भाषा : अपभ्रंश, बदल, मतांतरे इ.

Submitted by कुमार१ on 14 March, 2021 - 10:39

नुकताच मराठी म्हणींच्या धाग्यावर ‘उसापोटी कापूस जन्मला’ या म्हणीचा अर्थ विचारला गेला होता. त्यावर शोध घेताना मला रोचक माहिती मिळाली. वास्तविक सदर म्हणीत ‘कापूस’ शब्द नसून ‘काऊस’ हा शब्द आहे. त्याचा अर्थ ‘उसाच्या शेंड्याचा नीरस भाग किंवा कुचकामाचा माणूस’. ‘काऊस’ हा जरा विचित्र शब्द असल्याने याचा कापूस असा सोयीस्कर अपभ्रंश झाला असावा.

या निमित्ताने मनात एक कल्पना आली. वरील म्हणीप्रमाणेच आपल्या भाषेत अनेक शब्द, म्हणी अथवा वाक्प्रचार यांचे अपभ्रंश कालौघात रूढ होतात. त्याची अशी काही कारणे संभवतात :

१. एखादा मूळ शब्द उच्चारायला कठीण असतो
२. तो लोकांत खूप अपरिचित असतो, किंवा
३. भाषेच्या विविध बोली अथवा लहेजानुसार त्यात बदल संभवतात.

म्हणी आणि वाक्प्रचार हे कित्येक शतकांपासून भाषेत रूढ आहेत. तेव्हा त्यांचे विविध अपभ्रंश नक्की कधी झाले हे समजणे तसे कठीण असते. मात्र एकदा का ते रूढ झाले, की त्या पुढील पिढ्यांना तेच जणू मूळ असल्यासारखे भासतात. त्यातून बरेचदा संबंधित म्हणीचा अर्थबोध होत नाही. काहीसे बुचकळ्यात पडायला होते तर काही वेळेस काही शब्द हास्यास्पद भासतात. मग या अपभ्रंशांची नवनवीन स्पष्टीकरणे सामान्यांकडून दिली जातात आणि त्यातून काहीतरी नवेच रूढ होते. काही अपभ्रंशांच्याबाबत विविध शब्दकोश आणि भाषातज्ञात देखील मतांतरे अथवा मतभेद असतात. असे काही वाचनात आले की एखाद्या भाषाप्रेमीचे कुतूहल चाळवते. तो त्याचा अधिकाधिक शोध घेऊ लागतो. अशाच काही मजेदार बदल अथवा अपभ्रंशांची जंत्री करण्यासाठी हा धागा.

माझ्या माहितीतील काही उदाहरणांनी (संदर्भासह) सुरुवात करून देतो. नंतर इच्छुकांनी भर घालत राहावी.

१. आठराविश्वे दारिद्र्य
अर्थ : पूर्ण दारिद्र्य

आता १८ ‘विश्वे’ कोणती असा प्रश्न पडतो.
त्याची २ स्पष्टीकरणे मिळाली :

अ) वीस विश्वे (विस्वे) पैकीं अठराविश्वे म्हणजे जवळ जवळ पूर्ण दारिद्र्य. = १८/ २०
(https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF%...)

ब) 'अठरा विसा' याचा अर्थ १८ x २० = ३६० दिवस, असा होतो. ३६० दिवस म्हणजे एक वर्ष. वर्षाचे सर्व दिवस, सदासर्वकाळ दारिद्रय घरात वसतीला असणे, यालाच 'अठरा विश्वे दारिद्रय' म्हणतात (हणमंते, श्री०शा० १९८० : संख्या-संकेत कोश. प्रसाद प्रकाशन, पुणे)
http://maparishad.com/content/%E0%A4%85%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A...

आहे की नाही गम्मत ! गणितानुसारही चक्क २ वेगळे अर्थ झाले :
१८/२० आणि
१८ गुणिले २० !

२. पुराणातली वांगी पुराणात
अर्थ : उपदेश नुसता ऐकावा, करताना हवे ते करावे ( शब्दरत्नाकर).

आता इथे भाजीतील ‘वांगी ’ कुठून आली हा अगदी स्वाभाविक प्रश्न. मी यासाठी शब्दरत्नाकर व बृहदकोश दोन्ही पाहिले असता त्यात ‘वांगी’ च स्पष्ट लिहिलेले आहे. मात्र ‘वांगी’ हा वानगीचा अपभ्रंश असल्याचे संदर्भ मिळतात. उदा :

यातला मूळ शब्द ‘वानगी’ म्हणजे नमुना हा असावा, ज्याचा नंतर ‘वांगी’ हा अपभ्रंश झाला, असे काही भाषातज्ज्ञांचे मत आहे”.
https://www.loksatta.com/vishesh-news/scientific-research-in-indian-myth...

३. उंसाच्या पोटीं काऊस जन्मला
= हिर्‍याच्या पोटीं गारगोटी. [सं. कु + इक्षु]
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B8

इथे कापूस या अपभ्रंशांने खरेच बुचकळ्यात पडायला होते. ऊस श्रेष्ठ असेल तर कापूस कनिष्ठ कसा?

४. परोक्ष
मूळ अर्थ :
एखाद्याच्या पाठीमागें, गैरहजेरींत; डोळ्या-आड; असमक्ष.
मात्र व्यवहारात त्याचा वापर बरोबर उलट अर्थाने ( समक्ष) केला जातो !
हा पाहा संदर्भ :

“अडाणी माणसें परोक्ष याचा समक्ष या अर्थीं उपयोग करतात व असमक्ष करितां अपरोक्ष योजतात”.
(https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%95%...)
. मेत(थ)कूट
याचा सर्वपरिचित अर्थ हा:

तांदूळ, निरनिराळ्या डाळी, मोहऱ्या, मेथ्या इ॰ एकत्र दळून केलेलें पीठ व त्यांत दहीं घालून तयार केलेलें एक रुचकर तोंडीलावणें.
यात मेथ्या असल्याने ते खरे मेथकूट आहे.

पण, ‘मेतकूट जमणे / होणे’ याचा उगम मात्र मित्र + कूट असा आहे.

मेळ; एकी; दृढ मैत्री. 'शिंदे, बाळोबा व भाऊ यांचें मेतकूट झालें होतें.' -अस्तंभा ९६. [सं. मिथः कूट; मित्र-प्रा. मित + कूट] (वाप्र)
दाते शब्दकोश
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%...

......
वानगीदाखल मी काही वर दिले आहे.
येउद्यात अजून असे काही. चर्चा रोचक असेल.
**************************************

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सूक्ष्म चर्चा चांगली चालू आहे !
पण मला एक सांगा,
तुमच्यापैकी कोणी मुलाचं दुर्जय असं नाव ठेवलेलं ऐकलं आहे का? महाराष्ट्रात ?

मी तर हे आता पहिल्यांदाच वाचले.

विसर्गाच्या मागे दु - उकारांत अक्षर आणि पुढे ज आहे.

मुलाचं दुर्जय असं नाव: दुर्जोय दत्ता. दुर्जयचे बंगालीत दुर्जोय झाले असेल.

विसर्गसंधीचे नऊ नियम आहेत.
विसर्गाआधीचा स्वर आणि नंतरचा स्वर किंवा व्यंजन कोणते आहेत यावर विसर्गाचं काय होणार ते ठरतं.
नियम लि हा यला खूप वेळ जाईल म्हणून प्रत्येक प्रकाराची मोजकी उदाहरणे लिहितो.
नि:+चय = निश्चय (च /छ -> श)
धनु:+ टंकार -धनुष्टंकार (ट->ष)
नि:+तेज = निस्तेज (त-> स)
नि:+ कपट ( इ/उ : +क्/ ख/प्/फ-> ष , निष्पाप, निष्फल (अपवाद - दु:ख)
अ:+ क/प -> : प्रातःकाल अधःपात
अ:+ अखेरीज अन्य स्वर -> ए अतएव , इतउतर
अ:+ मृदु व्यंजन -> अ+उ = ओ अधः+ गती = अधोगती सरः+ वर = सरोवर, मनोहर, शिरोमणी, तपोबल
इ:/उ:+ स्वर /मृदुव्यंजन -> र निरंतर , निर्दय निर्लेप, निर्यात

अ:/आ:+ क -> स नमस्कार, भास्कर
: + श्/स = : किंवा श्श /स्स नि:शंक / निश्शंक (मी तरी नि:शंक असेच पाहिले आहे)
इ: /उ:+ र -> ई नीरस , नीरव, नीरोग (?)
रः+ श्/स = र चा लोप. चतु :शृंगी, अंतःकरण , चतु:सूत्री
अरः+ मृदु स्वर -> र. अंतरात्मा, पुनर्जन्म, अंतर्याम, अंतर्नाद.
व्याकरणाच्या पुस्तकात पाहून लिहिले आहे.

छान माहिती भरत.
अ:+ क/प -> : प्रातःकाल अधःपात >> ह्यात क च्या आधीचा विसर्ग हा विसर्जनीय (विसर्गाचा उच्चार क् सारखा साधारण) आणि प च्या आधीचा विसर्ग उपध्मानीय (विसर्गाचा उच्चार प् सारखा साधारण) होत असे संस्कृतात. त्यांची लिखित रूपे विसर्गाच्या जागी दोन छोटी पोकळ वर्तुळे अशी होती. पण पुढे त्यांचा वापर फार कुठे बघितला नाही (जुन्या संस्कृत ऋचांची पोथी सोडल्यास). मराठीत हे प्रकार कधी ऐकले नाहीत. तिथे विसर्गच काढतात त्या ठिकाणी.

छान माहिती भरत.
.....
आता अजून एक शंका.
दुर्योधन नाव असलेले काही संदर्भ वाचले. त्यात महाभारतातील श्रीकृष्ण दुर्योधनाला नेहमी सुयोधन म्हणत असे, असे लिहिले आहे.

मुळात दुर्योधनचा अर्थच शूरवीर असा असेल तर उगाचच त्याचा सुयोधन करायची गरज आहे का ?

इथे विसर्ग संधी नऊ नियम दिले आहेत. (लिखाण अचूक आहे की नाही माहित नाही.). किचकट आहेत नियम. त्यातील विसर्ग उकार संधी व विसर्ग र् संधी नियम जरा लक्षात होते.

मुळात दुर्योधनचा अर्थच शूरवीर असा असेल तर उगाचच त्याचा सुयोधन करायची गरज आहे का ?>> ते मूळ महभारतात तसे नसावे, दुर्यॊधनचा अर्थ म्हणजे वाईट असे समजणाऱ्या कुणी असेच नंतर केव्हातरी लिहीले असावे. दुर्यॊधनाचे मूळ नाव सुयोधन होते पुढे त्याचे (वाईट) वर्तन पाहुन दुर्योधन पडले असेही वाचले आहे.

छान चर्चा !

दुर्जय पेक्षा दुर्जेय योग्य वाटतो मला. खरे तर सर्व 'अजय' नी सुद्धा आपले नाव बदलून 'अजेय' करायला हवे. संबंधित अधिकारी इकडे लक्ष देतील काय?

बरोबर ! Happy
दुर्जेय
आपण इंग्लिश मध्ये ते Durjoy असं लिहिलेलं वाचतोय.
प्रत्यक्ष बंगालीत काय आहे हे बघावं लागेल.
अनिंद्य यांची वाट बघू या...

व चा ब/भ होतो. देब, बिनोद वगैरे मध्ये ब. भ सौरभ व्यतिरिक्त नक्की केव्हा केव्हा होतो माहीत नाही पण त्यातील एक म्हणजे इंग्रजी V चा उच्चार भी करतात. Valve चा उच्चार भाल्भ.

সৌরভ हे सौरभ. ভ हा त्यांचा भ.
রবী ন্দ্রনাথ हे रबिन्द्रनाथ (इथे कॉपी पेस्ट करताना बी आणि न्द्र अक्षरं जरा बदलुन होत आहेत, इथे बघता येइल.)
ব हा त्यांचा ब.
ৱ = व आणि র = र असे त्यांचे ब, व आणि र जरा गोंधळात टाकतात. एकदा कलकत्त्यात सलग दोन आठवडे असताना मी थोडेफार वाचायला शिकलो होतो, म्हणजे दुकानावरच्या पाट्या वगैरे.

सौरव आणि सौरभ अशी दोन वेगवेगळी संस्कृत नामे असावीत बहुधा. कारण सौरभ हे नाव सुगंध ह्या अर्थाने पुष्कळ वापरले गेले आहे.
सुरव पासून सौरव बनवताही येईल एखादे वेळी. पण तो संस्कृत शब्दकोशात आढळत नाही. whats ap नामसूचिमध्ये मात्र आढळते.आणि त्याचा संबंध सुर ह्या शब्दाशी जोडलेला दिसतो!
सुर पासून सौर शब्द घडतो.

हो. माझा काहीतरी गोंधळ झाला. सौरभ असाच शब्द आहे. बंगाली लोक स्पेलिंगमध्ये bh ऐवजी v वापरतात.
म्हणजे व चा उच्चार भ करायचा (माझे बंगाली बॉस वाशीला भाशी म्हणायचे) म्हणून त्यांनी भ साठी व्ही वापरला.

हो भरतजी. बंगाल्यांना सौरभ हा उच्चार अभिप्रेत होता तो Saurav ह्या स्पेलिंगने साधता आला.
अशी अनेक उदाहरणे आहेत. शींव साठी ब्रिटिशांनी sion अशी अक्षररचना केली, जेणेकरून ते शींवशी जास्तीत जास्त मिळताजुळता उच्चार करू शकले.
पुढे चालू.

मागील pratisaadaaahoon पुढे.
खडकी साठी किरकी, शंकरशेठ साठी sunkarsette, पुणं साठी Poona वगैरे.

हो. आणि आमच्या कोळे कल्याणच्या ब्रिटिश स्पेलिंगमुळे आम्ही त्या जागेला कालीना म्हणू लागलो!

अवांतर-
सायन म्हणजेच शीव हा साक्षात्कार मला एकदा लोकलने प्रवास करताना सायन स्टेशनवर गाडी थांबल्यावर स्टेशनची मराठी आणि इंग्रजीतली नावं बघून झाला. पुलंना बँकॉक विमानतळावर उतरल्यावर थायलंड म्हणजेच सयाम हे कळलं होतं याच जातीचा हा चिमुकला साक्षात्कार होता Proud दोन्ही नावं ऐकलेली होती, पण ती एकाच ठिकाणाची आहेत हे माहिती नव्हतं!
( मी मुंबईत रहात नव्हते आणि नातेवाईकांबरोबर लोकलचा प्रवास अत्यंत माफक प्रमाणात केलेला आहे. )

बोरीबंदर (छ. शि. म. ट.) हे नाव तर आता इतिहासजमा झाले असावे.

बोरी = गोणी
बंदर चे दोन अर्थ संभवतात :
१. पोर्ट आणि
२. भांडारचा अपभ्रंश बंदर,
असे विकिपीडिया म्हणतो

आणखी एक व्युत्पत्ती सांगतात.
बोहरी लोक तेथे जास्त संख्येने होते. ते प्रतिष्ठित व्यापारी. व्होरा म्हणजे गुजरातीत व्यापारी. वोहोरवुं म्हणजे व्यवहार करणे, व्यापार करणे. अशा (मुस्लिम) लोकांना बोहरी म्हणतात. त्यांच्यावरून बोरीबंदर नाव पडले.

बंगाली लोक स्पेलिंगमध्ये bh ऐवजी v वापरतात.....

बरोबर. त्यामुळे उच्चारी भाषा आणि स्पेल्लिंग याचा मेळ साधला जातो Happy सौरभचा अर्थ बंगालीतही हिंदी-संस्कृत प्रमाणेच = सुगंध.

सुजय, दुर्जय, विजय ही नावे बंगालीजन सुजोय, दुर्जोय, बिजोय अशी उच्चारतात, इंग्रजीत स्पेलिंग करतांना थोडी लिबर्टी घेतली जाते. उदा. जॉय मुखर्जी = Joy Mukherjee आता त्याचे नाव जय आहे की जॉय त्यालाच ठाऊक !

बंगालीत 'ब', 'भ' आणि 'व' चा भरपूर घोळ होतो, तसाच पंजाबी मधेही 'भ' चा 'प' होतो Happy
'भरजाई' (भावजय) ला 'परजाई' वगैरे !

ह्या ध्याग्यावर मजा येते, भाषेच्या कितीतरी गमती जमती कळतात.

१. बोहरी म्हणतात. त्यांच्यावरून बोरीबंदर
२. त्याचे नाव जय आहे की जॉय त्यालाच ठाऊक

>>> दोन्ही छान !

सायन म्हणजेच शीव हा साक्षात्कार लोकल स्टेशनची मराठी आणि इंग्रजीतली नावं बघून झाला

+ १

Happy

Pages