मरणोत्तर अन्तिमसन्स्कारान्चे अनुभव व त्यावरील भाष्य

Submitted by limbutimbu on 18 June, 2009 - 04:15

मरणोत्तर अन्तिमसन्स्कारान्चे अनुभव व त्यावरील भाष्य

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अन मग कशासाठी शिल्लक?/?>>

बोवाजी मैं हूं ना !!

येथे अमेरिकेत अंत्यसंस्कार हाही एक व्यवसाय आहे, व जुडिओ ख्रिस्चन धर्मांत शरीराला विशेष महत्त्व आहे. माझा येथील अंत्यसंस्काराचा अनुभव लिहित आहे, ज्यामुळे तुम्हाला याची थोडीशी कल्पना येऊ शकेल, पण टायपायला फार वेळ लागत आहे.

माझ्यावर हा प्रसंग आला २००६ मधे. माझ्या नवर्‍याला रविवारी रात्री अचानकपणे हृदयविकाराचा झटका आला. ९११ ला फोन करून बोलावले, मोठा मुलगा, शेजारी मित्र व मी ambulance च्या मागून हॉस्पिटलमधे गेलो. मित्राने माझी फोनची डायरी घेऊन काही मित्र व भावाला फोन करून त्यांना अ‍ॅडमिट केल्याचे कळवले व साधारण दीड तासाने डॉक्टरांनी आम्हाला वाईट बातमी दिली. साधारण तासाभरात मित्राने मराठी मंडळातले दहा मित्र गोळा केले. एक दोघांनीच येथील अंत्यसंस्कार प्रत्यक्ष बघितले होते. एका मित्राने मला आमच्या जवळपासच्या funeral homes ची यादी दाखवली व पैकी एकात तो पूर्वी गेला असल्याचे सांगितले. तिथे हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार केलेले त्याने पाहिले होते. मला त्या अवस्थेत काहीही सुचत नव्हते, पण बॉडी कुठे न्यायची हे सांगितल्याशिवाय आम्हाला बघायलाही मिळणार नव्हती. आधीच बसलेल्या धक्क्याने माझं डोकं बधीर झाले होते, मी मान डोलावली, कागदपत्रांवर सह्या केल्या. मग आम्हाला दर्शन घेऊ दिले व थोड्याच वेळात तेथून जायला सांगितले. मेडिकल इन्शुअरन्सच्या कागदपत्रांवर सह्या झाल्यावर एका मित्राने मला व मुलाला पहाटे पाचला घरी आणले. Funeral Home ला सकाळी नऊची वेळ ठरवली होती व भाऊ आठ वाजता फ्लोरिडाहून विमानाने येणार होता.
क्रमशः

घरी आल्यावर थोडी फोनाफोनी केली आणि एका शेजारणीने धाकट्या मुलाला घरी आणून सोडले. भाऊ ठरल्याप्रमाणे आला आणि पुन्हा बरेच मित्रमैत्रिणीही जमले. कोणीतरी देवळात फोन करून गुरुजी कधी येऊ शकतील याची चौकशी केली. तीन चार मित्र, भाऊ आणि मी funeral home ला गेलो. तिथे आम्हाला पहिल्याप्रथम तारीख ठरवायला लागली. भारतातून घरचे कोणीही येण्यासारखे नव्हते, त्यामुळे मी लवकरात लवकर कधी विधी करता येतील, असे विचारता, गुरुवारची तारीख मिळाली फक्त दोन तासासाठी. गुरुजीही त्यादिवशी available होते. पार्थिव viewing साठी ठेवायचे असेल तर गुरुवार चालणार नाही, मग पुढच्या आठवड्यातील तारीख मिळेल असे कळले. याचा अर्थ काय ते नंतरच कळले.
यानंतर एका भल्यामोठ्या catalog मधून अनेक गोष्टी व services निवडायला सांगितल्या. विद्युत दाहिनी वापरणार असूनही casket, urn कशासाठी ह्याला काही समाधानकारक उत्तर मिळाले नाही, पण ते निवडलेच पाहिजेत असे सांगितले. माझ्या बधीर झालेल्या डोक्याला काहीही समजत नव्हते, पण मित्रांना आणि भावालाही काहीच माहित नव्हते. आम्ही सर्व एकमेकांकडे नुसते बघत होतो. शेवटी त्या बाईने माझी अवस्था ओळखून सगळ्यात साधे casket, urn व services सुचवले आणि क्रेडिट कार्ड घेतले. दुसर्‍या दिवशीची वेळ family viewing साठी दिली.
क्रमशः

दुसर्‍या दिवशी family viewing साठी तोपर्यंत लांबून आलेले भाऊ, भावजय, ह्यांचे चुलतभाऊ, वहिनी, मुले आणि मी गेलो व आम्हाला पार्थिवाचे दर्शन घ्यायला मिळाले.
Funeral ची गुरुवारची वेळ गुरुजींना कळवली होती, त्यांना लागणारे सामान ते आणणार होते, पण पांढरे कापड, फुले, फोटो व इतर बारीकसारीक सामान घरून न्यायचे होते. क्रियाकर्म कोण करणार, तर मुंज झालेला मुलगा आहे, तो करेल हे गुरुजींनी मान्य केले. ह्यांचा एकट्याचा फोटो काही सापडेना, म्हणून digital camera वापरून मीच एका ग्रूप फोटोतला ह्यांचा फोटो काढला व एका मैत्रिणीला प्रिंट करून आणायला सांगितला. बाकी सारे सामानही कोणाकोणाला सांगून जमवून ठेवले.
मराठी मंडळाच्या अध्यक्षाला crowd control साठी तयार रहायला सांगितले, कारण आमच्याकडे दोनच तास होते.
गुरुवारी सकाळी ठरल्या वेळेला funeral home मधे पोचलो, गुरुजीही तिथे हजर होतेच. गुरुजींनी बॉडी आणायला सांगितली, तर एका लहानशा डब्यात अस्थी आणल्या गेल्या. आम्हा सर्वांची तोपर्यंत अशी समजूत होती की गुरुजी काही मंत्र वगैरे म्हणून मग मुलगा बटण दाबून दहनक्रिया चालू होईल, तर असे सांगण्यात आले की तुम्ही viewing, long process निवडली नाही, तर आम्ही असेच करतो. गुरुजींना याची कल्पना होती, व त्यांनी त्यावरही उपाय आहे, असे म्हणून पुढची क्रिया अस्थींवरच करू असे सांगितले. ६ वर्षांचा मुलगा कसे काय हे करणार हा त्यांना प्रश्न होता, पण मोठा मुलगा १३ वर्षाचा पुढे आला तेव्हा काही अडचण नाही असे गुरुजी म्हणाले. माझ्या मुलाने गुरुजींच्या सांगण्याप्रमाणे सर्व व्यवस्थित केले, गुरुजींनी मला व मुलांना प्रदक्षिणा घालायला सांगितली, मग हजर असलेल्या सर्वांनी हार, फुले वाहिली. गुरुजींनी मला पुढे घरी कायकाय व कधी कसे करायचे याची माहिती दिली. श्राद्धाच्या दिवशी ते घरी येणार होतेच. काही मित्र, ह्यांच्या ऑफिसमधले सहकारी, मुलांच्या शाळेतले शिक्षक, माझे चुलत दीर, जाऊ यांची भाषणे झाली. हजर असलेला प्रत्येकजण मला सांत्वनासाठी भेटून, वहीत नोंद करून गेला/गेली.
यातील सर्वात अवघड भाग वाटला तो म्हणजे मला किंवा आमच्या मित्रमंडळींना ह्यातला काहीच अनुभव नव्हता. वेळ आल्यावर पटापट निर्णय मात्र घ्यावेच लागतात. येथे आल्यामुळे आपण भारतात घडणार्‍या लग्न, मुंजीना तर मुकलेले असतोच, पण क्रियाकर्म, सांत्वनाला जाणे, याही गोष्टींपासून पूर्णपणे बाजूला रहातो.

स्वातीजी, आपला अनुभव अवघड आहे. आता तुम्ही कुठे असता? इथे एक एकटे पालक आधार गट आहे. तिथे आपले स्वागतच आहे. जरूर आपले पालकत्वाचे अनुभव शेअर करा. मुलांवर या सगळ्याचा काय परिणाम झाला. अहोंचे वय काय होते? माझे यजमान ५२ वरषांचे होते तेन्वा त्याना पहिलाच जोराचा अ‍ॅटॅक आला.
यातून बाहेर निघायला आपल्याला कशाची मदत झाली? मी एका मैत्रीच्या भावनेतून विचारते आहे. आपल्या प्रायवसीची मला जाणीव आहे.

मृत्यु नंतर १३ दिवस आत्मा कुटुंबाजवळ स्वजनांजवळच असतो. व त्यानंतर संस्कारानंतर त्यास गती मिळते. आणि कर्मा नुसार पुनर्जन्म प्राप्त होतो. असे ऐकले आहे. याविषयी अधिक माहिती असल्यास जाणकारांनी मार्गदर्शन करावे.

बाकी बर्‍याच धर्मात मरणोत्तर पुरतात - हिंदूंमध्ये मात्र जाळतात (सरसकट नाही - बर्‍याच जातीत)
असं का?

मला शास्त्रिय कारण माहीत नाही.
पंचतत्वाला हिंदुविचारसरणीत अनन्य महत्व आहे.सृष्टी आणि सजिव हा पंचमहाभुताचा खेळ आहे.माणसाचे शरीर पंचतत्वापासुनच बनतं म्हणुन शेवटी पंचत्वातच विलिन केल जात असावं असे वाटते.

हे हे हे.. that was a good answer..
पण अग, मी माझ्या एका मुसलमान कलिगला विचारलेलं की तुम्हाला जागेचा प्रश्न येत नाही का- तर तो म्हणाला की त्यांच्यात एकावर एक पुरतात.. म्हणजे ७-८ महिन्यातच!

एकदा वाटतं - की साथीच्या रोगानं बरीच माणसं मेल्यानं ही प्रथा पडली असण्याची शक्यता आहे (जेणे करून त्या माणसांबरोबर रोगजंतूही नष्ट व्हावेत)
पण मग हाच प्रोब्लेम इतर धर्माच्या लोकांनाही येत असेलच ना?

आणखी एक म्हणजे, जर विचार केला ना तर वाटतं - आज आपण जे कोळसे इंधन म्हणून वापरतो - आपल्याला जी माती सुपिक वाटते - त्या सगळ्यात पुर्वीच्या गेलेल्या जीवांचा(झाडं/प्राणी) अंश आहे.
मग आपल्याला जे निसर्गाकडून मिळालं ते जाताना त्यालाच परत करायचं हे जास्त योग्य वाटतं - म्हणजे we live again through it - the way we live through our kids/grandkids etc.

गंगाधर, तुमचं उत्तर मगाशी नव्हतं.मी वरचं पोस्ट केल्यानंतर दिसलं.
माझा प्रश्नः पुरल्यावर पण आपण पंचतत्वातच विलीन होतो ना? (कदाचित जास्त चांगल्या प्रकारे?)

अग्नी, वायू, आकाश, पृथ्वी, जल..
पुरण्याच्या प्रक्रियेत माणूस जमीनीत जाईल (पृथ्वी तत्व)
आणि मग त्यातून पुन्हा नवे कोंब येतील..
पण अग्नी तत्वातून नंतर राखेशिवाय काहीच रहात नाही..

नानबा, इथे यासंदर्भातली माहिती आहे पहा.

इतर धर्मांत ही प्रथा का नाही याचीही कारणं शोधायचा प्रयत्न केला आहे तिथे. माझ्या मते हवामान हे ही एक कारण असू शकेल. इस्लाम वाळवंटात स्थापला गेला. गरम वाळूत शव लवकर डीकम्पोज होत असावं. भारताचं समशीतोष्ण हवामान जीवजंतूंना अनुकूल असेल का? जाणत्यांनी अधिक माहिती द्यावी.

नानबा-
उष्णकटीबंधातील प्रदेश, सुर्य आणि अग्निला जीवनातील प्रत्येक "rites of passage" (शब्द साभार कॅम्पबेल) मध्ये अनन्यसाधारण महत्व आहे.
वासांसी जीर्णानी वगैरे वाल्या आत्म्याची शुद्धी अग्निने होते. आत्मा शरीर सोडून गेला तरी आसपास असतो, त्याला पुढील कायाप्रवेशात मदत व्हावी आणि मागे ठेवलेले सर्व बंध नष्ट व्हावे म्हणुन १३ दिवस दिवा.
आता याबद्दलचे स्पष्टीकरण मृत्युनंतर शरीराचे चुंबकीय किरण (?) मागे राहतात ते १३ दिवसात नष्ट होतात इथपासुन ते सरळ सरळ शोकाच्या क्रियेचे द्योतक म्हणुन इथपर्यंत आहेत.

पण अग्नी तत्वातून नंतर राखेशिवाय काहीच रहात नाही.
नानबा,
शरीर अग्नित जळतं,
धुर आकाशात पसरतो आणि वायुत समरस होतो,
राख पृथ्वीवर उरते, आणि अस्थी जलात विसर्जीत करतात.
बहुतेक याला म्हणत असावं पंचतत्वात विलीन.
.....................................
बाकी मनुष्यप्राण्याची सभोवतालची भौगोलीक परिस्थीती हे तर महत्वाचे कारण आहेच.

शरीर अग्नित जळतं,
धुर आकाशात पसरतो आणि वायुत समरस होतो,
राख पृथ्वीवर उरते, आणि अस्थी जलात विसर्जीत करतात.
बहुतेक याला म्हणत असावं पंचतत्वात विलीन.

हं.. आपण लिहीलेलं निश्चित विचार करण्यासारखं आहे.

मला वाटते एकदा प्राण गेला, कि शरीर पंचतत्वात विलीन व्हायला सुरवात होते. काही करा किंवा करु नका. (except preservation) . तेंव्हा जाळा किंवा पुरा काही फारसा फरक पडत नाही. पुरले तर bacteria काम करत्तात जाळले तर....

शरीर हे अणुरेणु नी बनले आहे आणि विघट्न झाल्यावर ते त्याच आणि तेवढ्याच प्रमाणात वातावरणात परत जाते.

थोड्क्यात शेणाच्या गोवर्या करुन जाळले, किंवा गोबर गैस करुन जाळला शेवटी जेवढा कार्बन होता तेवढाच ( equivalent CO2 तयार होतो. तेवढीच राख शिल्लक रहाते... (गैस जाळल्यावर राख रहात नाही, पण त्याचे solid waste परत निसर्गात ( जाउन decompose होते.)

कार्बन आणि नायट्रोजन चक्र आहे हे..... Happy

निवांत साहेब एकदम पटेश!
फक्त गंगाधरांनी जो अर्थ सांगितला ना - तो "हिंदू धर्मात अशी प्रथा का पडली असावी " ह्याच्या विवेचनासाठी असावा, असं मला वाटतंय. त्या दृष्टीनं त्यांनी दिलेला अर्थ बरोबर वाटतो.

<<मला वाटते एकदा प्राण गेला, कि शरीर पंचतत्वात विलीन व्हायला सुरवात होते. काही करा किंवा करु नका.>>
या बॉयोलॉजीक विघटन मार्गाने पंचतत्वात विलीन व्हायला खुप मोठ्ठा कालावधी लागतो. कदाचीत काही वर्षे सुद्धा.
त्यातुलनेने अग्निसंस्कार आणि अस्थीविसर्जन हा सोपा शॉर्टकट.५-६ तासात हमखास पंचतत्वात विलीन करुन मोकळे. Happy

लिंबूटिंबू: तुझी या व अनेक विषयांवरची मते पटतात. गोष्टींकडे पाहण्याचा वेगळा दृष्टीकोन मिळतो.

अश्विनिमामी यांस: तुम्ही हे सगळं लिहिण्याचं धाडस केलंत हीच मोठी गोष्ट आहे. माझे दोन्ही आजोबा (आजोबा व त्यांचे बंधू) गेले तेव्हा मी अगदीच लहान होतो त्यामुळे मला स्मशानात नेलं नाही कुणी. पण आजोळचे आजोबा गेले तेव्हा मी तेरावीत होतो, पण स्मशानात जायचं ह्या भीतीने सरळ क्लास ला निघून गेलो होतो.

गंगाधर मुटे यांस: तुमचं पंचतत्वात विलीन ह्यावरच स्पष्टीकरण पटलं.

मंदार धन्यवाद. अरे खरे तर स्मशानात फार भीतीदायक काहीच नसते. मध्ये एक अनुभव आला. माझ्या घराच्या रस्त्यावरच एक स्मशान आहे. व त्याच्या पुढ्यात कबरी आहेत. खूप जोरात पाउस येत होता व मी स्कूटर वरून येत होते तिथे पाहिले तर एकच चिता जळत होती. बरोबर कोणीच नव्हते. मला एक क्षण वाट्ले तिथे थांबावे तो जो कोण तिथे आहे त्याच्या सोबत. तो जाइपरेन्त. शेवट हाच आहे हे इत्के निश्चित आहे की त्यात घाबरायचे काय.

सध्या तर एलेक्ट्रिक दहनामुळे सर्व सोपे झाले आहे. तरीही दत्तक आईला घेऊन गेलो होतो तेव्हा बाहेर थांबलो होतो सर्व. दाहिनीच्या चिमणीतून एक मोठा धूराचा लोट बाहेर पड्ला. तेव्हा अगदी नक्की वाट्ले ' दॅट वॉज माय मदर. " या भावनेला काही तोड्च नाही.

अर्थात हे प्रसंग आपल्याला अंतरबाह्य बदलू शकतात त्यामुळे लाइट्ली घेऊ नये व त्रास होत असल्यास कोणाला तरी सांगावे जरूर.

मला वाटतं -
१] स्मशानात एकदा सोपस्कार सुरू झाले कीं वातावरण आपोआपच "इंपर्सनल" होतं व त्यामुळे मॄताच्या जवळच्या नातेवाईकानासुद्धा दु:खावेगातून बाहेर येणं सोपं होतं;
२] हल्लीं मुंबईला तरी स्त्रिया सर्रास स्मशानभूमित जातात व हे सर्वमान्य झालं आहे;
३] "स्मशान वैराग्य' हा व्यक्तीनुसार बदलणारा प्रकार आहे. स्मशानात गेल्यामुळेच यांत विशेष फरक पडत नसावा;
४] स्मशानातलं वातावरण बागेसारखं प्रसन्न असावं हा विचार आतां जोर धरतो आहे व तसे प्रयत्नही केले जाताहेत. ह्यामुळे, पारंपारीक स्मशानाची भयाणता जावून तिथल्या वातावरणामुळे वाढणारं "डीप्रेशन" कमी होईल;
५] अकाली ,अपघाती इ. मॄत्यु सोडल्यास इतर स्वाभाविक मॄत्युविषयीं अगदीं नजिकची मंडळी सोडल्यास
इतरानी उगीचच दु:खावेग दाखवण्याची खरंच गरज नसावी. त्यामुळे, वातावरण अकारण भयाण होतं व नजीकच्यांवर त्याचा उलट परिणाम होतो;
६] इलेक्ट्रीक दहन तर आतां सर्वमान्य होतच आलंय, हेही चांगलंच आहे.

मुंबईतल्या दफन पेट्या [कॉफीन्स ] बनवणार्‍या कांही दुकानाबहेरच्या पाट्या अशा होत्या [अजूनही असाव्यात]- "ड्रॉप ईन, बीफोर यू ड्रॉप डेड " " यूवर लास्ट स्टॉप !". मॄत्यु ही संकल्पनाच भयावह असली तरी विनोदाचा मेक-अप करून ती सुसह्य करण्यात कां अडचण यावी !

३/४ महीन्यांपुर्वी माझे वडिल वारले. मला भाऊ नसल्याने माझ्या वडिलांना अग्नि कोणी द्यावा हा प्रश्न होता. काही कारणाने माझ्या चुलत भावांना जमले नाही आणि काही अपरिहार्य कारणाने माझ्या यजमानांनाही जमले नाही. या सगळ्यांत माझे चुलत भाऊ तर सुटले पण सगळे खापर मात्र माझ्या यजमानांवर फुटले. ही गोष्ट त्यांनी मनाला खूपच लावून घेतली आहे. त्यांची समजूत कशी घालावी हेच कळत नाही.

स्नेहा, समान गोत्राच्या व्यक्तिस प्रथम प्राधान्य या न्यायाने तुमचे चूलत भाऊ प्रथम जबाबदार अर्थात, "खापराचा पहिला मान" त्यान्चाच!
अगदीच तरणोपाय नसेल तर जावई शोधला जातो! तेव्हा त्यान्नी मनाला लावून घेऊ नये हे उत्तम व विश्वास असल्यास पुढील वर्षश्राद्ध वगैरे मात्र जरुर करावे (असे त्यान्ना सान्ग)! Happy

वरती आपल्या देशात हिन्दु धर्मियात अग्नीच का देतात असे काहीसे विचारुन त्याची कारणे शोधण्याचा प्रयत्न झाला आहे
या सन्दर्भातच.....
हिन्दू धर्मात अल्पवयीन बालकास पुरतात
तसेच ब्रह्मचारी व्यक्ति असेल तर तिलाही अग्निडाग दिला जात नाही
ज्ञानेश्वरान्च्या आळन्दीसहित अनेक गावी "जिवन्त" समाधी घेतल्याची ठिकाणे आहेत, तिथे तर अन्तिम सन्स्कारान्चा सम्बन्धच नाही!
याचाच अर्थ असा की प्रदेश्/हवामान वगैरे बाबी कारण नाहीत, तसेच पन्चतत्वात विलिन होण्यास केवळ जाळलेच पाहिजे असेही नाही. याबाबत धर्मसिन्धूमधे काय शास्त्रार्थ मान्डलेत ते बघावे लागतील.

Pages