गेल्या 25 वर्षांमध्ये पुण्याचा विस्तार अतिशय झपाट्याने झाला आहे आणि तो अजूनही होतच आहे. पुणे आणि आसपासच्या परिसरांमध्ये येऊ लागलेल्या छोट्या-मोठ्या उद्योगांमुळे शहराचा आकार वाढत राहिला आहे. वाढत्या शहरीकरणाचा ताण पुण्यातील उपलब्ध शहरी सार्वजनिक वाहतुकीवर वाढत गेला. हा वाढता ताण ती वाहतूक व्यवस्था पूर्ण करू शकलेली नाही. आजही मागणी आणि सेवेचा पुरवठा यात बरीच तफावत आढळत आहे. मागणी पूर्ण करण्यास सार्वजनिक वाहतूक सक्षम नसल्यामुळे रस्त्यावरच्या खासगी वाहनांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत चालली आहे. त्यातच अरुंद रस्त्यांमुळे वाहतुकीचा वेग आणखीनच मंदावत आहे.
मध्यंतरी पुण्यात बीआरटी (Bus Rapid Transit) व्यवस्था सुरू करण्यात आली; पण तिच्या नियोजनातील गोंधळामुळे तीसुद्धा यशस्वी होऊ शकली नाही. आता तर पुण्यातील वाहनांची संख्या पुण्याच्या लोकसंख्येपेक्षाही जास्त झालेली आहे. वाढत्या शहरीकरणाला सक्षम सार्वजनिक वाहतुकीच्या साधनाची जोड देण्याच्या हेतूने 2009-10 पासून पुण्यात मेट्रो सुरू करण्याबाबत विचार सुरू झाला. त्यामध्ये मेट्रो कशी असावी, उन्नत की भूमिगत, गेज काय असावा, रस्ताच्या बाजूने असावी की मधून, डबे कसे असावेत इ. इ. मुद्द्यांवरून सतत फक्त चर्चेतच राहिलेल्या पुणे मेट्रोच्या प्रत्यक्ष कामाला अखेर डिसेंबर 2016 मध्ये सुरुवात झाली. मेट्रोची उभारणी हे तसे अवाढव्य काम आहे. पण तरीही 2019 पर्यंत म्हणजे तीनच वर्षांमध्ये पहिल्या दोन मार्गांचे काम पूर्ण करण्याचे अवघड लक्ष्य ठेवले गेले होते. ती कालमर्यादा पाळणे शक्य नाही हे माझ्याही मनाला पटत होतेच. आज पुण्यातील मेट्रो मार्गांची उभारणी पूर्ण होण्याला अजून बराच काळ लागणार असल्याचे सध्या दिसत आहे. कारण गरवारे महाविद्यालयानंतर पुढे नदीपात्रात गेलेल्या मार्गावर अजून दुसऱ्या टप्प्यातीलच काम सुरू आहे. परिणामी डेक्कन, छत्रपती संभाजी उद्यान, पुणे महानगरपालिका येथील स्थानकांचे कामही प्रथमावस्थेतच आहे. त्यापुढे सत्र न्यायालयाजवळ होत असलेल्या जंक्शनचे कामही बरेच बाकी आहे. तीच अवस्था मंडई, स्वारगेटच्या बाजूलाही दिसते.
शहरांतर्गत चालणारी रेल्वे वाहतूक ‘मेट्रो रेल्वे’ म्हणून ओळखली जाते. ही सेवा जमिनीखाली, जमिनीवर किंवा उन्नत (elevated) अशा कोणत्याही प्रकारे उपलब्ध करून देता येते. ही सेवा सुरक्षित, इंधनाची बचत करणारी, प्रदूषणमुक्त, वेगवान आणि आरामदायक मानली जाते. मेट्रो भूमिगत असेल, तर रस्त्यावरील जागा व्यापली जात नाही, शिवाय उन्नत असेल, तर ती रस्त्यावरील केवळ 2 मीटर रुंद जागा व्यापते. लोहमार्ग आधारित सार्वजनिक वाहतूक प्रवासाचा कालावधी 50 ते 70 टक्क्यांनी कमी करते. तसेच एका प्रवाशाची एक किलोमीटर अंतरापर्यंत वाहतूक करण्यासाठी लोहमार्गावरील वाहतुकीला रस्ता वाहतुकीच्या तुलनेत एक-पंचमांश कमी इंधन लागते. ज्या ठिकाणी पीएचपीडीटी (म्हणजे Peak Hour Peak Direction Traffic) निर्देशांक 20,000 ते 45,000 आहे, तेथे मेट्रोसारखी लोहमार्ग आधारित सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सोयीस्कर ठरते. कारण मेट्रोद्वारे दर 90 सेकंदाला एक याप्रमाणे सेवा उपलब्ध करून देता येते. रस्त्यावरील वाहतूक 8,000 पेक्षा कमी पीएचपीडीटीला उपयुक्त ठरते. पुण्यातील मेट्रोच्या पहिल्या दोन्ही मार्गांचा पीएचपीडीटी निर्देशांक 2031 पर्यंत 10,000 ते 20,000 दरम्यान राहण्याचे अनुमान काढण्यात आले आहे.
सध्या पुण्यात मेट्रोचा 12 किलोमीटरचा मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला आहे. तरीही या मार्गांवरील स्थानकांचं काम अजूनही अपूर्णच असलेलं दिसत आहे. पुण्यात एकूण 3 मेट्रो मार्ग उभारले जात असून त्यांची लांबी 54.58 किलोमीटर असणार आहे. त्यापैकी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका भवन ते स्वारगेट (परपल लाईन, लांबी 16.59 किलोमीटर) अशी असून ती खडकीतील रेज हिलपर्यंत उन्नत (elevated) आणि त्यानंतर स्वारगेटपर्यंत भूमिगत असणार आहे. या मार्गावरील फुगेवाडीपर्यंतचा मार्ग 6 मार्चपासून खुला झालेला आहे. दुसरा मार्ग कोथरुडमधील वनाज ते रामवाडी (ॲक्वा लाईन, 14.66 किलोमीटर) असा असणार असून तो पूर्णपणे उन्नत असणार आहे. त्यापैकी वनाज ते गरवारे कॉलेजपर्यंतचा मार्ग वाहतुकीसाठी खुला झालेला आहे. तिसरा मार्गही पूर्णपणे उन्नत असणार असून त्याची लांबी 23.33 किलोमीटर असणार आहे. तो मार्ग हिंजेवाडीतील राजीव गांधी इंफोटेक पार्कपासून सुरू होऊन बालेवाडी मार्गे शिवाजीनगरच्या सत्र न्यायालयापर्यंत जाणार आहे. हे तिन्ही मार्ग सत्र न्यायालयाजवळ एकत्र येणार आहेत.
भारतात मेट्रो रेल्वे सेवेचा विकास आणि विस्तार अतिशय संथ गतीने झाला आहे. त्यासाठी पुढील मुद्दे कारणीभूत ठरलेले आहेत.
• सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबाबत स्पष्ट धोरणाचा अभाव
• आवश्यक स्रोतांची कमतरता
• देशातील कायदेशीर व्यवस्था
• मेट्रोसंबंधीच्या तज्ज्ञांची कमतरता
• कार्यक्षम संस्थात्मक व्यवस्थेचा अभाव
मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी देशातील अकार्यक्षम संस्थात्मक व्यवस्था हा सर्वात मोठा अडथळा ठरला आहे. मेट्रो रुळांवर आधारित व्यवस्था असली तरी सध्या तिच्या उभारणीसाठी कोणतेही एक मंत्रालय किंवा केंद्रीय संस्था जबाबदार नव्हती. त्यामुळे हे प्रकल्प मंजूर होऊन प्रत्यक्ष कामाची सुरुवात होईपर्यंतच बऱ्याच अडथळ्यांना सामोरे जावे लागत होते. पण मेट्रो रेल्वे सेवा सुरू करण्याची देशात वाढत असलेली मागणी लक्षात घेऊन 2017 मध्ये मंजूर करण्यात आलेल्या नव्या मेट्रो रेल्वे धोरणामध्ये देशातील मेट्रो रेल्वे विकासाची जबाबदारी केंद्र सरकारच्या आवास आणि शहरी व्यवहार मंत्रालयाकडे सोपवण्यात आली आहे.
दिल्ली मेट्रोमुळे झालेले फायदे
• शहरातील रस्त्यांवरील सुमारे 3,90,000 दैनिक वाहने कमी झाली.
• शहराचा मध्यवर्ती भाग आणि शहराच्या जवळपासची ठिकाणे यांच्यातील प्रवास जलद झाला.
• शहरांतर्गत वाहतुकीतील प्रवासाचा कालावधी 32 मिनिटांनी कमी झाला.
• इंधनाच्या वापरात वार्षिक सुमारे पावणेतीन लाख टनांनी घट झाली.
• दिल्लीच्या हवेतील प्रदुषकांचे वार्षिक प्रमाण पावणेसहा लाख टनांनी घटले.
• दिल्लीतील रस्त्यांवरील गंभीर अपघातांचे प्रमाण वर्षाला 125 ने कमी झाले.
• एकूण रस्ते अपघातांची वार्षिक संख्या 937 ने कमी झाली.
दिल्ली मेट्रो रेल्वे प्रकल्पाची व्यावहारितकता आणि यश लक्षात घेऊन केंद्र सरकारने 2009 मध्ये 20 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या देशाच्या अन्य प्रमुख शहरांमध्ये मेट्रो रेल्वे सेवा सुरू करण्याला मान्यता दिली. दिल्लीमध्ये मेट्रो सेवा सुरू झाल्यावर तिच्या खात्रीशीर आणि वेगवान सेवेमुळे रस्ता वाहतुकीवर अवलंबून असलेले प्रवासी मेट्रोकडे वळलेले आहेत.
सध्या मेट्रो सेवा उपलब्ध असलेली शहरे
• कोलकाता, मुंबई, पुणे, नागपूर, चेन्नई, जयपूर, नम्मा मेट्रो (बेंगळुरू), तीव्र गती मेट्रो (गुरुग्राम), अहमदाबाद, हैदराबाद, कानपूर, कोची, लखनौ, नोएडा. यातील सर्वच मेट्रो रेल्वे प्रकल्पांची सेवा थोड्या-अधिक प्रमाणात सुरू झालेली आहे. त्याचवेळी त्यांचे विस्तारीकरणही सुरू आहे.
सध्या सेवा सुरू न झालेले, पण उभारणी सुरू असलेले प्रकल्प
• नवी मुंबई, भोज (भोपाळ), इंदूर, पाटणा, आग्रा, सुरत, ठाणे.
मान्यता मिळालेले, पण काम सुरू होण्याच्या स्थितीत असलेले प्रकल्प
• ठाणे, विशाखापट्टणम
लिंक
https://avateebhavatee.blogspot.com/2022/03/blog-post_17.html
पुणे मेट्रोतून मी केलेल्या पहिल्या प्रवासाचा व्हिडिओ खालील लिंकवर पाहता येईल.
https://www.youtube.com/watch?v=JvTZICUysoA
हिंजवडीला जायला पण पब्लिक
हिंजवडीला जायला पण पब्लिक वापरणार नाही का? वाकडचा ट्रॅफिक वाचणार असेल तरीही?.. तिथली कुठे सुरु झाली आहे? कोथरुड ते गरवारे कॉलेज रुट सुरु झालय ना? हिंजवडीला जाणारे वापरतील की नाही हे सुरु झाल्यावर कळेल, आणि मेट्रोला डबे किती असतात , फ्रिक्वेंसी
किती असेल, कुठल्या स्तेशन्सना कव्हर केलेय,स्तेशनवर उतरले की घरी जायची सोय काय,तिथुन घरी जायला वेळ किती लागणार, गर्दीच्या वेळी झोंबाझोंबी तर नाही होणार, याचा सगळा खर्च किती अशा अनेक फॅक्टर्स वर अवलंबुन आहे नक्की काय घडेल? पण हाच एक्मेव एरिया आहे जिथे सर्वात चांगला रिइसपॉन्स मिळु शकतो.
हिंजवडी मधे सम्ध्यकाळी एक्दम सगळे बाहेर पडतात आणि रस्ता एकच म्हणुन ट्रॅफिक जॅम व्हायचे, म्धल्या काळात परिस्थिती सुधरली असेल कदाचित.
आमच्याकडे पण मेट्रो आहे हे
आमच्याकडे पण मेट्रो आहे हे उगा कौतुकाने संगण्यापलीकडे पुण्यात त्याचा व्यवहारात उपयोग होणार नाही
आजवर असे अनेक प्रोजेक्त पुण्यात येऊन माती खाऊन गेलेत
याचे कारण म्हणजे जे बेसिक आहे पीएमटी इथे प्रचंड मोठे ब्लॅक होल आहे
बिराटी, सायकल ट्रॅक, रिंग रोड, मेट्रो यावर कोट्यवधी अब्जावधी खर्च करण्यापेक्षा पीएमटी सुटसुटीत केली असती तर आज पुण्याच्या ट्राफिक चा बोजवारा उडाला आहे तो उडाला नसता
शहराच्या अंतर्भागात मिनी बसेस, लांब अंतरासाठी एसी बसेस, जास्त प्रवासी असलेल्या मार्गाने डबल डेकर असे अनेक उपाय करता आले असते
आशुचँप >> +१
आशुचँप >> +१
राजकारण्यांना पैसे खाण्याव्यतिरिक्त या प्रोजेक्ट्सचा काही उपयोग होतो असे वाटत नाही. औंधचा उड्डाणपूल सूचना मागवण्याआधीच बांधला पण आणि लॉकडाऊन लावून गुपचूप पाडला पण. तेव्हांचे ४० कोटी म्हणजे आताचे किती ? पाण्यात गेले.
राजकारण्यांना पैसे
राजकारण्यांना पैसे खाण्याव्यतिरिक्त या प्रोजेक्ट्सचा काही उपयोग होतो असे वाटत नाही>>>
यांची भूक कधी संपणार आहे का नाही?
राजकारण्यांना पैसे
राजकारण्यांना पैसे खाण्याव्यतिरिक्त या प्रोजेक्ट्सचा काही उपयोग होतो असे वाटत नाही >>>' अजुनही' खातात?
आपण असे पण डोक्यावर पडलेली
आपण असे पण डोक्यावर पडलेली माणसं आहोत
पूर्ण जगात. अगोदर सर्व नियोजन करतात.
मोकळ्या जागा,सार्वजनिक वाहतूक करण्यासाठी रस्ते ,मेट्रो,रेल्वे ह्यांना आरक्षण टाकून मोकळी जागा ठेवतात आणि नंतर शहर वसावतात.
आपण डोक्यावर पडलेले अगोदर दिसेल त्या जागेत बांधकाम करून लोकसंख्या वाढवतो आणि नंतर
मेट्रो,रेल्वे,मोकळी मैदाने निर्माण करण्याचा विडा उचलतो.
नवी मेट्रो सुरु झाली, चार
नवी मेट्रो सुरु झाली, चार दिवस तरी जाऊ द्यायचे ना नावे ठेवण्यास सुरवात करण्यापूर्वी!
हडपसर च्या उड्डाण पुलाला दहा
हडपसर च्या उड्डाण पुलाला दहा वर्ष पण पुरे झाली नाही आणि त्याच्या पिल्लर्स ला तडे गेले म्हणून तो बंद केला आहे . त्या पुलाच्या आजू बाजूनं पुण्यातील सन्मानिय जनता अक्षरशः किड्या मुंग्या सारखी मार्गक्रमन करत असते .
यातील सर्वात मोठ्ठा गंमतीचा भाग सांगायलाच हवा !
दोन बाजूंनी रेल्वेट्रॅक , पूल , बोगदे बनवायला सुरवात करून कुठेतरी मध्यभागी त्यादोन्ही बाजूचे बांधकाम जुळण येते इथपर्यंत जगात तंत्रज्ञान ची प्रगती झालेली आहे . फ्रांस आणि इंग्लड या देशांत भुयारी रेल्वेचे काम
एकाचवेळी सुरू करून त्यांनी 1994 मध्ये समुद्रात मध्यभागी समोरासमोर जुळवून आणले होते .
पण आपल्या पुण्यात 2015 मध्ये हडपसर मधील उड्डाण पुलाचे बांधकाम पूर्ण होत आलेले असताना ज्या मध्यभागी पुलाच्या दोन्ही बाजू जुळून येणार होत्या तेथील समोरसमोरचे दोन्ही पिलर एकमेकांना समोर आलेच नाही .
एक डावीकडे एक फूट सरकलेला होता , मग तो पाडून नवीन पिलर बांधून पूल जुळवून आणला होता .
त्या चुकीच्या पिलरचे कॉन्ट्रॅक्टर ला त वाढीव बिल सुद्धा पास करून मिळाले असेल .
कोथरुडहून हिंजवडीला जायला
कोथरुडहून हिंजवडीला जायला मेट्रो उपयोगी ठरण्यात काय अडचणी आहेत ? खरोखरच विचारत आहे.
अलिकडे उबर बरेच ठिकाणी वापरता येते लाँग डिस्टन्स साठी. पण जे रोजचे नोकरी करणारे लोक आहेत त्यांना रोजचा कार/टु व्हिल्लरचा प्रवास एक्झॉस्टींग आहे. ते ही नाही वापरणार का ?
इंदोर मध्ये पण एक ओव्हर ब्रिज
इंदोर मध्ये पण एक ओव्हर ब्रिज असाच अर्धवट सोडलाय.
कोथरुडहून हिंजवडीला जायला
कोथरुडहून हिंजवडीला जायला मेट्रो उपयोगी ठरण्यात काय अडचणी आहेत ?.. ....तो रुट अस्तित्वात आहे का? असेल तर वापरली असती लोकांनी.
कोथरुडहून हिंजवडीला जायला
कोथरुडहून हिंजवडीला जायला मेट्रो उपयोगी ठरण्यात काय अडचणी आहेत ?.. >>> असे कोण म्हणाले आहे ?
बाकीच्या मोठ्या भागात मेट्रो नाही त्यांना गाड्या चालवणे भागच आहे. त्यांच्यासाठी रस्ता शिल्लक आहे का ? पुण्याच्या लोकसंख्येच्या किती टक्के लोकांना मेट्रो सोयीची आहे ?
दिल्ली ,मुंबई,कोलकत्ता ह्या
दिल्ली ,मुंबई,कोलकत्ता ह्या शहरांची तुलना बाकी शहर शी करणेच चूक आहे.
कारण ती तुम्ही शहर ब्रिटिश नी लक्ष देवून वसवली आहेत.
त्या मुळे मोकळ्या जागा,खेळाची मैदाने,सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही तुलनेने चांगली च आहे.
त्या मध्ये आपण कॉलर टाइट करण्या सारखे काही नाही .
एक नवी मुंबई, चंदीगड ह्या विषयी आपण बोलू शकतो
पुल न जुळण्याचं कारण दोन
पुल न जुळण्याचं कारण दोन वेगवेगळे कंत्राटदार आणि दोघांचे टेंपलरन वेगळे असणार.
हडपसर खुर्द आणि हडपसर बुद्रुक आहेत काय?
नाही , एकच हडपसर आहे .
नाही , एकच हडपसर आहे .
वाय टाईप पूल आहे , लांबी जास्तीत जास्त 500 मीटर .
या पुलाच्या जवळच अजून एक पूल मागरपट्टावासिया साठी 2008 मध्ये बनवला होता , पण चुकीच्या डिजाईन मूळे लोकं पुलाखालून जाणे पसंद करतात !
एकंदरीत पुण्याच्या बकालपणा वाढविण्यात अधिकाऱ्याबरोबर पुढाऱ्यांचा देखील हात आहे .
शहराच्या अंतर्भागात मिनी बसेस
शहराच्या अंतर्भागात मिनी बसेस, लांब अंतरासाठी एसी बसेस, जास्त प्रवासी असलेल्या मार्गाने डबल डेकर असे अनेक उपाय करता आले असते..
मुळीच नाही! डबल डेकर फक्त आमच्या मुंबईचीच!!!
डबल डेकर आणि जोड बसेस होत्या
डबल डेकर आणि जोड बसेस होत्या कि पुण्यात.
डबल डेकर पुण्यात व्यवस्थित
डबल डेकर पुण्यात व्यवस्थित होती अगदी 1997-98 पर्यंत
माझा काही जास्त पुण्याशी
माझा काही जास्त पुण्याशी संबंध नाही सातारा मुंबई करताना येईल तेवढाच संबंध.
आता बायपास झाला आहे पाहिले स्वारगेट ल जावं च लागायचे.
स्वारगेट एसटी डेपो समोर पाहिले रोड क्रॉस करणे सोप होते .
पण काय डिझायनिंग चे रस्ते बांधले आहेत
डेपो समोर रस्ता क्रॉस करणे म्हणजे महा दिव्य आहे.
कोणती गाडी कुठून येते त्याचा काही अंदाज च येत नाही.
मध्ये नात्यात असलेल्या लग्नासाठी पुणे आळंदी आणि परत आळंदी पुणे असा प्रवास करायचा योग आला बस नी.
महा प्रचंड ट्रॅफिक जाम.
चालत लवकर पोचेल माणूस .
पण चालायला रुंद फूट पथ पण नाहीत.
Horrible.
पिंपरी फुगेवाडी मेट्रो प्रवास
पिंपरी फुगेवाडी मेट्रो प्रवास केला मागच्या शनिवारी मुलीबरोबर. पार्किंग नाही अजून त्यामुळं अर्धा किमी दूर दुचाकी लावली आणि स्टेशनवर गेलो, छान प्रवास झाला, पण निवड करायची वेळ आली तर मी लोकल, पी एम टी किंवा शेअर रिक्षा प्रेफर करेन. कालच्या सकाळला बातमी होती की मेट्रो काय / कशी आहे ? त्याचे क्रेझ सम्पले आणि शनिवारी का रविवारी फक्त 650 प्रवाशांनी पूर्ण दिवसात प्रवास केला ह्या मार्गावर. पाच वर्षांपूर्वी काम सुरू झाले होते, पिंपरी स्वारगेट मधला फक्त 5 किमी टप्पा पूर्ण झालाय. खडकीच्या पुढे खांब पण दिसत नाहीत. पिंपरी शिवाजीनगर मार्गाला समांतर लोकल ट्रेन पण आहे. त्यामुळे हा मार्ग कितपत व्यवहार्य आहे हे लवकरच कळेल. गरवारे वनाज मात्र चांगला वाटत आहे. हिंजवडी शिवाजीनगर पण चांगलाच चालावा फक्त जरा लवकर काम व्हावे. अजून 10 वर्षानी जेंव्हा पुण्याची लोकसंख्या खूप वाढली असेल तेंव्हा मेट्रोचे महत्त्व समजेल.
शहरं असो, मुलं असो, की
शहरं असो, मुलं असो, की शहरातले नागरिक. दोन गोष्टी आहेत- एक तर 'अपब्रिंगिंग'. दुसरी- 'नवीन सवयी'. शिस्त, मॅनर्स आणि सोशल बिहेवियर या गोष्टी नंतर आपोआप येतात.
जागा, देश आणि प्रदेश बदलले की पॅरामीटर्स बदलतात, मात्र तत्त्वं तीच राहतात. असं नसतं तर भारतीयांनी परदेशात जाऊन प्रामाणिकपणे नियम पाळले नसते.
---
'वाहतुक' या गोष्टीचा अनेक देशांनी अनेक समुहांनी अनेक अंगांनी अभ्यास केला आहे. जगभरात अशा अनेक संस्था आहेत. तशा भारतातही आहेत, आणि विश्वास बसणार नाही, चक्क पुण्यातही आहेत. यातली एक- 'सेंत्रल इंस्टिट्युट ऑफ रोड ट्रान्स्पोर्ट'. या संस्थेने केलेली सम्शोधने. अभ्यास, सर्वे आणि त्यातले निष्कर्ष किती शहरांनी, संस्थांनी आणि लोकांनी प्रमाण मानले आहेत- हाही अभ्यासाचा विषय आहे.
सर्ट (सेंट्रल इंस्टिट्युट ऑफ रोड ट्रान्स्पोर्ट) म्हणते- 'वाहनांना रस्त्यावर पुरेशा 'रुंदीची' जागा उपलब्ध करून देणे हा आजकालच्या वाहतुकीच्या अराजकतेवरचा उपाय नव्हे. उपाय आहे- एका प्रकारच्या वाहनांसाठी एकच 'नॅरो', 'डिसिप्लिन्ड' आणि 'गायडेड' लेन उपलब्ध करून देणे. 'इतर' प्रकारच्या वाहनांना 'इतर' प्रकारांसाठीच्या लेन्समध्ये जाण्यास बंदी घालणे.
याचंच उपप्रमेय- एकाच दिशेने (रीड: प्रकारच्या) जाणार्या वाहनांसाठी (आणि लोकांसाठी) 'नॅरो' पण 'डेडिकेटेड' लेन. म्हणजे काय ? तर फ्लायवोव्हर. अंडरपास. ग्रेड सेपरेटर. (आणि मेट्रो, मोनोरेल, निओ मेट्रो.. बगैरे)
यामुळे काय होईल ?
----
सध्या काय होतेय?
१) बससारख्या अजस्त्र वाहनांसोबत छोटी वाहने (दुचाक्या) ज्या पद्धतीने हुतुतू आणि पळापळी खेळत असतात, त्यामुळे अनेक अपघात होतात. बसच्या 'मागच्या' चाकाने दुचाकी २५ फूट फरफटत नेली अशा बातम्या आपण वाचतो की नाही ? त्यामुळे अंगावर काटा येऊन चटकन तुम्ही पेपरचं पान उलटवलंय किंवा मोबाईल्/लॅपटॉपवर स्क्रोल केलेय की नाही?
२) बस ड्रायव्हर लोकांशी हुज्जत घालणारे लोक तुम्ही बघितलेत की नाही? बसमध्ये बसलेल्या २५-५० किंवा त्यापेक्षा जास्त लोकांचा त्यामुळे खोळबा झालेला झालेला?
३) मंडई, स्वारगेट, स्टेशन, फडके हौद, कसबा, गणेशपेठ, बुधवार, लक्ष्मी-केळकर-कुमठेकर-सदाशिव, टिळक रोड यांतून मार्ग काढणार्ञा पीएमटी ड्रायव्हर्सचा चेहेरा बघण्यात आला का कधी? इथं एकाच वेळेला किती प्रकारची वाहने दिसतात की नाही ?
४) बसम्ध्ये किती लोक बसतात ? आणि कारमध्ये ? शहरातल्या महागड्या जागेचा विचार केला तर कार असणारे किती लक्झरी एंजॉय करत आहेत, याचा विचार करता येणं शक्य आहे का ?
५) मग साधारण बसच्या २०० स्क्वे.फुटात एका बसमध्ये बसणारे माणसं, आणि साधारण कारच्या ४०-५० स्क्वे.फुटात कारम्ध्ये बसणारी माणसं- यांमध्ये प्राधान्य कुणाला द्यावं? आणखी एक म्हणजे, दुचाकी किंवा चारचाकीतला माणूस आणि शहर बस वाहतुकीतला माणूस- यांमध्ये अपघातात त्यातल्या त्यात सुरक्षित कोण असतं ?
----
हा विचार नीट केला तर बीआरटी हवी की नको ? ती नीट चालली तर जास्त लोक वापरतील की नाही ? ती जास्त चालली तर जास्त लोक वापरतील की नाही ?
याचं फॉर्वर्ड इंटेग्रेशन केलं तर हे सारं काही मेट्रोबद्दल म्हणता येईल की नाही?
जगभरात ते मॉडेल यशस्वी झाल्याने आपले राजकारणी आणि नोकरशहा नाईलाजाने आणि उशिरा का होईना, त्यासाठी बजेटची तरतूद करत आहेत - हे बरोबर आहे का?
---
सारं नीट होईल.
प्राधान्यक्रम सर्वदूर असतात, आणि आपल्यासारख्या गरीब देशांत तर असतातच असतात. शिस्त पाळणं आणि रांगेत राहणं हे अशा ठिकाणी बहुधा सेकंडरी असतं. पण गेल्या २ वर्षांचा कोविड काळ आपल्यापैकी कुणी विसरलंय का?
कुणी सांगावं, शिस्त पाळण्यासाठी परदेशात जायला लागत नाही, आता इथंच त्याचं समाधान मिळतं, असंही लोक म्हणतील ? मी विनोद करतोय असं मलाही वाटतं, पण हे असं खरंच झालं तर काय ?
--
त्या 'सर्ट'च्या मुद्द्यावरून आता एक आठवलं. पुण्याहून मुंबईला जायला आधी एकच रस्ता होता. (तोच तो- ज्यावर कार्ले-भाजे, कामशेत, पवना धरण, लोणावळा आणि त्यापुढचा रम्य घाट असं सारं नोस्टॅलिजिक करणारं आहे. आणि या रस्त्यावरून असंख्य वेळेला दिलीपकुमार देवानंद किशोर वहिदा राज पासून ते थेट सचिन रवीना माधूरी अमिताभ शाहरुख 'अस्से' गेल्याचे बघितलेले लोक. (ही एक न्यारीच जात! ). एक्सप्रेस हायवेचं (त्याकाळी) डोळे विस्फारून टाकणारं बांधकाम आमच्या समोरच झालं. आता लोक मेट्रोत फिरायला येतात तसे तेव्हा एक्साईटमेट म्हणून एक्सप्रेसवेला फिरायला जायचे. (सचिन त्याची 'ती' फेरारी' चालवता यावी म्हणून एक्सप्रेसवेवर आलेला, ही बातमी आठवते का?) आमचा मित्र एकदा नवाच हायवे असताना मुंबईला जाऊन आला तेव्हा म्हणाला- 'नथिंग! बारीक रस्ता होता, तेव्हा लोक एकमेकांच्या मागेपुढे असं रेसिंग नि पकडापडी करायचे लोक. आता फरक इतकाच पडला, की लेन्स वाढल्याने एकमेकांच्या बाजूबाजूने राहून करतात!'
२० वर्षांत २० पट ट्रॅफिक वाढली असेल. (इतकी की, आता नवीन ६ की ८ पदरी 'मिसिंग लिंक' बांधायला घेतली आहे.)
आता असा मुर्खपणा कुणी करताना क्वचित दिसेल. बर्यापैकी सारे पोचायच्या घाईत, पण तरीही बर्यापैकी शिस्तीत असतात. २० वर्षांत थोडं अप्ब्रिंगिंग झालं. 'मजा' संपली. 'युटिलिटी' वाढली. ये तो होनाही था.
---
मेट्रोचं ही तसं होईल. मीच पहिल्या दिवशी म्हणालो - 'हं. ३-४ फेजमधली पहिली फेज. तीतल्या ३५ किमी मधले पहिले १२ किमी कसेबसे रडतराऊत पूर्ण झाले. त्यातही खुद्द पुण्यात जेमेतेम ५ किमी. त्यातही. स्टेशनं अर्धी. जिने पूर्ण नाहीत. पार्किंग नाही. कनेक्टेड ट्रान्स्पोर्ट नाही..' वगैरे.
मेट्रोचंही तसं होईल. त्याशिवाय इलाजही नाही. शिस्त आणि कोड ऑफ कंडक्ट येईल आपोआप. आपण सगळ्याच बाबतीत जरा असंतुष्ट आणि तरीही मोकळेढाकळे असल्याने थोडं उशिरा येईल, इतकंच काय ते.
त्या व्हायरल झालेल्या मेट्रोकाकांना कदाचित तेच म्हणायचं असावं. 'आताशी तर सुरूवात आहे. तुम्ही नंतर या बघू.'
साजीरा छान पोस्ट. आपण
साजीरा छान पोस्ट. आपण बीआरटीला शिव्या देत आहोत पण कोणी किवळे ते औंध (जवळजवळ 15 किमी) पी एम टी ने प्रवास केलाय का? अत्यन्त सुनियोजन आहे बी आर टी चे इथे. अतिशय कमी वेळात, जलद पोचतो माणूस. असेच नियोजन इतर मार्गांवर पण व्हावे. निगडी ते खडकी बी आर टी पण चांगलीच आहे फक्त अजून शिस्त हवी आणि पी एम टी मधेच बंद पडू नये.
काही स्टेशनला फीडर बस सर्विस
काही स्टेशनला फीडर बस सर्विस सुरू होते आहे
https://www.google.com/amp/s/indianexpress.com/article/cities/pune/feede...
साजिरा उत्तम पोस्ट
साजिरा उत्तम पोस्ट
मुंबईचा आकार हा तळहातासारखा
..
एक कमिटी बनवा कुठे काय
एक कमिटी बनवा कुठे काय सुधारणा हव्यात. माबोचे दोन आइडी कमिटीत घ्या.
पुण्यात बरेच सामाजिक काम
पुण्यात बरेच सामाजिक काम करणारे तज्ञ लोक आहेत ज्यांनी अशा अनेक सूचना केल्या होत्या. पण प्रत्येक राजकीय पक्ष व नेते स्वतच्या मतदारसंघावर फोकस करतो. निर्णय स्वतच्या मतदारांना इंप्रेस करण्यासाठी घेतले जातात. अधिकारी सुध्दा आपल्याला सोयीचे नेमले जातात. त्यामुळे हा प्रायॉरीटिजचा सिक्वेन्स चुकतो.
वर हे अनेक लोक जे सांगत आहेत
वर हे अनेक लोक जे सांगत आहेत तेच बिचारे स्वयंसेवी संस्था चे लोक सांगत होते, कि पी एम टी ला पैसे द्या, पुरेसे आहे. पण पुण्यात काय सगळेच तज्ञ असे म्हणुन नेत्यांनी त्यांची खिल्ली उडवली.
एक कमिटी बनवा कुठे काय
एक कमिटी बनवा कुठे काय सुधारणा हव्यात. माबोचे दोन आइडी कमिटीत घ्या. >> +१११११.
साजिरा, शा.मा. - चांगली
साजिरा, शा.मा. - चांगली माहिती/पोस्ट्स. शा.मा - ही नंतरचीही चांगली माहिती होती. उडवलेली दिसते.
Pages