ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू असतोच हे तर मूलभूत सत्य. पण हा मृत्यू निरोगी अवस्थेत शांत झोपेत किती जणांच्या वाट्याला येतो? फारच थोड्या. आयुष्यात मानवी शरीर हे कुठल्या ना कुठल्या रोगाची शिकार बनतेच. मग हा रोग शरीर पोखरत रुग्णास मृत्यूस नेतो. आज विविध रोगांमुळे होणाऱ्या मृत्युंमध्ये हृदयविकार हे आघाडीवर आहेत आणि त्याखालोखाल स्थान आहे ते कर्करोगाचे. सध्या जगभरात कर्करोगाने जवळपास ८० लाख लोक दरवर्षी मरण पावतात. हा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. चालू शतक संपेपर्यंत बहुधा कर्करोग हा हृदयविकाराला मागे टाकून ते अव्वल स्थान पटकावेल अशी चिन्हे दिसताहेत.
आपल्याला कर्करोग का होतो? ढोबळ मानाने त्याची तीन कारणे आहेत:
१. विविध किरणोत्सर्ग (रेडीएशन)
२. अनेक प्रकारची रसायने, आणि
३. काही विषाणूंचा संसर्ग
आपल्याला होणाऱ्या एकूण कर्करोगांपैकी सुमारे ८०% हे रसायनांमुळे होतात. हादरलात ना हा आकडा ऐकून? पण ते वास्तव आहे. आज माणसाने विविध कारणांसाठी बनवलेल्या रसायनांची संख्या एक लाखाच्या आसपास आहे! या रसायनांशी आपला अनेक प्रकारे संपर्क येतो. त्याचे अनेक दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात आणि कर्करोग हा त्यापैकीच एक. रसायनांचे विविध स्त्रोत, त्यांच्यामुळे कर्करोग का होतो, कोणती रसायने जास्त घातक आहेत आणि त्यापासून वाचण्यासाठी आपण कोणते प्रतिबंधात्मक उपाय करू शकतो यांचा आढावा या लेखात घेत आहे.
या विषयाची व्याप्ती मोठी असल्याने पुढील मुद्द्यांच्या आधारे विवेचन करतो:
१. रसायनांशी आपल्या संपर्काचे मार्ग
२. रसायने आणि कर्करोगाची कारणमीमांसा
३. कर्करोगकारक रसायनांची उदाहरणे आणि
४. प्रतिबंधात्मक उपाय
रसायनांशी आपल्या संपर्काचे मार्ग
रसायने आपल्या शरीरात हवा, पाणी, अन्न अथवा त्वचेमार्फत शिरू शकतात. त्यांचे स्त्रोत हे खालीलप्रमाणे असू शकतात:
१. अन्नातील नैसर्गिक घटक : उदा. Aflatoxin हे दाणे, मका व सोयाबीन यांच्यात असते.
२. रासायनिक शेतीतील पिके : या विषयावर गेल्या दहा वर्षात अनेक माध्यमांतून भरपूर दळण दळले गेले आहे. अधिक लिहिणे नलगे.
३. अन्न-प्रक्रिया : एखादे उकळलेले खाद्यतेल तळणासाठी वारंवार वापरुन त्यात aromatic hydrocarbons तयार होतात. हा प्रकार कनिष्ठ दर्जाच्या खानावळीत हमखास होतो.
४. व्यसने : उदा. तंबाकूतील अनेक रसायने आणि अल्कोहोल
५. हवा व पाण्याचे प्रदूषण : कारखान्यांतून सोडली जाणारी अनेक रसायने.
६. विशिष्ट उद्योगधंदे : उदा. Asbestos हे वाहन आणि बांधकाम उद्योगात वापरले जाते, तर aromatic amines ही रबर उद्योगात वापरतात.
७. रोगोपचारासाठी वापरलेली औषधे : उदा. cyclophosphamide हे काही कर्करोगांच्या उपचारासाठी वापरलेले औषध अन्य काही कर्करोग निर्माण करू शकते! आहे की नाही हा विरोधाभास?
रसायने आणि कर्करोगाची कारणमीमांसा
कर्करोगकारक रसायने ही आपल्या पेशींमध्ये शिरून थेट DNA वर हल्ला चढवतात. परिणामी काही जनुकीय बदल होतात. मग विशिष्ट प्रथिनांची मोठ्या प्रमाणात निर्मिती होते आणि त्यांच्या प्रभावाखाली पेशींची अनियंत्रित वाढ होते. हाच तो कर्करोग. अर्थात अशा प्रकारे होऊ शकणारा कर्करोग खालील घटकांवर अवलंबून असतो:
१. रसायनाचे शरीरात जाणारे प्रमाण
२. रसायन-संपर्काचा दीर्घ कालावधी
३. कर्करोग होण्यासाठीची जनुकीय अनुकुलता आणि
४. शरीराची कमकुवत प्रतिकारशक्ती
ह्या सर्व घटकांच्या एकत्रित परिणामातून कर्करोग होतो (multifactorial disease). काही वेळेस गप्पांच्या अड्ड्यात आपल्याला “अहो, आमचे ते काका रोज पन्नासेक तरी सिगारेटी फुंकायचे, तरी वयाच्या ८०व्या वर्षापर्यंत कसे ठणठणीत होते” अशा छापाची विधाने कधीमधी ऐकायला मिळतात. याचे स्पष्टीकरण वरील चार कारणांमध्ये दडलेले असते. अर्थात अशी उदाहरणे ही अपवाद म्हणून सोडून द्यायची असतात. एखादे रसायन जर ९५% लोकांना घातक ठरले असेल तर त्याकडे गांभीर्याने बघितले पाहिजे.
कर्करोगकारक रसायनांची उदाहरणे
या संदर्भात अनेक रसायनांकडे ‘संशयित’ म्हणून बघितले गेले आहे. साधारणपणे त्यांचे दोन गटात वर्गीकरण करता येईल:
१. कर्करोगकारक (carcinogenic)
२. कर्करोगपूरक (co-carcinogenic)
त्यापैकी सुमारे १०० रसायने ही आतापर्यंत माणसासाठी ‘कर्करोगकारक’ म्हणून सिद्ध झालेली आहेत. यातील एकेक रसायन हे स्वतंत्र प्रबंधाचा विषय होऊ शकेल. काही रसायनांचा संपर्क हा विशिष्ट व्यावसायिकांपुरता मर्यादित असतो. याउलट धूम्रपान आणि मद्यपान हे समाजातील खूप मोठ्या समूहांशी संबंधित विषय आहेत. त्यामुळे या लेखाच्या मर्यादेत या दोनच स्त्रोतांमधील रसायनांचा विचार आपण करणार आहोत.
तंबाकूचे धूम्रपान
जागतिक स्तरावर फुफ्फुसाचा कर्करोग हा कर्करोगांच्या यादीत प्रथम क्रमांकावर आहे. त्याचे सर्वात महत्वाचे कारण आहे अर्थातच धूम्रपान. या रोगाने जे मृत्यू होतात त्यापैकी ८०% लोक हे दीर्घकाळ धूम्रपान करणारे असतात. धूर ओढणे हे स्वतःसाठी आणि धूर सोडणे हे आजूबाजूला असणाऱ्यांना घातक असते!
या धुरातील रसायनांचा तपशील असा आहे :
• एकूण रसायने ७०००
• त्यापैकी घातक २५० आणि
• कर्करोगकारक ६९
• कर्करोगकारक रसायनांमध्ये Acetaldehyde, Aromatic amines, Benzo[α]pyrene ही काही उदाहरणे.
तंबाकूतील निकोटीन हे एक बहुचर्चित रसायन आहे. ते जबरदस्त व्यसनकारी आहे पण ते माणसात कर्करोगकारक असल्याचे अद्याप निर्विवाद सिद्ध झालेले नाही. तूर्तास त्याला कर्करोगपूरक म्हणता येईल.
तंबाकू खाणे हा प्रकार आपल्याकडे भरपूर आहे. त्यातील nitrosamines हे तोंडाच्या कर्करोगास कारण ठरतात. भारतात हा कर्करोग पुरुषांमधील कर्करोगांच्या यादीत प्रथम क्रमांकावर आहे.
अल्कोहोलचे सेवन अर्थात मद्यपान
हे शीर्षक वाचताक्षणीच अनेकांच्या भुवया उंचावतील कारण हा अतिशय संवेदनशील विषय आहे ! जगभरातील सुशिक्षित समाजावर नजर टाकता एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. अनेकांनी धूम्रपानाला आयुष्यातून हद्दपार केलेले आहे पण त्यांना मद्यपानाची संगत मात्र सोडवत नाही. संशोधकांचाही हा लाडका विषय! त्यामुळे बहुसंशोधित आणि बहुचर्चित. फक्त कर्करोगच नव्हे तर इतर अनेक आजारांशीही त्याचा कार्यकारणभाव जोडलेला आहे. त्यावरील भरपूर उलटसुलट माहिती माध्यमांतून उपलब्ध आहे.
एक दशकापूर्वी अल्कोहोलला ‘कर्करोगपूरक’ इतपत लेबल लावलेले होते. आता मात्र ते ‘कर्करोगकारक’ च्या यादीत जाऊन बसले आहे. काही संशोधक त्याला ‘risk factor’ असे सुरक्षित लेबल लावणे पसंत करतात.
तर आता जाणून घेऊयात याबाबतीतली ताजी घडामोड. ६ नोव्हेंबर २०१७ रोजी American Society of Clinical Oncology (ASCO) ने अल्कोहोल आणि कर्करोग याबाबत नियतकालिकात जाहीर निवेदन दिलेले आहे. ‘First-time Statement’ अशा विशेषणासह त्याला ठळक प्रसिद्धी दिलेली आहे. त्यातील महत्वाचे मुद्दे असे आहेत:
१. अल्कोहोल हे पुढील सात अवयवांच्या कर्करोगास कारणीभूत ठरते (causal relationship) : तोंड, घसा, स्वरयंत्र, अन्ननलिका, यकृत, स्तन आणि मोठे आतडे.
२. तर जठर आणि स्वादुपिंडाच्या बाबतीत मात्र ते ‘कर्करोगपूरक’ आहे.
३. दीर्घकाळ अतिरिक्त मद्यपानाने कर्करोगाचा खूप धोका संभवतो आणि प्रमाणात (moderate) पिणे सुद्धा सुरक्षित नाही.
४. वैधानिक इशारा : “ तुम्हाला जर कर्करोगाचा धोका कमी करायचा असेल, तर खूप कमी ‘प्या’ आणि जर तुम्ही ‘पित’च नसाल तर अल्कोहोलच्या नादीच लागू नका !”
तर हे होते धूम्रपान आणि मद्यपानाशी संबंधित रसायनांचे विवेचन. अन्य रसायनांचा विचार विस्तारभयास्तव करीत नाही.
प्रतिबंधात्मक उपाय
संशोधनातील प्रगतीमुळे कर्करोगाच्या नवनव्या उपचारपद्धती विकसित होत आहेत. त्यामुळे जरी बऱ्याच कर्करोगांवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले असले तरीही रोगप्रतिबंध हा कधीही श्रेष्ठ उपाय ठरतो. याबाबतीत जागतिक आरोग्य संघटनेने काही मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. या लेखाच्या विषयालाही ती लागू आहेत. त्यानुसार काही कर्करोग-प्रतिबंधक उपाय असे आहेत :
१. तंबाकूसेवन वर्ज्य
२. अल्कोहोलसेवन अत्यल्प
३. आहारात ‘अ’, ‘इ’ व ‘क’ जीवनसत्वांचा भरपूर वापर. तेव्हा गाजर, पालेभाज्या आणि लिंबू दणकून खात रहा.
४. शरीराच्या वजनावर नियंत्रण, कारण अतिरिक्त चरबी ही पेशींमध्ये कर्करोगपूरक परिस्थिती निर्माण करते. आणि,
५. विविध वैद्यकिय ‘चाळणी परीक्षा’ (screening tests) नियमित करून घेणे.
समारोप
एकूण मानवी कर्करोगांपैकी सुमारे ८०% हे रसायनांमुळे होतात हे कटू सत्य आहे. आपण निर्माण केलेल्या रसायनांच्या बेलगाम वापरामुळे तीच आता आपल्यावर बूमरॅंग झाली आहेत. त्यांचा वापर आणि संपर्क शक्य तेवढा कमी केला पाहिजे. अन्नातून शरीरात जाणारी रसायने कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीचा प्रसार वेगाने झाला पाहिजे. व्यसनांपासून दूर राहणे हे तर सर्वस्वी आपल्याच हातात आहे. औद्योगिक-प्रदूषण नियंत्रण कठोरपणे झाले पाहिजे. रसायनांमुळे होणारा कर्करोग हा गंभीर सामाजिक आरोग्यविषय विषय आहे. तो रोखण्यासाठी विविध स्तरांवर युद्धपातळीवर अंमलबजावणी व्हायला हवी. अन्यथा कर्करोगाचा भस्मासुर हळूहळू मानवजातीला गिळंकृत करण्यासाठी टपून बसलेला आहे.
******************************************
अगदी बरोबर लिहिलेत.
अगदी बरोबर लिहिलेत.
News मध्ये वाचले 83% मुंबई कर
News मध्ये वाचले 83% मुंबई कर कर्क रोग चाचणी करायला घाबरतात.
मुंबई सारख्या शहरात ही अवस्था आहे तर बाकी ठिकाणी काय असेल
बरोबर आहे कारण सध्याच्या
बरोबर आहे कारण सध्याच्या सर्वच चाचण्या सुखकारक नाहीत. त्या दृष्टीने गेल्या दहा वर्षात नवे संशोधन प्रगतीपथावर आहे.
एखाद्या माणसाच्या शरीरातून फक्त थोडेसे रक्त घेऊन त्यावर विशिष्ट जनुकीय अभ्यास करून सुमारे 50 कर्करोगांच्या बाबतीतली लवकरच्या स्थितीतील माहिती मिळू शकते. या चाचण्यांना असे तांत्रिक नाव आहे :
Multicancer early detection (MCED) tests
सध्या या चाचण्यांचे मानवी प्रयोग मोठ्या प्रमाणावर चालू आहेत. महाराष्ट्रातही या संदर्भात जे संशोधन चालू आहे त्यासंबंधी मी प्रतिसादातून वेळोवेळी लिहिलेले आहे.
बरोबर आहे कारण सध्याच्या
बरोबर आहे कारण सध्याच्या सर्वच चाचण्या सुखकारक नाहीत>> खरे आहे. Colonoscopy सारखी चाचणी म्हणजे 2 दिवस काढायला हवे.
Colonoscopy ला २ दिवस लागत
कोलनोस्कोपीला २ दिवस लागत नाहीत. माझी स्वतः ची कोलनोस्कोपी झाली आहे. आदल्या दिवशी संध्याकाळी ४ वाजता आणि मग ८ वाजता पोट साफ होणारे औषध घ्यावे लागले. ते लिंबू सरबताच्या चवीचे होते. दर वेळी अर्धा तास जुलाब होऊन पोट साफ झाले. दुसऱ्या दिवशी ७ वाजता कोलनोस्कोपीसाठी बोलावले होते. ७:३० ला जनरल अनेस्थेशिया दिला, ७ सेकंदात मी गाढ झोपलो. ८:४५ ला जागा झालो तोपर्यंत कोलनोस्कोपी झाली होती. डॉक्टरने १५ मिनिटात रिपोर्ट दाखवून चर्चा केली. ९ वाजता बाहेर पडलो (पेशंटने स्वतः ड्रायव्हिंग करायचे नाही) आणि ३० मिनिटात घरी आलो आणि सर्वप्रथम जेवलो कारण आदल्या दिवशीपासून उपाशी होतो. मग आराम केला, पण तुम्ही हवे तर काम करू शकता, तितपत जागे असाल तर. कोलनोस्कोपी नंतर अजिबात दुखत नाही किंवा इतर काही त्रास होत नाही. आता पुढील कोलनोस्कोपी १० वर्षांनी करायची आहे.
आपल्याला होणाऱ्या एकूण
आपल्याला होणाऱ्या एकूण कर्करोगांपैकी सुमारे ८०% हे रसायनांमुळे होतात. >> हे सरसकट विधान माझ्या मते अवैज्ञानिक आहे. याबद्दल डॉ. कुमार यांच्याबरोबर चर्चा मिसळपाव वर झाली आहे. द्विरुक्ती नको म्हणून इथे लिहित नाही. इच्छा असेल तर इथे वाचता येईल. डॉ.कुमार यांचे उत्तर आणि त्याच्या पुढे अजून चर्चा आहे. कर्करोगाचा भस्मासुर याची चर्चा इथे आहे.
मला वाटते कलोनोस्कॉपी चाळणी
मला वाटते कलोनोस्कॉपी चाळणी चाचणी आहे. त्यात आत गाठी दिसल्या तर त्याचे सॅम्पल घेऊन ते पुढील तपासणीसाठी पाठवतात त्यात कॅन्सर पेशी आहेत का, किंवा त्या कँसर कडे वळत आहेत का हे तपासण्यास.
२०१४ मध्ये माझ्या मोठ्या आतड्यात दोन अगदीच छोट्या (१ - २ मिमी) गाठी सापडल्या कलोनोस्कोपी दरम्यान.
त्या गाठी काढून तपासणी साठी दिल्या. टेस्ट निगेटिव्ह आली.
कलोनोस्कोपीसाठी सुटी पण घ्यावी लागली नाही वर उबोंनी लिहल्या प्रमाणे पण रात्री ८ ते १२ पूर्व तयारी. सकाळी भूल उतरल्यावर तासभर थांबायला सांगतात, त्याचे अनिष्ट परिणाम होत नाहीत ना हे पाहण्यासाठी.
२०२१ मध्ये दुसऱ्या डॉकनी तो २०१४ चा रिपोर्ट पाहुन एक रक्ततपासणी करायला सांगितली कँसर संदर्भात. ती पण निगेटिव्ह आली.
बाकी कँसर टेस्ट्स बद्दल काही माहिती नाही, पण कलोनोस्कोपी टाळण्या इतपत त्रासदायक अजीबात वाटली नाही. पोट साफ करून घेण्याचे तेवढे कष्ट,प्रत्यक्ष चाचणीत काही कळले सुद्धा नाही.
बरोबर उपाशी बोका, मी
बरोबर उपाशी बोका, मी पूर्वतयारी आणि टेस्टचा दिवस म्हणून2 दिवस काही इतर प्लॅन करता येत नाही ह्या अर्थाने म्हटले. एरवी ब्लड टेस्ट, सोनोग्राफी ह्यांना अशी पूर्वतयारी लागत नाही. एव्हढाच अर्थ होता. प्रत्यक्ष कोलोनोस्कोपीला एवढा वेळ लागत नाही हे माहीत आहे. वर्षात एखादी करायची असेल तर एवढे वाटत नाही. काही कारणाने परत परत करावी लागली तर पेशंट कंटाळतो. त्यामानाने ब्लड टेस्ट सोपी वाटते.
तरीही तिचा रोगनिदानासाठी उपयोग आहे. ती टाळू नये हेही खरेच.
ह्या वर मेडिकल सायन्स काही
ह्या वर मेडिकल सायन्स काही भाष्य करते का?
१)कॅन्सर ची सुरुवात आणि त्या पासून जीवाला धोका निर्माण होण्याची स्थिती निर्माण होईल अशी कॅन्सर ची स्थीती
ह्या साठी किती काळ जातो.
२) कॅन्सर एकध्या अवयव मध्ये निर्माण झाला असेल तर तो बाकी ठिकाणी पसरतो च असे आहे का,?
वरील दोन्ही गोष्टी माहीत पाडण्यासाठी काही टेस्ट किंवा तंत्र उपलब्ध आहे का?
आता शेवटचा पॉइंट वरील दोन्ही पॉइंट शी संबंधित.
कॅन्सर आहे ,कन्फर्म आहे.
पण त्याचा वाढण्याचा वेग अतिशय हळू आहे.तो धोकादायक स्थिती मध्ये येण्यासाठी दहा वीस वर्ष जातील.
तो पसरत पण नाही
तर अशा कॅन्सर ल छेडून तो आक्रमक बनेल आणि तो एक दीड वर्षात च जीवाला धोका निर्माण करेल ह्याची शक्यता असते का?
प्रश्न चांगले आहेत. यांची
प्रश्न चांगले आहेत. यांची थोडक्यात उत्तरे देणे ही कसरत आहे. यातल्या बऱ्याच गोष्टी नीट समजण्यासाठी जीवशास्त्राची पार्श्वभूमी लागेल. तरी थोडक्यात प्रयत्न करतो.
१.
साधारणपणे कर्करोगाच्या चौथ्या अवस्थेला आपण ‘धोकादायक’ असे म्हणूया. कर्करोगाचा उगम ते शेवटची अवस्था याचा कालावधी काही वर्षे असतो. परंतु ‘काही’ म्हणजे नक्की किती याचे सरसकटीकरण अजिबात करता येणार नाही.
कर्करोगाचा प्रकार, त्यामागील जनुकीय बिघाड, संबंधित अवयव, रुग्णाची एकंदरीत प्रतिकारशक्ती, वय, आनुवंशिकता आणि बरंच काही.. अशा अनेक कारणांचा या कालावधीवर प्रभाव पडेल.
धन्यवाद डॉक्टर.
धन्यवाद डॉक्टर.
२.
२.
कर्करोगाच्या पेशींचे काही मूलभूत गुणधर्म आहेत:
A . जिथे उगम झाला असेल त्याच्या शेजारच्या भागातील पेशींचा नाश करत जाणे (invasion)
B . रक्त आणि लिम्फ यांच्या माध्यमातून शरीरात दूरवर पसरणे (metastasis)
आता, प्रत्येक कर्करोग शरीरात दूरपर्यंत पसरेलच का ? पुन्हा याचे सरसकट असे एक उत्तर नाही.
कर्करोग उगमापासून दूरवर पसरण्यामागे खालील घटकांचा प्रभाव असतो :
• जनुकीय बिघाडाचा प्रकार
• कर्करोगाच्या पेशींमधून बाहेर पडणारी सायटोकाईन्स व अन्य प्रथिने
• भक्षक पेशींची निर्मिती
• शरीरातील मेदपेशींचे प्रमाण
• रक्तातील प्लेटलेट-पेशींमधून बाहेर पडणारी काही रसायने
मूळचा कर्करोग दूरवर पसरण्याच्या प्रक्रियेसंदर्भात “माती आणि बीज” असे एक गृहीतक मांडलेले आहे. एखादे पीक उत्तम येण्यासाठी माती व बीज या दोन्ही गोष्टी त्यांच्या परीने उत्तम आणि एकमेकाला पूरक असाव्या लागतात. तसाच काहीसा प्रकार शरीरात होतो.
कर्करोग पेशी दूरवर पसरतात हे बरोबर. परंतु त्यातल्या त्यात त्यांना ‘प्रिय’ असणारी असणारी ठिकाणे म्हणजे हाडे, यकृत, फुफ्फुसे आणि मेंदू. या चार ठिकाणची ‘माती’ कर्करोगपेशींचे ‘पीक’ फोफावण्यासाठी अगदी पोषक असते.
३. वरील दोन्ही गोष्टी माहीत
३.
वरील दोन्ही गोष्टी माहीत पाडण्यासाठी काही टेस्ट किंवा तंत्र उपलब्ध आहे का?
>>>
होय, अशा काही चाचण्या उपलब्ध आहेत.
त्यातील सोप्या चाचण्या म्हणजे रक्ताचा नमुना घेऊन त्यामध्ये विशिष्ट प्रथिने, हार्मोन्स किंवा अन्य रसायने मोजणे. या सर्वांना मिळून ट्युमर मार्कर्स म्हणतात. ( उदाहरणार्थ, पीएसए हे प्रथिन जर बरेच वाढलेले असेल तर प्रोस्टेटचा कर्करोग असण्याची शक्यता असते).
अर्थात या चाचण्या जुजबी स्वरूपाच्या आहेत. अगदी लवकरात लवकर निदान करण्यासाठी त्यांचा उपयोग प्रत्येक रुग्णामध्ये होतोच असे नाही.
त्या दृष्टीने अलीकडे काही नवीन चाचण्या विकसित होत आहेत. त्यासंबंधी मी वरील एका प्रतिसादात आधीच लिहिलेले आहे (MCED)
त्या चाचण्यांमध्ये कर्करोगाच्या पेशींमधून बाहेर पडलेला DNA तपासला जातो. हे अधिक मूलभूत स्वरूपाचे आहे
हे म्हणजे मित्रांना पण व्यसनी
हे म्हणजे मित्रांना पण व्यसनी करण्यासारखे झाले.
म्हणजे पहिले स्वतः व्यसनी व्ह्यायचे मग एका एका मित्राला पण व्यसन ची सवय लावयाची.
पण त्यांचे आई बाप आपल्या मुलाला बदडून संगत सोडवतात.
तसे बाकी अवयव मध्ये कॅन्सर पसरायला लागला की तेथील पेशींच्या वर्तनावर लक्ष ठेवणाऱ्या यंत्रणा पण ह्या चावट पेशी नी बदडून काढत असतील ना.
थोड वेगळ्या भाषेत
होय
होय
कर्करोग्याच्या शरीरात अशा अनेक चकमकी सतत घडत राहतात.
कर्करोगाच्या पेशींचा सर्वात बेक्कार गुणधर्म कुठला असेल, तर तो म्हणजे त्या आपल्या स्वतःचा मृत्यू येणंकेणं प्रकारेण चुकवतात ! (evade)
प्रत्येक निरोगी पेशीमध्ये त्या पेशीच्या आयुष्याचा एक 'प्रोग्राम' जनुकीय पातळीवर ठरलेला असतो. कर्करोगपेशी तिच्या स्वतःच्या आयुधांच्यामुळे या मूलभूत 'प्रोग्राम'वर मात करते.
>>>> वाढ, वाढ आणि वाढ (growth) हेच त्यांचे एकमेव ध्येय राहते.
सर्वात महत्वाची चाचणी पेट
सर्वात महत्वाची चाचणी पेट स्केन - होल बॉ डी. ह्यातही धोके आहेत. पण नक्की कुठे कुठे कॅन्सर पसरला आहे व त्याची वाढ कुठे परेन्त झालेली आहे ते बघायला ह्याचा उपयोग. होतो. ब्रेन स्केन पण वेगळा करुन घ्यावा. सहा महिन्यातून एकदा ह्या शिवाय जास्त वेळा करु नये. व हा प्रिस्क्रिप्शन शिवाय केला जात नाही.
लिव्हर साठी लिव्हर फंक्षन
लिव्हर साठी लिव्हर फंक्षन टेसट व अल्फा फिटो प्रोटीन टेस्ट चांगली आहे.
लंग्ज साठी लक्षणांकडे लक्ष द्यावे. खोकला दमणूक झाल्यास पेशंटने दुर्लक्ष करु नये.
कॅन्सर विषयी वाचता वाचता.
कॅन्सर विषयी वाचता वाचता.
Nk सेल विषयी माहिती वाचली.
जबरदस्त आहेत ह्या tumor, cancer cells ची ओळख पटवून सरळ त्यांना नष्ट करतात.
त्या सेल वर आधारित कॅन्सर वर उपचार करणारी पद्धत पण संशोधक शोधून काढत आहेत.
आणि ही theropy प्रतेक व्यक्ती साठी वेगळी नाही.
सर्वांना लागू पडणारी आहे.
ह्या मध्ये योग्य ते यश मिळू दे.
आणि माणसाला कॅन्सर पासुन मुक्ती मिळू दे
https://www.google.co.in/url?sa=t&source=web&rct=j&url=https://www.natur...
सर्वात महत्वाची चाचणी पेट
सर्वात महत्वाची चाचणी पेट स्केन - होल बॉ डी
>>>
ही चाचणी उठसूट कोणासाठीही चाळणी चाचणी म्हणून वापरणे योग्य नाही.
ज्या लोकांमध्ये शारीरिक तपासणी, रक्ताच्या चाचणीवरून किंवा अन्य इमेजिंग तपासणीवरून कर्करोगाची शंका आली आहे, त्यांच्याच बाबतीत करणे हितावह आहे.
ती रोगनिदान चाचणी म्हणून महत्वाची.
सर्वसामान्य जनतेसाठी ठराविक वयानंतर निव्वळ चाळणी चाचणी करायची ठरल्यास ती रक्तावरचीच एखादी सोपी चाचणी करणे योग्य आहे.
(Considering the costs and risk of radiation exposure, PETscan would be better used as a priority in patients with laboratory and clinical/radiologic suspicion of malignancy.
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC6984113/)
PET SCAN will not be
PET SCAN will not be prescribed before biopsy or sono. It is not a walk in test. Expensive also.
एक टेस्ट केली की दुसरी करा
एक टेस्ट केली की दुसरी करा दुसरी केली को तिसरी टेस्ट करा मग अंदाज येणार .
मग उपचार.
फरक पडत आहे का ह्याची परत टेस्ट .
त्या टेस्ट मध्ये
फरक नाही पडला की परत टेस्ट कन्फर्म करण्यासाठी.
लय लफडी असतात.
योग्य निदान होणे हे कोणताही रोग बरा होण्याची हमी देणारी पहिली पायरी असते.
कॅन्सर,tb हे लय नालायक आहेत.
तुमच्या टेस्ट ल सहज टांग लावतात.
TB विषयी एका ओळखीच्या व्यक्ती चा अनुभव आहे.
Detect झाला नाही म्हणजे झालाच नाही
पण लक्षण तीच.
उपचार नी लक्षण मात्र बदलत गेली.
आणि डॉक्टर आपल्या मतावर ठाम राहिले
हाडाचा tb .
डॉक्टर ठाम राहिले म्हणून तो बरा पण झाला.
हाडाचा tb
खूप खतरनाक.
कॅन्सर तर सर्वांचं बाप आहे.
पण माणूस आशेवर जगतो, प्रयत्न
पण माणूस आशेवर जगतो, प्रयत्न करत रहायचे. remission is also good enough. It’s rare that a doctor can be sure that cancer will never come back.
कॅन्सर प्राथमिक स्तरावर माहीत
कॅन्सर प्राथमिक स्तरावर माहीत पडला तर तो बरा होण्याची शक्यता खूप असते.
हा अगदी योग्य दावा आहे.
पण माहीत कसा पडणार,?
अनेक टेस्ट आहेत पण त्या फक्त अंदाज व्यक्त करतात.
ते अंदाज आणि डॉक्टर नी लक्षणांचा केलेला अभ्यास.
हे दोन्ही मिळून निदान होते.
हे निदान खरे असेल तर खूप उत्तम तो बरा होणार च.
उपचार तसे आहेत
पण चुकला अंदाज तर.
कॅन्सर टेस्ट चे जसे दुष्परिणाम असतात.
तसे उपचार चे पण असतात.
Chemo rogit आणि नॉर्मल सर्व पेशींची वाढ थांबवते.
कडू असेल तरी ही शक्यता नाकारता येत नाही.
remission is also good enough
remission is also good enough. It’s rare that a doctor can be sure that cancer will never come back
. असा खात्री नी दावा कोणीच करू शकत नाही.
सत्य नाकारणे म्हणजे शहाणपण नव्हे.
परत फिरून तो कॅन्सर आला तरी मी भिनार नाही.
ही मानसिकता हवी .
डॉ. आर. रवी कण्णनकर्करोग
डॉ. आर. रवी कण्णन
कर्करोग शस्त्रक्रियातज्ञ
यंदाच्या वर्षी ‘रॅमन मॅगसेसे पुरस्कारा’चे एकमेव भारतीय मानकरी ठरले आहेत.
अभिनंदन !
https://www.loksatta.com/sampadkiya/columns/vyaktivedh-dr-r-ravi-kannan-...
जीवनसत्त्वे आणि खनिजे
जीवनसत्त्वे आणि खनिजे गोळ्यांच्या रूपाने घेतली आणि त्यांचे प्रमाण जास्त झाले तर काही प्रकारचे कॅन्सर होण्याची शक्यता वाढते, असे वाचले.
असे गृहीतक बऱ्याच वर्षांपासून
असे गृहीतक बऱ्याच वर्षांपासून मांडले गेले आहे. यावर बरीच उलटसुलट मते आहेत. काही गोष्टी प्राण्यांवरील प्रयोगांमध्ये आढळून आल्यात पण त्या माणसाला कितपत लागू करायच्या ?
एकंदरीत यावर बराच वादविवाद आहे.
जीवनसत्वे किंवा खनिजांची कमतरता नसताना उगाचच स्वतःच्या मनाने गोळ्या खात बसू नयेत हे बरोबर.
फुफ्फुसांचा कर्करोग ही एक
फुफ्फुसांचा कर्करोग ही एक गंभीर समस्या आहे. या रोगासाठी सध्या चाळणी चाचणी करायची झाल्यास CT-स्कॅन हीच शिफारस केलेली चाचणी आहे. या चाचणीमध्ये रुग्णाला किरणोत्सर्ग होतो आणि ती खर्चिक सुद्धा आहे. गरीब देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरण्यासाठी ती उपयुक्त ठरत नाही. त्या दृष्टिकोनातून सुटसुटीत चाचणीवर संशोधन होत आहे.
नुकतेच प्रसिद्ध झालेले हे प्राथमिक संशोधन (https://www.science.org/doi/10.1126/sciadv.adj9591) त्या दृष्टीने महत्त्वाचे ठरू शकेल. यामध्ये नॅनोकणयुक्त विशिष्ट डीएनए-बारकोड प्रकारचे रसायन रुग्णाला इन्हेलरमार्फत दिले जाते. त्यानंतर काही वेळाने त्याच्या लघवीची तपासणी केली जाते. जर या कर्करोगाची सुरुवात झालेली असेल, तर लघवीमध्ये विशिष्ट प्रकारची रसायने आढळून येतात.
ही चाचणी (तांत्रिक नाव PATROL) अत्यंत सुटसुटीत असून रुग्णासाठी इजाविरहित आहे. भविष्यात तिची प्रगती व्हावी ही अपेक्षा.
चौथ्या स्टेजच्या पोटाच्या
चौथ्या स्टेजच्या पोटाच्या कँसरमध्ये ऑपरेशन करुन स्टमक काढले पण एका महिन्यात पोटात परत पाणी व्हायला लागले. उपचार चालु आहेत पण पोटात भयंकर दुखते. दुखणे थोडे कमी व्हावे यासाठी काही करता येईल का? रुग्णाला बरे वाटावे म्हणुन पोटावर कोमट पाण्याच्या घड्या, बाम वगैरे करतात पण याने फरक पडत नाही. पेनकिलर सजेस्ट केलीय का माहित नाही पण ती दिली तर चालेल का?
साधना
साधना
अशा अवस्थेतील रुग्णाला सामान्य वेदनाशामक गोळ्या जरी द्यायच्या असतील तरीसुद्धा त्याच्या यकृत आणि मूत्रपिंड कार्याची पूर्ण माहिती असणे आवश्यक असते.
या संदर्भात इथून कुठलाही व्यक्तिगत सल्ला देणे अनुचित राहील. संबंधित डॉक्टर/ दुसरे तज्ञ डॉक्टर यांच्या सल्ल्यानेच योग्य तो निर्णय घ्यावा.
शुभेच्छा !
Pages