भाषा : अपभ्रंश, बदल, मतांतरे इ.

Submitted by कुमार१ on 14 March, 2021 - 10:39

नुकताच मराठी म्हणींच्या धाग्यावर ‘उसापोटी कापूस जन्मला’ या म्हणीचा अर्थ विचारला गेला होता. त्यावर शोध घेताना मला रोचक माहिती मिळाली. वास्तविक सदर म्हणीत ‘कापूस’ शब्द नसून ‘काऊस’ हा शब्द आहे. त्याचा अर्थ ‘उसाच्या शेंड्याचा नीरस भाग किंवा कुचकामाचा माणूस’. ‘काऊस’ हा जरा विचित्र शब्द असल्याने याचा कापूस असा सोयीस्कर अपभ्रंश झाला असावा.

या निमित्ताने मनात एक कल्पना आली. वरील म्हणीप्रमाणेच आपल्या भाषेत अनेक शब्द, म्हणी अथवा वाक्प्रचार यांचे अपभ्रंश कालौघात रूढ होतात. त्याची अशी काही कारणे संभवतात :

१. एखादा मूळ शब्द उच्चारायला कठीण असतो
२. तो लोकांत खूप अपरिचित असतो, किंवा
३. भाषेच्या विविध बोली अथवा लहेजानुसार त्यात बदल संभवतात.

म्हणी आणि वाक्प्रचार हे कित्येक शतकांपासून भाषेत रूढ आहेत. तेव्हा त्यांचे विविध अपभ्रंश नक्की कधी झाले हे समजणे तसे कठीण असते. मात्र एकदा का ते रूढ झाले, की त्या पुढील पिढ्यांना तेच जणू मूळ असल्यासारखे भासतात. त्यातून बरेचदा संबंधित म्हणीचा अर्थबोध होत नाही. काहीसे बुचकळ्यात पडायला होते तर काही वेळेस काही शब्द हास्यास्पद भासतात. मग या अपभ्रंशांची नवनवीन स्पष्टीकरणे सामान्यांकडून दिली जातात आणि त्यातून काहीतरी नवेच रूढ होते. काही अपभ्रंशांच्याबाबत विविध शब्दकोश आणि भाषातज्ञात देखील मतांतरे अथवा मतभेद असतात. असे काही वाचनात आले की एखाद्या भाषाप्रेमीचे कुतूहल चाळवते. तो त्याचा अधिकाधिक शोध घेऊ लागतो. अशाच काही मजेदार बदल अथवा अपभ्रंशांची जंत्री करण्यासाठी हा धागा.

माझ्या माहितीतील काही उदाहरणांनी (संदर्भासह) सुरुवात करून देतो. नंतर इच्छुकांनी भर घालत राहावी.

१. आठराविश्वे दारिद्र्य
अर्थ : पूर्ण दारिद्र्य

आता १८ ‘विश्वे’ कोणती असा प्रश्न पडतो.
त्याची २ स्पष्टीकरणे मिळाली :

अ) वीस विश्वे (विस्वे) पैकीं अठराविश्वे म्हणजे जवळ जवळ पूर्ण दारिद्र्य. = १८/ २०
(https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF%...)

ब) 'अठरा विसा' याचा अर्थ १८ x २० = ३६० दिवस, असा होतो. ३६० दिवस म्हणजे एक वर्ष. वर्षाचे सर्व दिवस, सदासर्वकाळ दारिद्रय घरात वसतीला असणे, यालाच 'अठरा विश्वे दारिद्रय' म्हणतात (हणमंते, श्री०शा० १९८० : संख्या-संकेत कोश. प्रसाद प्रकाशन, पुणे)
http://maparishad.com/content/%E0%A4%85%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A...

आहे की नाही गम्मत ! गणितानुसारही चक्क २ वेगळे अर्थ झाले :
१८/२० आणि
१८ गुणिले २० !

२. पुराणातली वांगी पुराणात
अर्थ : उपदेश नुसता ऐकावा, करताना हवे ते करावे ( शब्दरत्नाकर).

आता इथे भाजीतील ‘वांगी ’ कुठून आली हा अगदी स्वाभाविक प्रश्न. मी यासाठी शब्दरत्नाकर व बृहदकोश दोन्ही पाहिले असता त्यात ‘वांगी’ च स्पष्ट लिहिलेले आहे. मात्र ‘वांगी’ हा वानगीचा अपभ्रंश असल्याचे संदर्भ मिळतात. उदा :

यातला मूळ शब्द ‘वानगी’ म्हणजे नमुना हा असावा, ज्याचा नंतर ‘वांगी’ हा अपभ्रंश झाला, असे काही भाषातज्ज्ञांचे मत आहे”.
https://www.loksatta.com/vishesh-news/scientific-research-in-indian-myth...

३. उंसाच्या पोटीं काऊस जन्मला
= हिर्‍याच्या पोटीं गारगोटी. [सं. कु + इक्षु]
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B8

इथे कापूस या अपभ्रंशांने खरेच बुचकळ्यात पडायला होते. ऊस श्रेष्ठ असेल तर कापूस कनिष्ठ कसा?

४. परोक्ष
मूळ अर्थ :
एखाद्याच्या पाठीमागें, गैरहजेरींत; डोळ्या-आड; असमक्ष.
मात्र व्यवहारात त्याचा वापर बरोबर उलट अर्थाने ( समक्ष) केला जातो !
हा पाहा संदर्भ :

“अडाणी माणसें परोक्ष याचा समक्ष या अर्थीं उपयोग करतात व असमक्ष करितां अपरोक्ष योजतात”.
(https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%95%...)
. मेत(थ)कूट
याचा सर्वपरिचित अर्थ हा:

तांदूळ, निरनिराळ्या डाळी, मोहऱ्या, मेथ्या इ॰ एकत्र दळून केलेलें पीठ व त्यांत दहीं घालून तयार केलेलें एक रुचकर तोंडीलावणें.
यात मेथ्या असल्याने ते खरे मेथकूट आहे.

पण, ‘मेतकूट जमणे / होणे’ याचा उगम मात्र मित्र + कूट असा आहे.

मेळ; एकी; दृढ मैत्री. 'शिंदे, बाळोबा व भाऊ यांचें मेतकूट झालें होतें.' -अस्तंभा ९६. [सं. मिथः कूट; मित्र-प्रा. मित + कूट] (वाप्र)
दाते शब्दकोश
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%...

......
वानगीदाखल मी काही वर दिले आहे.
येउद्यात अजून असे काही. चर्चा रोचक असेल.
**************************************

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy
बदक का 'बद'नाम आहे ? काय केलं असं 'बद'फैली वर्तन म्हणून ही बदनामी वाट्याला आली.

बदक quack quack करते. वाजवीपेक्षा जास्त बडबड करणारा म्हणून बडक म्हणजेच बदक.!
हपा, अस्मिता Lol

बदली, बदला, तबादला ह्या शब्दांचे मूळ कदाचित बद नसावे.
बाद म्हणजे मराठी कटाप ( कट ऑफ) किंवा हिंदी ' नंतर '. ह्यांचे मूळ काय असावे?
प्यासा मधल्या ' जिन्हें नाज़ है हिंद पर वे कहां हैं ' ह्या अमर गीतामध्ये बदहवा सी असा एक शब्द आहे. ते आठवले

शिवाय quack म्हणजे भोंदू डॉक्टर. तोही वाईटच. म्हणून quack quack करणारं बदक वाईट. म्हणून 'बद' म्हणजे वाईट, अशीही एक व्युत्पत्ती सांगता येईल! Wink

वावे Lol
जिन्हें नाज़ है चे लिरिक्स पाहिले पण त्यात बदहवासी असा शब्द आढळला नाही. गाण्यात ऐकल्यासारखं वाटतंय. नंतर तपासून पाहीन. खरं तर मूळ कविता बहुधा साहिर च्या परछाईं मध्ये पूर्ण उर्दूमध्ये आहे आणि गाण्यापेक्षा मोठी आहे असे आठवते.
पण दुसरी एक ओळ मात्र पुन्हा स्पर्शून गेली. : " यह यशोदा की हम जीन सी राधा की बेटी"

बदक quack quack करते. वाजवीपेक्षा जास्त बडबड करणारा म्हणून बडक म्हणजेच बदक.!
>>>> ओ Happy

वावे Happy
नीम हकीम खतरे जान, बदक वैद्य गेले प्राण !

वावे, जबरीच!

अस्मिता आणि हीरा , Lol . हीरा यांचा विनोद मी पहिल्यांदाच वाचला. (माझे बरेच वाचायचे राहून गेले असल्यास क्षमस्व. नया है मैं.)

**बद आणि bad याचा पण संबंध आहे का?
>>>
होय तसे बृहदकोशात दिले आहे.
माझ्या मागील पानावरच्या प्रतिसादात मी लिहिले आहे

"वाईट; नीच (विशेषतः समासांत उपयोग). [सं. वध; फा. बद्; इं. बॅड]
....
बदच्या व्युत्पत्तीमध्ये फारसी व इंग्रजी अशा दोघांचा वाटा दिसतो आहे

बदसूरत वरून खूबसूरत आठवला आणि त्यावरून आमचं एक संभाषण आठवलं. एका इराणी मैत्रिणीबरोबर गप्पा मारत होतो. खूब आणि सूरत (फारसी - सूरत/सूरात) हे दोन्ही तिकडूनच जसेच्या तसे आलेले शब्द आहेत हे माहिती आहे, पण दोन्हीचा मिळून 'खूबसूरत' असा शब्द त्यांच्याकडे नाही म्हणे. हा समास (खूबा च असौ सूरत् यस्या: = खूबसूरत् Wink ) बहुतेक आपणच भारतात साधला असावा.

बहुत खूब ह्याचा अर्थ बहुधा खूप चांगले असा असावा. म्हणजे भला, बढिया वगैरे. आता मराठीत आपण खूप हा शब्द पुष्कळ ह्या अर्थाने वापरतो ते वेगळे.

रोचक चर्चा! Happy
'नेकी और बदी' (सुष्टपणा आणि दुष्टपणा) ही जोडगोळी आठवली.
मद्याला 'बादा' म्हणतात - त्याचा 'बद'शी काही संबंध असेल का असंही वाटलं. (तुझे हम वली समझते जो न बादाख्वा़र होता - गा़लिब)

स्वाती आंबोळे,
Lol
कुठल्यातरी धमाल हिंदी सिनेमात त्यातलं एक प्रमुख पात्र खपसूरत असा ख वर आघात देऊन उच्चार करतं. अंगूर, गोलमाल? देवेन वर्मा उत्पल दत्त?

<< खुप-सुरत.. पहिल्यांदाच वाचला. पण कानांना योग्य वाटत नाही. >>
याच्यावरून आठवले. थोडे अवांतर. माझा १ रूममेट होता, जो 'कफ सिरप' (cough syrup) ला 'कप सिरफ' म्हणायचा.

‘अपकर्षक’ हा शब्द एका राजकीय लेखात वाचला.
त्याचा अर्थ : हीनता आणणारा.

एखाद्या राजकीय व्यक्तीवर बारकाईने लक्ष ठेवून असणाऱ्या आणि टिपणी करणाऱ्या लोकांचे उतरंडीनुसार असे वर्गीकरण करता येईल :

भक्त, समर्थक, हितचिंतक, विरोधक, ‘अपकर्षक’ आणि द्वेष्टे.

कृष् या संस्कृत धातूचा अर्थ 'ओढणे' असा आहे. त्यापासून कृषी (नांगर ओढण्यावरून असावा), आकर्षक, संकर्षण वगैरे शब्द आलेले आहेत. अपकर्षक हा शब्द मला नवीन आहे. ओढण्याच्या विरुद्ध क्रिया, दूर लोटणे, अश्या अर्थाने ते हीन लेखणे, म्हणजे अपकर्षण असावे आणि ते करणारा तो अपकर्षक.

चुंबकांविषयीच्या मराठी वैज्ञानिक परिभाषेत attraction आणि repulsion साठी अनुक्रमे आकर्षण आणि अपकर्षण हे शब्द वापरले जातात.

चुंबकांविषयीच्या मराठी वैज्ञानिक परिभाषेत attraction आणि repulsion साठी अनुक्रमे आकर्षण आणि अपकर्षण हे शब्द वापरले जातात. >> +१ चुंबकच असं नाही, repulsion साठी अपकर्षण शब्द वापरतात. अपकर्षक असाही शब्द वाचलेला आहे विज्ञानाच्या पुस्तकात.

कृष् या संस्कृत धातूचा अर्थ 'ओढणे' असा आहे.

>>>> कृष्ण = काळा हा शब्दही याच धातूपासून बनतो का? 'प्रकाश (पूर्णपणे) ओढून घेणारा रंग' याअर्थी?

... repulsion साठी अपकर्षण...

यावरून आठवले,

आपल्या संसदेत "Attention calling motion" साठी 'ध्यानाकर्षण प्रस्ताव' वापरतात, अगदी अधिकृत संसदीय शब्द. Happy

चुंबकासाठी सजातीय ध्रुव प्रतिकर्षण व विजातीय ध्रुव आकर्षण हे शब्द शाळेत शिकलेत. अपकर्षण आठवत नाहीये.
(कृष् कर्ष धातु आठवला हर्पांमुळे)

कृष्ण म्हणजे ओढून घेणारा, आकर्षित करणारा, attractive असाही अर्थ लावतात. बाकी आहे तो श्याम सावळाच. तमाल नील.
मा यात पंथा: पथि भीमरथ्या: , दिगंबर: को s पि तमालनील:
विन्यस्त हस्तोsपि नितंबबिंबे चित्त: समाकर्षति पांथिकानाम्

Pages