रसायनांचा धुमाकूळ आणि कर्करोगाचा भस्मासुर

Submitted by कुमार१ on 2 December, 2017 - 01:39

ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू असतोच हे तर मूलभूत सत्य. पण हा मृत्यू निरोगी अवस्थेत शांत झोपेत किती जणांच्या वाट्याला येतो? फारच थोड्या. आयुष्यात मानवी शरीर हे कुठल्या ना कुठल्या रोगाची शिकार बनतेच. मग हा रोग शरीर पोखरत रुग्णास मृत्यूस नेतो. आज विविध रोगांमुळे होणाऱ्या मृत्युंमध्ये हृदयविकार हे आघाडीवर आहेत आणि त्याखालोखाल स्थान आहे ते कर्करोगाचे. सध्या जगभरात कर्करोगाने जवळपास ८० लाख लोक दरवर्षी मरण पावतात. हा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. चालू शतक संपेपर्यंत बहुधा कर्करोग हा हृदयविकाराला मागे टाकून ते अव्वल स्थान पटकावेल अशी चिन्हे दिसताहेत.

आपल्याला कर्करोग का होतो? ढोबळ मानाने त्याची तीन कारणे आहेत:
१. विविध किरणोत्सर्ग (रेडीएशन)
२. अनेक प्रकारची रसायने, आणि
३. काही विषाणूंचा संसर्ग

आपल्याला होणाऱ्या एकूण कर्करोगांपैकी सुमारे ८०% हे रसायनांमुळे होतात. हादरलात ना हा आकडा ऐकून? पण ते वास्तव आहे. आज माणसाने विविध कारणांसाठी बनवलेल्या रसायनांची संख्या एक लाखाच्या आसपास आहे! या रसायनांशी आपला अनेक प्रकारे संपर्क येतो. त्याचे अनेक दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात आणि कर्करोग हा त्यापैकीच एक. रसायनांचे विविध स्त्रोत, त्यांच्यामुळे कर्करोग का होतो, कोणती रसायने जास्त घातक आहेत आणि त्यापासून वाचण्यासाठी आपण कोणते प्रतिबंधात्मक उपाय करू शकतो यांचा आढावा या लेखात घेत आहे.

या विषयाची व्याप्ती मोठी असल्याने पुढील मुद्द्यांच्या आधारे विवेचन करतो:
१. रसायनांशी आपल्या संपर्काचे मार्ग
२. रसायने आणि कर्करोगाची कारणमीमांसा
३. कर्करोगकारक रसायनांची उदाहरणे आणि
४. प्रतिबंधात्मक उपाय

रसायनांशी आपल्या संपर्काचे मार्ग
रसायने आपल्या शरीरात हवा, पाणी, अन्न अथवा त्वचेमार्फत शिरू शकतात. त्यांचे स्त्रोत हे खालीलप्रमाणे असू शकतात:
१. अन्नातील नैसर्गिक घटक : उदा. Aflatoxin हे दाणे, मका व सोयाबीन यांच्यात असते.
२. रासायनिक शेतीतील पिके : या विषयावर गेल्या दहा वर्षात अनेक माध्यमांतून भरपूर दळण दळले गेले आहे. अधिक लिहिणे नलगे.
३. अन्न-प्रक्रिया : एखादे उकळलेले खाद्यतेल तळणासाठी वारंवार वापरुन त्यात aromatic hydrocarbons तयार होतात. हा प्रकार कनिष्ठ दर्जाच्या खानावळीत हमखास होतो.
४. व्यसने : उदा. तंबाकूतील अनेक रसायने आणि अल्कोहोल
५. हवा व पाण्याचे प्रदूषण : कारखान्यांतून सोडली जाणारी अनेक रसायने.
६. विशिष्ट उद्योगधंदे : उदा. Asbestos हे वाहन आणि बांधकाम उद्योगात वापरले जाते, तर aromatic amines ही रबर उद्योगात वापरतात.
७. रोगोपचारासाठी वापरलेली औषधे : उदा. cyclophosphamide हे काही कर्करोगांच्या उपचारासाठी वापरलेले औषध अन्य काही कर्करोग निर्माण करू शकते! आहे की नाही हा विरोधाभास?

रसायने आणि कर्करोगाची कारणमीमांसा
कर्करोगकारक रसायने ही आपल्या पेशींमध्ये शिरून थेट DNA वर हल्ला चढवतात. परिणामी काही जनुकीय बदल होतात. मग विशिष्ट प्रथिनांची मोठ्या प्रमाणात निर्मिती होते आणि त्यांच्या प्रभावाखाली पेशींची अनियंत्रित वाढ होते. हाच तो कर्करोग. अर्थात अशा प्रकारे होऊ शकणारा कर्करोग खालील घटकांवर अवलंबून असतो:

१. रसायनाचे शरीरात जाणारे प्रमाण
२. रसायन-संपर्काचा दीर्घ कालावधी
३. कर्करोग होण्यासाठीची जनुकीय अनुकुलता आणि
४. शरीराची कमकुवत प्रतिकारशक्ती

ह्या सर्व घटकांच्या एकत्रित परिणामातून कर्करोग होतो (multifactorial disease). काही वेळेस गप्पांच्या अड्ड्यात आपल्याला “अहो, आमचे ते काका रोज पन्नासेक तरी सिगारेटी फुंकायचे, तरी वयाच्या ८०व्या वर्षापर्यंत कसे ठणठणीत होते” अशा छापाची विधाने कधीमधी ऐकायला मिळतात. याचे स्पष्टीकरण वरील चार कारणांमध्ये दडलेले असते. अर्थात अशी उदाहरणे ही अपवाद म्हणून सोडून द्यायची असतात. एखादे रसायन जर ९५% लोकांना घातक ठरले असेल तर त्याकडे गांभीर्याने बघितले पाहिजे.

कर्करोगकारक रसायनांची उदाहरणे
या संदर्भात अनेक रसायनांकडे ‘संशयित’ म्हणून बघितले गेले आहे. साधारणपणे त्यांचे दोन गटात वर्गीकरण करता येईल:
१. कर्करोगकारक (carcinogenic)
२. कर्करोगपूरक (co-carcinogenic)
त्यापैकी सुमारे १०० रसायने ही आतापर्यंत माणसासाठी ‘कर्करोगकारक’ म्हणून सिद्ध झालेली आहेत. यातील एकेक रसायन हे स्वतंत्र प्रबंधाचा विषय होऊ शकेल. काही रसायनांचा संपर्क हा विशिष्ट व्यावसायिकांपुरता मर्यादित असतो. याउलट धूम्रपान आणि मद्यपान हे समाजातील खूप मोठ्या समूहांशी संबंधित विषय आहेत. त्यामुळे या लेखाच्या मर्यादेत या दोनच स्त्रोतांमधील रसायनांचा विचार आपण करणार आहोत.

तंबाकूचे धूम्रपान
जागतिक स्तरावर फुफ्फुसाचा कर्करोग हा कर्करोगांच्या यादीत प्रथम क्रमांकावर आहे. त्याचे सर्वात महत्वाचे कारण आहे अर्थातच धूम्रपान. या रोगाने जे मृत्यू होतात त्यापैकी ८०% लोक हे दीर्घकाळ धूम्रपान करणारे असतात. धूर ओढणे हे स्वतःसाठी आणि धूर सोडणे हे आजूबाजूला असणाऱ्यांना घातक असते!
या धुरातील रसायनांचा तपशील असा आहे :
• एकूण रसायने ७०००
• त्यापैकी घातक २५० आणि
• कर्करोगकारक ६९
• कर्करोगकारक रसायनांमध्ये Acetaldehyde, Aromatic amines, Benzo[α]pyrene ही काही उदाहरणे.

तंबाकूतील निकोटीन हे एक बहुचर्चित रसायन आहे. ते जबरदस्त व्यसनकारी आहे पण ते माणसात कर्करोगकारक असल्याचे अद्याप निर्विवाद सिद्ध झालेले नाही. तूर्तास त्याला कर्करोगपूरक म्हणता येईल.
तंबाकू खाणे हा प्रकार आपल्याकडे भरपूर आहे. त्यातील nitrosamines हे तोंडाच्या कर्करोगास कारण ठरतात. भारतात हा कर्करोग पुरुषांमधील कर्करोगांच्या यादीत प्रथम क्रमांकावर आहे.

अल्कोहोलचे सेवन अर्थात मद्यपान
हे शीर्षक वाचताक्षणीच अनेकांच्या भुवया उंचावतील कारण हा अतिशय संवेदनशील विषय आहे ! जगभरातील सुशिक्षित समाजावर नजर टाकता एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. अनेकांनी धूम्रपानाला आयुष्यातून हद्दपार केलेले आहे पण त्यांना मद्यपानाची संगत मात्र सोडवत नाही. संशोधकांचाही हा लाडका विषय! त्यामुळे बहुसंशोधित आणि बहुचर्चित. फक्त कर्करोगच नव्हे तर इतर अनेक आजारांशीही त्याचा कार्यकारणभाव जोडलेला आहे. त्यावरील भरपूर उलटसुलट माहिती माध्यमांतून उपलब्ध आहे.
एक दशकापूर्वी अल्कोहोलला ‘कर्करोगपूरक’ इतपत लेबल लावलेले होते. आता मात्र ते ‘कर्करोगकारक’ च्या यादीत जाऊन बसले आहे. काही संशोधक त्याला ‘risk factor’ असे सुरक्षित लेबल लावणे पसंत करतात.

तर आता जाणून घेऊयात याबाबतीतली ताजी घडामोड. ६ नोव्हेंबर २०१७ रोजी American Society of Clinical Oncology (ASCO) ने अल्कोहोल आणि कर्करोग याबाबत नियतकालिकात जाहीर निवेदन दिलेले आहे. ‘First-time Statement’ अशा विशेषणासह त्याला ठळक प्रसिद्धी दिलेली आहे. त्यातील महत्वाचे मुद्दे असे आहेत:
१. अल्कोहोल हे पुढील सात अवयवांच्या कर्करोगास कारणीभूत ठरते (causal relationship) : तोंड, घसा, स्वरयंत्र, अन्ननलिका, यकृत, स्तन आणि मोठे आतडे.
२. तर जठर आणि स्वादुपिंडाच्या बाबतीत मात्र ते ‘कर्करोगपूरक’ आहे.
३. दीर्घकाळ अतिरिक्त मद्यपानाने कर्करोगाचा खूप धोका संभवतो आणि प्रमाणात (moderate) पिणे सुद्धा सुरक्षित नाही.
४. वैधानिक इशारा : “ तुम्हाला जर कर्करोगाचा धोका कमी करायचा असेल, तर खूप कमी ‘प्या’ आणि जर तुम्ही ‘पित’च नसाल तर अल्कोहोलच्या नादीच लागू नका !”

तर हे होते धूम्रपान आणि मद्यपानाशी संबंधित रसायनांचे विवेचन. अन्य रसायनांचा विचार विस्तारभयास्तव करीत नाही.

प्रतिबंधात्मक उपाय
संशोधनातील प्रगतीमुळे कर्करोगाच्या नवनव्या उपचारपद्धती विकसित होत आहेत. त्यामुळे जरी बऱ्याच कर्करोगांवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले असले तरीही रोगप्रतिबंध हा कधीही श्रेष्ठ उपाय ठरतो. याबाबतीत जागतिक आरोग्य संघटनेने काही मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. या लेखाच्या विषयालाही ती लागू आहेत. त्यानुसार काही कर्करोग-प्रतिबंधक उपाय असे आहेत :
१. तंबाकूसेवन वर्ज्य
२. अल्कोहोलसेवन अत्यल्प
३. आहारात ‘अ’, ‘इ’ व ‘क’ जीवनसत्वांचा भरपूर वापर. तेव्हा गाजर, पालेभाज्या आणि लिंबू दणकून खात रहा.
४. शरीराच्या वजनावर नियंत्रण, कारण अतिरिक्त चरबी ही पेशींमध्ये कर्करोगपूरक परिस्थिती निर्माण करते. आणि,
५. विविध वैद्यकिय ‘चाळणी परीक्षा’ (screening tests) नियमित करून घेणे.

समारोप
एकूण मानवी कर्करोगांपैकी सुमारे ८०% हे रसायनांमुळे होतात हे कटू सत्य आहे. आपण निर्माण केलेल्या रसायनांच्या बेलगाम वापरामुळे तीच आता आपल्यावर बूमरॅंग झाली आहेत. त्यांचा वापर आणि संपर्क शक्य तेवढा कमी केला पाहिजे. अन्नातून शरीरात जाणारी रसायने कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीचा प्रसार वेगाने झाला पाहिजे. व्यसनांपासून दूर राहणे हे तर सर्वस्वी आपल्याच हातात आहे. औद्योगिक-प्रदूषण नियंत्रण कठोरपणे झाले पाहिजे. रसायनांमुळे होणारा कर्करोग हा गंभीर सामाजिक आरोग्यविषय विषय आहे. तो रोखण्यासाठी विविध स्तरांवर युद्धपातळीवर अंमलबजावणी व्हायला हवी. अन्यथा कर्करोगाचा भस्मासुर हळूहळू मानवजातीला गिळंकृत करण्यासाठी टपून बसलेला आहे.
******************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ राजेश,
******* cancer एकालाच होतो आणि बाकी दोघे निरोगी आयुष्य जगतात ह्याच काय कारण आहे >>>>>>

मुळात कर्करोग होण्यास पेशींतील काही महत्वाच्या जनुकांचा बिघाड कारणीभूत असतो आणि तो अनेक जनुकांत व्हावा लागतो.
आता लेखातील हा भाग बघा:
“ अशा प्रकारे होऊ शकणारा कर्करोग खालील घटकांवर अवलंबून असतो:

३. कर्करोग होण्यासाठीची जनुकीय अनुकुलता आणि
४. शरीराची कमकुवत प्रतिकारशक्ती”
आता मुद्दा ३ अजून स्पष्ट करतो:

जनुकीय अनुकूलता :
रसायन DNA वर हल्ला करते. DNA कडे स्वतःच्या ढाली असतात. म्हणजे दुरुस्ती यंत्रणा. बरेचसे हल्ले तो परतवून लावेल. पण कधीकधी रसायन जबरदस्त असेल आणि ढाल कमकुवत असेल तर मात्र जनुकीय बिघाड होतो.
म्हणजेच बिघाडाला प्रतिकार करण्याची शक्ती पुरेशी किंवा नाही, याला प्रतिकुलता / अनुकूलता समजावे.

म्हणजेच,
ज्यांच्या ‘ढाली’ कमकुवत असतात त्यांनाच रोग होतो. काहींच्या ढाली सशक्त असतात !

वयाच्या ३० वर्षापर्यंत तंबाखू,दारू,चुकीचा आहार आणि व्यायाम चा अभाव असलेली व्यक्ती पण नंतर healthy lifestyle .
आणि वयाच्या ३० वर्षा पर्यंत चांगला आहार,रोज व्यायाम दारू तंबाखू h व्यसन नाही पण३० chya पुढे व्यसन चालू .
तर ह्या दोन व्यक्तीत कोणाच्या शरीरावर unhealthy lifestyle cha सर्वात जास्त अनिष्ट परिणाम होईल

वयाच्या ३० वर्षापर्यंत तंबाखू,दारू,चुकीचा आहार आणि व्यायाम चा अभाव असलेली व्यक्ती पण नंतर healthy lifestyle .
आणि वयाच्या ३० वर्षा पर्यंत चांगला आहार,रोज व्यायाम दारू तंबाखू h व्यसन नाही पण३० chya पुढे व्यसन चालू .
तर ह्या दोन व्यक्तीत कोणाच्या शरीरावर unhealthy lifestyle cha सर्वात जास्त अनिष्ट परिणाम होईल

अशा दोन्ही व्यक्ती प्रत्यक्ष न बघता काही मत देणे अयोग्य आहे. लवकरच्या वयातील व्यसने वाईट असतील असे मोघम म्हणता येईल.

Roundup’ हे तणनाशक फवारतात.>>>>

हे प्रोडक्ट Monsanto या कंपनीचे असून ती तिच्या अनेक बेकायदा उद्योगांसाठी कुख्यात आहे. आपला माल सरकारी दबाव आणून खपवणे, वशील्याने पेटंट मिळवणे असे अनेक धंदे त्यांनी केलेले आहेत.

भारतात त्यांनी बी टी कॉटन प्रकारात बरेच गैरव्यवहार केले होते. त्याविरुद्ध वंदना शिवा यानी आवाज उठवला होता.
आता तिला ‘बायर’ ने विकत घेतले आहे.

साद,
माहिती बद्दल धन्यवाद.
Glyphosate मुळे कर्करोग होत नाही असा ती कंपनी दावा करते. पण जागतिक आरोग्य संघटनेने त्या रसायनाला २०१५ पासून कर्करोगकारकांच्या यादीत घेतले आहे.

व्यसन टाळणे ही ऐकच गोष्ट आपल्या हातात आहे .
रासायनिक खत, कीटकनाशक न वापरलेल्या भाज्या आणि डाळी मिळू शकत नाहीत मार्केट
मध्ये.
हवा प्रदूषण आपल्या हातात नाही .

{पण जागतिक आरोग्य संघटनेने त्या रसायनाला २०१५ पासून कर्करोगकारकांच्या यादीत घेतले आहे.}
Not really. It was a 'probable carcinogen' according to the WHO, which admitted that the inference was based on limited data. It has made a revision since then. Will write about it later.

जरूर लिहा. एकूण वादग्रस्त रसायन आहे ते.
कर्करोग संशोधन करणाऱ्या आंतरराष्ट्रीय एजन्सी नुसार (I A R C) त्यापासून धोका आहे; अन्य काहींच्या मते नाही.

शेतकरी वापरत असलेली विषारी तन नाशक,कीटकनाशक,रासायनिक खत,dudh denarya जनावरांना dilli जाणारी औषध हे सर्व बंद करायचे असेल तर शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च आणि मिळकत हा प्रश्न सोडवावा लागेल .
तो सुटला तर शेतकरी उत्तम दर्जाचे धान्य ,bhajya,dudh उत्पादन घेतील आणि कोणत्याच कंपनीच्या जाहिरातीला बळी पडणार नाहीत

कॅन्सर,मधुमेह,bp हे रोग आर्थिक फायदे देणारे आहेत
त्यातील कॅन्सर आणि मधुमेह हे रोग dnA बिघडते तेव्हा होतात पण उपचार dna दुरुस्ती हा नाही तर एकदम विपरीत आहे ।
हे दोन्ही रोग आता पैसे झापण्याची मशीन झाले आहेत ।

आजच्या लोकसत्तामध्ये सुभाष पाळेकरांचा नैसर्गिक शेतीवर छान लेख आहे:

https://www.loksatta.com/vishesh-news/major-agricultural-problems-in-mah...

…. कुठलेच 'खत' न वापरता ही शेती करतात आणि रसायनाचे तर नावही नको .

"सिगारेट ओढणाऱ्या सर्वांना कर्करोग का होत नाही ? " या नेहमीच्या प्रश्नाबाबतचे एक नवीन संशोधन:

सिगारेट मधील कर्करोगकारक घटकांचा नाश 'GST' या शरीरातील एन्झाईम द्वारा होतो. लोकसंख्येच्या सुमारे ५% लोकांत हे एन्झाइम नसते.

त्यामुळे हे एन्झाइम नसलेल्या आणि बऱ्याच सिगारेट ओढणाऱ्या लोकांत रोगाची शक्यता वाढते.

सिगारेट ओढणाऱ्या सर्वांना कर्करोग का होत नाही ? " या नेहमीच्या प्रश्नाबाबतचे एक नवीन संशोधन:

सिगारेट मधील कर्करोगकारक घटकांचा नाश 'GST' या शरीरातील एन्झाईम द्वारा होतो. लोकसंख्येच्या सुमारे ५% लोकांत हे एन्झाइम नसते.

त्यामुळे हे एन्झाइम नसलेल्या आणि बऱ्याच सिगारेट ओढणाऱ्या लोकांत रोगाची शक्यता वाढते.>> माहितीसाठी धन्यवाद डॉ. कुमार1

पाळेकर तंत्रज्ञानाला अनेक मर्यादा आहेत.>>>>
+ 786

बऱ्याच तंत्रज्ञानाच्या बाबतीत असे दिसून येते. सुरवातीस एखाद्या नव्या तंत्राचा बराच गाजावाजा होतो आणि लोकांवर त्याचा प्रभाव पडतो. पण काही काळाने त्यातल्या त्रुटी दिसू लागतात.

विशिष्ट प्रतिजैविकांचा अतिवापर आणि मोठ्या आतड्याचा कर्करोग होण्याचा धोका याबाबत नवे संशोधन झाले आहे.
पेनिसिलीन गटातील काही ( उदा. Ampicillin), imipenem, chloramphenicol, clindamycin अशी काही औषधे जर रुग्णांना दीर्घकाळ दिली तर वयाच्या साठीनंतर मोठ्या आतड्याच्या सुरवातीच्या भागाचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते. या औषधांच्या अनियंत्रित वापराने आतड्यातील नैसर्गिक जंतूंचा समतोल बिघडतो. त्यातून तिथे कर्करोगपूरक परिस्थिती निर्माण होते.

म्हणून प्रतिजैविके वापरताना हे मुद्दे महत्वाचे आहेत :

१. ती कमीत कमी काळासाठी वापरावीत
२. अशा औषधाची निवड करताना ते शक्यतो अधिक ताकदवान ( broad spectrum) प्रकारचे नसावे.
३. विषाणूजन्य आजारांत उठसूठ प्रतिजैविके वापरू नयेत.

कर्करोगाचे त्याच्या पूर्व-अवस्थेतच निदान हा संशोधनातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. किंबहुना, कर्करोगाचा धोका कोणत्या व्यक्तींना अधिक असतो, हे शोधणे हा या क्षेत्रातील पुढचा महत्त्वाचा टप्पा आहे.
यासंदर्भात एक मौलिक संशोधन पुणे व नाशिकसह अन्यत्रही झाले आहे. बातमी :
https://www.esakal.com/pune/research-pune-based-cancer-expert-has-conclu...

जेव्हा शरीरात एखाद्या अवयवाच्या निरोगी पेशी कर्करोगपेशी होण्याच्या दिशेने सुरुवात होते, तेव्हा काही महत्त्वाचे बदल होतात. सुरुवातीस काही विशिष्ट पेशी रक्तप्रवाहात येऊ लागतात. या स्थितीत त्या व्यक्तीस कुठलाच त्रास किंवा लक्षण नसते. निरोगी व्यक्तीत अशा पेशी सापडणे खूप दुर्मिळ असते.

भविष्यात अशा पेशींची रक्तचाचणी ही कर्करोगाची एक महत्त्वाची चाळणी चाचणी ठरू शकेल. त्या दृष्टीने हे संशोधन पथदर्शक आहे.
अभिनंदन !

सूर्यकिरणांमुळे त्वचेचा कॅन्सर होतो हे कितपत खरे आहे?

आजच एका हॉलिवूड सेलेब्रिटीचे सनबाथ विरुद्ध मत वाचले. ती swimsuit च्या कंपनीची मालकीण व मॉडेल आहे पण फोटोशूट सोडून इतर सर्व वेळ ती मोठी हॅट व सनस्क्रीन क्रीम्स लावून त्वचेचे संरक्षण करते असे तिने म्हटले. तिला हे करण्याचे कारण तिच्या ओळखीच्या बऱ्याच लोकांना कॅन्सर ट्रीटमेंट घ्यावी लागलीय.

https://www.hellomagazine.com/fashion/celebrity-style/2020092397800/eliz...

ऐ ते न

साधना,
होय, त्यात तथ्य आहे. सूर्यप्रकाशातील नीलातीत (UV) किरण जर खूप प्रमाणात दीर्घकाळ त्वचेवर पडले तर त्वचेच्या कर्करोगाचा धोका वाढतो.

धोका वाढवणारे काही अनुषंगिक मुद्दे :

१. गौरवर्णीय, तांबूस केस व निळे डोळे असलेली व्यक्ती
२. त्वचेवर काळ्या/तपकिरी nevi खूप असणे
३. विशिष्ट जनुकीय बदल.

Ok.

मीही तोच विचार करत होते की melanin जास्त असलेल्या भारतीय त्वचेवर याचा काय परिणाम होईल. भारतीय लोकांना मुद्दाम सनबाथ करायची गरज पडत नाहीच, घराबाहेर पडले की चेहरा, मान, हातावर किरणे पडतातच..

गडद रंगाच्या त्वचेत मेलानिन बरेच असते. ते (गोऱ्याच्या तुलनेत) दुप्पट प्रमाणात नीलातीत किरण गाळून टाकते.
त्याने संरक्षण मिळते.

Pages