रसायनांचा धुमाकूळ आणि कर्करोगाचा भस्मासुर

Submitted by कुमार१ on 2 December, 2017 - 01:39

ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू असतोच हे तर मूलभूत सत्य. पण हा मृत्यू निरोगी अवस्थेत शांत झोपेत किती जणांच्या वाट्याला येतो? फारच थोड्या. आयुष्यात मानवी शरीर हे कुठल्या ना कुठल्या रोगाची शिकार बनतेच. मग हा रोग शरीर पोखरत रुग्णास मृत्यूस नेतो. आज विविध रोगांमुळे होणाऱ्या मृत्युंमध्ये हृदयविकार हे आघाडीवर आहेत आणि त्याखालोखाल स्थान आहे ते कर्करोगाचे. सध्या जगभरात कर्करोगाने जवळपास ८० लाख लोक दरवर्षी मरण पावतात. हा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. चालू शतक संपेपर्यंत बहुधा कर्करोग हा हृदयविकाराला मागे टाकून ते अव्वल स्थान पटकावेल अशी चिन्हे दिसताहेत.

आपल्याला कर्करोग का होतो? ढोबळ मानाने त्याची तीन कारणे आहेत:
१. विविध किरणोत्सर्ग (रेडीएशन)
२. अनेक प्रकारची रसायने, आणि
३. काही विषाणूंचा संसर्ग

आपल्याला होणाऱ्या एकूण कर्करोगांपैकी सुमारे ८०% हे रसायनांमुळे होतात. हादरलात ना हा आकडा ऐकून? पण ते वास्तव आहे. आज माणसाने विविध कारणांसाठी बनवलेल्या रसायनांची संख्या एक लाखाच्या आसपास आहे! या रसायनांशी आपला अनेक प्रकारे संपर्क येतो. त्याचे अनेक दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात आणि कर्करोग हा त्यापैकीच एक. रसायनांचे विविध स्त्रोत, त्यांच्यामुळे कर्करोग का होतो, कोणती रसायने जास्त घातक आहेत आणि त्यापासून वाचण्यासाठी आपण कोणते प्रतिबंधात्मक उपाय करू शकतो यांचा आढावा या लेखात घेत आहे.

या विषयाची व्याप्ती मोठी असल्याने पुढील मुद्द्यांच्या आधारे विवेचन करतो:
१. रसायनांशी आपल्या संपर्काचे मार्ग
२. रसायने आणि कर्करोगाची कारणमीमांसा
३. कर्करोगकारक रसायनांची उदाहरणे आणि
४. प्रतिबंधात्मक उपाय

रसायनांशी आपल्या संपर्काचे मार्ग
रसायने आपल्या शरीरात हवा, पाणी, अन्न अथवा त्वचेमार्फत शिरू शकतात. त्यांचे स्त्रोत हे खालीलप्रमाणे असू शकतात:
१. अन्नातील नैसर्गिक घटक : उदा. Aflatoxin हे दाणे, मका व सोयाबीन यांच्यात असते.
२. रासायनिक शेतीतील पिके : या विषयावर गेल्या दहा वर्षात अनेक माध्यमांतून भरपूर दळण दळले गेले आहे. अधिक लिहिणे नलगे.
३. अन्न-प्रक्रिया : एखादे उकळलेले खाद्यतेल तळणासाठी वारंवार वापरुन त्यात aromatic hydrocarbons तयार होतात. हा प्रकार कनिष्ठ दर्जाच्या खानावळीत हमखास होतो.
४. व्यसने : उदा. तंबाकूतील अनेक रसायने आणि अल्कोहोल
५. हवा व पाण्याचे प्रदूषण : कारखान्यांतून सोडली जाणारी अनेक रसायने.
६. विशिष्ट उद्योगधंदे : उदा. Asbestos हे वाहन आणि बांधकाम उद्योगात वापरले जाते, तर aromatic amines ही रबर उद्योगात वापरतात.
७. रोगोपचारासाठी वापरलेली औषधे : उदा. cyclophosphamide हे काही कर्करोगांच्या उपचारासाठी वापरलेले औषध अन्य काही कर्करोग निर्माण करू शकते! आहे की नाही हा विरोधाभास?

रसायने आणि कर्करोगाची कारणमीमांसा
कर्करोगकारक रसायने ही आपल्या पेशींमध्ये शिरून थेट DNA वर हल्ला चढवतात. परिणामी काही जनुकीय बदल होतात. मग विशिष्ट प्रथिनांची मोठ्या प्रमाणात निर्मिती होते आणि त्यांच्या प्रभावाखाली पेशींची अनियंत्रित वाढ होते. हाच तो कर्करोग. अर्थात अशा प्रकारे होऊ शकणारा कर्करोग खालील घटकांवर अवलंबून असतो:

१. रसायनाचे शरीरात जाणारे प्रमाण
२. रसायन-संपर्काचा दीर्घ कालावधी
३. कर्करोग होण्यासाठीची जनुकीय अनुकुलता आणि
४. शरीराची कमकुवत प्रतिकारशक्ती

ह्या सर्व घटकांच्या एकत्रित परिणामातून कर्करोग होतो (multifactorial disease). काही वेळेस गप्पांच्या अड्ड्यात आपल्याला “अहो, आमचे ते काका रोज पन्नासेक तरी सिगारेटी फुंकायचे, तरी वयाच्या ८०व्या वर्षापर्यंत कसे ठणठणीत होते” अशा छापाची विधाने कधीमधी ऐकायला मिळतात. याचे स्पष्टीकरण वरील चार कारणांमध्ये दडलेले असते. अर्थात अशी उदाहरणे ही अपवाद म्हणून सोडून द्यायची असतात. एखादे रसायन जर ९५% लोकांना घातक ठरले असेल तर त्याकडे गांभीर्याने बघितले पाहिजे.

कर्करोगकारक रसायनांची उदाहरणे
या संदर्भात अनेक रसायनांकडे ‘संशयित’ म्हणून बघितले गेले आहे. साधारणपणे त्यांचे दोन गटात वर्गीकरण करता येईल:
१. कर्करोगकारक (carcinogenic)
२. कर्करोगपूरक (co-carcinogenic)
त्यापैकी सुमारे १०० रसायने ही आतापर्यंत माणसासाठी ‘कर्करोगकारक’ म्हणून सिद्ध झालेली आहेत. यातील एकेक रसायन हे स्वतंत्र प्रबंधाचा विषय होऊ शकेल. काही रसायनांचा संपर्क हा विशिष्ट व्यावसायिकांपुरता मर्यादित असतो. याउलट धूम्रपान आणि मद्यपान हे समाजातील खूप मोठ्या समूहांशी संबंधित विषय आहेत. त्यामुळे या लेखाच्या मर्यादेत या दोनच स्त्रोतांमधील रसायनांचा विचार आपण करणार आहोत.

तंबाकूचे धूम्रपान
जागतिक स्तरावर फुफ्फुसाचा कर्करोग हा कर्करोगांच्या यादीत प्रथम क्रमांकावर आहे. त्याचे सर्वात महत्वाचे कारण आहे अर्थातच धूम्रपान. या रोगाने जे मृत्यू होतात त्यापैकी ८०% लोक हे दीर्घकाळ धूम्रपान करणारे असतात. धूर ओढणे हे स्वतःसाठी आणि धूर सोडणे हे आजूबाजूला असणाऱ्यांना घातक असते!
या धुरातील रसायनांचा तपशील असा आहे :
• एकूण रसायने ७०००
• त्यापैकी घातक २५० आणि
• कर्करोगकारक ६९
• कर्करोगकारक रसायनांमध्ये Acetaldehyde, Aromatic amines, Benzo[α]pyrene ही काही उदाहरणे.

तंबाकूतील निकोटीन हे एक बहुचर्चित रसायन आहे. ते जबरदस्त व्यसनकारी आहे पण ते माणसात कर्करोगकारक असल्याचे अद्याप निर्विवाद सिद्ध झालेले नाही. तूर्तास त्याला कर्करोगपूरक म्हणता येईल.
तंबाकू खाणे हा प्रकार आपल्याकडे भरपूर आहे. त्यातील nitrosamines हे तोंडाच्या कर्करोगास कारण ठरतात. भारतात हा कर्करोग पुरुषांमधील कर्करोगांच्या यादीत प्रथम क्रमांकावर आहे.

अल्कोहोलचे सेवन अर्थात मद्यपान
हे शीर्षक वाचताक्षणीच अनेकांच्या भुवया उंचावतील कारण हा अतिशय संवेदनशील विषय आहे ! जगभरातील सुशिक्षित समाजावर नजर टाकता एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. अनेकांनी धूम्रपानाला आयुष्यातून हद्दपार केलेले आहे पण त्यांना मद्यपानाची संगत मात्र सोडवत नाही. संशोधकांचाही हा लाडका विषय! त्यामुळे बहुसंशोधित आणि बहुचर्चित. फक्त कर्करोगच नव्हे तर इतर अनेक आजारांशीही त्याचा कार्यकारणभाव जोडलेला आहे. त्यावरील भरपूर उलटसुलट माहिती माध्यमांतून उपलब्ध आहे.
एक दशकापूर्वी अल्कोहोलला ‘कर्करोगपूरक’ इतपत लेबल लावलेले होते. आता मात्र ते ‘कर्करोगकारक’ च्या यादीत जाऊन बसले आहे. काही संशोधक त्याला ‘risk factor’ असे सुरक्षित लेबल लावणे पसंत करतात.

तर आता जाणून घेऊयात याबाबतीतली ताजी घडामोड. ६ नोव्हेंबर २०१७ रोजी American Society of Clinical Oncology (ASCO) ने अल्कोहोल आणि कर्करोग याबाबत नियतकालिकात जाहीर निवेदन दिलेले आहे. ‘First-time Statement’ अशा विशेषणासह त्याला ठळक प्रसिद्धी दिलेली आहे. त्यातील महत्वाचे मुद्दे असे आहेत:
१. अल्कोहोल हे पुढील सात अवयवांच्या कर्करोगास कारणीभूत ठरते (causal relationship) : तोंड, घसा, स्वरयंत्र, अन्ननलिका, यकृत, स्तन आणि मोठे आतडे.
२. तर जठर आणि स्वादुपिंडाच्या बाबतीत मात्र ते ‘कर्करोगपूरक’ आहे.
३. दीर्घकाळ अतिरिक्त मद्यपानाने कर्करोगाचा खूप धोका संभवतो आणि प्रमाणात (moderate) पिणे सुद्धा सुरक्षित नाही.
४. वैधानिक इशारा : “ तुम्हाला जर कर्करोगाचा धोका कमी करायचा असेल, तर खूप कमी ‘प्या’ आणि जर तुम्ही ‘पित’च नसाल तर अल्कोहोलच्या नादीच लागू नका !”

तर हे होते धूम्रपान आणि मद्यपानाशी संबंधित रसायनांचे विवेचन. अन्य रसायनांचा विचार विस्तारभयास्तव करीत नाही.

प्रतिबंधात्मक उपाय
संशोधनातील प्रगतीमुळे कर्करोगाच्या नवनव्या उपचारपद्धती विकसित होत आहेत. त्यामुळे जरी बऱ्याच कर्करोगांवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले असले तरीही रोगप्रतिबंध हा कधीही श्रेष्ठ उपाय ठरतो. याबाबतीत जागतिक आरोग्य संघटनेने काही मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. या लेखाच्या विषयालाही ती लागू आहेत. त्यानुसार काही कर्करोग-प्रतिबंधक उपाय असे आहेत :
१. तंबाकूसेवन वर्ज्य
२. अल्कोहोलसेवन अत्यल्प
३. आहारात ‘अ’, ‘इ’ व ‘क’ जीवनसत्वांचा भरपूर वापर. तेव्हा गाजर, पालेभाज्या आणि लिंबू दणकून खात रहा.
४. शरीराच्या वजनावर नियंत्रण, कारण अतिरिक्त चरबी ही पेशींमध्ये कर्करोगपूरक परिस्थिती निर्माण करते. आणि,
५. विविध वैद्यकिय ‘चाळणी परीक्षा’ (screening tests) नियमित करून घेणे.

समारोप
एकूण मानवी कर्करोगांपैकी सुमारे ८०% हे रसायनांमुळे होतात हे कटू सत्य आहे. आपण निर्माण केलेल्या रसायनांच्या बेलगाम वापरामुळे तीच आता आपल्यावर बूमरॅंग झाली आहेत. त्यांचा वापर आणि संपर्क शक्य तेवढा कमी केला पाहिजे. अन्नातून शरीरात जाणारी रसायने कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीचा प्रसार वेगाने झाला पाहिजे. व्यसनांपासून दूर राहणे हे तर सर्वस्वी आपल्याच हातात आहे. औद्योगिक-प्रदूषण नियंत्रण कठोरपणे झाले पाहिजे. रसायनांमुळे होणारा कर्करोग हा गंभीर सामाजिक आरोग्यविषय विषय आहे. तो रोखण्यासाठी विविध स्तरांवर युद्धपातळीवर अंमलबजावणी व्हायला हवी. अन्यथा कर्करोगाचा भस्मासुर हळूहळू मानवजातीला गिळंकृत करण्यासाठी टपून बसलेला आहे.
******************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बापरे साधना.भीतीदायक आहे हे सर्व.
पंजाबी ग्रेव्ही चा भडक नारिंगी रंग पहिला की हेच आठवतं.पण रंग नसलेले पदार्थ, उदाहरण दही वगैरेही सुरक्षित नाहीयेत.
चांगले रेग्युलेशन्स यायला हवेत.मेनू कार्ड वर खरी घटक द्रव्ये/ इन्ग्रेडीयंट लिस्ट असणे बंधनकारक हवे.

मायक्रो/नॅनो प्लास्टिक कण घातक आहेत की नाही
>>>
हा विषय खूप गुंतागुंतीचा तसेच वादग्रस्तही आहे. प्राण्यांवरील प्रयोगांचे आणि मानवी प्रयोगांचे निष्कर्ष यात काही वेळा भिन्नता आढळते. अशा विविध संशोधनांवर नजर टाकता या संदर्भात काहीशी अनिश्चितता व्यक्त केलेली असते.

तरीसुद्धा सर्वसाधारणपणे मायक्रो/नॅनो प्लास्टिकना “Toxic Pollutants” असे म्हटले असून त्यांच्यातून येणाऱ्या रसायनांचा शारीरिक वाढ आणि पुनरुत्पादनावर परिणाम होतो अशा स्वरूपाचे संदर्भ मिळतात :
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC10675727/
..
असे विषय मूलभूत रसायनविज्ञान आणि वैद्यक यांच्या सीमारेषेवरचे आहेत.
मायबोलीकर निवांत पाटील यावर अधिक प्रकाश टाकू शकतील.

केस सरळ करणे प्रक्रिया, केराटीन ट्रीटमेंट, केसांना रंग लावणे ह्या गोष्टींतून पण कर्करोगा ची शक्यता अशा मथळ्याची व्हॉट्सअ‍ॅप फिरत आली. बहुतेक खरी असावी. केसांवरचे केमिकल झिरपून शरीरात गेले & रोग झाला.
असं होऊ शकतं का?
केस न रंगवता राहणं कठीण आहे Sad हल्ली ३०+ मधेच केस पांढुरके होतात..
नॅचरल चा डाय वापरत आहे सद्ध्या. लॉरियल, तत्सम बंद केलेत.

केस न रंगवता राहणं कठीण आहे >> का कठीण आहे? केमिकल डाय येण्याआधी लोक रहातच होते ना? कदाचित फक्त मेंदी वापरत असतील, ती वापरायची आतासुद्धा.

केस सरळ करणे प्रक्रिया,. . . , केसांना रंग लावणे ह्या गोष्टींतून पण कर्करोगाची शक्यता
>>>
होय, हे खरे आहे की धोका वाढतो. स्तन कर्करोगांच्या धाग्यावर यासंबंधी अधिक चर्चा झाली होती (https://www.maayboli.com/node/83621)

तसेच अलीकडे मी मूत्रपिंडासंबंधी धाग्यावर इथे एक प्रतिसाद लिहिलेला आहे (मूत्रपिंडाला गंभीर इजा) : https://www.maayboli.com/node/64830?page=5
(Submitted by कुमार१ on 27 March, 2024 - 07:58)

फक्त मेंदी वापरत असतील, ती वापरायची आतासुद्धा.>>> उबो. मेंदी भिजवणे, ती लगेच (८-१० दिवसांतचच्)जाणे वगैरे उस्तवार फार आहे.. म्हणुनच कठीण म्हटले, अशक्य नाही.
धन्यवाद कुमार सर.

(काहींना ग्रेज मिरवणे चांगले जमते/आवडते, काहींना नाही आवडत.या पूर्वी लिहिलेली वाक्ये उगीच विनाकारण भांडकुदळ/कजाग सुरात लिहिलेली वाटून खोडली.)
चांगली मेंदी 5 तास (कोरड्या,जास्त कंडिशनर नसलेल्या शांपू ने धुतलेल्या केसांवर,पतंजली केश कांती मला सूट होतो असं दिसून आलंय) लावून धुवून, पुढच्या दिवशी ऑरगॅनिक इंडिगो 1.5 तास लावून धुवून, त्याच्या पुढच्या दिवशी 1 तास तेल लावून शाम्पू करून केस चांगले दिसतात, साधारण 3 आठवडे तसे राहतात.जेव्हा हे सर्व करायला वेळ असेल तेव्हा हे रुटीन, आणि अगदीच काही सण समारंभ,अचानक ऑफिस इव्हेंट, अजिबात वेळ नसल्यास पार्लर किंवा घरी हेअर कलर.
कँसर धाग्यावर विषयांतर झालं, त्याबद्दल आगाऊ माफी.

* हे मायक्रो/नॅनो प्लास्टिक कण घातक आहेत की नाही
>>>
आजच्या छापील मटामध्ये ( ११/४) या विषयावर डॉ. नागेश टेकाळे यांचा लघुलेख आहे.
त्यातील हे महत्त्वाचे :

“प्लास्टिक मधील केवळ सहा टक्के रसायनांवर आंतरराष्ट्रीय नियंत्रण आहे. मग उरलेल्या 94% रासायनिक घटकांचे काय ? त्यांना आपल्या शरीरात मुक्त प्रवेशद्वार आहे असे गृहीत धरले, तर आज आढळणाऱ्या विविध मानवी रोगांचे वेगळे मूळ शोधण्याची गरजच काय ?”

मी ही केसांसाठी हेच करते. उर्जिता जैनची मेंदी आदल्या दिवशी व दुसर्‍या दिवशी इन्डिगो.

तरी आता केसांच्या कलपात खुप सुधारणा आहे. २५-३० वर्षांपुर्वी जे कलप मिळायचे ते वापरणर्‍या लोकाण्ची तोंडेही काळी व्हायची. कलपाची रंगद्रव्ये चेहर्‍याच्या त्वचेत उतरायची.

Submitted by साधना on 11 April, 2024 - 12:27
>>>>
शेतीत वापरल्या जाणाऱ्या रसायनांमुळे असलेला कर्करोग आणि इतर रोगांचा धोका हा विषय खूप व्यापक आहे. या विषयावरील ७ संशोधनांचे महाविष्लेषण इथे दिलेले आहे (https://www.mdpi.com/2305-6304/10/11/676
) ते बरेच मोठे असल्याने आता मी त्यावर साधारण नजर टाकली आहे.

त्या विश्लेषणाचे भरतवाक्य असे आहे :
Studies have indicated that a high degree of exposure may be linked to the increased prevalence of cancer and congenital malformations in exposed populations.

या विषयावरील भविष्यकालीन संशोधनांमध्ये कीटकनाशकांमधील जागतिक विविधता, विविध वंशामधील अभ्यास, अन्नपाण्यातून नक्की किती प्रमाणात रसायने मानवी शरीरात जातात आणि इतरही काही आनुषंगिक मुद्द्यांवर सखोल विचार व्हायला हवा आहे.

ह्म्म्म. शेतीत घातक रसायनांचे प्रमाण प्रमाणाबाहेर वाढलेय कारण सगळ्यांनाच सगळे आजच हवे. कधीकाळी आंबा एप्रिल मे मध्ये मिळायचा. आता डिसेंबरात मिळालेल्या आंब्याची बातमी होते. हे आंबे कसे काय अवेळी तयार होतात हा विचार विकत घेणारे करणार नाहीत तोवर विकणारे बाजारात माल आणत राहणारच.

आणि घातक रसायने न वापरता जे शेती करताहेत त्यांची शेतीही कितपत रसायन मुक्त आहे? आज माझ्या शेतात शेजारच्या रासायनिक शेतीचे पाणी पावसाळ्यात येते. मी नदीचे पाणी वापरते त्यात अशी वाहुन आलेली रसायने आहेतच. मग माझी शेती कितपत नैसर्गिक?? मला थेट नसला तरी अप्रत्यक्ष फटका बसणारच आहे. सगळ्यांनी मिळून रासायनिक शेतीवर एकत्रित उपाय काढल्याशिवाय काहीही आशा नाहीय. आणि या विषयावर सार्वमत होणे किती कठिण आहे हे मला माहित आहे Happy एका छोट्याशा गावात हे होऊ शकत नाही तर जागतिक पातळीवर काय होणार आहे.....

भारतात डबाबंद स्वरूपात विकल्या जाणाऱ्या विविध प्रोटीन पावडरींचे रासायनिक विश्लेषण करून त्यासंबंधीचा विस्तृत शास्त्रीय अहवाल येथे प्रसिद्ध झालेला आहे :
https://journals.lww.com/md-journal/fulltext/2024/04050/citizens_protein...

यातील अनेक पावडरींमध्ये खालील घातक रासायनिक घटक आढळले आहेत :
fungal aflatoxin, pesticides,
cycloheptatriene, benzene derivatives,
toluene and isopropyl alcohol

वरील रसायनांमधील काहींना कर्करोगकारक तर काहींना यकृतघातक गुणधर्म आहेत. अशा प्रकारची भेसळ पोषक पावडरींमध्ये होऊ नये यासाठी कठोर नियंत्रण असायला हवे.

मसाल्यांची बातमी.
>>> होय, गेल्या आठवडाभर वाचतोय.
आता त्या उद्योगांनी त्यांच्यावरील भेसळीचा आरोप नाकारल्याची बातमी देखील आताच वाचली.

कॅन्सर का होतो याचा विचार करताना मुख्यतः त्याच्या कारणांना रिस्क फॅक्टर म्हटले जाते. तर होय, प्लास्टिक हे रिस्क फॅक्टर मध्ये येते. पण यात प्रोडक्शन प्रोसेस चे बरेच पॅरामीटर लक्षात घेतले पाहिजेत.

उदा. BPA फ्री प्लास्टिक हे तुम्ही वाचलं असाल. याचा अर्थ अगोदर BPA सर्रास वापरलं जात होतं , जेंव्हा लक्षात आलं तेंव्हा त्याचा वापर कमी होत गेला. पण सगळीकडे एकदम बंद झाला नाही. इनफॅक्ट BPA फ्री हा एक सेल्लिंग फॅक्टर झाला, थोड्या वरच्या किमतीला. सगळी कडे हाच फॅक्टर काम करतो.

पुन्हा प्लास्टिक कडे, ज्याला आपण प्लास्टिक म्हणतो त्यात १७६० प्रकारचे प्लास्टिक येते, ज्या मध्ये प्लास्टीसायझर म्हणून वेगवेगळी केमिकल्स वापरली जातात. ( वर दिलेले BPA हे पण एक प्लास्टिसायझरच आहे.) आता कोणती कंपनी कोणते प्लास्टिसायझर वापरते हे कळेलच याची शास्वती नसते. त्यात हि गोष्ट मार्केट ड्रिव्हन आहे ( as usual ).

हीच गोष्ट सगळ्या सेक्टर ला लागू पडते. उदा. हेअर डाय. यातले सेमी पर्मनंट आणि पर्मनन्ट या प्रकारच्या डाय मध्ये गेल्या कित्येक दशकापासून खूप बदल होत गेले आहेत. जेंव्हा काही केमिकल्स "कार्सिनोजेन" कैटेगरी मध्ये येतात तेंव्हा कंपनी त्याला सब्स्टीट्युट शोधते, तो सब्स्टीट्युट परत कार्सिनोजेन मध्ये आलं कि त्याला सब्स्टीट्युट .... मग अगोदरच्या लोकांनी ते वापरलेले असतेच, काही लोकांना एक्सपोजर च्या प्रमाणात बाधा हि झालेली असतेच. ( हे फक्त कॅन्सर पुरतं मर्यादित नसून किडनी, यकृत इत्यादी व्हायटल ऑर्गन ना पण बाधा झालेली असते. )

याचे एक उदा. म्हणजे थॅलिडोमाइड. हे औषध मॉर्निग सिकनेस साठी दिले जायचे. लेट ५०'s मध्ये. याचा साईड इफेक्ट होऊन हजारो बेबीज मरण पावल्या आणि त्यापेक्षा जास्त बेबीज डिफॉर्मिटीज घेऊन जन्माला आल्या. हे लक्षात आल्यावर हा ड्रग बंद केला गेला ( आणि महत्वाचे म्हणजे औषधांच्यावर असलेले रेगुलेशन्स बरेच कडक करण्यात आले. ). हे थॅलिडोमाइड रेसेमिक मिक्शर होते (R + S) ( १२ वी ला केमेस्ट्री मध्ये वाचलं असेल कदाचित ). एकमेकांची आरशातील प्रतिमा. त्यातील R - हा मॉलिक्युल उपयोगाचा होता आणि S - हा मॉलिक्युल खलनायक. नंतर हे मॉलिक्युल सेपरेट करायला सुरवात झाली. आणि सध्या हेच औषध कॅन्सर आणि कुष्टरोगासाठी उपयोगी पडते हे सिद्ध झाले आणि त्यासाठी त्याला परवानगी पण मिळाली.

(२५-३० वर्षांपूर्वी एका उ नाशक औषधामुळे बऱ्याच लोकांना त्रास झाला होता, त्याचे डिटेल्स मला आठवत नाहीत.)

सो , इतके दिवस लोक हेअर डाय वापरत होते, किती जणांना कॅन्सर झाला ? असा विचार करून या गोष्टीला इग्नोर करणे पण तितकेच धोकादायक आहे. कारण प्रत्येकाचा त्या स्टिम्युलेशनला असणारा रिस्पॉन्स वेगवेगळा असणार. आणि थॅलिडोमाइड चा डेटा खूप लवकर अव्हेलेबल झाला तसा कॅन्सरचा होत नाहीय.

नि पा
सुरेख विश्लेषण आवडले.

* तसा कॅन्सरचा होत नाहीय.>>> +१

नि पा
Ethylene oxide च्या घातकतेबद्दल तुमच्या सवडीनुसार सविस्तर लिहावे ही विनंती.
MDH मसाल्यांबद्दलचा वाद यावरून आहे.

Mdh आणि mtr च्या मार्केट वर परिणाम होऊ शकतो.शिवाय फक्त फिश मसाल्यात ही खोट आहे, का इतर छोले पावभाजी चाट वगैरे मसाला प्रोसेस मध्ये पण?mdh ने दाव्याचा इन्कार केला आहे.

MDH मसाल्यांवरील आरोप संपायलाच तयार नाहीत.
अमेरिकेने त्या मसाल्यांमध्ये SALMONELLA हे विषबाधा करणारे जंतू असल्याचा आरोप करून ते मसाले नाकारले आहेत.

https://economictimes.indiatimes.com/industry/cons-products/food/after-p...

धन्यवाद डॉ. साहेब.
इथिलिन ऑक्साईड बद्दल, ( बरेच अवांतर पन होईल )

अन्नपदार्थ साठवणूक करताना त्याची शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी काही प्रक्रिया केल्या जातात. त्यामध्ये किती काळ वाढवायचा आहे, त्यात पाण्याचे प्रमाण किती आहे, अन्नपदार्थातील घटक काय आहेत, यावर कोणत्या प्रक्रिया करायच्या हे ठरवले जाते. तो प्रॉडक्ट कसा आणि कोणत्या कंडिशन ला स्टोर केला जाणार आहे हे पण महत्वाचे असते. यात अजून एक मुख्य घटक असतो तो म्हणजे स्थानिक सरकारी नियम काय आहेत. भारतातील, अमेरिकेतील , युरोपिअन युनिअन यांचे वेगवेगळे नियम आणि अटी आहेत.

या प्रक्रिये मध्ये प्री पॅकेजिंग / पोस्ट पॅकेजिंग ट्रीटमेंट ( यामध्ये हिट ट्रीटमेंट किंवा केमिकल ट्रीटमेंट असते ) किंवा प्रॉडक्ट मध्ये प्रीझरव्हेटिव्ह मिसळणे असे प्रकार असतात.
उदा. दुधाचे पास्चरायझेशन करून प्लास्टिक पिशवीत भरून कमी तापमानाला ठेवून त्याची १/२ दिवसात विक्री केली जाते. तेच दूध स्टराईल करून ग्लास किंवा टेट्रा पॅक मध्ये भरून १८० दिवस शेल्फ लाईफ मिळू शकते.

दूध स्टराईल करायला हीट ट्रीटमेंट केली जाते. पण जे अन्नपदार्थ हीट सेन्सिटिव्ह आहेत, ज्याला हीट ट्रीटमेंट दिल्यानंतर त्याच्या फ्लेवर वर फरक पडतो किंवा ते विघटन पावू शकतात, त्यासाठी केमिकल ट्रीटमेंट वापरली जाते. यासाठी वापरली जाणारी केमिकल्स वेगवेगळ्या गटातील असतात आणि ट्रीटमेंट करत असताना त्याची मोड ऑफ action वेगवेगळी असते. पण हेतू एकाच असतो. अन्नपदार्थामधील जंतू नष्ट करणे किंवा स्टराईल करणे. स्टराईल करणे म्हणजे त्याचे पुनरुत्पादन थांबवणे. (काही सूक्ष्म जंतू त्यांच्या दृष्टीने प्रतिकूल परिस्थिती मध्ये डॉरमन्ट होतात आणि अनुकूल परिस्थिती आली कि आपला प्रताप दाखवू लागतात. )

इथिलिन ऑक्साईड वायू हा वायू सुद्धा वस्तू स्टराईल करण्यासाठी वापराला जातो. हा वायू सूक्ष्म जीवांच्या शरीरातील डीएनए , आरएनए आणि प्रोटीन शी अभिक्रिया करतो आणि त्यांचे पुनरुत्पादन थांबवतो. हा जसा त्यांच्या डीएनए शी खेळतो तसाच आपल्या डीएनएशी. त्यामुळे त्याला कार्सिनोजेन कैटेगरी मध्ये टाकले आहे. आता केमिकल ट्रीटमेंट झाल्यावर त्या मटेरियल मधून इथिलिन ऑक्साईड काढून टाकले जाते, पण त्याचा थोडा भाग शिल्लक राहतो. तर प्रत्येक देशाचे या रेसिड्युअल साठी वेगवेगळे नियम आहेत. इयु चा नियम आहे, ०.१ मिलिग्रॅम / केजी. यापॆक्सा जास्त आढळले तर ते मटेरियल बॅन केले जाते. या अगोदर हि याच कारणासाठी काही प्रॉडक्ट्स वर बॅन केलं आहे.

इथिलिन ऑक्साईड हा खूप क्रियाशील वायू आहे.

The Annex to Regulation (EU) No 231/2012 is amended as follows:
(1) the introductory text ‘Note: Ethylene oxide may not be used for sterilising purposes in food additives’ is replaced by the
following:
‘Ethylene oxide may not be used for sterilising purposes in food additives.
No residue above 0,1 mg/kg, irrespective of its origin, of ethylene oxide (sum of ethylene oxide and 2-chloro-ethanol
expressed as ethylene oxide
(*)) shall be present in food additives listed in Annexes II and III to Regulation (EC)
No 1333/2008, including mixtures of food additives.
_____________
(*) i.e. ethylene oxide + 0,55* 2-chloroethanol.’;

https://eur-lex.europa.eu/legal-content/EN/TXT/PDF/?uri=CELEX:32022R1396

After ethylene oxide sterilization, the samples should be aerated for 24 hours to remove the residue which is left during the process. If the aeration is not validated properly there is a chance of presence of ethylene oxide residue in samples which can lead to the formation of another toxic non-volatile compound, 2- Chloroethanol

https://www.sgsgroup.in/en-gb/campaigns/-/media/f5328351ed804e9ba585b44f...)%20by%20the

माझा असा अंदाज आहे कि स्टारलायझेशन झाल्यावर पोस्ट ट्रीटमेंट मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आला असावा त्यामुळे इथ्यंलींन ऑक्साईड + २ chloro इथेनॉल या दोघांचे एकत्रित प्रमाण हे दिलेल्या लिमिट पेक्सा वाढले असेल.

Pages