश्विनीमामी , तुम्ही सांगीतलेले लक्षात ठेवीन.
धन्यवाद!!

माझ्या मुलाच्या नाकात खपली धरली आहे. उष्णतेनी होतं ना असं. मला सगळेजण खूप वेगवेगळे उपाय सांगताहेत. मैत्रिणीने खोबरेल तेल लावायला सांगितले तर आईनी अन कामवाल्या बाईनी गायीचं तुप लावायला सांगितलं. सासुबाई म्हणताहेत की तुप अन खोबरेल तेल गरम असतं. सरसोचं तेल लाव. ज्यानी जसं सांगितलं त्याप्रमाणे या तिन्ही गोष्टी २ -२ दिवस लावून झाल्यात. पण फरक नाही. नक्की काय लावावं?
दुसरं म्हणजे त्याला बर्‍याचदा शी ला त्रास होतो म्हणून १ मनुका पाण्यात भिजवून देते मी रोज. पण मग आता ही खपली असल्यामूळे काही दिवस बंद करावं का? किसमिस पण गरम असतात का?

सासुबाई म्हणताहेत की तुप अन खोबरेल तेल गरम असतं. >>> हो ग, तूप उष्णच मानतात अन म्हणूनच ती खपली गळून पडेल. काट्याने काटा काढल्यावाणी.. Happy खो.ते. च माहित नाही..
त्याला बर्‍याचदा शी ला त्रास होतो म्हणून १ मनुका पाण्यात भिजवून देते मी रोज. >>> एकच मनुक? काळ्या मनुका ८-१० तरी द्यायला हव्यात अस वाटत.. Happy मनी लहानपणी शी ला जायचा कंटाळा करायची तर तिला मी महिन्यातून एकदा तरी गरम चहात चमचाभर एरंडेल देत असे. तिचा कोठा जड असल्यामूळे नरम शी २-३ व्हायची दुसर्‍या दिवशी. अर्थात ती तीनची पूर्ण झाल्यानंतरची गोष्ट आहे ही.. आयामच्या बाबतीत डॉक्टरांना विचारून रेचक देऊ शकतेस.. कारण कडक शी झाली की घाबरून मुलं दाबून ठेवतात असा माझा अनुभव आहे.. Sad

अग आता बरय ते शी चं... १ किंवा २ च देते मी मनुका. पण तरी उपयोग होतो. पण काल नवरा म्हणत होता की आधीच नाकात खपली आलिये, मनुकामुळे अजुन उष्णता वाढेल. नको देवूस सध्या. त्याच्या खिरीत अन शिर्‍यात किसमिस पण नको घालुस. म्हणुन म्हटलं...
बाकी आता त्याला तो शी चा त्रास नाही होत... सलग २-३ दिवस मनुका नाही दिल्या तर मात्र हमखास होतो त्रास.

Pages