परतोनि पाहे (परदेशातून परतलेल्या, परतू इच्छिणा-यांचे अनुभव)

Submitted by रैना on 5 January, 2010 - 01:52

इथे खालील मुद्यांवर चर्चा / अनुभव अपेक्षीत आहे. शक्यतो उपदेशापेक्षा (काय करायला हवं वगैरेंचे डोस) अनुभव लिहा. आपण विचारांती काय निर्णय घेतला, का घेतला आणि तो कसा निभावतो आहोत.

- तुम्ही भारतात का परतलात, परतावसं का वाटलं (नक्की प्राण का तळमळला?) परतल्यावर आता कसं वाटतय ? (व्यक्तिगत बरेवाईट अनुभव, ठेचा, विचारमंथन).
-- तळ्यात मळ्यात- परतावसं वाटतय, हिम्मत होत नाही? दोलायमान परिस्थिती आहे? नवराबायकोपैकी एक अत्यंत नाखुष आहे ?
- परततानाची चेकलिस्ट ( काय करावे आणि करु नये)
- केल्याने देशाटन परदेशात काय मिळवलं, काय गमावलं
-भारतातील संधी, नोकरी, व्यवसाय, आर्थिक परिस्थितीचा आढावा (अनुभव), वर्क लाईफ बॅलन्स (व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याला देता येणारा वेळ)
- मुलं आणि तदनुषंगिक शेकडो गोष्टी ( शाळा, शैक्षणिक पद्धत, पाल्याचा सर्वांगीण विकास, भाषांचा सराव, गणिताचा सराव, वातावरणाचा सराव)
- वृद्ध होत चाललेल्या मातापित्यांची जवाबदारी. पुन्हा एकत्र आल्यावरचे अनुभव. त्यांच्या दृष्टीकोनातून तुमचे परदेशगमन आणि पुनरागमन.
- समाजाचे देणे
- दोहोंचा अनुभव घेतल्यावर आता काय करायचा मानस आहे ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

महेशः

मी कधीही जपान मध्ये गेलो नाही म्हणुन त्या कल्चर विषयी अनभिज्ञ आहे. माझ्या सगळ्या कमेंट्स अमेरीकेतील वास्तव्यावर आधारीत आहेत. इतर बर्‍याच देशांत कामानिमित्त फिरलो पण दीर्घकाळ राहिलो नाही.

तर तुमच्या मानसीक मुद्ध्या बाबत; स्ट्रेस्फ्री किंवा पीस ऑफ माईंड जीवन हे काय असतं याचा अनुभव अमेरीकेतच आला. माझी सौ. तर या बाबतीत माझ्याशी २००% सहमत आहे. भौतीक सुखं तर आहेतच, पण बाकी इतर अनेक गोष्टी आहेत(given), ज्यांच्या प्राप्तीकरता उगाच मगजमारी करावी लागत नाही वा कोणाची दाढी धरावी लागत नाही. प्रामाणिक, सरळ्मार्ग चोखाळलात, तर इथे तुम्हाला कोणाचीही भिती नाही.

विनय :). अगदी हेच मी नवर्‍याला म्हणत असते. आपली मुलं कदाचित चंद्रावर जातील. Happy
शर्मिला म्हणते ते मलाही पटते. मलासुद्धा आपल्याच देशात केरळला / बैंगलोरला भाषेच्या अडथळ्यामुळे मोकळेपणाने रहायला जमणार नाही. इथे मीही गेली ८ वर्षं रहाते आहे. मला काही मानसीक दडपण वगेरे वाटत नाही. नव्याने आले तेंव्हा थोडे बुजल्यासारखे नक्कीच वाटले पण जेंव्हा शिक्षणासाठी / नोकरीसाठी बाहेर पडले तेव्हा असं काही वाटलं नाही.

अगदी खरं बोललात राज. नीट विचार केला की आई बाबा हेच एकमेव कारण उरतं देशाच्या पारड्यात. अर्थात तेही खूप महत्त्वाचं आहे. त्यावर वाद नकोत.

आपण विचारांती काय निर्णय घेतला, का घेतला आणि तो कसा निभावतो आहोत ह्यावर लिहिलं तर इतरांना उपयोगी पडेल. तसेच अमेरिकेतुन वगैरे कायमचं जाताना काय काय उपयोगी वस्तु नेल्यात ते पण सांगा. उदा: मी कधी गेलेच तर लेकासाठी कार सीट नेणार आहे. कारण भारतात सध्या तरी कार सीट्स भयंकर महाग आहेत.

अग पण जाशील तोवर त्याला कारसीटची गरज आहे का हे हि बघुन जा बर Proud हा आता पुढच्याची तयारी असेल तर ठिक आहे Wink

>>नीट विचार केला की आई बाबा हेच एकमेव कारण उरतं देशाच्या पारड्यात. <<
अगदी बरोब्बर. आणि या कारणासाठी जे परत जातात त्यांचा निर्णय आदरणीय.

बर आता जरा मी लिहिण्याचा प्रयत्न करते. Happy

इथे कायम रहाण हे आम्हा दोघांनाही फारस पसंत नाहीये.. कारण अनेक आहेत. त्यामुळे देशी कंपनीचा हात अजुन सोडला नाहिये. मी लग्नानंतर दोन्हीकडे, परदेशी आणि देशी सलग जास्तीतजास्त २,२.५ वर्ष राहिले आहे. त्यामुळे इथे २ वर्ष होउ लागली कि परत जावस वाटत. Proud

विनोदाचा भाग जाउदे पण गेल्या वेळी गेलेलो तेव्हा आता काही परत यायचे नाही असच ठरवलेल पण जळ्ळ मेलं ते रिसेशन ६ महिन्यात अमेरिकेला परत याव लागल. ह्याचा अर्थ असा नाही कि मला इथे आवडत नाही. निवांतपणा, २४ तास माबो, विकेंडला स्वतःसाठी वेळ ह्या देशात दुर्मिळ असणार्‍या गोष्टी इथे अगदी सहज मिळतात.
आता जवळचे मित्र मैत्रिणी नेहेमीच सांगतात कि काय सारख इथे तिथे नाचता. इथेच रहा आता. पण हा निर्णय घेण्याच काही शक्य होत नाही. ह्याचा एक मोट्ठा फायदा म्हणजे कुठल्याही एका जागेची सवय होत नाही. दोन्हीकडे अगदी लगेच एडज्स्ट होतो. हं जुईला त्रास होतो पण ती पण थोड्या दिवसांत बर्‍यापैकी रुळते.
आणि लेकिचा मराठीचा टच आणि इंग्रजीचा एक्सेंट अगदी अबाधीत रहातो Proud ती तर आत्ता सुद्धा देशी आणि अमेरिकन स्टाइल ने बोलु शकते.
सध्या रोज मराठीच्या ५ ओळी लिहायला लावते तेव्हा तिच पहिल वाक्य असत ' मला अमेरिकेतच रहायचय मला मराठी नाही लिहायचय' ह्यावर मी तिला एकच सांगते ' कोण म्हणतय परत जायचय म्हणुन मी तुला मराठी लिहायला लावत्ये. इथे जरी रहायच ठरवल तरी मराठी लिहावच लागणार आहे' Proud
न रहाण्याचे आणि परत जाण्याचे मुद्दे नंतर लिहिन किंवा किरण लिहिल Wink

असो, अजुन तरी परत नक्किच जाउ.
आणि नेहेमी म्हणते तसच परत एकदा, आता जर गेलो तर काही मी अज्जिबात परत येणार नाही Wink

आंतर्जालविषयक कयद्यांबद्दल सचिंत होऊन मी इथले लिखाण उडवले आहे. उगाच मायबोलीवर काही गैर परिणाम होऊ नयेत म्हणून.

आंतर्जालविषयक कयद्यांबद्दल सचिंत होऊन मी इथले लिखाण उडवले आहे. उगाच मायबोलीवर काही गैर परिणाम होऊ नयेत म्हणून.

देसायानुं,
Happy शंभर टक्के पटलं.
मला दोन प्रामाणिक प्रश्न विचारायचे आहेत,
१ साधारण बारातेरा वर्षे अमेरिकेत/परदेशी नोकरी करून भारतात गेल्यावर नोकरी मिळेलच याची खात्री असते का? कि परत जाणारे लोक आधीच नोकरीची तजवीज करून जातात ? सॉफ्टवेयर शिवाय अन्य कामे करणार्‍यांना नोकरी मिळविण्यात अडचणी येतात का? अगदी सॉफ्टवेयर मध्ये ही डी बी ए सारख्या लोकांना खरेच मागणी आहे का?
२ वर्क लाईफ बॅलन्स/कामाला जाण्या येण्याचा वेळ/ वीक एंड/ बद्दल परत गेलेल्या लोकांचे अनुभव काय आहेत?

>>मला सतत उडल्यासारखे वाटते

एकदम पटले.

आणि मंगळावरून परत आल्यावर, फार जड वाटतंय.

असं वाटणारच. त्याला काय पर्याय ?
पण त्यातल्या त्यात इकडून तिकडे, तिकडून इकडे असं फिरणार्‍यांनी आपापल्या ठेचा, युक्त्या, अनुभव लिहिले तर खूप उपयोगी आहे. हा चर्चेचा धागा आवड्ला.

सगळ्यानी मस्त लिहिलय. विनय , ते चंद्रावरच लिहिलय ना ,गम्मत म्हनजे मी पण तसाच विचार करत असते बरेचवेळा. Happy
मी इथ सात वर्षापुर्वी आले. सुरुवातीला आले तेव्हाही आणि आताही करमण्याचा कधी प्रॉब्लेम आला नाही. तुम्हाला कुठलाही छंद असेल (अगदी चालण्याचा सुद्धा) ,काम असेल आणि त्या प्रदेशातली भाषा येत असेल तर तुम्ही तिथ रमु शकता अस मला वाटत. दुसर म्हणजे मी जिथ जाते तिथलीच होवुन रहाण्याचा माझा स्वभाव आहे. हा देश परका अस मी मनात न आणण्याचा जाणिवपुर्वक प्रयत्न केला. After all हा देश इमिग्रंट्सचा आहे. जपान सारख्या देशात मात्र मला हे जमल नसत. त्यामुळ मी इथली सिटिझन नसुनही हा माझा देश , माझ टेक्सास आणि त्यातही आता "माझ डॅल्लस" असच जास्त वाट्त.

समुहा पेक्षा आपण "वेगळे " असल्याचा अनुभव अधुन मधुन येतो. esp तुम्ही इथ शिकत असाल,तसच तुमच Non IT फिल्ड असेल तर तुम्हाला सामावुन घ्यायला त्रास होतोच. बरेच्वेळा त्याचे कारण रेसिझम पेक्षा "कल्चरली तुमच्या व्हॅल्युज" वेगळ्या असण्याच्या जास्त असतो अस जाणवल.
पण भारतातही बेंगलोर मध्ये ट्रेनिंगला(IT ) असताना असे अनुभव आलेले त्यामुळ फारस काही वाटल नाही.
इथही चांगली,वाईट माणस भेटली. फरक जाणवला तो अस कि ,भारतात माणस जोडायला जास्त त्रास होत नाही , पण वाईट अनुभव तिथही येतातच.

मराठी माध्यमात ज्याना आपल्या मुलांना घालायच आहे त्यांच्या विषयी नितांत आदर आहे. पण अस असुनही मी माझ्या मुलाना मराठी माध्यमात घालण्याची शक्यता कमीच वाटते मला. "यकृत" वगैरे शब्दाना इंग्रजीत काय म्हणतात हे पाठ करु पर्यंत नाकीनवु आलेले माझ्या.:)

सध्या तरी मी इथ आहे, तर इथल्याच कल्चर मध्ये स्वतःच वेगळा ग्रुप किंवा मिनि इंडिया करुन रहायच नाही अस ठरवलय. पुर्वग्रह न बाळगता open mind ठेवुन रहायच. मी बघितलय एकदा आपण पुर्वग्रह बाळगुन जनरलायझॅशन करत चाललो कि सामावुन जायला त्रास होतो. बरेच्वेळी stereotypes च्या नावाखाली लोकांविषयी आपण आडाखे बांधत जातो. इतके कि खरा आतला माणुस आपल्याला कळतच नाही. आणि समोरची व्यक्ती तुम्ही बांधलेल्या इमेजचीच प्रतिबिंब वाटते तुम्हाला. So It's better , to give everyone a chance to show "who they really are". मे बी , तुम्हाला तो माणुस आपला वाटेलही. आणि नाही वाटला तर "Next". Happy

मी परत गेले तर फक्त "आई वडिलांसाठीच" जाईन. आम्ही तिघी बहिणी. त्यातल्या आम्ही दोघी इथ अमेरिकेत आणि एक जण नुकतच लग्न होवुन आता आस्ट्रोलियाला जाईल. सध्या तरी आई वडिलाना आमची तिथ गरज नाही.(सहवासासाठी) याला कारण भरपुर नातेवाईक, आई वडिलांचा प्रचंड मोठा लोकसंग्रह. दोघे ही त्यामानान तरूण आहेत आणि महत्वाच म्हणजे उत्तम तब्येत संभाळुन आहेत. Happy
इथ राहुन घरच्यासाठी मला बरच काही करता येत. पण अर्थातच सहवास देता येत नाही. पण जेव्हा त्याना सहवासाची गरज असेल तेव्हा मी परत जाईनच. पण तसही माझी सध्याची उमेदीची वर्ष संपल्यावर मी कुठे रहाणार हे फारस महत्वाच रहात नाहीच. इथच रहाणार, तिथ जमणार नाही असा कसलाच हट्ट त्यामुळ नाही.

गेल्या चार वर्षात भारतातच इतके चेंजेस झाले आहेत , कि तिथ सुद्धा पटकन सामावुन जायला मला अवघड जाईल.
माझ इथल घर सोडुन भारतात जाताना मी माझ्या शेजारणीला सांगते "घरी जाते." आणि तिथ गेल कि माझ्या इथल्या घराच्या आठवणीन मला होमसिक व्हायला होत. मग मी आईला सांगते "मी घरी जाते. " Happy त्यामुळ मला खात्री आहे भारत सोडुन येताना मला जितक वाईट वाटलेल तितकच माझा हा देश सोडुन जातानाही वाटेल.

सगळ्यांचेच प्रतिसाद खुपच छान!

सीमा, तुला अनुमोदन.
मला वैयक्तिकरित्या असं वाटत, तुमचं घर ही अशी एकच जागा असते जिथे तुम्ही सगळ्यात जास्त comfortable असता. मग ते घर जगच्या पाठीवर कुठे का असेना.

आपण आपल्या आयुष्याची २०-२५ वर्ष ज्या देशात काढली त्या देशाबद्दल प्रेम, आपुलकी वाटन खुप सहाजिक आहे. मला इथे येवुन २ च वर्ष झालीत, पण या २ वर्षात एक जाणवलं ठरवलं तर कुठेही रहता येतं आणि ठरवल तर कुठेही अ‍ॅडजस्ट करता येतं.
हे ही तितकच खरं आहे की मला जितक माझ्या भारताबद्दल वाटतं तितकं या देशाबद्दल कधीच वाटलं नाही. कारण आज मी जी आहे, माझं जे qualification/ degree आहे ते सगळ मला माझ्या देशाने दिलं. ते जर नसतं दिलं तर आज कदाचित मी इथे येवुच शकले नसते.
उद्या आपण इथले सिटीझन जरी झालो तरी जगाच्या पाठीवर आपल्याला इंडियन म्हणुनच ओळखतील.

मुद्दा राहीला अ‍ॅडजस्ट करण्याचा, आपण काही बॉर्न फोर अमेरीका म्हणुन नाही जन्माला आलो. इथे आल्यावरही सुरवातीला अ‍ॅडजस्ट व्ह्यायला वेळ लागलाच ना? मग तसाच परत गेल्यावर अ‍ॅडजस्ट व्ह्यायला वेळ लागेल. कदाचित थोड अवधड असेल पण अगदीच जमणार नाही असं काही नाही.
आमच्या ओळखीचे जुन मध्ये फोर गुड भारतात परत गेले इथे १४ वर्ष राहील्यावर. आणि आता एकदम खुश आहेत दोघं त्यांच्या मुलांसकट.

परदेसाई, एक फरक आहे.
आपले वडील, आजोबा जे काही स्थलांतरीत झाले ते भारतातल्या भारतात असे धरुन चालु. आपण इथे ८००० मैलावर आलो आहोत. भारतातुन भारतात नातेवाईकांना भेटायला जाणे आणि इथुन तिथे जाणे ह्यात बराच फरक आहे. निदान मला तरी ते खुप महत्वाचे वाटते की आपण मनात आलो तर भारतात जवळच्या नातेवाईकांना लगेच भेटु शकतो, २ दिवसात परत आपल्या गावी येऊ शकतो. पण इथे राहुन ते होत नाही.

बाकी मुद्दे आहेतच का परत जाईन मी पण फक्त ह्या बद्दल लिहिले.

रैना, महेश, - छान.

रैना, छान बीबी सुरू केला आहेस .. ह्याबद्दल तर आमच्या घरी आणि माझ्या मनात कायमच विचारमंथन चालू असतं .. विचार करून काही उत्तर मिळालं नाही की वाटतं की काहितरी चमत्कार व्हावा आणि एक सकाळ अचानक भारतातच उजाडावी म्हणजे विचार करण्याच्या स्ट्रेस पासून सुटका होईल .. मी आज-उद्याकडे ह्याबद्दल सविस्तर लिहीण्याचा प्रयत्न नक्कीच करेन ..

विनय तुमचं पोस्टही आवडलं ..

सीमा, मिनी छान लिहिलयत.

सुनिधी, अग त्या काळात तो प्रवास तितकाच कठीण आणि खर्चीक होता. मुंबईहुन कोकणातल्या खेड्यात जाणे सोपे नव्हते. आता खुपच टेन्स, बस आणि खेड्यात कुठेही जाणार्‍या एसट्यांमुळे हा प्रवास २ दिवसांत जाउन येता येइल असा झालाय.

आपण इथे ८००० मैलावर आलो आहोत. भारतातुन भारतात नातेवाईकांना भेटायला जाणे आणि इथुन तिथे जाणे ह्यात बराच फरक आहे. निदान मला तरी ते खुप महत्वाचे वाटते की आपण मनात आलो तर भारतात जवळच्या नातेवाईकांना लगेच भेटु शकतो, २ दिवसात परत आपल्या गावी येऊ शकतो. पण इथे राहुन ते होत नाही.>>>>>

होइल ते ही होइल... त्याचीच वाट बघतोय.... Happy

सुनिधी, मी तर उलट ऐकलंय. गेल्यावर भेटायला गेलं की म्हणतात, तुम्ही एवढ्या लांबून आला की आवर्जून येता, लोक इथे असून भेटत नाहीत. Happy इथेच तर आहेत, भेटता येईल कधीही असं करत राहून जात असावं.
सीमा, छान लिहिलंयस.

अगदी अगदी शर्मिला, आम्ही गेलो की आम्हाला म्हणुन पण लोकं भेटायला येतात जे एरवी आई बाबा तिथेच असुनही फिरकत नाहीत. Happy सीमा खरच छान लिहिलं आहेस.

मी म माझी फॅमिली पुर्ण इथे मूव झालो एक १३-१४ वर्षापुर्वी. इथे इतके वर्षे राहिल्यावर इतके मिसळून गेलोय की हेच आपले गाव असे वाटते. हि वेगळी गोष्ट की लहानपणी आलो की अ‍ॅडजस्ट व्हायला प्रॉबलेम न्हव्ता/नसतो.
आज भारतात गेले की छान वाटते तिथे राहयला,आवडते सुद्धा एक आपला देश म्हणून पण काहीच दिवस. कारण कोणीच मित्र मैत्रीणे नाहीत. सर्व नातेवाईक पण इथे,तिथे गेलेत. आई-पप्पांचे पण जवळचे भारतात नाहीत. अगदी १ महिन्याने मी कधी इथे माझ्या घरी येते असे वाटते. तेव्हा जेव्हा कधी कधी ३-४ वर्षातून एकदा भारतात गेलेच तर तो एक महिना मन्सोक्त मजा करून येते. ३ वर्षापुर्वी आम्ही १० वर्षाने प्रथमच एकत्र असे सर्व भाऊ बहिण,आई व पप्पा एकत्र भारतातल्या घरी गेलो. खूप मजा केली. इथे अमेरिकेत राहून सुद्धा सगळे असे एकत्र एकाच घरी कमी भेटतो कारण प्रत्येक जण वेगवेगळ्या स्टेट मध्ये. असो.
तर एकुणात आपण जिथे जाऊ व ज्यास्त काळ जिथे घालवू तिथे मन रमते हळू हळू जर त्या जागेने आपल्याला स्विकारले तर.
दोन्ही बाजूने ओपन अ‍ॅप्रोच असेल तर.तेव्हा हेच एक नमूद करेन की तो देश्,तिथली माणसं ह्यांनी पण आपल्याला जवळ केले तर नक्कीच जगणे सोयिस्कर होते. कुठे जगूच शकत नाही असे होत नाही.फक्त आपणच मोकळा अ‍ॅटिटुड ठेवून चालत नाही,पण आपण एक मोका द्यावा स्वःताला व पहावे.

मी जपान,युरोप सारख्या ठिकाणी बर्‍याच वेळा कामासाठी गेले पण अजुनही मला वाटत नाही की मी तिथे पुर्ण वेळ राहिन का कुणास ठावूक. मला तिथे खूप अवघडल्यासारखे वाटते. गेली ४-५ वर्षात मी एक दोन महिने तरी युरोप, जपान वगैरे राहून आले पण विमान इथे लागले की वाटते घर आले.
अमेरीकेत तसे झाले नाही.

मी भारतात असताना मद्रासला गेले होते एका मैत्रीणीच्या घरी रहायला. तिची आजी रहायची. आम्ही क्लोझ म्हणून मी गेले पण मला जराही इथे फ्रेंडली वाटले नाही. कोणाशी गप्पा मारताना वाटायचे आपणच ज्यास्त बोलतो की काय्.(हे असे १५ एक वर्षापुर्वीचे मद्रास होते, आता माहित नाही.उगाच वाद नकोत) पण मुबंईत आल्यावर बरे वाटले. Happy

वाह, सर्वांनी छान मुद्दे मांडले आहेत.

>>भौतीक सुखं तर आहेतच, पण बाकी इतर अनेक गोष्टी आहेत(given), ज्यांच्या प्राप्तीकरता उगाच मगजमारी >>करावी लागत नाही वा कोणाची दाढी धरावी लागत नाही. प्रामाणिक, सरळ्मार्ग चोखाळलात, तर इथे तुम्हाला >>कोणाचीही भिती नाही.

हे तर बहुतेक सर्वच प्रगत देशांमधे आहे, त्याला पुर्वेकडील देश अपवाद नाहीत. जपान मधे जर टोकियो, ओसाका सारख्या ठिकाणी रहायचे असेल आणि जपानी भाषा येत नसेल तरी आयुष्य खुप खडतर आहे असे नाही.
ज्यांना गंतव्य प्रदेशातली भाषा येते, त्यांच्यासाठी तर तो प्रदेश बर्‍यापैकी सुखावह असतो. मला तिकडे जायच्या आधीपासुन जपानी भाषा येत असल्याने, कधी फारसे problems जाणवले नाहीत.

मनस्विनी यांनी लिहिल्याप्रमाणे, आम्हाला देखील टोकियो एअरपोर्ट वर उतरलो की घरी आल्यासारखे वाटायचे.
तिकडे असताना जी कामे सहज होत असत, त्याला इकडे तेवढी सहजता नाही, हे खरे असले तरी, when you are in India, be Indian या न्यायाने मी येथल्या कामातल्या मजामजा पण एन्जॉय करत आहे. Happy

सीमा, तुझी पोस्ट आवडली. 'In Rome, be a Roman' ह्या उक्तीप्रमाणी राहिल्यास भारतात किंवा बाहेर त्रास व्हायची शक्यता कमी. मिसळायचे नाही, गृप करून रहायचे वगेरे तर कुठेही त्रास होणार. American dream घेऊन अमेरिकेत राहील तर मजा येणार. तिथे असतांना इकडची आठवण आणि इथे असतांना तिकडचे आठवून झुरलो तर काय मजा करणार? शेवटी आपापल्या priorities महत्वाच्या. काही लोकांना अमेरिकेत असतांनाही फक्त धुणी, भांडी घरकाम करण्यात interest असतो. तिथे असण्याचा फायदा फार कमी लोक अनुभवतात.

एकीकडे इथून जाववत नाही. कारण इथले कामाचे तास ७-८ च असतात, अगदी मॅक्झिमम. त्यात कॅनबेराची लोकसंख्या अवघी ३,६०,००० आणि क्षेत्रफळ मुंबईइतके. साहजिकच एका टोकाच्या सबर्बपासून दुसर्‍या टोकापर्यंत जास्तीत्जास्त ४५ मि. जाता येते.

अगदी मालदीवचेच वर्णन..

मीही मालदीव सोडतोय. सहाच महिने झालेत. सहा महिन्यात कंपनीने सगळी प्रोसेस माझ्याकडून सेट करुन घेतली. आता म्हणतात, वी डोन्ट नीड अ फोरीन डोक्टर. लोकल नर्स कॅन मॅनेज.. ( मी हेल्थ इन्शुरन्स मध्ये काम करतो.) .. आता कानाला खडा. लहानसहान देशात फिरकायचे नाही.. त्याना नॉलेज हवे असते, ते मिळाले की झाले, देश लहान असल्याने फार हायर नॉलेजची गरज नसते. थोडे बेसिक्स त्याना पुरतात. लहान देशात कंपनीही एखाद दुसरीच असते, त्यामुळे आपल्याला दुसरी कंपनी धरायचा चान्स असेलच असे नाही...

मला आपण सर्वांचं अतिशय कौतुक वाटतं तिसरे जग ते पहिले जग ही फार अवघड उडी स्वतःच्या बळावर मारायची व कुटुम्ब सांभाळायचे यात खूप मेहनत व मनःस्ताप आहे. त्याचे रिवार्डस अतिशय सिग्निफिकंट आहेत. मग अशी चांगली घडी बसवल्यावर ती मोडावी कशाला? तो वैयक्तिक व अति महत्त्वाचा निर्णय आहे.
खालील काही पर्याय आवडतील का?

१) नोकरीत पुरेसा अनुभव व पात्रता मिळविल्यावर त्या देशांत उद्योजक बनणे. अमेरिकेत सेवा सुविधा पुरविणे ही मोठी गरज आहे. तिथे कंपनी काढ्णे वगैरे ही भारतापेक्षा सोपे आहे.
२) सल्लागार म्हणून व्यवसाय करणे. व गरज पडेल तसे भारतात येणे. ( फॉर द कल्चरल, इमोशनल फिक्स)
३) मुलांना तुम्ही एक उत्तम उत्कर्षाची संधी अमेरिकेत किंवा पहिल्या जगातील देशांत राहून देत आहात. ती त्यांना का नाकारायची. त्यांचा तो हक्क नाही का?
४) भारतातील स्थैर्य आता तितकेसे वाट्त नाही. प्रत्येक राज्यात काहीतरी अस्थिरतेचे प्रश्न आहेत. प्रामुख्याने
लोकसंख्या जास्त असल्याने इकॉलॉजिकल रिसोर्सेस जसे पाणी, हवा, त्या अनुषंगाने वीज यांच्या उपलब्धतेवर
खूप ताण आहे. जो आपल्याला, त्याही पेक्षा मुलांना भोगायला लागणार आहे. सरकारी सेवा सुविधा वर तर बोलणेच नको. साधे कचरा उचलणे वगैरे तुम्हाला पटणार नाही. त्रास होइल.
५) आपला परदेशस्थ माबो करांचा गट जमवून परांजपे स्कीम सारख्या ठिकाणी रिटायरमेंट क्लस्टर्स मध्ये
आत्ता इन्वेस्ट करता येइल जेणे करून मुले मार्गी लागल्यावर आपल्या वयाच्या लोकांबरोबर सुरक्षित पणे राहता येइल. व पुण्याच्या/आपल्या गावाच्या सांस्क्रुतिक जीवनाचा भरपूर आनंद घेता येइल.
६) घर- नोकरी- मुलांचे शिक्षण इथे जमेल ही पण भारतीयांच्या स्वभावाचा,भोचक पणाचा, चलता है व्रुत्तीचा
चौकस पणाचाच राग येइल. डू युवर ओन थिंग हे इथे फार पचत नाही. मला तर परदेशियांचे उत्तम मॅनर्स, दुसर्‍याच्या जीवनात दखल न देण्याची व्रुत्ती पटते. नातेवाइक्स डोन्ट फिगर इन माय डिसिजन मेकिन्ग.
७) आई वडिलांची जबाबदारी, भावनांमुळे परत येणे हे नॉन निगोशिएबल इश्यूज आहेत. ते जनरलाइज करता येणार नाहीत.

आल्दबेस्ट.

Pages