हात, जंतू, पाणी आणि साबण

Submitted by कुमार१ on 15 March, 2020 - 22:46

‘करोना’च्या जागतिक साथीमुळे वैयक्तिक स्वच्छतेबाबत बरीच चर्चा सर्वत्र होत आहे. रोगप्रसार कमी होण्याचे दृष्टीने त्याचे महत्व नक्कीच आहे. क्षणभर आपण ही साथ बाजूला ठेवू. कुठलाही संसर्गजन्य रोगप्रसार टाळण्याचे दृष्टीने वैयक्तिक स्वच्छता ही कायम खूप महत्वाची आहे. त्यातील एकाच महत्वाच्या पैलूकडे या लेखाद्वारे लक्ष वेधत आहे आणि तो म्हणजे आपल्या हातांची स्वच्छता.

आपले हात शास्त्रीयदृष्ट्या स्वच्छ कसे करावेत यावर काही मूलभूत माहिती देत आहे. वरवर पाहता हा विषय सामान्यज्ञान किंवा शालेय पातळीवरचा वाटेल. पण वास्तव तसे नाही. काही अपवाद वगळता बहुसंख्य लोक ही क्रिया उरकून टाकल्यासारखी करतात. हात धुण्याची महत्वाची कृती ही कायम व्यवस्थित व्हावी या उद्देशाने काही सूचना करतो. आपणही आपापले अनुभव लिहा. ही चर्चा सर्वांसाठी आरोग्यदायी व्हावी ही इच्छा.
..........

१. हात धुण्यासाठीचे पाणी स्वच्छ आणि वाहते असावे. ते गार किंवा गरम याने फरक पडत नाही. फक्त हात जर तेलकट असतील तर गरम असल्याचा फायदा होतो.
२. धुण्याची क्रिया किमान २० सेकंद झाली पाहिजे. जरा आजूबाजूस निरीक्षण केल्यास असे दिसेल, की बरेच लोक हे काम ३-४ सेकंदात उरकतात, अगदी पाटी टाकल्यासारखे.

३. हात धुताना ते खरखरून घासले पाहिजेत.
४. बहुतेक लोक फक्त हाताचा तळवा वरवर धुतात. हात नीट धुताना तळहाताची खालची बाजू आणि हातांची मागची बाजू ही देखील नीट धुतली पाहिजे.

५. साबणाचा वापर : हा या प्रक्रियेतील कळीचा मुद्दा आहे. आता साबणाच्या वापराने काय फायदे होतात ते पाहू.

इथे एक मुद्दा स्पष्ट करतो. साबणाचा एक गुणधर्म म्हणजे तो surfactant असतो. आपण हातांनी विविध कामे करताना त्यांच्यावर कमी अधिक प्रमाणात मेदाचा थर जमा होतो. नुसत्या पाण्याने हात धुताना हा थर सहज निघून जात नाही. याचे कारण म्हणजे पाणी आणि मेद ही दोन एकमेकात न मिसळणारी माध्यमे आहेत. त्या दोघांच्या संपर्कात साबण सोडला की मग मात्र ‘इमल्शन’ तयार होते आणि परिणामी त्वचेवरील मेदाचा थर पाण्याबरोबर छान निघून जातो. आता हाताला लागून आलेले जीवजंतू आणि साबण यांचा संबंध पाहू. करोना आणि अन्य काही जंतू यांच्या पेशीभोवती मेदाचे आवरण असते. जेव्हा आपण साबणाने हात धुतो त्यावेळेस हे आवरण तोडले जाते. साबणाचा वापर करीत हात खसाखसा चोळले की हातावरचे काही जंतू फुटून जातात. त्वचेला साबण लावल्याने ती निसरडी होते आणि त्यामुळे तिथले जंतू पाण्याबरोबर वाहून जातात. साबणवापराचे असे हे फायदे आहेत.

६. आता कुठल्या प्रकारचा साबण वापरावा, हा पुढचा मुद्दा. साबणाचे साधारणपणे उपलब्ध असलेले दोन प्रकार म्हणजे वडी आणि द्रवसाबण. हे दोन्ही प्रकार वापरून काही संशोधन अभ्यास झालेले आहेत. त्याबद्दल आता पाहू.
आपल्याकडे वडीचा वापर खूप होतो. अनेक जण लागोपाठ एकच वडी वापरतात तेव्हा ती सतत ओली राहते. त्यामुळे तिच्यावर धुणाऱ्याच्या हातातून आलेले जंतू राहू शकतात. मात्र हे जंतू पुढील हात धुणाऱ्याला ‘हस्तांतरित’ होत नाहीत असे आढळले आहे. त्यामुळे वडीबद्दल अकारण गैरसमज नको. फक्त एक काळजी सर्वांनी घ्यावी. एखाद्याने हात धुतल्यावर ती वडी पुरेशी कोरडी व्हावी. मग दुसऱ्याने तिचा वापर करावा. आपण वडीला हात लावण्यापूर्वी जर ती बुळबुळीत दिसली तर ती आधी पाण्याखाली धुवावी आणि मगच वापरावी.

द्रवसाबणाच्या वापराने अर्थातच वडीच्या तोट्यापासून सुटका होते. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी त्याचा वापर प्राधान्याने व्हावा.

७. हात धुवायला साबण की सॅनिटायझर , हा सध्याचा बहुचर्चित मुद्दा आहे. सॅनिटायझरमध्ये दोन प्रकार असतात – अल्कोहोलयुक्त आणि विरहित. अल्कोहोलयुक्त प्रकाराला जंतुनाशक गुणधर्म आहे. त्यासाठी त्यातील अल्कोहोलचे प्रमाण कमीत कमी ६२% असणे गरजेचे आहे.

सर्वसाधारण जनतेसाठी साबणाने नीट हात धुणे हे पुरेसे आणि योग्य आहे. संसर्गजन्य रुग्णाशी जे लोक थेट संबंधित आहेत त्यांच्यासाठी सॅनिटायझरची शिफारस केली आहे. तसेच ज्या परिस्थितीत वाहते पाणी, साबण आणि हात धुण्याची जागा उपलब्ध नसतात, त्या वेळीही ते वापरावे.

८. हात धुऊन झाल्यावर ते कशाने पुसावेत? हाही एक महत्वाचा मुद्दा.

धुतलेले हात कोरडे करण्यासाठी दोन पर्याय आहेत – कापड व कागदी रुमाल. घरगुती वापरासाठी कापड योग्य वाटते. असे हात पुसायचे कापड रोज स्व‍च्छ धुवून उन्हात वाळवलेले असावे. ही काळजी बऱ्याच घरांत घेतली जात नाही.
कागदी रुमालाने हात कोरडे करण्यात अजून एक फायदा आहे. कागद त्वचेवर अगदी घासून फिरवता येतो आणि त्यामुळे पूर्ण कोरडा होतो. घासण्याच्या क्रियेने हातावरील उरलेसुरले जंतू निघून जातात. हे पाहता सार्वजनिक ठिकाणी कागदी रुमालाचा वापर योग्य वाटतो.

सारांश: हात कशानेही पुसले तरी ते अगदी कोरडे करणे महत्वाचे.

९. कोणत्या परिस्थितीत हात नीट धुणे अत्यावश्यक आहे? शौचालयातून बाहेर आल्यावर, स्वयंपाक करण्यापूर्वी आणि जेवणापूर्वी हात धुणे या मूलभूत गोष्टी आपण जाणतो आणि पाळतो. या व्यतिरिक्त काही मुद्द्यांचा उल्लेख आवश्यक वाटतो.

a. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णास भेटण्याआधी आणि नंतर.
b. बाळांचे लंगोट बदलल्यानंतर
c. आपल्या तोंडापुढे हात धरून शिंकल्या वा खोकल्यानंतर
d. पाळीव प्राण्यांना स्पर्श केल्यानंतर
e. कचरा हाताळल्यानंतर.

जेवणापूर्वी हात धुण्याची सवय बहुतेक घरांत बहुतांश वेळा पाळली जाते. परंतु सार्वजनिक ठिकाणी मात्र बरेच लोक याचा आळस करताना दिसतात. जरा मंगल कार्यालये, उपाहारगृहे आणि प्रवासातील निरीक्षण करून पाहा. हे चित्र बिलकूल समाधानकारक नाही. बफेसाठी रांग लावण्यापूर्वी हात धुवून येणारे लोक अत्यल्प आहेत. काहींना या कृतीचा जाम आळस आहे तर काहींना त्यात कमीपणाही वाटतो ! “इथे काय चमच्यानेच तर खायचे आहे”, असा युक्तिवाद करणारेही आढळतात. पण जेवताना रोटी तोडणे आणि लिंबू पिळणे ही कामे तरी आपण हातानेच करतो, याचा त्यांना विसर पडतो.
प्रवासातील खाण्यादरम्यान तर हातांची स्वच्छंता हा विषयच अनेकांनी धाब्यावर बसवलेला दिसतो. यामध्ये जाणीवपूर्वक सुधारणा व्हायला हवी.

१०. सध्याच्या युगात आपण दिवसभर अनेकवेळा मोबाईल आणि कम्प्युटर हाताळतो. त्यामुळे मोबाईलचा पडदा आणि कम्प्युटरचा कीबोर्ड यांच्यावरही अगणित जंतू जमा होतात. या उपकरणांची योग्य ती स्व‍च्छता नियमित करावी. त्यात हलगर्जीपणा करू नये.

“हातांची नियमित स्व‍च्छता राखल्यास संसर्गजन्य रोग पसरणारच नाहीत का?” असा युक्तिवाद कधीकधी केला जातो. कुठल्याही रोगाचा १००% प्रतिबंध शक्य नाही हे बरोबर. परंतु काही मूलभूत स्वच्छता पाळल्यास रोगप्रसार रोखला जातो हे निःसंशय. म्हणूनच सामाजिक आरोग्याचे दृष्टीकोणातून हातांची स्व‍च्छता हा विषय अत्यंत महत्वाचा आहे.
…….

समाजात काही भीषण रोगांची साथ आल्यानंतर वैयक्तिक स्व‍च्छतेचे मुद्दे खूप चर्चिले जातात. कालांतराने आपल्याला या सगळ्याचा विसर पडतो. व्यवस्थित हात धुण्याची सवय ही खरे तर कायमस्वरूपीच हवी. ही साधी गोष्ट वारंवार सांगायची आणि चर्चेला घ्यायची वेळ यायला नको. दरवर्षी १५ ऑक्टोबर हा ‘जागतिक हातस्वच्छता दिवस’ म्हणून पाळला जातो. वास्तविक असा ‘दिन’ ठेवण्याची वेळ यावी हे खेदजनक आहे. सध्याच्या जागतिक साथीच्या निमित्ताने जगातील सर्वच नागरिक ही आरोग्यविषयक मूलभूत गोष्ट कायम आचरणात आणतील अशी अपेक्षा व्यक्त करतो.
*********************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Dr ,
Sanitizers Cha vapar sadharanta vahate Pani nasel tar karanyacha aahe. Asha veles tyacha ansh waranwar potat janyane kahi dhoka sambhavato ka?

कृष्णा , Bw

अल्कोहोलची विषाणूमारकता यावर थोडे संदर्भ चाळले.

१. विषाणूच्या प्रकारानुसार अल्कोहोलचे मारक प्रमाण ठरते.
२. म्हणून अमुक एकच % चे अल्कोहोल हा मुद्दा फार ताणण्यात अर्थ नाही.
३. आतापर्यंतचे अभ्यास ‘प्रस्थापित’ विषाणूंवर झालेले आहेत.
४. सध्याचा करोनाचा प्रकार हा ताजा गडी आहे. त्याचा पुरेसा व व्यापक अभ्यास अजून व्हायचा आहे.

तेव्हा रासायनिक स्व‍च्छतेचा बाऊ नको. जमेल तितकी मूलभूत स्वच्छता ठीक. शेवटी शरीराची प्रतिकारशक्ती ही मोठी ढाल आहेच न.

गौरी,
कुठलेही सॅनिटायझर हे फक्त बाह्य वापरासाठीच असते. ते हाताला लावल्यानंतर काही वेळात त्यातले अल्कोहोल उडून जाईल. पण अन्य काही रसायने हातावर राहू शकतील. तेव्हा संधी मिळताच हात पाण्याने धुवावा.
श्रद्धा,
धन्यवाद

समायोचित लेख!
एक डाॅ मोघेंचा व्हिडीओ वायरल झालाय त्या पांढरे व्हिनिगर पाण्यात डायलूट करुन वापरावे असे सांगितलेआहे. ते योग्य ना
https://youtu.be/AzXcHvGZ5sU

मंजूताई, सोनाली,
धन्यवाद.

* Vinegar = acetic acid ( 5-8%)
‘वैद्यकीय जंतुनाशके’ यांच्या यादीवर एक साधारण नजर टाकली तर अल्कोहोलचे स्थान बरेच वरचे आहे.
Peracetic acid हे त्या यादीत दिसते. पण निव्वळ विनेगर नाही दिसत. ते तितकेसे प्रभावी नाही.

मला ते स्वयंपाकघरातील ओटा, टेबल यासाठी ठीक वाटते.

<१. विषाणूच्या प्रकारानुसार अल्कोहोलचे मारक प्रमाण ठरते.
२. म्हणून अमुक एकच % चे अल्कोहोल हा मुद्दा फार ताणण्यात अर्थ नाही.
३. आतापर्यंतचे अभ्यास ‘प्रस्थापित’ विषाणूंवर झालेले आहेत.
४. करोना हा ताजा गडी आहे. त्याचा पुरेसा व व्यापक अभ्यास अजून व्हायचा आहे.>

करोना हा ताजा गडी आहे, हे तुमचे विधान सपशेल चूक आहे. कारण कोरोनाव्हायरस हा एक समूह आहे. या समूहातील व्हायरसांमुळे साध्या सर्दीपासून ते Middle East Respiratory Syndrome (MERS-CoV) आणि Severe Acute Respiratory Syndrome (SARS-CoV) असे रोग होतात. तुम्ही ज्याला 'ताजा गडी' म्हणत आहात, त्याचं नाव आहे severe acute respiratory syndrome coronavirus 2
(SARS-CoV-2) आणि त्याच्यामुळे जो आजार होतो, त्याचं नाव आहे COVID-19.

कोरोनाव्हायरस समूहातल्या इतर व्हायरसांवर अल्कोहोलचा परिणाम होतो, तसा तो SARS-CoV-2वरसुद्धा होईल. मात्र अल्कोहोलमुळे होणारा परिणाम हा साबणामुळे होणार्‍या परिणामापेक्षा कमी असू शकतो. कारण साबण व अल्कोहोल हे वेगवेगळ्या पद्धतीने व्हायरसांविरुद्ध काम करतात.

पुढचं थोड्या वेळाने लिहितो.

समयोचित व सर्वसमावेशक लेख. खूप छान उजळणी झाली. २-३ मिनिटात हात धुणे हा प्रकार माझ्याकडून हि होतो बऱ्याच वेळेला. कारण हिवाळ्याचा दिवसात वारंवार धुतल्याने त्वचा शुष्क आणि रखरखीत होते. पण आता मात्र व्यवस्थित हात धुणार. कोरोना.. नको ना !! Happy

चांगल्या चर्चेबद्दल सर्वांचे आभार !
....................................
* यानिमित्ताने लोकसत्ता मधे Ignaz Semmelweis बद्दल आलेला लेख आठवला.
Submitted by @Shraddha
>>>>>

या प्रतिसादामुळे काही रोचक वाचन घडले. त्याचा सारांश:

१९व्या शतकात जंतुसंसर्गातून झालेल्या तापाने बरेच लोक मरत. पण त्याचे कारण समजत नसे. १८४६मध्ये Ignaz S या हंगेरियन डॉ ने याचे बारीक निरीक्षण करून एक महत्वाचा निष्कर्ष काढला. तो म्हणजे, रुग्णालयातील डॉक्टरांच्या हातांच्या अस्वच्छतेमुळे रुग्णांना गंभीर ताप येतो. त्यावेळेस जीवाणूंबद्दल फारशी माहितीच नव्हती.
मग या डॉ ने सर्व डॉ नी हात स्वच्छ धुवावेत तसेच शल्य-उपकरणे क्लोरीनने धुवावीत असा आदेश काढला.
पण प्रकरण सोपे नव्हते.

अन्य डॉ नी त्याचे ऐकण्याऐवजी त्याला जोरदार विरोध केला. त्याला अगदी वेड्यात काढले. “डॉ चे हात अस्वच्छ आहेत” हे विधान त्यांना अपमानास्पद वाटले. मग त्यांनी संगनमत करून Ignaz S यांची हकालपट्टी केली. या धक्क्याने शेवटी ते मनोरुग्ण झाले.

पुढे यातून प्रेरणा घेऊन संशोधकांनी सूक्ष्मजंतूंचा शोध लावला.
......
आज आपण हात स्वच्छतेचे महत्व जाणतोच.

जालावर आजचे गुगल -डूडल (मुखपृष्ठ) जरूर पाहा. त्यावर Ignaz S यांचे स्मरणचित्र आहे.
त्यांना त्रिवार वंदन !

त्लोकसत्तेतील लेख ५-६ दिवसांपूर्वी वाचला होता.एका डॉक्टरचे असे पद्धतशीर खच्चीकरण करून आत्यंतिक हालात मृत्यू आला हे वाचूनच सुन्न झाले होते.

>>>>अन्य डॉ नी त्याचे ऐकण्याऐवजी त्याला जोरदार विरोध केला. त्याला अगदी वेड्यात काढले. “डॉ चे हात अस्वच्छ आहेत” हे विधान त्यांना अपमानास्पद वाटले. मग त्यांनी संगनमत करून Ignaz S यांची हकालपट्टी केली. या धक्क्याने शेवटी ते मनोरुग्ण झाले.>>>>
@कुमार - Sad अरेरे! फार भयानक. कोणाचे आपल्या विरुद्ध मत असले की कधीकधी मानवजात किती क्रूर होउ शकते Sad

वरील सर्वांशी सहमत.
*अरेरे! फार भयानक. कोणाचे आपल्या विरुद्ध मत असले की कधीकधी मानवजात किती क्रूर होउ शकते >>>

अगदी. इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत.
त्यातली काही मूलभूत विज्ञानासंबंधी आहेत.

एक दखलपात्र जाहिरात

‘लाइफबॉय’ साबणाची अभिनेत्री काजोल ही मुद्रादूत आहे. पण सध्याच्या त्यांच्या जाहिरातीत तिने आवाहन केले आहे की की कोणत्याही साबणाने हात धुवा.

https://www.afaqs.com/news/advertising/when-lifebuoys-handwashing-ambass...
हे विशेष वाटले.

‘लाइफबॉय’ साबणाची अभिनेत्री काजोल ही मुद्रादूत आहे. पण सध्याच्या त्यांच्या जाहिरातीत तिने आवाहन केले आहे की की कोणत्याही साबणाने हात धुवा. >> फारच सकारात्मक.

राच्याकने, मुद्रादूत शब्द वाचून दाताखाली खडा आल्यागत झालं पण असो तो इथला विषय नाही.

मी मराठी वृत्तपत्रांत 'नाममुद्रादूत' असा शब्द वाचला आहे.
मुद्रादूत' हा छोटा छान वाटतो.

>>फारच सकारात्मक.<<
हे एक प्रकारचं मार्केटिंग गिमिक आहे. डागाळलेली प्रतिमा सुधारण्यासाठी किंवा असलेली वृद्धिंगत होण्यासाठी केलेलं कँपेनिंग. कोक-कोला ने स्वतःचे प्रॉडक्टस वापरु नका असं आवाहन काहि वर्षांपुर्वि केलं होतं...

राज,
या विषयाची दुसरी बाजू तुम्ही दाखवलीत.
धन्यवाद !

>>इथे आहे ओरिजिनल ऍड<<
बरोबर आहे तुमचं. मी दिलेल्या अ‍ॅड मध्ये थोडा मसाला भरलेला आहे; लक्षात आणुन दिल्याबद्दल धन्यवाद. परंतु मेसेज आणि त्यामगचा हेतु "कम क्लिन" हाच आहे...

बी विजय, आभार.

‘ओसीडी’
हा विकार असलेल्या रुग्णांना एरवीही हात वारंवार धुवायची खोड असते. सध्याच्या वातावरणात त्यांची अजूनच गोची होत आहे. त्यांचे मानसिक द्वंद्व वाढत आहे.

“आता इतर सर्वजणही स्वच्छतेबाबाबत आपल्यासारखेच वागत आहेत”, अशी त्यांना भावना होत आहे !

एक चांगला लेख इथे :
https://www.nytimes.com/2020/04/03/style/ocd-coronavirus-challenges.html

भाज्या, फळे धुण्यासाठी पोटॅशिअम परमॅन्गनेट वापरता येईल का? माझ्याकडे त्याची पावडर आहे. किती प्रमाण घेऊन द्रावण तयार करावे धुण्यास.

आणि त्याने COVID19 विषाणु निष्क्रिय होउ शकेल का, अशी काही माहिती अद्याप आली आहे का?

मानव,

भाज्या धुण्यासाठी 0.1% KMnO4 वापरून पूर्वी काही अभ्यास झालेले आहेत. पण त्यांत जीवाणूविरोधक उपयोग झालेला आहे.

अद्याप करोनाविषाणू विरोधात किती फायदा आहे याची अधिकृत माहिती मिळालेली नाही. समजल्यास नंतर लिहीन.

Pages