रसायनांचा धुमाकूळ आणि कर्करोगाचा भस्मासुर

Submitted by कुमार१ on 2 December, 2017 - 01:39

ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू असतोच हे तर मूलभूत सत्य. पण हा मृत्यू निरोगी अवस्थेत शांत झोपेत किती जणांच्या वाट्याला येतो? फारच थोड्या. आयुष्यात मानवी शरीर हे कुठल्या ना कुठल्या रोगाची शिकार बनतेच. मग हा रोग शरीर पोखरत रुग्णास मृत्यूस नेतो. आज विविध रोगांमुळे होणाऱ्या मृत्युंमध्ये हृदयविकार हे आघाडीवर आहेत आणि त्याखालोखाल स्थान आहे ते कर्करोगाचे. सध्या जगभरात कर्करोगाने जवळपास ८० लाख लोक दरवर्षी मरण पावतात. हा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. चालू शतक संपेपर्यंत बहुधा कर्करोग हा हृदयविकाराला मागे टाकून ते अव्वल स्थान पटकावेल अशी चिन्हे दिसताहेत.

आपल्याला कर्करोग का होतो? ढोबळ मानाने त्याची तीन कारणे आहेत:
१. विविध किरणोत्सर्ग (रेडीएशन)
२. अनेक प्रकारची रसायने, आणि
३. काही विषाणूंचा संसर्ग

आपल्याला होणाऱ्या एकूण कर्करोगांपैकी सुमारे ८०% हे रसायनांमुळे होतात. हादरलात ना हा आकडा ऐकून? पण ते वास्तव आहे. आज माणसाने विविध कारणांसाठी बनवलेल्या रसायनांची संख्या एक लाखाच्या आसपास आहे! या रसायनांशी आपला अनेक प्रकारे संपर्क येतो. त्याचे अनेक दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात आणि कर्करोग हा त्यापैकीच एक. रसायनांचे विविध स्त्रोत, त्यांच्यामुळे कर्करोग का होतो, कोणती रसायने जास्त घातक आहेत आणि त्यापासून वाचण्यासाठी आपण कोणते प्रतिबंधात्मक उपाय करू शकतो यांचा आढावा या लेखात घेत आहे.

या विषयाची व्याप्ती मोठी असल्याने पुढील मुद्द्यांच्या आधारे विवेचन करतो:
१. रसायनांशी आपल्या संपर्काचे मार्ग
२. रसायने आणि कर्करोगाची कारणमीमांसा
३. कर्करोगकारक रसायनांची उदाहरणे आणि
४. प्रतिबंधात्मक उपाय

रसायनांशी आपल्या संपर्काचे मार्ग
रसायने आपल्या शरीरात हवा, पाणी, अन्न अथवा त्वचेमार्फत शिरू शकतात. त्यांचे स्त्रोत हे खालीलप्रमाणे असू शकतात:
१. अन्नातील नैसर्गिक घटक : उदा. Aflatoxin हे दाणे, मका व सोयाबीन यांच्यात असते.
२. रासायनिक शेतीतील पिके : या विषयावर गेल्या दहा वर्षात अनेक माध्यमांतून भरपूर दळण दळले गेले आहे. अधिक लिहिणे नलगे.
३. अन्न-प्रक्रिया : एखादे उकळलेले खाद्यतेल तळणासाठी वारंवार वापरुन त्यात aromatic hydrocarbons तयार होतात. हा प्रकार कनिष्ठ दर्जाच्या खानावळीत हमखास होतो.
४. व्यसने : उदा. तंबाकूतील अनेक रसायने आणि अल्कोहोल
५. हवा व पाण्याचे प्रदूषण : कारखान्यांतून सोडली जाणारी अनेक रसायने.
६. विशिष्ट उद्योगधंदे : उदा. Asbestos हे वाहन आणि बांधकाम उद्योगात वापरले जाते, तर aromatic amines ही रबर उद्योगात वापरतात.
७. रोगोपचारासाठी वापरलेली औषधे : उदा. cyclophosphamide हे काही कर्करोगांच्या उपचारासाठी वापरलेले औषध अन्य काही कर्करोग निर्माण करू शकते! आहे की नाही हा विरोधाभास?

रसायने आणि कर्करोगाची कारणमीमांसा
कर्करोगकारक रसायने ही आपल्या पेशींमध्ये शिरून थेट DNA वर हल्ला चढवतात. परिणामी काही जनुकीय बदल होतात. मग विशिष्ट प्रथिनांची मोठ्या प्रमाणात निर्मिती होते आणि त्यांच्या प्रभावाखाली पेशींची अनियंत्रित वाढ होते. हाच तो कर्करोग. अर्थात अशा प्रकारे होऊ शकणारा कर्करोग खालील घटकांवर अवलंबून असतो:

१. रसायनाचे शरीरात जाणारे प्रमाण
२. रसायन-संपर्काचा दीर्घ कालावधी
३. कर्करोग होण्यासाठीची जनुकीय अनुकुलता आणि
४. शरीराची कमकुवत प्रतिकारशक्ती

ह्या सर्व घटकांच्या एकत्रित परिणामातून कर्करोग होतो (multifactorial disease). काही वेळेस गप्पांच्या अड्ड्यात आपल्याला “अहो, आमचे ते काका रोज पन्नासेक तरी सिगारेटी फुंकायचे, तरी वयाच्या ८०व्या वर्षापर्यंत कसे ठणठणीत होते” अशा छापाची विधाने कधीमधी ऐकायला मिळतात. याचे स्पष्टीकरण वरील चार कारणांमध्ये दडलेले असते. अर्थात अशी उदाहरणे ही अपवाद म्हणून सोडून द्यायची असतात. एखादे रसायन जर ९५% लोकांना घातक ठरले असेल तर त्याकडे गांभीर्याने बघितले पाहिजे.

कर्करोगकारक रसायनांची उदाहरणे
या संदर्भात अनेक रसायनांकडे ‘संशयित’ म्हणून बघितले गेले आहे. साधारणपणे त्यांचे दोन गटात वर्गीकरण करता येईल:
१. कर्करोगकारक (carcinogenic)
२. कर्करोगपूरक (co-carcinogenic)
त्यापैकी सुमारे १०० रसायने ही आतापर्यंत माणसासाठी ‘कर्करोगकारक’ म्हणून सिद्ध झालेली आहेत. यातील एकेक रसायन हे स्वतंत्र प्रबंधाचा विषय होऊ शकेल. काही रसायनांचा संपर्क हा विशिष्ट व्यावसायिकांपुरता मर्यादित असतो. याउलट धूम्रपान आणि मद्यपान हे समाजातील खूप मोठ्या समूहांशी संबंधित विषय आहेत. त्यामुळे या लेखाच्या मर्यादेत या दोनच स्त्रोतांमधील रसायनांचा विचार आपण करणार आहोत.

तंबाकूचे धूम्रपान
जागतिक स्तरावर फुफ्फुसाचा कर्करोग हा कर्करोगांच्या यादीत प्रथम क्रमांकावर आहे. त्याचे सर्वात महत्वाचे कारण आहे अर्थातच धूम्रपान. या रोगाने जे मृत्यू होतात त्यापैकी ८०% लोक हे दीर्घकाळ धूम्रपान करणारे असतात. धूर ओढणे हे स्वतःसाठी आणि धूर सोडणे हे आजूबाजूला असणाऱ्यांना घातक असते!
या धुरातील रसायनांचा तपशील असा आहे :
• एकूण रसायने ७०००
• त्यापैकी घातक २५० आणि
• कर्करोगकारक ६९
• कर्करोगकारक रसायनांमध्ये Acetaldehyde, Aromatic amines, Benzo[α]pyrene ही काही उदाहरणे.

तंबाकूतील निकोटीन हे एक बहुचर्चित रसायन आहे. ते जबरदस्त व्यसनकारी आहे पण ते माणसात कर्करोगकारक असल्याचे अद्याप निर्विवाद सिद्ध झालेले नाही. तूर्तास त्याला कर्करोगपूरक म्हणता येईल.
तंबाकू खाणे हा प्रकार आपल्याकडे भरपूर आहे. त्यातील nitrosamines हे तोंडाच्या कर्करोगास कारण ठरतात. भारतात हा कर्करोग पुरुषांमधील कर्करोगांच्या यादीत प्रथम क्रमांकावर आहे.

अल्कोहोलचे सेवन अर्थात मद्यपान
हे शीर्षक वाचताक्षणीच अनेकांच्या भुवया उंचावतील कारण हा अतिशय संवेदनशील विषय आहे ! जगभरातील सुशिक्षित समाजावर नजर टाकता एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. अनेकांनी धूम्रपानाला आयुष्यातून हद्दपार केलेले आहे पण त्यांना मद्यपानाची संगत मात्र सोडवत नाही. संशोधकांचाही हा लाडका विषय! त्यामुळे बहुसंशोधित आणि बहुचर्चित. फक्त कर्करोगच नव्हे तर इतर अनेक आजारांशीही त्याचा कार्यकारणभाव जोडलेला आहे. त्यावरील भरपूर उलटसुलट माहिती माध्यमांतून उपलब्ध आहे.
एक दशकापूर्वी अल्कोहोलला ‘कर्करोगपूरक’ इतपत लेबल लावलेले होते. आता मात्र ते ‘कर्करोगकारक’ च्या यादीत जाऊन बसले आहे. काही संशोधक त्याला ‘risk factor’ असे सुरक्षित लेबल लावणे पसंत करतात.

तर आता जाणून घेऊयात याबाबतीतली ताजी घडामोड. ६ नोव्हेंबर २०१७ रोजी American Society of Clinical Oncology (ASCO) ने अल्कोहोल आणि कर्करोग याबाबत नियतकालिकात जाहीर निवेदन दिलेले आहे. ‘First-time Statement’ अशा विशेषणासह त्याला ठळक प्रसिद्धी दिलेली आहे. त्यातील महत्वाचे मुद्दे असे आहेत:
१. अल्कोहोल हे पुढील सात अवयवांच्या कर्करोगास कारणीभूत ठरते (causal relationship) : तोंड, घसा, स्वरयंत्र, अन्ननलिका, यकृत, स्तन आणि मोठे आतडे.
२. तर जठर आणि स्वादुपिंडाच्या बाबतीत मात्र ते ‘कर्करोगपूरक’ आहे.
३. दीर्घकाळ अतिरिक्त मद्यपानाने कर्करोगाचा खूप धोका संभवतो आणि प्रमाणात (moderate) पिणे सुद्धा सुरक्षित नाही.
४. वैधानिक इशारा : “ तुम्हाला जर कर्करोगाचा धोका कमी करायचा असेल, तर खूप कमी ‘प्या’ आणि जर तुम्ही ‘पित’च नसाल तर अल्कोहोलच्या नादीच लागू नका !”

तर हे होते धूम्रपान आणि मद्यपानाशी संबंधित रसायनांचे विवेचन. अन्य रसायनांचा विचार विस्तारभयास्तव करीत नाही.

प्रतिबंधात्मक उपाय
संशोधनातील प्रगतीमुळे कर्करोगाच्या नवनव्या उपचारपद्धती विकसित होत आहेत. त्यामुळे जरी बऱ्याच कर्करोगांवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले असले तरीही रोगप्रतिबंध हा कधीही श्रेष्ठ उपाय ठरतो. याबाबतीत जागतिक आरोग्य संघटनेने काही मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. या लेखाच्या विषयालाही ती लागू आहेत. त्यानुसार काही कर्करोग-प्रतिबंधक उपाय असे आहेत :
१. तंबाकूसेवन वर्ज्य
२. अल्कोहोलसेवन अत्यल्प
३. आहारात ‘अ’, ‘इ’ व ‘क’ जीवनसत्वांचा भरपूर वापर. तेव्हा गाजर, पालेभाज्या आणि लिंबू दणकून खात रहा.
४. शरीराच्या वजनावर नियंत्रण, कारण अतिरिक्त चरबी ही पेशींमध्ये कर्करोगपूरक परिस्थिती निर्माण करते. आणि,
५. विविध वैद्यकिय ‘चाळणी परीक्षा’ (screening tests) नियमित करून घेणे.

समारोप
एकूण मानवी कर्करोगांपैकी सुमारे ८०% हे रसायनांमुळे होतात हे कटू सत्य आहे. आपण निर्माण केलेल्या रसायनांच्या बेलगाम वापरामुळे तीच आता आपल्यावर बूमरॅंग झाली आहेत. त्यांचा वापर आणि संपर्क शक्य तेवढा कमी केला पाहिजे. अन्नातून शरीरात जाणारी रसायने कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीचा प्रसार वेगाने झाला पाहिजे. व्यसनांपासून दूर राहणे हे तर सर्वस्वी आपल्याच हातात आहे. औद्योगिक-प्रदूषण नियंत्रण कठोरपणे झाले पाहिजे. रसायनांमुळे होणारा कर्करोग हा गंभीर सामाजिक आरोग्यविषय विषय आहे. तो रोखण्यासाठी विविध स्तरांवर युद्धपातळीवर अंमलबजावणी व्हायला हवी. अन्यथा कर्करोगाचा भस्मासुर हळूहळू मानवजातीला गिळंकृत करण्यासाठी टपून बसलेला आहे.
******************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नवीन शोध हे शोध आहेत की जाहिरात हेच समजत नाही.
सूर्याची uv किरण पृथ्वी वर किती प्रमाणात पोचतात.
ती uv किरण जर घातक असती तर जीवसृष्टी प्राथमिक स्तरावर च नष्ट झाली असती.
जगात देशानुसार त्वचेचा कर्क रोग होण्याची प्रमाण किती आहे त्याची आकडेवारी का दिली जात नाही.
Uv किरण पासून मानवी शरीराला नुकसान होत असेल तर मानवी शरीर तो धोका कमी करण्यासाठी नक्कीच कोणती तरी उपाय योजना करत असेल ती कोणती.
ह्याची माहिती का दिली जात नाही.
आणि सूर्य किरण व्यतिरिक्त अजुन कोण कोणत्या मार्गे uv किरण निर्माण होतात त्याची माहिती का लपवली जाते
स्किन कॅन्सर भारतात अत्यंत नगण्य लोकांना होतो.
त्याची आकडेवारी पण सरकार कडे नसेल किंवा असली तरी लोकांना देणार नाहीत.
फक्त क्रीम ची विक्री भारतात जोरात होण्यासाठी uv ray ची भीती इथे पसरवून लोकांना जे D जीवनसत्व सूर्य प्रकाशाने मिळते ते पण मिळू देणार नाहीत.

शेतीतील कीटकनाशकांमुळे शेतकऱ्यांच्या आरोग्यावरही परिणाम होतो हे आपण जाणतो. यासंदर्भात पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील वैज्ञानिक डॉ. राकेश जोशी यांनी मोलाचे संशोधन केले आहे .

फक्त कीटकांचाच नाश करतील आणि त्यांचा मानवी आरोग्यावर परिणाम होणार नाही, अशी कीटकनाशके शोधण्यात त्यांनी संशोधन केलेले आहे.
याबद्दल डॉ. जोशी यांना यंदाचा युवा वैज्ञानिक पुरस्कार मिळालेला आहे.
अभिनंदन !

https://www.ncl-india.org/files/DisplayResource.aspx?ResourceId=047a4612...

मानवी पेशींचा मूलभूत अभ्यास आणि कर्करोगावरील उपचार यात मोलाचे संशोधन करणारे नोबेल-विजेते एडमंड एच. फिशर यांचे वयाच्या 101 व्या वर्षी निधन झाले

आदरांजली

कर्करोग उपचारांसाठी किरणोत्सर्गाचा वापर ही एक प्रस्थापित पद्धत आहे. त्यामध्ये सतत संशोधन होत आहे.

आता त्यासंदर्भात linear accelerator हे तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे, त्यातून निघालेल्या किरणांमुळे फक्त कर्करोग पेशींचा नाश होतो आणि शरीरातील आजूबाजूच्या नॉर्मल पेशींना धक्का लावला जात नाही.

Linear accelerator यासाठी आधीपासून वापरात आहे ना? त्यात आता काही सुधारणा होऊन इतर पेशी सुरक्षित ठेवण्यात यश आले आहे का?

मानव
बरोबर. अधिक सुधारित तंत्रज्ञानामुळे आजूबाजूच्या निरोगी पेशींना कमीत कमी इजा पोचते.
....

उबो
बरोबर.
केमोथेरपीची काही औषधे शिरेतून थेंब थेंब स्वरूपात दिली जातात तर अन्य काही सामान्य इंजेक्शन प्रमाणे.

आज (४ फेब्रु) जागतिक कर्करोग दिन. त्यानिमित्ताने भारतातील काही आकडेवारी :

• दरवर्षी आठ लाख नवीन कर्करुग्णांचे निदान
• दरवर्षी चार लाख मृत्यू.
• मृत्यू होणाऱ्यांचा सर्वाधिक (७०%) वयोगट ३०-६९
• पुरुषांपेक्षा महिलांच्या कर्करोगाची टक्केवारी अधिक

एकूण कर्करोगामध्ये प्रमाणाची क्रमवारी अशी :
1. स्तन
2. फुफ्फुस
3. तोंड
4. गर्भाशय मुख आणि
5. गर्भाशय
…..
जे लोक कर्करोगाने बाधित आहेत त्यांचा आजार नियंत्रणात राहण्यासाठी शुभेच्छा.
वयाच्या पन्नाशीनंतर कर्करोगासाठीच्या विविध चाळणी चाचण्या सर्वांनी करून घेणे हितावह. यासंबंधी विवेचन इथे झालेले आहे :
https://www.maayboli.com/node/65663

पुण्याच्या वारजे परिसरात 1997 मध्ये स्थापन झालेल्या Cipla palliative care या कर्करुग्ण सेवा संस्थेला यंदा 25 वर्षे पूर्ण होत आहेत

अभिनंदन आणि शुभेच्छा !

गुणसूत्रांमध्ये एक विशिष्ट प्रकारचा बिघाड असल्यामुळे कर्करोग होण्याची शक्यता कित्येक पटीने वाढते. एका 36 वर्षीय स्त्रीमध्ये सुमारे 12 प्रकारचे कर्करोग आढळले आहेत :

https://www.science.org/doi/10.1126/sciadv.abq5914

कर्करोगी व्यक्तीच्या रक्तातून फिरणाऱ्या कर्करोगपेशी अचूक ओळखणारी oncodiscover ही रक्तचाचणी डॉ. जयंत खंदारे यांच्या चमूने विकसित केली आहे. या चाचणीचे यशस्वी रुग्णप्रयोग मुंबईतील टाटा रुग्णालयात झाले.

या चाचणीचे संशोधन पुण्यामध्ये सुमारे 15 वर्षांपासून चालू होते. या चाचणीचा परदेशातील खर्च सुमारे दीड लाख रुपये असून भारतात ही चाचणी अवघ्या पंधरा हजार रुपयांमध्ये करणे शक्य झालेले आहे.

या संशोधनाचा उचित गौरव केंद्र सरकारतर्फे झालेला आहे.

न्युझीलँड मध्ये सिगारेट विक्रीवर निर्बंध घालणारा कायदा मंजूर झाला आहे. त्यानुसार 1जानेवारी 2009 नंतर जन्मलेल्या कोणालाही सिगारेट खरेदी करण्यास मनाई करण्यात आली आहे.

सिगारेट विक्री टप्प्याटप्प्याने हद्दपार करण्याच्या दृष्टीने टाकलेले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.

https://www.euronews.com/next/2022/12/13/new-zealand-passes-unique-tobac...

Vitamin supplements,protin supplement, विविध औषध, पावडर,तेल,cream, ह्यांच्या फसवणूक करणाऱ्या जाहिराती ,दावे ,केले जातात.
पण ह्याच वस्तू गंभीर आजाराला कारणीभूत अस्तात
तंबाखू आणि दारू खरे तर आरोग्य vardhak असण्याची शक्यता कमी नाही.
ह्या दोन्ही वर चे खरे संशोधन जाहीर होणे गरजेचे आहे

rmd
तुमच्यासारखे जागरूक वाचक त्याची दखल घेत आहेत हे पाहून आनंद वाटतो.
धन्यवाद.!

चांगला निर्णय वाटतोय सिगारेट विक्री टप्प्या टप्प्याने बंद करण्याचा. ज्यांना व्यसन आहे त्यांना त्रास होणार नाही, सिगारेट इंडस्ट्रीवर अवलंबून असणाऱ्यांना दुसरा पर्याय निवडण्यास भरपूर वेळ मिळेल, नव्याने व्यसन लागणाऱ्यांची संख्या कमी कमी होत जाईल.

भारत :
सिगारेटच्या खुल्या विक्रीवर बंदी घालावी, अशी शिफारस संसदेच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विषयक स्थायी समितीने नुकताच जारी केलेल्या ‘कर्करोगाचे व्यवस्थापन, प्रतिबंध आणि निदान’ या अहवालात करण्यात आली आहे.

https://www.loksatta.com/explained/parliamentary-standing-committee-reco...

खुल्या विक्रीवर बंदीची अंमल बजावणी कशी करणार?
साधी किराणा दुकाने आणि पानाची दुकाने, चहाच्या टपऱ्या इत्यादी इथे सिगरेट विक्रीवर बंदी करून फक्त सुपर मार्केट वगैरे मध्ये विक्री परवानगी असे केल्यास होउ शकेल.

अर्थात चोरून खुली विक्री होईल, पण प्रमाण कमी होईल.

कर वाढवून किंमत वाढवणे याचाही उपयोग होईल.

गुटखा बंद पण मिळतो सर्व ठिकाणी.
भारतात पूर्ण बंदी च उपयोगी पडेल.
उत्पादन,विक्री,वाहतूक,वापर ह्या सर्वावर बंदी.
अंशतः बंदी भारतात तरी केवळ दिव्य स्वप्न च ठरेल.

गुटखा बंद पण मिळतो सर्व ठिकाणी.
भारतात पूर्ण बंदी च उपयोगी पडेल.
उत्पादन,विक्री,वाहतूक,वापर ह्या सर्वावर बंदी.
अंशतः बंदी भारतात तरी केवळ दिव्य स्वप्न च ठरेल.

Cogarste, दारू उत्पादन करणाऱ्या कंपन्यांची खूप मोठी लॉबी आहे.
ते कधी बंद होणार नाहीत.
उलट लोकांना प्रोत्साहन च दिले जाईल वापरण्या साठी.
आता आपल्याला त्यांच्या बरोबर च जगायचे आहे

दारू आणि सिगारेट शरीरासाठी हानिकारक आहे.
सर्वांना माहीत आहेत.
डॉक्टर लोकांना तर datail मध्ये माहीत आहे.
तरी डॉक्टर्स,संशोधक,उच्च शिक्षित, उद्योग पती.
सर्व कळती सवरती लोक पण दारू पितात.
सिगारेट पितात.
आणि prestige वाटत त्या मध्ये.
खरेच गमतीशीर आहे

आज (४ फेब्रु) जागतिक कर्करोग दिन.

जे लोक कर्करोगाने बाधित आहेत त्यांचा आजार नियंत्रणात राहण्यासाठी शुभेच्छा.
वयाच्या पन्नाशीनंतर कर्करोगासाठीच्या विविध चाळणी चाचण्या सर्वांनी करून घेणे हितावह.

यंदाचे जागतिक ब्रीदवाक्य कर्करोगाच्या उपचारांसंबंधी असून ते असे आहे:
“close the care gap”

ह्याची भर घालते.... Happy
ज्यांच्या नात्यात कर्करोगाची व्यक्ती आहे त्यांच्यासाठी या चाचण्या चाळीशी नंतर करून घेणे हितावह असते. खासकरून ज्या स्त्रियांच्या आई, आजी, बहिण, मावशी यापैकी कुणाला कर्करोग होऊन गेला असेल त्यांनी चाळीशीनंतर दरवर्षी मॅमोग्रॅम तपासणी करून घ्यावी असे इथले स्त्रीरोगतज्ज्ञ आवर्जून सुचवतात.

Pages