भाषा : अपभ्रंश, बदल, मतांतरे इ.

Submitted by कुमार१ on 14 March, 2021 - 10:39

नुकताच मराठी म्हणींच्या धाग्यावर ‘उसापोटी कापूस जन्मला’ या म्हणीचा अर्थ विचारला गेला होता. त्यावर शोध घेताना मला रोचक माहिती मिळाली. वास्तविक सदर म्हणीत ‘कापूस’ शब्द नसून ‘काऊस’ हा शब्द आहे. त्याचा अर्थ ‘उसाच्या शेंड्याचा नीरस भाग किंवा कुचकामाचा माणूस’. ‘काऊस’ हा जरा विचित्र शब्द असल्याने याचा कापूस असा सोयीस्कर अपभ्रंश झाला असावा.

या निमित्ताने मनात एक कल्पना आली. वरील म्हणीप्रमाणेच आपल्या भाषेत अनेक शब्द, म्हणी अथवा वाक्प्रचार यांचे अपभ्रंश कालौघात रूढ होतात. त्याची अशी काही कारणे संभवतात :

१. एखादा मूळ शब्द उच्चारायला कठीण असतो
२. तो लोकांत खूप अपरिचित असतो, किंवा
३. भाषेच्या विविध बोली अथवा लहेजानुसार त्यात बदल संभवतात.

म्हणी आणि वाक्प्रचार हे कित्येक शतकांपासून भाषेत रूढ आहेत. तेव्हा त्यांचे विविध अपभ्रंश नक्की कधी झाले हे समजणे तसे कठीण असते. मात्र एकदा का ते रूढ झाले, की त्या पुढील पिढ्यांना तेच जणू मूळ असल्यासारखे भासतात. त्यातून बरेचदा संबंधित म्हणीचा अर्थबोध होत नाही. काहीसे बुचकळ्यात पडायला होते तर काही वेळेस काही शब्द हास्यास्पद भासतात. मग या अपभ्रंशांची नवनवीन स्पष्टीकरणे सामान्यांकडून दिली जातात आणि त्यातून काहीतरी नवेच रूढ होते. काही अपभ्रंशांच्याबाबत विविध शब्दकोश आणि भाषातज्ञात देखील मतांतरे अथवा मतभेद असतात. असे काही वाचनात आले की एखाद्या भाषाप्रेमीचे कुतूहल चाळवते. तो त्याचा अधिकाधिक शोध घेऊ लागतो. अशाच काही मजेदार बदल अथवा अपभ्रंशांची जंत्री करण्यासाठी हा धागा.

माझ्या माहितीतील काही उदाहरणांनी (संदर्भासह) सुरुवात करून देतो. नंतर इच्छुकांनी भर घालत राहावी.

१. आठराविश्वे दारिद्र्य
अर्थ : पूर्ण दारिद्र्य

आता १८ ‘विश्वे’ कोणती असा प्रश्न पडतो.
त्याची २ स्पष्टीकरणे मिळाली :

अ) वीस विश्वे (विस्वे) पैकीं अठराविश्वे म्हणजे जवळ जवळ पूर्ण दारिद्र्य. = १८/ २०
(https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF%...)

ब) 'अठरा विसा' याचा अर्थ १८ x २० = ३६० दिवस, असा होतो. ३६० दिवस म्हणजे एक वर्ष. वर्षाचे सर्व दिवस, सदासर्वकाळ दारिद्रय घरात वसतीला असणे, यालाच 'अठरा विश्वे दारिद्रय' म्हणतात (हणमंते, श्री०शा० १९८० : संख्या-संकेत कोश. प्रसाद प्रकाशन, पुणे)
http://maparishad.com/content/%E0%A4%85%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A...

आहे की नाही गम्मत ! गणितानुसारही चक्क २ वेगळे अर्थ झाले :
१८/२० आणि
१८ गुणिले २० !

२. पुराणातली वांगी पुराणात
अर्थ : उपदेश नुसता ऐकावा, करताना हवे ते करावे ( शब्दरत्नाकर).

आता इथे भाजीतील ‘वांगी ’ कुठून आली हा अगदी स्वाभाविक प्रश्न. मी यासाठी शब्दरत्नाकर व बृहदकोश दोन्ही पाहिले असता त्यात ‘वांगी’ च स्पष्ट लिहिलेले आहे. मात्र ‘वांगी’ हा वानगीचा अपभ्रंश असल्याचे संदर्भ मिळतात. उदा :

यातला मूळ शब्द ‘वानगी’ म्हणजे नमुना हा असावा, ज्याचा नंतर ‘वांगी’ हा अपभ्रंश झाला, असे काही भाषातज्ज्ञांचे मत आहे”.
https://www.loksatta.com/vishesh-news/scientific-research-in-indian-myth...

३. उंसाच्या पोटीं काऊस जन्मला
= हिर्‍याच्या पोटीं गारगोटी. [सं. कु + इक्षु]
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B8

इथे कापूस या अपभ्रंशांने खरेच बुचकळ्यात पडायला होते. ऊस श्रेष्ठ असेल तर कापूस कनिष्ठ कसा?

४. परोक्ष
मूळ अर्थ :
एखाद्याच्या पाठीमागें, गैरहजेरींत; डोळ्या-आड; असमक्ष.
मात्र व्यवहारात त्याचा वापर बरोबर उलट अर्थाने ( समक्ष) केला जातो !
हा पाहा संदर्भ :

“अडाणी माणसें परोक्ष याचा समक्ष या अर्थीं उपयोग करतात व असमक्ष करितां अपरोक्ष योजतात”.
(https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%95%...)
. मेत(थ)कूट
याचा सर्वपरिचित अर्थ हा:

तांदूळ, निरनिराळ्या डाळी, मोहऱ्या, मेथ्या इ॰ एकत्र दळून केलेलें पीठ व त्यांत दहीं घालून तयार केलेलें एक रुचकर तोंडीलावणें.
यात मेथ्या असल्याने ते खरे मेथकूट आहे.

पण, ‘मेतकूट जमणे / होणे’ याचा उगम मात्र मित्र + कूट असा आहे.

मेळ; एकी; दृढ मैत्री. 'शिंदे, बाळोबा व भाऊ यांचें मेतकूट झालें होतें.' -अस्तंभा ९६. [सं. मिथः कूट; मित्र-प्रा. मित + कूट] (वाप्र)
दाते शब्दकोश
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%...

......
वानगीदाखल मी काही वर दिले आहे.
येउद्यात अजून असे काही. चर्चा रोचक असेल.
**************************************

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वरील चर्चेवरून मला अन्य दोन वाक्प्रचार आठवले:

१. एखाद्याची चिमणी पाडणे
२. एखाद्याचा पोपट होणे

हे वाक्प्रचार विविध दशकांमध्ये विद्यार्थी वर्गात लोकप्रिय होते / आहेत.
यांचा उगम शब्दकोशांमध्ये नाही सापडणार. तसेच या वाक्प्रचारांचा संबंधित पक्षांच्या गुणधर्माशी काही संबंध आहे असे वाटत नाही.

काय वाटते ?

एखाद्याची चिमणी पाडणे
>> एखादा मनुष्य कोणाकडे, "मला फार समजते" अशा अविर्भावात गेला असता, त्याला त्याची जागा दाखवून देणे / कमी लेखणे

अर्थात त्याचा उगम विद्यार्थी परिवारातून झालाय . Happy

कांक्षा आणि आकांक्षा यांचे शब्दकोशातील मुख्य अर्थ सारखे आहेत.
मग दोन्ही शब्दांचा भिन्न वापर कधी करतात ?
का समानार्थीच धरायचे?

लेखाजोखा हा शब्द आपण विवरण किंवा वृत्तांत या अर्थी वापरतो. त्याची फोड केल्यावर दोन भागांचे वैयक्तिक अर्थ असे आहेत:

लेखा = हिशेब; गणती; मोजणी.
जोखा = बाई; स्त्री. [सं. योषा]

(https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%96%E0%A4%BE
https://educalingo.com/mr/dic-mr/jokha-2)

जोखाचा अर्थ रंजक आहे आणि पूर्णपणे वेगळा आहे. मग जोडशब्द झाल्यावर जोखाचा मूळ अर्थ लुप्त झाल्यासारखा दिसतोय !

लेखाजोखा मधे
जोखणे > तोलणे
हे योग्य वाटते आहे

लेखा हे हिशोब लिहिण्याबद्दल आहे. जोखा हे केलेल्या दाव्याबद्दल तपासणी आहे. खरोखरंच तसं आहे का हे पाहणे. थोडक्यात व्यवसाय किंवा व्यक्तिचे ऑडिटच.

असाच एक मजेदार जोडशब्द सापडला :
चिताडगुतार = गिचमिड लिहिलेले.

(चिताड= गिचमिड लिहिलेले)

परंतु गुतार हा स्वतंत्र शब्द काही नेहमीच्या कोशांमध्ये मिळाला नाही.
कदाचित तो ‘गुंताड’चा अपभ्रंश असेल का ?

गमक चा नेहमीचा अर्थ ( दाखला; पुरावा) आपल्याला परिचित आहे.

त्याचा दुसरा अर्थ म्हणजे एक कलाप्रकार :
काव्याच्या माध्यमातून केले जाणारे एक प्रकारचे कथाकथन
ते करणारा तो गमकी

(https://www.loksatta.com/sampadkiya/columns/vyaktivedh-globalization-cul...)

शास्त्रीय संगीतातही गमक नावाचा एक अलंकार आहे. (आंदोलन, खटका, मुरकी इत्यादी इतर अलंकार आहेत). ह्यात गमक हा शब्दप्रयोग काव्यातूनच आला असावा असा माझा अंदाज आहे.

ह पा +१

गमक = तान
असाही अर्थ आहे.

एक मस्त जपानी शब्द :

उभ्या उभ्या रांगेत पुस्तक वाचत पुढं सरकणं, याला मराठीत शब्द नाही. जपानी भाषेत मात्र त्यासाठी खास शब्द आहे, ‘टचियोमी.’

(https://maharashtratimes.com/editorial/samwad/reading-is-habit-of-thinki...).
..
पुस्तकांच्या दुकानात उभे राहून फुकट वाचणे असाही त्याचा अर्थ दिसतोय !

https://www.japandict.com/%E7%AB%8B%E3%81%A1%E8%AA%AD%E3%81%BF

Pages