पुण्यात मेट्रो धावू लागली!

Submitted by पराग१२२६३ on 19 March, 2022 - 11:53

गेल्या 25 वर्षांमध्ये पुण्याचा विस्तार अतिशय झपाट्याने झाला आहे आणि तो अजूनही होतच आहे. पुणे आणि आसपासच्या परिसरांमध्ये येऊ लागलेल्या छोट्या-मोठ्या उद्योगांमुळे शहराचा आकार वाढत राहिला आहे. वाढत्या शहरीकरणाचा ताण पुण्यातील उपलब्ध शहरी सार्वजनिक वाहतुकीवर वाढत गेला. हा वाढता ताण ती वाहतूक व्यवस्था पूर्ण करू शकलेली नाही. आजही मागणी आणि सेवेचा पुरवठा यात बरीच तफावत आढळत आहे. मागणी पूर्ण करण्यास सार्वजनिक वाहतूक सक्षम नसल्यामुळे रस्त्यावरच्या खासगी वाहनांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत चालली आहे. त्यातच अरुंद रस्त्यांमुळे वाहतुकीचा वेग आणखीनच मंदावत आहे.

मध्यंतरी पुण्यात बीआरटी (Bus Rapid Transit) व्यवस्था सुरू करण्यात आली; पण तिच्या नियोजनातील गोंधळामुळे तीसुद्धा यशस्वी होऊ शकली नाही. आता तर पुण्यातील वाहनांची संख्या पुण्याच्या लोकसंख्येपेक्षाही जास्त झालेली आहे. वाढत्या शहरीकरणाला सक्षम सार्वजनिक वाहतुकीच्या साधनाची जोड देण्याच्या हेतूने 2009-10 पासून पुण्यात मेट्रो सुरू करण्याबाबत विचार सुरू झाला. त्यामध्ये मेट्रो कशी असावी, उन्नत की भूमिगत, गेज काय असावा, रस्ताच्या बाजूने असावी की मधून, डबे कसे असावेत इ. इ. मुद्द्यांवरून सतत फक्त चर्चेतच राहिलेल्या पुणे मेट्रोच्या प्रत्यक्ष कामाला अखेर डिसेंबर 2016 मध्ये सुरुवात झाली. मेट्रोची उभारणी हे तसे अवाढव्य काम आहे. पण तरीही 2019 पर्यंत म्हणजे तीनच वर्षांमध्ये पहिल्या दोन मार्गांचे काम पूर्ण करण्याचे अवघड लक्ष्य ठेवले गेले होते. ती कालमर्यादा पाळणे शक्य नाही हे माझ्याही मनाला पटत होतेच. आज पुण्यातील मेट्रो मार्गांची उभारणी पूर्ण होण्याला अजून बराच काळ लागणार असल्याचे सध्या दिसत आहे. कारण गरवारे महाविद्यालयानंतर पुढे नदीपात्रात गेलेल्या मार्गावर अजून दुसऱ्या टप्प्यातीलच काम सुरू आहे. परिणामी डेक्कन, छत्रपती संभाजी उद्यान, पुणे महानगरपालिका येथील स्थानकांचे कामही प्रथमावस्थेतच आहे. त्यापुढे सत्र न्यायालयाजवळ होत असलेल्या जंक्शनचे कामही बरेच बाकी आहे. तीच अवस्था मंडई, स्वारगेटच्या बाजूलाही दिसते.

शहरांतर्गत चालणारी रेल्वे वाहतूक ‘मेट्रो रेल्वे’ म्हणून ओळखली जाते. ही सेवा जमिनीखाली, जमिनीवर किंवा उन्नत (elevated) अशा कोणत्याही प्रकारे उपलब्ध करून देता येते. ही सेवा सुरक्षित, इंधनाची बचत करणारी, प्रदूषणमुक्त, वेगवान आणि आरामदायक मानली जाते. मेट्रो भूमिगत असेल, तर रस्त्यावरील जागा व्यापली जात नाही, शिवाय उन्नत असेल, तर ती रस्त्यावरील केवळ 2 मीटर रुंद जागा व्यापते. लोहमार्ग आधारित सार्वजनिक वाहतूक प्रवासाचा कालावधी 50 ते 70 टक्क्यांनी कमी करते. तसेच एका प्रवाशाची एक किलोमीटर अंतरापर्यंत वाहतूक करण्यासाठी लोहमार्गावरील वाहतुकीला रस्ता वाहतुकीच्या तुलनेत एक-पंचमांश कमी इंधन लागते. ज्या ठिकाणी पीएचपीडीटी (म्हणजे Peak Hour Peak Direction Traffic) निर्देशांक 20,000 ते 45,000 आहे, तेथे मेट्रोसारखी लोहमार्ग आधारित सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सोयीस्कर ठरते. कारण मेट्रोद्वारे दर 90 सेकंदाला एक याप्रमाणे सेवा उपलब्ध करून देता येते. रस्त्यावरील वाहतूक 8,000 पेक्षा कमी पीएचपीडीटीला उपयुक्त ठरते. पुण्यातील मेट्रोच्या पहिल्या दोन्ही मार्गांचा पीएचपीडीटी निर्देशांक 2031 पर्यंत 10,000 ते 20,000 दरम्यान राहण्याचे अनुमान काढण्यात आले आहे.

सध्या पुण्यात मेट्रोचा 12 किलोमीटरचा मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला आहे. तरीही या मार्गांवरील स्थानकांचं काम अजूनही अपूर्णच असलेलं दिसत आहे. पुण्यात एकूण 3 मेट्रो मार्ग उभारले जात असून त्यांची लांबी 54.58 किलोमीटर असणार आहे. त्यापैकी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका भवन ते स्वारगेट (परपल लाईन, लांबी 16.59 किलोमीटर) अशी असून ती खडकीतील रेज हिलपर्यंत उन्नत (elevated) आणि त्यानंतर स्वारगेटपर्यंत भूमिगत असणार आहे. या मार्गावरील फुगेवाडीपर्यंतचा मार्ग 6 मार्चपासून खुला झालेला आहे. दुसरा मार्ग कोथरुडमधील वनाज ते रामवाडी (ॲक्वा लाईन, 14.66 किलोमीटर) असा असणार असून तो पूर्णपणे उन्नत असणार आहे. त्यापैकी वनाज ते गरवारे कॉलेजपर्यंतचा मार्ग वाहतुकीसाठी खुला झालेला आहे. तिसरा मार्गही पूर्णपणे उन्नत असणार असून त्याची लांबी 23.33 किलोमीटर असणार आहे. तो मार्ग हिंजेवाडीतील राजीव गांधी इंफोटेक पार्कपासून सुरू होऊन बालेवाडी मार्गे शिवाजीनगरच्या सत्र न्यायालयापर्यंत जाणार आहे. हे तिन्ही मार्ग सत्र न्यायालयाजवळ एकत्र येणार आहेत.

भारतात मेट्रो रेल्वे सेवेचा विकास आणि विस्तार अतिशय संथ गतीने झाला आहे. त्यासाठी पुढील मुद्दे कारणीभूत ठरलेले आहेत.
• सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबाबत स्पष्ट धोरणाचा अभाव
• आवश्यक स्रोतांची कमतरता
• देशातील कायदेशीर व्यवस्था
• मेट्रोसंबंधीच्या तज्ज्ञांची कमतरता
• कार्यक्षम संस्थात्मक व्यवस्थेचा अभाव

मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी देशातील अकार्यक्षम संस्थात्मक व्यवस्था हा सर्वात मोठा अडथळा ठरला आहे. मेट्रो रुळांवर आधारित व्यवस्था असली तरी सध्या तिच्या उभारणीसाठी कोणतेही एक मंत्रालय किंवा केंद्रीय संस्था जबाबदार नव्हती. त्यामुळे हे प्रकल्प मंजूर होऊन प्रत्यक्ष कामाची सुरुवात होईपर्यंतच बऱ्याच अडथळ्यांना सामोरे जावे लागत होते. पण मेट्रो रेल्वे सेवा सुरू करण्याची देशात वाढत असलेली मागणी लक्षात घेऊन 2017 मध्ये मंजूर करण्यात आलेल्या नव्या मेट्रो रेल्वे धोरणामध्ये देशातील मेट्रो रेल्वे विकासाची जबाबदारी केंद्र सरकारच्या आवास आणि शहरी व्यवहार मंत्रालयाकडे सोपवण्यात आली आहे.

दिल्ली मेट्रोमुळे झालेले फायदे
• शहरातील रस्त्यांवरील सुमारे 3,90,000 दैनिक वाहने कमी झाली.
• शहराचा मध्यवर्ती भाग आणि शहराच्या जवळपासची ठिकाणे यांच्यातील प्रवास जलद झाला.
• शहरांतर्गत वाहतुकीतील प्रवासाचा कालावधी 32 मिनिटांनी कमी झाला.
• इंधनाच्या वापरात वार्षिक सुमारे पावणेतीन लाख टनांनी घट झाली.
• दिल्लीच्या हवेतील प्रदुषकांचे वार्षिक प्रमाण पावणेसहा लाख टनांनी घटले.
• दिल्लीतील रस्त्यांवरील गंभीर अपघातांचे प्रमाण वर्षाला 125 ने कमी झाले.
• एकूण रस्ते अपघातांची वार्षिक संख्या 937 ने कमी झाली.

दिल्ली मेट्रो रेल्वे प्रकल्पाची व्यावहारितकता आणि यश लक्षात घेऊन केंद्र सरकारने 2009 मध्ये 20 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या देशाच्या अन्य प्रमुख शहरांमध्ये मेट्रो रेल्वे सेवा सुरू करण्याला मान्यता दिली. दिल्लीमध्ये मेट्रो सेवा सुरू झाल्यावर तिच्या खात्रीशीर आणि वेगवान सेवेमुळे रस्ता वाहतुकीवर अवलंबून असलेले प्रवासी मेट्रोकडे वळलेले आहेत.

सध्या मेट्रो सेवा उपलब्ध असलेली शहरे
• कोलकाता, मुंबई, पुणे, नागपूर, चेन्नई, जयपूर, नम्मा मेट्रो (बेंगळुरू), तीव्र गती मेट्रो (गुरुग्राम), अहमदाबाद, हैदराबाद, कानपूर, कोची, लखनौ, नोएडा. यातील सर्वच मेट्रो रेल्वे प्रकल्पांची सेवा थोड्या-अधिक प्रमाणात सुरू झालेली आहे. त्याचवेळी त्यांचे विस्तारीकरणही सुरू आहे.
सध्या सेवा सुरू न झालेले, पण उभारणी सुरू असलेले प्रकल्प
• नवी मुंबई, भोज (भोपाळ), इंदूर, पाटणा, आग्रा, सुरत, ठाणे.
मान्यता मिळालेले, पण काम सुरू होण्याच्या स्थितीत असलेले प्रकल्प
• ठाणे, विशाखापट्टणम

लिंक
https://avateebhavatee.blogspot.com/2022/03/blog-post_17.html

पुणे मेट्रोतून मी केलेल्या पहिल्या प्रवासाचा व्हिडिओ खालील लिंकवर पाहता येईल.
https://www.youtube.com/watch?v=JvTZICUysoA

Group content visibility: 
Public - accessible to all site users

३४०, ३९६, ३९८, ४२५, ४९६ हे सगळे बस मार्ग वाचून मी आधी वर स्क्रोल करून बघितले नक्की कोणता धागा उघडला आहे ते!!!

...त्यामुळे पुणे आणि मुंबईची तुलना होउ नाही शकत.... +११११११११११११११११११११११११११११११११११
तरी काही पुणेकरांना हौस असते मुंबईशी बरोबरी करू पाहण्याची!

#हापुण्याचाबीबीआहेइकडेबेस्टचीबडबडकशालाकरुनओरडूनये. Proud +१
बेस्टच्या बडबडीत माझीही थोडीशी भर!
बेस्टचे मुंबईत जेवढे बस डेपो (बस आगार) आहेत त्यांच्या नावांपैकी सर्वाधिक नावे कोणत्या अक्षरावरून सुरु होतात??? ओळखा पाहू!

म?
मरोळ, मजास, मरोळ-मरोशी, मुलुंड, मागाठणे....
मुंबईसेंट्रल. मालवणी... हे आणखी आठवले.

मित्तल इस्टेट पण बस स्टॉप आहे.
अंधेरी कुर्ला बसला. बहुतेक ३३२

अजून एक ३१२ (बहुतेक). सिप्झ ते बार्क आठवली अशीच. हीची मला स्वप्नही पडतात केव्हातरी.

पुण्यात मेट्रो रिंग रुटच्या मार्गाने फिरवायला पाहिजे होती..... मेट्रोसारख्या जलद साधनांचा उपयोग जवळच्या अंतरापेक्षा लांबच्या अंतरांसाठी जास्त संयुक्तिक आहे..... पुण्याच्या परिघावरुन मेट्रो फिरवली असती तर पुण्याच्या अंतर्गत भागातून परिघापर्यंत सुधारित बससेवा, मेट्रो स्टेशनच्या आजुबाजुला पार्किंगसारखे इंफ्रा आणि आजुबाजूच्या भागात डेव्हलपमेंट होउन मध्यवर्ती भागावरचा ताणही कमी झाला असता!!

असो!! जे होतय त्याचे स्वागत आहेच पण अश्या योजना राबवताना पुढच्या काही दशकांचा तरी किमान विचार व्हायला हवा!!

माहीम, महाराणी लक्ष्मीबाई चौक, माहेश्वरी उद्यान, म फुले चौक, माने (खुर्द) , मैत्री पार्क,( इथे डेपो आहे की नाही ते माहीत नाही.),मालाड, माझगाव.

अमितव आणि भरत. - बरोबर उत्तर!
हीरा - तुम्ही सांगितलेले सगळे बस थांबे (stops) आहेत.

मुंबईत बेस्टचे जेवढे बस डेपो आहेत त्यात 'म' (M) या अक्षरावरून सुरु होणारे डेपो सर्वाधिक आहेत.
१. मुंबई सेंट्रल
२. मरोळ
३. मजास
४. मागाठणे
५. मालवणी
६. मालाड
७. मुलुंड
बेस्टच्या एकूण २७ डेपोंंपैकी तब्बल ७ डेपो 'म' (M) या एकाच अक्षराने सुरु होतात!
https://www.bestundertaking.com/in/page.asp?i=27

माहीम डेपो आहेत, म लक्ष्मी चौक सुद्धा डेपो असावा...
नाही.
माहीम हे सेंट मायकल चर्चच्या समोरचे बस स्थानक आहे जिथून पूर्वी ७९ सुटायची. आता त्या स्थानकावर व्यावसायिक का रहिवासी इमारत झाली आहे. म्हणजे तळमजल्यावर बस स्थानक आणि वर इमारत.
म. लक्ष्मी चौक हे शीव (सायन) येथील म्हणत असाल तर ते देखील 'बस स्थानक' आहे, जिथून ६६ आणि इतर अनेक बसेस सुटतात.

'बस आगार' (डेपो) म्हणजे जिथे रात्री बस आणल्या जातात, यांत्रिक पद्धतीने धुतल्या जातात, देखभालीचे (maintenance) काम केले जाते, बसमध्ये इंधन भरले जाते, इलेक्ट्रिक बस चार्जिंगला लावल्या जातात, बस वाहकांची तिकीट मशीन्स (पूर्वी Trimax, आता Chalo) जमा होतात, दिवसभराचा हिशोब केला जातो. ही सर्व कामे 'बस स्थानकात' होत नाहीत.

राणी लक्ष्मी चौक बस स्थानक आहे. इतरही अनेक बस स्थानके आहेत. डेपो मधुन बस सुटत नाहीत. तुम्हाला आम्हाला आत जायला परवानगी नसते.
वि.मु. +१

डेपो मधुन बस सुटत नाहीत. तुम्हाला आम्हाला आत जायला परवानगी नसते....
काही बसेस डेपोमधून सुटतात, फक्त प्रवाशांना बाहेरच्या stop वर थांबावे लागते.
४ मर्या. - गोरेगाव आगार ते जे जे रुग्णालय
२०३ - पोयसर आगार ते जुहू बीच
४४० मर्या. - वडाळा आगार ते बोरीवली स्थानक (पू.)

२००६ - २००७ मध्ये बेस्टकडे Smart Cards येण्यापूर्वी १२ वर्षावरील शालेय विद्यार्थ्यांना अर्धे (हाफ) तिकीट मिळवण्यासाठी वर्षातून एकदा पास काढावा लागायचा. आणि त्यासाठी घर ते शाळा मार्गावरील बस ज्या आगाराच्या अखत्यारीत येते त्या आगारात जाऊन अर्ज आणावा लागायचा मग तो भरून त्यावर शाळेचा शिक्का, मुख्याध्यापकांची सही आदी घेऊन मग पुन्हा त्या आगारात जमा करावा लागायचा. याकामापुरता आगाराच्या इमारतीत ठराविक अंतरापर्यंत सामान्य लोकांना प्रवेश मिळायचा!

मुंबई मेट्रो (कोथरूड मार्गे) च्या धाग्यावर पेठांची नावं लिहायची का ? Proud-- अशी मेट्रो सुरु झाल्यावर लिहिली तर चालतील!!!

राणी लक्ष्मी चौक म्हणजे सायन सर्कल का?

खोदादाद चौक म्हणजे किंग्ज सर्कल?

मला वाटायचं बीएमसीला तुम्ही खोदा आम्ही दाद देऊ असे निर्भीडपणे सांगणारे लोक जिथे असतात तो खोदादाद चौक.

विषय काय, मी लिहितोय काय, पूर्वीची मायबोली राहिली नाही हेच खरं.

किंगसर्कल म्हणजे महेश्वरी उद्यान.
खोदादाद सर्कल म्हणजे दादर ईस्ट. टिळक ब्रिजवरुन उतरुन आलं की. दादर-पुणे इथुनच सुटतात. (चला पुण्याचा संबंध लावला) Proud

ओह, बरोबर.
संत गाडगेबाबा चौक= जेकब सर्कल ना?
आणि प्रिन्सेस स्ट्रीट म्हणजे श्यामलदास गांधी मार्ग?

विषयावर:
गरवारे चौक ते इलेक्ट्रीक हौस कुलाबा असा मेट्रो रूट सगळ्यात फायदेशीर राहील असे मला वाटते.

डेपो मधुन बस सुटत नाहीत. तुम्हाला आम्हाला आत जायला परवानगी नसते....
>>>>
अच्छा ही नवीन माहीती मिळाली. धन्यवाद.
मी लहानपणापासून जिथून बसेस सुटतात त्या प्रत्येक जागेला डेपोच बोलत आलोय Happy

राणी लक्ष्मीबाई चौक म्हणजे सायन स्टेशन परिसर , सायन सर्कल थोडे पुढे आहे.

किंग सर्कल आणि माहेश्वरी एकच हे माहीत नव्हते,

वि मु यांच्यामुळे बस स्थानक आणि बस आगार यांच्यातला फरक लक्षात आला. आमच्या घराशेजारी बसस्थानक आहे. बंदिस्त भाग. बसला आत जाण्यासाठी आणि बाहेर येण्यासाठी वेगवेगळे गेट. आत एक मिनि ऑफिस, विश्रामगृह आणि कँटिन कम हॉटेल. आतच बस स्टॉप आहेत. तिथून बस पकडता येते.
आम्ही पत्ता सांगताना xxxx बस डेपो समोर असाच सांगत आलोय. बस स्टेशन समोर असं सांगायला हवं.

आम्ही पत्ता सांगताना xxxx बस डेपो समोर असाच सांगत आलोय. बस स्टेशन समोर असं सांगायला हवं.
>>>>>

सगळे डेपो बोलत असतील तर पत्ता सांगताना डेपोच सांगा. पत्ता समोरच्याला समजणे महत्वाचे. म्हणून तर आपण मराठीचा हट्ट धरून आगार न म्हणता डेपो म्हणतो Happy

मायबोलीवर सुरुवातीच्या काळात पुणेकरांचे वर्चस्व होते. गेल्या काही काळात मुंबईकरांचे वाढलेय असे जाणवतेय. वेगळा धागा काढा जर अजून कोणाचे सेम निरीक्षण असेल तर..

.पुणे हे एक कला, शिक्षण, संस्कृती साठी ओळख असलेले स्वतंत्र राष्ट्र आहे. कोथरूड त्या राष्ट्रातील एक प्रगत राज्य आहे. त्याच्याशी सुसंगत असे मायबोली हे आंतरराष्ट्रीय व्यासपीठ आहे. त्यामुळे पुणेकरांना वेगळा वेळ काढावा लागत नाही.

मुंबई हे भारतासारख्या विकसनशील देशातल्या आर्थिक दृष्ट्या कर्जबाजारी असलेल्या महाराष्ट्र राज्यातील एक शहर आहे. पोट भरण्यासाठी पळणे ही या शहराची मुख्य ओळख आहे. त्यामुळे सांस्कृतिक घडामोडीत त्यांना भाग घेता येत नव्हता.

मात्र काही वर्षांपूर्वी या संस्थळावर कंपनीने देवाला सोडलेला एक रिटे आला. पुणे इंटेलिजन्स एजन्सी च्या माहितीनुसार हा रिटे स्वतःतून स्वतःला प्रसवतो. अशा प्रकारे रिटेंची संख्या वाढत गेल्याने पूर्वीचे चित्र बदलले असण्याची दाट शक्यता आहे.

वेगळा धागा काढा जर अजून कोणाचे सेम निरीक्षण असेल तर..>>>

तुमचं व्यसन फारच विकोपाला गेलं आहे सर
जगात धागा काढण्याव्यतिरिक्त अन्य ही काही गोष्टी असतात
आता एक धागा यावर येऊ दे
धागा काढण्याचे व्यसन Happy

म म मायबोली.
माझा कांजूरवरून बसने किंवा महानंद {डेअरी} जाणयाचा योग वर्षातून एकदा फेब्रुवारीत यायचा. गोरेगावजवळ प्रदर्शन भरायची जागा त्या महानंद स्टॉपला होती. येताना मात्र बिंबिंसार नगर स्टॉपला कारण रस्ता ओलांडण्यासाठी तिथेच जागा होती.
मालाड पश्चिमला जाण्यासाठी एका बसमध्ये शिरलो. तर कंडक्टर म्हणाला अहो ही खूप फिरून जाते चिंचबंदर(?) रोडवरून . पुढच्या वेळेस बोरिवलीच्या बसने हाइवेला उतरा आणि रिक्षा करून पलीकडे जा.

मेट्रोपुणेचे मुंबई महाजाल होत आहे. माफ करा.

खोदादाद सर्कल म्हणजे दादर ईस्ट. टिळक ब्रिजवरुन उतरुन आलं की. दादर-पुणे इथुनच सुटतात.

खोदादाद सर्कल म्हणजे दादर टी टी. टिळक ब्रिजवरुन उतरुन आलं की लगेचच.
दादर - पुणे शिवनेरी अजून थोडं उजवीकडे फायर ब्रिगेड जवळून सुटतात. ७-८ मिनिटं लागतात खोदादाद सर्कल कडून तिथे चालत जायला

Pages