श्रावण आणि पुरण!

Submitted by सांज on 10 August, 2021 - 00:31

श्रावण मासी हर्ष मानसी..’ वगैरे सगळं लिहण्या-वाचण्या पुरतं ठीक आहे. पण आता कोणी मान्य करो अथवा न करो, श्रावणाची एंट्री ही समस्त महिला वर्गाच्या मनात धडकी भरवणारीच असते. आणि अशा दहशतीमागचा कर्ता-सवरता असतो तो ‘पुरणाचा स्वयंपाक’! श्रावण महिना म्हटलं की सणावारांची गडबड हे तर ठरलेलच असतं.. श्रावणातले शुक्रवार, नागपंचमी, श्रावणी सोमवार, राखी पौर्णिमा, गोकुळाष्टमी, पोळा.. इ.इ. आणि ही तर फक्त सुरुवात.. पुढचा भाद्रपद तर याहून अधिक डेंजर असतो. आणि यापैकी बहुतांश वेळेला करावा लागतो तो हा पुरणाचा स्वयंपाक! याला आपण स्वयंपाकातला ‘ड’ गट म्हणू शकतो. बरं, पुरणाचा स्वयंपाक म्हणजे केवळ पुरणपोळी असं समजणार्‍यांना आत्ताच सांगते, तुम्ही घोर अज्ञानात जगत आहात. यूपीएससी चा सिलॅबस जसा व्हास्ट असतो नं तसाच या पुराणा-वरणाच्या स्वयंपाकाचा सिलॅबस पण भल्या-भल्यांना घाम फुटायला भाग पाडतो. एखाद-दुसरी चटणी, कालवलेलं मेतकूट, पंचामृत, कोशिंबीर, एक फोडभाजी, एक पालेभाजी, तळलेले पापड, भजी, कुरवड्या, कटाची आमटी, कढी, साधं वरण, सुधारस, लिंबाची फोड इ.इ. सुग्रास दागिन्यांनी वर्तुळाकार ताट सजलं की मधोमध येऊन विराजते ती लुसलुशीत पुरणपोळी! आणि याला म्हणतात ‘पुरणाचा स्वयंपाक!’ आणि हा जिला जमतो ती असते खरी सुगरण!

असा हा पुरणाचा स्वयंपाक श्रावणात, चार शुक्रवार, नागपंचमी, पोळा इ धरून किमान 5-6 वेळा तरी होतोच होतो. म्हणजे किमान मराठवाड्यात तरी असं चित्र आहे. मोठ्या शहरांनी आता यातलं फारसं काही उरलेलं नाही.. बहुतांश ठिकाणी तो आऊट ऑफ सिलबस होण्याच्या मार्गावर आहे. पण मराठवाड्यात तरी अजून तसं नाही. आला सण की शिजवा पूरण ही पॉलिसी अजून तरी इथे अस्तित्वात आहे. मराठवड्यातल्या देवांना पुरणाशिवाय दूसरा नैवेद्य चालतच नाही यावर आता माझा ठाम विश्वास बसलेला आहे. पण त्यामुळे मला वाटतं सणांची authenticity अनुभवता येते. साध्या श्रीखंड, खीर वगैरे क्षुद्र पदार्थांवर इथे सणांची बोळवण अजिबात होत नाही. आणि असा चारी-ठाव स्वयंपाक करणार्‍या निष्णात बायका इथे घरोघरी सापडतात. म्हणजे अर्थातच मी आधीच्या पिढी विषयी बोलतेय. माझ्यासारखा तरुण वर्ग अजून तरी ट्रेनिंग फेज मध्येच आहे. एकवेळ नुसती पुरणपोळी वगैरे करणं जमू शकतं, पण समग्र ‘पुरणाचा स्वयंपाक’ अतिशय कुशलतेने करून, म्हणजे एकीकडे तर्हे-तर्‍हेच्या फोडण्या देत दुसरीकडे योग्य consistency मध्ये पूरण वाटणं (हो, consistency फार महत्वाची असते.. पोळ्यांची कणीक आणि पूरण ह्यांची consistency सारखी असली तरच पुरण सगळीकडे सम-प्रमाणात पसरून सुंदर पोळी तयार होते) किंवा एकीकडे भजी तळत दुसरीकडे लुसलुशीत पोळ्या लाटणं आणि वर प्रसन्न मुद्रेने सगळ्यांना आग्रह करत जेवायला वाढण यासाठी नेक्स्ट लेव्हल ची स्किल्स असावी लागतात. हे साक्षात अन्नपूर्णेचच काम आहे॰

बरं या अशा सगळ्या प्रकारच्या चवी आणि रंगांनी संपन्न अशा आर्टिस्टिक स्वयंपाकाचा आवडीने आस्वाद घेणार्‍या मंडळींचीही इकडे वानवा नाही. बसल्या बैठकीला 3-4 मध्यम आकाराच्या, तुपात थबथबलेल्या पुरणपोळया, सोबतचे सगळे पदार्थ तोंडी लावत, घासागणिक अन्नपूर्णेच कौतुक करत खाणे आणि वर कटाची आमटी पैज लावून ओरपणे यालाही स्किल्सच असावी लागतात. माझ्या लहानपणी सणावारांना एकावेळी 15-20 माणसांची पंगत बसलेली आणि पैजा लागलेल्या मी पाहिल्या आहेत. एक-दोघी जणी वाढायला उभ्या आणि आई किंवा आजी सर-सर गोल गरगरीत पोळ्या लाटत बसलेल्या आणि आम्ही सगळे मस्त चेष्टा-मस्करीसह जेवतोय हे मनावर कायमचं कोरलं गेलेलं चित्र आहे. या बायका हे सगळं तेव्हा कसं पेलायच्या याचं आता नवल वाटतं.

महालक्ष्म्यांचा (म्हणजे गौरीचा, मराठवाड्यात महालक्ष्मी म्हणतात) स्वयंपाक तर अतिशय क्लिष्ट! वर उल्लेखलेले सगळे पदार्थ प्लस सोळा प्रकारच्या भाज्यांचा compulsory वापर, साखरभात, मसालेभात, साधा भात, सोवळयातल वळवट, त्याची खीर, उडीदाचे पापड इ.इ.इ.

बहुतेक वेळा बायकांचा दिवस जातो यात.

सध्याच्या वेगवान जगात जिथे बायका-मुली बाहेर पडून इतरही कामं करतायत तिथे आता हे सगळं जमवण थोडसं कठीणच आहे. पण वर्षातून एकदातरी हा असा सुग्रास स्वयंपाकाचा घाट घालून तो चाखण्याचा आनंद सगळ्यांनी अनुभवायलाच हवा असं वाटतं. बाहेर तर्हे-तर्हेच्या थाळ्यांचा आस्वाद घेत असताना आपली ही परिपूर्ण, मराठमोळी, चविष्ट पुरणा-वरणाची थाळी आपण नक्कीच जपायला आणि पुढच्या पिढीपर्यंत पोचवायला हवी..:)

सांज
www.chaafa.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरं आहे. बहुधा ज्या व्यक्ति अशा साग्रसंगीत जेवणाच्या आठवणींनी उसासे टाकतात त्यांच्या त्या आठवणी इतरांनी त्यांना ती जेवणे रांधून आयतं वाढण्याबद्दल असतात Happy पण जे लोक (बायका) ते सगळं रांधतात त्या "किती वर्षे झाली बै असं सोवळ्याने ३ तासात १६ पदार्थ बनवून दुसर्‍यांना आग्रह करून वाढलं नाही" असे उसासे टाकत असतील का? Happy

खरं आहे. बहुधा ज्या व्यक्ति अशा साग्रसंगीत जेवणाच्या आठवणींनी उसासे टाकतात त्यांच्या त्या आठवणी इतरांनी त्यांना ती जेवणे रांधून आयतं वाढण्याबद्दल असतात ! हो !

मी स्वतः देशस्थ असल्याने हे अनुभवले आहे. पुरुषांचीच जेवणे तीन साडेतीन ला होत, मग बायकांची पंगत ! डायबेटिक लोकांना अगदी वाईट ! शिवाय पहिली पंगतच चारला बसली हे अगदी अभिमानाने साण्गितले जायचे !
आमच्या शेजारी एक कोकणस्थ बाई होत्या, त्यांना आम्ही जेवायला बोलवायचो. त्या नेहेमी म्हणत की तुम्ही स्यवंपाक अगदी छान करता पण फार आग्रह करून चव घालवता !

एकत्र कुटुंबांत जेव्हा रांधा-वाढा-उष्टी काढायला अनेक हात असायचे आणि त्या सर्वांचे कष्ट सार्थ ठरतील इतकी जेवणारी तोंडं असायची तेव्हाच्या प्रथा आहेत या.
एकट्यादुकट्या बाईने - आणि बाईनेच! - 'एकीकडे भजी तळत दुसरीकडे लुसलुशीत पोळ्या लाटणं आणि वर प्रसन्न मुद्रेने सगळ्यांना आग्रह करत जेवायला वाढणं' वगैरे अपेक्षा केवळ येडपटच नाहीत, तर अमानुष आणि क्रूर आहेत.

हाहा मस्त चालूये Happy

सस्मित, खूप आभार!

सायो, तुम्ही मला साॅरी म्हणण्याचा काही प्रश्नच नाही. मुळात मी लेखात या प्रथा किती महान आहेत आणि सगळ्या बायकांनी त्या कशा फाॅलो करायला हव्यात असं काहीही म्हटलेलं नाही. तसं मला म्हणायचंही नाहीये.

बाकी सर्वांचा सूर सारखाच असल्याने सामाईक प्रतिसाद देतेय..

लेखाच्या शेवटच्या पॅरा मध्ये मी जे लिहलंय त्यात सारंच आलं. केवळ वर्षातून एकदा आवड असणाऱ्यांनी घाट घालावा असा साधा विचार मांडला, वर भरतजी म्हणाले तशी थाळी मिळायला लागली तर तोही घालण्याची आवश्यकता नाही!
लेख sarcastically आणि विनोदी अंगाने लिहला आहे.

ज्यांना आवडतं त्यांनी करावं, ज्यांना नाही आवडत त्यांनी करू नये.. सोप्पं आहे!
बाहेरून म्हणा किंवा स्वत: करुन म्हणा पण या पदार्थांचा आस्वाद मात्र घ्यावा असं नक्कीच वाटतं.. आणि असे पदार्थ असतात व ते फास्ट फूड इतकेच चविष्टही असू शकतात हे पुढच्या पिढीला सांगावं असंही वाटतं..

बायकांनी स्वत:चा पिट्टा वगैरे अजिबात पाडून घेऊ नये. अशा दिवशी, भरपूर मोबदला देऊन एखादी सुगरण स्त्री नेमावी आणि करून घ्यावं, तेवढाच त्या स्त्रीला स्वत:च्या स्किल्स माॅनेटाईज करायला हातभार!
आणि नाहीच जमलं तर नवऱ्यांना लावायचं की कामाला.
हे अर्थात आवड असणाऱ्यांविषयी!
ज्यांना पीअर प्रेशर वगैरे वाटतं त्यांनी भानगडीत पडूच नये. जे आवडतं ते करत रहावं!

Happy

Nice सांज.. good idea.. कित्ती बरं होईल परंपरा aur अनुशासन वाले लोक तुमच्यासारखे विचार करायला लागले तर..

वेगळं वळण लागलय खरं धाग्याला. पण मला वाटतं ते आवश्यक आहे हे ठासून सांगायला (आता कोणाला, हा मुद्दा बाजूला ठेउ. लेखिकेला नाही हे नक्की.) की खरच हे घरातील स्त्रियांना करायला लावणं आणि स्वतः काम न करता ऐतखाऊपणे खाणं थांबायला हवं.

>>> मुळात मी लेखात या प्रथा किती महान आहेत आणि सगळ्या बायकांनी त्या कशा फाॅलो करायला हव्यात असं काहीही म्हटलेलं नाही. तसं मला म्हणायचंही नाहीये.
यासाठी खूप खूप धन्यवाद.

या विषयावर उपरोधिक आणि विनोदी लिहिता येणं हीसुद्धा एक पायरी आहे, ती ओलांडल्याबद्दल तुमचं अभिनंदन.

पण होतं काय, की 'भरपूर मोबदला देऊन एखादी सुगरण स्त्री नेमावी आणि करून घ्यावं ... आणि नाहीच जमलं तर नवऱ्यांना लावायचं की कामाला' अशा प्रकारचे उल्लेख तरीही त्या प्रथांची भलावणच करतात.
वर 'आम्हाला मनाविरुद्ध हे करावं लागतं' अशा अर्थाचे प्रतिसाद आलेच आहेत, ते यामुळेच.

असो. वैयक्तिक तुमच्याशी हेवादावा नाही हा, पण अशा प्रथांचं ग्लोरिफिकेशन केलं जाऊ नये असं कळकळीने वाटतं म्हणून हा पोस्टप्रपंच.

>> लेख sarcastically आणि विनोदी अंगाने लिहला आहे.
ज्यांना आवडतं त्यांनी करावं, ज्यांना नाही आवडत त्यांनी करू नये.. सोप्पं आहे!>> तुम्ही म्हणताय तर तसं पण मल तरी ह्या लेखात कुठेही सार्केझम किंवा विनोद शोधूनही सापडला नाही. दोनदा वाचला. इनफॅक्ट तुम्ही हे फार कौतुकाने लिहिलंय हे व्यवस्थित जाणवतंय. अतिशय आउटडेटेड आहेत ह्या सणवाराच्या निमित्ताने ‘बायकांकडूनच’ केल्या जाणार्‍या अपेक्षा!!!

पुरूषांकडून सणावाराच्या अपेक्षा करायला हरकत नाही पण बदल काय घडणार? ते नाही म्हणणार आणि अगदीच प्रकरण पेटलं तर घरचे जिला करायची आवड आहे तशी दुसरी बायको आणणार. ज्या पुरूषाला हौशीने करायचे आहे तो न बोलता स्वतः करतोच/ मदत करतोच आणि त्या करणार्‍या गटाकडे अजून काय अपेक्षा करायच्या?
बायकांकडून केल्या जाणार्‍या अपेक्षा आउटडेटेड नाहीत. आजही भारतात ७९% महिला घरी आहेत, घरून अर्थार्जन करत असतील-नसतील. त्यांच्याकडे ह्या अपेक्षा पूर्ण करायला लागणारा वेळ, कौशल्य, आणि श्रमसंस्कार सगळं आहे. जिथे हे नाही तिथे "आग से ठंडक बर्फ से गरमी ... " करण्यात कशाला कोण वेळ घालवेल??

छान सिमंतिनी.
>> बायकांकडून केल्या जाणार्‍या अपेक्षा आउटडेटेड नाहीत. >>बरं!!

>>>>>>>भारतात ७९% महिला घरी आहेत, घरून अर्थार्जन करत असतील-नसतील. त्यांच्याकडे ह्या अपेक्षा पूर्ण करायला लागणारा वेळ, कौशल्य, आणि श्रमसंस्कार सगळं आहे. जिथे हे नाही तिथे "आग से ठंडक बर्फ से गरमी ... " करण्यात कशाला कोण वेळ घालवेल??

घरी असल्या म्हणजे त्या बायकांना गृहीत धरायचे का? कामे, मुलाबाळांचे सर्व करतातच की त्या. घरी आहेत हे काही जस्टिफिकेशन होउ शकत नाही. हां आवड असेल त्यांनी जरुर करावे. शिवाय बाहेर काम न करणं हे सुद्धा बाईवर लादलेलच असतं - नवर्‍याकडुन किंवा सासरच्यांनी - मग त्यात अनेक कारणं आहेत - तू आधी मुलांचं बघ. कधीकधी पुरुष असुरक्षिततेच्या भावनेतूनही स्त्रीला बाहेर भरारी घेण्याचे पंख छाटतात.

Lol मी कंटाळले आहे ह्या दळणाला. शेवटी सर्व चर्चा "रिग्रेसिव्ह वागण्याचे स्वातंत्र्य आहे" इथेच संपतात. नवं काही हाती येत नाही.

स्वगत - त्यापेक्षा एकदाच मेजॉरिटी स्त्रिया घरी असतात, आपल्या घरी असण्याने व्हॅल्यू अ‍ॅडिशन काय हे शोधत असतात, त्या करतात ते त्यांना करू द्यावे व अजून तेच करण्यास उत्तेजन द्यावे हे मनापासून स्वीकारावे. त्यांचे भावविश्व व्हॅलिडेट होईल असे लेख, गोष्टी लिहाव्या. तो मोठा ग्राहकवर्ग आहे. यशस्वी लेखिका होणे पुस्तके विकली जाणे, अशा बाबतीत फार उपयोगी मार्ग आहे हा Happy

बाहेर काम न करणं हे सुद्धा बाईवर लादलेलच असतं - नवर्‍याकडुन किंवा सासरच्यांनी - मग त्यात अनेक कारणं आहेत >>> असेलही पण अशा अर्थाची एकही पोस्ट मी मायबोलीवर पाहिलेली नाही. दोष माझा आहे मान्य. स्वेच्छेने घरी आहोत हेच दळण वारंवार येतं. "इच्छा आहे पण आम्हाला सध्या इंफ्रास्ट्रक्चर नाही" अशा पोस्टी दाखवा. (घरगुती भांडण ऐकण्याची हौस नाही तर सामाजिक इंफ्रास्ट्रक्चर किती कमजोर आहे हे ऐकायचे आहे.)

>>>>>त्यापेक्षा एकदाच मेजॉरिटी स्त्रिया घरी असतात, आपल्या घरी असण्याने व्हॅल्यू अ‍ॅडिशन काय हे शोधत असतात

सी हेच मला पटत नाही त्या स्त्रियांचं. अजिबात व्हॅल्यु अ‍ॅडवायची गरज नाही. दे आर प्राईसलेस इन देम्सेल्व्हस. मनात आलं तर हा घाट घालावा अन्यथा टांग द्यावी. अशा पुरणावरणाच्या घाटाची खरच आवश्यकता नाही स्वतःच्या अस्तित्वाचे कारण कोणाच्या ही पिताश्रींना पुरवायला. गिल्ट वाटायची अज्जिबात गरजच नाही. 'बाहेर नोकरी न करणं' हा सासर-नवरा-आपण असा टीम डिसिजन आहे ना. मग आता तो ट्विक करत कशाला बसायचं. व्हील्यु अ‍ॅडच नाही करायची. म्हणजे स्वतःला अजिबात कमी लेखायचं नाही.

परत हां आवड असेल तर जरुर करा.

>>>>स्वेच्छेने घरी आहोत हेच दळण वारंवार येतं.>>>>
हं तसं असेल तर मग बोलणंच खुंटलं. पुरुष जेव्हा नोकरी नसल्यामुळे घरी असतात (काही कारणाने) तेव्हा त्यांना फार कानकोंडं वाटतं, डिप्रेशन येतं वगैरे वगैरे. स्वेच्छेने घरी रहाणार्‍या स्त्रियांबाबत मला काहीच बोलायचे नाही. हाताची घडी तोंडावर बोट.

पुरणावरणाच्या घाटाची खरच आवश्यकता नाही >> हे तुझं मत झालं. सासर-नवरा-आपण अशी टीम आहे तोवर ठीक आहे. स्त्रीने विसंवादी सूर लावला की तिचे व्हॅल्यू डिप्लीशन होणारच. फार थोडी घरं अशी असतात की तिच्या मताला मान देवून आता कुळाचार बंद करू असं ठरवतील. १६ ऐवजी ५ निदान एवढ तरी करं असल्या वाटाघाटी चालूच असतात. सून बदलू पण कुळाचार चालू ठेऊ असंच चित्र बहुतेक जागी दिसते.

पुरुष जेव्हा नोकरी नसल्यामुळे घरी असतात (काही कारणाने) तेव्हा त्यांना फार कानकोंडं वाटतं, डिप्रेशन येतं वगैरे वगैरे. >> Lol अरे तबभी उसकी बिवी को भी पूछो कोई......

>>>>की तिचे व्हॅल्यू डिप्लीशन होणारच.
होय जो कमावतो त्याचा वरचष्मा असतो हे सत्य आहे. ते काही बदलता येणार नाही.
आणि खरय शेवटी आपल्या आपल्या चौकटीत आपणच तडजोड करुन किंवा कसेही आनंद शोधायचा असतो. तेव्हा ...... Sad दळणच होतय खरं.

दमणूक होते हे खरे आहे एकदम. बहिणीचे लग्न झाल्यावर काही वर्षे आईला फार ताण यायचा सगळं करताना , ह्यात फराळ पण असतो गौरींपुढं ठेवायचा, ज्यात चकली, करंज्या, अनारसे, शेव, शंकरपाळी असं सगळंच असायचं. आई आधीच बघून ठेवायची गौरी कधी बसतात ते, मग फराळ त्याप्रमाणे करायचा. मग एकाच दिवशी 2-3 पदार्थ करावे लागत. मी आणि वडील मदत करायचो पण तिला जाम टेन्शन यायचं , अजूनही येतं. आताशा जमेल तसं बाहेरचं पण आणतो. जेवणाच्या दिवशी पण खूप दमायला व्हायच. आमची मदत असायची पण सगळं व्यवस्थित होईल ना ही धाकधूक तिला अजून असते. मदत असते पण सगळं नीट होईल ना, ही भीती आणि धाकधूक जी आईला असते ती मला , वडिलांना आणि बायडीला नसते. सर्वांचा सहभाग हवा मात्र नाहीतर रांधणार्या गृहिणीच काही खरं नाही. मजा येते ,त्तो दिवस म्हणजे सर्वात मोठा सण वर्षातला Happy

१६ ऐवजी ५ निदान एवढ तरी करं असल्या वाटाघाटी चालूच असतात. सून बदलू पण कुळाचार चालू ठेऊ असंच चित्र बहुतेक जागी दिसते.>>> Exactly... कितीही progressive asle तरी हे संपत नाहीच.. श्रावण ते दिवाळी हा भयंकर च कालखंड असतो.. मला बऱ्याचदा वाटतं ख्रिश्चन लोकांचं बरं असतं.. एकच मोठा सण वर्षातून.. आणि तोपण आनंद देणारा.. धडकी भरवणारा नाही.. ख्रिसमस येतोय.. सोवळ्यात फराळ बनवावा लागणारे आता.. असं कोणी disappoint होताना नाही दिसत...

छान लेख. वाचतानाही जुन्या आठवणीत गेलो आणि तोंडाला पाणी सुटले.

लहानपणी गणपतीला पाच सहा दिवस आणि दिवाळीच्या भाऊबीजेला एकत्र कुटुंब जमायचो तेव्हा जेवणाचे मस्त घाट घातले जायचे रोज. बहुतांश काकी आत्या वगैरे जॉबला नसल्याने आणि माझ्या आईसारखे जे जॉब करायचे त्यांनीही या दिवसात सुट्ट्या टाकल्याने सर्वांमध्ये छान जमून जायचे. आजोबांना टोटल आठ मुले असल्याने एकत्र कुटुंबही भले मोठे होते. त्यामुळे जास्त प्रकार करत साग्रसंगीत जेवण जमून जायचे. त्यात मांसाहार असेल त्या दिवशी तर आमच्याकडचे पुरुष मंडळीही त्यात एक्सपर्ट असल्याने ते देखील किचनमध्ये शिरायचे आणि मग आणखी छान माहौल बनायचा. जेवणापेक्षा जेवण बनवतानाच्या गप्पा ऐकायला फार आवडायच्या. आणि त्या ऐकायला म्हणून आम्ही पोरे सुद्धा आम्हीही काही मदत करतो म्हणून किचनमध्ये लुडबूड करायचो. ज्यात खोबरे वगैरे किसायचे काम मिळून जायचे. हल्ली तर खोबरेही बाजारात किसलेले मिळते. त्यामुळे आता या पिढीत मात्र ती मजा गेलीय. गावच्या ठिकाणी असावी अजून. पण आमच्याईथे सध्या जेवणाचा घाट म्हणजे पार्टी झालीय आणि ते पार्टीचे जेवण बाहेरून मागवणेच सोयीचे पडू लागलेय. पण शेवटी घरचे ते घरचे आणि बाहेरचे ते बाहेरचे. भले त्या बाहेरच्या जेवणाला कितीही घरगुती जेवणाचा टॅग लावा ते बाहेरचेच. त्यामुळे जिथे जिथे ज्यांना शक्य आहे त्यांनी या प्रथा परंपरा सणवार पाळावेत. फार मौज असते यात Happy

वरच्या प्रतिसादांतील वाद वाचले. पण याबाबतीत सरसकटीकरण नाही करू शकत. कुठे यात बायकांचे अतिश्रमाने हाल होत असतील तर कुठे यात बायकांसह घरच्या सर्वांनाच आनंद मिळत असेल. मी आमच्या घरचे वातावरण अनुभवले आहे म्हणून एक बाजू ठामपणे सांगू शकतो. दुसरी बाजूही जगात नक्कीच असेल. पण ती बाजूही आहे म्हणून ज्यांना यातून आनंद मिळतोय त्यांचा आनंद का हिरावून घ्यावा.. ईतकेच.

"आमच्याईथे सध्या जेवणाचा घाट म्हणजे पार्टी झालीय आणि ते पार्टीचे जेवण बाहेरून मागवणेच सोयीचे पडू लागलेय."
तेच. ह्या परंपरा सध्याच्या परिस्थितीत गैरसोयीच्या आहेत म्हणूनच मागे पडत आहेत. काही अपवादात्मक ठिकाणी, जिथे आणि जिथवर हे सर्व आनंदाने, एकजुटीने साजरे होतेय, तिथे आणि तिथवरच ते टिकेल. आनंदाऐवजी त्रास आणि कटकट वाटू लागली की आपोआप दुसरे पर्याय शोधले जातीलच. मग ज्यांना आधी त्रास आणि दगदग वाटत होती त्यांना कदाचित मौज वाटू लागेल.

मला असे वाटते की ज्यांना आनंद वाटतो त्यांनी teamwork करून करावे सगळे हौसे पायी Happy
आणि असंही घडतं बरं का, काही कुटुंबात घरातले पुरुष/लहान मुले पंगत वाढणे, भजी तळणे, गुजा तळणे, पाट पाणी घेणे किंवा पूरक कामे करतात (जी वेळखाऊ आणि महत्वाचीच असतात )
वरच्या comments वाचून हे वाटलं की yes
This is पूर्वीची आणि नेहमीची आपली मायबोली!!!

आता(करोनापूर्व काळ) फेसबुकवर इंस्टा वर लोकांची 'तू थायलंड ट्रिप चे आल्बम टाकले, मी स्वित्झर्लंड चे टाकतो' किंवा 'तू झुंबा चा व्हिडीओ टाकला मी ग्राव्हिटी योगा चा टाकणार' अशी जी लाईक्स ची चुरस चालते, तसे पूर्वीच्या काळी कुळाचार, त्यात जास्तीत जास्त पदार्थ असलेले ताट, जास्तीत जास्त व्यासाच्या पुरणपोळी आणि त्यातून मिळालेले कौतुक हे त्या काळचे फेसबुक पोस्ट, लाईक्स, त्या काळचे व्हॅलीडेशन असेल.आजच्या काळात 'गौरीला स्टँड वापरायचे नाही, डबे वापरायचे, ते घरच्या ताज्या करंज्यानी भरायचे' वगैरे चालू ठेवणं, त्यासाठी नोकरी न करणाऱ्या सुना निवडणं, किंवा असलेल्या सुनांना घरातल्या मोठ्या सणांना सुट्ट्या घ्यायला लावणं हे काळात मागे जाणं आहे.

काही मोजक्या घरात पुरुषांची, लहान मुलांची मदत मिळत असेल.पण बरीच घरं अजूनही थकली दमलेली, कुळाचार संपलेल्या रात्री ताप येऊन आजारी पडणारी, अचानक संधिवात बळावणारी आई घेऊन वावरत असतील.100 वर्षांपूर्वी घरातील स्त्री ने एकत्र कुटुंबात, 4 बायकांबरोबर मिळून बनवलेलं साग्रसंगीत 20 पदार्थाचं ताट एखाद्या कुटुंबात पिढ्यानुपिढ्या चालत आलेला, नंतर नोकरी करणाऱ्या, 9 तास काम करणाऱ्या,महत्वाच्या मीटिंगस करणाऱ्या सुना आल्या तरी त्याच 100% ने चालू असेल.(बिलिव्ह मी, मायबोलीवर नसेल, बट धिस हॅपन्स.वर्क फ्रॉम होम चालू झाल्यावर सासू सासऱ्यांच्या गावी घरी राहायला (यावं लागलेल्या) आलेल्या, कुळाचारात, स्वयंपाकात हरवलेल्या,प्रसंगी नीट ऑफिस मध्ये जाऊन ऑफिस चालू होई पर्यंत नोकरीत ब्रेक घ्यावा लागलेल्या अनेक बाया मागच्या 1 वर्षात पाहिल्यात.फक्त खाण्यासाठी इतके करणे नॉट वर्थ इट.)

धागा लेखिकेच्या एका प्रतिसादात तिच्या 'घरी पुरणपोळी केली' असं अपूर्वाईने म्हणणाऱ्या काकूंची खिल्ली उडवलीय.(अश्या खिल्ली उडवणाऱ्या 10 बाया जमून गावाकडे एखादीवर दमून जीव जात असताना पुरणा वरणाचा स्वयंपाक करायचं अदृश्य पीअर प्रेशर टाकत असतील.)

वा! अगदी माबोयोग्य वळणावर आला धागा.
सांज, आवडतं तिने करावं नाही आवडत तिने करु नये इतकं सोपं माबोवर नसतंय. एखादी आवडीने करत असेल तरी ती जोखडात अडकलेली रीग्रेसिव बाईच असते.
एखादी वर्कींग वुमन पण चारीठाव सैपाक करत असेलच की. पण फक्त घरी आहे म्हणुन करतात हा एक सुर असतोच. तर एखादी होममेकर आम्लेटपाव पण करेल. नेहमीच हलक्फुयालक्या लेखनावर ह्या अनाठाई सिरीयस दळणाने वैताग येतो. कोथिंबीर वड्या करायला घेते आता.

आवडतं तिने करावं नाही आवडत तिने करु नये इतकं सोपं माबोवर नसतंय.>>>
इतकं सोपं खऱ्या आयुष्यात तरी असतं का.. कुठल्या एकत्र कुटुंबात सुनांना विचारून असे घाट घालतात.. घरात असेल तर गृहीत धरलेलं असतं ओर वर्कींग असेल तर सुट्टी काढावी लागेल च तुला हेच असतं. आणि पुरुषाचं म्हणाल तर आमच्या घरचे फोटो काढायला आणि पुजा आरती करायला हलतात फक्त. कधी असेलच important मीटिंग presentation तर वर्षातून एकदाच तर सुट्टी काढायची वेळ येते ते ही जमणार नाही का हे प्रश्न असतात..
आनंदानी करणाऱ्यांबदल ईथे कोणीच प्रश्न उभे केले नाहीयेत.. पण मोस्टली सूर नाईलाजाचेच दिसले..

Pages