भाषा : अपभ्रंश, बदल, मतांतरे इ.

Submitted by कुमार१ on 14 March, 2021 - 10:39

नुकताच मराठी म्हणींच्या धाग्यावर ‘उसापोटी कापूस जन्मला’ या म्हणीचा अर्थ विचारला गेला होता. त्यावर शोध घेताना मला रोचक माहिती मिळाली. वास्तविक सदर म्हणीत ‘कापूस’ शब्द नसून ‘काऊस’ हा शब्द आहे. त्याचा अर्थ ‘उसाच्या शेंड्याचा नीरस भाग किंवा कुचकामाचा माणूस’. ‘काऊस’ हा जरा विचित्र शब्द असल्याने याचा कापूस असा सोयीस्कर अपभ्रंश झाला असावा.

या निमित्ताने मनात एक कल्पना आली. वरील म्हणीप्रमाणेच आपल्या भाषेत अनेक शब्द, म्हणी अथवा वाक्प्रचार यांचे अपभ्रंश कालौघात रूढ होतात. त्याची अशी काही कारणे संभवतात :

१. एखादा मूळ शब्द उच्चारायला कठीण असतो
२. तो लोकांत खूप अपरिचित असतो, किंवा
३. भाषेच्या विविध बोली अथवा लहेजानुसार त्यात बदल संभवतात.

म्हणी आणि वाक्प्रचार हे कित्येक शतकांपासून भाषेत रूढ आहेत. तेव्हा त्यांचे विविध अपभ्रंश नक्की कधी झाले हे समजणे तसे कठीण असते. मात्र एकदा का ते रूढ झाले, की त्या पुढील पिढ्यांना तेच जणू मूळ असल्यासारखे भासतात. त्यातून बरेचदा संबंधित म्हणीचा अर्थबोध होत नाही. काहीसे बुचकळ्यात पडायला होते तर काही वेळेस काही शब्द हास्यास्पद भासतात. मग या अपभ्रंशांची नवनवीन स्पष्टीकरणे सामान्यांकडून दिली जातात आणि त्यातून काहीतरी नवेच रूढ होते. काही अपभ्रंशांच्याबाबत विविध शब्दकोश आणि भाषातज्ञात देखील मतांतरे अथवा मतभेद असतात. असे काही वाचनात आले की एखाद्या भाषाप्रेमीचे कुतूहल चाळवते. तो त्याचा अधिकाधिक शोध घेऊ लागतो. अशाच काही मजेदार बदल अथवा अपभ्रंशांची जंत्री करण्यासाठी हा धागा.

माझ्या माहितीतील काही उदाहरणांनी (संदर्भासह) सुरुवात करून देतो. नंतर इच्छुकांनी भर घालत राहावी.

१. आठराविश्वे दारिद्र्य
अर्थ : पूर्ण दारिद्र्य

आता १८ ‘विश्वे’ कोणती असा प्रश्न पडतो.
त्याची २ स्पष्टीकरणे मिळाली :

अ) वीस विश्वे (विस्वे) पैकीं अठराविश्वे म्हणजे जवळ जवळ पूर्ण दारिद्र्य. = १८/ २०
(https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF%...)

ब) 'अठरा विसा' याचा अर्थ १८ x २० = ३६० दिवस, असा होतो. ३६० दिवस म्हणजे एक वर्ष. वर्षाचे सर्व दिवस, सदासर्वकाळ दारिद्रय घरात वसतीला असणे, यालाच 'अठरा विश्वे दारिद्रय' म्हणतात (हणमंते, श्री०शा० १९८० : संख्या-संकेत कोश. प्रसाद प्रकाशन, पुणे)
http://maparishad.com/content/%E0%A4%85%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A...

आहे की नाही गम्मत ! गणितानुसारही चक्क २ वेगळे अर्थ झाले :
१८/२० आणि
१८ गुणिले २० !

२. पुराणातली वांगी पुराणात
अर्थ : उपदेश नुसता ऐकावा, करताना हवे ते करावे ( शब्दरत्नाकर).

आता इथे भाजीतील ‘वांगी ’ कुठून आली हा अगदी स्वाभाविक प्रश्न. मी यासाठी शब्दरत्नाकर व बृहदकोश दोन्ही पाहिले असता त्यात ‘वांगी’ च स्पष्ट लिहिलेले आहे. मात्र ‘वांगी’ हा वानगीचा अपभ्रंश असल्याचे संदर्भ मिळतात. उदा :

यातला मूळ शब्द ‘वानगी’ म्हणजे नमुना हा असावा, ज्याचा नंतर ‘वांगी’ हा अपभ्रंश झाला, असे काही भाषातज्ज्ञांचे मत आहे”.
https://www.loksatta.com/vishesh-news/scientific-research-in-indian-myth...

३. उंसाच्या पोटीं काऊस जन्मला
= हिर्‍याच्या पोटीं गारगोटी. [सं. कु + इक्षु]
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B8

इथे कापूस या अपभ्रंशांने खरेच बुचकळ्यात पडायला होते. ऊस श्रेष्ठ असेल तर कापूस कनिष्ठ कसा?

४. परोक्ष
मूळ अर्थ :
एखाद्याच्या पाठीमागें, गैरहजेरींत; डोळ्या-आड; असमक्ष.
मात्र व्यवहारात त्याचा वापर बरोबर उलट अर्थाने ( समक्ष) केला जातो !
हा पाहा संदर्भ :

“अडाणी माणसें परोक्ष याचा समक्ष या अर्थीं उपयोग करतात व असमक्ष करितां अपरोक्ष योजतात”.
(https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%95%...)
. मेत(थ)कूट
याचा सर्वपरिचित अर्थ हा:

तांदूळ, निरनिराळ्या डाळी, मोहऱ्या, मेथ्या इ॰ एकत्र दळून केलेलें पीठ व त्यांत दहीं घालून तयार केलेलें एक रुचकर तोंडीलावणें.
यात मेथ्या असल्याने ते खरे मेथकूट आहे.

पण, ‘मेतकूट जमणे / होणे’ याचा उगम मात्र मित्र + कूट असा आहे.

मेळ; एकी; दृढ मैत्री. 'शिंदे, बाळोबा व भाऊ यांचें मेतकूट झालें होतें.' -अस्तंभा ९६. [सं. मिथः कूट; मित्र-प्रा. मित + कूट] (वाप्र)
दाते शब्दकोश
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%...

......
वानगीदाखल मी काही वर दिले आहे.
येउद्यात अजून असे काही. चर्चा रोचक असेल.
**************************************

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला काही मराठी शब्दांच्या व्युत्पत्तीबद्दल कुतुहल आहे, लगे हाथ विचारून घेतो इथे :

१) अगडबंब - मोठा आकार दर्शवण्यासाठी हा शब्द कसाकाय आला असावा ?
२) अबब - आश्चर्य दाखवण्यासाठी जुन्या मराठीत हमखास दिसणारा शब्द
३) तळतळाट - राग राग आणि तळण्याचा काही संबंध ? आग-आग होते असा ?

जाणकारांनी प्रकाश टाकावा.

१. अगडबंब >>>
का. बंबल = ढीग? ( का = कन्नड ?)

आगड = अतिशय. [सं. अगाध]
बृहदकोशातून

सूर्य ह्या शब्दावरून सौर शब्द आलेला नाही. तो सुर ह्या शब्दावरून आलेला आहे. सुर म्हणजे १) देव २) सूर्य ३)साधू, विद्वान मनुष्य

निर्भीक
हा शब्द सहसा वाचनात येत नाही. मध्यंतरी एका लेखात वाचला.
अर्थ :
निर्भीड; स्पष्ट; असंदिग्ध; भयरहित.
(बृहदकोश)

तरुण तुर्क, म्हातारे अर्क या नाटकाच्या नावामधील तुर्क शब्द निव्वळ भाषिक सौंदर्यासाठी (यमक) घेतला आहे काय असे वाटत होते; परंतु तसे नाही. शब्दकोशात तुर्कचे तीन अर्थ दिलेले आहेत :

तुर्क,. अवखळ, दुर्दंम्य व्यक्ती

आणि इंग्लिश व्युत्पत्ती कोशात तर असे तीन अर्थ आहेत( पर्शियन) :
"a beautiful youth," "a barbarian," "a robber."

https://www.etymonline.com/word/turk

फार पूर्वी गौतमीपुत्र सातकर्णी पुस्तक वाचलेलं त्यात कल्याणचा उल्लेख कलियाण, ठाणेचा उल्लेख श्रीस्थानक, सोपाराचा सुप्पारा आणि भरुचचा भृगुकच्छ म्हणून होता, ह्या सर्व भागाला कोकण प्रांत म्हणायचे, पैठणहुन परदेशात व्यापार होत होता त्यात व्यापारी कुठून कसे जायचे तो उल्लेख होता. बाकी नावं आत्ताच्या नावांच्या जवळ जाणारी आहेत पण श्रीस्थानक आणि ठाणे यात बराच फरक वाटतो.

रुक्ष भाषेतील बातम्यांच्या जंजाळात कधीकधी एखादी छानसे व्यक्तिविशेषण लक्ष वेधून घेते !

(अभिनेत्री पामेला अ‍ॅण्डरसनबद्दल) :
या गोलगोलीत सौंदर्याने संपृक्त ललनेच्या शारीर कामगिरीची फारच ओळख सर्वाना असली, तरी तिच्या लेखन कारागिरीचा गुण अमेरिकेतर देशांना फारसा माहीत नाही

https://www.loksatta.com/sampadkiya/columns/bookbatmi-model-actress-pame...

कुमार सर हा लेख सहजच म्हणून वाचला.
भाषासौंदर्य, अलंकार व व्यक्तीविशेषण सगळ्यांची उत्तम रेलचेल आहे.
धन्यवाद!

अवा, धन्यवाद!
तुमचेही इथे स्वागत आहे !

येत चला. अनेकांच्या अर्थपूर्ण सहभागामुळेच धागा वाचनीय होतो

स्था तिष्ठ ह्या धातूचे PIE मूळ ( Sta) हे सर्वसंचारी होते. एखाद्या केळीच्या अथवा अळवाच्या मुळासारखे ( खरे तर खोडासारखे) ते Eurasia मध्ये धावत सुटले होते. stay, station,state, static, stand हे इंग्लिश शब्द मूळ stare ह्या लॅटिन आणि estai ह्या जुन्या फ्रेंच रूपापासून बनले आहेत.पण जर्मन मध्ये stehen, Persian मध्ये stay (उच्चार लिहिता येत नाही) वगैरे. शिवाय अनेक मध्य आशियाई देशांच्या नावांमध्ये स्तान / स्टान शब्द आहे. अफ़गानिस्तान, कज़ाकस्तान, बलूचिस्तान प्रांत, हायास्तान , (अगदी पाकिस्तान सुद्धा). हिंदी, मराठी गुजरातीमध्ये अनेक शब्द स्था वरून बनले आहेत. स्थावर, स्थानक, थांब, ठाव, ठिकाण, ठहर, ठाडे, ठाकणे, ठाय ठायीं असे अनेक अनेक शब्द. गंमत म्हणजे मूळ अर्थ एका ठिकाणी थांबणे, राहाणे पण हा धातू मात्र एकाच जागी न स्थिरावता चौफेर धावला आहे!

पण हा धातू मात्र एकाच जागी न स्थिरावता चौफेर धावला आहे!
>>> सही !
अगदी constable आणि कर्करोगाच्या metastasis पर्यन्त !

हो. अगदी नुसत्या stable पासून!
आणि घोड्यांचे stables सुद्धा असेच निपजले आहेत आणि हिंदीतले अस्तबल , मराठीतले तबेलेसुद्धा!

मूळ धातू प्रोटो इंडो यूरोपीय आहे. PIE गटात द्राविड भाषागट मोडत नाही. तरीही, PIE गटाच्या निकट सान्निध्य आणि साहचर्यामुळे हा धातू नक्कीच द्राविड भाषागटात शिरला असेल.

अमर / अमर्त्य हे शब्द परिचित आहेत. याच धर्तीवर

न-मर्त्य ( a-mortal)
असा शब्द सेपियन्स पुस्तकाच्या मराठी भाषांतरात वाचला.
= जीव घेणाऱ्या आजारांमुळे ही माणसे कधीच मरणार नाहीत ( आजारमुक्ती ). त्यांचे आयुष्य अनंत काळापर्यंत वाढू शकेल. मात्र अपघातांमुळे त्यांच्यावर मरण ओढवू शकते.

सन २०५० पर्यंत काही माणसे तरी न-मर्त्य होतील असे पुस्तक म्हणते.
पाहूया !

हो . न - नाट्य, न - नायक तसे न - मर्त्य. संस्कृत व्याकरणाप्रमाणे य तव्य अनीय प्रत्यय लागून होणाऱ्या विध्यर्थी विशेषणांना अ प्रत्यय लावून विरुद्ध अर्थी ( नकारार्थी ) शब्द बनतात. न लावायचा असेल तर तो जोडून लावता येत नाही. वेगळा ठेवावा लागतो. मान्य अमान्य, चिंत्य अचिंत्य, शोभनीय अशोभनीय,कर्तव्य अकर्तव्य हे ठीक. पण म्हणजे 'न' ने अगदी विरुद्ध असा शब्द बनत नाही. इंग्लिशमध्ये should not सारखा अर्थ. आणखी म्हणजे antagonist protagonist ह्या जोडी मध्ये protagonist हा नायक असेलच असे नाही पण खलनायक नसतो. तसे.

कोकणासंबंधी एका लेखात
होल्टा
हा शब्द वाचला आणि मजा वाटली. शोध घेतल्यानंतर अशी माहिती मिळाली :
ओलटा =
(कों.) होलटा; हिरवी फांदी; ओल्या लाकडाचा बारीक तुकडा; दांडकें; दंडुका (हा फळ पडतांना वापरतात). [ओलें + काष्ठ]
दाते शब्दकोश

आणि ही म्हण :
पडला तर आंबा नाहीं तर ओलटा.

शंख हा एक सुंदर बहुढंगी शब्द आहे.

१. नाम म्हणून त्याचे जवळपास डझनभर अर्थ आहेत. त्यामध्ये समुद्रातील जलचर, एक मोठी संख्या आणि कपाळावरील एका हाडाचे नाव इथपर्यंत त्यांची व्याप्ती.
२. विशेषण म्हणून तो ठोंब्या किंवा रड्या होतो !

३. तर काही विशेषणांच्या पुढे तो आधिक्यार्थीं जोडल्यास अजून सुंदर शब्द तयार होतात. जसे की, निर्मळशंख, निवळशंख (पाणी)
आणि
४. त्याचे क्रियापद केल्यावर तो बोंब मारतो !

क्लू साठी चपखल मराठी शब्द काही आहे का? आपण कोडी घालताना उत्तर आलं नाही तर क्लू देतो, त्या अर्थाने पाहिजे. सुगावा किंवा खूण ह्या अर्थाने नाही.

Pages