श्रावण मासी हर्ष मानसी..’ वगैरे सगळं लिहण्या-वाचण्या पुरतं ठीक आहे. पण आता कोणी मान्य करो अथवा न करो, श्रावणाची एंट्री ही समस्त महिला वर्गाच्या मनात धडकी भरवणारीच असते. आणि अशा दहशतीमागचा कर्ता-सवरता असतो तो ‘पुरणाचा स्वयंपाक’! श्रावण महिना म्हटलं की सणावारांची गडबड हे तर ठरलेलच असतं.. श्रावणातले शुक्रवार, नागपंचमी, श्रावणी सोमवार, राखी पौर्णिमा, गोकुळाष्टमी, पोळा.. इ.इ. आणि ही तर फक्त सुरुवात.. पुढचा भाद्रपद तर याहून अधिक डेंजर असतो. आणि यापैकी बहुतांश वेळेला करावा लागतो तो हा पुरणाचा स्वयंपाक! याला आपण स्वयंपाकातला ‘ड’ गट म्हणू शकतो. बरं, पुरणाचा स्वयंपाक म्हणजे केवळ पुरणपोळी असं समजणार्यांना आत्ताच सांगते, तुम्ही घोर अज्ञानात जगत आहात. यूपीएससी चा सिलॅबस जसा व्हास्ट असतो नं तसाच या पुराणा-वरणाच्या स्वयंपाकाचा सिलॅबस पण भल्या-भल्यांना घाम फुटायला भाग पाडतो. एखाद-दुसरी चटणी, कालवलेलं मेतकूट, पंचामृत, कोशिंबीर, एक फोडभाजी, एक पालेभाजी, तळलेले पापड, भजी, कुरवड्या, कटाची आमटी, कढी, साधं वरण, सुधारस, लिंबाची फोड इ.इ. सुग्रास दागिन्यांनी वर्तुळाकार ताट सजलं की मधोमध येऊन विराजते ती लुसलुशीत पुरणपोळी! आणि याला म्हणतात ‘पुरणाचा स्वयंपाक!’ आणि हा जिला जमतो ती असते खरी सुगरण!
असा हा पुरणाचा स्वयंपाक श्रावणात, चार शुक्रवार, नागपंचमी, पोळा इ धरून किमान 5-6 वेळा तरी होतोच होतो. म्हणजे किमान मराठवाड्यात तरी असं चित्र आहे. मोठ्या शहरांनी आता यातलं फारसं काही उरलेलं नाही.. बहुतांश ठिकाणी तो आऊट ऑफ सिलबस होण्याच्या मार्गावर आहे. पण मराठवाड्यात तरी अजून तसं नाही. आला सण की शिजवा पूरण ही पॉलिसी अजून तरी इथे अस्तित्वात आहे. मराठवड्यातल्या देवांना पुरणाशिवाय दूसरा नैवेद्य चालतच नाही यावर आता माझा ठाम विश्वास बसलेला आहे. पण त्यामुळे मला वाटतं सणांची authenticity अनुभवता येते. साध्या श्रीखंड, खीर वगैरे क्षुद्र पदार्थांवर इथे सणांची बोळवण अजिबात होत नाही. आणि असा चारी-ठाव स्वयंपाक करणार्या निष्णात बायका इथे घरोघरी सापडतात. म्हणजे अर्थातच मी आधीच्या पिढी विषयी बोलतेय. माझ्यासारखा तरुण वर्ग अजून तरी ट्रेनिंग फेज मध्येच आहे. एकवेळ नुसती पुरणपोळी वगैरे करणं जमू शकतं, पण समग्र ‘पुरणाचा स्वयंपाक’ अतिशय कुशलतेने करून, म्हणजे एकीकडे तर्हे-तर्हेच्या फोडण्या देत दुसरीकडे योग्य consistency मध्ये पूरण वाटणं (हो, consistency फार महत्वाची असते.. पोळ्यांची कणीक आणि पूरण ह्यांची consistency सारखी असली तरच पुरण सगळीकडे सम-प्रमाणात पसरून सुंदर पोळी तयार होते) किंवा एकीकडे भजी तळत दुसरीकडे लुसलुशीत पोळ्या लाटणं आणि वर प्रसन्न मुद्रेने सगळ्यांना आग्रह करत जेवायला वाढण यासाठी नेक्स्ट लेव्हल ची स्किल्स असावी लागतात. हे साक्षात अन्नपूर्णेचच काम आहे॰
बरं या अशा सगळ्या प्रकारच्या चवी आणि रंगांनी संपन्न अशा आर्टिस्टिक स्वयंपाकाचा आवडीने आस्वाद घेणार्या मंडळींचीही इकडे वानवा नाही. बसल्या बैठकीला 3-4 मध्यम आकाराच्या, तुपात थबथबलेल्या पुरणपोळया, सोबतचे सगळे पदार्थ तोंडी लावत, घासागणिक अन्नपूर्णेच कौतुक करत खाणे आणि वर कटाची आमटी पैज लावून ओरपणे यालाही स्किल्सच असावी लागतात. माझ्या लहानपणी सणावारांना एकावेळी 15-20 माणसांची पंगत बसलेली आणि पैजा लागलेल्या मी पाहिल्या आहेत. एक-दोघी जणी वाढायला उभ्या आणि आई किंवा आजी सर-सर गोल गरगरीत पोळ्या लाटत बसलेल्या आणि आम्ही सगळे मस्त चेष्टा-मस्करीसह जेवतोय हे मनावर कायमचं कोरलं गेलेलं चित्र आहे. या बायका हे सगळं तेव्हा कसं पेलायच्या याचं आता नवल वाटतं.
महालक्ष्म्यांचा (म्हणजे गौरीचा, मराठवाड्यात महालक्ष्मी म्हणतात) स्वयंपाक तर अतिशय क्लिष्ट! वर उल्लेखलेले सगळे पदार्थ प्लस सोळा प्रकारच्या भाज्यांचा compulsory वापर, साखरभात, मसालेभात, साधा भात, सोवळयातल वळवट, त्याची खीर, उडीदाचे पापड इ.इ.इ.
बहुतेक वेळा बायकांचा दिवस जातो यात.
सध्याच्या वेगवान जगात जिथे बायका-मुली बाहेर पडून इतरही कामं करतायत तिथे आता हे सगळं जमवण थोडसं कठीणच आहे. पण वर्षातून एकदातरी हा असा सुग्रास स्वयंपाकाचा घाट घालून तो चाखण्याचा आनंद सगळ्यांनी अनुभवायलाच हवा असं वाटतं. बाहेर तर्हे-तर्हेच्या थाळ्यांचा आस्वाद घेत असताना आपली ही परिपूर्ण, मराठमोळी, चविष्ट पुरणा-वरणाची थाळी आपण नक्कीच जपायला आणि पुढच्या पिढीपर्यंत पोचवायला हवी..:)
सांज
www.chaafa.com
The presence of cardamom,
The presence of cardamom, nutmeg and fennel seeds >> Fennel seeds? बडिशेप इन पुपो? काय? काय??
इथे इंग्रो मध्ये शेंगदाण्याच्या चिक्कीत बडिशेप पेरलेली बघितली आहे. तेव्हा एक कल्चरल शॉक बसलेला. पण पुपोत??? आणि बडिशेप महान आहे धरुन चाललं तरी एका पुपोत चार दाणे बडिशेपेचे येतील. तर ते बडिशेपे चे चार दाणे मिळण्यासाठी पुपो खा??? आणि म्हणून ती हेल्दी!!!
कोट >>The biggest takeaway from this recipe is the usage of gud (jaggery) and very less sugar in it. Yes, it is actually possible to have something sweet and not take in the additional sugar content which is harmful to your health. >> महान! पुपोत गुळ आहे साखर नाही. हे फारच सुंदर विवेचन आहे.
त्यावर धागा काढला कुणी तर
त्यावर धागा काढला कुणी तर उत्तर देईन तिथे Wink Happy
>>>>>
घ्या काढला, उत्तर हवेच
https://www.maayboli.com/node/79750
इथे लिहायचं टाळत होते, पण
इथे लिहायचं टाळत होते, पण लिहीते. माझ्या सासुबाई कमाल सुगरण आहेत, आणि घरच्यांना सदासर्वकाळ खाऊ घालणं ही घरच्या बाईची जबाबदारी आहे यावर त्या ठाम आहेत. त्यांच्या बालपणीच्या काही आठवणी आहेत यामागे, पण तरी हे जरा अति आहे. पण मी नवीन लग्न झालेली तेव्हा बोलले नाही जास्त. एरवीही नीट स्वयंपाक शिकत, माझं पीजी करत डबे-नाश्ते-दळण-साफसफाई या अव्याहत चक्रात राहून अभ्यास केला. मला हे जेव्हा डोईजड झालं तेव्हा शक्यतो न बोलता, अगदीच वाटलं तर बोलून विड्रॉ होत गेले. एव्हाना माझी गृहकृत्यदक्ष असण्यातली कमाल मर्यादा सगळ्यांना समजली होती आणि मी सगळ्यांकडे जमेल तसं दुर्लक्ष केलं, करते. मुख्य विषय रोज संध्याकाळी थोडं स्नॅक्स घरात "काय वाट्टेल ते झालं तरी असलंच पाहिजे बघ" हा होता, आहे. भडंग, चिवडा, शंकरपाळ्या, कसलेतरी लाडू... चेष्टा आहे? सकाळी चार लोकांना पोटभर ब्रेकफास्ट, दोन वेळच्या मिळून पोळ्या, दोन भाज्या, हे सगळं डब्यात भरून नवर्याचाही डबा भरून ठेवणं, सकाळी आठचं कॉलेज झालं की दुपारी घरी येऊन वरकामं. हळूहळू सोडून दिलं. नशीब हे, की सोवळ्याचं अवडंबर नाही, पण रोजची कामं आणि ती घरच्या बाईनेच करणं हा आग्रह अशक्य आहे. मी एकतर ५-६ तास कॉलेज शिकत तरी होते, किंवा मग ते झाल्यावर पूर्ण वेळ नोकरी किंवा बाळंतपण, ... म्हणजे पूर्ण घरीच आहे असं झालं नाही. बाळंतपण गुंतागुंतीचं होतं. आणि यथावकाश गोष्टी बदलत गेल्या. वरकामाला तासांच्या हिशोबाने मावशी लावल्या. हौस म्हणून मी खूप गोष्टी शिकले, पण आता लोड घेत नाही. इथे सोवळं हा मुद्दा नसला तरी "घरच्या बाईने हे जमवलं पाहिजे बघ" हा माझ्यासाठी असह्य असा मुद्दा आहे.
आता सकारात्मक बाजू. आमच्या गौरी सामाईक असतात, चुलत साबांकडे. पाळी असली तरी काकूला बोलू नको, फार लुडबुड करू नकोस असं साबा सांगतात. मी ऐकते. ही फसवणूक असो नाहीतर नसो. नवरा तर मला म्हणतो गळ्यात पाटी लावायची आहे का! गप रहायचं. गौरी नैवेद्य झाल्यावर हळदीकुंकू असतं, तेव्हा तर कमाल थकवा येतो. पण जेव्हा आमच्या घरी गौरी होत्या तेव्हा पहिल्या दिवशी गौर सजल्यावर लगेच हळदीकुंकू केलं संध्याकाळी. दोन कारणं. एक म्हणजे दुसरा दिवस सगळ्या बायकांना स्वत:च्या घरचं हळदीकुंकू असल्याने जमतं असं नाही, आल्या तरी निघायची घाई. पहिल्या दिवशी हकु केले तेव्हा आवर्जून सगळ्या येऊन गेल्या. खिरापत आणि कोरडा प्रसादही नीट देता आला. दुसरं म्हणजे मनाजोगता नैवेद्य झाला की पुन्हा संध्याकाळी हळदीकुंकू म्हणून घोळ नाही. निवांत जेवा, आराम करा.
आता काकू थकल्यावर हे आज ना उद्या माझ्या घरी असेल. पण साबांनी मनाची तयारी केली आहे की इतकं असं सगळं होणार नाही. थोडक्यात आणि आनंदाचं असेल ते करायचं. शिवाय आता त्याही पूर्वी इतक्याच आग्रही नसतात. आणि मी मनात नसेल तर नाहीच करत हे त्यांनी नाईलाजाने का असेना स्वीकारलं आहे.
कारण सांगू? नवर्याचा आणि सासर्यांचा वाढदिवस एकाच दिवशी असतो तेव्हा मी स्वत: यथासांग ३०-३५ घसघशीत आणि उत्तम पुरणपोळ्या करून त्यांना आनंदाने मनसोक्त खाऊ घालते हे ५-६ वर्षं त्या बघतायत. मोदक, रसमलाई, बासुंदी हे छानपैकी मनापासून; आणि माझ्या सोयीचे असतील ते अबरचबर खाऊ, पदार्थ मी जमेल तसे(च) का होईना करते हे त्यांना समजलं. शिवाय रोजचं तीन वेळचं खाणं अगदीच नीट, पथ्यपाणी बघून आणि वेळप्रसंगी वेगळं पथ्याचं करून सांभाळत असते मी. त्यामुळे मी निव्वळ विरोध आणि आळस करता नाही याची सगळ्यांना खात्री आहे आता.
पोस्ट अस्थानी आहे की नाही माहिती नाही, पण असूदे.
माझी आई सुपरवुमन होती तीन
माझी आई सुपरवुमन होती तीन वेळचे खाणे पीणे सांभाळून तूफान मस्त मस्त पदार्थ करत असे. अक्षरक्षः लाड करत असे खाण्यापीण्याचे. पण फार लवकर थकली आणि खूप थकली, गेली.
मी जेवढ्यास तेवढे करते. बाकी ज्यांना ऑबसेशन आहे त्यांनी स्वतःचे बूड हलवुन करावे असा खाक्या आहे.
मला तसे व्हायचे नाही
अरे ज्यांना आवडतं त्यांना करू
अरे ज्यांना आवडतं त्यांना करू द्यात की
अन आवडतं तर लिहू ही द्यात की।
साधी सरळ गोष्ट आहे। त्यांनी केलं म्हणून इतरांनी करायलाच हवं असं तर नाही न म्हणत कोणी?
आणि त्यांनी लिहिलं तर प्रत्येकानी वाचायलाच हवं असंही नाही न?
झालं तर मग।
लिहू नका असं कुणी नाही
लिहू नका असं कुणी नाही म्हटलेलं. पण आपलं मत वेगळं असेल तर ते मांडू नये किंवा चर्चा करु नये असंही काही नाही ना?
बरोबर
बरोबर
लिहिण्याचं स्वातंत्र्य सगळ्यांनाच
पण काही प्रतिसाद नक्कीच आरोपांसारखे वाटले
असो आपापले दृष्टिकोन
आता यावरून वाद होऊ नये ही अपेक्षा !
बाकी ज्यांना ऑबसेशन आहे
बाकी ज्यांना ऑबसेशन आहे त्यांनी स्वतःचे बूड हलवुन करावे असा खाक्या आहे. >
कारण सांगू? >>>> प्रज्ञा,
कारण सांगू? >>>> प्रज्ञा, खरतर तू लिहिलेली पोस्ट खूपच वैयक्तिक आहे पण इथे लिहिलीस म्हणून हा रिप्लाय. तू पूर्णपणे दुर्लक्ष करू शकतेस.
गौरींचं सगळं आत्ता होतं तसं होणार नाही हे स्विकारलं गेलं कारण शेवटी तू यथासांग ३०-३५ घसघशीत आणि उत्तम पुरणपोळ्या, मोदक, रसमलाई, बासुंदी, खाऊ, पदार्थ, रोजचं तीन वेळचं खाणं, वेळप्रसंगी वेगळं पथ्याचं खाणं हे सगळं करू शकतेस हे सिद्ध केलस ! तू गौरीच्या किंवा हळदीकुंकवाच्या दिवशी करत नाहीस पण इतर वेळेला करतेस एव्हडाच फरक. तू पाच सहा तास कॉलेज / नोकरी करतेस, मुलीचं करतेस, घरातली बाकी कामं करतेस किंवा तुला आवडत / पटत नाही म्हणून त्यांनी ते स्विकारलं असं नाही. आणि हाच तर मुद्दा वर सगळे मांडत आहेत ना?
पण काही प्रतिसाद नक्कीच
पण काही प्रतिसाद नक्कीच आरोपांसारखे वाटले
>>> सहमत
आता इतके सगळे वाचून पुपो
आता इतके सगळे वाचून पुपो करायलाच हव्या.कोकणी जीन्स असल्याने पुपोचा घाट घालावा लागणार. बरं विकतच्या पेक्षा (त्यात साखर असल्याने) घरी केलेल्या,गुळा chya pupo मला आवडतात.
पण काही प्रतिसाद नक्कीच
पण काही प्रतिसाद नक्कीच आरोपांसारखे वाटले
>>>
+७८६
माझ्या पहिल्यापासूनच्या पोस्टमध्ये हाच मुद्दा आहे. त्या आरोपांच्या पोस्टवर आक्षेप आहे.
अरे ज्यांना आवडतं त्यांना करू
अरे ज्यांना आवडतं त्यांना करू द्यात की Happy अन आवडतं तर लिहू ही द्यात की। >>> हे मान्य आहेच.
पण ज्यांना हे सर्व जाच वाटतो, मान्य नाही, करत नाहीत त्यांनीही ते लिहावंच असे मला तरी वाटते. माणूस हा सोशल अॅनिमल असल्याने नैसर्गिक रित्याच इतरांचे वागणे बघून स्वतःच्या वागण्याचे जस्टिफिकेशन , वॅलिडेशन करायला बघतो. तेव्हा जितके आवडीने करणारे आहेत तसेच ते न आवडणारे, न करणारेही भरपूर असतील तर तसे ते इतरांना दिसणे/ जाणवणे हे महत्त्वाचे ठरते. उदा. एखाद्या नाइलाजाने करणारीला 'नाही' म्हणण्याचा धीर येऊही शकतो!
Thanks Maitreyee
Thanks Maitreyee
इथलं वाचून कोणी करायला धावतं
इथलं वाचून कोणी करायला धावतं वा नाही म्हणायला धजावतं यावर गाढ विश्वास पाहून हसूच आलं
असो
माझ्याकडून मागेच यावर दिलेला पूर्णविराम स्वल्पविरामात कनव्हर्ट झाला तो पुन्हा पूर्ण करते.
आवडीने करते म्हणणारीला आवड
आवडीने करते म्हणणारीला आवड तपासून बघायची संधीच द्यायची नाही का? विशीत आवडतं म्हणून एखादीने केलं असेल तर 'हिलां फार हौस' करत करत सत्तर पर्यंत करतच बसायचं का? किंवा व्हाईस-व्हर्सा. इतर काय आवडतं ह्याचा शोध घ्यायची मुभा असावी. आपल्या आवडी-निवडी सजगपणे बघणं ह्यात दुमत नसावे.
Exactly सीमंतिनी.. आवडीने आणि
Exactly सीमंतिनी.. आवडीने आणि सोयीनं करणं आणि सक्ती नी करणं यात फरक असतो.. आणि आवड निर्माण होण्यात or जोपसन्यामध्ये social conditioning चा major रोल असू शकतो की
सीमंतीनी अगदी बरोबर
सीमंतीनी अगदी बरोबर
प्रत्येकान आपल्या आवडी इतकच नव्हे तर आपल्या अनिवार्य कामांचाही विचार करूनच निवडही स्वत:च करायला हवी। आणि ही निवड अगदी प्रत्येक सज्ञान व्यक्तीला आपापली करता यायला हवी।
करायचे वा नाही करायचे या दोन्हीचे स्वातंत्र्य व्यक्तीला असायला हवे आणि इतरांनी त्याचा योग्य आदर राखला पाहिजे
याला म्हणतात ‘पुरणाचा
याला म्हणतात ‘पुरणाचा स्वयंपाक!’ आणि हा जिला जमतो ती असते खरी सुगरण!>> हे रत्न मिसलं होतं मी
>>> इथलं वाचून कोणी करायला
>>> इथलं वाचून कोणी करायला धावतं वा नाही म्हणायला धजावतं यावर गाढ विश्वास पाहून हसूच आलं
एका चर्चेने नाही धजावणार, अवल. पण आपण जे वाचतो ऐकतो त्यातून कॉन्शस/सबकॉन्शस लर्निंग होतंच. प्रयत्न करायला काय हरकत आहे?
पार्टी/ गेट टुगेदर्सबद्दल वर कोणीतरी लिहिलं आहे. ती तुलना चुकीची यासाठी आहे की तसे समारंभ सहसा यजमान आणि पाहुणे सर्वांच्या सोयीने ठरतात, त्याची अगोदर पूर्वतयारी करायची मुभा आणि त्यासाठी पुरेसा अवधी असतो, मदत असते. अमुक घरच्या बाईनेच करायचं आणि पुरण आदल्या दिवशी करून ठेवलं तर ओवळं होतं वगैरे भानगडी नसतात.
बर चालू द्यात
बर
चालू द्यात
पण शक्यतो स्वतंत्र धागा काढून हे केलत तर जास्त मुलींपर्यंत जाईल न
अन दर ४ वर्षांनी तो धागा वर काढत चला। म्हणजे बरं पडेल
४ का? श्रावण दर चार वर्षांनी
४ का? श्रावण दर चार वर्षांनी येतो का?
चार वर्षं कशाला? दर श्रावणात
चार वर्षं कशाला? दर श्रावणात काढू की! हा.का.ना.का!
काढा ग खरच लिहा
काढा ग खरच लिहा
याला म्हणतात ‘पुरणाचा
याला म्हणतात ‘पुरणाचा स्वयंपाक!’ आणि हा जिला/ज्याला जमतो ती/तो असते/तो खरी/रा सुगरण!
आता ठीक? अर्थात दोघांनाही सोबत हेल्पिंग हँड्स असावे सगळा साग्र संगीत स्वयंपाक करायचा तर.
पुरणाचा स्वयंपाक नव्हे, पण पुरण पोळी करून बघण्याचा माझा विचार मी महिन्या भरा पूर्वीच जाहीर केला होता कुठल्याशा धाग्यावर. या दिवाळीत करून बघेन. या आधी म्हणजे अंजली पुरण यंत्रातून पुरण काढून देणे याचा अनुभव आहे. बघु पुपो जमते का ते, एक हाती.
पराग, मला मुद्दा समजला. इथे
पराग, मला मुद्दा समजला. इथे स्वयंपाक हा मुख्य विषय आहे म्हणून मी वैयक्तिक आणि स्वयंपाकाच्या संदर्भात गोष्टी लिहिल्या. मी स्वत:ला सिद्ध करणं हा माझ्यासाठी कधीच मुख्य मुद्दा नव्हता. इथे तोही प्रोजेक्ट होतोय हे लक्षात आलं नाही. इतर वेळी पदार्थ करायचा घाट घालणं हा माझ्या हौसेचा भाग आहे आणि सणाचा घाट मी जमला तर घालीन नाहीतर आऊटसोर्स करीन, मग मला उत्तम पुपो येत असल्या तरी इतर १६ पदार्थ असं साग्रसंगीत जमणार नाही हे घरच्यांपर्यंत नीट पोचवणं मला महत्त्वाचं वाटतं.
आणि इतर कामांचं जे लिहिलं आहे त्यात(मुलीचं संगोपन, कॉलेज वगैरे) घरातल्या जबाबदार्या टाळणं हाही फोकस नाही. वर जे लिहीलं त्यात विड्रॉ होता येणं प्रयत्नांनी जमू शकतं असं सांगायचं होतं. आणि मला गृहीत धरलं जाणं, मी केलंच पाहिजे यासाठी आग्रही असणं हे आवडत नाही हे आता सगळ्यांनी स्वीकारलं आहे. सध्या टाळेबंदी आहे तेव्हा माझं काम बंद आहे, मी हौस म्हणून क्लासेस घेतेय, पण घरी आहे म्हणून जास्तीचा वेळ स्वयंपाकात किंवा फक्त घरकामात घालवणार नाही हे स्पष्ट केलं. "मी सगळा वेळ स्वत:ला किचनमध्ये गाडून घेणार नाही." असंच सांगून विषय संपवला.
मी ज्या गोष्टी केल्या (पथ्य/ तीनदा खाणं) त्या घरच्या माणसांचा स्वीकार म्हणून केल्या. इथे जर माझी आई असेल तर? वडिलांना पथ्य असतं तर? त्यांचं जे जे केलं असतं ते मी साबा-साबुंचं करतेच. आणि हे करणं म्हणजे मी मला सिद्ध करून दाखवलं आहे असं वाटत नाही.
कुटुंब म्हणून काही करणं आणि निव्वळ प्रथा म्हणून मनाविरुद्ध काही करणं या वेगळ्या गोष्टी आहेत.
असो. माझ्याकडून मी इतकंच लिहू शकते.
इथलं वाचून कोणी करायला धावतं
(हे जरा जास्तच अवांतर आहे)
इथलं वाचून कोणी करायला धावतं वा नाही म्हणायला धजावतं यावर गाढ विश्वास पाहून हसूच आलं>>>अगदी चर्चा वाचून लगेच धजवला/ली असं नाही पण बऱ्याच वेळा एखाद्याची मतं आजूबाजूच्या पेक्षा वेगळी असतात,त्यामुळे धड पणे व्यक्त होता येईलच असंही नसतं,मायबोली हा सोशल मीडिया असला तरी fb किंवा whtsapp पेक्षा वेगळा वाटतो मला,कदाचित तिथे बरेचसे लोक एकमेकांना बऱ्यापैकी ओळखत असतात त्यामुळे इमेज जपणे,आपण एकदम भारी आहोत दाखवणे तुलनेने जास्त असते,मायबोली वर तसं होतच नाही असं नाही पण प्रमाण कमी वाटतं ,सगळेच अनोळखी असल्यामुळे इमेज जपणे वगैरे कमी असेल,पण म्हणूनच खरोखर व्यक्त होता येतं इथं, चूक किंवा बरोबर ठरवून जज केलं तरी डायरेक्ट वैयक्तिक संबंध नसल्याने जास्त तापदायक होत नाहीत इथल्या चर्चा...म्हणून इथं मतं मांडता येतात, आपल्या सारखी अजूनही बरीच माणसं आहेत हे वाचून आपोआप धीर येतो,हिम्मत येते निदान न्यूनगंड तरी नाही येत,
मला स्वतःला चपात्या नीट करता यायच्या नाहीत तेव्हा खूप अपराधी वाटायचं,स्वयंपाक करायला सुरूवात करून 5 6 वर्षे झाली तरी चपाती गोल ,मऊ होत नाही याचं खूप टेन्शन यायचं, लोकं जेवायला येणार असली तर कितीतरी टेन्शन यायचं,बरं आजूबाजूला कितीतरी जणींना विचारलं तर वेड्यात काढायचे,ऑफिस मध्ये सुद्धा टिप्स विचारल्या तर हसायचे पण एकदा इथे माबो वर सर्च करताना दिनेशजी चा एक धागा सापडला,त्यात खूप जणींनी चपाती येत नाही म्हणून दिलेले reply ,प्रश्न बघितले आणि खरं म्हणजे खूप खूप आनंद झाला,
चपाती न येणारी अशी मी एकटीच नाही आणि त्यात कमीपणा वाटावा असं काही नाही हे नीट कळलं मला आणि त्यानंतर आजतागायत कधीही काही न जमल्याच टेन्शन आलं नाही.
फक्त स्वयंपाक च नाही तर अजूनही कितीतरी गोष्टींबद्दल मला इथून धीर मिळाला आहे.
(छोटंसं अवांतर)
पण आपण जे वाचतो ऐकतो त्यातून कॉन्शस/सबकॉन्शस लर्निंग होतंच.>>>>सहमत.
(छोटंसं अवांतर)
माबोवर ची बागकामाचीची चर्चा वाचून, इतरांचे रोपांचे/झाडांचे फोटो पाहून मी आयुष्यात पहिल्यांदा बाल्कनी गार्डन सजवलं. माबोवर येईपर्यंत मला माहीत ही नव्हते मला बागकामाची आवड असेल.
इथलं वाचून कोणी करायला धावतं
इथलं वाचून कोणी करायला धावतं वा नाही म्हणायला धजावतं यावर गाढ विश्वास >> वर्षानुवर्षे गूळपोळीचे , नारळीभाताचे, उकडीच्या मोदकांचे धागे वर येतात ते इथलं वाचून काहीतरी मदत होते; करुन पहाण्याची हिम्मत येते, आई, सासू, मावशी , शेजारीण अशांकडून मिळालेल्या सल्ल्यांपलिकडे इथल्या धाग्यांमधून धीर मिळतो म्हणूनच ना ! नाहीतर या आणि अशा इतर रेसिपी केंव्हाच मागे पडल्या असत्या.
आणि हे नुस्तं मायबोलीबद्दल किंवा रेसिपीबद्दल नाही. इतरही सोशल मिडियावर इन्फ्लुएंसर नावाची जमात फोफावली आहे त्यांचे फॉलोअर्स देखील तेच करत आहेत - टिक्टॉक वर पाहून साफ सफाईच्या हॅक्स , इंस्टाग्राम वरुन पाहून व्यायाम, स्किनकेअर, रिलेशनशिप अॅडव्हाइस सर्व चालतंय जगभर
पण आपण जे वाचतो ऐकतो त्यातून
पण आपण जे वाचतो ऐकतो त्यातून कॉन्शस/सबकॉन्शस लर्निंग होतंच.>>>>सहमत.>>>>>>प्रचंड अनुमोदन
Pages