हात, जंतू, पाणी आणि साबण

Submitted by कुमार१ on 15 March, 2020 - 22:46

‘करोना’च्या जागतिक साथीमुळे वैयक्तिक स्वच्छतेबाबत बरीच चर्चा सर्वत्र होत आहे. रोगप्रसार कमी होण्याचे दृष्टीने त्याचे महत्व नक्कीच आहे. क्षणभर आपण ही साथ बाजूला ठेवू. कुठलाही संसर्गजन्य रोगप्रसार टाळण्याचे दृष्टीने वैयक्तिक स्वच्छता ही कायम खूप महत्वाची आहे. त्यातील एकाच महत्वाच्या पैलूकडे या लेखाद्वारे लक्ष वेधत आहे आणि तो म्हणजे आपल्या हातांची स्वच्छता.

आपले हात शास्त्रीयदृष्ट्या स्वच्छ कसे करावेत यावर काही मूलभूत माहिती देत आहे. वरवर पाहता हा विषय सामान्यज्ञान किंवा शालेय पातळीवरचा वाटेल. पण वास्तव तसे नाही. काही अपवाद वगळता बहुसंख्य लोक ही क्रिया उरकून टाकल्यासारखी करतात. हात धुण्याची महत्वाची कृती ही कायम व्यवस्थित व्हावी या उद्देशाने काही सूचना करतो. आपणही आपापले अनुभव लिहा. ही चर्चा सर्वांसाठी आरोग्यदायी व्हावी ही इच्छा.
..........

१. हात धुण्यासाठीचे पाणी स्वच्छ आणि वाहते असावे. ते गार किंवा गरम याने फरक पडत नाही. फक्त हात जर तेलकट असतील तर गरम असल्याचा फायदा होतो.
२. धुण्याची क्रिया किमान २० सेकंद झाली पाहिजे. जरा आजूबाजूस निरीक्षण केल्यास असे दिसेल, की बरेच लोक हे काम ३-४ सेकंदात उरकतात, अगदी पाटी टाकल्यासारखे.

३. हात धुताना ते खरखरून घासले पाहिजेत.
४. बहुतेक लोक फक्त हाताचा तळवा वरवर धुतात. हात नीट धुताना तळहाताची खालची बाजू आणि हातांची मागची बाजू ही देखील नीट धुतली पाहिजे.

५. साबणाचा वापर : हा या प्रक्रियेतील कळीचा मुद्दा आहे. आता साबणाच्या वापराने काय फायदे होतात ते पाहू.

इथे एक मुद्दा स्पष्ट करतो. साबणाचा एक गुणधर्म म्हणजे तो surfactant असतो. आपण हातांनी विविध कामे करताना त्यांच्यावर कमी अधिक प्रमाणात मेदाचा थर जमा होतो. नुसत्या पाण्याने हात धुताना हा थर सहज निघून जात नाही. याचे कारण म्हणजे पाणी आणि मेद ही दोन एकमेकात न मिसळणारी माध्यमे आहेत. त्या दोघांच्या संपर्कात साबण सोडला की मग मात्र ‘इमल्शन’ तयार होते आणि परिणामी त्वचेवरील मेदाचा थर पाण्याबरोबर छान निघून जातो. आता हाताला लागून आलेले जीवजंतू आणि साबण यांचा संबंध पाहू. करोना आणि अन्य काही जंतू यांच्या पेशीभोवती मेदाचे आवरण असते. जेव्हा आपण साबणाने हात धुतो त्यावेळेस हे आवरण तोडले जाते. साबणाचा वापर करीत हात खसाखसा चोळले की हातावरचे काही जंतू फुटून जातात. त्वचेला साबण लावल्याने ती निसरडी होते आणि त्यामुळे तिथले जंतू पाण्याबरोबर वाहून जातात. साबणवापराचे असे हे फायदे आहेत.

६. आता कुठल्या प्रकारचा साबण वापरावा, हा पुढचा मुद्दा. साबणाचे साधारणपणे उपलब्ध असलेले दोन प्रकार म्हणजे वडी आणि द्रवसाबण. हे दोन्ही प्रकार वापरून काही संशोधन अभ्यास झालेले आहेत. त्याबद्दल आता पाहू.
आपल्याकडे वडीचा वापर खूप होतो. अनेक जण लागोपाठ एकच वडी वापरतात तेव्हा ती सतत ओली राहते. त्यामुळे तिच्यावर धुणाऱ्याच्या हातातून आलेले जंतू राहू शकतात. मात्र हे जंतू पुढील हात धुणाऱ्याला ‘हस्तांतरित’ होत नाहीत असे आढळले आहे. त्यामुळे वडीबद्दल अकारण गैरसमज नको. फक्त एक काळजी सर्वांनी घ्यावी. एखाद्याने हात धुतल्यावर ती वडी पुरेशी कोरडी व्हावी. मग दुसऱ्याने तिचा वापर करावा. आपण वडीला हात लावण्यापूर्वी जर ती बुळबुळीत दिसली तर ती आधी पाण्याखाली धुवावी आणि मगच वापरावी.

द्रवसाबणाच्या वापराने अर्थातच वडीच्या तोट्यापासून सुटका होते. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी त्याचा वापर प्राधान्याने व्हावा.

७. हात धुवायला साबण की सॅनिटायझर , हा सध्याचा बहुचर्चित मुद्दा आहे. सॅनिटायझरमध्ये दोन प्रकार असतात – अल्कोहोलयुक्त आणि विरहित. अल्कोहोलयुक्त प्रकाराला जंतुनाशक गुणधर्म आहे. त्यासाठी त्यातील अल्कोहोलचे प्रमाण कमीत कमी ६२% असणे गरजेचे आहे.

सर्वसाधारण जनतेसाठी साबणाने नीट हात धुणे हे पुरेसे आणि योग्य आहे. संसर्गजन्य रुग्णाशी जे लोक थेट संबंधित आहेत त्यांच्यासाठी सॅनिटायझरची शिफारस केली आहे. तसेच ज्या परिस्थितीत वाहते पाणी, साबण आणि हात धुण्याची जागा उपलब्ध नसतात, त्या वेळीही ते वापरावे.

८. हात धुऊन झाल्यावर ते कशाने पुसावेत? हाही एक महत्वाचा मुद्दा.

धुतलेले हात कोरडे करण्यासाठी दोन पर्याय आहेत – कापड व कागदी रुमाल. घरगुती वापरासाठी कापड योग्य वाटते. असे हात पुसायचे कापड रोज स्व‍च्छ धुवून उन्हात वाळवलेले असावे. ही काळजी बऱ्याच घरांत घेतली जात नाही.
कागदी रुमालाने हात कोरडे करण्यात अजून एक फायदा आहे. कागद त्वचेवर अगदी घासून फिरवता येतो आणि त्यामुळे पूर्ण कोरडा होतो. घासण्याच्या क्रियेने हातावरील उरलेसुरले जंतू निघून जातात. हे पाहता सार्वजनिक ठिकाणी कागदी रुमालाचा वापर योग्य वाटतो.

सारांश: हात कशानेही पुसले तरी ते अगदी कोरडे करणे महत्वाचे.

९. कोणत्या परिस्थितीत हात नीट धुणे अत्यावश्यक आहे? शौचालयातून बाहेर आल्यावर, स्वयंपाक करण्यापूर्वी आणि जेवणापूर्वी हात धुणे या मूलभूत गोष्टी आपण जाणतो आणि पाळतो. या व्यतिरिक्त काही मुद्द्यांचा उल्लेख आवश्यक वाटतो.

a. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णास भेटण्याआधी आणि नंतर.
b. बाळांचे लंगोट बदलल्यानंतर
c. आपल्या तोंडापुढे हात धरून शिंकल्या वा खोकल्यानंतर
d. पाळीव प्राण्यांना स्पर्श केल्यानंतर
e. कचरा हाताळल्यानंतर.

जेवणापूर्वी हात धुण्याची सवय बहुतेक घरांत बहुतांश वेळा पाळली जाते. परंतु सार्वजनिक ठिकाणी मात्र बरेच लोक याचा आळस करताना दिसतात. जरा मंगल कार्यालये, उपाहारगृहे आणि प्रवासातील निरीक्षण करून पाहा. हे चित्र बिलकूल समाधानकारक नाही. बफेसाठी रांग लावण्यापूर्वी हात धुवून येणारे लोक अत्यल्प आहेत. काहींना या कृतीचा जाम आळस आहे तर काहींना त्यात कमीपणाही वाटतो ! “इथे काय चमच्यानेच तर खायचे आहे”, असा युक्तिवाद करणारेही आढळतात. पण जेवताना रोटी तोडणे आणि लिंबू पिळणे ही कामे तरी आपण हातानेच करतो, याचा त्यांना विसर पडतो.
प्रवासातील खाण्यादरम्यान तर हातांची स्वच्छंता हा विषयच अनेकांनी धाब्यावर बसवलेला दिसतो. यामध्ये जाणीवपूर्वक सुधारणा व्हायला हवी.

१०. सध्याच्या युगात आपण दिवसभर अनेकवेळा मोबाईल आणि कम्प्युटर हाताळतो. त्यामुळे मोबाईलचा पडदा आणि कम्प्युटरचा कीबोर्ड यांच्यावरही अगणित जंतू जमा होतात. या उपकरणांची योग्य ती स्व‍च्छता नियमित करावी. त्यात हलगर्जीपणा करू नये.

“हातांची नियमित स्व‍च्छता राखल्यास संसर्गजन्य रोग पसरणारच नाहीत का?” असा युक्तिवाद कधीकधी केला जातो. कुठल्याही रोगाचा १००% प्रतिबंध शक्य नाही हे बरोबर. परंतु काही मूलभूत स्वच्छता पाळल्यास रोगप्रसार रोखला जातो हे निःसंशय. म्हणूनच सामाजिक आरोग्याचे दृष्टीकोणातून हातांची स्व‍च्छता हा विषय अत्यंत महत्वाचा आहे.
…….

समाजात काही भीषण रोगांची साथ आल्यानंतर वैयक्तिक स्व‍च्छतेचे मुद्दे खूप चर्चिले जातात. कालांतराने आपल्याला या सगळ्याचा विसर पडतो. व्यवस्थित हात धुण्याची सवय ही खरे तर कायमस्वरूपीच हवी. ही साधी गोष्ट वारंवार सांगायची आणि चर्चेला घ्यायची वेळ यायला नको. दरवर्षी १५ ऑक्टोबर हा ‘जागतिक हातस्वच्छता दिवस’ म्हणून पाळला जातो. वास्तविक असा ‘दिन’ ठेवण्याची वेळ यावी हे खेदजनक आहे. सध्याच्या जागतिक साथीच्या निमित्ताने जगातील सर्वच नागरिक ही आरोग्यविषयक मूलभूत गोष्ट कायम आचरणात आणतील अशी अपेक्षा व्यक्त करतो.
*********************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वि मु,
*मग तो डोळ्यांवाटे कसा काय प्रवेश करू शकतो? >>

आपले डोळे, नाक, घसा या सगळ्यांच्या आतील भागावर एक पातळ आवरण असते ( म्युकस मेम्ब्रेन). त्याचे गुणधर्म सारखेच असतात. त्यामुळे विषाणूचा संसर्ग अशा सर्व ठिकाणांहून होऊ शकतो.
मात्र या तिघांची तुलना करता डोळ्याद्वारे होणारा करोना- संसर्ग दुर्मिळ आहे.

Vt२२०
खरच असे स्वतःचे आणि घरच्यांचे oxygen level monitor करावी का? >>>>

प्रश्न चांगला आहे पण त्याचे उत्तर सरळ नाही ! बरेच उलट-सुलट मुद्दे विचारात घ्यावे लागतात.

१. रक्तातील ऑक्सिजनची पातळी अन्य श्वसनाच्या आजारात देखील कमी होऊ शकते. उदा. न्युमोनियाचे अन्य प्रकार.
२. खुद्द कोविड श्वसनविकाराचे देखील दोन प्रकार असतात - टिपिकल आणि बिगर-टिपिकल. त्यातील फक्त पहिल्यात ऑक्सिजन पातळी कमी होते.

३. घरगुती वापराच्या oximeter यंत्रांची अचूकता बरीच कमी असते. विशिष्ट ऑक्सिजन पातळीच्या खाली त्यांची उत्तरे विश्वासार्ह नसतात.

४.अशी मोजणी घरी करताना दक्षता घ्यावी लागते. हात पुरेसे गरम असावे लागतात तसेच संबंधित बोटाच्या नखाला नेलपॉलिश असलेले सुद्धा चालत नाही.

५. उठसूट घरगुती मोजणीमुळे विनाकारण भीतीचे प्रमाण वाढत जाते.

हे सर्व बघता या उपकरणाचा उठसूट सर्वांसाठी वापर सुचविलेला नाही.

डॉक्टर , कोविद रुग्णांना तसेच इतरांना इम्युनिटी वाढवण्यासाठी प्रोटीनयुक्त आहार घ्यावा असे वाचनात आले .

यामागची कारणमीमांसा सांगू शकाल का?

जाई,
आपल्या विषाणूविरोधी प्रतिकारशक्ती मध्ये इम्युनोग्लोब्यूलिनस (Ig) चा वाटा बराच असतो. मुळात ही सर्व प्रथिने आहेत. त्यांचे शरीरात उत्तम उत्पादन होण्यासाठी आहारातून चांगल्या प्रथिनांचा वापर झाला पाहिजे.

बऱ्याच प्रथिनयुक्त आहारामधून काही खनिजेही आपसूक मिळतात. त्यांचाही प्रतिकारशक्तीच्या प्रक्रियेत वाटा असतो.

कोविडमुळे झालेल्या मृत्यूंची संख्या जगभरात बरीच आहे. अशा काही मृतदेहांचे अभ्यासासाठी शवविच्छेदन केले जाते.
त्यातून मृत्यू होण्याची कारणे अभ्यासली जातात. आतापर्यंत समजलेली तीन कारणे अशी आहेत:

१. विषाणूच्या थेट हल्ल्यामुळे झालेला शरीरपेशींचा नाश

२. अनेक रक्तवाहिन्यांमध्ये झालेल्या रक्तगुठळ्या

३. या विषाणूला रुग्णाच्या शरीराने दिलेला hyperimmune प्रतिसाद >>> अधिकाधिक पेशींचा नाश.

कुमार सर...
या विषाणूला रुग्णाच्या शरीराने दिलेला hyperimmune प्रतिसाद >>> ======>
हे नवीन ...thanks
करोनामुळे आजकाल आम्ही देखील आहोत....


नेहमीच्या आजारांचे लसीकरण

सध्या जगातील ७० देशांत नित्यनेमाने करायचे मुलांचे लसीकरण थंडावले आहे. हा मुद्दा जवळपास ८ कोटी मुलांना लागू होतोय.
या संदर्भात युनिसेफने चिंता व्यक्त केली आहे.

पोलिओ, घटसर्प आणि गोवर यांच्या लसी वेळच्या वेळी देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नियमित लसीकरणातून व्यक्तिगत संरक्षण तर मिळतेच आणि त्याच बरोबर संबंधित आजारांची समूह प्रतिकारशक्ती निर्माण होत असते. तेव्हा अशी नियमित लसीकरणे लवकरात लवकर चालू केली पाहिजेत, असे मत युनिसेफने व्यक्त केले आहे.

सर आज बातमी आहे की डब्ल्यु एच ओ म्हणतय की असिंप्टोमॅटिक लोकांकडून इन्फेक्शन होत नाही जरी ते पॉझिटिव्ह असले तरीही? या वर भिन्न मते देखील व्यक्त होत आहेत?
हा काय घोळ आहे सर?
WHO says asymptomatic spread
of Covid-19 rare,then clarifies
LATER SAYS THAT WHILE 6-41% OF INFECTED PEOPLEMAY NOT SHOW SYMPTOMS,MANY MAY TRANSMIT COVID
आणि आपल्या प्रेसचे इंट्रप्रिटेशन असे
लोकमत
लक्षणे नसलेल्या बाधितांकडून संसर्ग होण्याचा धोका नाहीच! जागतिक आरोग्य संघटनेचा निर्वाळा
आनंद आहे!!!!

अगोदर WHO नेच सांगितले होते की लक्षणे नसलेले पॉझिटिव्ह रुग्णसुद्धा "वाहक" असतील म्हणून.
आता म्हणतात नाही, WHO ने सुरुवातीपासून उलट सुलट माहिती देऊन संभ्रमाचे वातावरण तयार केले आहे.

रेव्यु, इच्चू,

हा प्रश्न बराच घोळदार झालाय खरा.
या बाबतीतले काही संदर्भ चाळल्यावर मिळालेली माहिती :

१. लक्षणविरहित बाधित या आजाराचा प्रसार करू शकतो.
२. पण अशा प्रसाराचे प्रमाण जगभरात वेगवेगळे आहे.

३. महाराष्ट्राच्या साथरोग सर्वेक्षण अधिकाऱ्यांच्या मते असा प्रसार दुर्मिळ आहे.

४. आज जरी काही बाधित लक्षणविरहित दिसत असले, तरी काही दिवसांनी त्यांना लक्षणे दिसू शकतात. म्हणजेच ते Asymptomatic नसून Presymptomatic असतात.
.....................
माध्यमांतील भाषांतरीत बातम्या घोळदार होताहेत खऱ्या.
आणि WHO निवेदने सुद्धा !

मध्यंतरी बऱ्याच परिचितांकडून हा प्रश्न विचारला गेला.

आपला विशिष्ट रक्तगट (A) आणि कोविड१९ होण्याची शक्यता यांचा खरंच संबंध आहे का ?

या संदर्भात मोजके अभ्यास युरोपमध्ये झालेले आहेत. त्यामध्ये ‘ए’ रक्तगट असणाऱ्या रुग्णांचा विशेष अभ्यास केला गेला.
या गटाच्या माणसांना जर कोविड झाला, तर त्यांच्यात श्वसनकार्य मोठ्या प्रमाणावर ढासळू शकते (failure). इतकाच सध्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.

अर्थात रक्तगट आणि हा आजार होण्याची अधिक शक्यता, यावर अजून पुरेसे संशोधन झालेले नाही. तेव्हा घाईने या मुद्द्याचे सरसकटीकरण करता येणार नाही.

मी याच्या अगदी उलट O रक्तगटाबद्दल ऐकलं आहे. O ला प्रादुर्भाव होण्याचे प्रमाण कमी आणि झालाच तर तीव्रता कमी राहील. का तर Covid cells don't as multiply in O+ !

>> पण अमेरिकेत दोनदा मला रक्तदानाला नकार दिल्या गेला कारण I am from a Malaria country
तसं नाही आहे ते. तुम्ही केव्हा अशा देशातून आलात त्यावर तो नकार ठरतो. तुम्हाला त्यांनी ते सांगितलं असावं अशी आशा आहे. पण रेडक्रॉसच्या साइटवर ही माहिती मिळायला हवी. शोधून्/बोलून पहा. मी जाते रक्तदान करायला. माझी हिमोग्लोबिन लेव्हल कमी पडते हा भाग वेगळा. पण तुम्ही फारच धडधडीत लिहिलं आहे ते थोडं चुकीचं वाटलं मला किंवा तुम्हाला ते तशी वागणूक देत असतील तर तेही चुकीचं आहे तेव्हा रिसर्च करा आणि पुढच्या वेळी जाल तेव्हा सांगा त्यांना.

अवांतर असाच नियम इंग्लंडला जाऊन आलेल्यांसाठी देखील आहे. आता कुठल्या आजारासाठी आहे ते माहित नाही. पण रक्तदानासारख्या पवित्र दानाविषयी कुणी डिमॉरलाइज होऊ नये म्हणून मी वरची पोस्ट लिहित आहे. कृ गै. नसावा. Happy

मला त्यांच्या volunteer जी माझी नेबर सुद्धा आहे तिने तसेच सांगितले वेका . अटी ही सांगितल्या. I was busy too so I couldn't follow/ keep up. तुम्ही म्हणता तसे असेलही... नंतर बघते प्रयत्न करून Happy तुमच्या प्रतिसादामुळे मलाही आशा निर्माण झाली पुन्हा ! धन्यवाद

वरचा प्रतिसाद संपादित केला आहे, कुणाला नाउमेद वाटू नये म्हणून !

विविध रक्तगट आणि काही आजार होण्याचे प्रमाण यावर गेल्या ५० वर्षांत बरेच संशोधन झाले आहे. मात्र त्यातील बरीच गृहीतके पुरेश्या पुराव्याअभावी सिद्ध झाली नाहीत.

अशा बऱ्याचशा अभ्यासांचा, रोगनिदान आणि विशिष्ट उपचार या दृष्टीने उपयोग नसतो. वैद्यकातील पूरक अभ्यास इतकेच त्यांचे महत्त्व असते.

‘रक्तगट व आजार’ असे अनेक अभ्यास आतापर्यंत गृहितके याच पातळीवर राहिलेले आहेत.

नक्की किती विषाणू शरीरात गेले की करोना त्रासदायक ठरतो,खूळ कमी विषाणू जाणे किंवा जास्त विषाणू जाणे दोघांचा सेम त्रास होऊ शकतो की कमीजास्त???

आदू,
तुमच्या प्रश्नाचे दोन टप्प्यात उत्तर देतो.

१. नक्की किती विषाणू शरीरात गेले की करोना त्रासदायक ठरतो ?
>
>>>
नक्की किती विषाणू शरीरात गेल्यावर संसर्ग त्रास होतो, याचे उत्तर सोपे नसते. ते द्यायचे झाल्यास निरोगी व्यक्तींना विषाणूचे विविध प्रमाणात डोस देऊन प्रयोग करावे लागतात.
असे प्रयोग सध्याच्या आजाराच्या बाबतीत करणे धोक्याचे आहे. म्हणून पर्यायी अभ्यास कसा करता येतो. विषाणू शरीरात शिरल्या नंतर तो किती पटीने वाढतो याचे मोजमाप करण्याच्या क्लिष्ट शास्त्रीय पद्धती असतात.

२. ,खूप कमी विषाणू जाणे किंवा जास्त विषाणू जाणे दोघांचा सेम त्रास होऊ शकतो की कमीजास्त???
>>>
एकदा विषाणू शरीरात फिरल्यावर त्याची गुणाकार पद्धतीने वाढ होत राहते. त्यातून कमी-अधिक प्रमाणात त्याचा साठा (load) तयार होतो. आता साठ्याचे प्रमाण आणि होणाऱ्या आजाराची तीव्रता यांचा संबंध सध्या तपासला जात आहे.

१. काही प्रयोगात त्यांचा संबंध नाही असे दिसले आहे
२. तर, अन्य काही प्रयोगात अधिक विषाणूचा साठा = अधिक तीव्र आजार असे दिसले आहे.

३. एखाद्या व्यक्तीच्या शरीरात किती प्रमाणात विषाणू वाढतात त्यावर लक्षणे अवलंबून असतात. जेव्हा त्यांचा साठा कमी असतो, तेव्हा त्या व्यक्तीस लक्षणे दिसत नाहीत. पुढे जेव्हा या विषाणूंची एका प्रमाणाबाहेर वाढ होते, तेव्हा तिला लक्षणे दिसतात.

तुम्ही खूप छान उत्तरे देता कुमार डॉक्टर,
Plz माझ अजून एक शंका समाधान करा,
प्रत्येक जण बाहेरून वस्तू भाजी वगैरे आणतोच,स्वतः बाहेर जाणे होतेच होते,मग अशा परिस्थितीत विषाणू शरीरापर्यंत पोचलाच नाही,असं कसं होऊ शकत हे मला समजत नाही,आणि जर तस होत असेल तर ज्या प्रमाणात करोना रुग्ण वाढायला हवेत अगदी त्या प्रमाणात तर वाढत नाहीयेत,असं कसं

आदू ,
असंख्य सूक्ष्मजंतू हे जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी आहेत. आपण विविध प्रकारे स्वच्छता बाळगून त्यांचे शरीरात जाणारे प्रमाण कमी करू शकतो; त्यांच्यापासून पूर्ण सुटका कधीच नाही !

शेवटी आपली प्रतिकारशक्ती राखणे हेच महत्वाचे ठरते. ती समतोल चौरस आहार, व्यायाम यांनीच राखायची असते.
क्षणभर कोविड बाजूला ठेऊ. आयुष्यात क्षणोक्षणी असंख्य सूक्ष्मजंतू आपल्या शरीरात घुसत असतातच. तरी आपण सगळे रोज आजारी पडतो का? नाहीच !

पांढऱ्या पेशी, इम्युनोग्लोबुलीन ..हे सर्व आपले भालदार चोपदार सतत काम करून जंतूंचा बिमोड करत असतात. त्यांच्यावर भिस्त ठेउयात.
..............................................
नोटांना इस्त्री करणे, निर्जीव वस्तूंना डेटोलच्या अगदी अंघोळी घालणे, हे सर्व मला अतिरेकी वाटते.

नोटांना इस्त्री करणे, निर्जीव वस्तूंना डेटोलच्या अगदी अंघोळी घालणे, हे सर्व मला अतिरेकी वाटते>>>>अगदी अगदी

क्षणभर कोविड बाजूला ठेऊ. आयुष्यात क्षणोक्षणी असंख्य सूक्ष्मजंतू आपल्या शरीरात घुसत असतातच. तरी आपण सगळे रोज आजारी पडतो का? नाहीच !>>>>>याला पण प्रचंड अनुमोदन, पण मग कोविड चा इतका उदो उदो का चालू आहे असा प्रश्न आहेच Sad

डॉक मला मान्य आहे की मला खूप प्रश्न पडत आहेत,पण बातम्या किंवा इतर ठिकाणाहून नीट माहिती मिळते असं वाटत नाही,
घरी अडीच वर्षाचा छोटा आहे,माझा रक्तगट A +आहे,इतर कोणतेही आजार नाहीत आणि मी रोज बसने प्रवास करत आहे,त्यामुळे करोन विषयी बरेच प्रश्न पडतात पण कोविड ची खूप भीती वाटत नाहीये
मी योग्य ती काळजी घेत आहेच पण बर्यादाचा कोविड बद्दल अति घाबरवून सोडणारे भेटले की वाटते अरे आपण याला lightly घेतोय की काय?
बाहेर जाताना मास्क,गॉगल ग्लोवस,जेवणापूवी हात स्वच्छ करणे,sanitizer लावणे
बाहेरून आले की आंघोळ,गरम पाण्याने गुळण्या,गूळ हळद दालचिनी मिरी आलं लवंग गुळवेल चहापत्ती चा लिंबू घालून काढा इतकं तरी करतेच
आता अजून काय काय करणार Sad

आता काही दिवस नवरा घरी आहे पण काही दिवसांनी त्यांना कामावर जायला लागले की मुलाला बेबी सिटिंग शिवाय पर्याय नाही,
करोना ला घाबरू तरी किती Sad

अगदी बरोबर, मनातली भीती काढा.
ते महत्वाचे आहे.
रक्तगट इ. मुद्दे विसरा. त्याचा खरा उपयोग रक्तदानाचे वेळी आहे ; आता नाही .
Bw

Pages