युरिआ व क्रिअ‍ॅटिनीन : मूत्रविकारांचे प्रगतीपुस्तक

Submitted by कुमार१ on 28 December, 2017 - 21:17

युरिआ’ हा शब्द उच्चारताच बहुतेकांच्या डोळ्यासमोर शेतीतले ‘युरिआ खत’ येते. साहजिकच आहे, कारण त्याच्या जाहिराती आपण विविध माध्यमांत बघत असतो. हेच युरिआ आपण आपल्या शरीरातही तयार करतो आणि रोज लघवीवाटे उत्सर्जित करतो.

क्रिअ‍ॅटिनीन’ हा युरिआसारखाच एक नायट्रोजनयुक्त पदार्थ. आपण तो शरीरात तयार करतो आणि तोही लघवीवाटे उत्सर्जित होतो. थोडक्यात हे दोन्ही नायट्रोजनयुक्त पदार्थ एकाच जातकुळीतले आहेत. दोन्हीही आपल्या रक्तात असतात आणि लघवीतून बाहेर पडतात. त्यांच्या रक्तातील पातळीचा आणि मूत्रपिंडाच्या कार्याचा जवळचा संबंध आहे. मूत्रविकाराने ग्रासलेल्या रुग्णांच्या ज्या रक्तचाचण्या नियमित होतात त्यामध्ये हे दोन्ही घटक अग्रस्थानी असतात.

या लेखात आपण या दोघांची मूलभूत माहिती, त्यांच्या वैद्यकीय उपयुक्ततेतील फरक आणि संबंधित मूत्रविकारांचा थोडक्यात आढावा घेणार आहोत.
युरिआ
याचे विवेचन चार भागात करतो :
१. शरीरातील उत्पादन
२. शरीरातून उत्सर्जन
३. आजारांमध्ये वाढलेली युरिआची रक्तातील पातळी, आणि
४. इतर रोचक माहिती

शरीरातील उत्पादन
आपण आहारातून प्रथिने घेतो. त्यांचे पचन होऊन अमिनो आम्ले तयार होतात. ही आम्ले प्रथम शरीरातील प्रथिने तयार करण्यासाठी वापरली जातात. यातून जी बाजूला उरतात त्यांचे पेशींमध्ये विघटन होते आणि त्यातून CO2 आणि अमोनिया बाहेर पडतात. हा अमोनिया रक्तात साठू देणे इष्ट नसते कारण तो मेंदूसाठी खूप घातक असतो. म्हणून अमोनियाचे रुपांतर युरिआ या निरुपद्रवी रसायनात करण्याची जबाबदारी आपले यकृत घेते. अशा तऱ्हेने युरिआ हा न वापरलेल्या नायट्रोजनचा उत्सर्जनीय पदार्थ आहे.

अन्य एका प्रकारेही युरिआची निर्मिती शरीरात होत असते. आपल्या पेशींमध्ये रोज ‘उलाढाल’ चालू असते. त्यात सतत काही प्रथिनांचे विघटन होत असते. त्यांच्या अपचयातून (catabolism) सुद्धा युरिआ तयार होतो.

शरीरातून उत्सर्जन
यकृतात युरिआ तयार झाल्यावर तो रक्तात येतो. आपले सगळे रक्त हे ‘शुद्धीकरणा’साठी मूत्रपिंडात येते. मूत्रपिंड ही एक प्रकारे चाळणी आहे. जेव्हा रक्त त्यातून जाते तेव्हा ‘टाकाऊ’ पदार्थ हे मूत्रमार्गात पाठवले जातात, तर उपयुक्त पदार्थ हे रक्तातच टिकवले जातात. त्यानुसार बराचसा युरिआ हा लघवीत जातो आणि काही प्रमाणात रक्तात उरतो.

मनुष्याच्या शरीरातील नायट्रोजनयुक्त पदार्थांचे पूर्णपणे विघटन झाल्यावर युरिआ हा प्रमुख अंतिम पदार्थ आहे, हे आपण पाहिले. या संदर्भात निसर्गातील अन्य जीवांशी आपली तुलना करण्याचा मोह होतो. मासा हा तर जलचर. तो त्याच्या नायट्रोजनचा शेवट अमोनियात करतो आणि हा पदार्थ भसाभस पाण्यात सोडून देतो, जे त्याच्या भवती मुबलक असते. त्यामुळे त्याला अमोनियाचे युरिआत रुपांतर करण्याची तसदी घ्यावी लागत नाही.
याउलट पक्ष्याचे बघा. तो पडला हवाई प्राणी. त्याच्याकडे पाण्याचे जाम दुर्भिक्ष. त्यामुळे त्याच्या नायट्रोजनचे रुपांतर तो ‘युरीक अ‍ॅसिड’ मध्ये करतो. हे रसायन उत्सर्जित करायला पाण्याची फारशी गरज भासत नाही. त्यामुळेच पक्षाची लघवी ही खऱ्या अर्थाने ‘शू’ नसून ‘शी’च असते!

आजारांमध्ये वाढलेली युरिआची रक्तातील पातळी
अशा आजारांचे आपण तीन गटात वर्गीकरण करूया:
१. मूत्रपिंडाचे आजार : जर कोणत्याही कारणाने इथली ‘चाळणी’ यंत्रणा (glomerulus) बिघडली तर मग युरिआ आणि अन्य टाकाऊ पदार्थ रक्तात साठू लागतात.
२. मूत्रमार्गातील अडथळे : यात मूत्राशय व मूत्रनलिकांच्या आजारांचा समावेश होतो. उदा. मूतखडे, प्रोस्टेटची मोठी वाढ, गर्भाशयमुखाचा कर्करोग.
मूतखडे हे मूत्रमार्गातले अंतर्गत अडथळे असतात तर बाकीच्या आजारांनी मूत्रमार्गावर बाहेरून दाब पडतो. अशा अडथळ्यांमुळे मूत्रपिंडाच्या चाळणी यंत्रणेवर ‘उलटा दाब’ (back pressure) येतो आणि चाळणी प्रक्रिया कमी होते.

३. युरिआचे वाढलेले उत्पादन : याची दोन प्रकारची कारणे आहेत :
(अ) उच्च प्रथिनयुक्त भरपूर आहार : समजा एखाद्याने एखादे दिवशी मस्तपैकी एक ‘चिकन हंडी’ फस्त केली, तर पुढचे काही तास युरिआची पातळी बऱ्यापैकी वाढते! आपल्या रोजच्या आहारातील प्रथिनाच्या प्रमाणानुसार युरिआची पातळी बदलती असते.
(आ) जेव्हा कोणत्याही कारणाने पेशींमधला अपचय वाढतो तेव्हा. उदा. उपोषण, मोठा जंतूसंसर्ग इ.

इतर रोचक माहिती
युरिआचे विवेचन संपवण्यापूर्वी आपल्या सार्वजनिक जीवनातील एक प्रसंग सांगतो. समजा, आपण एखाद्या अपरिचित ठिकाणी समारंभास गेलो आहोत. तिथे आपल्याला बराच वेळ काढायचा आहे. काही वेळाने आपल्याला लघवीची जाणीव होते आणि मग आपण ‘ते’ ठिकाण शोधू लागतो. कोणीतरी आपल्याला हातवारे करून ते कुठे आहे ते सांगतो. जसे आपण त्या मूत्रालयाच्या जवळ येतो तसे आपले ‘स्वागत’ होते त्या ‘परिचित’ वासाने ! हा भरून राहिलेला वास असतो अमोनियाचा. अनेक लोक जेव्हा एखाद्या लहान जागेत लघवी करत असतात तेव्हा त्यातील युरिआचे अंश हे त्या मूत्रभांड्यांमध्ये पसरून राहतात. हळूहळू त्या युरिआचे नैसर्गिक विघटन होऊन अमोनिया वायुरूपात पसरू लागतो. तेव्हा आपल्याकडे सार्वजनिक मूत्रालय शोधताना दिशादर्शक पाटीपेक्षा वासाचाच अधिक उपयोग होतो !

जे युरिआ आपल्या शरीरात तयार होते तेच आपण कृत्रिमरीत्या प्रयोगशाळेतही करू शकतो. विज्ञान संशोधनातील हा एक महत्वाचा टप्पा मानला जातो. आज युरिआचे मोठ्या प्रमाणात औद्योगिक उत्पादन केले जाते. या युरिआचा वापर हा शेती, रासायनिक उद्योग आणि वैद्यकातील औषध म्हणून केला जातो.
* * * *

क्रिअ‍ॅटिनीन
हा शब्द युरिआ इतका परिचित नाही याची कल्पना आहे. तो युरिआचा ‘भाउबंद’ आहे हे आपण वर पाहिले. म्हणजेच लघवीतून उत्सर्जित होणारा एक नायट्रोजनयुक्त पदार्थ. रक्तातील त्याची नेहमीची पातळी तर खूप कमी – युरिआच्या साधारण एक तीसांश. नेहमीप्रमाणे त्याचेही विवेचन तीन भागात करतो:
१. शरीरातील उत्पादन
२. उत्सर्जन आणि
३. आजारांमध्ये वाढलेली त्याची रक्तातील पातळी

शरीरातील उत्पादन
आपल्या हाडांवरचे जे स्नायू असतात (skeletal muscle) त्यांच्यात क्रिअ‍ॅटिन-पी नावाचे एक उच्च उर्जायुक्त संयुग साठवलेले असते. स्नायुंच्या कार्यादरम्यान त्यातील उर्जा वापरली जाते. मग बाकी उरते ते क्रिअ‍ॅटिन. आता यातून पाण्याचा एक रेणू आपोआप निघून जातो आणि तयार होते क्रिअ‍ॅटिनीन.

प्रत्येक व्यक्तीमधील स्नायूंचे आकारमान (mass) स्थिर असते. त्या प्रमाणात त्यांच्यात ठराविक क्रिअ‍ॅटिन-पी असते. दररोज त्यातील ठराविक क्रिअ‍ॅटिनचे क्रिअ‍ॅटिनीनमध्ये रुपांतर होते. त्यामुळे क्रिअ‍ॅटिनीनची रोजची रक्तपातळी ही युरिआच्या तुलनेत बऱ्यापैकी स्थिर असते. या बाबतीत लिंगभेद मात्र महत्वाचा आहे. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या स्नायूंचे आकारमान कमी असल्याने त्यांची क्रिअ‍ॅटिनीनची रक्तपातळी कमी असते.

उत्सर्जन

युरिआप्रमाणेच रक्तातले क्रिअ‍ॅटिनीन हे मूत्रपिंडाच्या चाळणी प्रक्रियेतून जाते आणि त्यातले बरेचसे लघवीवाटे बाहेर पडते. त्यामुळे त्याची रक्तपातळी कमी राहते.

आजारांमध्ये वाढलेली त्याची रक्तातील पातळी

वर युरिआच्या विवेचनात मूत्रपिंडाचे आजार आणि मूत्रमार्गातील अडथळे यांचा उल्लेख आला आहे. या दोन्हींमध्ये क्रिअ‍ॅटिनीनची रक्तपातळी अर्थातच वाढते. जेव्हा मूत्रपिंडाच्या चाळणी- प्रक्रियेत दोष निर्माण होतो तेव्हा युरिआची रक्तपातळी ही क्रिअ‍ॅटिनीनपेक्षा अधिक वेगाने आणि खूप जास्त वाढते.

आता युरिआ व क्रिअ‍ॅटिनीनच्या रक्तपातळी संदर्भात एक फरक ध्यानात घेतला पाहिजे. जेव्हा कोणत्याही कारणाने पेशींमधला अपचय वाढतो, तेव्हा फक्त युरिआच वाढते; क्रिअ‍ॅटिनीन नाही. जेव्हा क्रिअ‍ॅटिनीन वाढते तेव्हा मूत्र-यंत्रणेत नक्कीच कुठेतरी गडबड झालेली असते. त्यामुळे मूत्रपिंड आणि मूत्रमार्गांच्या आजारांमध्ये क्रिअ‍ॅटिनीन हा युरिआपेक्षा अधिक संवेदनशील निर्देशांक मानला जातो.

प्रयोगशाळेत आपण जेव्हा युरिआ व क्रिअ‍ॅटिनीनच्या रक्तपातळी मोजतो तेव्हा युरिआची चाचणी ही बरीच सरळसोट आहे, तर क्रिअ‍ॅटिनीनच्या चाचणीत काही तांत्रिक समस्या आहेत आणि युरिआच्या तुलनेत अचूकता कमी आहे. या कारणासाठी मूत्रविकारांसाठी जेव्हा चाचण्यांची गरज लागते, तेव्हा युरिआ व क्रिअ‍ॅटिनीन हे दोन्ही जोडीने मोजले जातात. मूत्र- रुग्णांच्या रिपोर्टस मध्ये हे दोघे अगदी नवराबायकोसारखे वावरत असतात !

युरिआ व क्रिअ‍ॅटिनीनच्या मर्यादा
या दोघांची रक्तपातळी मोजणे ही मूत्रविकारांच्या निदानातील प्राथमिक पायरी आहे. याबाबतीत त्यांच्या उपयुक्ततेबरोबरच त्यांच्या काही मर्यादाही लक्षात घ्याव्यात. मूत्रपिंडाच्या अगदी सुरवातीच्या बिघाडाचे निदान करण्यासाठी त्यांचा तसा उपयोग नसतो. जेव्हा चाळणी-यंत्रणेचे काम कमी होत होत निम्म्यावर येते तेव्हाच क्रिअ‍ॅटिनीनची रक्तपातळी बऱ्यापैकी वाढते. म्हणजेच क्रिअ‍ॅटिनीनची पातळी ‘नॉर्मल’ असली तरी याचा अर्थ ‘मूत्रपिंडाचे कार्य छान चाललेले आहे’, असे नेहमीच म्हणता येणार नाही.

तरीसुद्धा रुग्णाचे थोडेसे रक्त घेऊन करता येणाऱ्या या दोन्ही सुटसुटीत चाचण्या आहेत. त्यामुळेच एक शतकाहून अधिक काळ त्यांनी मूत्र-चाचण्यांच्या यादीत आपले अग्रस्थान टिकवले आहे.

मूत्रपिंडाच्या आजाराची अनेक कारणे असतात. त्यामध्ये दीर्घकालीन मधुमेह आणि उच्च-रक्तदाब ही प्रमुख कारणे आहेत. अशा बऱ्याच रुग्णांच्या बाबतीत त्यांना मूत्रपिंड-विकार जडला की तो दीर्घकालीन (chronic) होण्याची शक्यता असते. अशा रुग्णांची देखभाल करताना अनेक चाचण्या नियमित कराव्या लागतात. त्यामध्ये अर्थातच युरिआ व क्रिअ‍ॅटिनीनचा समावेश असतो. त्यांच्या पातळीतील चढउतारावरून आजार कितपत नियंत्रणात आहे ते कळते. त्यांचे क्रमशः रिपोर्टस् हे एक प्रकारे रुग्णाचे प्रगतीपुस्तकच असते. त्यानुसार रुग्णाच्या भावी उपचारांची दिशा ठरवता येते.

समारोप

शरीरातील नायट्रोजनयुक्त पदार्थांचे विघटन पूर्ण झाल्यावर युरिआ तयार होतो. यकृतात तयार झालेला युरिआ हा नंतर मूत्रपिंडाद्वारे लघवीत उत्सर्जित होतो.
आपल्या स्नायूंमधल्या क्रिअ‍ॅटिनपासून रोज ठराविक क्रिअ‍ॅटिनीन तयार होते आणि तेही लघवीत उत्सर्जित होते. मूत्रविकारांच्या निदानामध्ये युरिया व क्रिअ‍ॅटिनीनची रक्तपातळी मोजणे या प्राथमिक चाचण्या आहेत. त्यांच्या उपयुक्तता आणि मर्यादा आपल्याला या लेखातून समजल्या असतील अशी आशा करतो.
या लेखाच्या निमित्ताने आपणा सर्वांना आयुष्यभर उत्तम मूत्र-आरोग्य लाभो अशी सदिच्छा व्यक्त करून थांबतो.
****************************************************************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जवळच्या नात्यातील एक जण मूत्रपिंडाच्या प्रतीक्षेत आहे. सध्या आठवड्यात दोनदा डायलिसिस करावे लागते.

छान माहिती
क्रिअ‍ॅटिनीन लेवल नॅचुरली कमी करता येते का ?

क्रिएटिनिनची पातळी सातत्याने वाढलेली असण्याचे कारण मूत्रपिंडाची गाळण क्षमता कमी झालेली असणे हे होय. त्यावरील वैद्यकीय उपायांनीच क्रिएटिनिन पातळी (रोगाच्या प्रमाणानुसार) कमी होऊ शकते.

निरोगी अवस्थेत ती एका ठराविक रेंजमध्ये असते आणि ती निसर्गतः कमी होत नाही. नैसर्गिकरित्या पातळी कमी होण्याचे एकच कारण म्हणजे वयोवृद्ध व्यक्ती. त्यांच्यात एकूण स्नायूंचे आकारमान (mass) कमी होत झाल्यामुळे असे होते.

एकाच व्यक्तीत एकावेळी दोन मूत्रपिंडांचे प्रत्यारोपण
(dual kidney transplant)
ही विशेष शस्त्रक्रिया दिल्लीच्या एम्स रुग्णालयात करण्यात आली. या घटनेतील ‘दाता’ 78 वर्षीय मेंदूमृत व्यक्ती होती तर ‘घेता’ डायलिसिसवर असलेली 51 वर्षीय स्त्री आहे.

नेहमी जेव्हा एखाद्या व्यक्तीत एकाच मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण करतात त्यासाठी काही निकष ठरवलेले असतात. त्यामध्ये 65 वर्षावरील दाता निवडला जात नाही. परंतु भारतातील अवयवदानाची प्रतीक्षा यादी आणि पुरवठा यांचे व्यस्त प्रमाण लक्षात घेता काही रुग्णांच्या बाबतीत हे निकष शिथिल केले जातात.

65 वर्षे वयावरील दात्याची मूत्रपिंडे कमी कार्यक्षम असतात. या घटनेत त्याची दोन मूत्रपिंडे प्रत्यारोपित केली असल्याने ती घेणाऱ्या व्यक्तीला सुमारे दहा वर्षांचे आयुष्य तरी मिळेल अशी डॉक्टरांना आशा आहे.

https://indianexpress.com/article/health-wellness/at-aiims-78-year-old-d...

एकाच दात्याची दोन्ही मूत्रपिंडे एकाच वेळी एकाच व्यक्तीला देणे हे प्रचंड रिस्की नाही का? किमान १ मूत्रपिंड तरी मूळचे असायला नको का? ते जरी दुर्बळ झाले असले तरी?

दृष्टीदान करतानासुद्धा २ डोळे हे प्रत्येकी १, असे २ व्यक्तींना देतात.

आंतरजालावर माहिती मिळाली की Dual Kidney Transplants हे बऱ्यापैकी केले जाते.
या संदर्भानुसार,
DKT may be considered a suitable an option to expand the donor pool.
पण त्यातून डोनर पूल कसा वाढेल, ते काही कळले नाही.

प्रस्तुत घटनेत घेत्याच्या शरीरामध्ये मूळची दोन मूत्रपिंडे तशीच ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे त्या व्यक्तीच्या शरीरात आता एकूण चार मूत्रपिंडे झालेली आहेत !
(The surgery involved placing two new kidneys in a heterotropic manner alongside the patient’s native kidneys, resulting in a total of four kidneys...
..
या घटनेत दाता व घेता या दोघांचीही शारीरिक परिस्थिती पाहता घेणाऱ्या व्यक्तीला दात्याचे एकच मूत्रपिंड कार्यासाठी पुरणार नव्हते, असा डॉक्टरांचा निर्णय आहे.

या प्रत्यारोपणाच्या बाबतीत दाता निवडताना आणि परिस्थितीनुसार दोन प्रकारचे निकष असतात :
१. standard criteria donors (SCDs) : हे नेहमीचे. यात शक्यतो दाता तरुण किंवा मध्यमवयीनच निवडला जातो आणि त्याचे एकच मूत्रपिंड पुरते.

२. expanded criteria donors (ECDs) : हे निकष शिथिल आहेत. निवडक गटांमध्ये असे निकष ठेवल्यामुळे अन्य तरुण गरजूंसाठी मध्यमवयीन दात्यांचे कार्यक्षम असलेले एकच मूत्रपिंड राखून ठेवता येते. प्रस्तुत घटना या प्रकारची आहे.

https://bmcnephrol.biomedcentral.com/articles/10.1186/s12882-019-1664-8

प्रस्तुत घटनेत घेत्याच्या शरीरामध्ये मूळची दोन मूत्रपिंडे तशीच ठेवण्यात आली आहेत. )))

हे कसं काय करता येतं डॉक्टर?.. दोन नवीन मूत्रपिंडांना उदारपोकळीत जागा कशी काय केली जाते? त्यामुळे इतर अवयवांवर ताण येणार नाही का?..आणि नवीन मूत्रपिंडे प्रत्यारोपित केल्यावरही निकामी झालेली मूत्रपिंडे का ठेवली जातात ?

स्वासु,
या प्रत्यारोपणादरम्यान घेत्याच्या शरीरातील मूळ मूत्रपिंडे प्रत्येक वेळी काढली जातातच असे नाही. मूळ मूत्रपिंडांचा काय आजार आहे त्यानुसार तो निर्णय प्रत्यक्ष शस्त्रक्रियेदरम्यानच घेतला जातो.

नवी मूत्रपिंडे पोटातील खालच्या बाजूला वेगळ्या जागी बसवली जातात जिथून त्यांचा मूत्राशयाशी संपर्क साधणे सोपे जाते. जुनी मूत्रपिंडे काढूण्याच्या शस्त्रक्रियेत अन्य बऱ्याच कटकटी होण्याची शक्यता असते.

तसेच ती मूळ जागी ठेवून दिल्यामुळे त्यांचे जे काही थोडेफार कार्य असते त्याचा राखीव म्हणून उपयोग होऊ शकतो (जर का प्रत्यारोपित मूत्रपिंडाना भविष्यात काही समस्या आली तर).

थोडेफार कार्य असते त्याचा राखीव म्हणून उपयोग होऊ शकतो )))

ओह डॉक्टर, वैद्यकशास्त्रांतील असे शोध व प्रयत्न दिलासादायक आहेत...

खरंय. मानवी अवयवांचा पुरवठा मागणीपेक्षा कमीच असल्याने अन्य मार्गही चोखळले जात आहेत. त्यापैकी हा एक :
https://www.reuters.com/business/healthcare-pharmaceuticals/first-pig-to...(Reuters)%20%2D%20A,in%20Boston%20announced%20on%20Thursday.

डुकरामध्ये सुयोग्य जनुकबदल करून त्याच्या मूत्रपिंडाचे माणसात प्रत्यारोपण केले गेलेले आहे. आता ते किती यशस्वी होते हे कालांतराने समजेल,

इंटरेस्टिंग !

हे प्रयोग डुकरावरच का केले असावेत ? घोडा किंवा कुत्रा का नाही ? माणूस आणि डुक्कर यांच्यात काही जनुकिय साम्य वगैरे आहे का ? ( स्वभावात / सवईत आहे ) Just curious Happy

हे प्रयोग डुकरावरच का केले असावेत ?
>>>> . चांगला प्रश्न आहे.
अन्य प्राण्यांमधून मानवी प्रत्यारोपण करण्यासाठी डुक्कर, माकड, चिंपांझी आणि बबून या प्राण्यांचा विचार केला जातो. त्यापैकी डुक्कर हे सर्वश्रेष्ठ आहे कारण, त्यांच्या अवयवांचे आकारमान, शरीरातील चयापचय आणि इम्युन यंत्रणा मानवाशी जास्तीत जास्त साधर्म्य दाखवते.

या प्रकारच्या अवयव प्रत्यारोपणाला xenotransplantation असे शास्त्रीय नाव आहे. भविष्यात खालील प्रकारच्या प्रत्यारोपणासाठी डुकरांचा सखोल अभ्यास केला जात आहे :
PIG xe.jpg

मानवाच्या उत्क्रांती मध्ये डुकराचा काहीतरी सहभाग आहे असे कुठे तरी वाचल्याचे स्मरते (वराह अवतार??), त्याचा काही संबंध असेल काय?

वराह >>>
कल्पना नाही. अभ्यासूंनी सांगावे.

केसांची सौंदर्यवर्धके आणि मूत्रपिंड-इजा
केसांचे सौंदर्य वाढवण्यासाठी शाम्पू, लोशन्स आणि केस सरळ करणारी रसायने वापरली जातात. त्यांच्या वापरातून संबंधित व्यक्तींच्या मूत्रपिंडाला इजा झाल्याच्या काही घटना दिसून आल्यात. या संदर्भात फ्रान्स व इसराइलमध्ये स्वतंत्रपणे संशोधन झाले आहे.

या रसायनांमध्ये Glyoxylic acid हा एक घटक असून तो डोक्याच्या त्वचेतून रक्तात शोषला जातो आणि पुढे त्याचे मूत्रपिंडावर वाईट परिणाम होतात. संबंधित रसायनाचे प्राण्यांवर प्रयोग केल्यावर हे सप्रमाण सिद्ध झालेले आहे. या रसायनाचा प्रसाधनांमध्ये अलीकडेच अंतर्भाव करण्यात आलेला आहे. पूर्वी त्याच्या जागी formaldehyde हे रसायन वापरले जायचे परंतु ते दाहजनक व कर्करोगकारक गुणधर्म असलेले होते.

वरील निरीक्षणांवरून फ्रान्सच्या संशोधकांनी, “संबंधित रासायनिक घटक असलेली सौंदर्यप्रसाराने बाजारातून काढून घेण्यात यावीत” असे पत्र ‘न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन’मध्ये लिहिलेले आहे. तसेच फ्रान्समध्ये या संदर्भात राष्ट्रीय सर्वेक्षण करण्याचे ठरले आहे.

१. https://www.ajkd.org/article/S0272-6386(23)00006-9/fulltext
२. https://www.nejm.org/doi/10.1056/NEJMc2400528 ( सशुल्क संदर्भ).

या संशोधनांमधून भविष्यातील या विषयावरील अधिक संशोधनाची गरज अधोरेखित झालेली आहे.

वयोमानानुसार होणाऱ्या प्रोस्टेट वाढीसाठी अलीकडे अनेक आधुनिक उपचार उपलब्ध होत आहेत. त्यापैकी एक नवा उपचार म्हणजे युरोलिफ्ट ही सोपी क्रिया.

यामध्ये डॉक्टरांच्या तपासण्याच्या खोलीतच संबंधित रुग्णाच्या मूत्रमार्गातून काही implants बसवले जातात. त्यांच्यामुळे प्रोस्टेट वर उचलली जाऊन ती मूत्रमार्गात अडथळा करत नाही. रुग्णाला कमीत कमी त्रास होणारी ही क्रिया आहे (minimally invasive procedure)

सध्या भारतात ती निवडक केंद्रांवर केली जात असून त्यामध्ये बंगलोर व पुण्याचा समावेश आहे.
https://www.newindianexpress.com/states/karnataka/2023/Apr/05/bengaluru-...

पुण्यातली बातमी आजच्या छापील मटामध्ये आहे.

Pages