श्रावण मासी हर्ष मानसी..’ वगैरे सगळं लिहण्या-वाचण्या पुरतं ठीक आहे. पण आता कोणी मान्य करो अथवा न करो, श्रावणाची एंट्री ही समस्त महिला वर्गाच्या मनात धडकी भरवणारीच असते. आणि अशा दहशतीमागचा कर्ता-सवरता असतो तो ‘पुरणाचा स्वयंपाक’! श्रावण महिना म्हटलं की सणावारांची गडबड हे तर ठरलेलच असतं.. श्रावणातले शुक्रवार, नागपंचमी, श्रावणी सोमवार, राखी पौर्णिमा, गोकुळाष्टमी, पोळा.. इ.इ. आणि ही तर फक्त सुरुवात.. पुढचा भाद्रपद तर याहून अधिक डेंजर असतो. आणि यापैकी बहुतांश वेळेला करावा लागतो तो हा पुरणाचा स्वयंपाक! याला आपण स्वयंपाकातला ‘ड’ गट म्हणू शकतो. बरं, पुरणाचा स्वयंपाक म्हणजे केवळ पुरणपोळी असं समजणार्यांना आत्ताच सांगते, तुम्ही घोर अज्ञानात जगत आहात. यूपीएससी चा सिलॅबस जसा व्हास्ट असतो नं तसाच या पुराणा-वरणाच्या स्वयंपाकाचा सिलॅबस पण भल्या-भल्यांना घाम फुटायला भाग पाडतो. एखाद-दुसरी चटणी, कालवलेलं मेतकूट, पंचामृत, कोशिंबीर, एक फोडभाजी, एक पालेभाजी, तळलेले पापड, भजी, कुरवड्या, कटाची आमटी, कढी, साधं वरण, सुधारस, लिंबाची फोड इ.इ. सुग्रास दागिन्यांनी वर्तुळाकार ताट सजलं की मधोमध येऊन विराजते ती लुसलुशीत पुरणपोळी! आणि याला म्हणतात ‘पुरणाचा स्वयंपाक!’ आणि हा जिला जमतो ती असते खरी सुगरण!
असा हा पुरणाचा स्वयंपाक श्रावणात, चार शुक्रवार, नागपंचमी, पोळा इ धरून किमान 5-6 वेळा तरी होतोच होतो. म्हणजे किमान मराठवाड्यात तरी असं चित्र आहे. मोठ्या शहरांनी आता यातलं फारसं काही उरलेलं नाही.. बहुतांश ठिकाणी तो आऊट ऑफ सिलबस होण्याच्या मार्गावर आहे. पण मराठवाड्यात तरी अजून तसं नाही. आला सण की शिजवा पूरण ही पॉलिसी अजून तरी इथे अस्तित्वात आहे. मराठवड्यातल्या देवांना पुरणाशिवाय दूसरा नैवेद्य चालतच नाही यावर आता माझा ठाम विश्वास बसलेला आहे. पण त्यामुळे मला वाटतं सणांची authenticity अनुभवता येते. साध्या श्रीखंड, खीर वगैरे क्षुद्र पदार्थांवर इथे सणांची बोळवण अजिबात होत नाही. आणि असा चारी-ठाव स्वयंपाक करणार्या निष्णात बायका इथे घरोघरी सापडतात. म्हणजे अर्थातच मी आधीच्या पिढी विषयी बोलतेय. माझ्यासारखा तरुण वर्ग अजून तरी ट्रेनिंग फेज मध्येच आहे. एकवेळ नुसती पुरणपोळी वगैरे करणं जमू शकतं, पण समग्र ‘पुरणाचा स्वयंपाक’ अतिशय कुशलतेने करून, म्हणजे एकीकडे तर्हे-तर्हेच्या फोडण्या देत दुसरीकडे योग्य consistency मध्ये पूरण वाटणं (हो, consistency फार महत्वाची असते.. पोळ्यांची कणीक आणि पूरण ह्यांची consistency सारखी असली तरच पुरण सगळीकडे सम-प्रमाणात पसरून सुंदर पोळी तयार होते) किंवा एकीकडे भजी तळत दुसरीकडे लुसलुशीत पोळ्या लाटणं आणि वर प्रसन्न मुद्रेने सगळ्यांना आग्रह करत जेवायला वाढण यासाठी नेक्स्ट लेव्हल ची स्किल्स असावी लागतात. हे साक्षात अन्नपूर्णेचच काम आहे॰
बरं या अशा सगळ्या प्रकारच्या चवी आणि रंगांनी संपन्न अशा आर्टिस्टिक स्वयंपाकाचा आवडीने आस्वाद घेणार्या मंडळींचीही इकडे वानवा नाही. बसल्या बैठकीला 3-4 मध्यम आकाराच्या, तुपात थबथबलेल्या पुरणपोळया, सोबतचे सगळे पदार्थ तोंडी लावत, घासागणिक अन्नपूर्णेच कौतुक करत खाणे आणि वर कटाची आमटी पैज लावून ओरपणे यालाही स्किल्सच असावी लागतात. माझ्या लहानपणी सणावारांना एकावेळी 15-20 माणसांची पंगत बसलेली आणि पैजा लागलेल्या मी पाहिल्या आहेत. एक-दोघी जणी वाढायला उभ्या आणि आई किंवा आजी सर-सर गोल गरगरीत पोळ्या लाटत बसलेल्या आणि आम्ही सगळे मस्त चेष्टा-मस्करीसह जेवतोय हे मनावर कायमचं कोरलं गेलेलं चित्र आहे. या बायका हे सगळं तेव्हा कसं पेलायच्या याचं आता नवल वाटतं.
महालक्ष्म्यांचा (म्हणजे गौरीचा, मराठवाड्यात महालक्ष्मी म्हणतात) स्वयंपाक तर अतिशय क्लिष्ट! वर उल्लेखलेले सगळे पदार्थ प्लस सोळा प्रकारच्या भाज्यांचा compulsory वापर, साखरभात, मसालेभात, साधा भात, सोवळयातल वळवट, त्याची खीर, उडीदाचे पापड इ.इ.इ.
बहुतेक वेळा बायकांचा दिवस जातो यात.
सध्याच्या वेगवान जगात जिथे बायका-मुली बाहेर पडून इतरही कामं करतायत तिथे आता हे सगळं जमवण थोडसं कठीणच आहे. पण वर्षातून एकदातरी हा असा सुग्रास स्वयंपाकाचा घाट घालून तो चाखण्याचा आनंद सगळ्यांनी अनुभवायलाच हवा असं वाटतं. बाहेर तर्हे-तर्हेच्या थाळ्यांचा आस्वाद घेत असताना आपली ही परिपूर्ण, मराठमोळी, चविष्ट पुरणा-वरणाची थाळी आपण नक्कीच जपायला आणि पुढच्या पिढीपर्यंत पोचवायला हवी..:)
सांज
www.chaafa.com
गुजराथी आणि राजस्थानी थाळी
गुजराथी आणि राजस्थानी थाळी मिळते . म्हणजे काही उपाहारगृहे फक्त थाळीच देतात. अनलिमिटेड.
तशी या मराठी थाळीची कल्पना हॉटेलवाल्यांना सुचायला हवी.
सहमत.
सहमत.
असा थाट जेवलो आहे. यातले पदार्थही आवडतात . यातल्या देवादिकांनी त्यांचे नियम standards higher levelला ठेवलेत.
तर देवादिक सर्वठिकाणी भरून राहिलेत. जीवाजीवात. हे पटलेलं असल्याने आम्ही आमचे वेगळे नियम बनवले आहेत। आणि काम सोपं केलंय.
कोणतेही पदार्थ कधीही करून खाणे हा प्रयोग चालू ठेवला आहे.
अगदी माझ्या मनातलं लिहीलं आहे
अगदी माझ्या मनातलं लिहीलं आहे!
आम्ही विदर्भातले.. खास वर्हाडातले! म्हणजे मराठवाड्याचे अगदी मावस भाऊच म्हण ना....!! महालक्श्म्या म्हणाजे सगळ्यांना अगदी उत्साह..आणि मला धडकी भरविणारा सण! वरच्या लिस्ट मधे आंबील, वाटली डाळ, करंज्या, सोळा भाज्या.........अशा गोष्टी राहिल्याच!
आणि आताही , पुण्यात, आमच्याकडे करतात हं या सगळ्या गोष्टी! काही कालबाह्य वगैरे नाही झालेलं.......!!!

अरे मस्त मस्त खुमासदार लेख
अरे मस्त मस्त खुमासदार लेख आहे.
आवडला.
ठाण्यात वेस्टला नौपाड्यात पुरणपोळी घर उघडलेय. दुकान पाहुन वेडच लागले. जबरी आहे. वाटिका की वातिका बिल्डिंग मध्ये आहे. ठाणेकरांनो पळा.
छान लिहिलंय. आवडला लेख.
छान लिहिलंय. आवडला लेख.
असा पूरणा वरणाचा स्वयंपाक करुन कुणी जेवायला बोलावलं पाहिजे. मस्तच.
पण ऊठसुट प्रत्येक सणाला पुपो बनवुन देशस्थांनी पुपोचं ग्लॅमर कमी केलंय हेमास्पम आहे. आमच्या कोकणात असं नसतं. नापं ला खीर, होळईला पुपो आणी बरीच वेरायटी असते.
छान लिहिल आहे.
छान लिहिल आहे.
प्रत्येक वाक्याला अगदी अगदी
प्रत्येक वाक्याला अगदी अगदी झालं!
मी मराठवाड्यातली असल्यामुळे घरी, मामा आणि मावशी यांच्या घरी सणावाराला, महालक्ष्म्यांचा मोठा रगडा बघितला आणि अनुभवला सुद्धा आहे. फुलोरा करणे हे पण एक मोठे प्रकरण असते !
पुरणाच्या स्वयंपाका बद्दल अगदी बरोबर लिहिले आहे. पुरणाचा स्वयंपाक हा फक्त पुरणपोळीचा कधीच नसतो. कमीत कमी 15 ते 20 अजून पदार्थ असतातच . आणि ते कोणाला फारसे आवडो अथवा न आवडो नैवेद्य साठी करावेच लागतात.
आता इथे पुण्यात सुद्धा ज्या दिवशी महालक्ष्म्या जेवतात त्यादिवशी मला दुपारचे जेवण अजिबात जात नाही. अगदी थोडेसे काहीतरी खाऊन मी डायरेक्ट रात्रीच जेवते!
मात्र त्यादिवशी महालक्ष्म्यांच्या चेहऱ्यावरील भाव अगदी अप्रतिम आणि बघत रहावे असे असतात!!
छान लिहिलंय!
छान लिहिलंय!
देशस्थांनी पुपोचं ग्लॅमर कमी केलंय हेमास्पम आहे. आमच्या कोकणात असं नसतं. नापं ला खीर, होळईला पुपो आणी >>>>> हेतुस्पम मला पटलं.म्हणून कोकणात पुपोचा घाट घतला म्हणतात आणि नेहेमीच्या पोळ्या कराव्यात इतक्या सहजतेने घाटावरच्या बायका पुपो करतात.
पूरणा वरणाचा स्वयंपाक करुन
पूरणा वरणाचा स्वयंपाक करुन कुणी जेवायला बोलावलं पाहिजे
नको.
पाच वाजवतात काही ठिकाणी.
>>>>नको.
>>>>नको.
पाच वाजवतात काही ठिकाणी.
लोल!!!
>>>>नको.
>>>>नको.
पाच वाजवतात काही ठिकाणी.
लोल!!!
बापरे! जेवायला बोलावून
बापरे! जेवायला बोलावून पाहुण्यांच्या पाच वाजवतात म्हणजे डेंजरच.
दिवे घ्या
नैवेद्य ना! एवढ्या पदार्थांचा
नैवेद्य ना! एवढ्या पदार्थांचा आणि तेही त्याच दिवशी सोवळ्याने लवकर करणे अवघड आहे. आदल्या दिवशी भाज्या चिरून ठेवल्या फ्रिजात, डाळ शिजवून ठेवली, गूळ चिरून ठेवला हे चालत नाही. आणि स्वयंपाक घरात दुसरेही पदार्थ (फोडणीचा भात ,पोहे वगैरे )करून भुकेला दिले हेही चालत नाही.
पण ऊठसुट प्रत्येक सणाला पुपो
पण ऊठसुट प्रत्येक सणाला पुपो बनवुन देशस्थांनी पुपोचं ग्लॅमर कमी केलंय हेमास्पम आहे.>>>>> हो स्मिता, हे खरे आहे.
माझ्या जावेला जर म्हणले की अगं गौरीला फक्त नैवैद्याला पुपो कर, बाकी बासुंदी किंवा इतर गोड करु तर ती ऐकतच नाही. २ - ४ डझन पुरण पोळ्या करते.
आमच्याकडे आई दिव्याच्या अमावस्येला दिवे व रव्याची खीर करायची, नागपंचमीला दिंडे व गव्हाची खीर. पुरणपोळी फक्त होळीला.
इथे कोणी देशस्थ नाहीत का? आपण
इथे कोणी देशस्थ नाहीत का? आपण नसतं ब्वॉ ऐकून घेतलं

तसेही मी ना कोकणस्थ ना देशस्थ. पण आगीत तेल ओतायला काय जातय!
सगळ्यांचेच प्रतिसाद भारीयेत.
सगळ्यांचेच प्रतिसाद भारीयेत. आवडले.
आंबडगोड, आंबील नसते आमच्याकडे. पुण्यात राहुन तुम्ही करताय ही कौतुकाचीच बाब!
प्राजक्ता, हो. फुलोरा हा पण धमाल विषय आहे
इथे एक किस्सा सांगते, माझी एक काकू कोकणस्थ आहे आणि आम्ही देशस्थ. त्यामुळे प्रचंड धमाल येते कधी-कधी. एकदा मी काकूसोबत ठाण्याला तिच्या एका काकूकडे गेले होते. त्यांनी भलतं आदरातिथ्य केलं. आणि चार-चार वेळा कौतुकाने सांगत होत्या, मी केलीये बरंका पुरणपोळी. ‘घरी’ केलीये. हे सांगतानाचा त्यांचा चेहरा अजून आठवतो. मी आपलं काकूकडे पाहून हसू गालातल्या गालात दाबलं. त्यांना काय सांगू आम्ही महिन्यातून दोनदा पुरण खातोच खातो ते, तेही ‘घरी’ बनवून वगैरे..

हम्म.. पूपोचं ग्लॅमर वगैरे काही कमी होत नाही बरं त्याने.. उलट तिचा आणि आमचा लोभ त्यामुळे वाढतच जातो
नैवेद्य ना! एवढ्या पदार्थांचा
नैवेद्य ना! एवढ्या पदार्थांचा आणि तेही त्याच दिवशी सोवळ्याने लवकर करणे अवघड आहे. आदल्या दिवशी भाज्या चिरून ठेवल्या फ्रिजात, डाळ शिजवून ठेवली, गूळ चिरून ठेवला हे चालत नाही>>>>> माझी आई करायची.... फ्रीज, मिक्सर, पुरणयंत्र नसताना. शुक्रवारचा ज्युतीचा नेवैद्य करून शाळेत जायची शिकवायला. ... डावीकडे व उजवीकडे दोन दोन ,भजी गव्हल्याची खारी, वरण भात कढी/आमटी सुटी असेल त्यादिवशी सवाष्ण व पोटभर पुपो बाकी इतर शुक्रवारी नेवैद्यापुरतं पुरण.
भरतजी, थाळीची कल्पना छानय.
भरतजी, थाळीची कल्पना छानय. मिळायला हवी अशी थाळी!
Srd, मनात येईल तेव्हा तो-तो पदार्थ बनवून खाणं छानच. पण सगळ्या चवी एकत्रित चाखणं हा रसना तृप्त करणारा अनुभव असतो.
सस्मित, मीच देते तुम्हाला निमंत्रण. या पुरणाचा स्वयंपाक जेवायला
आणि हो, आम्ही पाच नाही वाजवत बरंका 
सामो, दोन कट्टर पंथियांमध्ये भडका उडवण्याचं काम करताय तुम्ही
दोन कट्टर पंथियांमध्ये भडका !
दोन कट्टर पंथियांमध्ये भडका !!!
असा भडका हल्ली उडत नसेल. सध्या मराठी मालिकांत 'श्रीमंत वि गरीब' भडका असतो. आणि त्यास पोषक एकत्र कुटुंब पद्धत घेतात.
बरं अवांतर नको..
मंजूताई आणि सांज, प्रतिसाद पटले.
भरत, पुरणाचा गोळा आणि तुपाची बुधली हॅाटेलवाल्यांनी दिली तरी चालेल. किंवा कडबु आणि अळुची भाजी काजु घातलेली.
>>>>सामो, दोन कट्टर
>>>>सामो, दोन कट्टर पंथियांमध्ये भडका उडवण्याचं काम करताय तुम्ही Lol
हाहाहा
मस्त लिहिले आहे सांज.
मस्त लिहिले आहे सांज.



सामो
मी पण मराठवाड्यातली देशस्थ आहे त्यामुळे प्रत्येक वाक्याला अगदी अगदी झाले. मी आईला लोटांगण घालायचे एका तरी सणाला श्रीखंड/बासुंदी कर पण तिला सोपं असूनही पटायचं नाही. आम्ही पुष्कळ मोठे झाल्यावर ती थोडं देवापुरतं पुरण + आम्हाला हवं ते करायला लागली तेही अपराध्यासारखं वाटून दिवसभर बोलून दाखवायची. आपल्या महालक्षुम्या, फुलोरा , गणपती, कुलाचार गोंधळ सगळं आठवलं. पुपो आपल्या जीन्स मधे आहेत, शिकाव्या लागत नाहीत.
प्राजक्ता आणि आंबटगोड प्रतिसाद आवडले, सहमतच
मी पण मराठवाड्यातली देशस्थ
मी पण मराठवाड्यातली देशस्थ आहे त्यामुळे प्रत्येक वाक्याला अगदी अगदी झाले+१११११
आपल्या महालक्षुम्या, फुलोरा , गणपती, कुलाचार गोंधळ सगळं आठवलं. पुपो आपल्या जीन्स मधे आहेत, शिकाव्या लागत नाहीत. Wink
प्राजक्ता आणि आंबटगोड प्रतिसाद आवडले, सहमतच
+१११११
आताही हे सगळे अनुभवते आहे, नांदेड मध्ये राहून.
इथल्या गरमीत एवढा सगळा स्वयंपाक केला जातो.
पंगत वाढणं हे एक वेगळं प्रकरण आहे, आग्रह करकरून गरम गरम वाढणे, केळीची पाने, रांगोळ्या, वडे, भजे (भजी नाही म्हणत आम्ही इकडे ) इत्यादी सगळं सगळं relate झालं.
हे सगळं संस्कृती,आठवणी वगैरे ठीक आहे पण ही सर्व कामे कारणाऱ्या बायकांचा पिट्टा पडतो.
मदतीला खूप जण असतील तर मात्र मिळून करायला छान वाटते.
भांडे,भजे इ.ऐकल्यावर सां.ध
भांडे,भजे इ.ऐकल्यावर सां.ध.बसला होता.
पण ही सर्व कामे कारणाऱ्या बायकांचा पिट्टा पडतो.>>>+१.
१६ भाज्या करायच्या म्हटल्यावर मनात आले की बापरे एवढी भाज्यांची १६ भांडी कुठे ठेवत असतील. नंतर पुढचा स्वयंपाक करायचा.महान आश्चर्य वाटले होते.एकीला शेवटी विचारले तर म्हणाली,छे छे १६ प्रकारच्या भाज्या आणून एकत्र शिजवायच्या.मग त्या धक्क्यातून माझी सुटका झाली.
आमच्याकडे किंवा दोन्ही
आमच्याकडे किंवा दोन्ही आजोळीसुध्दा कुळाचार किंवा धार्मिक व्रतवैकल्यं अश्या गोष्टी कधी नव्हत्या - महाशिवरात्र, संकष्टी, आषाढी वगैरे मोजके उपवास करायच्या बायका. पण असं सण आहे म्हणून एव्हढा साग्रसंगीत स्वयंपाक कोणी केल्याचं मला आठवत नाही. गणपतीच्या दिवसात मोदक, आषाढीला खिचडी, रताळ्याचा गोडा कीस, होळीला पुरणपोळी आणि दिवाळीला फराळ असा सुटसुटीत मामला. त्यामुळे हा लेख उत्सुकतेने वाचला. 'ही सर्व कामे कारणाऱ्या बायकांचा पिट्टा पडतो' हे किल्लीचं मत पटलं. त्यात हे सगळं खुशीने करणार्या किती आणि केवळ सासरच्या घरी रीत आहे म्हणून कराव्या लागणार्या किती हा प्रश्न आहे. खुशीने करणार्या बायकांना माझा सलाम.
सांज, आमंत्रणाकरता धन्यवाद.
सांज, आमंत्रणाकरता धन्यवाद.
छान लिहितेस तू. संपी पण वाचतेय मी पण प्रतिसाद दिला नाही. मोबाईलवरुन जास्त टाईप करवत नाही.
लिहित रहा. शुभेच्छा.
स्वप्ना अगं काय चपखल प्रश्न
स्वप्ना अगं काय चपखल प्रश्न मांडलायस. अगदी बरोबर प्रश्न आहे. ज्यांना आवडते त्यांनी जरुर करावे पण पीअर प्रेशर, घरच्यांचा लोड घेउ नये. अर्थात, सांगणे फार सोपे आहे.
खुशीने करणार्या बायकांना
खुशीने करणार्या बायकांना माझा सलाम.>>>>माझा अगदी उलट सलाम,म्हणजे सासरची रीत म्हणून करणाऱ्या ना
आजिबात आवड नसताना,मनात नसताना पण हे इतकं वाचूनच शॉक देणाऱ्या पंगती सजवायाच्या म्हणजे अवघड आहे खरं
त्यात हे सगळं खुशीने करणार्या
त्यात हे सगळं खुशीने करणार्या किती आणि केवळ सासरच्या घरी रीत आहे म्हणून कराव्या लागणार्या किती हा प्रश्न आहे. >>>
+1000
खुशीने करणाऱ्यांबद्दल काही म्हणणं नाही.. असतात धार्मिक लोक... पण रीत आहे म्हणून लादलेल्या गोष्टी वात आणतात... कधी यातून बाहेर पडणार आणि गोष्टी outsource करायला शिकणार असं वाटतं.. सोवळ्या ओवळ्यातून बाहेर च पडायचं नसतं जुन्यांना.. आयत
ताट हातात मिळताना छान च वाटतं पण करणाऱ्यांचा जीव जातो.. आणि देशस्थी कारभारात संध्याकाळचे ४/५ नक्कीच वाजतात जेवायला.. धडकी भरते मला तर श्रावण आला की.. onsite जायचं असेल तर August पासूनचे महिनेच choose करावेत
हे सर्व फार सुपरवुमन सिंड्रोम
हे सर्व फार सुपरवुमन सिंड्रोम वाटतं मला.(करणाऱ्या बायकांचं कौतुक आहेच.तरीही.)
सुगरण, अन्नपूर्णा वगैरे
सुगरण, अन्नपूर्णा वगैरे किताबांनी बायकांना कैक वर्ष भुरळ पडलेली आहे. त्यापायी आणि नसत्या अपेक्षांपायी घालत आहेत असे घाट. आपल्याला खरंच ह्याची आवड आहे की नाही हे पुरतं कळण्याआधीच हे सोवळं ओवळं आणि ‘आमच्याकडे किनै सगळं साग्रसंगीतच लागतं‘ म्हणत करायची अपेक्षा ठेवली जाते. बायकांनी सकाळी उठून खपून हे सगळं करायचं, घरातल्या पुरुष मंडळींना ताटावर बसून ताव मारायचा आणि मग बायकांनी जे काय उरलं सुरलं असेल ते खायचं. हे चित्रं अगदी नकोसं आहे.
सॉरी सांज, तुमचं लेखन जनरली आवडतं पण हे अजिबात नाही झेपलं.
Pages