मी वाचलेले पुस्तक - ३

Submitted by Admin-team on 20 April, 2022 - 18:19

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे.

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

हार्ट लँप (इंग्रजी)- मूळ लेखिका बानू मुश्ताक. भाषांतर- दीपा भस्ती
इंटरनॅशनल बुकर पारितोषिक मिळालेलं हे मूळ कन्नड पुस्तक आहे.
बानू मुश्ताक या व्यवसायाने वकील आहेत. त्यांनी दीर्घ काळात लिहिलेल्या कथांचा हा संग्रह आहे. एकूण बारा कथांचा. जवळपास सगळ्या कथांमध्ये स्त्री जन्माची कहाणी आहे. त्यातही मुस्लिम स्त्री जन्माची.
मला या कथा ठीकठाक आवडल्या. कथाबीज बहुतेक वेळा चांगलंच आहे. भाषाही ओघवती आहे. अधूनमधून विनोदाची पेरणीही जमलेली आहे. (गटणे व्हायच्या आत इथेच थांबते.)
पण मला लेखन शब्दबंबाळ वाटलं. पानंच्या पानं एखाद्या प्रसंगाच्या वर्णनात खर्च व्हावीत आणि त्याचं प्रयोजनच समजू नये, असं बऱ्याच वेळा झालं! माझी लांबलचक वर्णनांना अजिबात हरकत नाही. बाळूच्या अवस्थांतराची डायरी ही किरण गुरवांची अख्खी कथा चार ओळीत सांगता येईल, पण त्या कथेचं सामर्थ्य त्या वर्णनातच आहे. पण हार्ट लँपमधल्या वर्णनांनी काही मूल्यवर्धन होतानाच जाणवलं नाही. एकदोन कथा वाचताना मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या, पण शेवट अगदीच फुसका निघाला. अगदी 'कहना क्या चाहते हो?' नाही, पण त्याच प्रकारची भावना मनात आली.
मला कल्पना आहे की मुस्लिम समाजातील स्त्रीने इतक्या खुलेपणाने त्या समाजातल्या स्त्रियांच्या परिस्थितीबद्दल लिहिणं अजिबात सोपं नसणार. त्यामुळे या धाडसासाठी मात्र लेखिकेला मानलं. लेखनशैलीही आवडली. 'इंटरनॅशनल बुकर पारितोषिक मिळालेलं पुस्तक' या संदर्भात बघितल्यामुळे कदाचित माझा अपेक्षाभंग झाला असेल.

>>>>>>मला कल्पना आहे की मुस्लिम समाजातील स्त्रीने इतक्या खुलेपणाने त्या समाजातल्या स्त्रियांच्या परिस्थितीबद्दल लिहिणं अजिबात सोपं नसणार.
+१००

काही नट्या आणि खेळाडू मात्र यांच्या कचाट्यातून मुक्त असतात. त्यामुळे मी असल्या कथांची पुस्तके हातात पण घेत नाही.

ललिता-प्रीति, वावे - छान माहिती. जंगलातील थरार वगैरे सिरीज किंवा चित्रपटातून आपल्यापुढे दृश्य स्वरूपात उभा राहतो. पुस्तकांतून तो उभा करणे हे नक्कीच सोपे नसणार.

बुकरचे ऑस्करसारखे आहे का अशी मला शंका आहे. एखाद्या वर्षी एखाद्या कॅटेगरीला देऊ असे ठरवल्यासारखे त्यातील एखादी कलाकृती निवडतात. मग ती प्रत्यक्षात खूप भारी असली नसली तरी त्यांना तितकी डीप माहिती नसते. ए आर रहमानला स्लमडॉग मिलियनेयर साठी ऑस्कर मिळणे हे एक उदाहरण. किंवा मग तुम्ही म्हंटल्यासारखे केवळ हे धाडस केले म्हणूनही असेल.

Greg Egan चे नाव इथे ऐकायला मिळेल असे वाटले नव्हते. केशवकुल दंडवत घ्या.

एकदम अफाट (कधी कधी मला अतर्क्य पण त्याला सुतर्क्य) कल्पना असतात त्याच्या पण त्याला का कुणास ठाऊक पात्रे नीट रंगवता येत नाहीत. म्हणजे तो विज्ञान जबरदस्त मांडतो पण थोडासा कलात्मक भागात उणा पडतो. अर्थात त्याच्या कादंबऱ्या वाचणे म्हणजे डोक्याला जबर खुराक.

Cixin Liu नंतर मला तोच सर्वात जास्त आवडला. दोघांच्या उणीवा पात्रांच्या बाबतीत सारख्याच आहेत.

केशवकूल, धन्यवाद.
हा लेखक माहिती नव्हता.

वावे, परिचय आणि तुझा वाचनानुभव आवडला.
मूल्यवर्धनचा मुद्दा अगदी पटला. असं मला शशी देशपांडेंचं 'दॅट लॉन्ग सायलेन्स' वाचताना झालं होतं.
पुस्तकं वाचून त्याबद्दल लिहिताना सगळ्यांनी स्वतःच्या वाचनानुभवाबद्दल शक्य तितकं लिहावं असं मला कायमच वाटतं. म्हणजे मला त्यासकटचा पुस्तक परिचय वाचायला आवडतो.
गटणेचा कंसही आवडला Lol

सध्या ऑनलाईन पुल वाचायला / ऐकायला घेतलं आहे. ऐकल्यावर यातली पुस्तक विकत घेऊन ठेवणार आहे.
एक सांगावंसं वाटतं, एकदा तत्कालीन संदर्भ समजले कि पुलंचं लिखाण वाचण्यासारखा /ऐकण्यासारखा आनंद नाही.
आता सिनेमा, वेबसिरीज, पुस्तकं यातल्या एकसुरीपणाबद्दलची तक्रार कुठल्या कुठे पळाली.

१.सुचवलेली पुस्तकं खरड वेळ आणि आइडीनावांसह नोंद करत जातो एका नोटमध्ये.
२. फोनवर पुस्तक वाचताना इंटरनेट बंद ठेवतो. WhatsApp बंद राहाते.

आता बहुतेक मी एम्पायर्स ऑफ द इंडस वाचायला घेणार आहे.
>>> वा!

ओटीटीवर 'वॉच पार्टी' हा प्रकार बघितला आहे.
तशी संप्रति यांच्यामुळे इथे या पुस्तकाची 'रीड पार्टी' सुरू झाली आहे!

सुचवलेली पुस्तकं खरड वेळ आणि आइडीनावांसह नोंद करत जातो एका नोटमध्ये. >>> खरडवेळ आणि आयडी का?

आय मीन, मी सुद्धा पुस्तकांची नावं नोट करते. पण बाकीचं कशाला लागतं? जेन्युइनली विचारतेय.

सुचवलेली पुस्तकं खरड वेळ आणि आइडीनावांसह नोंद करत जातो एका नोटमध्ये. >>>> जर ते पुस्तक किंडल वर ईबुक स्वरूपात असेल तर मी लगेच 'Send Free Sample" चा उपयोग करून किंडल वर सॅम्पल घेऊन ठेवतो. म्हणजे किंडल उघडल्यावर लगेच ते पुस्तक समोर दिसते व वाचले जाण्याची शक्यता वाढते. सॅम्पल वाचुन हे पुस्तक पूर्ण वाचणे आपल्याला जमेल कि नाही याचा अंदाज येतो मग ते विकत घायचे कि नाही ते ठरावीता येते.

थोडा उशीर झाला पुस्तक वाचायला तर प्रतिसाद लिहायला नंतर सोपं जातं.
बाकी कधी कधी लगेच ओझरतं पाहून होतं तेव्हा प्रश्न नसतो.
१. शशी देशपांडेंचं 'दॅट लॉन्ग सायलेन्स' थोडी पाने वाचली पण बायकी गप्पा वाटल्या आणि सोडून दिले.
२.Greg Egan चे DIASPORA चीही थोडी पाने वाचली. आगामी काळ, वैज्ञानिक कथा प्रकार आहे. प्राणिविज्ञान ( क्लोन, डीएनए, वगैरे बरेच), डेटा सायन्स ( नेटवर्किंग, डेटा ट्रान्स्फर, अवकाश, रोबोट आणि कायकाय) काहीही समजले नाही कारण ती पार्श्वभूमी नाही. यातील कित्येक गोष्टी अगोदर थोड्या माहिती हव्यात . फारच पुढचे म्हणजे २९७५ चा काळ दाखवायचा आहे. कथानक समजण्यापूर्वीच बरेच अगम्य शब्द अडकतात. सोडून दिले.
३. कालच glass palace ( Amitav ghoshचे) वाचून संपवले. खूप आवडले. शाळेत पाच दहा ओळींत थोडी माहिती कळली होती. ...ब्रिटिशांची भारतावर पकड,
भारतीय तरुणांना शिकवून सैन्य तयार केलेले.. बर्मावर ब्रिटिशांचा कब्जा..तिथल्या राजा राणी थीबा याला इकडे रत्नागिरीत आणून टाकलेले त्यांच्या प्रजेपासून दूर. ...जपानचा हल्ला बरमावर( ब्रह्मदेशावर) जपानी हल्ला.. तिकडे भारतीय कामगार रबराच्या मळ्यात.. ब्रिटिश विरुद्ध जपानी सैन्याची तिकडे लढाई.. इकडे त्यांना मदत का करायची? .. स्वातंत्र्य चळवळ जोर घेत असते.
लेखकाचा शेवटी खुलासा आहे...थीबा परिवारास इथे आणून टाकले या घटनेवर आधारित कादंबरी आहे. बाकी पात्रे काल्पनिक आहेत. पण ती पात्रे आणि घटना त्या वेळच्या समाजावर, लोकांवर ऊजेड टाकतात. भारतीय तमिळ, बंगाली ,हिंदी लोक काय करत होते...बर्मिज लोक काय करत होते. याचबरोबर मलाया, सिंगापूर ही येते. शेवट दुःखद आहे.
१९४८ च्या स्वातंत्र्यानंतर बर्मा म्हणजे म्यानमारमध्ये काय स्थित्यंतरे झाली याची माहिती नंतर वाढवली आहे. बर्मामध्ये एका खानावळीतल्या टपरीवर काम करणारा अनाथ बंगाली मुलगा राजकुमार तर दुसरीकडे तिथला राजा थीबा, त्याची राणी सुपाल्यत आणि त्यांचे नोकर, दास, दासी अशी दोन मुख्य कथानके आहेत. तिसरी परिस्थिती ही ब्रिटिशांची सत्ता, त्यांचे अधिकारी आणि त्यांचे भाडोत्री सैन्य, बरमातील लाकडाचा व्यापार हे आहे. भारतातील आणि बरमातील प्रजा काय करत असते तसेच ब्रिटिशांच्या चाकरीतील भारतीय सैन्य काय विचार करते याचीही पार्श्वभूमी आहे. राजकुमाराचा संसार आणि शेवटी त्याची नात पुस्तकाला पुढे नेतात. लेखकाने यासाठी कोणा कोणाची मदत घेतली ती नावे दिली आहेत. खूप संशोधन करून लिहिले आहे पुस्तक.
(तर या पुस्तकाच्या वाचनानंतर वरची दोन पुस्तकं वाचणे मला का जड गेले ते सांगितले. लेखन पकडच घेत नव्हते. ते असो.)
( पुस्तके नेटवर अगम्य अनधिकृत स्रोतातून मिळतात, शोधा. मी माझ्यासाठीच वाचण्यासाठी घेतो, आणि हौस भागवतो.)

विमल मोरे ह्यांनी लिहिलेले तीन दगडांची चूल आता प्राईम वर आहे, ते वाचले. सुंदर आहे पुस्तक पण मन विषण्ण होतं.

अनधिकृत स्रोतातून >>>
मी माझ्यापुरतं ठरवलं आहे- विशलिस्टमधलं एखादं पुस्तक कधीच वाचायला मिळालं नाही तरी चालेल, पण अनधिकृत कॉपी वाचणार नाही.
एक पुस्तक प्रत्यक्षात आणण्यासाठी, ते प्रॉडक्ट म्हणून काय काय यातायात करावी लागते ते अनेक वर्षं बघतेय, अनुभवतेय, त्यात कामही करतेय.

द ग्लास पॅलेसबद्दल कुठेतरी वाचल्यासारखं वाटतंय. बहुदा माबोवरच.

>>अनधिकृत कॉपी वाचणार नाही.>> +100
------

मी इतकी पुस्तकं कुठून वाचतो ते सांगितलं. इंग्रजी पुस्तकं त्यातून मिळतात. 2022 ला करोना निर्बंध सुरू झाले. घरीच बसून काय करायचं असा विचार करत हॅरी पॉटर पुस्तकं शोधताना ती साईट बिंगवर सापडली. अगोदर वाटलं की काही वायरस / रमी जाहिराती असतील पण तसं काही नव्हतं. पाच वर्षांत दहा वेळा सर्वर बदली झाला आहे. साईट बहुतेक रशियातून चालते.

मराठी पुस्तकं मात्र मला वाचनालयातून मिळतात.

मी सध्या हिंदी साहित्य नेट वर / पेन ड्राईव्ह मधून वाचतेय. ते अधिकृत कि अनधिकृत हे कस ओळखायचं ?
पण एक आहे , यामुळं काय मागवावं हे मला ठरवायला सोपं जातंय. नवे लेखक कळताहेत.
तीच गत जर्मन आणि रशियन लेखकांचे इंग्रजी अनुवाद वाचताना. अन्यथा हे लेखक कधीच वाचनात आले नसते.

मलाही कधीकधी प्रश्न पडतोच की वाचनालयाने पुस्तके विकत घेऊन महिना शुल्क घेऊन सभासदांना वाचायला देणे हे ( लेखकांच्या परवानगीशिवाय त्यावर पैसे कमावणे)कॉपीराईट भंग होतो/ तोडतो का?
अगोदर लिहिलं त्यात हॅरी पॉटरची पुस्तके कुणी एकाने त्याच्या गूगल ड्राईव्हवर अपलोड करून ठेवली आहेत आणि त्यांची डाउनलोड लिंक दिली होती. हेसुद्धा अनधिकृतच झालं. त्यांचे लेखक प्रकाशक याकडे दुर्लक्ष करतात ही गोष्ट वेगळी.
आपल्याकडे पूर्वी नोकियानचे बटण फोन मिळायचे त्यातल्या रेडिओवरून गाणी वाजवता येत पण डाउनलोड करता येत नसत. नोकियावाले प्रत्येक देशाचे नियम पाळण्यात पक्के होते.मी त्या वेळी ओळखीच्या दुकानदाराकडे चौकशी केली होती. तो म्हणाला " तुमच्याकडे कंप्युटर नाही का? त्यावरून डाऊनलोड होतात गाणी." मग एका नातेवाइकाला विचारले की "गाणी कशी मिळवतोस?" तर तो बोलला की त्या साईट सर्व पाकिस्तानी आहेत. त्यातून कधीकधी स्टोरेज सीडी ड्राईव खराब होते. परत दुकानदाराला विचारले की अगदी योग्य मार्ग काय. तर तो म्हणाला की गूगलची लायब्रेरी आहे त्यातून पस्तीस ते पन्नास रुपयांना एक गाणं ( मूळ स्टेरिओवालं) मिळतं. मग हेच इतरांना पेन ड्राइवमध्ये भरून देतात. तर असा आहे प्रवास. मग ॲपलवाल्यांनी त्यावर तोडगा आढळला ...आईट्यून्स लायब्ररी. यासाठी फोनमधले ब्लूटूथ आणि मेमरी कार्डच गायब केले. कॉपी होऊ नये म्हणून. तर असो.
पण सामसंग फोनमध्ये मात्र एफएम रेडिओवरून गाणी डाउनलोड करून ती फाईल दुसऱ्यांना देताही येत असे. मराठी नाटकांत किंवा मालिकांत एखादी हिंदी सिनेमाची ओळ जरी पात्रांनी गुणगुणायची असली तरी त्याची कॉपी राईट फी त्यांनी भरलेली असते. ते केंद्र बहुतेक वरळीचे बॉम्बे फिल्म लॅबोरेटरीज.

तीन दगडांची चूल खूप वर्षांपूर्वी वाचलेलं, अजून पुढचा भाग यायला हवा असं वाटलं. अशा पुस्तकातून काहीजण कसे जगतात, हे पोचते. फार इमोशनल करतात अशी पुस्तकं.

हो, मलाही वाटतं तसं. आनंद यादव यांचे आयुष्य नंतर कसे गेले हे त्यांच्या पुढच्या पुस्तकांमधून कळते. तसेच मोरे यांच्या पुस्तकाचा पुढचा भाग हवा होता.

त्यांचे मिस्टर नंतर नाशिकच्या मुक्त युनिव्हर्सिटीत प्राध्यापक होते हे कुठेतरी वाचलं, बहुतेक उत्तम कांबळे यांच्या पुस्तकात वाचलं. उत्तम कांबळे यांचं आत्मचरित्रही डोळ्यातून पाणी आणते, सतत संघर्ष.

इन्शाअल्लाह - अभिराम भडकमकर
अतिशय उत्तम पुस्तक. विविध भूमिकांमधून आणि विभिन्न वैचारिक दृष्टिकोनातून प्रश्नांचा विचार आणि उत्तरांचा मागोवा घेतला आहे. मुस्लिम मोहल्ल्याशी जोडलेली एक घटना आणि त्या अनुषंगाने होणारी घुसळण नेटकेपणाने मांडली आहे. खूप आवडले पुस्तक.

सध्या हत्ती हा विषय चर्चेत आहे. यावरचे एक पुस्तक वाचनालयात सापडले.द एलेफंट व्हिस्परर
लॉरेन्स अँथनी, ग्रॅहम स्पेन्स(2009). मराठी अनुवाद मंदार गोडबोले २०२३. लॉरेन्स यांचे बालपण आफ्रिकेतील जंगलाजवळच गेले. नंतर त्याने एक मोठे जंगलच विकत घेतले. पण त्यात हत्ती फार वर्षांपूर्वीच मारले गेलेले असतात. आता त्याला एक विचारणा येते की तुम्हाला नऊ हत्ती फुकट हवे आहेत का? दुसऱ्या एका जंगलातल्या या त्रासदायक कळपाला काढायचे असते किंवा मारून टाकायचे असते. दोन आठवड्यात घेऊन जा अथवा त्याबाबत 'अंतिम निर्णय ' घेतला जाईल. तर घाईघाईत त्या हत्तींना इकडे आणले जाते आणि लेखक कसा त्यांच्या प्रेमात पडतो याची कथा आहे. सुरुवात केली आहे.
( E book available on Amazon kindle).

इथे नियमित येणारे आपण सारे काही नाही काही ना काही सतत वाचतोय आणि त्यावर खेळीमळीने चर्चा सुद्धा करतोय.
"माणसं - विशेषतः पुरुष- हल्ली अजिबात वाचतच नाहीत" ही तक्रार पाश्चात्य जगात सुद्धा केली जातेय.
या विषयावरील एक खुसखुशीत लेख : https://www.irishtimes.com/world/us/2025/08/03/attention-men-books-are-s...

त्याचे शीर्षकच मोठे आकर्षक आहे :
Attention, men: Books are sexy, but staring into a phone is not

Happy

Pages