परतोनि पाहे (परदेशातून परतलेल्या, परतू इच्छिणा-यांचे अनुभव)

Submitted by रैना on 5 January, 2010 - 01:52

इथे खालील मुद्यांवर चर्चा / अनुभव अपेक्षीत आहे. शक्यतो उपदेशापेक्षा (काय करायला हवं वगैरेंचे डोस) अनुभव लिहा. आपण विचारांती काय निर्णय घेतला, का घेतला आणि तो कसा निभावतो आहोत.

- तुम्ही भारतात का परतलात, परतावसं का वाटलं (नक्की प्राण का तळमळला?) परतल्यावर आता कसं वाटतय ? (व्यक्तिगत बरेवाईट अनुभव, ठेचा, विचारमंथन).
-- तळ्यात मळ्यात- परतावसं वाटतय, हिम्मत होत नाही? दोलायमान परिस्थिती आहे? नवराबायकोपैकी एक अत्यंत नाखुष आहे ?
- परततानाची चेकलिस्ट ( काय करावे आणि करु नये)
- केल्याने देशाटन परदेशात काय मिळवलं, काय गमावलं
-भारतातील संधी, नोकरी, व्यवसाय, आर्थिक परिस्थितीचा आढावा (अनुभव), वर्क लाईफ बॅलन्स (व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याला देता येणारा वेळ)
- मुलं आणि तदनुषंगिक शेकडो गोष्टी ( शाळा, शैक्षणिक पद्धत, पाल्याचा सर्वांगीण विकास, भाषांचा सराव, गणिताचा सराव, वातावरणाचा सराव)
- वृद्ध होत चाललेल्या मातापित्यांची जवाबदारी. पुन्हा एकत्र आल्यावरचे अनुभव. त्यांच्या दृष्टीकोनातून तुमचे परदेशगमन आणि पुनरागमन.
- समाजाचे देणे
- दोहोंचा अनुभव घेतल्यावर आता काय करायचा मानस आहे ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

झक्कीबुवा,
बास आता ते नेहेमीचे रटाळ पुराण... बाकी गेले चार पानं ना घर का ना घाटका वाल्यांच्या अनुभवांन्नी जास्त भरली आहेत.

आंतर्जालविषयक कयद्यांबद्दल सचिंत होऊन मी इथले लिखाण उडवले आहे. उगाच मायबोलीवर काही गैर परिणाम होऊ नयेत म्हणून.

छान लिहिलय बर्‍याच जणांनी. सशल, केदार, पराग, फचिन आणि इतर काहीजणांनी दोन्हीही बाजू चांगल्या मांडल्या आहेत. इथल्या प्रत्येकजणाच्या मनात हे द्वंद्व सुरु असतेच.
माझे म्हणाल तर मला अमेरिकेत येऊन ७ वर्षं झाली, अजून २-३ वर्षे राहणार आहे. पण परत जायच्या निर्णयावर मी ठाम आहे, आणि लकीली नवरा पण त्याच्या फेवरमध्येच आहे. प्रोज आणि कॉन्स बद्दल सगळ्यांनी डिटेलमध्ये चर्चा केली आहे. ह्यातला पॉईंट न पॉईंट आम्हालाही लागू पडतो. माझा मुलगा २ वर्षांचा आहे, त्यामुळे सो कॉल्ड "कटऑफ टाईम" पासून आम्ही थोडे दूर आहोत. वर कोणीतरी सिटिझनशीप बद्दल बोललं. तो ही पॉईंट आम्ही कन्सिडर करतोय. भविष्यात मुलाला आणि आम्हाला कधी इथे परत यावे वाटले तर तो मार्ग खुला असावा म्हणून.
आता जाण्याचं एक आणि एकच कारण आहे ते म्हणजे दोघांचे आई वडील. कोणीही आम्हाला या म्हणून प्रेशर करत नाही आहे, त्यांच्या तब्ब्येतीही सध्या चांगल्या आहेत. पण म्हणून आम्हाला ते अजून वयस्कर होऊन त्यांना आमची गरज लागेपर्यंत थांबायचे नाही आहे. तिथे कसे काय अ‍ॅडजस्ट होऊ ह्या बर्‍याचजणांच्या मुद्दयाचे मला आश्चर्य वाटते. मी कुठे काही वाळवंटात किंवा जंगलात रहायला जाणार नाही आहे किंवा अगदी अनार्की असलेल्या अनोळखी देशात पण नाही. मी त्याच देशात जाणार आहे जिथे मी आयुष्यची २५ वर्षे काढ्ली आहेत. हे अगदी मान्य आहे की प्रगत देशांमध्ये राहून तुम्हाला चांगल्या, कम्फर्टेबल आयुष्याची ओळख होते, सवय लागते. पण मला असे नाही वाटत की ह्यामुळे आता मी भारतात जाऊन राहूच शकत नाही. आपण वरदाची अर्किऑलोजिस्टची डायरी वाचतो, वाहवा करतो की किती प्रतिकूल परिस्थितीत ती काम करते, आणि तिथेच थांबतो. पण मला मात्र तिच्या डायरीने इन्स्पिरेशन मिळते. खरं तर ह्याच प्रगत देशातली काही लोकसुद्धा जगाच्या पाठीवर कुठे कुठे जाऊन काम करतात, राहतात. त्या उदाहरणांचा आपण फारसा विचार करत नाही. असो... विषयांतराबद्दल क्षमस्व.
मला वाटतं माझ्या मुलाने (किंवा मुलांनी) त्यांच्या आजी आजोबांबरोबर, इतर भावंडांबरोबर वेळ घालवावा, आपल्या सण, संस्कॄतीला जवळून पाहावे. पुढे १२-१५ वर्षांनी त्यांना (किंवा आम्हालाही) परत यावे वाटले तर तो मार्ग नेहेमी उघडा असेलच. आमच्या दोघांच्याही आई वडिलांना नातवंडाची किती आठवण येते हे नेहेमीच दिसते, पण आठवण काढण्याव्यतिरिक्त आणि २ वर्षांनी ४ आठवडे त्याला पाहण्याव्यतिरिक्त ते काही करु शकत नाही. वरचेवर इथे येणे पण शक्य नसते. मला पुर्ण कल्पना आहे की आपल्या वडिलधार्‍यांच्या आयुष्यातली कमी वर्षे आता राहिली आहेत आणि मला ती त्यांच्याबरोबर घालवायची आहेत. जेंव्हा आजी आजोबा गेल्याची बातमी मी इथे ऐकते तेंव्हा मला ते प्रकर्षाने जाणवते. आता हे माझे अगदी वैयक्तिक मत आहे आणि बर्‍याच जणांना उगाच सेंटिमेंटल होऊन घेतलेला निर्णय वाटेल, पण मी ही तुमच्यासारख्याच सगळ्या परत जाण्याबद्द्लच्या अनुकूल आणि प्रतिकूल गोष्टींचा विचार करते. प्रतिकूल गोष्टी मलाही दिसतात. वर कोणीतरी म्हटल्याप्रमाणे इकडे काय किंवा तिकडे काय कमीजास्त प्रमाणात प्रॉब्लेम्स असणारच, पण एकदा तुमची प्रायॉरिटी काय आहे हे ठरले की कुठलेतरी एक पारडे जड होते. मला माझी प्रायॉरीटी माहिती आहे :).

मो छान लिहिलयस

तिथे कसे काय अ‍ॅडजस्ट होऊ ह्या बर्‍याचजणांच्या मुद्दयाचे मला आश्चर्य वाटते. मी कुठे काही वाळवंटात किंवा जंगलात रहायला जाणार नाही आहे किंवा अगदी अनार्की असलेल्या अनोळखी देशात पण नाही. मी त्याच देशात जाणार आहे जिथे मी आयुष्यची २५ वर्षे काढ्ली आहेत >> अगदी १००% अनुमोदन.. तशीही मी देशात गेल्यावर फक्त बिसलरी पिणारी मंडळीही पाहिली आहेत. Uhoh आणि मी गेल्यावर आधी जाउन पाणीपुरी हादडणार्‍या कॅटेगरी मधली. Proud

अमृता, मी ही दुसर्‍या कॅटेगरीतली. ऊन, वारा,पाऊस काहीही असो, गाडीवरची पापु खाल्ल्याशिवाय ट्रिप सार्थकी लागत नाही.
बाहेर गेल्यावर मुलं मात्र अ‍ॅक्वाफिनावर.

तशीही मी देशात गेल्यावर फक्त बिसलरी पिणारी मंडळीही पाहिली आहेत. आणि मी गेल्यावर आधी जाउन पाणीपुरी हादडणार्‍या कॅटेगरी मधली.
>> मागच्या वेळेस हेच केलं आणि मग जे पोट बिघडलं - फूड पॉईझनिंग - अत्यंत वाईट अवस्था झालेली माझी... ह्यावेळी सुरुवातीला तरी काळजी घेईनच त्यामुळे.

कुणाला असे वाटते का, की ऑस्ट्रेलिया पेक्षा किंवा अबु धाबी पेक्षा भारतच बरा!>>>>> नक्कीच बरा. ऑस्ट्रेलियापेक्षा तर नक्की!

मो...... अगदी मनातलं! Happy

डॉ. जयंत नारळीकर, जे १५ वर्षे परदेशात राहुन पुन्हा भारतात आले त्यांच्याच शब्दात सांगायचे तर... हे असे समीकरण आहे, जे ज्याने त्याने स्वतःचे व्हेरियेबल्स टाकुन सोडवायचे असते!
डॉ. नारळीकरांना ही टोकाच्या प्रतिक्रियेला सामोरे जावे लागलेच होते! साल १९७२. देश: इंग्लंड.
त्यांनी दिलेले उदाहरणः जर मी एखाद्या श्रीमंत माणसाच्या घरी रहायला गेलो, तरी किती दिवस रहाय्चे हे माझे मीच ठरवायला हवे. पाहुणा म्हणुन किती दिवस राहणार....!

मो अगदी बरोब्बर लिहिलंयस.जर प्रायोरिटीज पक्क्या झाल्या असतील तर निर्णय निभावणे सोपे जाईल असे वाटते.मनात गोंधळ झाला कि 'जगी सर्व सुखी असा कोण आहे' हा मंत्र मी मनात आणते आणि मग उत्तर सापडतं.भारतात गेल्यावर होणार्‍या त्रासापेक्षा फारद्याचा जास्त विचार करावा असं मनाला बजावते.

तिथे कसे काय अ‍ॅडजस्ट होऊ ह्या बर्‍याचजणांच्या मुद्दयाचे मला आश्चर्य वाटते. >>>>>>> आश्चर्य काहीच नाही, अ‍ॅडजस्ट होण्यामध्ये फक्त सुखंसोयी किंवा भारताच्या वातवरण हेच मुद्दे नाहीयेत. हे एकदम पटलं की आपण कुठे वाळवंटात वगैरे जात नाही आहोत, आयुष्याची २२-२५ वर्ष जिथे काढली, जिथे जन्माला आलो तिथेच परत जात आहोत. प्रश्न आहे कुठली वर्ष काढली. मी इथे शिकायला आलो, त्या नंतर इथे नोकरी मिळाली. मला भारतात नोकरी करायचा शुन्य अनुभव आहे. त्यात मी आय टी क्षेत्रात काम करत नाही जिथे माझ्या माहिती प्रमाणे सर्वाधिक नोकर्‍या उपलब्ध आहेत. असो, एक वेळ नोकरी ही मिळुन जाइल. मला सगळ्यात काळजीची वाटणारी बाब ( माझ्या करता) म्हणजे भारतातलं कंपन्यांमधलं "वर्क कल्चर" ज्याचा मला अजिबात अनुभव नाही. उद्या तिथे जाऊन जर मला तिथलं कल्चर नाही पटलं (ज्याची दाट शक्यता आहे) तर मी काय करणार. आता ज्याला मार्ग शोधायचा तो नक्की शोधेल, मी ही शोधीन पण आधी (अमेरिकेत) नोकरी करता केलेला आटापिटा संपुन आता कुठे लाइन लागायला लागली आहे आणि त्यात मी परत जर "मार्ग शोधणं" मोहिम हाती घेतली तर माझ्या अख्ख्या परिवाराला ते जड जाइल. थोडक्यात सांगायचं तर जरीही हा फक्त आपल्या "प्रायॉरिटीज" चा प्रश्न असला तरी सोपा मात्र आजिबात नाही. मो, तु हा प्रश्न सोपा आहे असं म्हणतेस असं मला आजिबात म्हणायचं नाहीये. मी फक्त मला हा निर्णय घ्यायला का जड जातय हा मुद्दा मांडला.

वरती सगळ्यानी सिटिझनशिप विषयी लिहिलय , पण परतीचा मार्ग जर ओपन ठेवला तर तिथल्या छोट्या छोट्या अडचणी पण मोठ्या नाही का वाटणार? नाहीच जमल तर ऑप्शन आहेच परतायचा मग तिथ मन रमणार कस? मुल मोठी झाल्यावर त्याना भेटण्यासाठी इथ यावस वाटल तर व्हिजिटर व्हिसाचा ऑप्शन आहेच ना.कि माझ काही चुकतय समजावुन घ्यायला?
एकदा निग्रह केलाय मायदेशी परतण्याचा तर परत तिथलेच होवुन जाउया. इकडे आहोत तोवर इकडचे होवुन राहुया. अशी मधली अधांतरी अवस्था ,मला तरी जमत नाही.हा निर्णय मी तरी असाच घेणार आहे.मी माझ्या पहिल्या पोस्ट मध्ये लिहिलय तस एकदा तिकडे गेले कि मी तिकडचीच. Happy इकडे आहे तोवर इथलीच.
>>>>>तिथे कसे काय अ‍ॅडजस्ट होऊ ह्या बर्‍याचजणांच्या मुद्दयाचे मला आश्चर्य वाटते. मी त्याच देशात जाणार आहे जिथे मी आयुष्यची २५ वर्षे काढ्ली आहेत.>>>>>
प्रश्न फक्त आपण कसे अ‍ॅडजस्ट होवु याचा नाही आहे. आपली मुल जी इथली सिटिझन आहेत ती कशी अ‍ॅडजस्ट होतील त्यांचाही आहे.
असो. सगळ्याना त्यांच्या इच्छेनुसार जिथ रहायच आहे तिथ रहायला मिळो अशीच शुभेच्छा. हे माझ इथल हेमाशेपो . वाचणार आता फक्त. Happy

पाल्यांची अन त्यांच्या भवितव्याची चिंता अती होतेय असे नाही का वाटत? ओव्हर कॉशियस/ ओव्हर रिअ‍ॅक्ट कोतायत का लोक? मला अजुन पाल्य नसल्याने पालक कश्याशी खातात ते नाही माहीती, पण एक पाल्य म्हणुन जर माझे पालक माझ्यासाठी इतका त्रास सहन करत असतील तर मी का जन्माला आलो हा प्रश्न मला नक्कीच पडेल?
(प्रश्नाचा बीबी चुकला का? ९५.९७ वर लिहायला हवे? )

मला तरी वाटतं की 'ऑप्शन ओपन असू दे' म्हणून आपण परतीचा ऑप्शन घालवून बसतो.
खूप वर्ष बाहेर राहिलात की तुमची विचारसरणी, जगण्याची पद्धत, सवयी सगळं सगळं बदलतं.
परत गेल्यावर तिथलेही संदर्भ बदललेले असतात.
जुन्या मित्र मैत्रिणींसाठी आपण 'एकमेव' राहिलेले नसतो आणि आपल्यासाठीचं सर्कल लिमिटेडच असतं.(जे आपण जाण्यापूर्वी होतं)
म्हणजे १९७० साली देशाबाहेर पडलेले लोक, १९७० सालातच अडकून बसतात. २००५ साली पडलेले २००५ सालात.
१९८०-१९९० ला बाहेर पडलेले लोक जर आज भारतात रहायला गेले तर त्यांना 'सांस्कृतिक धक्का' बसेल.
त्यांनी जे जे सगळ इथे राहून जपलेलं, त्यातलं काहिच तिकडच्या नातेवाईकांनी जपलेलं नाही असंही आढळू शकतं! हे आणि इतर अनेक बदल झालेले असतील.. ज्यांच्याशी जुळवून घेता येईलच असं नाही (उदा - वाढलेली रहदारी)
हेच आपलंही आणखीन काही वर्ष बाहेर राहिल्यावर होईल.
त्यामुळे ऑप्शन ठेवू म्हणून बाहेर राहिलो तर काही ऑप्शन रहातच नाही कालौघात असं मला वाटतं.
अपर्णा वेलणकरच्या 'फॉर हिअर ऑर टू गो' ह्या पुस्तकात तिनं "क्ष= क्ष+१" सिंड्रोम म्हणून एक कॉन्सेप्ट सांगितली आहे. म्हणजे, उदा २००७ मधे आपण ठरवतो की २००९ मधे नक्की परत जाऊ.. मग आठ साली वाटतं २०१० मध्ये, हे संपतच नाही कारण क्ष+१ व्या वर्षी आपला नवीन क्ष पुन्हा जुना क्ष+ १ झालेला असतो.

चंपकच्या पोस्टवरून पुढे....
अनिल अवचटांनी जिल्हा परिषदेच्या कन्याशाळांमधे मुलींना घातलं होतं. दोन्ही मुलींना त्याचे कधी चटके लागले नाहीत.
आकेरीच्या डॉ प्रसाद आणि डॉ हर्षदा देवधरांची मुलं तिथल्याच लोकल मराठी माध्यमाच्या शाळेत जातात.. आणि दोन्ही मुलांची समज, विचार करण्याची शक्ती शहरातल्या सर्व सुविधा हात जोडून उभ्या असलेल्या, ककूनड (योग्य मराठी शब्द आठवत नाही..) मुलांपेक्षा खूप वरच्या पातळीवरची आहे.
अशी अनेक ऐकीव आणि प्रत्यक्ष बघितलेली उदाहरणं बघता आपण जरा जास्तच बाऊ करतो असं वाटतं.

अवचटांच्या आयुष्याचा पट सगळ्याच महाराष्ट्राने पाहिलेला आहे. त्य पूर्ण कुटुम्बाने भौतिक सुखाचा , आर्थिक सुरक्षिततेचा कधीच हव्यास बाळगला नाही. अवचटांसारखे आयुष्य जगायला आणि मुलानाही इन्स्पायर करायला फार मोठे धैर्य लागते. इथल्या लोकांच्या प्रश्नाची आणि त्यांच्या आयुष्याची तुलनाच होऊ शकत नाही.

दोन्ही बाजूंचे ’परतोनि पाहे’चे मुद्दे वाचले, काही मुद्दे पुन्हापुन्हा येताहेत, पण गंमत म्हणजे काही (निदान माझ्यासाठी) महत्त्वाचे मुद्दे राहून गेलेत किंवा निसटतेच आलेत.
हे लिहिताना माझी थोडक्यात पार्श्वभूमी अशी की मी सध्या अमेरिकेत आयटी मध्ये आहे, व्यावसायिक आयुष्याला भारतात सुरुवात केली मग दोन वर्षे भारतीय कंपनीतर्फे अमेरिकेत काम केले, पुन्हा भारतात जाऊन भारतीय़ कंपनीत वर्षभर काम केले. त्यानंतर पुन्हा अमेरिकेत येऊन गेले पाच वर्ष इथे काम करतोय. हे सगळं सांगायचा उद्देश असा की, भारतात तसेच अमेरिकेत (प्रॊग्रेमर लेव्हलपासून प्रॊजेक्ट मॆनेजर, आर्कीटेक्ट लेव्हलवर) काम करण्याची आणि करुन घेण्याची पद्धत, दोन्हीकडचे बदलते जीवनमान, राहाणीमान, सामाजिक प्रश्न अशा संक्रमणातून एकापेक्षा अधिक वेळा गेल्यामुळे काही गोष्टी खूप जवळून अनुभवल्यात. एक महत्त्वाचे म्हणजे माझे व्यावसायिक अनुभव अमेरिका आणि भारत ह्या दोन देशांपर्यंतच आणि सांसारिक अनुभव फक्त अमेरिकेपुरतेच मर्यादीत आहेत. तसेच सुदैवाने भाषा हया महत्वाच्या माध्यमाचा मोठा प्रश्न (जो जपान, चायना मध्ये काम करणायांना अपरिहार्यपणे येतो) आपोआपच नाहीये.
माझं म्हणण मांडण्यापूर्वी हा बाफ मुद्देसूद चालू केल्याबद्दल रैना तुझे खास आभार आणि पोटतिडकीने लिहील्याबद्दल सगळ्यांचेच.. रैना विषयांतर झाले असे वाटले तर क्षमस्व पण मूळातून विचार करण्यासाठी ’जाओनी किंवा राहोनी पाहे’ या अनुषंगाने आधी मुद्दे माडतोय म्हणजे परतण्याचा विचार त्या त्या गटात वेगळा कसा हे लक्षात येईल.
नमनाला घडाभर तेल झालय, आता काही मुद्दे.. Happy
वरती बयाच जणांनी म्हटल्याप्रमाणे प्रश्न त्याची उत्तर वैयक्तीक पातळीवर बदलतात पण मग जी कारण असतात निर्णय प्रक्रीयेमागे (परतण्याच्या किंवा न परतण्याच्या) ती कोणती, हे इतरांनी लिहीलेय.. मी पुन्हा लिहीत नाही पण मुळात असे प्रश्न ज्यांना पडतात त्यांना सरसकट एका पारड्यात टाकता येत नाही असं मला वाटतं. पुल ’म्हैस’ मधे म्हणतात तसं ’रत्नागिरीहून परत जाताना मी इथे का आलो असा विचार करतो’, तसच काहीसं ह्या परतोनि पाहे बाबत आहे असं मला वाटतं..
अमेरिकेत येणारा प्रत्येक जण एकाच सारख्या मार्गाने येत नाही, शिवाय येणाया प्रत्येकाचे उद्दीष्ट ’अमेरीकन ड्रीम’ हेच असते, असेही नाही उलट बरेचदा ते बदलत असते मृगजळासारखे. असो, तर ढोबळमानाने इथे भारतातून आलेल्यांपैकी काही महत्त्वाचे गट -
१. अमरिकेत एम एस किंवा एम बी ए किंवा पीएचडी करू म्हणून उच्च शिक्षणासाठी आलेले लोक
२. भारतात शिकून अमेरिकेत नोकरीसाठी म्हणजे पैसा कमवण्यासाठी आलेले लोक
२.अ. एल १ म्हणजे कंपनी ट्रान्सफर वर आलेले जे इथे नोकरी बदलू शकत नाहीत आणि कंपनीच्या इशायावर केव्हाही परत जावे लागू शकते
२.ब. एच १ म्हणजे जे इथे नोकरी बदलू शकतात आणि नोकरी सुटल्यास काही एक दिवसात परत जावे लागण्याची शक्यता असते
३. भारतातून येनकेनप्रकारेण नातेसंबंधातून इथे ग्रीनकार्ड घेऊन आलेले लोक (उदा. बरेचसे पटेल आपण बघतो..)
४. अमेरिकेत असणाया वरील पहिल्या दोन प्रकारच्या भारतीयांबरोबर लग्न करून आलेले डीपेंन्ड्ट व्हिसावरचे लोक
५. इमिग्रेशनची अडथळा शर्यत पार करून आलेले लोक - जीसी किंवा सिटीझनशिप असलेले
आता ह्या गटांच्या ढोबळ आर्थिक स्थैर्य आणि साधारण अपेक्षांचा आणि त्याचा वैयक्तिक पातळीवर (कौटुंबिक पातळीवर थोडं नंतर पाहू) परतीच्या श्क्यतेवर होणाया परिणामाचा थोडक्यात विचार करु -
गट १.
ह्यातील बयाचशा लोकांनी इथे येऊन शिकण्यासाठी पदरमोड केलेय अगदी स्कॊलरशिपवर आला असाल तरी किमान दोन वर्षे वेळेची गुंतवणूक केलेय. शिवाय, स्टुडंट लाईफ मधे कॊलेज फुटबॊलपासून एक वेगळी अमेरिका अनुभवलेय, त्यांची अमेरिकेशी थोडी वेगळीच नाळ जुळलेय. शिवाय, वैयक्तीक पातळीवर व्यावसायिक आयुष्यात त्यांना अमेरिकेत शिकल्याने प्रचंड संधी आहे, मागणी आहे. त्यामुळे रीटर्न ऒन इन्व्हेस्ट्मेंट तसेच ऒनर ऒफ टेलेंट ह्या दोन्हीवर विचार करता अशी लोक अमेरिकेत पटकन स्थिरावू शकतात, बरेचदा ह्याच गटातला जोडीदार ते निवडतात. आर्थिक प्रॊब्लेम सुटलेले असतील तर परतण्याचे विचार मनात येऊ शकतात किंवा अमेरिकन ड्रीमच्या दिशेने वेगात वाटचाल तरी करू शकतात. अर्थात, इथे शिकूनही नोकरी मिळत नसेल, ओपीटी नंतर एच वन आणि एच वन नंतर जीसी होत नसेल तर शिक्षणावरचा खर्च, लग्नाचे वय ह्यातून बरीच ओढाताण होऊन परतीच्या शक्यता सक्तीच्या होऊ शकतात. अर्थात ह्या गटातील लोकही गट २ बच्या माध्यमातूनच इमिग्रेशन मधून जात असल्याने त्यांना बयाच सारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते.
गट २.
ह्यातील २.अ. लोकांना अमेरिकेत राहाणे तसे फार शक्य नसल्याने त्यांना कधी ना कधी परतायचेच आहे हे लक्षात ठेवावेच लागते.
२.ब. अमेरिकेतले मार्केट, तुमच्या व्यावसायिक निपुतणतेला इथे असलेली मागणी, तुमचा अनुभव आणि मुख्य म्हणजे इमिग्रेशनचे नियम ह्या सगळ्या कचाट्यात ही लोक व्यवस्थित भरडून निघत आहेत. लग्नाची समस्या होऊ नये किंवा नक्की काय करायचे हे ठरत नाही किंवा कंपनी तयार होत नाही अशा विविध कारणांनी जीसी लांबणीवर पडले की मग एक चक्र सुरु होते. वर्षानुवर्षे जीसीची वाट पहाणे आणि त्याअनुषंगाने येणारे निर्वासिताचे जीवन चालू होते. बद्लती प्रोजेक्ट्स, जीसी फाईल केलेल्या कंपनीकडून होणारी अडवणूक, ऒनसाईट ऒफशोअर मॊडेल असेल तर कामाचे विचित्र तास ह्याबाबींमुळे अस्थिर जीवनमान सुरु होते. प्रोजेक्ट एकाच ठिकाणी असेल ह्याची खात्री बहुधा नस्तेच शिवाय एच वन वर असल्याने घर घेऊन राहाणे ही मोठीच रीस्क बनते. ह्या मंदी मध्ये होत्याचे नव्हते झालेल्या फॆमिली आपण पाहिल्या असतीलच. शिवाय जीसी येईपर्यंत तांत्रिक दृष्ट्या तुम्ही वर्षानुवर्षे तुमचा कामाचा प्रोफाईल वाढवू शकत नाही त्यामुळे प्रसंगी व्यावसायिक हतबलताही येऊ शकते. समजा एखाद्याला वयाच्या पस्तीशी पर्यंत जरी जीसी मिळाले तरी त्यानंतर वीस वर्षांचे होमलोन, इतका वेळ नोकरी टिकवून ठेवणे आणि संसार उभा करणे म्हणजे मोठी जबाबदारी होऊ शकते. ह्याचा एकत्रित विचार करता ग्रीनकार्ड हा एक जुगार झाला आहे. वरती मनस्मिने म्हटल्याप्रमाणे ग्रीनकार्ड मिळूनही सीटीझन शीप मिळेपर्यंत ह्यातून सुटका नाहीच.
गट ३.
ह्यांचा इथे येऊन राहाणे हा एकच उद्देश असल्याने परतीचा काही प्रश्न येत नाही.
गट ४.
हा एक महत्त्वाचा घटक आहे. ह्यात आपण बहुसंख्य शिकलेल्या मुली निव्वळ एच ४ वर नोकरी करणे शक्य नाही म्हणून घरी बसलेल्या बघतो. ह्यात त्यांचे करीअरचे वैयक्तिक नुकसान झाल्याची बोच असतेच पण जर अशा व्यक्तीने ड्राइव्हीग, सोशल नेटवर्कींग, इथे वेळेचा स्वत:साठी कसा सदुपयोग करता येईल ह्याचा विचार केला नसेल तर अमेरिकेचा कंटाळा येऊ शकतो आणि मग भारतात परत जाऊया असा दबाव त्यांच्याकडून येऊ शकतो किंवा उलटपक्षी इथले सांसारिक स्वातंत्र्य आवडायला लागून भारतात जायलाच नको असाही सूर आळवला जाऊ शकतो. थोडक्यात, परत जायचं का ह्या मुद्द्यावर ह्या गटाचा प्रभाव अपरिहार्यपणे असतोच.
गट ५
ह्या गटातली माणसं बहुतांश इथे पोहोचेपर्यंत आर्थिक दृष्ट्या यशस्वी, स्थिरावलेली असतात. इतके वर्ष जीसी/सिटिझनशीप साठी लढलॊ त्याचे फळं खाण्याचे दिवस असं मनात येतं असतं. कुटब सुद्धा बरच स्थिरावलेलं असतं. अशावेळी आई वडिलांसाठी इथली बसलेली घडी मोडायची असेल तर कुटुंबाला खूप विश्व्वासात घेणं गरजेच वाटतं. परत जाण्यासाठी ह्यांना थोडं जास्तच धैर्य दाखवावं लागतं., इतके वर्षात इथे चांगला जम बसला असेल तर ह्यावर्षी जाऊ पुढच्या वर्षी जाऊ म्हणत (क्ष + १ सिंड्रोम) इथेच राहातात लोकं असं बरेचदा दिसतं.

एक कुटुंब परततं म्हणजे त्यात साधारणपणे कमावणारी (एक वा क्वचित अधिक)व्यक्ति आणि अवलंबित व्यक्ती (जी इथे कमवू शकत नाही पण कमवण्याची पात्रता आहे किंवा जी शिकतेय किंवा शिकण्यायोग्य होतेय). आता परतणाया कुटुंबप्रमुखास तीन पिढ्यांचा विचार करायचाय, आधीची (म्हणजे आई वडील..), स्वत:ची म्हणजे स्वत: तसेच बायको कसा परतीचा बदल मानवू शकेल आणि पुढची पिढी म्हणजे मुलं. हल्ली बयाच वेळा ’मागच्या पिढीसाठी परत जायचं’ ह्याला सरसकट टाळ्या वाजवल्या जातात, पण ते एका चौकटीतच खरं आहे. म्हणजे वृद्ध आई वडिलांसाठी परत जात असाल पण मुलांचे नुकसान होतेय तिथे गेल्याने किंवा अमेरिकेतल्या शिक्षणाची त्यांची संधी हुकली अशी बोच असेल तर मागच्या पिढीसाठी पुढच्या पिढीचे नुकसान केले असं म्हणायला वाव आहे. ह्याउलट पुढच्या पिढीच्या शिक्षणासाठी इथे थांबलं तर मागच्या पिढीवर अन्याय होण्याची शक्यताही आहेच. सगळ्यांना पटेल असं ह्याचं उत्तर काढण म्हणूनच शक्य नाही हा असा वैयक्तीक प्रश्न आहे की जिथे तुम्हाला काय हवय आणि काय नकोय हे नीट माहिती असायला हवं आणि जो निर्ण्य घेऊ तो ठामपणे तडीस नेऊन जीवनाची अपरिहार्यता समंजसपणे स्वीकारता यायला हवी.

  • ’मी इथे का आलो?’ ह्याचं उत्तर अमेरिकेत जगायला, अमेरिकन ड्रीम पूर्ण करायला असं असेल तर तुमची दिशा अमेरिकेत राहाण्याकडे झुकतेय त्यामुळे गणिताची उकल सोप्पि हॊइल. जर फक्त पैसे कमवायला, जगाच्या दुसया टोकावर काय चाल्लय पहायला हे उत्तर असेल तर अजूनही परतीची धुकधुकी व्यवस्थित आहे. तुमची आर्थिक उद्दीष्ट जेवढी सुस्पष्ट असतिल तेवढं परतीच गणित सोप्प होईल.
  • इथल्या इमिग्रेशन सिस्टीमच्या कचाट्यात २ब गटामधील बहुसंख्य लोकं मोडतात. जीसी फाईल करण्याचा उपयोग फार तर एच वन सहा वर्षांपलिकडे वाढवायला होईल पण जीसी मिळायला (इबी२ किंवा इबी३ असेल) तरी अंदाजे दहा एक वर्षे लागतील. एवढे वर्ष निर्वासीतासारखे (आपण आणि कुटुम्बियांनी) आयुष्य जगायचे का हे ज्याचे त्याने ठरवायचे. स्थैर्य हे तुमचे प्रमुख उद्दीष्ट असेल तर अशा स्थितीत नोकरीत, घर खरेदी, मुलांच्या शाळा, त्यांचा कौटुंबिक सहवास ह्या सगळ्या प्रकारांत स्थैर्य मिळणे दुरापास्त आहे. ह्याचं मुख्य कारण म्हणजे इमिग्रेशन लॊज. ह्या गटातील लोकांना नोकरीच्या ठिकाणी सगळ्यांना समान न्याय नाही (तसं अपेक्षित आहे असं नाही, पण नाहीये हे महत्त्वाचं) कारण ग्रीन कार्ड -सिटीझन आणि एच वन ह्यांना कामाचे स्वरुप, मर्यादा, संध्या ह्यात फरक आहे.
  • जोडीदार जर नोकरी करु शकत नसेल (उदा. एच ४ किंवा मुलांना द्यावा लागणारा पूर्ण वेळ किंवा नोकरीची संधी नसणे) आणि महत्वाकांक्षी असेल तर इथे घालवलेला प्रत्येक दिवस त्याच्या व्यावसायिक आयुष्यास त्रासदायक ठरु शकतो आणि कुटुंब अस्थिर करु शकतो.
  • इथली प्राथमिक शिक्षणसंस्था एका मर्यादेपर्यंतच चांगली आहे असे वाटते. म्हणजे लॆब, हुशारीप्रमाणे शिक्षण, व्यावसायानुषंगिक शिक्षण हे सगळ छान आहेच पण इथल्या शालेय वातावरणात मुल वाढवायला तुमच्या मनाची तयारी असायला हवी. तसच तुम्ही जितक्या लवकर अमेरिकन कल्चर आत्मसात कराल तितकं मुलांना सोप्प जाईल. तिथे शिकले तर आपल्यातले पुष्कळ जण आले तसे उच्चशिक्षणासाठी मूल इथे येऊही शकेल मोठे झाल्यावर. भारताल्या प्राथमिक शिक्षणपद्धतीत मुलांवर बोजा खूप आहे, मान्य पण आता तिथेही शाळा अभ्यासक्रमांत हा मुद्दा विचारात घेत आहेत आणि घरी स्पर्धेतून मुलाचा कोंडमारा होत नाही ना ही काळजी आपण घेतली तर बराच फायदा होऊ शकतो.
  • इथे ठरलेले सणवार (बयाचदा) सोयीस्कर विकेंडला करायचे, दोन वर्षातून एकदा भारतात तीन आठवडे जाऊन ’जी ले तेरी जिंदगी’ करायचं आणि त्यावर समाधान मानायचं हे तात्पुरतं जमेल पण कायमस्वरूपी जमेल का ह्याचा नक्की विचार करायला हवा. अमेरिकेत म्हातारपण घालवायची तयारी आहे का ह्याचाही विचार करायला हवा.
  • मुलांना एक पालक म्हणून मराठीची आवड निर्माण व्हावी असं मनापासून तुम्हाला किती वाटतं आणि ते किती गरजेचं वाटतं? वाटत असेल तर इथे राहून ते अजिबात सोप्प नाही. झक्की म्हणतील ते पुण्यातही शक्य नाही पण ते पटत नाही. अजूनतरी पुण्यामुंबईत मराठी मेलेली नाही उलट ’राज’कीय कारणांमुळे तिला पुन्हा बळ येतय. नुसती भाषा नाही तर मराठी संस्कृतीशी पुढच्या पिढीची (ती त्याच्या पुढच्या पिढीत्त तशीच जुळलेली राहावी असा हट्ट नाही) नाळ जुळावी असं वाटत असेल तर नीट विचार होणं आवश्यक आहे. उदा. ’पु.लं. चा नारायण’ मी मुलाला समजावू शकलो पाहिजे, ’चाफ्याच्या फुला’ त्याच्याबरोबर बसून समरसून ऐकू शकलो पाहिजे साहित्याची, वाद्मयाची गोडी त्याला लावता आली पाहिजे अशी इच्छा असेल तर ते इथून वर्षाकाठी काही पुस्तक मागवून पूर्ण होण कठीण वाटतं. शिवाय, ते तिथे (हो बदलत असले तरीही) वातावरणामुळे आपोआप घडून येईल इथे राहिलो तर मात्र नाही म्हटलं तरी मुलांवर मराठी लादावं लागेल Sad आणि जे मराठी भाषेचं आहे तेच अभिजात हिदुस्थानी संगीताच. तिथे सवाई गंधर्व, वसंतोत्सवासारखे उत्सव आणि जर त्याला आवड असेल तर दिग्गज संगीत तन्द्न्य गुरुस्थानी मिळू शकतील, इथून ती आवडं निर्माण करणं थोडं आडवळणाच हॊईल असं वाटतं. अर्थात उदा. इथे राहून व्हायोलिन शिकता येईल तिथे जाऊन हिंदुस्थानी संगीत मुलाने शिकायलाच हवे असे नाही असे एखाद्यास वाटत असेल तर ते वावगे नाही. पालकत्व हा शेवती वैयक्तिक प्रश्न आहे.
  • झक्की म्हणतात ते अगदी पटते. ’जगी सर्व सुखी असा कोण आहे?’, प्रत्येकाला इथे राहा किंवा तिथे राहा समस्या आहेत. आपण जगतोय म्हणजेच चांगले वाईट असे भोग भोगतोय. त्यामुळे आपल्याला येणाया समस्यांवर आणि त्यांच्या निवारण्यावर आपलं किती नियंत्रण आहे हे महत्त्वाचं. भारतात तुमच्याकडे पैसा असेल तर बयाच प्रश्नांवर चांगले नियंत्रण येऊ शकते असे म्हणतात Wink

कौटुंबिक पातळीवर -
इथे जोडपं काम करत असेल तर विकेंड घरकामात, पुढच्या आठवड्याच्या पूर्वतयारीत जातात, रोज सकाळ संध्याकाळ ताजं जेवण मिळतच असं नाही, मुलांना डेकेअर मध्ये ठेवणं अपरिहार्य असतं. ह्याउलट भारतात मनुष्यबळाचा अभाव नाही. तुमचं आर्थिक नियोजन नीट असेल आणि विश्व्वासू माणसं तुम्ही निवडू आणि टिकवू शकलात तर बरीच काम आऊटसोर्स करता येऊ शकतात. शिवाय, आइ वडिलांचा तसेच शेजार्यापासून इतर नातेवाईकांचा आधार मिळवू शकता, धोबी, इस्त्री, पोळ्याला बाई, स्वयंपाकाला बाई, केरवारं करायला बाई अशा अनेक पातळ्यांवर आपण आपली काम करवून घेऊ शकता आणि वेळ वाचवू शकता. नातेवाईकांबरोबर येणार्या लग्न मुंजी बारशी डोजे अशा कार्यांना पैठण्या नेसून दागिने घालून मिरवणे अशा मजांबरोबरच कुत्सितपणा, भोचकपणा, चोमडेपणा अशा अवगुंणांचाही आपल्याला सामना करावा लागतो पण ते कसं परतून लावायचं की त्याचा ताण घ्यायचा हे पूर्णत: तुमच्यावर आहे. एकूणात दहीहंडी, संक्रांत, गणपती, दिवाळी, पाडवा आणि प्रत्येक सणच जोरदार उत्साहात साजया होणाया ठिकाणी (उदा. गिरगाव, दादर, ठाणे) तुमचं आयुष्य गेलं असेल तर एका उत्सवी जीवनाच आकर्षण आपल्याला असतं, अमेरिकेतलं जीवनमान त्यामुळेच कित्येकदा तेच ते आणि चाकोरीबद्ध वाटू शकतं.
भारतात परतल्यावर तुमचे तसेच जोडीदाराचे आई वडील जवळ असतील, त्यांनाही बरं वाटेल, सहवासाचं प्रेम वाढेल, त्यांच्या तब्येतीची इथे राहुन जी काळजी असेल तर ती उरणार नाही. त्यांनाही मुला-नातवाबरोबर जीव रमवता येईल, नातवालाहि डेकेअरची गरज भासणार नाही असं सगळं जूळून आलं तर तुमचं काम सोप्पच होईल खूप.
तिथले गड किल्ले, धार्मिक स्थळे किंवा डोंगर दया, गावं, शेतं तुम्हाला खुणावत असतील तर भारतात असाल तर निदान काही महिन्यातून रजा टाकून ह्यातलं थोडं थोडं तुम्ही नक्कीच उपभोगू शकता.

व्यावसायिक पातळीवर-
भारताच्या विकासाचा वेग अमेरिकेच्या विकासाच्या वेगापेक्षा कितीतरी जास्त आहे. मान्य आहे भारतात भ्रष्टाचार आहे पण त्यामुळे अब्दुल कलाम आणि नारायण मुर्थी घडायचे थांबत नाहीत. भ्रष्टाचारामुळे, राजकारण्यांमुळे वेग कमी होत असेल पण जागतिक रेट्यामुळे, माहितीच्या स्त्रोतांमुळे बरेच फायदे होत आहेत. कोणी सांगावे. अशाच वेगात धावत राहिला तर भारत येत्या पंचवीस वर्षात अमेरिकेच्या आसपास येईलही, हे स्वप्नरंजन मुळीच नाही. शिवाय, भारत विकसनशील असल्याने आणि आपल्यासारख्यांनी विकसित देश म्हणजे काय हे अनुभवले असल्याने भारतात लघु उद्योगाच्या (विशेषत: आय टी क्षेत्रात) प्र चं ड संधी आहेत. चंपक ने दुग्ध व्यवसाय आणि गुळाबद्दल लिहीले आहेच. एस एस एन सारखी सिस्टीम भारतातही येतेय. आर्थिक क्षेत्रातही सेबीने बरीच शिस्त आणलेय, आयसीआयसीआय डीरेक्ट सारखी पोर्टल्स व्यवस्थित काम करताहेत. लोकसंख्येचा बोजा भारतावर आहे हे मान्य पण हीच लोकसंख्या शिकतेय, ह्यात सुशिक्षित तरुणांचे प्रमाण वाढतेय आणि त्यांना संधी उत्पन्न करुन दिली तर खूप काही करता येईल (जे टाटा, अंबानीने केलं..). त्यामुळे परत गेल्यावर काय असा प्रश्न तूर्त तरी पडत नाही, थोडक्यात इथल्या अनुभवाला भारत बयापैकी न्याय देऊ शकेल असा विश्वास वाढतोय.
कामाच्या बाबतीत मात्र मागच्या पोस्ट्स्मध्ये अमेरिकेतल्या लोकांना जरा जास्त सहानुभूती मिळतेय असं वाटतं. एन जे (जर्सी सिटी नव्हे) मधे राहून न्यू यॊर्कला अपडाऊन करणारे मित्र सकाळी सहाला जाणार ते रात्री आठ्ला घरी, अगदी कडाक्याच्या थंडीतही. याउलट पुण्यात बाईक वरुन मी १५ मिनिटात ऒफीसला जायचो. मला एवढच म्हणायचं की तुम्ही योग्य ठिकाणि असाल आणि तुमचा व्यावसायिक अनुभव पाठीशी असेल तर घराच्या जवळ किंवा वर्क फ्रॊम होम असा जॊब तुम्ही कुठेही मिळवू शकता नाहीतर कार पुलिंग सारखा उपाय आहेच. इथे अमेरिकेत आयबीएम मधे काम करताना आठवड्यातून चार दिवस क्लायंट कडे आणि एक दिवस घरुन काम अशी कन्स्ल्टींग जॊब मधे जबाबदारी पेलणारे पाहिलेत त्यांच्या घरच्यांना खरच सलाम.

सामाजिक पातळीवर-
भारतातलं जीवनमान नक्की सुधारतय. प्रत्येक भारतवारीत ते प्रकर्षाने जाणवतय. आज इंटरेनेटवरुन पुण्याच्या जागेचं विजेचं बील मी भरू शकतोय. रस्ते, वाहतूक ह्या समस्या आहेत मान्य पण त्यांना कसं टाळायच हे तुमच्यावर. मुंबईतल्या गर्दीला घाबरून तुम्ही मुंबईत गेलाच नाहीत तर तुम्हाला मुंबईची नशा कशी कळणार.. आणि गर्दी शिवाय मुंबई हा तुमचा हट्ट असेल तर ते शक्य नाही हे स्वीकारता यायला हवंच, कुरबूर करुन काहीच साध्य होणार नाही. एकंदर भारतातही सुविधा येत आहेत. वीज, पाणी अशा समस्या जरूर आहेत, लोकसंख्येचा बोजा आहे पण भारताने शिक्षणाबरोबर दिलेल्या इतर अनेक चांगल्या गोष्टीबरोबर ही कडू गोळीही गिळायला हवी ना. तिथेही माणसं राहात आहेत आपण नक्की ऎडजस्ट करू असा विश्वास आहे.

एक मात्र नक्की, भारतात जाणार असाल तर व्यवस्थित आर्थिक नियोजन करुन जायला हवंच हव असं मनापासून वाटतं. दुसरं म्हणजे तुम्ही योग्यवेळी निर्ण्य घेतला नाहीत किंवा तो लांबवणीवर टाकत राहिलात तर तुम्ही वेळेचा अपव्यय करण्याची शक्यता बळावते. जेथे तुम्हाला आयुष्यातील जास्त काळ राहायचे तिथे कौटुबिक जीवनास लवकर सुरुवात करणे (होमलोन, स्कूलिंग वगैरे च्या दृष्टीने) कधीही सयुक्तिक आहे. म्हणूनच मुलांना थोडे इथले आणि थोडे तिथले असे प्राथमिक शिक्शण द्यायला लागणार नाही ह्याचा जरूर विचार करायला हवा. अशावेळी मुलांना मित्रमैत्रिणी जोडणे, सोशल एक्सेप्टन्स ह्या पातळ्यांवर ताण सहन करायला लागण्याची शक्यता आहे. मुलांचे व्यक्तिमत्त्व ज्या काळात घडते त्याकाळात अस्थैर्यामुळे किंवा बदलांमुळे त्यांच्यात कुठलाही न्यूनगंड निर्माण होणार नाही ह्याची काळजी घ्यावी लागेल. पूर्ण अमिरेकेतले की पूर्ण भारतातले शिक्षण द्यायचे हा निर्णय मुलाच्या पाचव्या वर्षापर्यंत घेता आला तर केव्हाही उत्तमच अर्थात तुमचा ’पॊईंट ऒफ नो रीटर्न’ तुम्ही ठरवायचा. परतीची वा न परतीची एका पेक्षा अधिक कारणं असू शकतात, ती किती सबळ आहेत हे ठरवता येण्यासाठी अशा चर्चेचा अंशत: तरी उपयोग होऊ शकेल असं वाटतं. तशी ती पुरेशी सबळ असतील तर घेतलेला निर्णय हा जाणीवपूर्वक असल्याने कुठलीही (इथे राहिलात तर इथे किंवा तिथे गेलात तर तिथे) एडजेस्टमेंट होऊ शकतेच. तर आपल्यापुरतं ती कारणं शोधणं आणि त्यांची सबळता ठरवणं महत्त्वाचं.

मुद्दे मांडताना पोस्ट अंमळ मोठे झाले त्याबद्दल क्षमस्व, पण विभागून लिहीण्यापेक्षा सगळं एकत्र लिहीणं आवश्यक वाटलं..

जबरी लिहीले आहे उपास ! खूप आवडले, पटले पोस्ट ..

मला अमेरिकेत येऊन २च वर्षं झाली. नवर्‍याला ७. दोघांनाही परत जावेसे वाटते. मुद्दा हा आहे की, कधी जायचे? ठराविक रक्कम/ आर्थिक डेडलाईन ठेऊन की काळाची डेडलाईन. कन्फ्युजन आहेच..
पण एक नक्की, आम्हा दोघांना आमच्या मुलांशी मराठीतच संवाद साधायचा आहे! अमेरिकेत राहून मराठी येतंही मुलांना.. पण तरी ते तितकंसं मला पुरेसं नाही. मराठी साहित्य, चित्रपट ,नाटकं या गोष्टी मला अपरिहार्य वाटतात. त्या मी अमेरिकेत देऊ शकणार नाही.
शिवाय अजुन एक पाहीले तर "बालपणीचा काळ सुखाचा"! तुम्हाला कायम बालपणीचा काळ आठवतो.. ती तुमची बेस्ट वर्षं असतात! आमचे बालपण ज्या देशात गेले, त्याच देशात आमच्या मुलांचे बालपण गेलेले आम्हाला आवडेल. तो समान धागा नसेल तर काय होईल मला कळत नाही..

उपास, छान पोस्ट. खूप कष्ट घेवून लिहिलेस खरेच. पण आतून मनापासून लिहिलेस. बराच विचार केलेला दिसतोय.

सशल, केदार, अमृता, प्राजा, नीधप, चंपक, मो, नानबा, शर्मिला, स्वाती, पग्या,मानस्मी - पोस्ट आवडल्या. पुन्हा पुन्हा वाचल्या.

केल्याने देशाटन परदेशात काय मिळवलं, काय गमावलं
- व्यापक दृष्टीकोन, जाणीवेच्या कक्षा विस्तारणे इ.इ माझ्यापुरतं सांगायच तर खरं आहे. सुमारे दहा देशातुन आलेल्या स्त्रीपुरुषांसोबत सतत काम करणे आणि त्यात एकटी भारतीय असणे, आणि कामानिमीत्ताने शेकडो लोकांचे करिअर प्लॅन्स जाणुन घेणे ही माझ्या साठी लेबोरेटरी ठरली खरोखर. Diversity of Thought (विचारांचे वैविध्य),विश्वशांती आणि स्थलकालदेश सापेक्ष मानवी अस्तित्वाचे सार यांची माझ्या मुल्यात भर पडली ती परदेशातील वास्तव्यामुळे.
- विकसीत देशातील कायदेकानु, पायभूत सोयीसुविधा, पर्यटन ही काय चीज असते ते समजलं त्याचबरोबर त्यासाठी मोजावी लागणारी सामाजिक किंमतही. विकसीत देश म्हणावा तर त्यांचा स्त्रीविषयक दृष्टीकोन so called विकसनशील देशांना लाजवेल इतका मागास ह्या धडधडीत विरोधाभासाचा धडाही इथलाच.
- एक राष्ट्र म्हणुन पूर्णपणे बेचिराख होऊन पुन्हा उभे राहणे आणि त्या अनुभवांबद्दल न बोलणे, एक पूर्ण वेगळं समाजमन जाणण्याची संधी मिळणे, सर्वस्व ओतून शंभरापेक्षा अधिक टक्के परिपूर्ण आणि सौंदर्यपूर्ण अश्या Work Product ची अनुभूती घेणे.
- कमालीची शिस्त आणि घड्याळाला बांधलेली जीवनपद्धती. कामाच्या वेळेस काम आणि मजेच्या वेळेस मजा. शारिरीक फिटनेस आणि unapologetic स्वःतासाठी देण्यात येणारा वेळ, Individualism, अक्षरशः संपूर्णपणे खाजगी असणारा थोडा वेळ. स्वः ला ओळखणे, त्याची जोपासना करणे, झोकुन देणे आणि स्वतःची उन्नती साधत कुटुंबाची साधणे. भारतीय मनाला पराकोटीचा वाटणारा आत्मकेंद्रीपणा ही या Individualism ची अलबत दुसरी बाजू. फारच तुसडे असतात हे फिरंगी लोकं, माणसांची कदरच नाही ही फाडकन येता जाता येणारी पूर्वग्रहदुषीत वाक्य आताशा जरा अडखळत येऊ लागली. माझ्या बाबतीत स्वातीने मांडलेला "भारतीय संस्कृतीच काय ती थोर" चा परिच्छेद पूर्णपणे लागु होता. डोळ्यांवरची झापडं काढुन विचार करायला शिकले. माणसं आणि देशोदेशीच्या संस्कृती त्रिमीत असतात. सीमीत असतो तो आपला दृष्टीकोन.
- एक सर्वसामान्य म.व. भारतीय म्हणुन आपलं आयुष्य किती सरळ रेषेत चालणारं (चाकोरीबद्ध) आहे याची आधी कधी जाणीव झाली नव्हती. सरळ रेषेत आईवडलांच्या कमाईत शिक्षण, २१व्या वर्षापासून नोकरी, वेळेत झालेलं बरं म्हणुन वेळेत केलेलं (अर्थातच सर्व गोष्टी बघून, पाहून वगैरे) लग्न वगैरे वगैरे. नोकरी बिकरी सोडून एक वर्ष बॅकपॅकींग किंवा जगाची सैर वगैरे करण्याची कल्पनाही कधी शिवलेली नाही. जनरीत जनरीत म्हणत आयुष्य कसं निघुन जातं यात काय कमावलं आणि काय गमावलं हे ज्याचं त्यानी ठरवावं.
- उत्सवी सणावारात सतत गुंफलेलं आयुष्य मी कधी अनुभवलं नव्हतं, त्यामुळे तो माझ्या प्रेयसाचा भाग नव्हता. नव-याच्या भावजीवनाचा तो एक अटळ भाग होता आणि आहे.
तिकडे सणवार म्हणजे अंमळ विनोदीच साजरा व्हायचे. म्हणजे उदा. लक्ष्मीपूजनाची लाभदायक वेळ भारतीय प्रमाणवेळेनुसार धरावी की स्थानिक यावर लोकांनी ४ तास घालवले होते. शेवटी प्रत्येकाने आपापल्या सोयीनुसार अर्थ लावला. देव्हारे बहूतेकांकडे नव्हते, कागदी खोक्यांना सजावट करुन त्यावर देवबीव स्थानापन्न होत आणि चिमुकल्या जपानी घरांमध्ये पाहूणे आल्यास देव आरामात टेबलावर जाऊन गाद्या घातल्या जात. तात्पर्य देवही लेकुरवाळे आणि सांसारिक होते. Proud आणि माझ्यासारख्या काफर व्यक्तिला सुद्धा बिना तेलाच्या दिव्यांची (हॉलमध्ये परवानगी नाही या कारणाने) सार्वजनिक गणेशोत्स्वपूजा अधूरी वाटे, आणि धूप दीप अगरबत्ती कापुरांच्या वासांचा भास होऊ लागे.
कॅसेटींवर सत्यनारायणाची पूजा हास्यास्पद वगैरे मानणा-यांनी त्याला ही सन्माननिय अपवाद असु शकतात, आणि ही सगळी nRI's ची थेरं वगैरे म्हणणा-यांनी एकदा त्या मागची शुद्ध भावना आणि भक्ती अनुभवून पहावी. निदान त्यांच्यापुरता तरी त्यांचा धर्म खरा असुदे असं मला या काळात प्रामाणिकपणे वाटायला लागलं.
मुलांसाठी ख्रिसमस आणि दिवाळी दोन्ही साजरी करणारी खूप भारतीय कुटुंब पाहिली.
- जपानमध्ये चोरी/ मगींग वगैरे होण्याचे प्रमाण नगण्य. गजबजलेल्या ट्रेनीत खिशातून मोबाईल चोरीला गेलाय असं होणं सहसा शक्य नाही. इथे राहून आपला जामजिमा (पाकीट, बॅग,पर्स, भ्रमणद्वनी, किल्या इ.इ.)व्यवस्थित सांभाळणे याप्रकाराची सवय कशी मोडते हे आम्ही प्रत्येकजण आपापल्या घरी (१० वेगवेगळ्या देशात) सुट्टीत जाऊन आल्यानंतर हापिसमध्ये बोलत असू हे विशेष नमुद करावेसे वाटते.
ट्रेनमध्ये २दा लॅपटॉप असलेली, महत्वाची कागदपत्र असलेली बॅग विसरुन ती व्यवस्थित परत मिळाली असा आमचा वै. आणि प्रातिनिधीक म्हणता येईल असा अनुभव.
- व्यसनाधीनता. रोज या ना त्या प्रकारचे अल्कोहोल पिणे याला व्यसनाधीनता म्हणता येईल का? प्रत्येक शुक्रवारी दारूच्या अंमलाखाली असणे हा (अलिखीत) व्यावसायिक कायदा. आजारी असताना गोळी घेण्यासाठी सुद्धा बीयर पिणे हा प्रकार मला खरोखरी अनाकलनिय वाटतो.
दारू हा त्यातल्या त्यात कमी उपद्रवी प्रकार असं म्हणावं लागेल असे आणि इतके इतर नशीले पदार्थांचे सेवन करणे हेही सहका-यांच्या बाबतीत खूप पाहिलय. जे लोकं परदेशात शिकले आहेत त्यांना याच्या पुष्ट्यर्थ पानंच्या पानं जोडता येतील. परदेशी सहका-यांच्या शिक्षणाकाळातील रंजक आठवणीतील मानाचे पान हे सेवन केलेल्या द्रव आणि घन पदार्थांबाबत.
देशी लोकातील सर्वात उद्वेगजनक प्रकार म्हणजे शक्य होत नसताना अल्कोहोल सेवन. can't hold the drink. यातुन फार खतरनाक गोष्टी उद्भवू शकतात.
- सामिष/निरामिष असणे. तुम्ही परदेशातील सोशल सर्कल मध्ये किती सामावून जाऊ शकता हे तुमच्या खाद्यजीवनावर अवलंबून आहे. जपानसारख्यादेशात समुद्रातील कुठलाही घटक खाद्यंतीतून वर्ज्य नाही.
वैचारीक दृष्टीकोन व्यापक म्हणताना झुरायचं ते वरण भाताच्या मुदीवरील कडकडीत तुपाच्या खास गंधासाठी यात कमालीची विसंगती आहे आणि ती कबुल करावीच लागेल.
- Melting Pot ज्यात देशोदेशीच्या संस्कृती विलीन होऊन एक आगळं रसायन तयार होतं Vs सॅलड बोल- देशोदेशीच्या संस्कृती आपलं वैविध्य जपत सामील होतात अशा अमेरिकन संस्कृतीच्या प्रवासाबद्दल वाचलं होतं.
परदेशी जाणारी व्यक्ति ही खालील मनोव्यापार अनुभवते:
- grotto, complete denial- बी म्हणतोय तसं गोठलेल्या वाटा. आपली एक कुंपण असलेली settlement करुन राहणे. बाहेरील जगाचा/ संस्कृतीचा (सुविधांबाबत सोडल्यास) स्पर्श आपल्या कुटुंबाला न होऊ देणे. दरम्यानच्या काळात देशातच इतकी सांस्कृतिक उलथापलथ झालेली असते असा मुद्दा खूप जणांच्या प्रतिक्रियेत येतो आहे.
- चाचपणे- खिडक्यांची कवाडं किलकिली करुन थोडी झेपेल इतकी सांस्कृतिक देवाणघेवाण होऊ देणे. स्थानिक पद्धतींशी जुळवून घेणे. Be on the brink of socially acceptable in the foreign culture, yet rooted in your own culture. (शिष्टाचार पाळण्याइतपत परदेशातील संस्कृती आत्मसात करणे, आणि आपली मूळं घट्ट धरून ठेवणे.)
- assimilation- उत्तमरीत्या सामावणे
- go local with a vengeance- more English than a britisher होण्याचा प्रयत्न करणे.

अपूर्ण.... वेळ मिळाला तसे पूर्ण करेन.

- व्यापक दृष्टीकोन, जाणीवेच्या कक्षा विस्तारणे इ.इ माझ्यापुरतं सांगायच तर खरं आहे. सुमारे दहा देशातुन आलेल्या स्त्रीपुरुषांसोबत सतत काम करणे आणि त्यात एकटी भारतीय असणे, आणि कामानिमीत्ताने शेकडो लोकांचे करिअर प्लॅन्स जाणुन घेणे ही माझ्या साठी लेबोरेटरी ठरली खरोखर. Diversity of Thought (विचारांचे वैविध्य),विश्वशांती आणि स्थलकालदेश सापेक्ष मानवी अस्तित्वाचे सार यांची माझ्या मुल्यात भर पडली ती परदेशातील वास्तव्यामुळे.<<<<
याबद्दल डिट्टो!!

उपास, अतिशय सुंदर आणि मुद्देसूद पोस्ट ..

रैना, परदेशातील वास्तव्यातून तू शिकलेल्या, अनुभवलेल्या गोष्टी वाचायला छान वाटतंय ..

उपास, अतिशय छान पोस्ट. 'for here or to go-part 1' म्हणून तुझी पुस्तिका यायला हरकत नाही.
रैना, तुझी ही पोस्ट खूप प्रामाणिक. जपानच्या WLB चा तोच तर ड्रॉबॅक आहे ना. नेटवर्किंगच्या नावाखाली ऑफिस संपल्याबरोबर सहकार्‍यांबरोबर दोन घोट प्यायला बाहेर जावंचं लागतं. न जाणारे ही भरपूर आहेत पण मग ते बाहेर टाकले जातात कॉन्टॅक्ट्समधून. बरेचसं ऑफिस पॉलिटिक्सही बारमध्येच होतं. तात्पर्य हेच की ऑफिस नंतर थोडा वेळ तरी कलिग्सबरोबर घालवणं फायदेशीर असतं. सकाळी गेलेले नवरे कधी घरी येतील ह्याचा खरंच भरवसा नाही. शुक्रवार रात्र म्हणजे ऑफिशियल पार्टी डे. त्यामानाने इथे चांगलं आहे. अधूनमधून पार्ट्या असल्या तरी नवरा ११.३०/१२ पर्यंत घरी येतो.

Pages