भाषा : अपभ्रंश, बदल, मतांतरे इ.

Submitted by कुमार१ on 14 March, 2021 - 10:39

नुकताच मराठी म्हणींच्या धाग्यावर ‘उसापोटी कापूस जन्मला’ या म्हणीचा अर्थ विचारला गेला होता. त्यावर शोध घेताना मला रोचक माहिती मिळाली. वास्तविक सदर म्हणीत ‘कापूस’ शब्द नसून ‘काऊस’ हा शब्द आहे. त्याचा अर्थ ‘उसाच्या शेंड्याचा नीरस भाग किंवा कुचकामाचा माणूस’. ‘काऊस’ हा जरा विचित्र शब्द असल्याने याचा कापूस असा सोयीस्कर अपभ्रंश झाला असावा.

या निमित्ताने मनात एक कल्पना आली. वरील म्हणीप्रमाणेच आपल्या भाषेत अनेक शब्द, म्हणी अथवा वाक्प्रचार यांचे अपभ्रंश कालौघात रूढ होतात. त्याची अशी काही कारणे संभवतात :

१. एखादा मूळ शब्द उच्चारायला कठीण असतो
२. तो लोकांत खूप अपरिचित असतो, किंवा
३. भाषेच्या विविध बोली अथवा लहेजानुसार त्यात बदल संभवतात.

म्हणी आणि वाक्प्रचार हे कित्येक शतकांपासून भाषेत रूढ आहेत. तेव्हा त्यांचे विविध अपभ्रंश नक्की कधी झाले हे समजणे तसे कठीण असते. मात्र एकदा का ते रूढ झाले, की त्या पुढील पिढ्यांना तेच जणू मूळ असल्यासारखे भासतात. त्यातून बरेचदा संबंधित म्हणीचा अर्थबोध होत नाही. काहीसे बुचकळ्यात पडायला होते तर काही वेळेस काही शब्द हास्यास्पद भासतात. मग या अपभ्रंशांची नवनवीन स्पष्टीकरणे सामान्यांकडून दिली जातात आणि त्यातून काहीतरी नवेच रूढ होते. काही अपभ्रंशांच्याबाबत विविध शब्दकोश आणि भाषातज्ञात देखील मतांतरे अथवा मतभेद असतात. असे काही वाचनात आले की एखाद्या भाषाप्रेमीचे कुतूहल चाळवते. तो त्याचा अधिकाधिक शोध घेऊ लागतो. अशाच काही मजेदार बदल अथवा अपभ्रंशांची जंत्री करण्यासाठी हा धागा.

माझ्या माहितीतील काही उदाहरणांनी (संदर्भासह) सुरुवात करून देतो. नंतर इच्छुकांनी भर घालत राहावी.

१. आठराविश्वे दारिद्र्य
अर्थ : पूर्ण दारिद्र्य

आता १८ ‘विश्वे’ कोणती असा प्रश्न पडतो.
त्याची २ स्पष्टीकरणे मिळाली :

अ) वीस विश्वे (विस्वे) पैकीं अठराविश्वे म्हणजे जवळ जवळ पूर्ण दारिद्र्य. = १८/ २०
(https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF%...)

ब) 'अठरा विसा' याचा अर्थ १८ x २० = ३६० दिवस, असा होतो. ३६० दिवस म्हणजे एक वर्ष. वर्षाचे सर्व दिवस, सदासर्वकाळ दारिद्रय घरात वसतीला असणे, यालाच 'अठरा विश्वे दारिद्रय' म्हणतात (हणमंते, श्री०शा० १९८० : संख्या-संकेत कोश. प्रसाद प्रकाशन, पुणे)
http://maparishad.com/content/%E0%A4%85%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A...

आहे की नाही गम्मत ! गणितानुसारही चक्क २ वेगळे अर्थ झाले :
१८/२० आणि
१८ गुणिले २० !

२. पुराणातली वांगी पुराणात
अर्थ : उपदेश नुसता ऐकावा, करताना हवे ते करावे ( शब्दरत्नाकर).

आता इथे भाजीतील ‘वांगी ’ कुठून आली हा अगदी स्वाभाविक प्रश्न. मी यासाठी शब्दरत्नाकर व बृहदकोश दोन्ही पाहिले असता त्यात ‘वांगी’ च स्पष्ट लिहिलेले आहे. मात्र ‘वांगी’ हा वानगीचा अपभ्रंश असल्याचे संदर्भ मिळतात. उदा :

यातला मूळ शब्द ‘वानगी’ म्हणजे नमुना हा असावा, ज्याचा नंतर ‘वांगी’ हा अपभ्रंश झाला, असे काही भाषातज्ज्ञांचे मत आहे”.
https://www.loksatta.com/vishesh-news/scientific-research-in-indian-myth...

३. उंसाच्या पोटीं काऊस जन्मला
= हिर्‍याच्या पोटीं गारगोटी. [सं. कु + इक्षु]
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B8

इथे कापूस या अपभ्रंशांने खरेच बुचकळ्यात पडायला होते. ऊस श्रेष्ठ असेल तर कापूस कनिष्ठ कसा?

४. परोक्ष
मूळ अर्थ :
एखाद्याच्या पाठीमागें, गैरहजेरींत; डोळ्या-आड; असमक्ष.
मात्र व्यवहारात त्याचा वापर बरोबर उलट अर्थाने ( समक्ष) केला जातो !
हा पाहा संदर्भ :

“अडाणी माणसें परोक्ष याचा समक्ष या अर्थीं उपयोग करतात व असमक्ष करितां अपरोक्ष योजतात”.
(https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%95%...)
. मेत(थ)कूट
याचा सर्वपरिचित अर्थ हा:

तांदूळ, निरनिराळ्या डाळी, मोहऱ्या, मेथ्या इ॰ एकत्र दळून केलेलें पीठ व त्यांत दहीं घालून तयार केलेलें एक रुचकर तोंडीलावणें.
यात मेथ्या असल्याने ते खरे मेथकूट आहे.

पण, ‘मेतकूट जमणे / होणे’ याचा उगम मात्र मित्र + कूट असा आहे.

मेळ; एकी; दृढ मैत्री. 'शिंदे, बाळोबा व भाऊ यांचें मेतकूट झालें होतें.' -अस्तंभा ९६. [सं. मिथः कूट; मित्र-प्रा. मित + कूट] (वाप्र)
दाते शब्दकोश
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%...

......
वानगीदाखल मी काही वर दिले आहे.
येउद्यात अजून असे काही. चर्चा रोचक असेल.
**************************************

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

1 जानेवारी 2022 पासून सुरू असलेले भाषासूत्र हे दैनिक लोकसत्ता मधील सदर आज समाप्त झाले. दर आठवड्यात सोमवार ते शुक्रवार पाच विविध भाषा अभ्यासकांनी यामध्ये लेख लिहिले होते. ते खूप माहितीप्रद आणि रंजक देखील होते. त्यातून मराठी भाषेचे विविध पैलू समजायला चांगली मदत झाली.

आपल्या दैनंदिन बोलण्यात आणि लिहिण्यात अनेक चुका अनवधानाने होत असतात. त्याही लक्षात आल्या. मराठी बोलणारा माणूस हा मराठी ‘भाषक’ असतो, भाषिक नव्हे, हा मूलभूत शब्द मनात ठसवला गेला.

या सदरातून परकीय भाषांमधून मराठीत आलेले शब्द, मराठी म्हणी आणि वाक्प्रचार यासंबंधी मौलिक माहिती मिळाली. म्हण आणि वाक्प्रचार यात फरक काय, यावर आपण अनेकदा इथे चर्चा केलेली आहे. या आठवड्यातील भाषासूत्रमधील एका लेखात काही मान्यवरांनी केलेल्या म्हणीच्या व्याख्या इथे उद्धृत करतो:

· साहित्यसम्राट न. चिं. केळकर : ‘चिमुकले, चतुरपणाचे, चटकदार असे वचन म्हणजे म्हण’.

· कोशकार वि. वि. भिडे : ‘ज्यात काही अनुभव, उपदेश, माहिती, सार्वकालिक सत्य किंवा ज्ञान गोवलेले आहे, ज्यात काही चटकदारपणा आहे आणि संभाषणात वारंवार योजतात असे वचन म्हणजे म्हण.’

· डॉ. दुर्गा भागवत : ‘जनतेने आत्मसात केलेली उक्ती म्हणजे म्हण’

· वा. म. जोशी : ‘थोडक्यात व मधुर शब्दांत जिथे पुष्कळ बोधप्रद अर्थ गोवला जातो, त्या वाक्यांना म्हणी असे म्हणतात.’
(https://www.loksatta.com/navneet/bhashasutra-oral-of-tradition-cultural-...)

या चांगल्या वार्षिक उपक्रमाबद्दल लोकसत्ताचे अभिनंदन !!

सध्या हिवाळ्यात काही ठिकाणी पाऊस पडत असून धुकेही जमा होत आहे.
या ऋतूला हिवसाळा असे नाव बातम्यांमध्ये वाचण्यात आले !

छान.
याला संडामोड म्हणायला हरकत नसावी आता.

स्वच्छता आणि आरोग्यकारक संडास हा भारतीय प्रकार आहे. फक्त बूट चप्पलचे तळवे खाली टेकतात. संसर्ग होण्याची शक्यता ही वेस्टन कमोडमध्ये सार्वजनिक ठिकाणी वापरण्यात अधिक आहे. फक्त घरामध्ये आपल्या कुटुंबातील लोकांसाठी कमोड ठीक आहे.

हो. अर्थात कदाचित.
पण मूळ लेखनाला प्रतिसाद देताना उपरोधाकडे दुर्लक्ष्य करून अन्य वाचकांकडे अनुरोधाने पाहाता येतेच!
( थोडी ओढाताण झालीय अर्थाची, पण पुन्हा अनुरोध वाचकांना!)

धुरके हा शब्द अनेक वर्षांपासून प्रचलित आहे. मी शाळेत असताना विज्ञानाच्या पुस्तकात होता. Smog याच अर्थाने.

वखरणी म्हणजे शेतीतले नक्की कुठले काम ?

'वखरणी- कोळपणी'
असा जोडशब्द महानोर यांच्या लेखात वाचला.
कोळपणी माहित आहे.

वावे +१
संमोड Lol

वखरणी

वखर हे एक शेतीसाठी लागणारे एक प्रकारचे अवजार आहे. याचा उपयोग वखरणी करण्यासाठी करतात. वखरणी म्हणजे नांगरणी झालेल्या जमिनीवरची ढेकळे फोडून तिला सपाट करणे. हे करताना नको असलेले तण काढणे.

कदाचित, म्हणून जोडीनं नाव घेत असतील, किंवा वखराने दोन्ही गोष्टी करता येत असाव्यात ,फक्त कृती वेगवेगळी म्हणून शब्द वेगळे असेही असू शकते.

वखर-रा—पुन. १ शेतकीचें एक हत्यार. यानें शेतांतील तण, गवत मुळांसकट उपटून काढतात. २ जमीन सपाट करण्याचें औत; कुळव. -शे १०.१९९. चारबैली वखर. -शे ६.७५. [सं. विकृ-विकिर] वख(खा)रणें-उक्रि. १ वखरानें तण इ॰ काढून टाकून साफ करणें. २ नांगरल्यानंतर जमीन सारखी करणें.

इतर अवजारे....
https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80%E0%...

हे वाचूनही मला पूर्ण कळलयं असं वाटत नाही. Proud

इतर अवजारे.... >>
छान. वाचेन आता.
थोडक्यात,
जसे 'झाडलोट' करणे, तसेच वरील (एकाच अवजाराने करायची ) जोडकृती असावी.

निर्माता दिग्दर्शक फ्रॅंक काप्रा यांचे भाषेसंबंधी एक अवतरण वाचण्यात आले. ते सुंदर आहे:

तीन वैश्विक भाषा आहेत. त्यापैकी एक म्हणजे चित्रपट. अन्य दोन म्हणजे गणित आणि संगीत.

सुंदर! गणिताचा फारसा अनुभव नाही, पण संगीत ही नक्कीच वैश्विक भाषा आहे. परंतु त्यात वेगवेगळ्या बोली आहेत हे ही तितकंच खरं आहे. त्या जाणल्याशिवाय खरा अर्थबोध होईलच असं काही सांगता येत नाही. उदा. एखादं करुण रसातलं रॅप ऐकून आमचे वडील म्हणतील की काय धिंगाणा चाललाय! त्या उलट मी वाजवलेला शुद्ध सारंग ऐकून एक चिनी मुलगा म्हणाला होता की खूप खोल आणि करुण वाटतं आहे Lol (ह्यात चूक त्याचीच असेल असं नाही, मलाच नीट रियाजाची गरज असावी). हा तो ओळख असलेल्या बोलीतील फरक.

ह पा
प्रतिसाद आवडला आणि पटला.
गणिताचा फारसा अनुभव नाही
>>>
यावरून थोडे लिहितो.
मला छापील मराठी वृत्तपत्रातील शब्दकोडे सोडवायला विशेष आवडते. याउलट माझी पत्नी फक्त सुडोकू सोडवते. जेव्हा कधी आम्ही भारतातील परराज्यात जातो तेव्हा एक फरक स्पष्ट होतो. तिथे मला मराठी छापील कोडे सोडवायचे असेल तर मराठी वृत्तपत्र मिळत नाही. याउलट तिथल्या स्थानिक भाषेतील वृत्तपत्र जरी मिळाले आणि त्यात सुडोकू असेल तर माझ्या पत्नीचे काम होऊन जाते !

अंकांना भाषा नाही हा मुद्दा तेव्हा मला अगदी जाणवतो. Happy

अवतरण चांगलेच आहे.
वैश्विक भाषेवरून अवांतर:
मूक बधिरांची भाषा ही वैश्विक भाषा करायला हवी, जगभरात शाळेत शिकवायला हवी. मुकबधीर लोकांना सगळ्यांशी आणि इतरांना त्यांच्याशी सहज बोलता येईलच, पण जगभरातील लोक जगभरात कुठंही गेले तरी साधे संवाद साधण्यास अडचण येणार नाही.
जेव्हा आवाज न करण्याची अपेक्षा असते तिथेही याचा गरजे नुसार वापर करता येईल. म्हातारपाणी श्रवणशक्ती अगदी कमी झाली तरी एकमेकांशी संवाद सुरू राहील, टीव्हीवरील मूक बंधीरांसाठीच्या बातम्या बघता येतील.

मानव
अगदी विचार करण्याजोगा मुद्दा.

गेल्या काही वर्षांमध्ये आंतरजालीय संवादात विविध भावमुद्रा असलेल्या चित्रांचा वापर खूप वाढला. त्याचबरोबर शब्दांचा वापर तुलनेने कमी झाला.

त्यावरून, 'मनुष्य आता अक्षर भाषेकडून पुन्हा चित्रभाषेकडे, म्हणजे उलट्या दिशेने जाणार का ?' या आशयाचा एक लेख वाचला होता.

<< मूक बधिरांची भाषा ही वैश्विक भाषा करायला हवी, जगभरात शाळेत शिकवायला हवी. मुकबधीर लोकांना सगळ्यांशी आणि इतरांना त्यांच्याशी सहज बोलता येईलच, पण जगभरातील लोक जगभरात कुठंही गेले तरी साधे संवाद साधण्यास अडचण येणार नाही. >>
मुळात "मूक बधिरांची भाषा" ही कुठल्यातरी बेस लँग्वेजवर आधारित असते. उदा. अमेरिकन साईन लँग्वेज ही इंग्रजीवर आधारित आहे. जगात साधारण १५०-२०० विविध साईन लँग्वेज आहेत.

<< आंतरजालीय संवादात विविध भावमुद्रा असलेल्या चित्रांचा वापर खूप वाढला.
'मनुष्य आता अक्षर भाषेकडून पुन्हा चित्रभाषेकडे, म्हणजे उलट्या दिशेने जाणार का ?' >>
आंतरजालामुळे सगळे जग जवळ आले आहे आणि
भाषा हा संवाद साधण्याचा मार्ग आहे. त्यामुळे भाषेची अस्मिता वगैरे भंपकपणा बाजूला ठेऊन एकमेकांशी सहज संवाद साधता येणे गरजेचे झाले आहे. त्यातूनच ईमोजी सारखी चित्रे हा प्रकार सुरू झाला आहे. संवाद साधता यावा म्हणून भाषा ओघवती असावी लागते, त्यामुळे हे नैसर्गिक आहे. पुढील ५००-१००० वर्षात अनेक भाषा मृत होतील आणि जेमतेम १००-२०० भाषाच शिल्लक राहतील, हे पण नैसर्गिक आहे.

त्यावरून, 'मनुष्य आता अक्षर भाषेकडून पुन्हा चित्रभाषेकडे, म्हणजे उलट्या दिशेने जाणार का ?
>>>>मीम्स ना, धमाल असतात ते. कल्पकतेची नवी अभिव्यक्ती आहे. उलट्या दिशेने नाही जाणार , माणसाला व्यक्त व्हायची सगळीचं माध्यमे हवी असतात. नवीन आली म्हणजे जुनी जाणार असं काही वाटत नाही. Happy

मानवदादा, कल्पना फार आवडली आहे.
हर्पा व कुमार सरांचे प्रतिसादही छान.
इथे ह्युस्टनमधे एक 'महाराजा भोग' नावाचे भारतीय रेस्टॉरन्ट आहे. तिथे पदार्थांना अप्रतिम चव असते. आम्ही गेलो असताना , शेजारच्या टेबलवरील अमेरिकन गृहस्थाने हळूहळू गप्पा सुरू केल्या. त्या आधी खाण्यावरून मगं संगीताकडे वळल्या व पंडीत रवी शंकरांवर तो खूप आपुलकीने बोलला. संगीताबाबत खरचं अनुमोदन.'अन्नचिंतन' हीसुद्धा एक वैश्विक भाषा असायला हवी, त्यावरून कोणीही कुणाशीही गप्पा मारू शकते, कनेक्ट होऊ शकते.

पण कुठल्या भाषेत बोलला? इंग्रजीतच ना? संवाद साधण्यासाठी इंटरप्रीटेशन (अनुवाद) गरजेचे आहे. त्या दृष्टीने गणिताची भाषा एक वेळ योग्य आहे, पण चित्रपट, संगीत, अन्नपदार्थ या संवादासाठी भाषा होऊ शकत नाहीत.

Pages