पेट पीव्हज ( डोक्यात जाणार्‍या - लहान सहान गोष्टी)

Submitted by सामो on 19 January, 2024 - 09:21

लोक हो आपापल्या पेट पीव्हज (लहान सहान डोक्यात जाणार्‍या गोष्टी) लिहा. कदाचित काहीतरी शिकायला मिळेल की कसे असू नये. नकळत आपण त्या कॅटॅगरीत मोडतही असू.

माझ्या काही पेट पिव्हज -

- आय अ‍ॅम सॉरी पण मला हॉटेलात भात हाताने खाणारी माणसे आवडत नाहीत. याईक्स होते. माझी जेवायची इच्छाच मरते. आणि अशी माणसे आहेत.

- चौकशीखोर लोकं आवडत नाहीत. फार वैयक्तिक प्रश्नं विचारणारी. अरे जनरल बोला ना. हवापाणी, चालू घडामोडी, सिनेमे, पुस्तके.

- गॉसिपी लोकंसुद्धा आवडत नाहीत. गोंदवलेकर महाराज म्हणतात - परनिंदा ही विष्ठेसमान माना. मला ते पटते.

- माझ्या घरात चपला न काढता येणारी माणसे तर तिडीकच जाते डोक्यात. बहुसंख्य लोक अशातच मोडतात. नो कन्सिडरेशन. अरे स्वतःच्या घरात चपला काढता अन आमचं घर काय कचरापट्टी आहे का? आपण नम्रपणे सांगतो की तुम्हाला काय सोयीस्कर आहे ते करा आणि अचूकपणे लोक चपला पायात ठेवतात. तुमच्या नानाची टांग.

अजुन एक वैश्विक पेट पीव्ह म्हणजे बायकांची पंगत वेगळी पुरुषांची वेगळी , घरातच कार्यक्रमात, बायकांचा ग्रुप वेगळा व पुरुषांचा वेगळा. हे अमेरिकेत नाही पाहीले फारसे. पण क्वचित पाहीलेले आहे.

मला तर आँटी म्हणणारे लोकही डोक्यात जातात Wink तुम्ही स्वतः २५ शीचे घोडे आहात, आंटी कसलं म्हणताय? आणि तेही अमेरीकेतील दुसरी जनरेशन हमखास म्हणतेच.

अरे हां अजुन एक आपण चुकून कोणाच्या अध्यात्मध्यात कडमडलो चुकून तर - 'EXCUSE ME' असे जोरात व अ‍ॅग्रेसिव्हली बोलणारी लोकं. मला फार राग येतो यांचा. अरे मुद्दाम पायात आलो का?

अजुन एक डोक्यात जाणारी गोष्ट म्हणजे मुलीला काही शिकवायला गेलं की आधी आपल्यात तो गुण कसा नाही हे नवर्‍याने त्याच वेळी तिथेच सांगणं.
उदा मुलीला "ईट युअर ग्रीन्स." वगैरे शहाणपणा तेही कॉलर ताठ करुन इंग्रजी वाक्प्रचार वापरत सांगताना, तेव्हाच नवर्‍याने "तू तरी तुझं सॅलड खाल्लस का?" वगैरे विचारणे Happy
मुलीला आपण ठामपणे , फेमिनिस्ट रोल घेउन "आपल्याकडे ते तसलं बार्बी कल्चर नाही!!" वगैरे सांगतेवेळी. नवर्‍याने कुत्सितपणे हसत आपल्याकडे पाहून म्हणणे "नाही गं! आपल्याकडे नाही ते कल्चर." म्हणजे नको तिथे जोक करुन हवा फुस्स करुन टाकणे. Happy

आठवेल तसे संपादित करत जाइन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विकुंना लिहायचं राहिलं. ते gud morning वगैरेचा मलाही राग आहे, दोन ओ वाचवून एक यु लिहिल्याने वाचलेल्या वेळात अजून एक काकाफॉ पाठवत असतील. नुसत्या GM ला "जनरल मोटर्स टू यु टू" म्हणत जा. Proud

इथे सारखं स्टेटस स्टेटस वाचून जुना पेपी उफाळून आला. भारतात एकाने मला 'स्टॅटस नाय काय, स्टेटस म्हणायचं, म्हणून हिणवलं होतं. मूळ अमेरिकन उच्चार स्टॅटस असाच आहे. भारतीय लोक ब्रिटिशांकडून इंग्लिश शिकले असल्याने चुकीचे उच्चार करतात.

होय स्टॅटस आहे. मी उगाच शफल करत बसते. जसे कॅल्सिअम्/कॅल्शिअम, व्हिटॅमिन्/व्हायटॅमिन आणि आयर्न/आयरन यात मी उगाच शफल करत बसते तसे. पोर्न ला पॉर्न म्हणतात हे मला ऐसीवरती पॉर्न विशेषंकाच्या वेळी कळलेले.

आणि इंग्रजी हो ला मी होर म्हणत असे. मग एका मैत्रिणीने ते दुरुस्त केले. मी म्हटले कशाला दुरुस्त केलेस गं. माझे जे काही इटसी बिटसी नैरागस्य Wink होते ते तरी राहू द्यायचे.

नवर्‍यालाही उगाचच माहीती देण्यात फार रस असतो . मला कित्येक वर्षे वाटे की माझी उंची ५ फूट आहे तर याने उगाचच करेक्ट केलेले - ४-११ आहे म्हणुन Sad
हा केशर दूध घेतो रोज. आणि मला एकदा म्हणालेला केशर बायपोलर डिसॉर्डरकरता चांगले नसते. मी म्ह्टले - तुला कोणी हे संशोधन करायला सांगीतले होते का? मी तर केशर घालून दूध पीत ही नव्हते. वर केलं तर केलं पण मला कशाला या फालतू गोष्टींबद्दल एनलायटन केलस? Sad

याला म्हणतात -
हम को मालूम है जन्नत की हक़ीक़त लेकिन
दिल के ख़ुश रखने को 'ग़ालिब' ये ख़याल अच्छा है

राहू द्यायचे ना काही गैरसमज.

हे स्टेटस कुठे बघतात? माबोवर? का व्हॉअ‍ॅ वगैरे? का फेबु?
काही माबोकर व्हॉअ‍ॅवर आहेत पण मी कुणाचे स्टेटस बघायला कधी गेलेलं आठवत नाही. मला स्वतःला स्टेटसला टाकण्यासारखं काही नाही.

मी मंगळावर गेल्यावर स्टॅटस टाकणार आहे, तोवर काही कामगिरी केली आहे असे वाटणार नाही. मला माझ्या आयुष्याचं अजिबात कौतुक नाही, शोधूनही सापडत नाही. उलट लाजिरवाणे आहे. Proud

मला छान तयार होणं होत नाही, फोटो काढणं होत नाही, पूजा करणं होत नाही, खंडीभर स्वयंपाक होत नाही. मी कधीही पूजेचे फोटो टाकत नाही, त्यावरून एका मेरा पती मेरा देवता है टाईप मैत्रिणीने चर्चा सुरू केली तेव्हा मी म्हंटले मी धर्म बदलला. फेफरे आले त्यांना. Lol त्या "सौभाग्यवती अस्मिता आडनाव हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा" म्हणतात. मला फारच राग येतो सौभाग्यवती लिहिले की. नुसतं अस्मिता आवडतं. माझ्या वयाच्या असून असं आहे.

मागे मी योगी आदित्य नाथला xxx Xander cage मधला विन डिझल म्हंटले होते. तर रागाचे व पांढरेफटक इमोजी आले होते. Happy तसाच दिसतो तो.

मी ठेवते whatsapp स्टेटस कधीकधी. पक्ष्यांचे, आकाशाचे चांगले फोटो मिळाले की ते ठेवते जनरली.

माझी एक मामेबहीण आहे तीही आकाशाचे फोटो व काव्यमय कॅप्शन ठेवते. 'दूर कही जब दिन ..." वगैरे. खूप आवडतात मला आकाशाचे मूडस.

स्टॅटस सेटिंग आठवत नाही आता, About मध्ये मी "No forwarded messages please!" असं लिहिलं आहे सुरवाती पासून. त्याचा फारसा फरक पडला नाही पण गेल्या दोन तीन वर्षात बरेच कमी झाले. आपल्याला आलेले सगळे मेसेजेस रात्री आपल्या काँटॅक्टलिस्टमधील सगळ्यांना पाठवण्याची धुरा उचलणारे कमी झालेत की ते सगळे माबो मूकवाचक होते आणि काकाफॉ वाचत होते म्हणुन मला वगळले कल्पना नाही.

चंद्र विशेष दिसणार असेल की मला वावेची आठवण येते, पक्षी, चंद्र, इंद्रधनुष्य.. सुंदर photos असतात आणि तेही खरे.. Genuine वाटतात..
#वावे दोन चंद्र फॅन गर्ल
स्टेटस वरून personality ओळखायची एक reel सुद्धा आलेली मध्यंतरी

योगी आदित्य नाथला xxx Xander cage मधला विन डिझल म्हंटले होते. तर रागाचे व पांढरेफटक इमोजी आले होते. >>
आता गजानन महाराज का कोण ते बुवा का बापू आहेत ना उकिडवे बसुन गांजा ओढणारे, ४२० फ्रेंडली. त्यांचं गंजेडी पोस्टर आम्रविनेत वीड स्टोर वर असतं असं एआयला काढायला सांग आणि तो फोटो फिरव. धूर आणि जाळ संगटच!

खंडीभर स्वयंपाक होत नाही. >>> हो तुझे खाउगल्लीतले फोटो येण एकदम बन्दच झाल..असु देत!! निवान्त रहा, तब्येत महत्वाची..
स्टेट्सला काहि टाकल की लोक पर्सनली मेसेज करणार मग त्याना उत्तर द्या..ही सगळी प्रोसेस कटाळवाणी वाटते..त्यामुळे तिकडे काहि टाकण बन्दच केलय.

हो ना अस्मिताचे खाऊ गल्लीतील फोटो माझ्याकरता तरी आकर्षण होते. विशेषतः मेथीचा काय असतो तो ..... हां घोळणा, फार आवडायचा. करणं सवरणं नीटस आणि सढळ होतं.
काय बोलतेस - मी स्वयंपाक करत नाही वगैरे.

{मागे मी योगी आदित्य नाथला xxx Xander cage मधला विन डिझल म्हंटले होते. तर रागाचे व पांढरेफटक इमोजी आले होते. Happy तसाच दिसतो तो.}
रागा म्हणजे आमचा लाडका राहुल गांधी का हो, सौ अस्मिता?

तुला खंडीभर स्वयंपाक होत नाही
>>>>
तुला खंडीभर स्वयंपाक होत नाही? मग मी निगेटीव्हमधे जाईन.

मी काही मोठा सण असेल तर आणि त्यासंबंधी काही चांगली कविता, चित्र वगैरे असेल तर स्टेटसला ठेवते. स्वतःचा फोटो वर्षातून एखादा अपडेट करते म्हणजे अचानक कुणी भेटले तर दचकणार नाहीत ‘कोण होतीस तू काय झालीस तू’.

हो देत जाईन खाऊ गल्ली वर. पण हे स्टॅटस प्रकार सणावाराला नैवेद्यासाठी जास्त असतो. ते मला होत नाही, अर्थात नो गिल्ट. घोळाणा तर किती सोपा असतो ध, तो आवडतो होय ! Happy

भरत, सौ नाही. आता माझी सटकली होते. Proud
मला हात जोडून नमस्कार करून भावाने सांगितले आहे, तू सन्नी देओल होऊन पाकिस्तानात जाऊन पाकिस्तान मुर्दाबाद करून येतेस. तू भारतात पंप उखाड पण पाकिस्तानात नको. घरी काहीही बोल चारचौघांत नको. पण अजूनही अंगात येतोच सन्नी. Proud

पण बरेच माबोकर गदरचा सन्नी देओल आहेत. मी एकटी नाही. Happy

अगं कच्ची पालेभाजी मस्तच की. पण मी अजुन घोळणा ट्राय केलेला नाही. पालेभाज्या फार आवडतात मला. इथे तू अन्य सॅलड (अरुग्युला) वगैरेचा घोळणा करतेस का? दॅट इज ऑल्सो अ ग्रेट ऑप्शन. मला करायचाय. पण आधी रेसिपी वाचेन.

Pages