रसायनांचा धुमाकूळ आणि कर्करोगाचा भस्मासुर

Submitted by कुमार१ on 2 December, 2017 - 01:39

ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू असतोच हे तर मूलभूत सत्य. पण हा मृत्यू निरोगी अवस्थेत शांत झोपेत किती जणांच्या वाट्याला येतो? फारच थोड्या. आयुष्यात मानवी शरीर हे कुठल्या ना कुठल्या रोगाची शिकार बनतेच. मग हा रोग शरीर पोखरत रुग्णास मृत्यूस नेतो. आज विविध रोगांमुळे होणाऱ्या मृत्युंमध्ये हृदयविकार हे आघाडीवर आहेत आणि त्याखालोखाल स्थान आहे ते कर्करोगाचे. सध्या जगभरात कर्करोगाने जवळपास ८० लाख लोक दरवर्षी मरण पावतात. हा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. चालू शतक संपेपर्यंत बहुधा कर्करोग हा हृदयविकाराला मागे टाकून ते अव्वल स्थान पटकावेल अशी चिन्हे दिसताहेत.

आपल्याला कर्करोग का होतो? ढोबळ मानाने त्याची तीन कारणे आहेत:
१. विविध किरणोत्सर्ग (रेडीएशन)
२. अनेक प्रकारची रसायने, आणि
३. काही विषाणूंचा संसर्ग

आपल्याला होणाऱ्या एकूण कर्करोगांपैकी सुमारे ८०% हे रसायनांमुळे होतात. हादरलात ना हा आकडा ऐकून? पण ते वास्तव आहे. आज माणसाने विविध कारणांसाठी बनवलेल्या रसायनांची संख्या एक लाखाच्या आसपास आहे! या रसायनांशी आपला अनेक प्रकारे संपर्क येतो. त्याचे अनेक दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात आणि कर्करोग हा त्यापैकीच एक. रसायनांचे विविध स्त्रोत, त्यांच्यामुळे कर्करोग का होतो, कोणती रसायने जास्त घातक आहेत आणि त्यापासून वाचण्यासाठी आपण कोणते प्रतिबंधात्मक उपाय करू शकतो यांचा आढावा या लेखात घेत आहे.

या विषयाची व्याप्ती मोठी असल्याने पुढील मुद्द्यांच्या आधारे विवेचन करतो:
१. रसायनांशी आपल्या संपर्काचे मार्ग
२. रसायने आणि कर्करोगाची कारणमीमांसा
३. कर्करोगकारक रसायनांची उदाहरणे आणि
४. प्रतिबंधात्मक उपाय

रसायनांशी आपल्या संपर्काचे मार्ग
रसायने आपल्या शरीरात हवा, पाणी, अन्न अथवा त्वचेमार्फत शिरू शकतात. त्यांचे स्त्रोत हे खालीलप्रमाणे असू शकतात:
१. अन्नातील नैसर्गिक घटक : उदा. Aflatoxin हे दाणे, मका व सोयाबीन यांच्यात असते.
२. रासायनिक शेतीतील पिके : या विषयावर गेल्या दहा वर्षात अनेक माध्यमांतून भरपूर दळण दळले गेले आहे. अधिक लिहिणे नलगे.
३. अन्न-प्रक्रिया : एखादे उकळलेले खाद्यतेल तळणासाठी वारंवार वापरुन त्यात aromatic hydrocarbons तयार होतात. हा प्रकार कनिष्ठ दर्जाच्या खानावळीत हमखास होतो.
४. व्यसने : उदा. तंबाकूतील अनेक रसायने आणि अल्कोहोल
५. हवा व पाण्याचे प्रदूषण : कारखान्यांतून सोडली जाणारी अनेक रसायने.
६. विशिष्ट उद्योगधंदे : उदा. Asbestos हे वाहन आणि बांधकाम उद्योगात वापरले जाते, तर aromatic amines ही रबर उद्योगात वापरतात.
७. रोगोपचारासाठी वापरलेली औषधे : उदा. cyclophosphamide हे काही कर्करोगांच्या उपचारासाठी वापरलेले औषध अन्य काही कर्करोग निर्माण करू शकते! आहे की नाही हा विरोधाभास?

रसायने आणि कर्करोगाची कारणमीमांसा
कर्करोगकारक रसायने ही आपल्या पेशींमध्ये शिरून थेट DNA वर हल्ला चढवतात. परिणामी काही जनुकीय बदल होतात. मग विशिष्ट प्रथिनांची मोठ्या प्रमाणात निर्मिती होते आणि त्यांच्या प्रभावाखाली पेशींची अनियंत्रित वाढ होते. हाच तो कर्करोग. अर्थात अशा प्रकारे होऊ शकणारा कर्करोग खालील घटकांवर अवलंबून असतो:

१. रसायनाचे शरीरात जाणारे प्रमाण
२. रसायन-संपर्काचा दीर्घ कालावधी
३. कर्करोग होण्यासाठीची जनुकीय अनुकुलता आणि
४. शरीराची कमकुवत प्रतिकारशक्ती

ह्या सर्व घटकांच्या एकत्रित परिणामातून कर्करोग होतो (multifactorial disease). काही वेळेस गप्पांच्या अड्ड्यात आपल्याला “अहो, आमचे ते काका रोज पन्नासेक तरी सिगारेटी फुंकायचे, तरी वयाच्या ८०व्या वर्षापर्यंत कसे ठणठणीत होते” अशा छापाची विधाने कधीमधी ऐकायला मिळतात. याचे स्पष्टीकरण वरील चार कारणांमध्ये दडलेले असते. अर्थात अशी उदाहरणे ही अपवाद म्हणून सोडून द्यायची असतात. एखादे रसायन जर ९५% लोकांना घातक ठरले असेल तर त्याकडे गांभीर्याने बघितले पाहिजे.

कर्करोगकारक रसायनांची उदाहरणे
या संदर्भात अनेक रसायनांकडे ‘संशयित’ म्हणून बघितले गेले आहे. साधारणपणे त्यांचे दोन गटात वर्गीकरण करता येईल:
१. कर्करोगकारक (carcinogenic)
२. कर्करोगपूरक (co-carcinogenic)
त्यापैकी सुमारे १०० रसायने ही आतापर्यंत माणसासाठी ‘कर्करोगकारक’ म्हणून सिद्ध झालेली आहेत. यातील एकेक रसायन हे स्वतंत्र प्रबंधाचा विषय होऊ शकेल. काही रसायनांचा संपर्क हा विशिष्ट व्यावसायिकांपुरता मर्यादित असतो. याउलट धूम्रपान आणि मद्यपान हे समाजातील खूप मोठ्या समूहांशी संबंधित विषय आहेत. त्यामुळे या लेखाच्या मर्यादेत या दोनच स्त्रोतांमधील रसायनांचा विचार आपण करणार आहोत.

तंबाकूचे धूम्रपान
जागतिक स्तरावर फुफ्फुसाचा कर्करोग हा कर्करोगांच्या यादीत प्रथम क्रमांकावर आहे. त्याचे सर्वात महत्वाचे कारण आहे अर्थातच धूम्रपान. या रोगाने जे मृत्यू होतात त्यापैकी ८०% लोक हे दीर्घकाळ धूम्रपान करणारे असतात. धूर ओढणे हे स्वतःसाठी आणि धूर सोडणे हे आजूबाजूला असणाऱ्यांना घातक असते!
या धुरातील रसायनांचा तपशील असा आहे :
• एकूण रसायने ७०००
• त्यापैकी घातक २५० आणि
• कर्करोगकारक ६९
• कर्करोगकारक रसायनांमध्ये Acetaldehyde, Aromatic amines, Benzo[α]pyrene ही काही उदाहरणे.

तंबाकूतील निकोटीन हे एक बहुचर्चित रसायन आहे. ते जबरदस्त व्यसनकारी आहे पण ते माणसात कर्करोगकारक असल्याचे अद्याप निर्विवाद सिद्ध झालेले नाही. तूर्तास त्याला कर्करोगपूरक म्हणता येईल.
तंबाकू खाणे हा प्रकार आपल्याकडे भरपूर आहे. त्यातील nitrosamines हे तोंडाच्या कर्करोगास कारण ठरतात. भारतात हा कर्करोग पुरुषांमधील कर्करोगांच्या यादीत प्रथम क्रमांकावर आहे.

अल्कोहोलचे सेवन अर्थात मद्यपान
हे शीर्षक वाचताक्षणीच अनेकांच्या भुवया उंचावतील कारण हा अतिशय संवेदनशील विषय आहे ! जगभरातील सुशिक्षित समाजावर नजर टाकता एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. अनेकांनी धूम्रपानाला आयुष्यातून हद्दपार केलेले आहे पण त्यांना मद्यपानाची संगत मात्र सोडवत नाही. संशोधकांचाही हा लाडका विषय! त्यामुळे बहुसंशोधित आणि बहुचर्चित. फक्त कर्करोगच नव्हे तर इतर अनेक आजारांशीही त्याचा कार्यकारणभाव जोडलेला आहे. त्यावरील भरपूर उलटसुलट माहिती माध्यमांतून उपलब्ध आहे.
एक दशकापूर्वी अल्कोहोलला ‘कर्करोगपूरक’ इतपत लेबल लावलेले होते. आता मात्र ते ‘कर्करोगकारक’ च्या यादीत जाऊन बसले आहे. काही संशोधक त्याला ‘risk factor’ असे सुरक्षित लेबल लावणे पसंत करतात.

तर आता जाणून घेऊयात याबाबतीतली ताजी घडामोड. ६ नोव्हेंबर २०१७ रोजी American Society of Clinical Oncology (ASCO) ने अल्कोहोल आणि कर्करोग याबाबत नियतकालिकात जाहीर निवेदन दिलेले आहे. ‘First-time Statement’ अशा विशेषणासह त्याला ठळक प्रसिद्धी दिलेली आहे. त्यातील महत्वाचे मुद्दे असे आहेत:
१. अल्कोहोल हे पुढील सात अवयवांच्या कर्करोगास कारणीभूत ठरते (causal relationship) : तोंड, घसा, स्वरयंत्र, अन्ननलिका, यकृत, स्तन आणि मोठे आतडे.
२. तर जठर आणि स्वादुपिंडाच्या बाबतीत मात्र ते ‘कर्करोगपूरक’ आहे.
३. दीर्घकाळ अतिरिक्त मद्यपानाने कर्करोगाचा खूप धोका संभवतो आणि प्रमाणात (moderate) पिणे सुद्धा सुरक्षित नाही.
४. वैधानिक इशारा : “ तुम्हाला जर कर्करोगाचा धोका कमी करायचा असेल, तर खूप कमी ‘प्या’ आणि जर तुम्ही ‘पित’च नसाल तर अल्कोहोलच्या नादीच लागू नका !”

तर हे होते धूम्रपान आणि मद्यपानाशी संबंधित रसायनांचे विवेचन. अन्य रसायनांचा विचार विस्तारभयास्तव करीत नाही.

प्रतिबंधात्मक उपाय
संशोधनातील प्रगतीमुळे कर्करोगाच्या नवनव्या उपचारपद्धती विकसित होत आहेत. त्यामुळे जरी बऱ्याच कर्करोगांवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले असले तरीही रोगप्रतिबंध हा कधीही श्रेष्ठ उपाय ठरतो. याबाबतीत जागतिक आरोग्य संघटनेने काही मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. या लेखाच्या विषयालाही ती लागू आहेत. त्यानुसार काही कर्करोग-प्रतिबंधक उपाय असे आहेत :
१. तंबाकूसेवन वर्ज्य
२. अल्कोहोलसेवन अत्यल्प
३. आहारात ‘अ’, ‘इ’ व ‘क’ जीवनसत्वांचा भरपूर वापर. तेव्हा गाजर, पालेभाज्या आणि लिंबू दणकून खात रहा.
४. शरीराच्या वजनावर नियंत्रण, कारण अतिरिक्त चरबी ही पेशींमध्ये कर्करोगपूरक परिस्थिती निर्माण करते. आणि,
५. विविध वैद्यकिय ‘चाळणी परीक्षा’ (screening tests) नियमित करून घेणे.

समारोप
एकूण मानवी कर्करोगांपैकी सुमारे ८०% हे रसायनांमुळे होतात हे कटू सत्य आहे. आपण निर्माण केलेल्या रसायनांच्या बेलगाम वापरामुळे तीच आता आपल्यावर बूमरॅंग झाली आहेत. त्यांचा वापर आणि संपर्क शक्य तेवढा कमी केला पाहिजे. अन्नातून शरीरात जाणारी रसायने कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीचा प्रसार वेगाने झाला पाहिजे. व्यसनांपासून दूर राहणे हे तर सर्वस्वी आपल्याच हातात आहे. औद्योगिक-प्रदूषण नियंत्रण कठोरपणे झाले पाहिजे. रसायनांमुळे होणारा कर्करोग हा गंभीर सामाजिक आरोग्यविषय विषय आहे. तो रोखण्यासाठी विविध स्तरांवर युद्धपातळीवर अंमलबजावणी व्हायला हवी. अन्यथा कर्करोगाचा भस्मासुर हळूहळू मानवजातीला गिळंकृत करण्यासाठी टपून बसलेला आहे.
******************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण हे मिळवण्यासाठी महागडे उपकरण विकत घ्यावे लागेल ना ?
एकंदरीत अनुभव आहे कसा आहे याचा ? >>>

धन्यवाद डॉ. साहेब. मुळात ओझोन हा खूप अन स्टेबल असतो आणि स्टोअर करता येत नाही. त्यामुळे ऑन साईट तयार करावा लागतो. त्यासाठी छोटे ओझोन जनरेटर मिळतात. तो ओझोन पाण्यात ऍबसॉरब करून त्या पाण्यात फळे / भाज्या ठेवल्या कि त्या वरील ऑरगॅनिक कॉमपौंड्स चे विघटन होते. केंट चे एक प्रॉडक्ट आहे मार्केट मध्ये.

मी अजून वापरलेले नाहीय, पण आता वापरावे लागेल असं प्रकर्षाने वाटू लागले आहे.

( ओझोन हा खूप घातक वायू आहे. अतिक्रियाशील गटात मोडणारा. श्वास वाटे शरीरात गेल्यावर त्याच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक ऑरगॅनिक घटकांबरोबर त्याची अभिक्रिया होते. त्यामुळे श्वसन मार्ग / फुफुसे डॅमेज होऊन मृत्यू होऊ शकतो.)

https://www.lenntech.com/ozone-and-humans.htm

कदाचित आपल्यामध्ये पण या रसायनांना प्रतिकार करेल अशी सिस्टिम तयार होईल.>> हास्यास्पद प्रतिसाद आहे. चेर्नोबिल मध्ये एक्क्ष्पोज र किती न्युक्लीअर रेडिएशनला. हे आता जरा बेअरेबल लेव्हलला आले आहे. त्यात म्युटेशन हे नेहमी चान्स वर अवलंबून आहे. वडाची साल पिंपळाला टाइप ऑप्टिमिझम वाटतो.

सिकल सेल उदाहरण आठवले. मलेरिया पासून बचाव करण्यास झालेले म्युटेशन. याची एक कॉपी असेल तर मलेरिया पासून बचाव होतो आणि दोन कॉपीज असतील तर मात्र हानिकारक असे वाचले आहे.

अनुकुल म्युटेशन हे चान्सवर अवलंबून असते हे यातून दिसुन येते काय?

म्युटेशन अनुकूल दिशेने होत राहण्यास परिस्थितीतुन तग धरण्यास प्रबळ मानिसक इच्छाशक्ती असणे यालाही महत्व आहे का?
उदा. चवी साठी आपण आवडीचे जंक फूड खात राहिलो, तुलनेत एखाद्या विषाणूशी लढण्यात जमेल ते उपाय करत राहिलो (लस नाहीय असे समजा). अनुकूल म्युटेशन होण्याची शक्यता दुसऱ्या केस मध्ये जास्त असेल का? की असे काही नाही.

मानव
मला जरा शांतपणे हे सगळं वाचावे लागेल
सध्या बाहेर आहे
बघूया Happy

दोन वेगवेगळे मुद्दे मांडते.
रसायनांचे exposure - घराबाहेर आणि घरातील हवेचे प्रदूषण भयंकर आहे ज्याला आपण सर्व जण २४ तास सामोरे जात आहोत. साधी उदबत्ती किती प्रदूषण करते हे आपल्याला माहीत नसते. ही सर्व रसायने कर्करोगास कारणीभूत होऊ शकतात. एखाद्या निर्व्यसनी, निरोगी व्यक्तीला कर्करोग होण्याचे कारण हवा आणि पाण्यातून होणारे exposure असू शकते.

जनुकीय बदल हा फार लांब पल्ल्याचा आणि अनिश्चित मार्ग आहे. चेर्नोबिल हा अपवाद आहे कारण त्या पातळीवर आपण कधीच सर्व मानवजातीला exposure होऊ देणार नाही आणि ही प्रक्रिया random असल्याने या जनुकीय बदलाच्या जोडीला इतर अनेक नको असलेले बदल देखील होऊ शकतात जे आपल्याला नियंत्रित करता येणार नाहीत. थोडक्यात हा मार्ग शक्य नाही.

साधी उदबत्ती किती प्रदूषण करते हे आपल्याला माहीत नसते. ही सर्व रसायने कर्करोगास कारणीभूत होऊ शकतात.>> बरोबर, मी त्यातील घटक पदार्थांमधील सी एम आर इन्ग शोधुन सर्टिफाय करायचे काम करते.

कॅन्सर व्हायला नको म्हणून चेर्नोबिल लेव्हल एक्स्पोजर हे फारच निरागस आहे. गोड. इथे निकोटीन विरोधात लिहिले तरी हसण्यावारी नेतात. ज्याचा सीएम आर डाटा उपलब्ध आहे.

कदाचित आपल्यामध्ये पण या रसायनांना प्रतिकार करेल अशी सिस्टिम तयार होईल.>>>

चेर्नोबिल मधील रेडिएशन मुळे त्या प्राण्यामध्ये कॅन्सर होणं अपेक्सित होतं.... त्याउलट त्यांच्या मध्ये प्रतिकार शक्ती निर्माण झाली , त्याप्रमाणे ज्या रसायनांना मुळे कॅन्सर होत आहे त्याच्या एक्स्पो जर मुळे आपल्यामध्ये पण तशी प्रतिकार शक्ती निर्माण होईल, असा अर्थ अभिप्रेत होता, हे सायंटिफिक विधान नव्हते.
. अख्या मानव जातील रेडिएशन द्यायला हवं असं लिहायचा हेतू नव्हता.

निवांत पाटील हो, मला तुमच्या पोस्टचा तुम्ही म्हणताय तसाच अर्थ लागला. माझी वरील पोस्ट त्या अनुषंगाने आहे.

_cotton_candy.jpg
तामिळनाडूमध्ये लोकप्रिय असलेल्या panju mittai अर्थात cotton candy या खाद्यपदार्थावर बंदी घालण्यात आली आहे :

https://www.msn.com/en-in/health/other/tamil-nadu-bans-sale-of-cotton-ca...

या पदार्थात Rhodamine-B हे रसायन आढळले असून ते “बहुधा कर्करोगकारक” या यादीतील रसायन आहे :
https://efsa.onlinelibrary.wiley.com/doi/pdf/10.2903/j.efsa.2005.263

निवांत पाटील हो, मला तुमच्या पोस्टचा तुम्ही म्हणताय तसाच अर्थ लागला.>> होय ते वाचताना मला लक्षात आलं होतं. धन्यवाद

तामिळनाडूमध्ये लोकप्रिय असलेल्या panju mittai अर्थात cotton candy या खाद्यपदार्थावर बंदी घालण्यात आली आहे :>>> काल वाचली ती बातमी. रोडमाइन बी चे विघटन ( वेस्ट वॉटर ट्रीटमेंट ) हा माझा मास्टर्स चा प्रोजेक्ट होता.
तसं पाहायला गेलं तर बऱ्याच ठिकाणी फूड कलर हे फूड ग्रेड न वापरता इंडस्ट्रियल ग्रेड वापरले जातात. त्यांच्या किमतीमध्ये खूप फरक असतो. पण लागणाऱ्या quantity च्या प्रमाणात फायनल प्रॉडक्ट मध्ये फारसा फरक पडत नाही.
असच अजून एक केमिकल म्हणजे CMC कार्बॉक्सि मिथाईल सेल्युलोस. हे पण सर्रास इंडस्ट्रियल ग्रेड वापरले जाते. आणि प्रमाणापेक्षा जास्त वापरले जाते. दही/ताक , ग्रेव्हीच्या भाजी / नॉन व्हेज यामध्ये वापरतात.

हे cmc घट्टपणा आणायला वापरतात का? मागे एकाच क्लासमध्ये आईस्क्रीम च्या रेसिपी त cmc वापरायला सांगितले होते असे अंधुक आठवतेय. बाकी ते गुलाबी बुदढी के बाल आहे ना? डेंजर प्रकार. बाहेर पंजाबी भाज्यांच्या ग्रेव्हीत लाल रंग घालतात तो कितीही हात धुतला तरी लवकर निघत नाही. एकूणच कशा मार्गानी घातक गोष्टी शरीरात शिरतील काही सांगू शकत नाही. शक्य तेवढी काळजी घेणे एवढेच हातात आहे.
प्रज्ञा ९, तुमच्या मामींना श्रद्धांजली.

CMC >>> माहीत नव्हते. धन्स
...

ते गुलाबी बुदढी के बाल आहे ना?
>>
बहुतेक तेच असावेत; पण दोन्हीमध्ये काही रासायनिक बारकावे असतील तर ते नि पा सांगू शकतील.

दही पांढऱ्या रंगाचं असतं त्यात पण? >>> cmc कलर लेस असतं .

हे cmc घट्टपणा आणायला वापरतात का? >> हो.

पंजाबी भाज्यांच्या ग्रेव्हीत लाल रंग घालतात तो कितीही हात धुतला तरी लवकर निघत नाही. > एक्झाक्टली. काही वेळा कलर स्किन मध्ये पेनिट्रेट होतो. आपल्याकडे गुलाल वापरला म्हणून FDA च्या केसेस झालेल्या आहेत ( मासे ताजे दिसावेत म्हणून). मिरची पूड मध्ये रंगांची भेसळ जास्त होते.

शक्य तेवढी काळजी घेणे एवढेच हातात आहे.>>> यासाठी लोकशिक्षण / जनजागृती महत्वाची आहे.

पण दोन्हीमध्ये काही रासायनिक बारकावे असतील तर ते नि पा सांगू शकतील.>>> buddhike बाल / कॉटन कॅंडी म्हणजे फक्त साखर (१००%) असते. त्या मशीनच्या सेंटर ला साखर विरघळते. जेथे साखर वितळते तो भाग खूप जोरात फिरत असतो, त्यातून अतिशय लहान लहान तंतू बाहेर फेकले जातात, जे एका काडी वर गोळा केले जातात.
जर यामध्ये कलर किंवा फ्लेवर घालायचा असेल तर तो साखरेसोबत टाकला जातो.

आता हा आयटम जर पांढरा असेल तर इतका लक्षवेधी होत नाही जेवढा डार्क गुलाबी किंवा डार्क निळा असल्यावर होतो. डार्क गुलाबी करण्यासाठी त्यात रोडामाईन बी टाकत होते ( तामिळनाडू केस मध्ये ).

हल्ली कलिंगडामध्ये खूप भेसळ आढळून येते. रंग आणि चव दोन्हीची.

कॉटन कॅंडी म्हणजे फक्त साखर (१००%) असते. त्या मशीनच्या सेंटर ला साखर विरघळते.
>>>
चांगली माहिती. धन्यवाद !
तुमच्या रसायनशास्त्राच्या ज्ञानाचा या धाग्यावर चांगला उपयोग होत आहे.

सहज आठवले म्हणून,
खेडेगावात नासूनये म्हणून दुधामध्ये खायचा सोडा टाकला जायचा. pH कमी झाला कि दूध नासते/ फाटते म्हणून थोडा वेळ pH मेंटेन करण्यासाठी लोक सोडा वापरत. पण डेअरी मध्ये सोडा वापरला कि हल्ली समजते त्यामुळे वापर कमी झाला आहे.

दूध नसू नये म्हणून फॉर्मॅलिन चा वापर होतो हे वर्गीस कुरियन यांच्या आत्मचरित्रामध्ये वाचले होते. फॉर्मॅलिन हे कार्सिनोजेनिक आहे , म्हणून त्याच्या इंडस्ट्रियल वापरासाठी पण बरेच निर्बंध आहेत ( जेथे प्रॉडक्ट चा स्किन शी संपर्क यायची फक्त शक्यता असते अश्या ठिकाणी ). पण दुधामध्ये हे नासूनये म्हणून वापरले जाते.

कुरियन याना एका सॅम्पल मध्ये फॉर्मॅलिन आढळले तेंव्हा ते शोधत त्याच्या सोर्स पर्यंत पोहोचले, एका कॉप. सोसायटी च्या टँकर मधून ते येत होते. जेंव्हा चेअरमन ला विचारले कि हे तुम्ही का वापरता ? तेंव्हा त्याने सांगितले कि हे खूप कमी वापरतो पण हे वापरायला सुरु केल्यापासून दूध रिजेक्ट होत नाही. आणि हे वापरायला आम्हाला तुमच्या केमिस्ट ने सांगितले आहे. इनफॅक्ट त्यानेच आम्हाला हि बाटली दिली आहे.

कर्करोगावरील उपचारांपेक्षा त्याच्या कारणमीमांसेवरील संशोधनाकडे अधिक लक्ष दिले पाहिजे हे खरे. त्या दृष्टिकोनातून जीवनशैलीतील विविध घटकांचा आणि कर्करोगाचा संबंध अनेक संशोधनांमधून तपासला जात आहे. या संदर्भात अलीकडे झालेले हे एक मोठे संशोधन :
https://acsjournals.onlinelibrary.wiley.com/doi/10.1002/cncr.35235

ज्या व्यक्तींना मेटाबोलिक सिंड्रोम असतो ( म्हणजे उच्च रक्तदाब + ग्लुकोज व मेद अधिक्य + सुटलेले पोट), अशा व्यक्तींमध्ये जर कुठलीही दीर्घकालीन दाहप्रक्रिया शरीरात असेल तर त्यातून काही कर्करोगांचा धोका वाढतो. यामध्ये स्तन, गर्भाशय, मूत्रपिंड आणि पचनसंस्थेच्या कर्करोगांचा समावेश आहे.

अर्थात या दोन घटकांमधला कार्यकारणभाव सिद्ध होण्यासाठी अजून संशोधनाची गरज आहे.

पान 6 वर (Submitted by कुमार१ on 12 February, 2024 - 07:54) . CAR-T cell therapy चा उल्लेख आहे.

या प्रकारचे उपचार देणाऱ्या भारतातील पहिल्या केंद्राचे उद्घाटन आपल्या राष्ट्रपतींच्या हस्ते मुंबईत काल झाले आहे.
सदर प्रकल्प आयआयटी मुंबई आणि टाटा संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने उभारलेला आहे :

https://www.telegraphindia.com/india/president-launches-indias-first-hom...

https://assamtribune.com/amp/health-and-fitness/india-emerges-cancer-cap...

भारत कर्करोगाची राजधानी व्हावी इतका हा रोग घराघरात पसरलाय.

हा रोग व्हायची जी अनंत कारणे आहेत त्यात घातक रसायने नियमित स्वरुपात पोटात जाणे हे एक महत्वाचे कारण आहे. हे सगळ्यांना माहित असुनही खाणारे व खिलवणारे दोघेही याकडे कानाडोळा करतात.

बाजार नकली दुध, तेले, लोणी इत्यादीनी भरलाय हे माहित असुनही स्ट्रीट फुड लोकप्रिय आहे, सटी सहामाशी होणारे हॉटेल दर्शन आता दर विकेंडला होते. कुठलाही पदार्थ आधी नजरेला उत्तम दिसायला हवा, त्यासाठी बनवणारे काहीही करतात, कोणाचेही नियंत्रण नाही. ज्यांनी नियंत्रण ठेवायचे ते किरकोळ रकमेला विकले जातात. खाणार्‍यांनाच चिंता नाही म्हटल्यावर इतर संबंधित तरी का काळजी करतील.

आरोग्यपुर्ण, विना जहर अन्न धान्य पिकवायचे तर पुर्ण भारतातली जमिन खराब झालेली आहे, कार्बन ०.२ च्या खाली घसरलाय, पि एच दोन्ही बाजुनी वाढलाय. सामान्य शेतकरी ज्याचे पोट शेतीवरअवलबुन आहे तो रासायनिक खते न वापरायचा बिचारही करु शकत नाही इतकी उत्पादकता कमी झालेली आहे. भविष्य भयंकर आहे. सध्या भारतात फुड सिक्युरिटी आहे पण सामान्याच्या तोंडी पडणारा घास त्याला अनारोग्याकडे नेणारा ठरतोय.

पण सामान्याच्या तोंडी पडणारा घास त्याला अनारोग्याकडे नेणारा ठरतोय.
>>
+११
खरंय. कुठला खाद्यपदार्थ सुरक्षित आहे हा पेचात टाकणारा प्रश्न आहे.
आता त्यातील घातक घटकांपासून सुटका नाही. त्यासह जगायचे आहे एवढे खरे.
आजच्या जागतिक आरोग्य दिनाच्या दिवशी हे लिहिताना खरोखर वाईट वाटते.

आजच ही बातमी वाचली :
https://www.moneycontrol.com/news/trends/navjot-singh-sidhus-wife-underg...
तेव्हा उत्सुकता वाटली की त्या घटनेमध्ये, ‘पसरलेल्या स्तनकर्करोगाचा’ दुर्मिळातला दुर्मिळ प्रकार नक्की काय आहे ते जाणून घेण्याची. परंतु त्या बातमीत त्याबद्दल विस्तृत माहिती नाही.

उपचारांमध्ये नवनवे पर्याय उपलब्ध होत आहेत ते खरे आहे; परंतु प्रतिबंध बऱ्यापैकी शक्य झाला असता तर अधिक बरे वाटले असते.
असो

कलिंगडात भेसळ आहेच.. अपरिपक्व फळे तोडुन आणतात आणि रंग व साखरचे इन्जेक्शन लाऊन आपल्याला चुना फासतात Happy

कित्येकदा संत्री खाताना ती विचित्र चवीची लागलेली आहेत. आता यात भेसळ करतात का व कशी करतात मला माहित नाही पण काहितरी विचित्र कृत्रिम चव खाताना जाणवते. मी हल्ली असे काही आढळले तर सरळ फेकुन देते. पैसे देऊन आणलीत तर खाऊया असा विचार करुन आधी खायचे. आता म्हणते, नंतर लाखोंचे केमो करण्यापेक्षा आता १०० रु गेलेले परवडले.

कँसरवरील उपचार कँसरपेक्षा भयंकर आहेत. माणसाचा खुळखुळा करुन टाकतात. एवढे करुनही जीव वाचायची शक्यता नसेल तर तो पेशंट व त्याच्या घरचे अगदी हवालदिल होऊन जातात. खर्चापरी खर्च होतो, रुग्ण जबरदस्त शारिरीक व मानसिक हाल सहन करतो आणि शेवटी हाती शुन्य. दुर्दैवाने हे सगळे जवळुन पाहतेय सध्या.

काहितरी विचित्र कृत्रिम चव खाताना जाणवते.
>>>
अगदीच सहमत. मुख्य म्हणजे ताजी आणलेली फळे सुद्धा जेमतेम दोन दिवस टिकतील का नाही अशी परिस्थिती आहे. त्यावर दिवस उलटला की त्याच्या आतमध्ये बघवणार नाही अशी खराबी दिसू लागते.
..
दुर्दैवाने हे सगळे जवळुन पाहतेय सध्या.
>>
असो. शुभेच्छा देतो ; दुसरे काय करू !

Dr. Kumar breast cancer Mets to skeleton liver duodenum lungs and brain. If to brain it could mean such a surgery.

साधना, बाहेर खाणे काय आणि घरी आणलेले पॅकेज्ड फूड काय. ऑरगॅनिक सर्टिफिकेशन असलेल्या तिखट आणि हळदीत भेसळ दिसली, ते घालून केलेले पदार्थ खाल्ल्यावर जिभेवर वेगळाच रंग.
दुसरे हणजे नॉनस्टिक भांडी, त्याला चिकटलेले खरवडून काढतात आणि परत ती भांडी वापरतात.

दुसरे हणजे नॉनस्टिक भांडी >>> हल्लीच एका आहारतज्ञाने सांगितले की नॉनस्टीक कोटींग मध्ये जी केमिकल्स असतात ती इनर्ट असतात. शरीरात गेली तरी त्यांची काही रासायनीक क्रीया होत नाही. हे कितपत बरोबर आहे?

Pages