श्रावण आणि पुरण!

Submitted by सांज on 10 August, 2021 - 00:31

श्रावण मासी हर्ष मानसी..’ वगैरे सगळं लिहण्या-वाचण्या पुरतं ठीक आहे. पण आता कोणी मान्य करो अथवा न करो, श्रावणाची एंट्री ही समस्त महिला वर्गाच्या मनात धडकी भरवणारीच असते. आणि अशा दहशतीमागचा कर्ता-सवरता असतो तो ‘पुरणाचा स्वयंपाक’! श्रावण महिना म्हटलं की सणावारांची गडबड हे तर ठरलेलच असतं.. श्रावणातले शुक्रवार, नागपंचमी, श्रावणी सोमवार, राखी पौर्णिमा, गोकुळाष्टमी, पोळा.. इ.इ. आणि ही तर फक्त सुरुवात.. पुढचा भाद्रपद तर याहून अधिक डेंजर असतो. आणि यापैकी बहुतांश वेळेला करावा लागतो तो हा पुरणाचा स्वयंपाक! याला आपण स्वयंपाकातला ‘ड’ गट म्हणू शकतो. बरं, पुरणाचा स्वयंपाक म्हणजे केवळ पुरणपोळी असं समजणार्‍यांना आत्ताच सांगते, तुम्ही घोर अज्ञानात जगत आहात. यूपीएससी चा सिलॅबस जसा व्हास्ट असतो नं तसाच या पुराणा-वरणाच्या स्वयंपाकाचा सिलॅबस पण भल्या-भल्यांना घाम फुटायला भाग पाडतो. एखाद-दुसरी चटणी, कालवलेलं मेतकूट, पंचामृत, कोशिंबीर, एक फोडभाजी, एक पालेभाजी, तळलेले पापड, भजी, कुरवड्या, कटाची आमटी, कढी, साधं वरण, सुधारस, लिंबाची फोड इ.इ. सुग्रास दागिन्यांनी वर्तुळाकार ताट सजलं की मधोमध येऊन विराजते ती लुसलुशीत पुरणपोळी! आणि याला म्हणतात ‘पुरणाचा स्वयंपाक!’ आणि हा जिला जमतो ती असते खरी सुगरण!

असा हा पुरणाचा स्वयंपाक श्रावणात, चार शुक्रवार, नागपंचमी, पोळा इ धरून किमान 5-6 वेळा तरी होतोच होतो. म्हणजे किमान मराठवाड्यात तरी असं चित्र आहे. मोठ्या शहरांनी आता यातलं फारसं काही उरलेलं नाही.. बहुतांश ठिकाणी तो आऊट ऑफ सिलबस होण्याच्या मार्गावर आहे. पण मराठवाड्यात तरी अजून तसं नाही. आला सण की शिजवा पूरण ही पॉलिसी अजून तरी इथे अस्तित्वात आहे. मराठवड्यातल्या देवांना पुरणाशिवाय दूसरा नैवेद्य चालतच नाही यावर आता माझा ठाम विश्वास बसलेला आहे. पण त्यामुळे मला वाटतं सणांची authenticity अनुभवता येते. साध्या श्रीखंड, खीर वगैरे क्षुद्र पदार्थांवर इथे सणांची बोळवण अजिबात होत नाही. आणि असा चारी-ठाव स्वयंपाक करणार्‍या निष्णात बायका इथे घरोघरी सापडतात. म्हणजे अर्थातच मी आधीच्या पिढी विषयी बोलतेय. माझ्यासारखा तरुण वर्ग अजून तरी ट्रेनिंग फेज मध्येच आहे. एकवेळ नुसती पुरणपोळी वगैरे करणं जमू शकतं, पण समग्र ‘पुरणाचा स्वयंपाक’ अतिशय कुशलतेने करून, म्हणजे एकीकडे तर्हे-तर्‍हेच्या फोडण्या देत दुसरीकडे योग्य consistency मध्ये पूरण वाटणं (हो, consistency फार महत्वाची असते.. पोळ्यांची कणीक आणि पूरण ह्यांची consistency सारखी असली तरच पुरण सगळीकडे सम-प्रमाणात पसरून सुंदर पोळी तयार होते) किंवा एकीकडे भजी तळत दुसरीकडे लुसलुशीत पोळ्या लाटणं आणि वर प्रसन्न मुद्रेने सगळ्यांना आग्रह करत जेवायला वाढण यासाठी नेक्स्ट लेव्हल ची स्किल्स असावी लागतात. हे साक्षात अन्नपूर्णेचच काम आहे॰

बरं या अशा सगळ्या प्रकारच्या चवी आणि रंगांनी संपन्न अशा आर्टिस्टिक स्वयंपाकाचा आवडीने आस्वाद घेणार्‍या मंडळींचीही इकडे वानवा नाही. बसल्या बैठकीला 3-4 मध्यम आकाराच्या, तुपात थबथबलेल्या पुरणपोळया, सोबतचे सगळे पदार्थ तोंडी लावत, घासागणिक अन्नपूर्णेच कौतुक करत खाणे आणि वर कटाची आमटी पैज लावून ओरपणे यालाही स्किल्सच असावी लागतात. माझ्या लहानपणी सणावारांना एकावेळी 15-20 माणसांची पंगत बसलेली आणि पैजा लागलेल्या मी पाहिल्या आहेत. एक-दोघी जणी वाढायला उभ्या आणि आई किंवा आजी सर-सर गोल गरगरीत पोळ्या लाटत बसलेल्या आणि आम्ही सगळे मस्त चेष्टा-मस्करीसह जेवतोय हे मनावर कायमचं कोरलं गेलेलं चित्र आहे. या बायका हे सगळं तेव्हा कसं पेलायच्या याचं आता नवल वाटतं.

महालक्ष्म्यांचा (म्हणजे गौरीचा, मराठवाड्यात महालक्ष्मी म्हणतात) स्वयंपाक तर अतिशय क्लिष्ट! वर उल्लेखलेले सगळे पदार्थ प्लस सोळा प्रकारच्या भाज्यांचा compulsory वापर, साखरभात, मसालेभात, साधा भात, सोवळयातल वळवट, त्याची खीर, उडीदाचे पापड इ.इ.इ.

बहुतेक वेळा बायकांचा दिवस जातो यात.

सध्याच्या वेगवान जगात जिथे बायका-मुली बाहेर पडून इतरही कामं करतायत तिथे आता हे सगळं जमवण थोडसं कठीणच आहे. पण वर्षातून एकदातरी हा असा सुग्रास स्वयंपाकाचा घाट घालून तो चाखण्याचा आनंद सगळ्यांनी अनुभवायलाच हवा असं वाटतं. बाहेर तर्हे-तर्हेच्या थाळ्यांचा आस्वाद घेत असताना आपली ही परिपूर्ण, मराठमोळी, चविष्ट पुरणा-वरणाची थाळी आपण नक्कीच जपायला आणि पुढच्या पिढीपर्यंत पोचवायला हवी..:)

सांज
www.chaafa.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुणीतरी बाई कुलाचार पाळतेय, चारीठाव सैपाक करतेय त्यामागचा पसारा आवरतेय, आवडीने किंवा जबरदस्तीने आणी ते तिने कथन केलं तर आता बाकी बायकांवर ते सगळं करण्याची जबरदस्ती होणार आहे, त्यांना ते करावंच लागणार आहे आणि समस्त स्त्रीजात रिग्रेसिव होणार आहे हे लॉजिक हास्यास्पद आहे. >>
होणार आहे लागणार आहे वगैरे नाही... होत आहे.. करावं लागत आहे वाले reply आहेत... समस्त स्त्री जात चार ठाव स्वैपाक केल्यानी regressive होते असं नाही म्हणते हो कोणी..
पण जबरदस्ती करावं लग्नाऱ्यांनी त्यांची मतं मांडू नयेत का कधी..

माझ्या म्हणण्याचा मुद्दा हा की घरी नवीन पदार्थ करण्याच्या निमित्ताने, पार्टीच्या निमित्ताने , वादि च्या निमित्ताने जास्त काम पडतच असत. मुलांचा वादि ही आनंदाची गोष्ट असली , तरी एका point ला त्याच
ओझं वाटू शकतं एखादीला . आणि हा point प्रत्येकीचा वेगळा असतो.

परदेशात गणेशोत्सव वैगेरे खूप माणसांना जेवायला बोलावून करतात खूप जणी . ती ही एक प्रकारची परंपरा च होते मग काही वर्षांनी न मोडता येण्या जोगी. अर्थात हे कुठं पर्यन्त करायचं आणि मला झेपतंय म्हणायचं हे ही प्रत्येकीच्या पिंडावर, स्वभावावर, शारीरिक ताकदीवर अवलंबून आहे. तसेच हे कुळाचार.

आणि ह्यात बदल होत नाहीयेत हे कुणी सांगितलं ? काही ठिकाणी नेवैद्य तेवढा घरी करून बाकी outsource करतात. सगळ्याना जेवायला बोलवायचा घाट न घालता फराळाला बोलवतात, प्रसाद घरी पाठवून देतात असे अनेक. असो.
चार माणसाना एक पिझा पुरतो की काय ? शब्दच्छल करून किस न काढता मतितार्थ बघितला न बरे होईल.

सांगायचा मुद्दा हा की डॉक्युमेंटेशनचा आरोप सिलेक्टीव्ह नको. जर एकच फूटपट्टी लावली तर अख्खा धर्म आणि संस्कृती मोडीत निघेल. ती हिंमत असेल तरच पुढे जाऊया >>>
पण का बरं.. कोणी आपापली लढाई लढत असेल तर हे काय compulsion..
हे म्हणजे अंनिस वाले फक्त हिंदू धर्मातच लुडबुड करतात. जावं की त्यांनी मुस्लिम Christian s कडे असं म्हणण्यासारखं आहे..
स्वतःची मतं असल्यामुळे or ti एक्स्प्रेस करता आल्यामुळे./ केल्यामुळे होत असेल कुठे बदल तर होऊ द्या की..

जबरदस्तीने करावं लागतंय तर ईथे मत मांडून काय होणार ताई.
असो. मी कोणतेही कुलाचार पाळत नाही. ना कुणी माझ्यावर जबरदस्ती करत आहे. माझा मुद्दा फक्त लेखात तसं काही लिहिलेलं नसताना जिथेतिथे तेचते मुद्दे रेटणं हा होता.
धन्यवाद.

असो. मी कोणतेही कुलाचार पाळत नाही. ना कुणी माझ्यावर जबरदस्ती करत आहे. माझा मुद्दा फक्त लेखात तसं काही लिहिलेलं नसताना जिथेतिथे तेचते मुद्दे रेटणं हा होता.
धन्यवाद. >> अगदी अगदी हे माझ्या साठी ही खर आहे.

>>स्टँड (मनात) असले तरी शक्यतो सोशल मीडियावर लिहून डोक्याला ताप करून घेत नाही Happy चार घटका यावे हॉरर कथा वाचाव्या आणि सुमडीत निघून जावे

अगदी बरोबर स्टँड आहे हा. आजकाल मी मायबोलीवर तेच करते. ह्या लेखावर प्रतिसाद दिला तोही अनेक वेळा एडीट करून. पण....असो. हाही प्रतिसाद द्यायचा की नाही ह्यावर १० वेळा विचार केला आणि मगच पोस्ट करते आहे.

mi_anu सगळ्या पोस्टस अगदी अगदी पटल्या. आपण किती खंबीरपणे वगैरे उभे राहू शकतो हे जितकं आपल्या कणखरपणावर अवलंबून असतं तेव्हढंच (किंबहुना कदाचित अधिक!) समोरचा किती समजूतदार आहे ह्यावरही अवलंबून असतं. विषयांतर आहे पण सांगते. १०वी नंतर तेव्हाच्या प्रचलित प्रथेनुसार, वर्गातल्या सगळ्या टॉपर मुलींनी घेतलं तसं, पीसीबी न घेता मी पीसीएम घेतलेलं आईला पटलं नव्हतं. एक मूल डॉक्टर आणि एक इंजिनियर (मुलगी डॉक्टर आणि मुलगा इंजिनियर अशी विभागणी झाली नाही कारण मुलगा आणि मुलगी दोघांत फारसा भेदभाव न करणार्‍या कुटुंबात माझा जन्म झाला) व्हावं अशी तिची इच्छा होती. मी ऐकलं नाही. आईनेही समजून घेतलं. पुढे काही स्त्री कलिग्जशी बोलताना घरचे कसे समजून घेत नाहीत, त्यामुळे नको असताना डिगरीसाठी प्रवेश घ्यावा लागला वगैरे ऐकायला मिळालं तेव्हा लक्षत आलं की घरचे समजूतदारप्णे वागले होते तेव्हा. तोवर मला ह्याची जाणीवही नव्हती. स्वतःच्या आईवडिलांना जिथे समजावून सांगता येत नाही तिथे परक्या कुटुंबातल्या, सुनेने कसं वागलं पाहिजे ह्याचे ठोकताळे असलेल्या माणसांना समजावणं नेहमीच कसं शक्य होईल? म्हणूनच माझ्या पोस्टमध्ये मी म्हटलं होतं की ज्या बायका आवडीने हे करतात त्यांना माझा सलाम आहे.

शेवटी काय, तर जे काम आवडीने, आनंदाने करतो तेच खरं. मग तशी आनंदाने केलेली साधी डाळीची आमटीसुध्दा झक्कास होईल. पण नाईलाजाने, दमून, प्रेशर घेऊन केलेला स्वयंपाक, मग तो १६ पदार्थांचा का असेना, देवाला कसा पोचणार आणि माणसांच्या पोटात जाऊन पूर्णब्रह्म तरी कसा होणार?

काहींना खरंच चारीठाव/साग्रसंगीत करायला आवडते.माझ्या आजोळी हा प्रकार होता.कृष्णाष्टमी/गौरी गणपतीमधे आमची आजी खूप करायची.पण तिला आजोबांपासून मामांची सर्वांची मदत असे.श्रद्धेपेक्षा तिला माणसांची जास्त आवड होती.५०-६० माणसांचे एकट्याने जेवण करीत असे.तिचा वारसा काही प्रमाणात तिच्या लेकीने,नातीने(मी नाही) नोकर्‍या सांभाळून चालवला.यात परत त्यांचीही हौस होती.
त्यामुळे वर इतका गदारोळ न कळण्यासारखा होता.ज्यांना सक्ती केली जाते,त्यांनी मात्र अवश्य ती झुगारली पाहिजेच.त्यात ते पिरिएड्स पुधे ढकलण्यासाठी गोळ्या घेणे वगैरे आलेच.

तुम्हाला मांसाहार आणि श्रावण यांच्यासाठी जो आक्षेप आहे त्याची लढाई तुम्ही अवश्य लढा Happy
माझ्याशी संबंधित विषयाची लढाई मी लढते.
>>>>

बिलकुल लढा. माझे प्रतिसाद पुन्हा वाचा. मी तुम्हाला होणारा त्रास समजतो आणि तुम्हाला लढू नका असे म्हणत नाहीये.
फक्त ईथे लढाई चुकीच्या लोकांशी चालू आहे.
हा लढा तुम्ही तुमच्या घरच्यांशी द्यायला हवा जे तुमच्यावर अशी कुलाचाराच्या नावावार सक्ती लादत आहेत.
जे कोणी आवडीने करत असेल आणि चारचौघांना कौतुकाने सांगत असेल त्यांना तुम्ही तुमच्यामुळे आमचे वांधे होतात असे नाही म्हणू शकत.
हे म्हणजे जिकडे लढायला हवे तिकडे लढायची हिंमत नाही तर बाहेरच्यांवर खापर फोडायचा प्रकार वाटतोय.

एक सिंपल लॉजिक आहे बघा. जी बाई या गोष्टीचे डोक्युमेंटेशन करतेय आवडीने याचा अर्थ तिला आपण करत असलेल्या कामाचे कौतुकच असेल. तर तिला तुम्ही ती जे करतेय ते चूक आहे, आणि डोक्युमेंटेशन करून उदात्तीकरण करू नका असे म्हणू शकत नाही.

श्रावणाचे मी उदाहरण दिले. मी माझा लढा व्यवस्थित लढला आहे. माझ्या घरी सारे श्रावण पाळतात. मी एकटा महिनाभर मांसाहार करतो. आता बाकी जग श्रावणात भक्तीभावाने काय पोथ्या वाचतात आणि त्याचे काय डोक्युमेंटेशन करतात याच्याशी माझे काही घेणेदेणे नाही. व्हॉटसपवर श्रावणाचे शंभर मेसेज येऊन पडले तरी आता मला माझ्या घरचे ते दाखवून श्रावण पाळायला भाग पाडू शकत नाही. थोडक्यात मी माझा लढा जिंकलो आहे कारण मी जिथे गरज आहे तिथे लढलोय. त्या व्हॉटसपवर मेसेज पाठवणार्‍यांच्या श्रद्धेशी हुज्जत घालायला गेलो नाही Happy

इथे लढा 'माझा' किंवा 'माझ्या सासरच्यांशी' किंवा इथे लिहिणाऱ्या बायकांच्या सासरच्यांशी या पर्सनल लेव्हलवर नाहीय हे जाताजाता नमूद करते.प्रत्येकजण वेगवेगळ्या पातळ्यांवर आपले लढे लढत असतोच.
लेख ललित म्हणून छानच लिहिला असेल.म्हातारी मेल्याचं दुःख नाही,असे 100 लेख(आणि उरलेले मुक्तपीठ) मिळून काळ सोकावतो.

ऋ, +1
पण बरेचदा जबरदस्ती सैपाक रांधुन ईथे येऊन मतं मांडायची असतात.

मागाच्या गणपती मध्ये व्हॉटसाप वर के मस्त पोस्ट वाचली होती . त्या काका नी त्यात चक्क लिहले होते, की यापुढे कुळाचार , नैवद्य वाईगरे सगळ्या गोष्टी बाप्पे लोकांनी पुढाकार घेऊन कराव्यात. बायकांची आधी पंगत बसवून मग आपण पाने घावयी. नुसत गमंत म्हणून मी विचार केला तर अजूनच भारी वाटू लागल , की बायका पंगती मधे बसल्या आहेत. आमच्या ह्यांनी आज खूप च सुंदर पुरण केले आहे , कट जमला आहे, मोदक तर के सुबक वळलेत वगैरे कौतुक करत आहेत.
पुरण पोळी महत्वची असेल तर कोणी का करेना. आवड असल्याची कारण.

इथे लढा 'माझा' किंवा 'माझ्या सासरच्यांशी' किंवा इथे लिहिणाऱ्या बायकांच्या सासरच्यांशी या पर्सनल लेव्हलवर नाहीय हे जाताजाता नमूद करते
>>>>

मी देखील जे तुम्ही म्हटलेय ते तुम्हाला वैयक्तिक लेव्हलवर नसून असा प्रॉब्लेम असणारया बायकांना म्हटले आहे.
हे असे सांगावे लागणे खेदाचे आहे. असो.
पण मुद्दा तोच
१) लेख लिहिणाऱ्याला जर या गोष्टीचे कौतुक असेल पण ते तुम्हाला बंधन वाटत असेल तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे. तो तुम्ही असा लेख लिहिणाऱ्याला जबाबदार न ठरवता सोडवायचा आहे.
२) जर लढा योग्य जागी दिला आणि तो जिंकलात तर असे शंभर काय लाख लेख येईनात, तुमच्यासाठी काळ कधीच नाही सोकावणार नाही Happy

अजून एक उदाहरण घेऊया, मुद्दा आणखी स्पष्ट होत जाईल.
उद्या जर माझ्या मुलीला साड्या घालायची आवड लागली आणि मी कौतुकाने तिचे साड्या घालून नटलेले फोटो हॅशटॅग ट्रेडिशनल लूक करत फेसबूक ईन्स्टावर टाकू लागलो तर तिच्या मैत्रीणी मला येऊन असे बोलू शकत नाही की काका तुम्ही साड्यांचे उदात्तीकरण करत आहात त्यामुळे आमचे पालक आम्हाला स्कर्ट घालू देत नाहीयेत Happy

अंकु.. हे भारीये Lol असे प्रयोग व्हायला हवेत.

ऋ, सस्मित, मनीमोहोर.. मुद्दे छान आहेत.

आता असाही मुद्दा भरकटलेलाच आहे तर अजून एक वेगळा मुद्दा मांडते.
आपले सणवार हे ऋतूंशी जोडलेले आहेत आणि बहुतांश नैवेद्याचे पदार्थ हे आरोग्याशी. त्या-त्या ऋतुत काय उपलब्ध असतं आणि काय खायला हवं याची जणू ती नियमावलीच आहे. उदाहरणार्थ, संक्रांतीला तिळाच्या पोळ्या खाणं, आषाढात तळलेले पदार्थ खाणं, चैत्र पाडव्याला आवर्जून कडूलिंबाला त्या काळात जो अंकुर येतो त्याची चटणी खाणं, चैत्रागौरीच्या हळदी-कुंकवाला भिजवलेली हरभर्‍याची डाळ खाणं, शिवाय इतरही कैक चटण्या, रायती..
भिजवलेली हरभर्‍याची डाळ तर बायकांच्या तब्येतीसाठी अतिशय गुणकारी असते. आपल्या तर्‍हेतर्‍हेच्या कोशिंबीरी तर आधुनिक सॅलडस च्या आज्याच आहेत. पुरणातून प्रचंड प्रमाणात फायबर, फोलेट, विट ए, बी, डी.. इ.इ. मिळतं.. पुरणपोळी ही सगळ्या स्वीट्समध्ये सर्वात अधिक पोषक मनाली जाते.
नैसर्गिक भागानुसार या पदार्थांमध्ये वैविध्य दिसून येतं. कोकणात उकडीचे मोदक प्रसिद्ध आहेत. ते चविष्टही असतात आणि पोषकही. मराठवाड्यात तांदूळ इतका पिकत नाही. त्यामुळे इथल्या उपलब्धतेनुसार इथे पुरणाचा वापर अधिक होतो.

कुळाचार वगैरे गोष्टींच्या प्रसंगी जाचक वेष्टनाखाली या मूलभूत गोष्टी दबल्या जातात आणि दुर्लक्षित राहतात. त्यात या सार्‍यांचा संबंध देवाशी, पाप-पुण्याशी जोडला गेल्यामुळे ते अधिक जाचक तरी वाटायला लागतं किंवा केलं पाहिजे बुवा नाहीतर काहीतरी होईल अशी अव्यक्त भीती तरी मनात निर्माण होते.

पण, या सार्‍याच्या पलिकडे जाऊन सगळंच चूक आहे असं न म्हणता, गोष्टी, त्यांचे अर्थ नीट समजाऊन घेत कालानुरूप जोडल्या गेलेल्या चुकीच्या गोष्टी सोडून देत या संकल्पनांमागचा गाभा जपायला हवा.. ते आपल्याच आरोग्यासाठी हितकारक आहे Happy

जाता-जाता.. पिझ्झा, केक आरोग्यासाठी उपकारक असतात असं कोणी कधी म्हटल्याचं ऐकिवात नाही!

>>>>मी कौतुकाने तिचे साड्या घालून नटलेले फोटो हॅशटॅग ट्रेडिशनल लूक करत फेसबूक ईन्स्टावर टाकू लागलो तर

पण जर तुम्ही साडी घालणे कमालीचे भारी आहे असे काही पोस्टस टाकू लागलात तर मग लंबक दुसर्‍या बाजूला हेलकावणारच मग कडवे विरोधी प्रतिसाद येणारच. शिवाय तुमचे पर्सनल अकाउंट वेगळे आणि एखादा प्लॅट्फॉर्म वेगळा. पर्सनल अकाउंटवरती फक्त तोंडदेखलं चान चान म्हणणारं पब्लिक असतं, फोरमवर तसा काही नियम नसतो.

पिझ्झा, केक आरोग्यासाठी उपकारक असतात असं कोणी कधी म्हटल्याचं ऐकिवात नाही!>> असं काही नाही. चांगले हेल्थकॉन्शियस इन्ग्रडिएंट्स घातले की हे पदार्थ देखिल चांगले पोषणमुल्य असणारे बनतात. अगदी ईतालियन गावठी पद्धत पाहिली तर ती अशा पोषणमुल्यांनी भरलेली दिसेल. इटालियन पिझ्झा, केक्स, ब्रेड्स हे प्रकार तिथल्या लोकांना उच्च पोषण देतच आजवर टिकून राहिले. आपण त्यांच्या पद्धतीने केले तर ते पोषणमुल्यांसहित बनतील यात शंका नाही.

आपल्याकडे भरपूर रासायनिक फवारणी, रासायनिक खते, टवटवी आणण्यासाठी वापरलेली जिबरलिक अ‍ॅसिड अशा भाज्या/फळे खाणारांना कोणती पोषणमुल्यं मिळत असतील हा संशोधनाचा विषय आहे. परदेशी निर्यात होणार्‍या द्राक्षं, डाळिंबं, आंबे आणि इतर फळं, भाज्यांना त्या निर्त्यात होणार्‍या देशातील नियमांत (म्हणजे पेस्टिसाईड चा १% अंश जरी सापडला, जिबरलिक अ‍ॅसिड्चा अंश सापडला, हानीकारक रसायनांचा अंश सापडला किंवा वॅक्स वगैरे तर फार दूरच्या गोष्टी..!) बसले नाही तर कंटेनरच्या कंटेनर परत भारतात पाठवले जातात... ती परदेशातील रिजेक्टेड फळे-भाज्या मग आपल्या इथल्या आयटी पार्कात, कॉस्मोपॉलिटियन वसाहतींत, जमिनीशी संपर्क नसलेल्या पेठांत भारतीय बाजारपेठांपेक्षा दुप्पट भावात आरामात विकली जातात हा अगदी स्वतः घेतलेला अनुभव आहे. असं असताना पोषणमुल्ये अ‍ॅनिमल फॅट मधे घोसळून चमकणार्‍या डाळींच्या अन कसदार गहू गिरणीतून दळून न आणता आटा आणून केलेल्या पुरणपोळ्यात, काचेसमान पॉलिश केलेल्या भातात, भयंकर रासायनिक फवारणी केलेल्या कांद्याच्या भज्यांत आपण शोधत असु तर फार मोठी चूक करत आहोत.

सर्वच पदार्थ योग्य पिकवलेल्या अन्नधान्यांत, फळ-भाज्यांत किंवा शिजवण्या/भाजण्याच्या योग्य पद्धतींमुळेच मिळू शकतात असं माझं तरी मत आहे.. मग ते पदार्थ कोणत्याही ठिकाणी बनलेले का असेनात.

>>>>>सर्वच पदार्थ योग्य पिकवलेल्या अन्नधान्यांत, फळ-भाज्यांत किंवा शिजवण्या/भाजण्याच्या योग्य पद्धतींमुळेच मिळू शकतात असं माझं तरी मत आहे

योग्य मत आहे. काही अन्नपदार्थां वरील अनावश्यक तेजोवलय काढून टाकणेही आवश्यक आहे. अन्न हे पूर्णब्रह्मच आहे, फक्त घटक योग्य पाहीजेत. पोर्शन साईझ ऑल्सो मॅटर्स.

पण जर तुम्ही साडी घालणे कमालीचे भारी आहे असे काही पोस्टस टाकू लागलात तर मग लंबक दुसर्‍या बाजूला हेलकावणारच मग कडवे विरोधी प्रतिसाद येणारच.
>>>>>>>>>

कडवे विरोधी प्रतिसाद हा मुद्दाच नाहीये. येऊ देत खुशाल.
मुद्दा हा आहे की
"तिच्या मैत्रीणी मला येऊन असे बोलू शकत नाही की काका तुम्ही साड्यांचे उदात्तीकरण करत आहात त्यामुळे आमचे पालक आम्हाला स्कर्ट घालू देत नाहीयेत Happy"
आणि बोलल्या तरी त्यांच्या मनाचे समाधान होईल. त्यांना सोल्युशन नाही मिळणार. त्यांना स्कर्ट घालायची आवड असेल तर त्यांनी आपल्याच पालकांचे मत बदलायला हवे. ज्यांना साड्या नेसायची आवड आहे त्यांना तुम्ही आपली आवड जगजाहीर करू नका हे बोलणे काही अर्थ नाही.

>>आता(करोनापूर्व काळ) फेसबुकवर इंस्टा वर लोकांची 'तू थायलंड ट्रिप चे आल्बम टाकले, मी स्वित्झर्लंड चे टाकतो' किंवा 'तू झुंबा चा व्हिडीओ टाकला मी ग्राव्हिटी योगा चा टाकणार' अशी जी लाईक्स ची चुरस चालते, तसे पूर्वीच्या काळी कुळाचार, त्यात जास्तीत जास्त पदार्थ असलेले ताट, जास्तीत जास्त व्यासाच्या पुरणपोळी आणि त्यातून मिळालेले कौतुक हे त्या काळचे फेसबुक पोस्ट, लाईक्स, त्या काळचे व्हॅलीडेशन असेल.

अनु +१११

सांज, न्यूट्रियंट वाल्या मुद्द्यावर पूर्ण सहमत.ओरिजिनल उद्देश तोच असेल >>> +1
हे सगळ्याच सणांच्या बाबतीत झालंय मूळ उद्देश हरवत चाललाय. ...

आता हरभऱ्याच्या डाळीचाच विषय आला तर पूर्ण विदर्भात चून भाकरी (बाजरीची/ ज्वारीची) हे नेहमीचेच अन्न आहे. ते मला वाटते अधिक पौष्टिक असावे. पौष्टिक किंवा सकस अन्नाचाच मुद्दा असेल तर चून भाकरी वरचढ ठरेल. करायला सोप्पी आणि पौष्टिक. अनेक संतांना चून भाकरीचा नैवेद्य दाखवतात. सर्वांच्या मंगल कार्यातही त्याचा समावेश असायला हरकत नव्हती. कोशिंबीर म्हटले तर बुक्का मारून फोडलेला कांदा, मिरची, लसूण, हिरवी पात, मेथी रोजच आहारात असते. तेव्हा पौष्टिक अन्न पुरवावे अथवा खाल्ले जावे हा सणांच्या पक्वान्नांमागचा उद्देश नक्कीच नव्हता असणार. चैत्र पाडव्याला चिमुटभर कडुलिंब अंकुरचटणी खाण्यातून मिळणारे उलीसे पौष्टिक घटक रोजच्या कडुलिंबाच्या काडीने दात घासण्यात मिळतच होते की.
सणासुदिनाच्या भरगच्च आहाराला पौष्टिकतेचे लेबल न चिकटवताही खाण्याचा आनंद लुटता येईल.
मूळ उद्देश आनंद हाच होता असणार. रोजच्यापेक्षा काहीतरी वेगळे करून नावीन्याचा आनंद मिळवावा असेच असणार.
सद्यस्थितीत त्याच उद्देशावर म्हणजे आनंदावर घाला घातला जात असेल तर आपले सण साजरे करणे हे मूळ उद्दिष्टांपासून दूर जात आहे असे म्हणावे लागेल.

सणासुदिनाच्या भरगच्च आहाराला पौष्टिकतेचे लेबल न चिकटवताही खाण्याचा आनंद लुटता येईल. >> अगदी मनातलं लिहिलत. मी लिहिलेला प्रतिसाद पोस्ट न करता काढून टाकला होता.

पोषक आहार आणि सणासुदीची मजा यांची ओढून ताणून सांगड घालू नये.

Pages