‘प्रांजळ’ कथानायकाचे व्यावहारीक परिवर्तन

Submitted by कुमार१ on 6 August, 2025 - 07:20

शेवटची (मराठी) कादंबरी वाचली होती त्याला आता १३ वर्षे उलटून गेली होती. ती ग्रंथालयातून आणून आणि पान अन् पान न वाचता काहीशी उडतउडत संपवली होती. आयुष्याच्या त्या टप्प्यावर मनोमन वाटू लागलं होतं की आता कादंबरी व कथावाचन नकोस वाटतंय; कल्पिताचे दीर्घवाचन हा काही आता आपला प्रांत राहिलेला नाही. पुढे 2019मध्ये ग्रंथालय कायमचे बंद केले आणि तिथून पुढे दरवर्षी मोजकी पुस्तके विकत घेऊनच वाचतोय. ग्रंथालयातून पुस्तक आणताना माणूस निवडीबाबत काहीसा शिथिल असतो. परंतु पुस्तक विकत घ्यायचे म्हटल्यानंतर तो (अति) चिकित्सक बनतो ! आता आपल्या आवडीचाच साहित्यप्रकार घेणे आले आणि त्यामुळे तेव्हापासून एक निर्णय घेतला की, आता इथून पुढे फक्त लेखसंग्रहच वाचायचे. त्याला अजून एक कारण होते. आपण ज्या प्रकारचे लेखन करतो त्या दृष्टीने स्वतःला मार्गदर्शक होईल असेच वाचन करावे, हा देखील एक स्वार्थी दृष्टिकोन. त्यानंतर इतक्या वर्षांनी आता अचानक एखादी (इंग्लिश) कादंबरी वाचण्याच्या फंदात का पडलो ते सांगतो.

रवींद्र पिंगे यांच्या सॉमरसेट मॉमवरील परिचयलेखात एक अतिशय रोचक माहिती वाचली. त्या लेखात मॉम यांच्या मुलाखतीचा काही अंश आहे. त्यात प्रश्नकर्ता मॉमना विचारतो की, आम्ही नवीन लेखकांनी कोणत्या लेखकांचं आणि किती वाचलं पाहिजे ? त्यावर ते एडमंड बर्क, ट्रॉलॉप व व्हॉल्टेअर ही तीन नावे घेतात. ते म्हणतात,
“मी कुठल्याही नव्या लिखाणाला प्रारंभ करण्याच्या अगोदर व्हॉल्टेअरचे ‘कॅन्डीड’ चाळतो. व्हॉल्टेअर हा परिस आहे. साधं, सुंदर, तत्वप्रेरित, खुसखुशीत, ऐटदार आणि अल्पाक्षरी असं बहुगुणी लेखन तो लेखक एकाच वेळी करू शकतो, हे आपण शिकण्यासारखे आहे”.

हे वाचल्यावर व्हॉल्टेअरबद्दल अतिशय कुतूहल वाटले. त्या आधी अन्य वाचनातून त्यांच्याबद्दल अजून एक माहिती वाचण्यात आली होती. भारतीय संसदेच्या जुन्या इमारतीवर व्हॉल्टेअरचे तत्त्वज्ञान सांगणारे एक वाक्य कोरलेलं होतं आणि ते असं आहे :
"I disapprove of what you say, but I will defend to the death your right to say it."

संसदेवरती बोधवाक्य म्हणून लिहायला याहून अधिक योग्य लोकशाही-वाक्य कुठले असणार? ते खूप म्हणजे खूपच आवडलं आणि भावलं. अर्थात या वाक्याच्या उगमाबद्दल प्रवाद आहेत. बरीच वर्षे अनेक नामवंतांनी त्याचे श्रेय खुद्द व्हॉल्टेअरनाच दिले होते. परंतु अधिक संशोधनातून हे स्पष्ट झाले की ते वाक्य व्हॉल्टेअरांचे नसून त्यांच्या तत्त्वज्ञानाचा सारांश सांगणारे ते वाक्य Evelyn Beatrice Hall लिखित ‘The Friends of Voltaire’ या पुस्तकातले आहे. वाद बाजूला ठेवला तरी वाक्य मार्मिक आहे यात शंका नाही.

वरील दोन मजकुरांमुळे व्हॉल्टेअर आणि त्यांच्या कॅंडिड (Candide) या कादंबरीबद्दल कमालीचे आकर्षण निर्माण झालं. सन 1759चे हे पुस्तक आहे. इतके जुने व प्रसिद्ध इंग्लिश साहित्य म्हटल्यावर ते जालावर असणार अशी अटकळ बांधली आणि त्याची पीडीएफ सहज मिळाली आणि काम सोपे झाले. असे हे निमित्त झाले, मी कँडीडमध्ये डोकं घालायला. म्हटलं, पाहूया तरी या ‘परिस’स्पर्शातून आपल्याला काय काय उपयुक्त मिळतंय ते.
तर मित्रांनो, हे झालं नमनाला धडाभर तेल ! आता कादंबरीकडे वळतो.
Candide.png

मूळ कादंबरी फ्रेंचमध्ये असून तिचे ‘कादंबरीका’ असे वर्णन केलेले दिसते. मी अर्थातच तिचा इंग्लिश अनुवाद वाचला. Candide हे तिच्या नायकाचे नाव असून candid या शब्दाप्रमाणेच त्याचे व्यक्तिमत्व पण प्रांजळ व निरागस आहे.
कॅन्डीडची कहाणी जर्मनीतील एका उमरावाच्या प्रासादातून सुरू होते. हा कँडीड त्या उमरावाच्या बहिणीचा अनौरस मुलगा. कादंबरीतील अन्य प्रमुख पात्रे म्हणजे उमरावाची कन्या Cunégonde, जी कँडीडची प्रेयसी आहे आणि प्राध्यापक Pangloss,जे मोठे तत्त्वज्ञ असून ते उमरावाकडे राजप्रशिक्षक आहेत. कॅन्डीड उमरावकन्येच्या प्रेमात पडतो आणि त्याची ही आगळीक उघडकीस आल्यानंतर त्याची प्रासादातून हकालपट्टी होते. मग तो प्रशियन सैन्याच्या तावडीत सापडतो आणि त्याला युद्धात लढायला लावले जाते. तिथून तो पलायन करतो परंतु पुढे एकदा वादळात सापडतो.

त्यानंतर अनेक हालअपेष्टांनी भरलेला त्याचा दीर्घकाळ जहाजप्रवास चालू होतो. युरोपातील अनेक देशांमधून त्याला जावे लागते. ताटातूट झालेल्या आपल्या प्रेयसीला आयुष्यात पुन्हा भेटण्याच्या अनावर ओढीनेच तो फिरत राहतो. या प्रवासादरम्यान त्याच्यावर अनेक जीवघेणे हल्ले होतात आणि एकूणच दुर्दैवाचे फेरे त्याच्या मागे लागतात. तिकडे त्याच्या प्रेयसीवरही विस्थापित होण्याची पाळी येते आणि ती देखील हालअपेष्टांमध्ये सापडून तिच्या वाट्याला गुलामीचे जिणे येते. पण अथक प्रयत्नांती अखेरीस प्रियकर व प्रेयसीचे मीलन होते.

अर्थात कादंबरीचा उद्देश निव्वळ ही कथा सांगणे नसून तत्कालीन प्रस्थापित दैववादी तत्त्वज्ञानावर प्रहार करण्याचा आहे. त्याकाळी जर्मन तत्त्वज्ञ Leibniz यांच्या शिकवणीचा समाजावर मोठा प्रभाव होता. त्यांच्या मतानुसार, या संपूर्ण जगाचा कर्ताकरविता परमेश्वरच असून जगात जे जे काही चांगले अथवा वाईट घडत असते ते सर्व त्याच्याच इच्छेने घडते. जगात जरी असंख्य वाईट गोष्टी घडताना दिसल्या तरी अंतिमतः त्या सुद्धा मानवजातीच्या भल्यासाठीच ‘त्याच्या’ इच्छेने घडतात. कादंबरीतील प्रा.Pangloss हे या विचारसरणीचे खंदे समर्थक असतात आणि ते कॅन्डीडच्या कानीकपाळी सतत हाच मंत्र ठसवत असतात ( "All is for the best" in the "best of all possible worlds"). मात्र कॅण्डीड त्याच्या आयुष्यातील अनेक छळ व हालअपेष्टांमधून तावूनसुलाखून बाहेर पडल्यानंतर त्याचा भ्रमनिरास होतो. जगात सुखी माणूस काही त्याला शोधून शोधून देखील सापडत नाही. परंतु सर्वत्र दैन्य, दुःख आणि दारिद्र्य भरलेले जवळून बघितल्यानंतर त्या ‘गुरुमंत्रा’वरचा त्याचा विश्वास डळमळीत होतो आणि कादंबरीच्या अखेरीस तो सर्वांना म्हणतो,
“चला, आता आपणच आपल्या हातांनी आपले भविष्य घडवूया”.
हा झाला कादंबरीचा सारांश.

अशा तऱ्हेने लेखकाने कॅन्डीडच्या माध्यमातून दैववादी विचारसरणीचा उपहास करत त्यावर हल्ला चढवलेला आहे. कादंबरीचे कथानक गतिमान, अद्भुत आणि अधूनमधून कलाटणी देणारे आहे. या कथनातून धर्मसत्ता, राजसत्ता, दैववाद, लष्करी खाक्या, तत्कालीन संशोधक, साहित्यिक, तत्वज्ञ आणि त्यांचे प्रस्थापित तत्त्वज्ञान यांची कमीअधिक खिल्ली उडवलेली आहे. गरजेनुसार कथनभाषा बोचरी होते. मानवी दुष्टपणाचे वर्णन करताना एका ठिकाणी माणसांच्या तब्बल 19 दुर्गुणांची जंत्री केलेली आहे (खोटारडे, भामटे, गुंड, दारुडे, भांडकुदळ, हिंसक, बदफैली, ढोंगी, इत्यादी). ती सर्व विशेषणे मुळातून वाचण्यासारखी. कादंबरीचा परिघ युरोप आणि पश्चिम आशियाभोवती फिरतो. इंग्लंड व फ्रान्समधील लोकांच्या ऐय्याशी आणि स्त्रीभोगवादी वृत्तीवर देखील बोट ठेवलेले आहे. युद्धकैद्यांच्या अनन्वित छळांची, गुलामी आणि मानवी व्यापाराची वर्णने हृदयद्रावक आहेत. समाजातील एकंदरीत बजबजपुरी आणि कायमस्वरूपी कलह यांचीही वर्णने अनुरूप आहेत. हे सगळे दैन्य बघून सुद्धा प्राध्यापकांचे पात्र कायमच त्यांच्या दैववादी विचारसरणीशी घट्ट चिकटून असते हा विरोधाभास पाहण्यासारखा आहे. त्याचबरोबर निरागस कँडीडमध्ये हळूहळू झालेले वैचारिक परिवर्तन कादंबरीला एका उंचीवर नेऊन ठेवते.

तेव्हाच्या कर्मठ समाजात ही कादंबरी प्रथम गुप्तपणेच प्रसिद्ध झाली आणि त्यानंतर तिच्यावर ईश्वरनिंदा व राजद्रोहाचे ठपके ठेवून बंदी सुद्धा घालण्यात आली होती. मात्र कालांतराने पुढच्या पिढ्यातील अनेक लेखकांना ती प्रेरणादायी ठरली. जगातील अत्यंत प्रभावशाली अशा कायमच्या शंभर पुस्तकांमध्ये ती स्थान पटकावून आहे. लोकशाही आणि विचारस्वातंत्र्य या संकल्पना उदयास येण्यात अशा साहित्याचा निश्चित वाटा असतो.

या निमित्ताने पुस्तकलेखकाबद्दल काही लिहिणे समुचित ठरावे. व्हॉल्टेअर हे 18व्या शतकातील फ्रान्समधले थोर व्यक्तिमत्व. अभिजात लेखक, तत्त्ववेत्ता व इतिहासकार म्हणून त्यांची ख्याती होती. विनोदबुद्धी आणि चातुर्य ही त्यांची खास वैशिष्ट्ये. त्यांनी रोमन कॅथलिक धर्मावर टीका करून धर्मसत्ता व राजसत्ता यांची फारकत झालीच पाहिजे असा आग्रह धरला. गुलामगिरीवर त्यांनी प्रहार केला. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे तर ते खंदे समर्थक होते. त्यांची साहित्यसंपदा अमाप असून अनेक साहित्यप्रकार त्यांनी हाताळलेत. त्यातील Candide ही त्यांची उत्कृष्ट कलाकृती (मास्टरपीस) मानली जाते. व्हॉल्टेअर हे त्यांचे लेखनातले सर्वाधिक प्रसिद्ध टोपणनाव, जे त्यांनी त्यांच्या मूळ नावाच्या अक्षरांची करामत करून तयार केलेले आहे. याखेरीज त्यांनी सुमारे 178 वेगवेगळ्या टोपणनावांनी देखील लेखन केलेले आहे.
Voltaire.jpg
. . .

मला या वाचनातून अठराव्या शतकातील युरोपीय इतिहास-भूगोलाची चांगली सफर घडली. लेखनशैली आकर्षक आहे. प्राचीन इंग्लिशमधील काही शब्दप्रयोग आता मजेशीर वाटतात उदाहरणार्थ, corrector of the press, durst not, Mussulman, इ. तत्कालीन काही आर्थिक चलनांची नावे(Piastre, sequins) सुद्धा मजेदार वाटली. मनोरुग्णालयाला त्या काळी madhouse म्हणत असत हे समजले. कॅन्डीड व त्याच्या गुरूंची नावे (Pangloss) अर्थवाही आहेत. लेखनाच्या ओघात येणारे तिरक्या अक्षरांमध्ये छापलेले फ्रेंच वाक्प्रचार नजरेत भरतात. जेव्हा संदर्भाने त्यांच्या अर्थाचा अंदाज आला तेव्हा उगाच गुगलत बसलो नाही. कादंबरी 30 प्रकरणांमध्ये विभागलेली असल्याने ती दमादमाने शांतपणे वाचता आली. शेवटच्या प्रकरणानंतर सर्व तळटीपा एकत्रित छापल्यात. त्यातूनही काही महत्त्वाची माहिती मिळते. त्यामध्ये व्हॉल्टेअरना या पुस्तकासाठी प्रवृत्त करणारा इ.स.1755चा लिस्बनमधला महाप्रलयकारी भूकंप, मानवी गुप्तरोगांचा उगम वेस्टइंडीजमधून झाल्याची नोंद आणि दक्षिण अमेरिकेतील उंटासमान असणाऱ्या Llama या वैशिष्ट्यपूर्ण स्पेलिंग असलेल्या प्राण्याचा उल्लेख, इ. नोंदी आहेत.

एकंदरीत आपल्या ज्ञानकक्षा रुंदावणारे, अनेकदा अस्वस्थ करणारे आणि विचार व भाषा समृद्ध करणारे हे ओघवते व आटोपशीर लेखन आहे.
*******************************************************************************************************************************
Candide
(इंग्लिश अनुवाद)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रस्तावना खूप आवडली.
आपण ज्या प्रकारचे लेखन करतो त्या दृष्टीने स्वतःला मार्गदर्शक होईल असेच वाचन करावे >> आवडले.
कँडीड कादंबरीचा परिचय सुद्धा आवडला आणि लेखाचा समारोपही सुंदर.
चतुरस्त्र लेखक आहात सर. आणि जाणते वाचक.

व्हॉल्टेअर हे मूळ नाव नाही ?
आयन रँड चं पण हे नाव टोपणनाव आहे हे नुकतंच समजलं. Happy

मनापासून धन्यवाद !

* प्रस्तावना खूप आवडली.
>>> मध्यंतरी मी वा पु धाग्यावरील चर्चेत तुम्ही एक चांगला मुद्दा मांडला होतात : "पुस्तक परिचय लेखांमध्ये लेखकाने वाचलेल्या पुस्तकाच्या सारांशाबरोबरच स्वतःचा अनुभव देखील लिहावा".
या अतिशय चांगल्या मुद्द्याला अनुसरूनच हा लेख लिहिताना दोन मुद्द्यांवर विशेष लक्ष दिले :
१. मी ते पुस्तक वाचायला का उद्युक्त झालो?
आणि
२. मला त्या वाचनातून काय मिळाले?

छान परिचय.
"पुस्तक परिचय लेखांमध्ये लेखकाने वाचलेल्या पुस्तकाच्या सारांशाबरोबरच स्वतःचा अनुभव देखील लिहावा".>>>> रानभुली, चांगला मुद्दा.

मला जुन्या प्रकारच्या इंग्रजी, युरोपीय भागात शब्दांच्या सहाय्याने रमायला आवडते. ही मेजवानीच आहे माझ्यासाठी.
खूप छान प्रकारे तुम्ही पुस्तक आणि लेखक उलगडून सांगितला.

तुम्ही पुस्तकाच्या 50 भागांचे PDF वाचन केले याच तुमचा संयम व उत्सुक वाचकपण दिसून येते कुमार 1!

असेच नवनवे साहित्य उलगडत जा... पुढील वाचनास शुभेच्छा!!

खूप छान परिचय.
तुमचे लेखन पुन्हा पुन्हा वाचण्यासारखे आहे.
इथे लिहिले राहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

धन्यवाद !
. .
* पुस्तकाच्या 30 भागांचे PDF वाचन केले >>>
दिवसाला दोन प्रकरणे या संथ गतीने !
केवळ या पुस्तक व लेखकाबद्दल आकर्षण निर्माण झाले म्हणून.
अन्यथा, अलीकडे मी फार आळशी वाचक झालेलो आहे; दीर्घवाचन नकोच नको ! Happy

छान परिचय.
इतकं जुनं पुस्तक पीडीएफ स्वरूपात वाचायचं म्हणजे खरंच कौतुक आहे.

पुस्तक परिचय, जोडीला त्या पुस्तकाबद्दल कसं समजलं, वैयक्तिक वाचनानुभव असं सगळं वाचायला मलाही आवडतं.

१. मी ते पुस्तक वाचायला का उद्युक्त झालो?
आणि
२. मला त्या वाचनातून काय मिळाले? >>> हे लक्षात ठेवीन.

ऋतुराज धन्यवाद.

माझा प्रतिसाद कुठल्या संदर्भात होता हे लक्षात नाही. पण फक्त परिचया ऐवजी रसग्रहण ( कसं वाटलं इ. काय आवडलं, का आवडलं, काय खटकलं इ.- हे परिचयात येतंच म्हणा) असल्यास वाचावं कि नाही हे ठरवता येतं असं काही तरी असेल ते.

छानच....
Candid अनौरस म्हणून लग्नाला विरोध झाला असेल किंवा गरीब असेल.
माफ करा पण एक शंका आहे.
आपल्याकडे मामाच्या मुलीशी लग्न लावलं जातं ते वैद्यकीय दृष्टिकोनातून बरोबर आहे का?

* आपल्याकडे मामाच्या मुलीशी लग्न लावलं जातं
>>>> चांगला प्रश्न.
वैद्यकीयदृष्ट्या योग्य नाही. इथे एक मुद्दा लक्षात घेण्यासारखा.
मामाच्या मुलीशी लग्न अशा प्रकारच्या (फर्स्ट कझिन) विवाहातून जी संतती निर्माण होते तिच्यात काही जन्मजात विकृती किंवा विशिष्ट प्रकारचे जनुकीय आजार होण्याची शक्यता सर्वसामान्य लग्नांपेक्षा सुमारेटक्क्यांनी अधिक असते. ठराविक प्रकारचेच जनुकीय आजार याप्रकारे संक्रमित होतात - उदाहरणार्थ, थॅलसिमिया.

जेव्हा फर्स्ट कझिन या प्रकारचे लग्न होते तेव्हा त्या दोन्हीही व्यक्तींमध्ये एखादा जनुकीय बिघाड असण्याची शक्यता 12.5% असते आणि त्यामुळे होणाऱ्या संततीत 6.25% प्रमाणात प्रत्यक्ष आजार होऊ शकतो.

म्हणून, काही कारणास्तव नात्यात लग्न करायचेच असल्यास त्यातल्या त्यात लांबचे नाते असलेले बरे.

https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC3419292/

१.
प्राचीन इंग्लिशमधील काही शब्दप्रयोग आता मजेशीर वाटतात उदाहरणार्थ, corrector of the press, madhouse, durst not, Mussulman, इ. तत्कालीन काही आर्थिक चलनांची नावे(Piastre, sequins) सुद्धा मजेदार वाटली.

यातील madhouse हा शब्द देखील मजेशीर वाटला हे खटकले. त्या काळी मनोविकार असाध्य होते. या मनोरुग्णांना या मॅडहाऊसमध्ये ठेवले जात असे. तिथे मनोरुग्णांची अवस्था फार दयनीय असे. विषयांतर नको म्हणून यावर जास्त लिहीत नाही.

२.
गुलामगिरी ही एक सर्वसामान्य व्यवस्था आहे असे मानणार्‍या त्या काळच्या समाजात गुलामगिरीविरुद्ध बोलणार्‍या फार थोड्या विचारवंतात व्हॉल्टेअरचे नाव अग्रक्रमाने आणि आदराने घेतले जाते. असे मी नुकतेच वाचले आहे.

३.
धर्मसत्ता व राजसत्ता यांची फारकत झालीच पाहिजे असा आग्रह धरला. गुलामगिरीवर त्यांनी प्रहार केला. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे तर ते खंदे समर्थक होते.
वा हे फारच आवडले. त्या काळी हे खूपच कठीण असावे.

छान. या पुस्तकात तुम्हाला काय गवसले हे कमीत कमी शब्दात परिणामकारक रीत्या मांडले आहे. धन्यवाद.

धन्यवाद !
* यातील madhouse हा शब्द देखील >> क्षमस्व ! त्या मुद्द्याबाबत सहानुभूती आहेच. लेखनाच्या ओघात चुकून त्या यादीत आला. तो 'वेगळा' वाटला असे म्हणायचे होते.
संपादन करतो.