भाषा : अपभ्रंश, बदल, मतांतरे इ.

Submitted by कुमार१ on 14 March, 2021 - 10:39

नुकताच मराठी म्हणींच्या धाग्यावर ‘उसापोटी कापूस जन्मला’ या म्हणीचा अर्थ विचारला गेला होता. त्यावर शोध घेताना मला रोचक माहिती मिळाली. वास्तविक सदर म्हणीत ‘कापूस’ शब्द नसून ‘काऊस’ हा शब्द आहे. त्याचा अर्थ ‘उसाच्या शेंड्याचा नीरस भाग किंवा कुचकामाचा माणूस’. ‘काऊस’ हा जरा विचित्र शब्द असल्याने याचा कापूस असा सोयीस्कर अपभ्रंश झाला असावा.

या निमित्ताने मनात एक कल्पना आली. वरील म्हणीप्रमाणेच आपल्या भाषेत अनेक शब्द, म्हणी अथवा वाक्प्रचार यांचे अपभ्रंश कालौघात रूढ होतात. त्याची अशी काही कारणे संभवतात :

१. एखादा मूळ शब्द उच्चारायला कठीण असतो
२. तो लोकांत खूप अपरिचित असतो, किंवा
३. भाषेच्या विविध बोली अथवा लहेजानुसार त्यात बदल संभवतात.

म्हणी आणि वाक्प्रचार हे कित्येक शतकांपासून भाषेत रूढ आहेत. तेव्हा त्यांचे विविध अपभ्रंश नक्की कधी झाले हे समजणे तसे कठीण असते. मात्र एकदा का ते रूढ झाले, की त्या पुढील पिढ्यांना तेच जणू मूळ असल्यासारखे भासतात. त्यातून बरेचदा संबंधित म्हणीचा अर्थबोध होत नाही. काहीसे बुचकळ्यात पडायला होते तर काही वेळेस काही शब्द हास्यास्पद भासतात. मग या अपभ्रंशांची नवनवीन स्पष्टीकरणे सामान्यांकडून दिली जातात आणि त्यातून काहीतरी नवेच रूढ होते. काही अपभ्रंशांच्याबाबत विविध शब्दकोश आणि भाषातज्ञात देखील मतांतरे अथवा मतभेद असतात. असे काही वाचनात आले की एखाद्या भाषाप्रेमीचे कुतूहल चाळवते. तो त्याचा अधिकाधिक शोध घेऊ लागतो. अशाच काही मजेदार बदल अथवा अपभ्रंशांची जंत्री करण्यासाठी हा धागा.

माझ्या माहितीतील काही उदाहरणांनी (संदर्भासह) सुरुवात करून देतो. नंतर इच्छुकांनी भर घालत राहावी.

१. आठराविश्वे दारिद्र्य
अर्थ : पूर्ण दारिद्र्य

आता १८ ‘विश्वे’ कोणती असा प्रश्न पडतो.
त्याची २ स्पष्टीकरणे मिळाली :

अ) वीस विश्वे (विस्वे) पैकीं अठराविश्वे म्हणजे जवळ जवळ पूर्ण दारिद्र्य. = १८/ २०
(https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF%...)

ब) 'अठरा विसा' याचा अर्थ १८ x २० = ३६० दिवस, असा होतो. ३६० दिवस म्हणजे एक वर्ष. वर्षाचे सर्व दिवस, सदासर्वकाळ दारिद्रय घरात वसतीला असणे, यालाच 'अठरा विश्वे दारिद्रय' म्हणतात (हणमंते, श्री०शा० १९८० : संख्या-संकेत कोश. प्रसाद प्रकाशन, पुणे)
http://maparishad.com/content/%E0%A4%85%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A...

आहे की नाही गम्मत ! गणितानुसारही चक्क २ वेगळे अर्थ झाले :
१८/२० आणि
१८ गुणिले २० !

२. पुराणातली वांगी पुराणात
अर्थ : उपदेश नुसता ऐकावा, करताना हवे ते करावे ( शब्दरत्नाकर).

आता इथे भाजीतील ‘वांगी ’ कुठून आली हा अगदी स्वाभाविक प्रश्न. मी यासाठी शब्दरत्नाकर व बृहदकोश दोन्ही पाहिले असता त्यात ‘वांगी’ च स्पष्ट लिहिलेले आहे. मात्र ‘वांगी’ हा वानगीचा अपभ्रंश असल्याचे संदर्भ मिळतात. उदा :

यातला मूळ शब्द ‘वानगी’ म्हणजे नमुना हा असावा, ज्याचा नंतर ‘वांगी’ हा अपभ्रंश झाला, असे काही भाषातज्ज्ञांचे मत आहे”.
https://www.loksatta.com/vishesh-news/scientific-research-in-indian-myth...

३. उंसाच्या पोटीं काऊस जन्मला
= हिर्‍याच्या पोटीं गारगोटी. [सं. कु + इक्षु]
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B8

इथे कापूस या अपभ्रंशांने खरेच बुचकळ्यात पडायला होते. ऊस श्रेष्ठ असेल तर कापूस कनिष्ठ कसा?

४. परोक्ष
मूळ अर्थ :
एखाद्याच्या पाठीमागें, गैरहजेरींत; डोळ्या-आड; असमक्ष.
मात्र व्यवहारात त्याचा वापर बरोबर उलट अर्थाने ( समक्ष) केला जातो !
हा पाहा संदर्भ :

“अडाणी माणसें परोक्ष याचा समक्ष या अर्थीं उपयोग करतात व असमक्ष करितां अपरोक्ष योजतात”.
(https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%95%...)
. मेत(थ)कूट
याचा सर्वपरिचित अर्थ हा:

तांदूळ, निरनिराळ्या डाळी, मोहऱ्या, मेथ्या इ॰ एकत्र दळून केलेलें पीठ व त्यांत दहीं घालून तयार केलेलें एक रुचकर तोंडीलावणें.
यात मेथ्या असल्याने ते खरे मेथकूट आहे.

पण, ‘मेतकूट जमणे / होणे’ याचा उगम मात्र मित्र + कूट असा आहे.

मेळ; एकी; दृढ मैत्री. 'शिंदे, बाळोबा व भाऊ यांचें मेतकूट झालें होतें.' -अस्तंभा ९६. [सं. मिथः कूट; मित्र-प्रा. मित + कूट] (वाप्र)
दाते शब्दकोश
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%...

......
वानगीदाखल मी काही वर दिले आहे.
येउद्यात अजून असे काही. चर्चा रोचक असेल.
**************************************

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्या शाळेतील सरांनी 'वड्याचे तेल वांग्यावर' चा अर्थ सांगितला होता. वढ्याची (ओढ्याची) तेढ वांग्यावर अशी मूळ म्हण होती. कारण वांगी ओढ्याजवळ लावत. मग त्याचा अपभ्रंश झाला.

मस्त उदाहरणं. काऊस हा उसाच्या विरुद्धार्थी शब्द वाटतो. सुपुत्र - कुपुत्र सारखा.

सटीसामाशी म्हणजे काय असावं. सामाशी = सहा माशी = सहा महिन्यांत. पण सटी म्हणजे काय ? साठी = ६० ?

मनस्विता, मामी
धन्यवाद

' वढ्याची ' व 'सटी' >>> जरा संदर्भ शोधून बघतो.
रोचक आहे.

सटी षन्मासी > सहा महिन्याने येणाऱ्या षष्ठी ला म्हणजे फार अंतराने होणारी घटना
वड्याचे तेल वांग्यावर > वडे तळायला जास्त तेल लागते पण म्हणताना वांग्याने तेल खाल्ले म्हणायचं. म्हणजे एकाच राग दुसऱ्यावर.

भाषेची उत्पत्ती कशी झाली,माणूस बोलायला कधी लागला.ह्याची जोपर्यंत माहिती मिळत नाही तो पर्यंत हे सर्व शब्द खेळ आहेत.

हा एक अपभ्रंश पाहा :

घोड्यानें पेंड (पेण) खाणें

वास्तविक पेण =प्रवासांतील टप्पा

प्रत्यक्षात ,
'पेंड’ हा शब्‍द ‘पेण’ याबद्दल चुकीचा वापरतात व खाण्याची पेंड असा असा खुलासा करतात.

घोड्याने पेंड खाल्‍ली म्‍हणजे तो सुस्‍त होतो व पुढे जात नाही. पण ही व्युत्पत्ती चुकीची आहे. दूरच्या प्रवासात विश्रांतीचे निरनिराळे टप्पे (पेणे) ठेवलेले असतात. तेव्हां सरावाचे टप्पे आले की घोडे तेथे अडतात, म्‍हणजे घोडे तेथे पेण खातात.
https://www.transliteral.org/dictionary/%E0%A4%98%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A...

कानामागून आली आणि तिखट झाली असा मूळ शब्दप्रयोग मिरचीसाठी आणि त्या अर्थी मागाहून येऊन महत्व मिळालेल्या व्यक्तीसाठी आपण वापरतो
पण तो पानामागून आली आणि तिखट झाली असा असावा असं कुठेतरी वाचलंय

भारतात आधी तिखटपणासाठी मिरे , लवंग वापरायची पद्धत होती. मिरची पोर्तुगीजांनी(?) आणली आणि ती लोकप्रिय होऊन बसली. असे काही तरी माबोवरच वाचले होते.
चिनुक्स योग्य ते सांगू शकतील.

वरील सर्वांचे स्वागत आणि आभार !

ऋतुराज,

‘कानामागून आली नी तिखट झाली’

हेच बरोबर आहे.
पाहा :
शिंगे ही मागाहून फुटतात
कान हे उपजत असतात पण मागाहून येणारी शिंगे कानापेक्षां तीक्ष्ण टोकदार असून टोचतात. यावरून मागाहून येणार्‍या पण वरचढपणानें वागणार्‍या व्यक्तीला म्‍हणतात.

३. चुकीचा पाठभेद-पानामागून आली, तिखट झाली (मिरची).

https://www.transliteral.org/dictionary/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A...

योग्य/ अयोग्य उच्चाराबद्दल प्रश्न विचारला तर >>> विचारा की !
..........
सूचना :

ज्यांना अपभ्रंश इ. बद्दल ‘ऐकीव’ माहिती असेल त्यांनी खालील संस्थळावरून तिची खातरजमा करून घ्यावी.
१. https://bruhadkosh.org/

२. https://www.transliteral.org/dictionary

नंतर चुकीचे/ ऐकलेले व बरोबर अशी एकत्र माहिती लिहावी.
धन्यवाद व स्वागत !

छान धागा!
पेण चे नाव पेण पडण्यामागे कोकणातून देशावर येताना ती मुक्कामाची मोठी जागा होती म्हणून
माझ्याकडून एक - ताकास तूर न लागु देणे (थांगपत्ता न लागू देणे)
यात मूळ शब्द ताकास नसून तागास आहे पण तेवढ्या बदलाने सर्व अर्थ बदलतो. हा शेतकऱ्यांचा वाक्प्रचार आहे. तागाचे रोप आणि तुरीचे लहान असताना सारखे दिसतात. तागाच्या झाडात फार उष्णता असते म्हणतात का दुसरे काही कारण आहे पण त्यामुळे तण मारायला पूर्वी आधी ताग पेरायचे. लागला फुलोरा आल्यावर तो कोवळा जमिनीत गाडत असत. नंतर तो काही काळाने कुजल्यावर इतर धान्य पेरत असत आणि ते धान्य चांगले येई त्यामुळे. पण तूर आणि ताग हे एकत्र पेरल्यास तूर मरून जाईल म्हणून तागास तूर लागू न देणे असा वाक्प्रचार आहे मूळ.
अजूनही आहेत, जसे आठवेल तसे टायपेल

भारीच +११

माझ्याकडून हे एक.
उचलबांगडी हा उचलपांगडीचा अपभ्रंश आहे.

उचल + पांग-डी = कोळ्याचें जाळें (हे मोठे असल्यास दोघे, चौघे उचलतात.)
हा संदर्भ आहे-
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%89%E0%A4%9A%E0%A4%B2%E0%A4%AC%...

"अडला हरी गाढवाचे पाय धरी" हे मूळ "अडला हरी गरुडाचे पाय धरी" असे असायला हवे होते. गरुडाचे गाढव कधी झाले त्याची खबर नाही मात्र गरुडाची कथा पंचतंत्रात अशी आहे -
एकदा टिटवीची अंडी समुद्राने वाहून नेली. यामुळे टिटवी शोक करत असलेली पाहून टिटवा रागाने म्हणाला या समुद्राला आता उपसून टाकतो. टिटवी म्हणाली, " धनी जादा हवा नका करू, हे आपल्या आवाक्याबाहेरचे काम आहे तरी तुम्ही आपल्या पक्षांचा राजा गरुडाकडे जावा दाद मागायला." टिटवा गरुडाकडे गेला आणि आपले गाऱ्हाणे मांडले. " महाराज , तुम्ही आमचे राजे आणि भगवान विष्णुची तुमच्यावर विशेष मर्जी. विष्णू समुद्रात शयन करतात आणि त्याच समुद्राने आमची ....... तरी आता तुम्हीच आम्हाला न्याय द्या. " गरुड म्हणाला, "असे आहे होय, त्या समुद्राकडे बगतोच आता. तुम्ही नका टेन्शन घेऊ. जा आता घरी.''
इकडे विष्णूला इंद्राकडे जायचे होते आणि गरुड त्याचा ड्रायव्हर आणि गाडी दोन्ही असल्याने त्याने गरुडाला निरोप धाडला. पण गरुड बसला होता फुगून आणि तो काय येईना. शेवटी विष्णूला हातापायापडून त्याची बरीच मनधरणी करावी लागली आणि समुद्राला सांगून टिटवीची अंडी तिला परत मिळवून दिली तेव्हा कुठे गरुड यायला तयार झाला.

जिद्दु ,
रोचक.
पण इथे एक वेगळी कहाणी दिलीय :

"नारद मुनी महाराजांनी ओळखलं येथे कोठेतरी पाणी मुरतंय. म्हणून गर्दभ राजाला हात जोडले. मी तुमच्या पाया पडतो. वरुणराजा कुठे आहेत एवढं मला सांगा. गर्दभ राजाने कानावर हात ठेवून म्हणाले, 'ऐवढं विचारु नका'. मी तुमचे पाय धरतो, मी कोणाला सांगणार नाही. वरुण राजा एका डोंगराच्या पायथ्याशी गुहेमध्ये तपश्चर्येला बसले होते. सर्व श्रेष्ठ राजाचा अधिकार मान्य केल्यावर वरुण राजाने पाऊस बरसण्यास सुरुवात केली. सर्व पृथ्वीवर आनंदीआनंद झाला. नद्या नाले पाण्याने भरुन वाहू लागले. वरुण राजाचं वाहन गर्दभ असल्यामुळे राजा प्रसन्न झाला. म्हणूनच अडला नारायण गाढवाचे पाय धरी ही म्हण रुढ झाली."
https://maharashtratimes.com/others/like-share-readers-own-page/sang-na-...

हो ते खरे आहे. मराठी भाषेवरच्या काही जुन्या पुस्तकांत बऱ्याच वाक्प्रचार आणि म्हणींच्या संदर्भांविषयी वाचलेले आठवते आहे. रात्री शोधून सापडले तर टाकतो इथे.

अडला हरी>> दोन्ही कथा भारीच !
मी एक विचारतो.
आटपाट नगर मधल्या ‘आटपाट’ शब्दात आठ पाट म्हणजे नक्की काय ? बसायचे पाट की कालवे वगैरे ?

मुंबईतील प्रसिद्ध 'भेंडीबाजार' ह्या जागेचं नाव 'बिहाइंड दि बझार'चा अपभ्रंश आहे असं ऐकण्यात आलं. भेंडी ह्या भाजीचा त्या जागेशी काही संबंध नाही.

हो, मीपण 'अर्धी मुंबई' पुस्तकात वाचलं हे भेंडीबाजाराबद्दल. तिथे आजूबाजूला बरेच बाजार होते पूर्वी.

भेंडी मस्तच !
....
आटपाट नगर मधल्या ‘आटपाट’ शब्दात आठ पाट म्हणजे नक्की काय ? >>>

आटपाट हा शब्द मूळ संस्कृत अष्टप्रकोष्ठम वरून आलेला आहे. त्याची फोड अशी आहे :
अट्ट म्हणजे वाडा आणि
पट्ट म्हणजे चौक.
>>>> आठ चौकांचा वाडा / आठ पेठा असलेले मोठे शहर.
( शब्दरत्नाकर ).

‘भेंडीबाजार’वरून ब्रिटिशकालीन किस्से आठवले. तेव्हा भारतात अधिकारपदावर असणारे इंग्रज अधिकारी आपल्या हाताखालच्या भारतीय शिपायांना दरवाजा बंद करणे व उघडणे अशी कामे सांगत. आता शिपायांना तर साहेबांचे इंग्रजी कळणे अवघडच आणि साहेबाला इंग्लिश सोडून दुसरी कुठली भाषा येणार ?

मग आपल्यातल्या काही डोकेबाज लोकांनी साहेबांना ती दोन वाक्य हिंदीतून कशी बोलायची ते शिकवले.

जेव्हा “दरवाजा बंद कर”, असे सांगायचे असेल तेव्हा ‘There was a banker’

आणि “दरवाजा खोल दे” यासाठी ‘There was a cold day’ असे म्हणायचे.

साहेबाने इंग्लिश वाक्य भरकन म्हंटली त्याचा अपेक्षित ध्वनी हिंदीतून येतो !
करून पाहा ! Bw

Pages