मी वाचलेले पुस्तक - ३

Submitted by Admin-team on 20 April, 2022 - 18:19

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे.

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

The Glass Palace - Amitav Ghosh.
दुसरं महायुद्ध, ब्रह्मदेशात इंग्लंडची मोहीम. एका छोट्या जेवणाच्या टपरीवर राजकुमार नावाच्या एका भारतीय मुलाचं आयुष्य तिथे कसं घडतं आणि थिबा राजाचं राज्य विलीन होऊन तो रत्नागिरीत कसा येऊन पडतो..... मजेशीर वाटतंय. Google booksवर 67 पाने वाचता येतील. ( किंडल प्रत २५०/-)

न वाचलेली आणि परिचय आवडलेली पुस्तकं नोट केली आहेत.

ग्लास पॅलेस वाचलं होतं. कारण अर्थातच रत्नागिरी. त्या पॅलेसला लोकल नाव थिबा पॅलेस आहे.

त्याच्या मृत्यूनंतर काही कुटुंबिय परत गेले तेव्हा तो वाडा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला दिला होता. रात्री वास्तू अंधारात असायची आणि जवळच्या हॉस्टेलमधले मिणमिणते दिवे त्यामुळे परीसर भयाण वाटायचा. आता हेरीटेज वास्तू म्हणून जपला जातो व दिवे वगैरेची सोय आहे.

लेखकाने नाव ग्लास पॅलेस ठेवलं कादंबरीचं कारण ते रूपक आहे. राजा राहतो तिथे. त्याच्यासाठी खास महाल बांधला. तरी तो बंदिवास आहे. राजाच्या आणि त्याच्या राणीच्या मानाचा कसा कचरा होत जातो आणि एक सामान्य नागरिक होतात या कथानकाला हाटेलच्या एका सामान्य कामगाराचे कथानक जोडून दोन विश्वे दाखवली आहेत. ऐतिहासिक घटनांचा मागे पडदा आहेच. " ब्रिटिश काय करत होते" हे जाणून घेण्यासाठी अमिताभ घोषची पुस्तके वाचायला हवीत.

Lance Armstrong यांच्या
It;s Not About the Bike : My Journey Back to Life
या पुस्तकाचा रिव्ह्यू सकाळी लिहीला होता. पण माझ्याकडे या पुस्तकाचे प्रकाशक वेगळे आहेत. नेटवर सर्च केला तर आणखी दोन दिसले. ही काय भानगड आहे कळले नाही.
एका सायकलिस्टने वर्ल्ड वयाच्या एकविसाव्या वर्षी ( ११९३) चँपिअयनशिप जिंकली, नंतर तीन वर्षांनी (१९९६ साली) त्याला कॅन्सर डिटेक्ट झाला. डॉक्टरांनी ४०% ग्यारण्टी दिलेली. पण त्यावर मात करून तो तीन वर्षात जिद्दीच्या जोरावर कॅन्सर मुक्त झाला. जिद्द हा शब्द चुकीचा असेल, दुर्दम्य आशावाद म्हणूयात. तीन वर्षांनी मग सायकल साठी असलेली टूर दे फ्रान्स ही चँपिअयनशिप जिंकली. त्यानंतरही तो जिंकतच राहिला. पण पुढचा प्रवास पुस्तकात नाही कारण २००० साली पुस्तक प्रकाशित झाले. ही कहाणी पुस्तकात आहे.
अ त्यंत प्रेरणादायी आहे.

पण पुस्तक एका सायकलिस्टकडून आणले होते. ते महिनाभर पडून होते. नंतर त्याने परत मागायला सुरूवात केल्यावर अधून मधून पानं सोडत वाचावं लागलं. सायकलचा भाग पूर्ण वाचला. कॅन्सरचा स्किप करत करत वाचला तरीही विलक्षणच आहे. स्किप केलेले असल्याने आधीचा रिव्ह्यू खोडून टाकला होता.

इथे अनेकांनी वाचले असेल. मला आवडले.

ब्रिटिश काय करत होते" हे जाणून घेण्यासाठी अमिताभ घोषची पुस्तके वाचायला हवीत.
>>> १०००+++
बरोबर. विशेषतः आपल्याला वायव्य प्रांतात काय चाललंय याची माहिती असायची पण ब्रह्मदेश, सध्याचा बांगलादेश वगैरे प्रांतात काय राजकारण होत होतं याची फारशी माहिती नव्हती. अमिताव घोषची पुस्तकं ही गॅप नक्कीच भरून काढतात.

रानभुली, मी वाचलं होतं ते पुस्तक. पण पुढे लान्स आर्मस्ट्राँगने डोपिंग केल्याचं कबूल केलं. त्याची सगळी रेकॉर्डस् रद्द झाली. ते कळल्यावर माझ्या मुलाला भयंकर राग आला. फसवणूक झाली, असं वाटलं. ते पुस्तक त्याने सरळ कचऱ्यात टाकलं!!

चे गव्हेरा हे मोटारसायकल( डायरीज) ट्रिपचं पुस्तक आहे. ही दोन्ही आहेत वाचनालयात पण सायकल आणि मोटरसायकल दोन्ही आवड नसल्याने ती वाचली नव्हती.
बाकी जिद्द असल्याशिवाय या गोष्टी अशक्य.

ते कळल्यावर माझ्या मुलाला भयंकर राग आला. फसवणूक झाली, >> ओह. त्याची मनःस्थिती समजू शकते, खरंच वाईट वाटतं.

पण जसं त्या पुस्तकाचं नावच सांगतं कि हे आत्मचरित्र फक्त सायकलशी संबंधित नाही, तर त्याची आयुष्य जगण्याची धडपड आहे. ती खूप आव्हानात्मक आहे.

हे पुस्तक वाचल्यावर मी पण पावसाने अनियमित झालेला सायकलिंगचा फेरा पुन्हा चालू केला. मला इतकं जड गेलं थोड्याशा ब्रेकने.
तर कॅन्सरमुळं शरीर पूर्ण खिळखिळं झालेलं असताना, केमोथेरपीने आतून पोखरून निघालेलं असताना आणि रेडीएशन्सच्या सेशन्सने आतले अवयव जाळून निघालेले असताना, लगेचच सायकलिंगसाठी उभं राहणं हेच कौतुकास्पद आहे. फक्त उभं राहणंच नाही तर सायकलची स्पर्धा जिंकणं सुद्धा.

कॅन्सरच्या पेशंटला औषधांशिवाय रिकव्हरी शक्य नसते. आतून शरीर पोकळ झालेलं असतं. त्यातून ब्रेनमधे पसरलेला असेल तर भयानक वीकनेस असतो. अशा परिस्थितीत जर त्याने उत्तेजक औषधं घेतली तर समजून घ्यावं लागतं. हे मुलाला सांगून बघा.
खरं तर त्याचे पुरस्कार निर्दयीपणे काढून घेण्याआधी असा विचार करायला हवा होता, किंवा दुसरा अन्य पुरस्कार देऊन त्याचे प्रयत्नांना शाबासकी देता आली असती.

कधी कधी नियम गाढव असतात हेच खरं.

सत्तांतर: व्यंकटेश माडगुळकर.
ही जंगलात रहाणार्‍या माकड्यांच्या टोळ्यांची, त्यांच्यातील सत्तांतराची गोष्ट आहे.
लेखकाने प्रस्तावनेत लंगुर आणि इतर माकडांच्या प्रजातींवरील, त्यांच्या समुहावरील, समुहा अंतर्गत आणि दोन समुहांत परस्पर घडणार्‍या व्यवहारांवर झालेल्या संशोधनांची, त्यातून काढलेल्या निष्कर्षांची जंत्रीच दिली आहे. काही नर-नर समुह असतात. काही समुहांत एक नर म्होरक्या आणि बाकी माद्या आणि लहान मुलं/ मुली असे समुह असतात. समुहात जन्मलेल्या नर माकडांना कशी इतर नर माकडे मारुन टाकतात. त्यांचे लैंगिक व्यवहात कसे होतात, माकडे फक्त फळे/ झाडांवरील कोंब इ. खातात असं नाही तर पक्षांची अंडी सुद्धा चवीने खातात इ. माहिती फार रोचक आहे.
ती माहिती मिळवून, त्यासाठी अनेकोनेक रिसर्च पेपरचा अभ्यास करुन, रानावनांत जाऊन माकडांचे आणि इतर पशुपक्षांची निरीक्षण करुन मिळालेल्या माहिती आधारे त्यांनी ही कादंबरी लिहिली आहे. हे सगळं वाचुन लेखक कादंबरीकडे किती गंभीरपणे बघतोय ते प्रस्तावनेतच समजतं.

ही काही एक रुपककथा नाही, का बोधकथा म्हणुन ही लिहिलेली नाही ( हे लेखक प्रस्तावनेत स्पष्ट करतो. .) कादंबरी वाचुन झाल्यावर हे कोणा मानवाला, मानव समुहाला, इतिहासातील किंवा वर्तमानातील घटनेला स्मरुन लिहिलेलं आहे असं सहजी (ऑब्युअस) तरी वाटलं नाही. पण तरीही सावकाश विचार केला तर माकडांच्या वर्तनाशी आपल्याला मानवी संबंधातील समानता, तुल्यभाव जाणवतोच. पण अ‍ॅनिमल फार्म सारखं यात उघड उघड साधर्म्य अजिबात नाही, आणि ही गोष्ट वाचताना आपण त्या गोष्टीतच रंगुन जातो, हे आवडलं. उगा प्राण्यांच्या आडून ही इसापनितीची बोधकथा वगैरे अजिबात नाही.
वानरांच्या टोळीतील राजकारण, त्याला असलेले लैंगिक पदर, सत्तास्पर्धेत टिकाव लागायला लागणारे गुण-अवगुण, करायला लागणार्‍या क्लुप्त्या, सततचा संघर्ष आणि हे सगळं उणंपुरं तीन वर्षांचं म्होरके पद!
बारक्या ६०-६५ पानांत जंगलातील कालानुकाल घडणार्‍या घडामोडी, १२-१५ वेगवेगळ्या वानरांची नावा/ वैशिष्ट्यांबरहुकुम आपल्या मनात बसणारी पकड सत्ता संघर्षांत होणारे जय पराजय आणि शेवटी घटित घडणार हे पहिल्यापानापासून माहित असलं तरी तो पर्यंतचा मॅटर ऑफ फॅक्टली होणारा, हुरहुर लागुनही पान उलटल्यावर हेच तर जीवन वाटायला लावणारा प्रवास वाचताना मजा येते.
हे पुस्तक मिळवुन दिल्याबद्दल अवलचे आभार.

केकूंनी "द ओव्हरकोट" धाग्यावर सुचविलेली The cat in the rain ही एर्नेस्ट हेमिंग्वेची कथा वाचली.

एक अमेरिकन जोडपं पावसामुळे इटलीतील एका हॉटेलातल्या रूममधे अडकलेले असते. त्यातली स्त्री ही एक नवरा सोबत असूनही एकटेपणा आलेली हाऊसवाईफ वाटावी अशी आहे. तिला खिडकीतून बाहेर बघताना पावसात भिजत असलेली एक मांजर दिसते. ती मांजर तिला "आत्ताच्या आत्ता" हवी असते. खाली जाऊन ती हॉटेल मालक व तिथली मदतनीस यांच्या मदतीने ती शोधायचा प्रयत्न करते. हॉटेल मालक अगदी at your service व्यक्तिरेखा आहे त्यामुळे या अमेरिकन टुरिस्ट स्त्रीला लागेल ती मदत करायची तयारी दाखवतो. पण ती मांजर काही तिला सापडत नाही.

परत रूमवर येऊन ती आरशासमोर बघत कुरकुर करत राहते. ती म्हणते, "इथे काहीच मजा येत नाही, मला खरेतर अंबाडा हवा होता पण तुझ्यामुळे मी असे मुलांसारखे छोटे केस केलेत, मला सुंदर सिल्वरवेअर हवेत, मला नवीन ड्रेस हवेत, निदान मला तरी ती मांजर तरी हवीच आहे...ते पण आत्ताच्या आत्ता !" हे ऐकून नवरा वैतागून "शट अप" म्हणतो. तेवढ्यात हॉटेल मालक मेडला एक मांजर देऊन हिच्याकडे पाठवतो. शेवटी तिला ती मांजर मिळते. काही तरी ॲब्स्ट्रॅक्ट आणि गूढ असेल कारण वरकरणी एक लोनली हाऊसवाईफ आणि तिचा त्रागा जाणवला. शिवाय तिला हॉटेल मालकाचे सेवाभावी असणं आणि दिसणं आवडलं हे ही थोडं अधोरेखित केल्यासारखे वाटले. एवढंच आहे पण कथेत.

अस्मिता, इतकं मन लावून वाचण्याबद्दल अभिनंदन.

अलिकडच्या काही दिवसात वाचन करताना, सिनेमा पाहताना मन एकाग्र नसतं , त्यामुळं हेवा वाटला. या अशा कथा (किंवा कविता, कलाकृती) वाचताना, पाहताना त्या लेखकाबद्दल, कवीबद्दल, चित्रकाराबद्दल थोडीशी माहिती असली तर त्याला काय म्हणायचेय हे समजू शकतं. मध्यंतरी जी एं च्या काही कथा वाचल्या होत्या, पण पुन्हा तेच. एकाग्रतेने वाचल्या तर निसटू जाणारं काही हाती लागू शकतं. नाही तर काही तरी गूढ वाचलं असं वाटतं.

हेमिंग्वे यांच्या सारख्या जुन्या लेखकांच्या काळात पूष्ठभागाच्या वर वरचं वर्णन पण पृष्ठभागाच्या खाली किती तरी अशा पद्धतीने नरेशन असलेलं दिसतं. गुगळून पाहिलं तर याला आईसबर्ग थिअरी म्हटलंय. समर्पक नाव आहे.

हेमिंग्वेंच्या लिखाणाची पद्धत माहिती नाही, त्यामुळं प्रतिकात्मकतेचे अर्थ लावले तर ते मला वाटले तसे असतील. या कथेत एक दुसर्‍या (कि पहिल्या) महायुद्धातलं लष्करी स्मारक आहे. स्थानिकांसाठी या स्मारकाबद्दल भावनिक गुंतवणूक असेल. हॉटेलमधून ते स्मारक दिसतं. त्यामुळं स्थानिक स्टाफचीही त्यात गुंतवणूक असेल. ते स्मारक पहायला लोक येतात आणि त्याच हॉटेलात उतरतात.

पण त्या अमेरिकन जोडप्यामधल्या बाईचं तसं नाही. ती या सर्वांपासून अलिप्त आहे. तिचं मन त्या मांजरात अडकलेलं आहे. तिच्या कोंडलेल्या इच्छांसारखं. वास्तविक तिचा नवरा तिला सूटीवर घेऊन आलाय, एक प्रेक्षणीय स्थळ पहायला दोघेही आलेत. पण तिचं मन यात रमत नाही. तिला काय हवंय त्याची त्याला कल्पना नाही. असं काही तरी कथेचं सार असावं असं हे परीक्षण वाचून वाटलं.

कथा वाचेनच याची काही खात्री नाही.
इथे इतकं सुंदर रसग्रहण दिल्याबद्दल मनापासून आभार.

अभ्यासपूर्ण पोस्ट राभु. हो, आईसबर्ग थेअरी आहे. वरवर साधीच वाटणारी कथा पण ती कुठेतरी एकटी आहे म्हणून तिला मांजर हवी आहे, ती सुपरफिशियल दिखाव्यात सुखी नाही, नवऱ्यासोबत सुखी नाही. त्यामुळे ती वर्णनं ही त्यांच्या संसाराचीच प्रतिकं असावीत वरून सुशोभित किंवा नॉर्मल आतून असुखी आणि रिक्त. हिमनगाचे फक्त टोक दाखवून तिच्या मांजर हवं असण्याच्या अट्टाहासाची कारणं शोधायची जबाबदारी वाचकांवर सोडली आहे. स्मारक वगैरे सगळी प्रतिकं असावीत.

या अशा कथा (किंवा कविता, कलाकृती) वाचताना, पाहताना त्या लेखकाबद्दल, कवीबद्दल, चित्रकाराबद्दल थोडीशी माहिती असली तर त्याला काय म्हणायचेय हे समजू शकतं. >>>> अनुमोदन.

धन्यवाद. Happy . एकाग्रतेची वाट लागली आहे माझ्याही, हे पुन्हा वळण लावणं चालू आहे. Happy

एकाग्रतेची वाट लागली आहे माझ्याही, >>> किती दिशांनी नि काय काय येऊन आदळत असतं,कि एकाग्रता शक्यच नाही.
कुठे तरी इंटरनेट,टिव्ही नसलेल्या जागी पुस्तकं आणि सायकल घेऊन जावं असं वाटतंय. Lol

आभार मानायचेच राहून गेले एकाग्रतेच्या नादात Happy
थँक्स अस्मिता.

ह्या इवल्या इवल्या घरात
माणसाला लागलेय खूळ
त्याची गोम अश्शी आहे की
आन्हला नाही मूल!
=====
पहा हे जमतेय का!
अस्मिता, छान परिक्षण लिहिले आहे.

ओह, अपत्यहीन असल्याने आलेली रिक्तता भरून काढण्यासाठी तिला ती पावसात भिजणारी मनीमाऊ हवी आहे, कळाले. शेवटी तिला ती माऊ मिळाल्याने ही कथा तर गोड होऊन बसली. Happy आभारी आहे.

कोणाला तरी आपण हवे आहोत ही भावना जोर करू लागते याचं मूर्त रूप म्हणजे ती भिजणारी मांजर. ती मांजर हिच्याशी गट्टी करेल, लाड करून घेईल.
-------
बहुतेक नाटकात किंवा कथानकात नायक नायिकांना काय वाटते हे वाचक किंवा प्रेक्षकांना समजावे म्हणून त्यांचे मित्र. सहनायक नायिका असतात. त्यांच्याशी बोलताना ते कळते. पण जीएस तसं करत नाहीत. मग ते गूढ होत जाते.

वरवर साधीच वाटणारी कथा पण ती कुठेतरी एकटी आहे म्हणून तिला मांजर हवी आहे, ती सुपरफिशियल दिखाव्यात सुखी नाही, नवऱ्यासोबत सुखी नाही. त्यामुळे ती वर्णनं ही त्यांच्या संसाराचीच प्रतिकं असावीत वरून सुशोभित किंवा नॉर्मल आतून असुखी आणि रिक्त. हिमनगाचे फक्त टोक दाखवून तिच्या मांजर हवं असण्याच्या अट्टाहासाची कारणं शोधायची जबाबदारी वाचकांवर सोडली आहे. स्मारक वगैरे सगळी प्रतिकं असावीत. >>
अस्मिता आणि srd सकाळी निघायची घाई असल्याने नेमका प्रतिसाद दिला नाही.
अस्मिता, योग्य शब्दात अचूक वर्णन केले आहे. तू खूप प्रगल्भ वाचक आहेस. इथून पुढच्या तुझ्या कथेच्या अनुवादासोबत रसग्रहण सुद्धा पाहिजेच बरं का!
Srd जी एं च्या कथांबद्दल पटलं तुमचं म्हणणं. आता तुमचा एखादा धागा जीएं च्या कथेवर येऊ द्या. किती दिवस तुम्हाला फक्त प्रतिसाद देताना बघायचं?
ओपन एन्डेड abstract कथेत दिशा शोधावी. निश्चित अनुमान किंवा घटना जोपर्यंत लेखक सांगत नाही तोपर्यंत ठरवू शकत नाही.

जसं मांजर आहे तसंच केसांचा उल्लेख आहे. तिला हवी तशी केशरचना तिने केलेली नाही. त्याला हवी तशी केली आहे. तो तिला या ठिकाणी व्हेकेशन वर घेऊन आलाय. तिचा चॉईस आहे का हे माहीत नाही.पण ती यात रमलेली नाही म्हणजे तिची फक्त फरफट आहे हे स्पष्ट झाले.

आता देखील तिला मांजर हवंय तर तो तिला शट अप म्हणाला. ते भिजलंय म्हणून तिच्यात दयाभाव उत्पन्न झाला असेल किंवा वात्सल्य उफाळून आले असेल किंवा मांजराशी खेळण्याची मौज हवी असेल.... अशा छोट्या छोट्या अपेक्षा त्याला पुरवता येत नाहीत. तो तिला गप्प करतोय. त्याला हवं ते तिच्या वर लादून तो वाचनात गर्क आहे. आत्ममग्न आहे तो.

मांजर आणून दिल्यावर ती आनंदी झाली. किती छोटीशी अपेक्षा!
सकाळी हे लिहायला धजावत नव्हते कारण पाश्चात्य देशात सुद्धा हीच परिस्थिती होती का असा प्रश्न पडला. कोणत्या काळातील कथा आहे ही?

खूपच सिंबॉलिक असेल आणि लेखक एखाद्या डाव्या / उजव्या विचाराचा असेल तर ती आणि तो सुद्धा सिंबल्स असतील. . लेखकाची माहिती नसल्याने हा जरा जास्तच कल्पनाविलास असू शकतो.

ईथे खरच खूप वेगळी पुस्तक समजतात. मला अमितव घोष ची पुस्तक हवी आहेत . पण लायब्ररी मधे ती नाहीत. घरी कोणी english विचतन नाही मी सोडून .तर किःडल वर विकत घ्यावी का अस वाटतय.

ईथे अक्षत गुप्ता ची The Hidden Hindu सिरीज कोणी वाचली आहे का?मी पहिला भाग आणलाय पण म्हणावा तसा आवडत नाहीये. कथानक पकड घेत नाहिये

>>एखादा धागा जीएं च्या कथेवर येऊ द्या... Submitted by रानभुली
जीएंच्या कथांचं रसग्रहण कठीण आहे आणि त्रोटक माहिती देण्यानेही काही साध्य होणार नाही. शांतपणे कथा वाचायच्या. १. जीएंच्या कथांवर मालिका काढण्याचा प्रयत्न झाला होता मागे एकदा ( बहुतेक सह्याद्री चानेलवर) तीन चार कथांनतर मालीका गुंडाळली. कारण दृष्य माध्यम, उगाचच मालिका लांबवत नेणे, भडक घटना टाकून वाढवणे याला प्रेक्षक सरावले आहेत. इतके सूक्ष्म नाट्य दाखवणे कठीण आहे. २. मागे एकदा एबिपी माझावर राहूल कुलकर्णी यांनी जीएंच्या कथेतील येणारी वर्णने आणि त्यांच्या धारवाडच्या घराजवळील दृष्ये कथेत कशी आली आहेत याचा शोध दाखवला होता. फारच आवडलं. ३. जीए अशा कथा का लिहीत होते असा विचार पडतो पण एकदा एक मराठी पुस्तक सापडलं " मराठी भाषा प्रभूंची प्रेमप्रकरणं" ते वाचलं त्यात काही नामवंत लेखकांच्या खऱ्या कहाण्या दिल्या होत्या. त्यात बालकवी आणि जीएही होते. जीएंचं प्रेम आणि लग्न फार वाईटपणे फिसकटलं होतं. पुस्तकांच्या नावावरून काही थट्टेखोर गंमती असतील असं वाटतं पण पुस्तक करूण आहे. वाईट वाटतं. फक्त एका लेखकाचंच प्रेमप्रकरणं अगदी पूर्णपणे आनंददायक झालं.
तर असो. माझा प्रयत्न पुस्तकाचा विषय काय आहे आणि कथानक सादर करण्यात लेखक किती यशस्वी झाला आहे हे सांगून वाचकांचं लक्ष वेधणे हा असतो. आणि तसं पाहिलं तर मला रसग्रहण जमतही नाही.

मांजर घरात असणे हे माझ्या मते घरातल्या शांततेचं, प्रेमळ वातावरणाचं , आनंदाचं प्रतीक वाटतं. घरी आलेल्या पाहुण्यांनाही त्रास देत नाही. मिळून मिसळून राहातं. भारतात तरी मांजराची वंशावळ कोणती इत्यादी चिकित्सा नसते. रस्त्यावरचं मांजराचं सापडलेलं पिलू आणून ठेवल्यावर ते घरचं होतं.

>> अमितव घोष ची पुस्तक हवी आहेत >>> by प्राजक्ता कागदे
१. अमिताभ घोष ची पुस्तकं गेल्या वीस वर्षांतली अधिक आहेत आणि खूप अभ्यास करून लिहीली आहेत. त्यांचे मराठी भाषांतराचे हक्क अजून मेहता पब्लिशिंगलाही हाती आलेले नाहीत. एक थोडा व्यावहारिक उपाय म्हणजे तीन वाचकांचा गट बनवून तीन पुस्तकं तिघांनी विकत घेणे. पंधरा दिवसांनी फिरवणे. शेवटी एक पुस्तक प्रत्येकाकडे राहील. खर्च कमी आणि घरात गठ्ठा कमी साठेल.
२. मोठ्या सार्वजनिक वाचनालयात दरवर्षी पुस्तके मागवली जातात आणि साधारणपणे जुलै ऑगस्टमध्ये यादी घेतात. कुणी एक contractor 20% दराने पुस्तके आणून ओततो. त्याला स्वतःला चाळीस टक्के कमिशनने मिळतात. चांगले पब्लिशर चांगल्या पुस्तकांना एवढे कमिशन देत नाहीत. त्यामुळे ती येत नाहीत. परंतु बऱ्याच वाचकांनी एकच नाव सुचवले तर ते येते. चारशे पुस्तकांत पाच दहा सहज खपून जातील. थोडक्यात असे की वाचकांनी अशी यादी द्यावी.
३.. पुस्तक " download pdf books for free" असा शोध Microsoft Bing मध्ये घेतल्यास काही साईट ( बेकायदेशीर) हाती लागू शकतात. गूगल सर्चमध्ये येणार नाहीत. हा थोडा वाइट सल्ला आहे परंतू खात्रीशीर साईट आहेत.

राभु, धन्यवाद. तुला कथा आवडली, वाचावी वाटली. त्या अनुषंगाने माहिती मिळवावी वाटली- हे बघून मस्त वाटलं. Happy १९२५ ला प्रकाशित झालेली कथा आहे.
चर्चा- पोस्टी वाचतेय. Happy

>>>>>>>>>>>>>एखादा धागा जीएं च्या कथेवर येऊ द्या... Submitted by रानभुली
हा मी मागे अन्यत्र टाकलेला उतारा -
--------------------------------------------
कोणी मराठी पुस्तकांबद्दल लिहीले की मला नहमी वाटते त्यातील उतारे द्या. आम्हा मराठीची उपासमार असलेल्यांना वाचू द्यात Wink आज मी मराठी पुस्तकाचा परिचय लिहीते आहे, अन खूप उतारे देणार आहे. Stay Tuned.

"पारवा" - जी ए कुलकर्णी


कथांमधील, मृगजळाच्या मागे लागलेली दुर्गी, अन स्वतःच्या बहीणीचाच मित्र जाळ्यात ओढून खुशाल थेरं करणारी अन अतिशय माजोरी शकी, सरड्याच्या पावलांची काशी सर्व पात्रे आवडत आहेत असं नक्कीच म्हणता येणार नाही परंतु त्यांची दु:खे, व्यथा अन घुसमट खरं तर विषारी जीवने वाचताना, आपण कोणत्या हस्तिदंती मनोर्‍यात वावरतो असे वाटते.
शलॉट मधली सरड्याच्या पावलाची काशी तर एकदम चटका लावून जाते.
"काकणे" कथेतील भटांच्या बायकांची जीवनपद्धती अतिशय बारकाव्याने वर्णन केलेली आहे. आता कोणी म्हणेल त्यात "भटांच्या" हा उल्लेख करण्याचं कारण काय? तर कारण आहे- जेव्हा कावेरी घुमी घुमी बसून रहाते तेव्हा काकू म्हणतात - महाशिवरात्रीच्या चूलीसारखी बसलीये.
जेव्हा काकू अंगाचे मुटकुळे करुन पडलेल्या दिसतात तेव्हा कावेरीला त्यांना पाहून, मुटकुळे केलेल्या कदाची आठवण येते. या सार्‍या वर्णनात, सोन्याला मंगलधातू हा शब्द वापरला आहे. तर रेशीम इतके घरंदाज असावे की प्रकाश त्याचेवरुन सरकताना जरा काळ थांबावा.
जी ए, उपमा अन रुपके तर इतकी अनवट वापरतात जसे -
वडीलांचे शब्द ऐकून तिला, तिला स्वतःच्या अंगावर सरडे चढू - उतरु लागल्याचा भास होणे,
रस्ता पापड फुलल्यासारखा गजबजू लागणे,
आंधळ्या डोळ्याच्या खोबणीसारखी विहीर,
सुरकुत्या पडलेला, वाळक्या भोपळ्यासारखा चेहरा,
चिमण्यांच्या विटक्या प्रकाशाप्रमाणे तेथे बर्‍याच माणसांचे आयुष्य धुरकटत संपत होते,
माझ्याच ओट्यात सोन्याची माती झाली.
.
स्किझोफ्रेनिया (पुस्तकात तसा थेट उल्लेख नाही) झालेल्या बापूला जे काही दिसत असे त्याचे भयावह चित्रण येते - तो शून्य नजरेने वर पहात पडला होता. कडेपाटाच्या लाकडावर अनेक साप, वेडेवाकडे होऊन पळत होते, एकमेकात अडकत होते. त्यांच्यामध्ये डोहासारखे एक वर्तुळ होते, त्यावरील पांढरट डाग एखाद्या डोळ्याप्रमाणे दिसत होता. तो डोळा आपल्याकडे पहातो....मग आपला डोळा त्याच्याकडे पहातो मग पुन्हा तो डोळा आपल्याकडे पहातो, ही गंमत पाहून, बापू स्वतःशीच हसत होता.त्या डोहातले पाणी मधेच थरथरु लागले, त्याच्या लाटा पसरत खाली आल्या.बापूने हात उंचावून एका लाटेला हळूच स्पर्श केला, तिला चाकूची थंड धार होती.तो उठला व त्या लाटांच्या वर्तुळांना ढकलत स्वयंपाकघरापुढे आला. चालताना त्याची सावली, सावज हेरल्याप्रमाणे सावकाश सरकत होती. बापू तिच्याकडे तिरप्या नजरेने पहात होता.दरवाज्यातून आत शिरताना ती भिंतीवरुन पुढे येऊन आपल्याला धरणार असे त्याला वाटू लागले व त्याने टुण्णदिशी उंबर्‍यावरुन आत उडी घेतली. बाजूलाच व्हरांड्यात स्वयंपाकीण काकू रमाबाई शाल पांघरुन गाढ झोपल्या होत्या. त्यांच्या शालीचा रंग आमसोलासारखा होता. पाय दुमडून झोपलेल्या त्या आकृतीकडे पहाताच त्याच्या सार्‍या शिरा ताणल्यासारख्या झाल्या, डोक्यात एकदम गोळा येऊन, लालभडक फुटला. त्याचे अंग दिवटीसारखे पेटले. त्याने कोपर्‍यातली सोवळे घालण्याची काठी उचलली व तो रमाकाकूंवर ताड-ताड प्रहार करु लागला.
.
बलात्कार केल्यानंतर, मेस्त्री कावेरीला घराबाहेर ढकलून देतो अन दरवाजादेखील लाथेनेच लोटतो. त्यातील "देखील" शब्दाने काळीज अक्षरक्षः चरकते कारण "देखील" म्हणजे तो कावेरीला देखील लाथच घालतो. एकंदर त्या प्रसंगातील कावेरीची विटंबना काळजाला डागण्या देऊन जाते. असहाय, अगतिक, नियतीच्या भोवर्‍यात सापडलेले लोक, त्यांच्या मानसिकतेचे सूक्ष्म वर्णन अन अत्यंत चित्रमय भाषा.

___
अवांतर खरं तर पुस्तके बसमधून न्यायला आणायला, लहान नीटस पिशवी हवी आहे. अन इथे पाऊस असल्याने प्लास्टिकची उत्तम. आज खालील आकाराची, एक कापडी विकत घेणार आहे. योग्य त्या पिशवीशिवाय पुस्तक प्रवासात नेऊच नये असे वाटते. उगाच अक्षम्य हेळसांड करायची.
.
"पारवा" संग्रहातील "व्यथा" नावाची अत्युच्च कथा वाचली. वयाने वाढलेल्या मुलीचे लग्न होत नाही अन तिच्या पगारावर घर चालतय, गरीबी तर इतकी आहे की विरलेलं पातळ घ्यायला पैसा नाही, नवरा स्वप्नाळू वृत्तीचा अशा गांजलेल्या पण अतिशय मानी राधाबाई अक्षरक्षः चटका लावून जातात. अन किती प्रेम करतात त्या मुलीवर. "बाहुलीच्या गळ्यातील काळा मणी हरवला काय अन शाळेजवळ लंगडी शेळी दिसली काय" अशा लहानसहान गोष्टी भरभरुन आईला सांगणारी कालिंदी आता घुमी झाली, डोळ्याभोवती काळी वर्तुळं निर्माण झाली, कोपर्‍यात खंगून पडून रहाते अन मुलीचा हा अनावस्था कायापालट होण्याचं दुर्भाग्य नशीबी आलेल्या राधाबाईंचे हृदय तीळ्तीळ तुटते.
ही कथा मला सर्वात चटका लावून गेली. अक्षरक्षः बसमध्ये डोळ्यांना धारा लागतील असे वाटून गेले.
.
"निरोप" कथेतील म्रूत्युपश्चात विजुचा वावर अन त्या वावरात तिच्या मनात आलेले विचार - फार गूढ अन वेगळीच पण चटका लावणारी कहाणी आहे. त्यातील काही अंश पुढे -
स्वयंपाकघरात आल्यावर विजुच्या मनावरुन एकदम बरीच वर्षे गळून पडली. लोलकातून पाहील्याप्रमाणे, अगदी परिचित वस्तुभोवती हळूवार भावनेची शलाका तिला दिसू लागली. कशाची तरी उत्कटतेने वाट पहात असल्याप्रमाणे, स्वयंपाकघर जिवंत वाटत होते. एका बाजूला ठेवलेल्या देव्हार्‍यातील समईचा तृप्त प्रकाश तलम पणे ताटापाटांवर, भांड्यांवर, स्वच्छ सारवलेल्या चूलीवर पसरला होता आनि कोनाड्यात ठेवलेल्या गंध उगाळण्याच्या खोडामुळे त्याला नाजूक वासाचा स्पर्श झाला होता. जिन्याची एकेक पायरी उतरावी त्याप्रमाणे निरनिराळ्या वस्तूंनी विजूच्या आयुष्याची वर्षे कमी झाली. लहानपणी खास तिच्यासाठी घेतलेला चांदीची फुले असलेला हिरवा पाट तिथे उभा होता. त्याचा रंग कित्येक जागी उडालेला, चांदीची फुले किंचित झिजलेली; पण प्रामाणिकपणे आपला पाचपा़कळी आकार सांभाळून बसलेली ..... समईतील प्रकाशात देव्हार्‍यातील मूर्ती विश्रब्धपणे झळाळत होत्या. त्यातील चांदीच्या नागाची मूर्ती विजूने एकदा आईला नकळत आपल्या दप्तरात घालून शाळेतील मुलांना दाखवायला नेली होती. एका मूर्तीवर, मूठभर जाळ हातात घेऊन गोठवल्याप्रमाणे दिसणारे एक लालभडक द्राशाळाचे फूल होते. .......
.
जी एंच्या उपमा तर इतक्या अनवट अन वेगळ्याच असतात उदाहरणच द्यायचे झाले तर -
.
विजू मनाने माधववरती प्रेम करते अन लग्न अन्य कोणाशी होते. अन तिच्या मनात विचार येतो - माधव आता तुला माझी कधी आठवण होत असेल की नाही कुणास ठाऊक! पण मला मात्र सारं आठवतं. प्रेतावरील फुलाच्या गंधाप्रमाणे ते मला त्रस्त , उद्विग्न करतं.
.
"ऊभे गंध लावणारे, बसल्याबसल्या चंदनाचे खोड पाठीत घालणारे, स्वतः शेंगदाणे खात आपल्याकडून रामरक्षा म्हणवून घेणारे दादा तिला आठवेले आणि शांत , अबोल, पैठणीवरील कोयरीप्रमाणे वाटणारी वहीनी दिसली.
___________

जी एं चे सांजशकुन सुरु केले आहे. जर पारवा सामान्य लोकांच्या व्यथेबद्दल होते तर "सांजशकुन" मध्ये अ‍ॅब्स्ट्रॅक्ट, गूढ, सत्याचा शोध आदि काही विषय जी एंनी हाताळले आहेत असे प्रथमदर्शनी वाटते. पैकी अनंत, अहम अन प्रसाद या गोष्टी वाचून झाल्या. सर्वच सरस आहेत. पण "अनंत" फारच आवडली विशेषतः मला कुंडलिनी योग मधील, सातापैकी ३ चक्रांशी ती रिलेट करता आली. अर्थात जी एं ना तसा अर्थ अभिप्रेत नसेलही. "प्रसाद" कथेतील खालील परिच्छेद आवडला. अन्य परिच्छेद येतीलच.

ते समोर झुडुप दिसते ना, तिथे भर पावसाळ्यात एक हिरवा दांडा उगवतो व त्यावर लाल सुगंधी जखमेप्रमाणे फुलांचा गुच्छ येतो. रात्री त्याचा वास पसरतो. तो वास येतोदेखील एखाद्या सरदाराच्या तालेवार दिमाखाने - इतरांना जिंकण्यासाठीच, नम्र करण्यासाठीच. त्यावेळी मात्र तू म्हणतोस तसे वाटते खरे.त्या स्त्रीला आपल्या रुपाचा गर्व असावा. तिच्यात अद्यापही थोडा प्रतिकार असावा. तिने हिर्‍यांची कर्णभूषणे घातलेली असावीत आणि तिचे डोळे - ते मात्र निळे नसावेत.निळे डोळे रिते , वेडसर वाटतात. हरीणीच्या मांडीवर सूर्यप्रकाश पडला की जो धुंद तपकिरी रंग दिसतो, तसे ते असावेत. आणि त्यातही ती असावी केवळ मादी. केवळ आपले उष्ण रक्त, मदिर शरीर यांच्या इशार्‍यांनी जगणारी; आत्मा, मन, पापपुण्य असल्या कोळिष्टिकांपासून स्वच्छ असलेली, एक निरंजन, केवळ स्त्री. - सांजशकुन (जी ए)

जी ए एकेकाळी आवडत असत. नंतर नंतर जड जाऊ लागले. अर्थात मग मैत्रिणींना पुस्तके देउन टाकली. परत वाटली तर विकत घेइन परत.

@सामो, बेस्ट.
>>जी ए एकेकाळी आवडत असत. नंतर नंतर जड जाऊ लागले.....>
आता या गोष्टींची वर्णनं जुनी होऊ लागली. नवीन घटना नवीन समस्या आणि त्यांनी नवीन उत्तरं......Radhika Yadav, murdered by her father. नवीन लेखक येतील.

थोडक्यात असे की वाचकांनी अशी यादी द्यावी. <<>>>>. पै लायब्ररी सारख्या लायब्ररीज उत्तम, चांगली पुस्तकं घेतात. फी जास्त असली तरी ती वसूल होते.

हा माझा आवडता धागा आहे. इथे वाचून पुस्तकांची यादी सारखी अपडेट करत जाते. त्यातही लायब्ररीत असलेली, लायब्ररीत नसलेली पण किंडलवर असलेली आणि दोन्हीकडे नसलेली असे भाग केले आहेत. शोधणे सोपे जाते.

जी ए एकेकाळी आवडत असत. नंतर नंतर जड जाऊ लागले.<<>>> अगदी.

'दीवार में एक खिडकी रहती थी' विनोद कुमार शुक्ल यांचं पुस्तक आहे.. चांगलं आहे‌.. पण मला त्यांचं 'नौकर की कमीज' आणि 'खिलेगा तो देखेंगे' ही जास्त आवडली होती.
या तिन्ही पुस्तकांचे मराठी अनुवाद झाले आहेत.

शिवाय हिंदीमध्ये देवीप्रसाद मिश्र म्हणून एक आहेत अलीकडचे. त्यांचं 'मनुष्य होने के संस्मरण' गेल्या वर्षी पुस्तक महोत्सवातून घेतलेलं.. याचा मराठी अनुवादही आला आहे नुकताच. ('माणूस असण्याच्या आठवणी', अनु. गणेश विसपुते, पपायरस प्रकाशन). फार चांगलं पुस्तक आहे हे.

अरेच्चा! इथं वरती 'दीवार में एक खिडकी रहती थी' चा उल्लेख असलेला एक प्रतिसाद होता .. तो संपादित केला गेला बहुतेक.. त्या अनुषंगाने मी वरचा प्रतिसाद दिला होता.. असो. Happy

संप्रति, हो. पुस्तक वाचल्यानंतर लिहावेसे वाटले तर लिहीन त्या बद्दल.
आता घाई झाली असं वाटल्याने काढला प्रतिसाद. Happy

Pages