परतोनि पाहे (परदेशातून परतलेल्या, परतू इच्छिणा-यांचे अनुभव)

Submitted by रैना on 5 January, 2010 - 01:52

इथे खालील मुद्यांवर चर्चा / अनुभव अपेक्षीत आहे. शक्यतो उपदेशापेक्षा (काय करायला हवं वगैरेंचे डोस) अनुभव लिहा. आपण विचारांती काय निर्णय घेतला, का घेतला आणि तो कसा निभावतो आहोत.

- तुम्ही भारतात का परतलात, परतावसं का वाटलं (नक्की प्राण का तळमळला?) परतल्यावर आता कसं वाटतय ? (व्यक्तिगत बरेवाईट अनुभव, ठेचा, विचारमंथन).
-- तळ्यात मळ्यात- परतावसं वाटतय, हिम्मत होत नाही? दोलायमान परिस्थिती आहे? नवराबायकोपैकी एक अत्यंत नाखुष आहे ?
- परततानाची चेकलिस्ट ( काय करावे आणि करु नये)
- केल्याने देशाटन परदेशात काय मिळवलं, काय गमावलं
-भारतातील संधी, नोकरी, व्यवसाय, आर्थिक परिस्थितीचा आढावा (अनुभव), वर्क लाईफ बॅलन्स (व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याला देता येणारा वेळ)
- मुलं आणि तदनुषंगिक शेकडो गोष्टी ( शाळा, शैक्षणिक पद्धत, पाल्याचा सर्वांगीण विकास, भाषांचा सराव, गणिताचा सराव, वातावरणाचा सराव)
- वृद्ध होत चाललेल्या मातापित्यांची जवाबदारी. पुन्हा एकत्र आल्यावरचे अनुभव. त्यांच्या दृष्टीकोनातून तुमचे परदेशगमन आणि पुनरागमन.
- समाजाचे देणे
- दोहोंचा अनुभव घेतल्यावर आता काय करायचा मानस आहे ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे xxxxx आपल्यावर राज्य करुन आपल्याला लुटून गेले, आता आपण भारतीय जगभर पसरून यांना लुटू.>> तसं केल तर आपण काय वेगळे हो मग?

मलादेखिल भाग्यश्री सारखेच वाटते. गेल्या १५ वर्षापासुन मी (नवरा १८ वर्षापासुन) अमेरिकेत आहोत. मी जिथे आहे तिथे तर फक्त १,५०,०००च लोक्संख्या आहे. आणि मुख्य म्हणजे सर्व काही व्यवस्थित चाललेले असताना रिस्क घ्यावी का परत जायची? हाच मोठा प्रश्न (भिती) आहे.

>>पण परदेशात कितीही कम्फर्ट असला तरी सतत एक प्रकारचे दडपण असते की आपण परक्यांच्या देशात आहोत, आपल्या हातुन कळत नकळत काही नियम मोडला तर जाणार नाही ना, इ. <<
पटलं नाही बुवा... आपण सगळेच लॉ अबायडिंग सिटिझंस असतो मग दडपण कसले? उलट कायदा आपल्या बाजुने असतो.

अर्थात "आ बैल मुझे मार" अशी वर्तणुक ठेवली तर गोष्ट वेगळी... naughty.gif

आमच्या कुटुंबात माझ्या वडीलाना किंवा बहिणीला इकडे येण्यात अजिबात स्वारस्य नाही. माझ्या पत्नीच्या आई वडील किंवा भावालाही अजिबात स्वारस्य नाही. माझे वडील माझ्या इथल्या तेरा वर्षात मोजुन ४ वेळा इथे आले आणि २ महिन्यापेक्षा जास्त राहिले नाहीत. जेव्हा येतात तेव्हा इथल्या घरी पाउल टाकल्या टाकल्या त्यांचे जाण्याचे प्लॅनिंग सुरु होते Happy मग अशा परिस्थितीत अर्धवट लक्ष इथे आणि तिथे लागुन राहण्यापेक्षा आम्हीच ठरवले लेट्स गो बॅक!

work-life balanace भारतात चांगला नाही आणि अमेरिकेत जास्त चांगला आहे हे तितकसं पटत नाही.
सरसकट सर्व jobs ना हे विधान लागू पडत नाही.
माझा नवरा इथे सुद्धा अनेकदा रात्री १०-११ पर्यंत काम करत असतो. फक्त घरून काम करायचा पर्याय इथे (IT क्षेत्रात) उपलब्ध आहे. भारतात तो पुर्वी उपलब्ध नव्हता.
ह्याउलट, मला भारतात कधीही ८ तासाच्या वर office मधे थांबायला लागलं नाही. ना कधी सुट्टीच्या दिवशी काम पडलं. भारतात असताना सहकारी आणि बॉस बरोबर अतिशय जिव्हाळ्याचे आणि घरगुती संबंध प्रस्थापित झाल्याने, कधी काही अडचण ( Traffic/ खराब हवामानामुळे ऑफिसला उशीरा पोचणे इ.) असेल तर ते सहकार्य करायला तयार असतं.
इथे खराब हवामानामुळे ऑफिसला उशीर होणे ह्यासारख्या अडचणी कोणी समजून घेत नाही. राजकारणं, Groupism इथेही असतं. तो मानवी स्वभावाचा भाग आहे. त्यामुळे कमी-अधिक प्रमाणात सगळीकडे असणारच.

>>माझा नवरा इथे सुद्धा अनेकदा रात्री १०-११ पर्यंत काम करत असतो. <<
पण दिवसाचे १०-१२ किंवा जास्त तास काम असते का? कारण इथे बर्‍याच जणांच्या कामाच्या वेळा फ्लेक्सीबल असतात. वेगवेगळे टाईम झोन्स, डिस्ट्रिब्युटेड टीम्स आणि क्लायंट्सच्या कमीट्मेंट्स या सगळ्यांकरता ती एक आवश्यक बाब बनते. इथेच work-life balanace नीट साधता येतं. माझच ऊदाहरण ध्यायच झाल तर मी या सगळ्यांतुन दिवसाचे ४-५ तास वेगळे काढतो आणि मित्रांबरोबर गॉल्फ खेळतो... dude.gif

सगळ्यांतुन दिवसाचे ४-५ तास वेगळे काढतो आणि मित्रांबरोबर गॉल्फ खेळतो.>>> ओके आय नीड अ जॉब देअर. Happy अ‍ॅन्ड यू नीड द एचार टू मॅनेज धिस Proud

You don't need to manage anybody as long as you manage to make the numbers... smil.png

सोहा तुमच्या मागच्या पोस्टवर रैनाने लिहिले आहे ते मला पटले-
"आपल्याच पॅटर्न मध्ये पोरांना कोंबावे आणि त्यांनाही आपल्यालाच आले ते प्रश्न पडावेत म्हणजे आपण त्यांना मदत करु शकु हे पालक म्हणुन तळमळीने वाटले तरी हे बरोबर नाही"
परदेशात येऊनही इथल्या समाज, संस्कृतीशी जुळवून घेऊन त्यात सहभागी न होता तिकडे असते तसेच एक जग इथे तयार करुन त्यात राहिले की तुम्ही म्हणता ते प्रॉब्लेम होतात. यावर पूर्वी मी एक 'समांतर' नावाचा धागा काढला होता त्याची लिंक मिळाली तर देईन. इथे लहानपणी आलेली वा जन्मलेली मुले इथल्याच समाजाचा भाग होऊन जातात तेव्हा आईवडिलांनी त्यात भाग घेतला तर 'एन्जॉय करायला लिमिटेड गोष्टी' वगैरे जाणवणार नाही.

>> भारतात असताना सहकारी आणि बॉस बरोबर अतिशय जिव्हाळ्याचे आणि घरगुती संबंध प्रस्थापित झाल्याने
इथे व्यावसायिक आणि खाजगी संबंधांची सरमिसळ करत नाहीत. जे योग्य आहे.

>>इथे खराब हवामानामुळे ऑफिसला उशीर होणे ह्यासारख्या अडचणी कोणी समजून घेत नाही
हेसुद्धा नाही पटले. समजून घेतात. उलट जीव धोक्यात घालून येऊ नका असंही सांगतात. अर्थात परिस्थिती तशी असेल तर.

रैना, तुझी पोस्ट आवडली. विचार अगदी छान मांडले आहेस.

सोहा, एक पटत नाही. जेंव्हा रात्री ११ ११ वाजेपर्यंत कामं करतात तेंव्हा नंतर परसनल टाईम तरी घेतात ( ऑफ) आणि जर एखाद्या जॉबवर रोज ११ तास काम कराव लागत असेल तर काँपन्सेशन त्याप्रमाणात असतं ( बोनसेस, स्टॉक ऑप्शन वगैरे) किंवा कोणाच तरी काहि तरी कुठेतरी चुकतं आहे.

भारतात विशेषतः मुंबईसारख्या ठिकाणी जाणंयेणं ह्यात खरच आयुष्याचे खूप तास जातात आणि त्यात घरात, मुलांकडे नोकर्‍याकरून बघणार्‍या आईवडिलांच नेहेमीच कौतुक वाटत.

राज/ आर्च >>हो. माझा नवरा सकाळी ८ वाजता घर सोडतो. आणि संध्याकाळी १० पर्यंत काम अनेकदा असते. शनिवारी आणि रविवारी सुद्धा काम करावं लागतं. कॉम्प-ऑफ वगैरे अजिबात मिळत नाही. आणि हे त्याच्या एकट्याचं नाही तर त्याच्या अनेक colleagues आणि मित्रांची हीच परिस्थिती आहे. तुम्ही लोकं म्हणता तसा work-life balance एके-काळी अमेरिकेत असेलही, पण सध्याच्या मंदीच्या काळात तो अभावानेच दिसतो.
अतिकाम पडते म्हणून कोणाकडे तक्रार केली तर लोक म्हणतात, 'काम आहे हेच चांगलं आहे'.

शर्मिला>> तुमचा मुद्दा पटला. आई-वडिलांनीही इथल्या संगीत, खेळ, चित्रपटात रस घेतला पहिजे. असं करणारे आई-वडिलही बघितले आहेत. पण सर्वांनाच ते जमतं असं नाही.

सोहा,

तुम्ही लिहिलेय ते (शनिवार्/रविवारीही काम) कधी कधी असते का नेहमीच असते? देसी कंपनी आणि एच १ वर असे होणे अगदीच अशक्य नाही.
पण ग्रीनकार्ड्/नागरिकत्व असेल तर असे कोणी करायला भाग पाडत असतील (आणि कोणी करतील) असे वाटत नाही. ती कंपनी असे काही करत असेल तर ते बेकायदेशीर आहे आणि कोणी लेबर डीपार्ट्मेंटकडे तक्रार केल्यास ती गोत्यात येउ शकते.

हा हा हा बर्‍याचशा इंवेस्टमेंट बँक्स मधे सोहा म्हणते तसे वर्क कल्चर आहे. तिथे देसी/अमेरिकन/H1/ग्रीनकार्ड असा भेद मी तरी बघितला नाही. वर्षाखेरीस बोनस मिळतो पण तो सगळ्यांनाच आणि केलेल्या कामाच्या बदल्यात मिळेल असे काही नाही.

कामानिमित्त सगळ्या (फिनांशीयल इन्स्टिट्युट, रीटेल, टेलीकॉम, गव्हर्नमेंट, हेल्थकेअर) कंपन्यांमध्ये जाणे होते. माझ्या पाहण्यात एकच वर्ग जो १०-१२ तासांच्यावर काहीही तक्रार न करता काम करत असतो आणि तो म्हणजे इंडीयन आउट्सोर्सींग कंपनीचा एंम्प्लॉयी. यात डेवलपर पासुन ते प्रॉग्रॅम मॅनेजर आणि मधले, सगळे आले. रीसेशन-नो रीसेशन त्यांना काही फरक पडत नाही. आपलीच माणसं आपल्याच माणसांना असं पीळताना बघुन वाईट वाटतं.

विषयांतराबद्धल क्षमस्व...

राज, पुषकळदा तो फिजिकल प्रेझेन्स असतो कारण कंपनीला पर पर्सन तासानुसार पैसे मिळतात. त्या १०-१२ तासात सगळी लोकं कामं किती करतात ते पाहिलं आहे का?

सोहा म्हणते तो प्रकार असतो काही कंपन्यात इथे सुद्धा. विशेष करून. मजही पण एक चुलत बहिण बॅंकेत नोकरी करते. मला वाटते जॉब वर अवलंबून असते.
पण तरे भारतात खूपच धावपळ असते असे मी बर्‍याच जणांकडून एकलेय. मला अनुभव नाही तिथे नोकरी केलेली नसल्याने.

त्या १०-१२ तासात सगळी लोकं कामं किती करतात ते पाहिलं आहे का?>> कळीचा मुद्दा हो !!!

माझ्या मते भारतापेक्षा अमेरिकेमधे labor laws अधिक सक्तीने वापरले जातात तेंव्हा wlb अधिक तर्‍हेने manage करता येतो, नसेल तर कायदेशीररित्या दाद मागता येते.

..

राज, लॉ अबायडिन्ग सिटिझन्स जरी असलो तरी सुद्धा परक्या देशात कोणीही माणूस कधीच मनमोकळेपणे राहू शकत नाही. मी जे म्हणतो आहे ते वरवरचे materialistic life नाही. ते तर सहज शक्य आहे. मानसिकतेचा विचार करून पहा.

माझ्या ओळखीचा एक मराठी साऊथ जपान मधे researcher होता, त्याच्या हातून दुचाकीवरून जाताना एका म्हातार्‍या बाईला थोडासा धक्का लागला आणि त्याला पुढे अनेक दिवस जे काही जबरदस्त मानसिक त्रास झाला. अगदी कोर्ट केस वगैरे तर झालेच पण जास्त दंड झाला तर, शिक्षा झाली तर असे विचार, तसेच कामाच्या ठिकाणी होणारी टिका, इ. मुळे त्या बिचार्‍याला जगणे मुश्किल झाले होते. त्याला जपानी भाषा येत नव्हती, त्यामुळे अजुनच हाल होते.

कदाचित अमेरिका, युरोप मधे असे problems येत नसावेत. कारण तिकडे भारतीयांची संख्या खुप जास्त आहे, तसेच अनेक काळापासुन रहात आहेत, भाषेचीही फारशी अडचण नसावी. तिकडच्या देशांची आणि पुर्वेकडील देशांची mentality पण खुप वेगळी आहे.

तसे तर discrimination, groupism इकडे (जपानमधे) पण आहे. परदेशी आणि देशी लोकांच्यात सुद्धा.
माझ्या मते पश्चिमेकडे हे जरा जास्त आहे. असे असुनही बाहेर रमणे चांगले कसे ? (रहाणे नाही, रमणे ... फरक लक्षात घ्यावा)

>>परक्या देशात कोणीही माणूस कधीच मनमोकळेपणे राहू शकत नाही.
हे अजिबातच पटले नाही. पुन्हा 'आम्ही रहातो' म्हणावं तर अप्रामाणिकपणाचा आरोप आधीच केलाय. तेव्हा काही सांगण्यात अर्थ नाही.

बर्‍याच छोट्या रिसर्च कंपन्यांमध्ये पण तसेच वर्क कल्चर आहे. वर काहीच मिळत नाही. आणि नुकत्याच सुरु झालेल्या कंपन्या असतील तर आणखिन वाईट परिस्थिती.

शर्मिला, क्षमस्व, आपल्या प्रमाणे अन्य कोणाच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत याकरिता माझ्या लिखाणातील "प्रामाणिकपणाचा" उल्लेख काढला आहे.

महेश मला वाटत तुमचा जो मुद्दा आहे ना मनमोकळा रहाण्याचा तो माझ्या मते कुठल्याही देशापेक्षा भाषेशी निगडीत आहे. ज्या देशाची भाषा आपल्याला अगदी जुजबी येते (जिथे इंग्रजी अजिबात बोलले जात नाहेत असे देश - पूर्व आशिया, युरोप, लॅटीन अमेरीका इ.इ.) आणि जिथे इंग्रजी ही राष्ट्रभाषा आहे अश्या देशात रहण्यात फरक आहे.
ज्या देशाची भाषा आपल्याला नीट येत नाही तिथे रहातांना मानसिक दडपण येते ते आपण नीट संवाद साधु शकत नाही (संवाद- कायदेशीर बाबी, टॅक्स, कामाचे कॉन्ट्रॅक्ट्स इ. इ.) या कारणाने पण इंग्रजी भाषीक देशात ते येत नाही असा माझा स्वतःचा अनुभव आहे.

कदाचित अमेरिका, युरोप मधे असे problems येत नसावेत. >> का नाही येणार? असे प्रॉब्लेम इथेही (अमेरिकेत तरि युरोपचे माहित नाही)बरेच जण फेस करतात की पण, कायदा आणी सुविधा सगळ्यांना अगदी सारखाच आहे,तुम्ही चुक केली तर शिक्षा/दंड आहेच.

सध्या आर्थिक मंदिची झळ सगळिकडेच बसलिय, त्यातही तुम्हि कुठल्या क्षेत्रात आणी कधीपासुन आहात हेही फार महत्वाच.(वर्क कल्चर आणी कामाचे अवर्स संबधात)

रुनी, धन्यवाद. भारतातही कोचीनमध्ये रहाताना मला मोकळेपणा वाटणार नाही. पुन्हा तिथला समाज कसा आहे तुम्हाला कितपत सामावून घेतो, तुम्ही स्वतःहून त्यांना किती समजून घ्यायचा प्रयत्न करता यावर आहे ते. वागण्यात मोकळेपणा कधी येतो? जेव्हा तुम्हाला आजूबाजूला काय आहे हे माहित आहे आणि आत्मविश्वास असतो तेव्हा. त्याचा देशाशी संबंध नाही.

गड्या आपुला गाव बरा, प्राण तळमळला, आईवडिलांना आवडत नाही म्हणून इत्यादी बर्‍याच कारणांसाठी लोक परत जातात. जावोत. (माझा त्याला विरोधही नाही). प्रत्येकजण स्वतःला जे बरोबर वाटेल तेच करतोच..
पण थोडा अजून विचार केलात तर...

मनुष्यच काय प्राणी काय, खाण्यापिण्यामागे भटकणार्‍या जमाती आहेत. 'कशासाठी पोटासाठी' हेच खरे. (खंडाळ्याचा घाटासाठी नव्हे).

अगदी आर्यांपर्यंत जायला नको पण आपल्या स्वतःच्याच चारपाच पिढ्या मागे जाऊन विचार करायला हवा. आता इथे येणार ९० ते ९५% लोक हे मुंबई, पुणे सारख्या शहरातून आलेले असतात (नागपुर, कोल्हापूर वगैरे पण)
आपले वडील, आपले आजोबा, पणजोबा सगळेच तिथेच त्याच गावात जन्माला आले होते का?

या प्रश्नाचं उत्तर नाही हेच येईल. बहुतेकवेळा हेच दिसेल की गावामधे 'पोट भरणार नव्हते', 'शिक्षणाची सोय नव्हती', 'दुष्काळ पडला होता' .. असल्या कारणासाठी त्यांनी स्थलांतर केले होते. स्थलांतर करणारी पहीली पिढी गावाच्या ओढीने रहायची.. म्हणजे गावी पैसे पाठवायची, वेळ मिळाला की गावी जायची... पण पुढच्या पिढीला त्या गावाची ओढ नसतेच.

मग उद्या माझे वडील म्हणाले, की आपण मुंबईचे आहोत, तिकडे परत ये... तर आजोबा म्हणतील 'अरे मुंबईचे नाही, आपण कोकणातले'. मग पणजोबा म्हणतील, 'आपल्या सगळ्या जमिनी कर्नाटकातल्या' तेव्हा आपण तिकडचे. म्हणजे मग मी नक्की कुठचा?

मग जे आपल्या वाडवडिलांनी केले तेच आपण करतोय ना? ते गावातून मुंबईला आले, आपण मुंबईहून अमेरिकेला. आणि आपली पोरं कदाचित अमेरिकेहून मंगळावर जातील, आणि आपल्याला त्यांच्याकडे गेल्यावर म्हणावं लागेल.. 'इथे करमत नाही, गुरुत्वाकर्षण कमी आहे, मला सतत उडल्यासारखे वाटते....' Happy

Pages