भाषा : अपभ्रंश, बदल, मतांतरे इ.

Submitted by कुमार१ on 14 March, 2021 - 10:39

नुकताच मराठी म्हणींच्या धाग्यावर ‘उसापोटी कापूस जन्मला’ या म्हणीचा अर्थ विचारला गेला होता. त्यावर शोध घेताना मला रोचक माहिती मिळाली. वास्तविक सदर म्हणीत ‘कापूस’ शब्द नसून ‘काऊस’ हा शब्द आहे. त्याचा अर्थ ‘उसाच्या शेंड्याचा नीरस भाग किंवा कुचकामाचा माणूस’. ‘काऊस’ हा जरा विचित्र शब्द असल्याने याचा कापूस असा सोयीस्कर अपभ्रंश झाला असावा.

या निमित्ताने मनात एक कल्पना आली. वरील म्हणीप्रमाणेच आपल्या भाषेत अनेक शब्द, म्हणी अथवा वाक्प्रचार यांचे अपभ्रंश कालौघात रूढ होतात. त्याची अशी काही कारणे संभवतात :

१. एखादा मूळ शब्द उच्चारायला कठीण असतो
२. तो लोकांत खूप अपरिचित असतो, किंवा
३. भाषेच्या विविध बोली अथवा लहेजानुसार त्यात बदल संभवतात.

म्हणी आणि वाक्प्रचार हे कित्येक शतकांपासून भाषेत रूढ आहेत. तेव्हा त्यांचे विविध अपभ्रंश नक्की कधी झाले हे समजणे तसे कठीण असते. मात्र एकदा का ते रूढ झाले, की त्या पुढील पिढ्यांना तेच जणू मूळ असल्यासारखे भासतात. त्यातून बरेचदा संबंधित म्हणीचा अर्थबोध होत नाही. काहीसे बुचकळ्यात पडायला होते तर काही वेळेस काही शब्द हास्यास्पद भासतात. मग या अपभ्रंशांची नवनवीन स्पष्टीकरणे सामान्यांकडून दिली जातात आणि त्यातून काहीतरी नवेच रूढ होते. काही अपभ्रंशांच्याबाबत विविध शब्दकोश आणि भाषातज्ञात देखील मतांतरे अथवा मतभेद असतात. असे काही वाचनात आले की एखाद्या भाषाप्रेमीचे कुतूहल चाळवते. तो त्याचा अधिकाधिक शोध घेऊ लागतो. अशाच काही मजेदार बदल अथवा अपभ्रंशांची जंत्री करण्यासाठी हा धागा.

माझ्या माहितीतील काही उदाहरणांनी (संदर्भासह) सुरुवात करून देतो. नंतर इच्छुकांनी भर घालत राहावी.

१. आठराविश्वे दारिद्र्य
अर्थ : पूर्ण दारिद्र्य

आता १८ ‘विश्वे’ कोणती असा प्रश्न पडतो.
त्याची २ स्पष्टीकरणे मिळाली :

अ) वीस विश्वे (विस्वे) पैकीं अठराविश्वे म्हणजे जवळ जवळ पूर्ण दारिद्र्य. = १८/ २०
(https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF%...)

ब) 'अठरा विसा' याचा अर्थ १८ x २० = ३६० दिवस, असा होतो. ३६० दिवस म्हणजे एक वर्ष. वर्षाचे सर्व दिवस, सदासर्वकाळ दारिद्रय घरात वसतीला असणे, यालाच 'अठरा विश्वे दारिद्रय' म्हणतात (हणमंते, श्री०शा० १९८० : संख्या-संकेत कोश. प्रसाद प्रकाशन, पुणे)
http://maparishad.com/content/%E0%A4%85%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A...

आहे की नाही गम्मत ! गणितानुसारही चक्क २ वेगळे अर्थ झाले :
१८/२० आणि
१८ गुणिले २० !

२. पुराणातली वांगी पुराणात
अर्थ : उपदेश नुसता ऐकावा, करताना हवे ते करावे ( शब्दरत्नाकर).

आता इथे भाजीतील ‘वांगी ’ कुठून आली हा अगदी स्वाभाविक प्रश्न. मी यासाठी शब्दरत्नाकर व बृहदकोश दोन्ही पाहिले असता त्यात ‘वांगी’ च स्पष्ट लिहिलेले आहे. मात्र ‘वांगी’ हा वानगीचा अपभ्रंश असल्याचे संदर्भ मिळतात. उदा :

यातला मूळ शब्द ‘वानगी’ म्हणजे नमुना हा असावा, ज्याचा नंतर ‘वांगी’ हा अपभ्रंश झाला, असे काही भाषातज्ज्ञांचे मत आहे”.
https://www.loksatta.com/vishesh-news/scientific-research-in-indian-myth...

३. उंसाच्या पोटीं काऊस जन्मला
= हिर्‍याच्या पोटीं गारगोटी. [सं. कु + इक्षु]
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B8

इथे कापूस या अपभ्रंशांने खरेच बुचकळ्यात पडायला होते. ऊस श्रेष्ठ असेल तर कापूस कनिष्ठ कसा?

४. परोक्ष
मूळ अर्थ :
एखाद्याच्या पाठीमागें, गैरहजेरींत; डोळ्या-आड; असमक्ष.
मात्र व्यवहारात त्याचा वापर बरोबर उलट अर्थाने ( समक्ष) केला जातो !
हा पाहा संदर्भ :

“अडाणी माणसें परोक्ष याचा समक्ष या अर्थीं उपयोग करतात व असमक्ष करितां अपरोक्ष योजतात”.
(https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%95%...)
. मेत(थ)कूट
याचा सर्वपरिचित अर्थ हा:

तांदूळ, निरनिराळ्या डाळी, मोहऱ्या, मेथ्या इ॰ एकत्र दळून केलेलें पीठ व त्यांत दहीं घालून तयार केलेलें एक रुचकर तोंडीलावणें.
यात मेथ्या असल्याने ते खरे मेथकूट आहे.

पण, ‘मेतकूट जमणे / होणे’ याचा उगम मात्र मित्र + कूट असा आहे.

मेळ; एकी; दृढ मैत्री. 'शिंदे, बाळोबा व भाऊ यांचें मेतकूट झालें होतें.' -अस्तंभा ९६. [सं. मिथः कूट; मित्र-प्रा. मित + कूट] (वाप्र)
दाते शब्दकोश
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%...

......
वानगीदाखल मी काही वर दिले आहे.
येउद्यात अजून असे काही. चर्चा रोचक असेल.
**************************************

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे पहा, महाराष्ट्रातील एका नामवंत आणि दर्जेदार प्रकाशनाच्या पुस्तकाच्या पहिल्या पानाच्या मागे दिलेली माहिती :

मुखपृष्ठ : वसंत सरवटे

मलपृष्ठ छायाचित्र : धनेश पोतदार

संबंधित छायाचित्र खरोखरीच पुस्तकाच्या पाठीमागच्या कव्हरवर आहे

पण आता छायाचित्राऐवजी प्रकाशचित्र हा शब्द योग्य समजला जातो. तसं काही असेल मलपृष्ठाचं.

>>> मल** म्हणजे मागचे
हो, मलाही असंच माहीत आहे. पृष्ठच काय, 'तळहात/मळहात' म्हणतो की आपण.

अवांतर :
पण 'मळपाय' नाही म्हणत. तळपायच मळतात म्हणून की काय! Proud

मलपृष्ठ malapṛṣṭha n (S मल Dirt, पृष्ठ Page.) The outer or first page of a book left unwritten because exposed to be dirtied, the fly-leaf.
मोल्सवर्थ शब्दकोश

थोडक्यात ते सर्व पानाबद्दलच बोलत आहेत.
पुस्तकाच्या मागच्या जाड वेस्टणाच्या बाजूबद्दल शब्द नाही !
The outer = ??

एक मार्मिक शब्द : ‘संतापकीय’

“बेडेकरांनी आपल्या या नियतकालिकाच्या माध्यमातून समाजाविषयी, शासनाविषयी ‘संताप’ व्यक्त करण्यात खंड पडू दिला नाही. या अंकात ते ‘संतापकीय’ या नावानं ‘संपादकीय’ लिहीत”.

https://www.aksharnama.com/client/article_detail/6623

न्यायाधीशांसाठी शब्दकोश
कायदेशीर बाबींमध्ये लिंगवाचक आणि चुकीचे शब्दप्रयोग टाळण्यासाठी न्यायाधीशांना मार्गदर्शन करणारा शब्दकोश भविष्यात प्रसिद्ध होणार आहे.
सध्या त्याचे काम कोलकाता उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश मौसमी भट्टाचार्य यांच्या नेतृत्वाखाली चालू आहे.

( बातमी : छापील सकाळ, 18 मार्च 2023)

पण ह्या शब्दाचा वापर आणि अर्थ किंचित बदलला आहे.
पूर्वी उदा. देशमुखांच्या घरी अगदी कडक मराठमोळा आहे. म्हणजे घरंदाज सरंजामी वातावरण. अहो जाहो, डोक्यावरून पदर, अक्काराजे बाई साहेब, वहिनीबाईसाहेब, आऊसाहेब वगैरे.
म्हणजे मोळा हा कडक सोवळे ह्या आचारासारखा पाळावयाचा एक वेगळा आचार.

+१
************************************************************************************
चौकस हा अगदी परिचित शब्द.
तो संस्कृत ‘चतुःकष’ वरून आला आहे.

त्या शब्दात असलेले चार ‘कस’ कोणते हा कुतूहलजनक प्रश्न आहे.
त्याचे उत्तर एका संस्कृत श्लोकातून मिळाले.
ते चार कस असे आहेत:

१. हे काय आहे?
२. हे झाले कसे?
३. हे कुणी केले असावे?
आणि
४. याची साधनसामग्री कोणती ?

ह्या चार प्रश्नांची उत्तरे शोधू पाहणारा तो चौकस !

तो श्लोक :

किमिदं कथमिदं जातं को वा कर्तास्य विद्यते
उपादानं किमस्तीति विचारः सोयमीदृशः

..
ठळक केलेले चार शब्द म्हणजे ते ४ कस.

राष्ट्रीय हा शब्द रूढ आहे.
त्याप्रमाणे नुसता "राज्यीय" का नाही रूढ होऊ शकला?

राज्यासंबंधी बोलताना आपल्याला राज्यस्तरीय किंवा राज्य पातळीवर असे लांबण लावावे लागते.

हा अंदाज आहे.
इंग्रजीत Nation -natioanl त्यावरून राष्ट्र - राष्ट्रीय.
province -provincial आहे. त्यावरून आपल्याकडे प्रांत - प्रांतीय, विभाग - विभागीय असे शब्द आले असावेत.
पण state - > वरून काही विशेषण बनलेलं नाही. state हाच शब्द विशेषण म्हणूनही वापरला जातो.

धन्यवाद !
समजले
....
पण
"आंतरराज्यीय संबंध" असा वाक्यप्रयोग वाचनात येतो

5W1H>>>??
तिथे "हे पान सापडत नाही" असा संदेश येतो

मध्यंतरी सापांविषयी एक लेख वाचला. त्यात कामेरू हा शब्द होता. तो शब्दकोशात मिळाला नाही म्हणून एका माहीतगारांशी संपर्क साधला. त्यांच्याकडून कळलेली माहिती लिहितो:

कामेरू/ कांबेरू = साप सावरायची विशिष्ट आकाराची काठी.

तिला पुढे अणुकुचीदार धातूचं पातं लावलेले असते. या काठीच्या मदतीने सर्पमित्र सापाला पोत्यात ढकलतात.
याच काठीला काही भागात खोचेरा असे म्हणतात.

Pages