श्रावण आणि पुरण!

Submitted by सांज on 10 August, 2021 - 00:31

श्रावण मासी हर्ष मानसी..’ वगैरे सगळं लिहण्या-वाचण्या पुरतं ठीक आहे. पण आता कोणी मान्य करो अथवा न करो, श्रावणाची एंट्री ही समस्त महिला वर्गाच्या मनात धडकी भरवणारीच असते. आणि अशा दहशतीमागचा कर्ता-सवरता असतो तो ‘पुरणाचा स्वयंपाक’! श्रावण महिना म्हटलं की सणावारांची गडबड हे तर ठरलेलच असतं.. श्रावणातले शुक्रवार, नागपंचमी, श्रावणी सोमवार, राखी पौर्णिमा, गोकुळाष्टमी, पोळा.. इ.इ. आणि ही तर फक्त सुरुवात.. पुढचा भाद्रपद तर याहून अधिक डेंजर असतो. आणि यापैकी बहुतांश वेळेला करावा लागतो तो हा पुरणाचा स्वयंपाक! याला आपण स्वयंपाकातला ‘ड’ गट म्हणू शकतो. बरं, पुरणाचा स्वयंपाक म्हणजे केवळ पुरणपोळी असं समजणार्‍यांना आत्ताच सांगते, तुम्ही घोर अज्ञानात जगत आहात. यूपीएससी चा सिलॅबस जसा व्हास्ट असतो नं तसाच या पुराणा-वरणाच्या स्वयंपाकाचा सिलॅबस पण भल्या-भल्यांना घाम फुटायला भाग पाडतो. एखाद-दुसरी चटणी, कालवलेलं मेतकूट, पंचामृत, कोशिंबीर, एक फोडभाजी, एक पालेभाजी, तळलेले पापड, भजी, कुरवड्या, कटाची आमटी, कढी, साधं वरण, सुधारस, लिंबाची फोड इ.इ. सुग्रास दागिन्यांनी वर्तुळाकार ताट सजलं की मधोमध येऊन विराजते ती लुसलुशीत पुरणपोळी! आणि याला म्हणतात ‘पुरणाचा स्वयंपाक!’ आणि हा जिला जमतो ती असते खरी सुगरण!

असा हा पुरणाचा स्वयंपाक श्रावणात, चार शुक्रवार, नागपंचमी, पोळा इ धरून किमान 5-6 वेळा तरी होतोच होतो. म्हणजे किमान मराठवाड्यात तरी असं चित्र आहे. मोठ्या शहरांनी आता यातलं फारसं काही उरलेलं नाही.. बहुतांश ठिकाणी तो आऊट ऑफ सिलबस होण्याच्या मार्गावर आहे. पण मराठवाड्यात तरी अजून तसं नाही. आला सण की शिजवा पूरण ही पॉलिसी अजून तरी इथे अस्तित्वात आहे. मराठवड्यातल्या देवांना पुरणाशिवाय दूसरा नैवेद्य चालतच नाही यावर आता माझा ठाम विश्वास बसलेला आहे. पण त्यामुळे मला वाटतं सणांची authenticity अनुभवता येते. साध्या श्रीखंड, खीर वगैरे क्षुद्र पदार्थांवर इथे सणांची बोळवण अजिबात होत नाही. आणि असा चारी-ठाव स्वयंपाक करणार्‍या निष्णात बायका इथे घरोघरी सापडतात. म्हणजे अर्थातच मी आधीच्या पिढी विषयी बोलतेय. माझ्यासारखा तरुण वर्ग अजून तरी ट्रेनिंग फेज मध्येच आहे. एकवेळ नुसती पुरणपोळी वगैरे करणं जमू शकतं, पण समग्र ‘पुरणाचा स्वयंपाक’ अतिशय कुशलतेने करून, म्हणजे एकीकडे तर्हे-तर्‍हेच्या फोडण्या देत दुसरीकडे योग्य consistency मध्ये पूरण वाटणं (हो, consistency फार महत्वाची असते.. पोळ्यांची कणीक आणि पूरण ह्यांची consistency सारखी असली तरच पुरण सगळीकडे सम-प्रमाणात पसरून सुंदर पोळी तयार होते) किंवा एकीकडे भजी तळत दुसरीकडे लुसलुशीत पोळ्या लाटणं आणि वर प्रसन्न मुद्रेने सगळ्यांना आग्रह करत जेवायला वाढण यासाठी नेक्स्ट लेव्हल ची स्किल्स असावी लागतात. हे साक्षात अन्नपूर्णेचच काम आहे॰

बरं या अशा सगळ्या प्रकारच्या चवी आणि रंगांनी संपन्न अशा आर्टिस्टिक स्वयंपाकाचा आवडीने आस्वाद घेणार्‍या मंडळींचीही इकडे वानवा नाही. बसल्या बैठकीला 3-4 मध्यम आकाराच्या, तुपात थबथबलेल्या पुरणपोळया, सोबतचे सगळे पदार्थ तोंडी लावत, घासागणिक अन्नपूर्णेच कौतुक करत खाणे आणि वर कटाची आमटी पैज लावून ओरपणे यालाही स्किल्सच असावी लागतात. माझ्या लहानपणी सणावारांना एकावेळी 15-20 माणसांची पंगत बसलेली आणि पैजा लागलेल्या मी पाहिल्या आहेत. एक-दोघी जणी वाढायला उभ्या आणि आई किंवा आजी सर-सर गोल गरगरीत पोळ्या लाटत बसलेल्या आणि आम्ही सगळे मस्त चेष्टा-मस्करीसह जेवतोय हे मनावर कायमचं कोरलं गेलेलं चित्र आहे. या बायका हे सगळं तेव्हा कसं पेलायच्या याचं आता नवल वाटतं.

महालक्ष्म्यांचा (म्हणजे गौरीचा, मराठवाड्यात महालक्ष्मी म्हणतात) स्वयंपाक तर अतिशय क्लिष्ट! वर उल्लेखलेले सगळे पदार्थ प्लस सोळा प्रकारच्या भाज्यांचा compulsory वापर, साखरभात, मसालेभात, साधा भात, सोवळयातल वळवट, त्याची खीर, उडीदाचे पापड इ.इ.इ.

बहुतेक वेळा बायकांचा दिवस जातो यात.

सध्याच्या वेगवान जगात जिथे बायका-मुली बाहेर पडून इतरही कामं करतायत तिथे आता हे सगळं जमवण थोडसं कठीणच आहे. पण वर्षातून एकदातरी हा असा सुग्रास स्वयंपाकाचा घाट घालून तो चाखण्याचा आनंद सगळ्यांनी अनुभवायलाच हवा असं वाटतं. बाहेर तर्हे-तर्हेच्या थाळ्यांचा आस्वाद घेत असताना आपली ही परिपूर्ण, मराठमोळी, चविष्ट पुरणा-वरणाची थाळी आपण नक्कीच जपायला आणि पुढच्या पिढीपर्यंत पोचवायला हवी..:)

सांज
www.chaafa.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऋन्मेष, हीरा, किल्ली.. अगदी सहमत!

सस्मित.. एखादी वर्कींग वुमन पण चारीठाव सैपाक करत असेलच की. पण फक्त घरी आहे म्हणुन करतात हा एक सुर असतोच. तर एखादी होममेकर आम्लेटपाव पण करेल. नेहमीच हलक्फुयालक्या लेखनावर ह्या अनाठाई सिरीयस दळणाने वैताग येतो. कोथिंबीर वड्या करायला घेते आता. >>>
अगदी अगदी खरं आहे.
बरेच दिवस झालेत को.वड्या तळून Lol

बाकी, मी कोणाचीही खिल्ली वगैरे उडवली नाही. तेव्हाही नाही आणि आत्ताही. हा फक्त दोन खाद्यसंस्कृतींमधला फरक आहे. जो मला मजेशीर वाटतो. त्या काकू मला अतिशय प्रिय आहेत. पण, देशस्थांना कोकणस्थांची गम्मत वाटते आणि कोकणास्थांना देशस्थांची हे वास्तव आहे. त्याला उगाच नको ती वळणे देऊन विषय गंभीर वगैरे कशाला करायचा.

बोलणारी माणसं, नाईलाजाने गोष्टी करायला लावणारी माणसं सगळीकडे असतात. ऑफिस मध्येही आणि घरातही. कोणाचं किती ऐकायचं हे आपल्या हातात असतं, किंवा मी म्हणेन आपल्या हातात ठेवावं आपण.
आणि जुन्या सगळ्या पद्धती त्या चूकच असतात वगैरे सूर लावणं आजकालच्या बायकांनी बंद करायला हवं. जे चूक वाटतंय ते वगळून चांगल्या, सोयीस्कर पद्धतीने सण साजरे होऊच शकतात की. आता माझ्या आजेसासुबाईंनी ज्या कडक शिस्तीत सगळं पार पाडलं तितकं माझ्या सासूबाई नाही करत. त्यांनी त्यांच्या पद्धतीने गोष्टी सुकर करून घेतल्या. उद्या माझ्यावर जेव्हा करायची वेळ येईल तेव्हा मीही उगाच मागच्या पिढ्यांना बोल लावत बसण्यापेक्षा मला जसं आणि जितकं जमेल तितकंच कसलंही दडपण किंवा गिल्ट मनात न आणता करायला हवं. इतकं साधं आहे.

उगाच मन मारून करत बसायचं आणि इतरांना बोल लावायचे हा सुर आधुनिक बायकांनी तरी लाऊ नये. सतत victim म्हणवून घेण्यात काहीही अर्थ नाही. करायच्या की गोष्टी आपल्या मनाप्रमाणे. थोड्या नव्या, कालसुसंगत रितीही सुरू करायच्या. बोलणारे बोलतील. कशाला द्यायचं लक्ष. 'तुम्हाला जमतं, खूप छान! पण मला हे इतकंच जमतं आणि मी तेवढंच करेन' असं म्हणता यायला हवं..!

आणि ज्यांना या रिती-परंपराच नकोशा वाटतात, त्यांनी पाळू नयेत त्या. जे करतायत, ज्यांना आवडतंय त्यांना कशाला बोल लावायचे?

अनामिका, या समस्यांना वर्किंग बायकांना तोंड द्यावं लागतं हे अगदीच मान्य आहे. पण कुठेतरी आता आपणच ठाम व्हायला हवं आणि नाही म्हणायलाही शिकायला हवं असं वाटतं. मगच इतरांना त्याची सवय होईल.

येस अनामिका...... हेच मला म्हणायच आहे. कुळाचार म्हणजे प्रचंड अस्मिता, सोवळे ओवळे असे वातावरण असते.
त्यात काही कमी करु, सुटसुटीत पणे करु असे अजिबात मान्य नसते. सुनां च्या मताला शू न्य किंमत.. म्हणजे तिचे मत विरुद्ध असेल तर...!!!
असो......
आवडतं तिने करावं नाही आवडत तिने करु नये ..इतकं व्हाईट अँड ब्लॅक नसतं ना ते!
वाद विवाद होतात...त्याना तोंड द्यायचा निडरपणा प्रत्येकीत असतोच असं नाही....

अनामिका, या समस्यांना वर्किंग बायकांना तोंड द्यावं लागतं हे अगदीच मान्य आहे. पण कुठेतरी आता आपणच ठाम व्हायला हवं आणि नाही म्हणायलाही शिकायला हवं असं वाटतं. मगच इतरांना त्याची सवय होईल. >>

अगदी अगदी मी हेच म्हणत होते या समस्यांना वर्किंग बायकांना तोंड द्यावं लागतं. घरी राहणार्‍या आवडीनेच करतात सगळं. वर्किंग मध्ये पण एखादी आवडीनेच करत असेल. वर्किंग बायकांची समस्या त्यांची त्यांनी खंबीर बोलून सोडवायची. काय उगा चर्चा करायची!

घरी राहणार्‍या आवडीनेच करतात सगळं.">>>> असं मुळीच नाही. मला आवडत नाही. वर आई काय करत होती ते लिहीलंय. तिला नको करू सांगायचो पण ती ऐकायची नाही. आजीआजोबा नव्हते. वडील तर आगरकर होते. वरवरची मदत आम्ही करायचो सोवळं असल्यामुळे नंतर भावजय. आई नाही आता देशस्थ वहिनी तिचं प्रथा चालू ठेवतेय तर भाऊ तिला मोडता घालतो हळूहळू बदलतेय.माझे वडील कर्नाटकातले कोकणस्थ तिथलं सोवळं अजून कडक . ते पाहूनच त्यांना ह्या सगळ्या प्रथांची चीड होती. पण आईने परंपरा मोडली नाही. आम्ही सगळेच ह्याबाबतीत वडीलांचा कित्ता गिरवतोय.

मला हा मुद्दा नोकरी/नॉन नोकरी, गाव/शहर किंवा व्हिक्टइम्स(शब्द मोबाईलवर नीट लिहिता येत नाहीये) या स्वरुपातही मांडायचा नाहीये.

कुठेतरी ही साग्रसंगीत वर्णने, अमकी बाई चार हातानी भजी, पापड एकावेळी तळतेय, दुसऱ्या हाताने पोळ्या लाटते, तिसऱ्या हाताने पानं मांडते चौथ्या हाताने आग्रह करते वाले कौतुक लेख लिहून, 'मी घरी करते पुरणपोळी' या अतिशय निरुपद्रवी वाक्याचा जोक बनवून कुठेतरी या कुळाचार, स्वयंपाकाचे अपर्णा रामतीर्थकर भाषण टाईप्स स्टॅंडर्ड सेट होतायत का?इन्फ्लुअन्स वाढतोय का? सगळीकडे 'जमेल तितकं कर' म्हणून समजून घेणारी माणसं आहेत का?
कुठेतरी हे आणि अश्या प्रकारचे मुक्तपीठ लेख(यात जनरली लेख लिहिणारी आणि तो सुपरमॅन स्वयंपाक करणारी व्यक्ती वेगवेगळी असते) जास्त प्रमाणात येऊन आपण परत त्याच रिग्रेसिव्ह काळात जाऊ.फक्त या काळात बाईकडे(नोकरी करणाऱ्या किंवा होममेकर) बाहेरच्या जगातली इतर व्यवधानंसुद्धा असतील.

'सहज' म्हणून 100 लोकांनी लिहिलेल्या 100 वर्णनाची व्हॉटसप वर फिरून 'सत्यं' बनून परत कोणा आधुनिक घरातल्या सुनेला हे सर्व या प्रमाणात करायचा आग्रह होऊ नये, झाला तर तिला स्पष्टपणे नाही म्हणाता यावं, नाही म्हटलं तर तिच्या नवऱ्याचा पाठिंबा असावा, कुटुंबाने रिझनेबली ऐकावं इतक्याच सदिच्छा.

नाही म्हणायचा नीडरपणा नसतो, आवड नसते, नाईलाज असतो म्हणुन करत आहेतच की बायका. करणार्या आहेत न करणार्याही आहेत. आग्रह करणारे आहेत. जबरदस्ती करणारे आहेत. सोडून देणारेही आहेत. पण प्रत्येक स्वयंपाकाच्या, कोथिंबिर वडीच्या, गरम चपात्या वाढण्याच्या, भांडी घासण्याच्या, मुलं वाढवण्याच्या लेखांवर, लेखात बायकांनीच केलंच पाहिजेच, झालंच पाहिजेच असं काहीही लिहिलेलं नसलं तरीही दळण दळणं अगम्य आहे. ऊठसुट गाडी तिकडेच वळवणं एक प्रकारचा दिखावा वाटू लागतो.

अनु, तुम्ही इतका क्लिअर स्टँड घेऊन लिहिलेलं मी तरी पहिल्यांदाच वाचलं. आवडलं.

सीमंतिनी यांचे प्रतिसाद सर्कॅस्टिक आहेत असा संशय आहे.

चान चान लेखनावर विचार करून आणि कदाचित इतरांना विचार करायला भाग पाडणारा प्रतिसाद देत असाल तर आधी ठळक अक्षरांत तसा स्पॉयलर अ‍ॅलर्ट द्यायची पद्धत मायबोलीवर सुरू करायला हवी. म्हणजे ज्यांना मेंदू शिणवायचा नाही त्यांची सोय होईल. उपयोग होईलच याची खात्री नाही. ( स्वानुभव)
( कथा, ललित लेखनावर वैचारिक, सामाजिक अंगाने जाणारे प्रतिसाद देऊ नये अशी सूचना येऊच शकते.)

स्टँड (मनात) असले तरी शक्यतो सोशल मीडियावर लिहून डोक्याला ताप करून घेत नाही Happy चार घटका यावे हॉरर कथा वाचाव्या आणि सुमडीत निघून जावे.
इथला त्या काकू वाल्या प्रतिसादातला जोक चा सूर किंवा देशस्थ कोकणस्थ(there is a whole world apart from and beyond that) वगैरे वगैरे थोडं खटकलं म्हणून बोलले.

शेवटी life is adjustment. झेपेल तोपर्यंत आवड असेल तर करायला काय हरकत आहे ?
पिझा ,पाव केक घरी केलेला धावतो पण कुणी पू पो केली घरी की ते परंपरा ,कुळाचार रीत इ च ओझं , जोखड होत लगेच. स्त्री स्वातंत्र्य वादी धावून येतात लगेच

एक प्रश्न पडलाय, जमल्यास उचला

जर एखाद्या बाईला स्वयंपाकाची आवड असेल, आणि तिला खरेच सतरा प्रकारचे पदार्थ करायची हौस असेल. तिला आपल्या या गुणाचे कौतुकही असेल. तर ते तिने जाहीरपणे ईतक्यासाठीच मिरवू नये का की ईतर बायकांनाही मग त्यांचे नवरे आणि सासू-सासरे तसे करायला सांगतील जे त्यांना करायची ईच्छा नसेल.

अरे मला आवडते, मी करते. ते बघून तुमच्यावरही तसेच वागायची जबरदस्ती होत असेल तर हा तुमचा फॅमिली प्रॉब्लेम आहे. आणि मग तो स्वयंपाकापुरताच मर्यादीत नसून घरातल्या प्रत्येक कामाबाबत असणार, जो तुमचा तुम्हाला सोडवायचा आहे, मी काय त्यात करू...... असे त्या बाईला वाटणे साहजिकच आहे.

समाजात मनाविरुद्ध स्वयंपाक लादल्या जाणार्‍या बायका आहेत. हे सुर्यप्रकाशाईतके स्वच्छ आहे. आणि हे मायबोलीबाहेरच्या लोकांनाही ठाऊक आहे. आपण काही वेगळा शोध लावत नाही आहोत.
पण एखाद्या बाईला आवड आणि कौतुक असेल तर तीच याला जबाबदार असल्यासारखे तिलाच आरोपीच्या पिंजर्‍यात तर उभे नाही करत आहोत आपण...

Thanks सांज , आंबट गोड, सीमंतिनी.. निडर पणा यायला थोडी वर्ष जावी लागतात..
पिझा ,पाव केक घरी केलेला धावतो पण कुणी पू पो केली घरी की ते परंपरा ,कुळाचार रीत इ च ओझं , जोखड होत लगेच. >>
पिझा पाव करायची कोणी सक्ती केलेली नसते.. आणि एकच पदार्थ करून भागत..
कुलधर्म कुलाचार रिती परंपरा या सक्तीनेच आलेल्या असतात शक्यतो.. आणि दुसऱ्यांनी लादलेल्या गोष्टींचं ओझं च वाटतं..
शिवाय एकच पू. पो. सुद्धा करून चालत नाही.. ताटात १६ तरी गोष्टी असतात.. आणि ते सुपर वुमन चच काम आहे.. तुम्ही करत असाल एकहाती तर शी. सा. नमस्कार..

रुन्मेष, त्या करण्याचे 'दर वर्षीचा कुळाचार' या नावाखाली डॉक्युमेंटेशन करण्याला माझा विरोध आहे.जेव्हा ते होतं तेव्हा ते 'माझा सुगरणपणा' या स्वरूपात मर्यादित न राहता पुढच्या पिढ्याना मॅनडेट बनतं.हा मॅनडेट तोडून नवे विचार करणारे,नवे डॉक्युमेंटेशन बनवायची हिंमत करणारे मॅनेजर्स, त्यांना लाथ मारून बाहेर न काढता ठेवणारी कंपनी पुढच्या पिढ्यात,पुढच्या येणाऱ्या टिम्स मध्ये असतील किंवा नसतील.
बाकी वीकेंड ला कोणताही नेम न ठरवता तुम्ही 50 काय, 500 पदार्थांचे स्वयंपाक करा.

अवांतर: हे सर्व पदार्थ, पुरणपोळी, त्याबरोबर ताट भरणारे पदार्थ, गरम भजी, आग्रह हे सर्व फक्त आवड आणि टॅलेंट म्हणून केलं असेल तर लेखाची सुरुवात 'धडकी भरणे' या शब्दप्रयोगाने नसली असती का?

लेखन वर्णन स्वरूपाचे वाटलं . म्हणजे आमच्याकडे हे अस अस होत टाइप . जे लोकं कोकणस्थ वा देशस्थ असे दोन्ही नाहीत त्यांना अच्छा अस पण असत होय अस फिलिंग तर कोकणस्थ /देशस्थ लोकांना मजा वाटू शकते which is fair enough. अश्या प्रकारच्या लेखात गाडी घसरण्याचा धोका असतो जो इथे झालाय. विशेषतः लेखातील "हे काम अन्नपूर्णाचेच असते" वगैरे. त्यामुळे लेखिकेने जरी उपहास म्हणून लिहिलं असलं तरीही त्याचा परिणाम पोचत नाही. उलट बघा! हे सगळं करण्याऱ्या बायका सुगरण , कस जमवतात ना ! ही भावना येऊ शकते. मी अनु यांनी अचूकपणे मांडलंय ते.

दुसरा मुद्दा ज्यांना जमतंय ते करायचा वगैरे तर इतकं सरळ सोपं जग असत तर बरं झालं असतं. न करण्याऱ्या बायकांना जमत नाही म्हणून टोमणे , आणि प्रथा आहे म्हणून कसेही करून जमवणे इथपर्यंत पुढे प्रकरण जातं. बरं ! हे सगळं करायला सोवळं ओवळ पाळावा लागत. मग पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या , त्याचे त्रास अस दुष्टचक्र! म्हणजे शेवटी बायकांचं आरोग्य धोक्यात! डॉ शंतनू अभ्यंकर यांनी याबद्दल सुरेख लेख लिहिला होता. लिंक मिळाली तर डकवते

पिझा पाव करायची कोणी सक्ती केलेली नसते.. आणि एकच पदार्थ करून भागत..
कुलधर्म कुलाचार रिती परंपरा या सक्तीनेच आलेल्या असतात शक्यतो.. आणि दुसऱ्यांनी लादलेल्या गोष्टींचं ओझं च वाटतं..
शिवाय एकच पू. पो. सुद्धा करून चालत नाही.. ताटात १६ तरी गोष्टी असतात.. आणि ते सुपर वुमन
+ १

पिझा आणि पुरणपोळी यांची तुलना मजेशीर वाटली. पिझा करायला सक्ती वगैरे करतात का हा प्रश्न पडला. शेवटी ज्या स्त्री स्वातंत्र्यवाद्याच्या प्रयत्नांमुळे काही एक धाडस मिळाले त्यांनाच टपली मारण्याचं कौशल्य विशेष आवडलं Biggrin

रुन्मेष, त्या करण्याचे 'दर वर्षीचा कुळाचार' या नावाखाली डॉक्युमेंटेशन करण्याला माझा विरोध आहे.
>>>>>>>
मग तर सर्वात पहिले लोकांना श्रावण पाळने बंद करायला सांगा. गणपतीत वा नवरात्रीत वा कुठल्याही सणवाराला मांसाहार करू नये हा नियमही बाद करायला सांगा. किंवा पाळा आपल्या घरी पण त्याची बाहेर वाच्यता करू नका.
तुम्हाला मांसाहार काही काळासाठी सोडायचा आहे तर सोडा ना, उपवास करायचा आहे तर करा ना, पण मग त्याला धार्मिक स्वरुप देऊ नका. वा धार्मिक कारणाशी त्याला जोडू नका.
उगाच पिढ्यानपिढ्या हे लादले गेलेय. आणि माझ्यासारखे ज्यांना वर्षाचे ३६५ दिवस मांसाहार करायचा असतो त्यांना उगाच पाप केल्यासारखे वाटते वा जग तसे भासवून देते. एक वेगळा धागा निघेल यावर की आमच्यासारख्यांना कसे हिणकस शेरे झेलावे लागतात.

सांगायचा मुद्दा हा की डॉक्युमेंटेशनचा आरोप सिलेक्टीव्ह नको. जर एकच फूटपट्टी लावली तर अख्खा धर्म आणि संस्कृती मोडीत निघेल. ती हिंमत असेल तरच पुढे जाऊया Happy

सगळे प्रतिसाद पूर्ण वाचले नाही.
मी_अनु मुद्दे चांगले मांडलेत.

बाकी काही प्रतिसादांवरून सगळं साग्रसंगीत करण्याची प्रथा सासरी असते, माहेरी नाही हे कळले.

शिवाय एकच पू. पो. सुद्धा करून चालत नाही.. ताटात १६ तरी गोष्टी असतात.. आणि ते सुपर वुमन चच काम आहे.. तुम्ही करत असाल एकहाती तर शी. सा. नमस्कार..
>>>>>>>

माझा आक्षेप याचा बोल्ड केलेल्या वाक्यातील मुद्द्याला आहे.
जी बाई हे आवडीने करत असेल तर तिला हा टोमणा का झेलावा लागावा.
ज्या बायकांना घरी सोळा पदार्थ करावे लागतात त्याला हि वरची बाई जबाबदार नाही. त्यांनी या बाईला नावे ठेवण्यापेक्षा आपल्या घरी संघर्ष करावा असे मला वाटते.

आधीच्या प्रतिसादात आम्ही कोकीदे लिहीलं नव्हतं ह्यात को किंवा दे असा प्रश्नच नाही प्रत्येकाचा स्वभावाचा गुण/दोष आहे. मला पटलेल्या गोष्टींवर राहायला जमतं म्हणून जमलं.... अर्थात विरोध पत्करावा लागलाच....

अपत्याच्या वाढदिवसाच्या पार्टीला केक आणि पिझ्झा बाहेरूध आणला.
सणावाराला पुरणपोळी, उकडीचे मोदक बाहेरून आणलेत.
दोन्ही वाक्यांवर एकसारख्याच प्रतिक्रिया उमटतील का?

मानव, सुनांनीच करायचं अशी प्रथा असू शकेल.

रुन्मेष,
तुम्हाला मांसाहार आणि श्रावण यांच्यासाठी जो आक्षेप आहे त्याची लढाई तुम्ही अवश्य लढा Happy
माझ्याशी संबंधित विषयाची लढाई मी लढते.
मापृ, माहेरी पण काही ना काही रीती प्रथा कुळाचार चालत असतात.पण घरातली मुलगी त्यावेळी शाळा/अभ्यास/कॉलेज/हॉस्टेल यात असल्याने तिच्या पर्यंत त्या रांगोळी/पाने मांडणे/आरती अश्या लिंबुटीम्बु स्वरूपात येतात.(प्रोजेक्ट मधला ज्युनिअर/दुसरीकडे बिलेबल आणि इथे फक्त मदतीला बोलावलेला माणूस)
सासरी नवे कुळाचार त्या प्रोजेक्ट चा मॅनेजर/रिक्रुटर/प्री सेल्स/प्रोग्रामर हे सगळे रोल एका माणसाकडे या स्वरूपात येतात.त्यामुळे लिहिण्या इतके जाणवत असावेत.

कुणीतरी बाई कुलाचार पाळतेय, चारीठाव सैपाक करतेय त्यामागचा पसारा आवरतेय, आवडीने किंवा जबरदस्तीने आणी ते तिने कथन केलं तर आता बाकी बायकांवर ते सगळं करण्याची जबरदस्ती होणार आहे, त्यांना ते करावंच लागणार आहे आणि समस्त स्त्रीजात रिग्रेसिव होणार आहे हे लॉजिक हास्यास्पद आहे.

म मो, ऑब्जेक्शन मिलॉर्ड! केक पिझ्झा कधीही करता येतो. सणावारांसारखे इतर पूजाविधी, ठराविक आचार, सोवळे, इत्यादि प्रकरणांचे ओझे नसते. लोकांचे दर्शनाला म्हणून सततचे येणे जाणे आणि सततचे आदरातिथ्य नसते. चटण्या कोशिंबिरी रायती, पंचामृते, पापड कुरडया यातले प्रकार वर्ज्य करता येतात. पंगत वाढणे नसते .
हां, घरी पार्टी असेल तरी घर नीटनेटके ठेवावे लागते, पडदे, चादरी वगैरे बदलाव्या लागतात, अधिकची भांडी काढून घासून ठेवावी लागतात, पसारा पडतो हे खरे.

पण सणाची लगबग दगदग वेगळी आणि गेट टुगेदरची वेगळी.

बाकी काही प्रतिसादांवरून सगळं साग्रसंगीत करण्याची प्रथा सासरी असते, माहेरी नाही हे कळले.>>> Lol मानव. ( पण मी ह्याच कॅटेगरीत येते. ) मला मीच आठवले, लग्न होउन नुकतीच आलेली. नास्तिकांच्या घरुन एका देशस्थ आस्तिक कुटुंबात. मला सोवळं ओवळं ओ कि ठो माहीत नव्हतं. मी बरीच बोलणी खाल्ली आहेत ह्यावरून. जाऊ दे. विषयांतर होईल. अनुचे मुद्दे पटले.

माझा आक्षेप याचा बोल्ड केलेल्या वाक्यातील मुद्द्याला आहे.>>> अहो तो उपहास नाही त्यामागचे कष्ट माहीत आहेत.. त्याला खरा खुरा दंडवत आहे.

बाकी काही प्रतिसादांवरून सगळं साग्रसंगीत करण्याची प्रथा सासरी असते, माहेरी नाही हे कळले>>>
असं कोणी अजून तरी म्हणलं आहे असं वाटत नाही.. आणि by the way माहेरी सरळ नाही म्हणता येतं.. आता हे आणखी वेगळंच वळण लागतंय धाग्याला सासर माहेर comparison च..
Just to give example : माझ्या माहेरी पण सेम सगळं होतं.. पण मी full day college practical आहे म्हणून कल्टी मारायचे.. or नाही करणार मी असं direct ही सांगितलंय.. rather periods मध्ये वेगळं बसण्यापासून च्या प्रथा होत्या.. बंद पाडल्या मी.. पण माहेरी rebel असणं definitely वेगळं असतं..

पुरणपोळी वगैरे बाहेरून मागवली हे कळलं तर मिळालेला 'लुक' अगदी खासच असतो बरं का ! जोडीला जमलं नाही आपल्याला हा गिल्ट पण फ्री मिळतो.
पिझा वगैरे बाबतीत अस काही घडलेल अनुभवात नाही

Pages