लहानपणीचे नसते उद्योग

Submitted by योडी on 3 June, 2009 - 06:28

'लहानपणीचे खेळ' ह्या बीबीवरुन खुप नॉस्टॅल्जिक व्हायला झालं. त्यामुळे हा बीबी ओपन केला. खुप गोष्टी अश्या असतात त्या लहानपणातच केल्या जातात. अश्याच काही गोष्टी, गमती इथे शेअर करु.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी ३री/४थीत असतानाची गोष्ट. त्यावेळी आमच्या कॉलनीच्या बाजुला भरपूर शेतं/माळरानं/पडीक जमीनी होत्या. वस्ती सुद्धा खूप विरळ होती. (आता अगदी शहराच्या मध्यभागी आली आहे कॉलनी).
तर एका पडीक जमीनीवरच्या मोठ्या झाडाच्या फांदीवर गळफास लावून कोणीतरी आत्महत्या केली होती. (कोणीतरी बाहेरचाच माणूस होता.) त्या वयात ह्या गोष्टीचे गांभीर्य कळले नव्हते. पण मृत व्यक्ती कशी दिसते हे बघायची कमालीची उत्सुकता मात्र होती. पोलीस पंचनामा वैगरे चालू होता.
आजचा दिवस त्या बाजूला अजीबात जायचे नाही असे मला आणि माझ्या मित्राला आपापल्या आयांनी बजावून ठेवले होते. त्या बाजूला जायच्या रस्त्यातच माझ्या मित्राचे घर होते आणि त्याची आई त्यांच्या दारातच आमच्या वर लक्ष ठेऊन होती. (आमच्या आयांना पक्की खात्री की आम्ही तिकडे कडमडायला जाणारच Happy )
आणि ते खरच होतं.
मग आम्ही दुसर्‍या बाजूच्या एका शेतात उतरलो. इथुन आम्ही माझे आणि माझ्या मित्राचे घर चुकवू शकत होतो. गुढगाभर चिखलातून वाट तुडवत आम्ही घटनास्थळी येऊन पोहोचलो.
अजुन मृतदेह झाडावरून खाली उतरवला नव्हता. आम्ही त्याच झाडाखाली उभे राहून वर लटकणार्‍या मृतदेहाचे निरीक्षण करत होतो. तेवढ्यात एका हवालदाराचे लक्ष आमच्या कडे गेले. आमच्या दोघांचे बखोट धरून त्यानी आम्हाला मित्राच्या घरी नेले. आणि मित्राच्या आईची "ओ बाई, पोरांकडं लक्ष ठेवा. तुमची पोरं पार तिकडं पोचली तरी तुमला पत्या नाय" अशी त्यांची खरडपट्टी काढली.
मग त्या आम्हा दोघांना घेऊन आमच्याकडे आल्या. आणि दोन्ही आयांनी मिळुन सामुदायीक रित्या आमची धुलाई केली. Sad

कॉलनीच्या बाजुला भरपूर शेतं/माळरानं/पडीक जमीनी होत्या. >>> काय सांगतोस हो?? विश्वास नाही बसत!!

किस्सा डेंजर.. निरिक्षण काय करायचे! Uhoh Proud

तुझ्या किश्श्यावरून आठवले.
मी अभिनव मराठी मध्ये होते. तेव्हा शाळेच्या मागे एक आउटहाऊस सारखे काहीतरी होते. कायम बंद आणि अंधारलेले. शाळेत (का कुणास ठाऊक) सांगून ठेवले होते, की तिथे जायचे नाही. काहीतरी असंच कोणीतरी आत्महत्या केली वगैरे अफवा.. मग आम्ही जायचोच. एकदा असंच निरखून पाहात असताना तिथे दर थोडे किलकिले उघडे दिसले. मग त्यात डोकावून पाहताना हवेत दोन डोळे चमकले! आणि मग भास होत उगीच दोरी वगैरे पण दिसलेली वर लटकलेली.. Uhoh आम्ही जे धूम ठोकून पळून आलो! तिथे बहुधा उंचावर मांजर बसले असावे, आणि त्याचे डोळे चमकले असणार. पण जी भिती बसली त्या एरियाची! बापरे..

>>>> >>> काय सांगतोस हो?? विश्वास नाही बसत!!
हो, तुमच्या जुन्या घराच्या मागेच शेत/पडीक जमीन होती (जिथे आम्ही उड्या मारून उतरलो होतो).
आणि आताची ती शामाप्रसाद मुखर्जी बाग आहेना, तिथेच 'ते' झाड होतं. Proud

काय रे! त्या बागेत मी वॉकला जायचे, तिथे हे झाड..!
सिंडे, शक्यता आहे...
पण एकंदरीत त्या काळात फारच अफवा पसरल्या होत्या व गुढ वातावरण होते. त्यामुळे जास्त घाबरलो आम्ही.. नक्की आठवत नाही, पण काहीतरी हाकामारी म्हणून पण प्रकार होता, व सर्व खिडक्यांवर फुल्या दिसायच्या. काय फंडा होता म्हणे तो?!

पण काहीतरी हाकामारी म्हणून पण प्रकार होता
>> हा हा हा.. हा प्रकार आमच्याही लहानपणी होता..
ती मागून वेगवेगळे आवाज काढून हाका मारते.. आणि विचारते येऊ का.. आपण मागे वळून पाहिलं/हो म्हटलं म्हणजे बस्सा!!
घरावर स्वस्तिक काढल्यावर ती येत नाही..

आणि एक, दारावर 'आस्तिक' लिहिलं की साप येत नाही Lol

कायच्या काय!

लहानपणी शार्पनर असला तरी ब्लेड ने पेन्सिलीला टोक करायला आवडायचा मला.. मग काय ? एकादा आई दुपारी झोपली असताना ब्लेड ने टोक करायला घेतला आणी करन्गली ला कापुन घेतला ... रक्ताची धार लाग्ली हाताला ..
आणी त्यात ही आई ल कळू नये म्हणुन मागच्या दाराने बाथरुम मधे गेले आणी हाथ नळाखाली धरला तर बादली मधे रक्ताचा पाणी .... मग घाबरून आई ला उठवला Happy बरच रक्त गेला होता

नाकात दाणे, वाटाणे, डाळ अडकवून ठेवून स्वतःचेच डोळे पांढरे करणे हा उद्योग केलाय का कुणी?
>>
हा प्रकार मी फक्त नाकात थर्मोकोल कोंबुन केला होता. कुत्र्याचा नाकाला चिकटतोय मग माझ्याच नाकाचा का पडतोय खाली म्हणून पेन्सिलने वरपर्यंत सारुन गच्च बसवला होता. Proud

एकाच मजल्यावर ६ बिर्‍हाडे रहायचो आम्ही. सगळ्यांच्या दाराला letter box ची झडप असायची. एकदा आम्ही शेजारच्या जयवंत फॅमिलीच्या घरी एक पत्र स्वहस्ते लिहून दिले सरकवून आणि त्यात तुमची कार्टी कशी महामाया आहे, नतद्रष्ट आहे, कुचकट आहे वगैरे वगैरे लिहिले होते. वर अक्षर कुणाचे आहे ते नंतर ओळखता येऊ नये म्हणून चक्क डाव्या हाताने वेड्यावाकड्या अक्षरात लिहिले होते. Wink

दुश्मनीचा बदला घ्यायचा म्हणून असे केले ...... Wink

पुढे जाऊन मात्र जयवंतांची गौरी ही माझी खूप छान मैत्रीण झाली. अजूनही आम्ही चांगल्या terms वर आहोत. Happy

आई उन्हाळ्यात दुपारी बाहेर खेळायला सोडायची नाही. मग आम्ही ति झोपली की जायचो ;). एकदा असंच खेळताना डोक्यात माती/वाळु गेलेली. आई उठल्यावर ओरडेल म्हनुन डोकं धुवायचं ठरवलं. मग हौदाच्या नळा खाली डोकं धरुन नळ सोडलं. हौदाचं नळ बादलीच बसेल एवढं खाली होतं. खुप वेळ वाकुन डोकं नळाखाली धरल्यानं कंबरडं अकडल्या सार्खं झालं. मग काय, अस्मादीक भस्स्कन उभं राहाय्ला गेले नि डोकं नळाला जोरात धडकलं... ठाक्क करुन आवाज आला नि फुटलं... डोकं Proud (नळ नव्हे... ते चांगलं पितळीचं होतं :फिदी:) एक कळ सरकली नि ओल्या हाताला रक्त लागलं... Sad आईच्या परत शिव्या खाव्या लाग्नार म्हनुन डोकं परत नळाखाली... !!!! Proud म्हंटलं पटकन रक्त सुद्दा धुवुन घेउत... Wink पण च्यायला ते थांबायलाच तयार नव्हतं... मस्तच कोच पडलेली Sad थोड्या वेळाने साईडला लक्श गेलं तर न्हाणी मध्ये मोरी जवळ सगळंच लाल लाल.. Uhoh अस्मादिकांनी डोकं सोडलं आधी मोरीत पाणी ओतुन ते साफ केलं.... तेवढ्यात आईच जागी होउन आलि नि मोरी, बादली, नळ यांच्या सकट मलाही धुतलं... Proud
डोकं फुटलं ते फुटलं वर मार खाल्ला Angry

कोच पडलेली ??? खोच असा शब्द आहे ना तो?
तेच ते.... Proud

दुसरा किस्सा....
असंच काही तरी उनाडक्या करुन परत घरी कडमडलेलो. आईला समजलेलं म्हणुन ती समोर उभारुन ओरडत होती... म्हंटलं आता मार बसनार. त्यामुळे माझं लक्ष तिच्या बोलण्यापेक्षा तिच्या हाता कडेच होते.. आईला वाटत होतं पोरगं कधी नाय ते मुंडी खाली करुन बोलणी ऐकतंय... इतक्यात तिनं सहज हात हालवला... मला वाटले झाले, पडली झापड गालावर !! Proud मार चुकवावा म्हणुन फट्कन ङोकं मागे स्रकवलं नि खटकन मागच्या भिंतिवरचा खिळा डोक्याला लागला.... मग मी डोक्याला हात धरुन ओरडायला लाग्लो, आईचा राग अजुनच चढला, म्हणतेय मी अजुन मारलेय कुठे... Proud मग रक्ताचा हात पुढे केला तेव्हा कळलं काय झालं ते...

एक चुकवायला गेलो नि दुसरं बसलं... Proud

लहान असताना घरी अगदी निरमा की धुलाई व्हायची , ती देखिल हाती जे काही मिळेल त्याने .. त्यावर मी एक उपाय शोधला.. मला मारायला आले की मी टी.व्ही. कडे जावुन उभा राहायचो.. आणि मग हातातील वस्तुचा टी.व्ही.वर फटका बसेल म्हणून मारहाण (?) आवरती घेतली जायची Happy
नंतर मीच एकदा हे घरातल्यांना सांगीतले.

Rofl
सगळे किस्से महान आहेत.

@ मल्ली- हे अस तु ल्हाणपणी सारख सारख डोसक्यावर लागल्यामुळे तु वेंधळेपणावर असतोस म्हण की. Proud

ईशानने नाकात शेंगदाणा घातला होता. एकच नाकपुडी सुजल्यासारखी दिसत होती. तो तर नीट बघुन पण देत नव्हता. बर त्या शेंगदाण्याचा रंग असा की वाढलेल मांस आहे नाकात. हा प्रकार कालपर्यंत नव्हता आणि आज अचानक कसा प्रकटला हेच कळेना. Uhoh

मग काय ठरलेली डॉ वारी.

>>>>>>>मी फक्त बकुळीची फुले, खडू, मोगर्‍याचे फूल वगैरे वगैरे गोष्टी नाकात घातल्या होत्या.
अकु, या सगळ्या वस्तू (आणि परत वगैरे वगैरे!!!!) तु एकावेळी नाकात घातल्या होत्यास??? काय नाक आहे का कान्हेरी केव्ह्ज Proud

१०-१२ वर्षाची असेल्...आधिच तब्येत किरकाडी असल्याने नेहमी आजारी पडायचे. इंजेक्शन घ्यायला जाम भिती वाटायची...! आख्ख्या विद्यापीठ क्वार्टरला एकच डॉक्टर पोळ. एकदा असच मलेरिया झाला म्हणुन बाबांनी नेले डॉ. पोळांकडे. डॉक्टरांनी सांगितले मात्र की एक इंजेक्शन देतो ....म्हणताच अस्मादिक टेबलावरुन उतरुन सुसाट...! Proud बाबांच्याही हातातुन निसटुन काट्याकुट्यात, शेतात पुरी कॉलनी पालथी घातली. बाबा मागे "अगं आता नाही म्हणतायेत ते डॉक्टर, औषधानेच ठीक होईल म्हणतायेत" ! असं बाबापुता करुन बाबांच्या जवळ गेले मग काय लगेच बाबांनी उचलुन घेतलेच आणि इंजेक्शन काय चुकतेय होय! Happy

किरू Proud

आमच्या ओळखीच्या एका बाईंच्या मुलाला लहानपणी पिंटू म्हणत. त्या एकदा पिंटूला घेऊन दिराकडे गेल्या होत्या. थोड्यावेळाने गप्पाटप्पा झाल्यावर स्त्रिया किचनमध्ये स्वयंपाक करण्यात गुंतल्या आणि मुले दिवाणखान्यात खेळत होती. अचानक दिराचा मुलगा (जो ३-४ वर्षांचा असेल) रडवेला होऊन किचनमध्ये धावत आला आणि सांगू लागला ' पिंटूने विष खाल्लं !!!!!' . हे ऐकता क्षणी बायका धावत बाहेर आल्या.... पाहतात तर पिंटू वेडावाकडा होत होता. त्याच्या आईने घाबरून नक्की काय खाल्लं शोधण्यासाठी इकडे तिकडे पाहिलं.... तर काय मिळालं असेल .... 'व्हिक्स' :). पिंटूच्या चुलतभावाच्या बोबड्या बोलण्याने त्या बायकांची चांगलीच बोबडी वळली होती.

Lol
हा माझा नाही शेजार्‍यांच्या मुलाचा किस्सा..
त्यांना दोन मुलं, धाकटा अगदी लहान म्हणजे तान्हा होता.. आणि थोरला तीन सव्वातीन वर्षाचा होता.
एके दिवशी धाकट्याने जे काही भोकाड पसरलं ते थांबेचना, काही केल्या..
कपाळ आणि नाक तेलकट आणि लालसर झालं होतं त्याचं. मग थोरल्याचा उद्योग
कळला, बाळ डोकं दुखतंय म्हणून रडत असेल म्हणून त्यानं बाळाच्या अख्ख्या तोंडाला स्लोन्स बाम चोपडून ठेवलेला..
वर असं का केलंस म्हणल्यावर आईला उलट उत्तर, काल तु पण लावलास ना? डोकं दुखतंय म्हणून? Uhoh

शाळेत असताना आमचा मुलींचा ग्रुप हे उद्योग करायचा ऑफ लेक्चर ला:

१) निरिक्षण नोंदवणे ==>
वर्गात ऑफ लेक्चर ला कोण कोण काय काय करतंय याचे निरिक्षण करून एका वहीत ते विनोदी ढंगात नोंदवणे.
उदा. जोशी अप्पा दात काढून हसतायत.
ऑफ लेक्चरला आलेल्या मॅडम चष्म्याच्या काचा साफ करतायत.
जयेश अण्णा पुढे मागे डोलतायत.
तृप्तीच्या चेहर्‍यावर ब्र्मम्हानंदी टाळी लागल्याचे भाव आहेत.
शिल्पा अम्मा कर्कटक घेऊन बेंच वर नक्षीकाम करतेय. इ.इ. Lol

२) आगळेवेगळे प्रयोग लिहिणे ==>
शाळेत एक प्रयोगवही असते. त्यात प्रयोगाचे नाव, साहित्य, कृती, निरिक्षण आणि अनुमान अशी माहीती भरायची असते. तर प्रयोगवहीतला कुठलाही प्रयोग घ्यायचा आणि त्यात खालील प्रमाणे बदल करून सर्व प्रयोग नव्याने लिहायचा.
१) स्पिरिटच्या दिव्या ऐवजी गॅसची शेगडी
२) परिक्षानळी ऐवजी बादली
३) ज्या पदार्थावर प्रयोग करायचा आहे त्या ऐवजी वर्गातल्या कोणत्याही मुला/मुलीचे नाव.

उदा.
कृती:
१) झोपे ला बादलीत बसवा.
२) बादली गॅसच्या शेगडीवर ठेवा.
३) ५ मिनिटांपर्यन्त झोपेला उकळू द्या.
४) झोपे चा रंग बदलतो का ते पहा.
५) अधून मधून बादली हलवा.

Rofl

आणि त्याखाली अशाच प्रकारचे विनोदी निरिक्षण आणि अनुमान वगैरे लिहायचे Rofl

मी लहान असताना मामाला मुलगी बघायला मम्मी-पप्पांबरोबर पुण्याला गेलो होतो. सगळा कार्यक्रम अगदी छान झाला. त्यांनी खायला पोहे, ईडली-सांबार, थंडाई असा बेत केला होता.ते सर्व खाऊन, मुलगी पाहुन झाल्यावर सर्व बडी मंडळी निरोप घेऊ लागले, एव्हढ्यात मी पचकलो-"थांबा की अजुन चहा कुठे दिलाय त्यांनी..." अरेरे मुलीकडच्यांचा चेहरा बघण्यालायक झाला होता. झक मारत त्यांना चहा करावा लगला. Biggrin
अर्थात त्या मुलीशी मामाचे लग्न झाले नाही(बहुधा ज्या घरातली लहान मुले एव्हढी वात्रट तिथली मोठी मोणसे काय असतील असा धास्तावलेला विचार मुलीकडच्यांनी केला असावा :खोखो:)

हा किस्सा माझ्या वडीलांच्या लहानपणी घडलेला.
वडील तेव्हा पाच-सहा वर्षांचे असावेत. माझी आजी त्यांना आपल्या माहेरच्या गावी, कोकणात घेऊन गेली होती तेव्हाचा हा प्रसंग.
आजी सहसा माहेरी जात नसे. पुण्याहून तिच्या गावी जायला बरीच यातायात करावी लागे. शिवाय माहेरी तिच्या भावाची आर्थिक परिस्थिती अगदीच बेताची होती. त्याला उगाच अजून कशाला खर्चात पाडा, म्हणून ती मानी स्त्री वर्षानुवर्षे माहेरी फिरकत नसे.
पण बर्‍याच वर्षांनी, म्हणजे माझ्या वडीलांच्या जन्मानंतर पहिल्यांदाच, त्यांना सोबत घेऊन ती माहेरी आलेली.
कोकणातले टिपिकल कौलारू घर, मागे गोठा. वडीलांच्याच वयाची त्यांची मामेबहीण होती...ते दोघे ह्या गोठ्यात तासन् तास मांजरींच्या पिल्लांशी किंवा गायीच्या वासराशी खेळत बसत. दोघेही दिवसातून अनेकदा गोठ्यात गायब होत. मग त्यांना बखोट धरून घरात आणावे लागे.
त्या दोघा भावंडांची ''आपली गंमत कोण्णा कोणाला सांगायची नाही'' स्टाईल वाक्ये दोन-तीनदा माझ्या आजीच्या कानावर पडली पण तिने कामात असल्यामुळे दुर्लक्ष केले. त्या दोघांना गोठ्यातील एका कोपर्‍यात ठेवलेल्या टोपलीच्या जवळ खेळताना तिने अनेकदा पाहिले होते. तेव्हा तिला त्यात काही विशेष वाटले नाही. पण एकदा तिला त्यांचा हळूच फुसफुसत्या स्वरात चाललेला संवाद ऐकू आला आणि तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. तिने पोरांना जवळ बोलावले आणि त्यांची ''गंमत'' नक्की काय आहे ह्याची चौकशी केली. त्यांचे बोलणे ऐकल्यावर तिच्या चेहर्‍याचा रंगच पालटला....तिने हातात एक कोयता घेतला आणि त्यांना दूर उभे राहायला सांगून गोठ्यात आली. तेथील एका कोपर्‍यात एक टोपली उपडी टाकलेली होती. आणि त्या टोपलीखालीच माझ्या वडीलांची व त्यांच्या मामेबहिणीची मोठ्या प्रयत्नाने गुप्त ठेवलेली, त्यांच्या रोजच्या खेळण्याचा मुख्य भाग असलेली, त्यांच्या बालमतानुसार ''पाळीव'' अशी हिरवीगार ''गंमत'' वळवळत होती. आजीने टोपली उचलली, आत झाकून ठेवलेल्या फुरशाच्या (हिरव्यागार रंगाचा अतिशय जहरीला, कमालीचा चपळ साप) पिल्लावर सपासप कोयत्याचे वार केले, त्याचे और्ध्वदेहिक उरकले आणि मग मात्र आपल्या पुत्ररत्नाकडे मोर्चा वळवला!!

माझे वडील त्यांनी तेव्हा खाल्लेला अशक्य मार आठवला की अजूनही कळवळतात! Proud

लहानपणी मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही बरीच भावंडे एकत्र जमायचो. त्यातल्या त्यात घाबरट भिडूला घाबरवण्याचा एक एपिसोड हमखास रंगायचा...दर वर्षी.
रात्री जरा निजानीज झाली की हा खेळ सुरू व्हायचा. एकाने पूर्ण काळं कुट्ट घोंगडं पांघरायचं. सगळे दिवे बंद करायचे. तोंडात दोन्ही ओठांच्यात अलगद एकेक मुरमुरा लावायचा. बाहेर आलेल्या दातासारखं भयानक दिसतं ते. अगदी ओठांच्या या टोकापासून ते त्या टोका पर्यंत.
भित्र्या भिडूला काही ना काही कारणाने त्या अंधार्‍या खोलीत पाठवायचे. की आतलं भूत अगदी चित्रविचित्र हालचाली/ जमेल तसे भयानक आवाज काढून या भि.भि.ची अगदी तंतरून सोडायचे.
यातही हा भुताचा पार्ट करणारा जर फारच भारी व अनुभवी भिडू असेल तर तो पेटती उदबत्तीही तोंडात (पेटता भाग अलगद तोंडात) ठेवायचा. या सार्‍याचा अंधार्‍या खोलीत जो काही इफेक्ट यायचा ........भि. भि. परत पूर्ण सुट्टीभर त्या खोलीत फिरकायचा नाही.

Pages