लहानपणीचे नसते उद्योग

Submitted by योडी on 3 June, 2009 - 06:28

'लहानपणीचे खेळ' ह्या बीबीवरुन खुप नॉस्टॅल्जिक व्हायला झालं. त्यामुळे हा बीबी ओपन केला. खुप गोष्टी अश्या असतात त्या लहानपणातच केल्या जातात. अश्याच काही गोष्टी, गमती इथे शेअर करु.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय काय उद्योग केलेत लहानपणी........श्शी! मावसबहिणीच्या लग्नात मी व बरोबरीचा मामेभाऊ यांनी काय केले होते ते आठवलं की ...........श्शी! !( आता त्याच्याकडे पाहिलं तर कुण्णालाच खरं नाही वाटणार तो तसले काही उद्योग करत असेल म्हणून! )अस्मादिकही त्याला सामील असायचे नेहेमी!
त्या कार्यालयात अजूनही काही कामं चालू होती. कार्यालय नवं होतं. दार खिडक्यांची काही कामं चालू होती. त्यात लांबी भरलेली होती. शेजारी एका डब्यातही भरलेली होती. लग्न लागून गेलेले होते. जेवणासाठी पाट मांडत होते. (बहुतेक स्पेशल पंगत असावी.........सर्वांनाच पाट होते की काय आता नीट आठवत नाही. फक्त स्पष्ट आठवते ती लांबी!)
आम्ही सर्व भावंडे इकडे तिकडे फिरत होतो. अर्थातच टवाळक्या करत. तेवढयात मामेभावाची नजर लांबीवर गेली. त्याने एवढ्या गर्दीत बर्‍याच पाटांवर लांबी विशिष्ट आकारात(!) घालून ठवली. असं समजा चकली/जिलबीच्या आकारात. लोक जेवायला बसायला आले. काही पटकन बसले.........काहींचे लक्ष गेले. मग जो काही आरडा ओरडा.........किळस आल्यामुळे किंकाळ्या वगैरे! मग नक्की काय आहे कळल्यावर त्या लोकांच्या जरा जिवात जीव आला. मामेभाऊ व आम्ही सर्व वरच्या मजल्यावरून सर्व पहात होतो. अगदी प्रसंगाचा एरियल व्ह्यू! श्शी!

लहानपणी मी एकदा कोंबडीचं पिस उचललं होतं. सुरेख होतं ते... शेजारी मैत्रिण रहात होती तिने सांगितलं की आता तु मरणार.. Uhoh
मग मी रडकुंडीला येऊन तिला विचारलं आता काय करू? ती म्हणाली दर शनिवारी मारूतीला वाटीभर तेल घालून १०१ प्रदक्षिणा घालायच्या.. आता घरात सांगून तर उपयोगच नव्हता.. त्यामुळे बाबांनी कधी खाऊला पैसे दिले तर मी ते साठवून ठेवायची. ही मैत्रिण एकदम रिच्यूअलिस्टिकली शनिवारी माझ्याबरोबर यायची... एका शनिवारी देवळातून ही मुलगी मला अजून कुठेतरी घेऊन गेली... इकडे बाबा शोधून दमले, आल्यावर जी हजेरी घेतली माझी... मग मी सगळं खरंखरं सांगून टाकलं... बाबा जोराजोरात हासले Lol
म्हणाले कोंबडीचं पिस नुसतं हातात घेऊन लोक मरत असते तर अख्खी कोंबडी खाणार्‍यांचं काय व्हायला हवं?
आम्ही शाकाहारी असल्याने ही गोष्ट माझ्या चिमुकल्या डोक्यात आलिच नाही त्यावेळी.

>>>>>''रात को ज्यादा देर हो गयी क्या? तुम लोग चाबी क्यूं नही लेके जाता? बहुत लगा तो नही?''
अकु, हे चुकुन मी ''रात को ज्यादा हो गयी क्या?'' असं वाचलं. त्या अर्थानेही पुढची वाक्य चपखल बसताहेत. Wink

माझ्या दीरांचं लग्न ठरलं होतं. आमच्याच गावातल्या मुलीशी. तर आम्ही सगळे त्या मुलीच्या घरी गेलो. आम्ही जाऊन बसलो वगैरे! जावेच्या घरचे गोळा झाले. आमचीही जॉइंट फॅमिली, त्यांचीही. त्यामुळे ग्रुप्स झाले. मुलं विखुरली. जावेच्या आईने विचारलं, सगळे चहा घेतात ना? आम्ही हो म्हटलं तर त्या म्हणाल्या मुलंही ? मी म्हटलं नाही हो ....मुल नाही घेत चहा. माझी मुलगी दिसेनाशी झाली होती. म्हटलं असेल मुलांमधे खेळत कुठे तरी. तरी म्हटलं एकदा नजर टाकावी. म्हणून मी उठले. तर मला स्वयंपाकघरातलं दृश्य दिसलं. आमच्या बाईसाहेब तिथे मांडा ठोकून बसल्या होत्या आणि दोन्ही हातानी बशी धरून फुर्रर्रर्र करून काही तरी पीत होत्या. समोर खाली जमिनीवर कप ठवलेला होता.
चौकशीअंती कळलं की मुलं चहा घेत नाहीत हे मी ठणकावून सांगितल्यावर ती भराभरा स्वयंपाकघरात गेली होती व जावेच्या आईला म्हणाली, "आजी ,मला घरी कुणी चहा देत नाही. म्हणून मी चहा घेईन"

बरं दुधामधे जंतू जीवाणू असतात (पाश्चरायझेशन शिकवत होते शाळेत तेव्हा बहुतेक!) म्हणून तापवून ठेवलेल्या दुधामधे डेटॉल घालून जंतू नष्ट करायचा उपाय कुणी वापरलाय का इथे???

(आई गं... काय धपाटे पडले होते माझ्या पाठीत त्या दिवशी.)

तिसरी किंवा चौथीत असतानाची गोष्ट. तेव्हा आम्ही कुर्डुवाडीला होतो. गॅसस्टोव्ह हा प्रकार घरात नव्हताच. केरोसिनचे स्टोव्ह असायचे. त्यावेळी पाणी तापवण्यासाठी म्हणुन दगडी कोळशाच्या शेगड्या सर्रास वापरात होत्या. कुर्डुवाडीत एक बाई अशा शेगड्या घरी बनवून विकत असे. ती शेगडी काहीतरी ४५-५० रुपयाला असायची तेव्हा. आईने ऑलरेडी ऑर्डर देवून ठेवली होती. शेगडी आणायच्या दिवशी शेजारच्या अशोक नावाच्या एका सातवीतल्या मुलाबरोबर मला पाठवले. त्याच्याकडे (तो मोठा ना!) ५० रुपये आईने देवून ठेवले होते. त्या आजींच्या घरी गेल्यावर शेगडी ताब्यात घेतली आणि अशोकदादाने थोडी घासाघिस करण्याचा प्रयत्न केला. तो त्या आज्जींना म्हणाला, "माझ्याकडे फक्त ३५ रुपयेच आहेत." त्यावरून मी उसळून म्हणालो, " खोटे कशाला, बोलतोस, आईने ५० रु. दिलेत की."

आज्जींनी शाबासकी दिली आणि घरी आल्यावर आईने पाठीत एक धपाटा घातला. Uhoh

आम्ही लहानपणी चुरमुरे धुतले होते साबणचुरा वापरून ! आईने आत्याला स्वच्छ करायला सांगितले होते, आम्ही इमानदारीत आत्याची मदत करायला गेलो आणि उगाचच शिव्या आणि फटकेही खाल्ले. Sad

मामाच्या लग्नातला किस्सा. आई भलतीच बिझी होती. मी कोणाचे तरी लहान बाळ खेळवायला म्हणून घेतले. त्या बाईनेही आढेवेढे न घेता दिले. मग जरा वेळाने बाळ रडू लागला. मी त्याला कुत्र्यावर बसवले. नेमके ते कुत्रे जरासे चावले त्या बाळाला Sad आईने बड बड बड्वले. शेवटी मामाला दया आली. आता कुठेही जाउ नकोस माझ्या जवळ बसून रहा म्हणाला.
कसलासा विधी चालू होता. चौरंगावर भटजी खारका, सुपार्‍या, विड्याची पाने मांडत होते. एका पानावर मांडून दुसरे पान ठेवे पर्यंत, आधीचे खारीक. खोबरे गडप. भटजी अवाक्. असे तीनदा झाल्यावर त्यांनी मामाला सांगीतले. मामाने कृद्ध नजरेने पहात मला जाब विचारला. मी नकारार्थी मान हलवल्यावर फ्रॉकचे खिसे रिकामे करायला लावले. तोवर दोन खारका संपल्या पण होत्या :-P. मग रट्टा देऊन पून्हा मला पिटाळले खेळायला.

नाकात दाणे, वाटाणे, डाळ अडकवून ठेवून स्वतःचेच डोळे पांढरे करणे हा उद्योग केलाय का कुणी?

वय वर्ष ४. आपलं नाक आतून किती मोठं आहे हे मोजण्यासाठी मी वाटाण्याचा दाणा नाकात घालून तो किती आतपर्यंत जातोय ते बघत होते. मग तो बाहेर येईना आणि माझी हालत खराब. आमची वरात डॉक्टरकडे. आधीच नाक नकटं त्यामुळे डॉक्टरला तो वाटाणा काढताना महा कष्ट पडले. नशीब डॉक्टर नात्यातला काकाच होता त्यामुळे पाउणतास एका उपद्व्यापी कार्टीवर वाया घालवला त्याने.

वाटाणा निघाल्यावर मी पुन्हा नॉर्मलला आले आणि टिपी सुरू केला. आई जी काय चिडलेली होती की ज्याचं नाव ते... Happy

पने Lol

नी, चार दिवसांपूर्वीच माझ्या मुलीने, आर्याने स्वतःच्या नाकात शेव घालून घेतली आणि आमचे डोळे पांढरे केले.:फिदी:

नंदिनी, विशाल Lol
नी : डिट्टो.... मी फक्त बकुळीची फुले, खडू, मोगर्‍याचे फूल वगैरे वगैरे गोष्टी नाकात घातल्या होत्या. डॉक्टरांकडे वारी अर्थातच ओघाने.... तेही बिचारे सरावले होते तोवर माझ्या उपद्व्यापांना..... Proud
पनू Biggrin

हे सगळ्यांचे नसते उद्योग वाचून मजा आली .
मी आणि माझ्या आत्तेबाहीणीने एक धमाल केलेली आठवली. आमचे आजी आजोबा साताऱ्याला राहत असत. तिथे सगळे एकत्र जमायचो ते मुख्यतः काहीतरी धार्मिक कार्यक्रमासाठीच.
लघुरुद्र , महारुद्र, अतिरुद्र, श्राद्ध पक्ष, देव दिवाळी , तुळशीच लग्न ३०-३ दांपत्य, सोवळं ओवळ ह्या सगळ्याचा आम्हाला जाम कंटाळा यायचा. एकदा घरातले सगळे दुपारी झोपले होते तेव्हा आम्ही शेजाऱ्याच्या घरातले देव उचलून हौदामागे असलेल्या नाल्याच्या काठाशी ठेवले होते .
घरी कळलं तेव्हा आमची काय हालत झाली ते वेगळं सांगत नाही.

Pages