परतोनि पाहे (परदेशातून परतलेल्या, परतू इच्छिणा-यांचे अनुभव)

Submitted by रैना on 5 January, 2010 - 01:52

इथे खालील मुद्यांवर चर्चा / अनुभव अपेक्षीत आहे. शक्यतो उपदेशापेक्षा (काय करायला हवं वगैरेंचे डोस) अनुभव लिहा. आपण विचारांती काय निर्णय घेतला, का घेतला आणि तो कसा निभावतो आहोत.

- तुम्ही भारतात का परतलात, परतावसं का वाटलं (नक्की प्राण का तळमळला?) परतल्यावर आता कसं वाटतय ? (व्यक्तिगत बरेवाईट अनुभव, ठेचा, विचारमंथन).
-- तळ्यात मळ्यात- परतावसं वाटतय, हिम्मत होत नाही? दोलायमान परिस्थिती आहे? नवराबायकोपैकी एक अत्यंत नाखुष आहे ?
- परततानाची चेकलिस्ट ( काय करावे आणि करु नये)
- केल्याने देशाटन परदेशात काय मिळवलं, काय गमावलं
-भारतातील संधी, नोकरी, व्यवसाय, आर्थिक परिस्थितीचा आढावा (अनुभव), वर्क लाईफ बॅलन्स (व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याला देता येणारा वेळ)
- मुलं आणि तदनुषंगिक शेकडो गोष्टी ( शाळा, शैक्षणिक पद्धत, पाल्याचा सर्वांगीण विकास, भाषांचा सराव, गणिताचा सराव, वातावरणाचा सराव)
- वृद्ध होत चाललेल्या मातापित्यांची जवाबदारी. पुन्हा एकत्र आल्यावरचे अनुभव. त्यांच्या दृष्टीकोनातून तुमचे परदेशगमन आणि पुनरागमन.
- समाजाचे देणे
- दोहोंचा अनुभव घेतल्यावर आता काय करायचा मानस आहे ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आर्थिक नियोजन असणे गरजेचे आहेच .. अगदी मान्य.. आम्ही अगदी योग्य वेळी घर घेतल, आज त्या घराची किंमत दुपटीहुन जास्त आहे. आज घ्यायला जमल नसत बहुदा.

पण आपण आपल्या गरजा जितक्या वाढवु ना तितक्या त्या वाढतच जातात आणि मग पैसे कधीच पुरत नाहीत.
सायो, १ लाख पण पुरणार नाहीत हे जरा अतिशयोक्तिच विधान आहे. कारण मी आत्तच ६ महिने देशात राहुन आल्ये. महागाई वाढली आहेच पण आपल कस होणार अशी वेळ एकदाही आली नाही. आमचा महिन्याचा जास्तितजास्त २५ हजार खर्च होत होता.

पैसे पुरणार नाहित असा विचार करत राहिलात तर हे चक्र कधीच संपणार नाही.

इथली आणि तिथली तुलना करत राहीलो तर कुठेच समाधान मिळणार नाही. वैयक्तिक पसंतीने जिथे राहू तिथल्या फक्त जमेच्या गोष्टींचा विचार करायचा. सर्व काळाचा महीमा आहे. द्विधा मनस्थिती, समाज आणि संस्कृतीची नाळ ह्या गोष्टी स्थलांतरीत पीढीपुरता मर्यादीत आहेत. पुढची पीढी जिथे जन्मते त्या मातीत आपोआप रुजते. बाकी मनुष्यस्वभाव सर्वत्र सारखाच.

वेल सेड अमृता,
मी २००३ साली योगायोगाने ६ महिने पुण्यात होतो, त्याच वेळेस घर घेतले.
खरोखर असे वाटते की त्यावेळेस जमले नसते तर नंतर जबरद्स्त दणका बसला असता.
कारण नंतर भाव एवढे वाढले की परदेशात राहून देखील घर घेणे सोपे वाटेनासे झाले.
दोघेही नोकरी करत असतील तर कदाचित सोपे जाऊ शकते.
आता आमच्या घराची किंमतही तिप्पट झाली आहे.
देशातल्या खर्चाचे म्हणाल तर (निदान पुण्यात तरी),
मध्यमवर्गीय चौकोनी कुटुंबाचा महिन्याचा खर्च साधारण २५~३० ह. पर्यंत येतो.
यामधे मोठे खर्च (वैद्यकीय, उच्च शिक्षण, देशांतर्गत मोठे प्रवास) याचा समावेश नाहीये.

मी अमेरिकेत १० वर्ष व माझा नवरा १६ वर्ष होतो.मागच्या १.५ वर्षापासून भारतात. त्याने पीएचडी केली व नोकरी तिथेच. भारतातील नोकरीचा अनुभव नाही. मुलांची वय- ६ आनी ४
- भारतात जायचे हे पहील्यापासून ठरवले होते. मुलं मुळातच प्रचंड लाजरी असल्याने शक्यतो शाळेची सुरवात भारतातच करावी असे ठरवले होते. नवर्‍याला नोकरी मिळाल्याशिवाय जायचे नाही ह्यावर मी ठाम होते. संशोधन क्षेत्रात असल्याने नवर्‍याला नोकरी मिळायला जरा त्रासच झाला. आमचा x + 1 प्रकार होतो काय अशी भिती वाटलेली.
-शासकीय संस्थांमध्ये / आर्मी रिसर्च संस्थांमध्ये नोकरी मिळणे फारच कठीण आहे व त्या मानाने पगार खुपच कमी.
-मला वाटते आपल्या आवडत्या क्षेत्रात जॉब मिळाला नाही तर परत येउन इथे स्थिरस्थावर होणे खुप कठीण होउ शकते.
-त्याच प्रमाणे ज्या ठीकाणी जाल, तिथे नवरा-बायको ह्या दोघांनाही संधी उपलब्ध असली पाहीजे.
-नवर MNC मध्ये नोकरी घेउन परतला.
-वर्क कल्चर वेगळे आहे पण अगदीच काही काम करता येणारच नाही असेही नाही आहे.

-परतण्याचे नक्की झाल्यावर मुलांच्या शाळेचे व जागेचे नक्की केले.
वर सांगितलेल्या r2i साईटचा फार उपयोग झाला.
-शाळा नवर्‍याच्या ऑफिसच्या जवळ शोधली. सर्वात अप्रतिम चांगली शाळा वैगरेच्या भानगडीत पडलो नाही.
-जागा थोडे भाडे जास्त गेले तरी चालेल पण एका मोठ्या अपार्ट्मेंट कॉंप्लेक्स मध्ये घेतली जेणेकरुन मुलांना खेळायचा भरपुर जागा असेल व सोबत मिळेल. मला पण त्यामुळे खुप मैत्रिणी मिळाल्या. आणी मुख्य म्हणजे जागा शाळेच्या जवळ घेतली.
-ट्रावल टाईम तशी महत्वाची बाब आहे. अर्थात कुठे रहाता ह्यावर अवलंबून आहे पण ट्राफीक मध्ये खुप वेळ जाऊ शकतो.

-आम्ही आई-वडील ज्या शहरात आहेत तिथे परतु शकलो नाही. पण तरीही दोन्ही आजी-आजोबा वर्षातून ३-४ वेळा येऊन गेले.
-मी अमेरिकेत असताना १० वरषात माझे बाबा फक्त १दा आले होते. त्यांना तिथे अजिबात करमायचे नाही.आता इथे ४ तरी फेर्‍या मारल्या.
-सासु-सासरे पण येतात आठवडा-२ आठवडे रहातात व पुन्हा जातात व आपापल्या व्यापात गुंततात. अमेरिकेत येताना त्यांना इकडच्या जागेची-बाकी गोष्टींची व्यावस्था लाउन यावे लागायचे. त्यासाठी कोणावरतरी अवलंबून रहावे लागायचे.परत अमेरिकेत काहीही करायला आमच्यावर अवलंबून रहावे लागायचे. त्यामुळे एखादा महीना येऊन झाल्यावर त्यांची चिड्चिड व्हायची. अगदी नंतर नंतर बाहेर पडायला पण कंटाळायचे. फ़क्त नातवंडांच्या ओढीसाठी ते यायचे व रहायचे.
-खरं म्हणजे आई काय व सासू काय, अमेरिकेत आल्यावर घरकामाच्या बाईच्याच भूमिकेत शिरायच्या.
ऑफिसमधून येईपर्यंत स्वयंपाक वैगरे सर्व आटपलेले असायचे. आपणही कोणाची आई आली आहे असे कळल्यावर्,मग काय मज्जाच आहे तुझी असेच म्हणायचो. आता स्वयंपाकी लाऊन ही तरी टोचणी मी कमी करते.

-सर्वात जिव्हाळयाचा विषय म्हणजे मुलांचा. शाळा आता आपल्या वेळेसारखा राहील्या नाहीत. वर्गात २५ मुलं.(शाळेत माझा रोल नं ७२ होता व नंतरही काही मुलं). शाळेत परिक्षा नाही पण असेस्मेंट होत रहाते. पेपरच सोडवून घेतात पण ती कधी होते ते कधी सांगत नाही जेणेकरुन पालक मुलांकडून रटवून घेणार नाहीत. प्रत्येक क्वार्टरला PTM. रोज थोडा थोडा घरचा अभ्यास. अर्थात हे शाळेवरपण अवलंबून आहे.ऑलंपियाड / स्पेलींग बी अशा परिक्षांना शाळेबाहेर होत रहातात.
-आपण चढाओढ म्हणतो. पण ती पण पालकच निर्माण करतात. मेडिकल्-इंजिनीयरिंग जर देशाबाहेर केले तर भरपूर पैसे भरावे लागतात आणि देशात चढाओढीत पार न पडून करावे लागले तर पैसे भरुन करता येते.
-खरं म्हणजे पालकांनी मुलांना हव्या त्या क्षेत्रात जायला दिले तर त्यांना कुठल्याही चढाओढीचा सामना कदाचित करावाही लागणार नाही.
-आज माझी मुलं इथे सरावली. बरेच मित्रमंडळी झालेत. खेळायला गेल्यावर ७-७.३० पर्यंत कधी कधी घरीपण उगवत नाहीत.

आम्ही आलो ते कायमचे असे ठरवूनच आलो. आतापर्यंत निर्णय बरोबर वाटतो. वर म्हटल्याप्रमाणे प्रत्येकाचे वेरिएबल्स आणि ईक्वेशन वेगळी असतात व त्यांचे सोलुशन प्रत्येकाच्या सिचुएशनप्रमाणे बदलते.
आमचे अमेरिकेतले वास्तव्य काही वाईट नव्हते. पण मुलांना आजी-आजोबांचा सहवास जास्त लाभावा. फक्त आजीआजोबाच नव्हे तर बाकीच्या नातेवाईकांची खरच ओळख असावी. भावंडात खेळता यावे. आणि अश्या दुसर्‍या अनेक गोष्टींसाठी परतलो. काही गोष्टींसाठी अ‍ॅडजेस्ट्मेंट करावी लागते पण ती तर अमेरिकेत गेल्यावर पण कशासाठीतरी केलीच होती.
इथे आल्यावर आपल्यासारखे परत आलेले बरेच असतात. त्यामुळे फारकाही जगावेगळे आपण करत नाही असे पण जाणवते Happy
बरेच काही लिहीण्यासारखे आहे पण नंतर कधीतरी.
जाता जाता. हा भारत पूर्वीचा नाही राहीला. पण सर्वच बदल काही वाईट नाही आहे. आणि आपल्या ओळखीची बेटं भेटत रहातातच व आपली माणसं ज्यांच्या ओढीने आपण मुख्यतः परत येतो. ती तर तिच असतात. Happy

पण सर्वच बदल काही वाईट नाही आहे. आणि आपल्या ओळखीची बेटं भेटत रहातातच व आपली माणसं ज्यांच्या ओढीने आपण मुख्यतः परत येतो. ती तर तिच असतात. >>>
किती छान लिहिलं आहेस अदिती Happy

वर मंदारने, अमृताने लिहिलेले खर्च रीयलिस्टीक. घराच्या कर्जाचे हप्ते/ घराचे भाडे हा सर्वात मेजर खर्च आहे देशात सध्या.

बाकी, मी परतलेलीच आहे, त्यामुळे काही लिहित नाही Proud

पण वर कोणीतरी लिहिलेल्या दोन गोष्टी पटल्या-
१) यायचं किंवा यायचं नाही हेच दोन पर्याय असतात. द्वंद्व सुरू होतं ते मुळात आपलं मन कोणा एका पर्यायाकडे झुकल्यामुळे आणि तो फारसा न पटल्यामुळे.
२) 'मुलांचं कसं होईल' ही भीती सर्वथा चूक आहे. भारतात परत या, वा भारतामधून परदेशी जा- मुलं सहज अ‍ॅडजस्ट करतात. जी काही भीती असते ती मोठ्यांच्या मनात!

सगळ्यांना इप्सित स्थळी रहायला/ परतायला मिळो ही सदिच्छा Happy

सुड्डु ह्यांचा लेख अश्याच विषयावर होता हे मला आजच खालील लिंक मूळे कळले, अर्थात महेश ह्यांनी वर आणला तो बीबी.
सुड्डूंचा लेख त्यांच्या परवानगी शिवाय ह्याच हेतुने देतेय की त्यांचा अनुभव चाण्गला ठरेल,
http://maayboli.com/node/3072?page=2

सुड्डु तुमची माफी ह्यासाठी.

आदिती,

छान लिहिलयं.
>>हा भारत पूर्वीचा नाही राहीला. पण सर्वच बदल काही वाईट नाही आहे. आणि आपल्या ओळखीची बेटं भेटत रहातातच व आपली माणसं ज्यांच्या ओढीने आपण मुख्यतः परत येतो. ती तर तिच असतात>> हे खरच पटलं.
आणि परत येण्याचा विचार करणारयानी ती माणसं आहेत तोपर्यंत ठरवाव कारण काळ कोणासाठी थांबत नाही.

माझा अनुभव परत जाणार्‍याचा अनुभव होईल की नाही हे माहित नाही पण तरिही मांडतो Happy

मी १९९९-२००० दोन वर्षे अमेरिकेत होतो पण काही वैयक्तिक कारणांनी परत आलो... नंतर २००४ मध्ये एक वर्षासाठी परत अमेरिकेत कुटुंबासोबत होतो...
पण परत यायचे हे पहिल्यापासून ठरले होते... आणि एक वर्ष झाल्यावर प्रोजेक्ट एक्स्टेंड होत होते तरी ते नाकारून परत आलो... दोन्ही वेळा भारतीय कंपनीतून तिकडे गेलो होतो त्यामुळे इकडे येउन नोकरी शोधणे वगैरे त्रास काहीच झाला नाही...

WLB : माझ्यामते हे बरेचसे तुम्ही काय काम करता आणि कुठल्या प्रोजेक्ट्वर आहात त्यावर अवलंबून आहे... मला अमेरिकेत असताना भारतापेक्षा जास्त काम होते. अर्थात भारत काय किंवा अमेरिका काय जर तुम्हाला करीअर मध्ये शिडी चढायची असेल तर जास्ती परिश्रमांना पर्याय नाही असे वाटते... बहुतेक सर्व कंपन्यांमध्ये रेटींग हे रिलेटीव असते .. म्हणजे एखादा जर ८ तास जीव झोकून १००% काम करत असेल तर तो solid contributer ठरतो पण जर त्याच्यापेक्षा जास्ती १४०% काम करणारी (त्याच क्वालीटीची) लोक असतील तर अर्थातच कंपनी त्यांना चांगले रेटींग व जास्त इन्क्रिमेंट्स देते .. कितिही बरेवाईट असले तरी ही एक रेस आहे आणि प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर ठरवायचे आहे की त्याला/तिला नक्की काय मिळावायचे आहे... वरवरची पोस्ट, जास्ती पगार, स्टेटस का टिपिकल ९ ते ६ नोकरीचे तास... ह्यासाठी अमेरिकाही अपवाद नाही असे माझे निरिक्षण... माझे कित्येक अमेरिकेतले सहकारी ८ तासांपेक्षा जास्ती काम करताना मी रोज पहातो
(अमेरिकन कंपनी मधले सुद्धा).. अमेरिकेत घरून काम करायचा पर्याय चांगला आहे... भारतात हे फारसे रुळलेले नाही पण हळूहळू हा पर्याय कंपन्या द्यायला लागल्या आहेत.. निदान माझ्या कंपनीत तरी मी मला पाहिजे तेव्हा ऑफिसला जाऊ शकतो... पाहिजे तेव्हा घरून काम करू शकतो... जायची यायची वेळ सुद्दा बांधिल नाही.. ह्याचा दुसरा परीणाम म्हणजे अगदी सकाळी ६ वाजता किंवा रात्री १० वाजता सुद्धा मला कॉल्स असतात पण माझे अमेरिकेतील सहकारी सुद्धा ऑड आवर्स ना कॉल्स घेतातच की... माझी अमेरिकन मॅनेजर कायमच (तिच्या) सकाळी सहापासून ऑन्लाईन असते Happy

मला व्यक्तिश: अमेरिकेत रहायला आवडत नाही असे नाही. (थोड्या दिवसांसाठी तर नक्की) तिथले दैनदिन जीवन इकडच्यापेक्षा सुकर आहे पण इथे आधी वर बर्याच जणांनि लिहिल्याप्रमाणे non-negotiable गोष्टींचे पारडे (जसे आई-वडील) तुमच्या बाबतीत जड असेल तर परत आलेले चांगले... माझ्या आईवडीलांना मी परत आलेले नक्कीच आवडले आणि मी इकडे नसताना त्यांची जी मानसिक अवस्था होती ती परत आल्यावर नक्कीच सुधारली असे वाटते...

घर : भारतात (विशेषतः) पुणे मुंबईत चांगल्या लोकॅलिटीत घर घेणे अवघड होत चालले आहे. आधी घर घेतले नसेल तर हा मुद्दा महत्वाचा ठरू शकतो... मी आल्यावर घेतले.. पण वेळेत घेतले असे वाटते

शिक्षण : व्यक्तिशः लोक इथे जरा ह्याचा जास्ती बाऊ करत आहेत असे वाटते... भारतात मुलांवर थोडे लोड जास्ती असेलही पण त्यास बहुतांशी पालकच जबाबदार आहेत असे वाटते... ह्याची दुसरी बाजू अशी की जोपर्यंत तुम्ही स्वतःला स्ट्रेच करत नाही तोपर्यंत किती ताण झेलायची तयारी आहे तुमच्या मनाची हे कळत नाही.. हे थोडेसे तसेच आहे... जोपर्यंत तुम्ही मुलांवर थोडासा ताण देत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याच्या कपॅबिलिटिज कश्या कळणार? तेव्हा जीवनात थोडा ताण हवाच... आणि आपल्या मुलांना तो किती द्यायचा हे पालकांनी ठरवावे असे वाटते..

शेवटी शाळा-कॉलेजातील शिक्षणाने फार फरक पडतो असे मला वाटत नाही.. प्रत्येक जण आपल्या स्वकर्तूत्वानेच वर येतो... तुमचे सुरुवातीचे शिक्षण जर चांगल्या शाळा, कॉलेजमध्ये झाले नसेल तर त्या त्रूटी नंतर नक्कीच भरून काढता येतात तेव्हा शाळा, कॉलेज खराब असेल तर त्याने फार काही फरक पडत नाही असे माझे वैयक्तिक मत आहे...

तुम्हाला परत आल्या आल्या इथल्या गैरसोयींचा त्रास होउ शकतो.. जसे भारनियमन, वाहतूक, प्रदूषण पण ६ महिन्यात सवय होऊन जाते... जसे इकडून तिकडे गेल्यावर काहींना पोलन अ‍ॅलर्जी, गोठवणारी थंडी ह्याचा सुरुवातीला त्रास होतो तसेच आहे हे...

बाकी खर्चाविषयी मंदार ने लिहिले आहे ते पटले... मुळात तुमची जीवनशैली मध्यमवर्गीय असेल तर Rs ३५००० भागते असे वाटते

Rs ५०००० तुम्ही अगदी चैनीत राहू शकता (पुण्यात.. बंगलोरसाठी साधारण हाच आकडा दीडपट करावा) जसे महिन्यातून ४ वेळा हॉटेलींग... २-३ मूव्हीज... मिड्साईझ गाडी ड्रायव्हरसकट इत्यादी... अर्थात पैसा काय जेव्हा उधळाल तेवढा लागतोच... तुम्ही सारखे ५-स्टार मध्ये जेवायला जाणार असाल... तुम्हाला मर्सिडीज वगैरे मधून हिंडायचे असेल तर जास्ती पैसा लागणारच Happy मला इथली एक्-दोन कुटंबे माहिती आहेत ज्यांना होम्-लोन वगैरे नसूनही महिन्याला ५००००-६०००० मध्ये त्यांचे भागत नाही Sad असे अपवाद सगळीकडेच असतात आणि होमलोन सकट २५००० मध्ये ज्यांचे भागते अशीही कुटूंबे माहिती आहेत Happy

मुले : मुलांना कुठेही रुळायला फार त्रास होतो असे वाटत नाही... मुले टिन्-एजची व्ह्यायच्या आधी परत आलात तर माझ्या पहाण्यात तरी असा एकही अनुभव नाही की मुले रुळलेली नाहीत... टिन्-एज मधल्या मुलांना मात्र खरेच त्रास होतो हे एक्-दोन कुटुंबात बघितले आहे. इकडून तिकडे गेलेली मुले सुद्धा चांगली रुळतात असे २-३ अनुभव पाहिले आहेतच (एक अमृताचा आपल्यासमोरच आहे Happy
आमच्या ओळखीचे एक कुटूंब होते आम्ही देट्रॉईट्ला असताना.. ते मुलगा २रीत असताना अमेरिकेत गेले... सुरुवातीला मुलाला खूप त्रास झाला त्याला शाळेत इतरांचे अक्सेंट कळायचे नाहीत, पुण्यात तो मराठी शाळेत शिकायचा त्यामुळे इंग्लिश कच्चे होते... मुलाला सवय व्हावी म्हणून त्य कुटुंबाने घरातही इंग्रजी बोलायला सुरुवात केली ... मुलगा काही महिन्यातच रुळला आणि व्यवस्थित अक्सेंट्सकट बोलायला पण लागला... शेवटी वर्षभरात अशी वेळ आली की त्याच आइ-बाबांनी घरात त्याला मराठीतच बोलायचे असे बंधन घातले... मराठीची सवय जाऊ नये म्हणून Happy तात्पर्य काय मुले कुठेही लगेच रुळतात.. Happy

बहुतेक सगळे लिहिलेय तेव्हा थांबतो आता....

एक प्रेमाचा सल्ला : पूनमने लिहिल्याप्रमाणे तुमचे परत यायचे नक्की असले तर व्यवस्थित प्लॅन करा आणि परत या नाहीतर तिकडेच काहीही सल न ठेवता तिकडचे असल्याप्रमाणेच रहा... द्विधा मनस्थिती असली की त्रास हा होणार...

तळटीप : हे माझे वैयक्तिक अनुभव आणि मते आहेत... कुणाचीही मते खोडून काढायचा ह्यात उद्देश नाही.. प्रत्येक जण आपापल्या जागी बरोबर असू शकतो...

अग बाई तुला नी मला लाख मिळतात ग पण पूनम वैनीला नाही मिळत आहे. परतोनी पाहे च्या लिस्ट वर लिहिलय बघ तिने Wink एकदा जा तिच्याकडे नि दाखव सगळी दुकान Happy

ह्म्म्म्म्म.. मलाही भारताबाहेर पडून जवळपास २१,२२ वर्षं झालीत्..पण सतत साऊथ ईस्ट एशिया मधे राहिल्याने भारताची ओढ ,फक्त आईवडिल्,बहीण वगैरेंना भेटण्यापुरती मर्यादित होती.. इकडलं कल्चर आपल्याशी थोडं बहुत मिळतं जुळतंय म्हणून असेल कदाचित.. पण आता आम्ही कधी कधी चर्चा करतो जेन्व्हा फायनली रिटायर व्हायची वेळ येईल तेन्व्हा आम्ही एम पी मधल्या आमच्या शांत गावी जाऊन राहू बहुतेक.. मुंबई,पुणं आऊट आहे आमच्या साठी

अदिती, मिल्या- पोस्ट खूप आवडल्या.

मंदार/महेश /मिल्या/ अमृता- खर्चाबाबत सहमत. मुंबईसाठी या खर्चाच्या अंदाजाला दीडपट करा.
घर = घरघर. आणि मुंबईत घर घेण्यापेक्षा तोक्यो, न्युजर्सीत घेणे स्वस्त पडते असे ब-याच आकडेमोडीनंतरचे मत.

वर्षुशी सहमत- परतोनि मुंबईत (कुठलाच पाया नसताना म्हणजे घर वगैरे) येण्यापेक्षा जरुर दुस-या शहराचा विचार करायला हरकत नसावी.

हा बीबी पहिल्यापासून मनःपूर्वक वाचतो आहे. रैना, उपास, अदिती, महेश, मिल्या आणि इतर अनेकांच्या पोस्ट संतुलित अशा वाटल्या. परदेशात राहणार्‍यांचे / परत येऊ इच्छिणार्‍यांचे मनोव्यापार या निमित्ताने समजले. (यातल्या काही गोष्टी इथे राहणार्‍यांच्या गावीही नसतात).

इथल्या लिविंग कॉस्ट बद्दल मिल्याचे आकडे बघितले. या आकड्यांमध्ये होम लोनचाही ईएमआय असावा, असे वाटते. यात एक मुद्दा म्हणजे, (उदाहरणार्थ)मिल्याने २००४ किंवा २००५ मध्ये घेतलेल्या घरासारखे घर घ्यायला आता म्हणजे २०१० मध्ये साधारणतः दुप्पट ते अडीचपट पैसे लागतील. कर्ज काढून घर घ्यायचे असल्यास ईएमआयदेखील अंदाजे दुप्पट किंवा जास्त. (अर्थातच घर आधीच असेल, किंवा रोख रक्कम मोजून नव्याने घर घ्यायचे असेल, तर हा मुद्दा येणार नाही).

मुंबईत घर घेण्यापेक्षा तोक्यो, न्युजर्सीत घेणे स्वस्त पडते >> हे खरे असावे. माझा चुलतभाऊ गेली ५ वर्षे शांघाय मध्ये आहे. २००८ मध्ये त्याने तिथे घर घेतले. आता मागल्या महिन्यात पुण्यातही घर घ्यायच्या तयारीने तो आला होता. एनआयबीएम च्या आसपासच्या घरांच्या किंमती शांघायच्या तेवढ्याच आकाराच्या घरांच्या अंदाजे दीड्पट बघून तो उडालाच. आणि शिवाय तिथल्या घरांमधल्या अत्याधुनिक सुखसोयी (उदा. पर्सनल लिफ्ट) इतक्या किंमती असूनही अजून तरी इथे नाहीतच. मुंबई, दिल्ली वगैरेंची अवस्था थोडी आणखीच अवघड असेल. (भावाने शेवटी नाशकात घर घेतले).

तीच गोष्ट कार, (व्यवसाय करणार असाल तर) शॉप / ऑफिस याबाबत. या सार्‍यांपैकी काहीच लायबिलीटीज नसतील तर आर्थिक गणित बर्‍यापैकी सोपे होईल. अन मग आपला गाव खरेच आपला वाटेल. Happy

खरे सांगायचे तर कायम त्याच ठिकाणी त्याच घरात राहणार असाल तरच 'घरघर' लावून घ्यावी. भविष्यात पुन्हा दुसरीकडे मूव्ह व्हायचे असेल तर घर विकत घेऊच नये.

कारण आता पुण्यात ३ बेड. फ्लॅटची किंमत ८० लाखच्या आसपास आहे असे ऐकले. आता परत किंमती दुप्पट्/तिप्पट होतील असे वाटत नाही. ८० लाख व्याजी लावलेत तर त्या घराचे भाडे जितके मिळेल त्यापेक्षा नक्कीच जास्त रक्कम मिळेल.

परदेशात बरेचवेळा घर भाड्याने दिले तर साधारण भाड्याइतकाच अथवा त्यापेक्षा थोडा जास्त/कमी ईएमआय असू शकतो. आपल्याकडे हे अजून झालेले नाही.

बाकी पुणे-मुंबई इथेच राहणे जरुरी नाही हे ही खरे.

भाड्यानेच रहावे विशेषतः पुण्यामुंबईत तरी ह्या मतावर मी आता बरीचशी ओक्के झालेली आहे.
मुंबईत विशेषतः पार्ल्यात साधारण १००० - १२०० पर्यंतच्या घराची किंमत दीड पावणेदोन कोटीच्या घरात जातेय. म्हणजे महिन्याला दीड लाखाचा हप्ता. आणायचे कुठून दर महिन्याला... आणि हा स्ट्रेस साधारण वीस वर्ष बाळगायचा.. त्यापेक्षा तेवढाच फ्लॅट ४०-५० हजारापर्यंत भाड्याने मिळतो. दिड लाख कुठे आणि ४०-५० हजार कुठे... (ह्या सगळ्या पार्ले इस्टच्या किमती...)
दर दोन तीन वर्षांनी बदलावं घर.. नव्याने सजवावं.. वाटलं आता परिस्थिती बरी नसणारे तर लहान घ्यावं पुढचं घर.. हे बरे..
आमच्यासारख्या अनिश्चित व्यवसायातल्या लोकांनी तर हेच करावे!

असो विषयांतराबद्दल क्षमस्व!!

कारण आता पुण्यात ३ बेड. फ्लॅटची किंमत ८० लाखच्या आसपास आहे असे ऐकले.
>> बापरे! काय सांगतेयस????? अग, थोडसं आऊटस्कर्टस मध्ये घेतलं तर उत्तम ठिकाणी उत्तम ३बेड च घर ४५ लाखापर्यंत मिळायला हरकत नाही (which is still high- as per me)
मी २००५ साली पुण्यात फ्लॅट बघत होते. तेव्हापासून आत्तापर्यंतचा फरक पाहिला तर फेफरं येईल असं वाटतं!
दीड पावणेदोन कोटीला फ्लॅट!४०-५० हजारापर्यंत भाड्याने मिळतो
>> मुंबईच्या बाहेर पडल्याचा आज आनंद होतोय!!! ५०००० रु भाडं आत्ता देऊन म्हातारपणी खायचं काय!

पण जेव्हा तुम्ही आऊटस्कर्टस म्हणता तेव्हा कोणत्या बाजलांब? किती लांब ? तिकडे जाण्यायेण्याचा खर्च , इ. गोष्टी पण मॅटर करतात. मला नाही वाटत ३ बीएचके ४५ पर्यंत मिळेल. जास्तच आहेत रेटस.

अरे महेश, मी बावधन, वारजे आणि पिंपळे सौदागर अरिया बद्दल बोलतेय.
बावधन आत जरा 'गंडल्यासारखं' वाटू शकतं - पण आदित्य शगून आणि त्याच्या आसपासचा एरिया छान आहे (असं मला वाटत :))
In fact आदित्य शगुन स्कीम हाफिज कॉन्ट्रॅक्टरनं डिझाईन केली आहे...
वारजे आणि बावधन मधून कोथरुड ला पोहोचायला १० मिनिटं लागतात
आणि हिंजवडीला पोचायला २० मिनिट (बाईकवरून)

अमृता, मी महिन्याला १ लाख खर्च धरुन चालावा हे लिहिलेलं वर कुठेतरी. त्यात अतिशयोक्ती आहे थोडी फार पण खूपही नाही. नीधप म्हणाली त्याप्रमाणे जर का वेस्टर्न मुंबईत फ्लॅट भाड्याने घ्यायचा म्हटला तर ४०,५० हजार सहज जातील त्यात. परत गाडी, ड्रायव्हर, बाकीचे खर्च शाळांच्या फिया हे सगळं जमेला धरलं तर लाखभरही कुठेच उडतील.

नानबा, वर नीधप म्हणाली तसेच जागांचे रेटस कायच्या काय वाढलेत मुंबईत. पार्ला, सांताक्रुज या सारख्या ठीकाणी रहाणं म्हणजे स्वप्नच झालंय.

आंतर्जालविषयक कयद्यांबद्दल सचिंत होऊन मी इथले लिखाण उडवले आहे. उगाच मायबोलीवर काही गैर परिणाम होऊ नयेत म्हणून.

४०-५० हजार नुसत्या भाड्यात घालवायचे ? विचारानेच कससं होतय Uhoh (तसे इथे आम्ही घालतोच आहोत दर महिन्याला अक्कलखाती :()

Pages