हात, जंतू, पाणी आणि साबण

Submitted by कुमार१ on 15 March, 2020 - 22:46

‘करोना’च्या जागतिक साथीमुळे वैयक्तिक स्वच्छतेबाबत बरीच चर्चा सर्वत्र होत आहे. रोगप्रसार कमी होण्याचे दृष्टीने त्याचे महत्व नक्कीच आहे. क्षणभर आपण ही साथ बाजूला ठेवू. कुठलाही संसर्गजन्य रोगप्रसार टाळण्याचे दृष्टीने वैयक्तिक स्वच्छता ही कायम खूप महत्वाची आहे. त्यातील एकाच महत्वाच्या पैलूकडे या लेखाद्वारे लक्ष वेधत आहे आणि तो म्हणजे आपल्या हातांची स्वच्छता.

आपले हात शास्त्रीयदृष्ट्या स्वच्छ कसे करावेत यावर काही मूलभूत माहिती देत आहे. वरवर पाहता हा विषय सामान्यज्ञान किंवा शालेय पातळीवरचा वाटेल. पण वास्तव तसे नाही. काही अपवाद वगळता बहुसंख्य लोक ही क्रिया उरकून टाकल्यासारखी करतात. हात धुण्याची महत्वाची कृती ही कायम व्यवस्थित व्हावी या उद्देशाने काही सूचना करतो. आपणही आपापले अनुभव लिहा. ही चर्चा सर्वांसाठी आरोग्यदायी व्हावी ही इच्छा.
..........

१. हात धुण्यासाठीचे पाणी स्वच्छ आणि वाहते असावे. ते गार किंवा गरम याने फरक पडत नाही. फक्त हात जर तेलकट असतील तर गरम असल्याचा फायदा होतो.
२. धुण्याची क्रिया किमान २० सेकंद झाली पाहिजे. जरा आजूबाजूस निरीक्षण केल्यास असे दिसेल, की बरेच लोक हे काम ३-४ सेकंदात उरकतात, अगदी पाटी टाकल्यासारखे.

३. हात धुताना ते खरखरून घासले पाहिजेत.
४. बहुतेक लोक फक्त हाताचा तळवा वरवर धुतात. हात नीट धुताना तळहाताची खालची बाजू आणि हातांची मागची बाजू ही देखील नीट धुतली पाहिजे.

५. साबणाचा वापर : हा या प्रक्रियेतील कळीचा मुद्दा आहे. आता साबणाच्या वापराने काय फायदे होतात ते पाहू.

इथे एक मुद्दा स्पष्ट करतो. साबणाचा एक गुणधर्म म्हणजे तो surfactant असतो. आपण हातांनी विविध कामे करताना त्यांच्यावर कमी अधिक प्रमाणात मेदाचा थर जमा होतो. नुसत्या पाण्याने हात धुताना हा थर सहज निघून जात नाही. याचे कारण म्हणजे पाणी आणि मेद ही दोन एकमेकात न मिसळणारी माध्यमे आहेत. त्या दोघांच्या संपर्कात साबण सोडला की मग मात्र ‘इमल्शन’ तयार होते आणि परिणामी त्वचेवरील मेदाचा थर पाण्याबरोबर छान निघून जातो. आता हाताला लागून आलेले जीवजंतू आणि साबण यांचा संबंध पाहू. करोना आणि अन्य काही जंतू यांच्या पेशीभोवती मेदाचे आवरण असते. जेव्हा आपण साबणाने हात धुतो त्यावेळेस हे आवरण तोडले जाते. साबणाचा वापर करीत हात खसाखसा चोळले की हातावरचे काही जंतू फुटून जातात. त्वचेला साबण लावल्याने ती निसरडी होते आणि त्यामुळे तिथले जंतू पाण्याबरोबर वाहून जातात. साबणवापराचे असे हे फायदे आहेत.

६. आता कुठल्या प्रकारचा साबण वापरावा, हा पुढचा मुद्दा. साबणाचे साधारणपणे उपलब्ध असलेले दोन प्रकार म्हणजे वडी आणि द्रवसाबण. हे दोन्ही प्रकार वापरून काही संशोधन अभ्यास झालेले आहेत. त्याबद्दल आता पाहू.
आपल्याकडे वडीचा वापर खूप होतो. अनेक जण लागोपाठ एकच वडी वापरतात तेव्हा ती सतत ओली राहते. त्यामुळे तिच्यावर धुणाऱ्याच्या हातातून आलेले जंतू राहू शकतात. मात्र हे जंतू पुढील हात धुणाऱ्याला ‘हस्तांतरित’ होत नाहीत असे आढळले आहे. त्यामुळे वडीबद्दल अकारण गैरसमज नको. फक्त एक काळजी सर्वांनी घ्यावी. एखाद्याने हात धुतल्यावर ती वडी पुरेशी कोरडी व्हावी. मग दुसऱ्याने तिचा वापर करावा. आपण वडीला हात लावण्यापूर्वी जर ती बुळबुळीत दिसली तर ती आधी पाण्याखाली धुवावी आणि मगच वापरावी.

द्रवसाबणाच्या वापराने अर्थातच वडीच्या तोट्यापासून सुटका होते. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी त्याचा वापर प्राधान्याने व्हावा.

७. हात धुवायला साबण की सॅनिटायझर , हा सध्याचा बहुचर्चित मुद्दा आहे. सॅनिटायझरमध्ये दोन प्रकार असतात – अल्कोहोलयुक्त आणि विरहित. अल्कोहोलयुक्त प्रकाराला जंतुनाशक गुणधर्म आहे. त्यासाठी त्यातील अल्कोहोलचे प्रमाण कमीत कमी ६२% असणे गरजेचे आहे.

सर्वसाधारण जनतेसाठी साबणाने नीट हात धुणे हे पुरेसे आणि योग्य आहे. संसर्गजन्य रुग्णाशी जे लोक थेट संबंधित आहेत त्यांच्यासाठी सॅनिटायझरची शिफारस केली आहे. तसेच ज्या परिस्थितीत वाहते पाणी, साबण आणि हात धुण्याची जागा उपलब्ध नसतात, त्या वेळीही ते वापरावे.

८. हात धुऊन झाल्यावर ते कशाने पुसावेत? हाही एक महत्वाचा मुद्दा.

धुतलेले हात कोरडे करण्यासाठी दोन पर्याय आहेत – कापड व कागदी रुमाल. घरगुती वापरासाठी कापड योग्य वाटते. असे हात पुसायचे कापड रोज स्व‍च्छ धुवून उन्हात वाळवलेले असावे. ही काळजी बऱ्याच घरांत घेतली जात नाही.
कागदी रुमालाने हात कोरडे करण्यात अजून एक फायदा आहे. कागद त्वचेवर अगदी घासून फिरवता येतो आणि त्यामुळे पूर्ण कोरडा होतो. घासण्याच्या क्रियेने हातावरील उरलेसुरले जंतू निघून जातात. हे पाहता सार्वजनिक ठिकाणी कागदी रुमालाचा वापर योग्य वाटतो.

सारांश: हात कशानेही पुसले तरी ते अगदी कोरडे करणे महत्वाचे.

९. कोणत्या परिस्थितीत हात नीट धुणे अत्यावश्यक आहे? शौचालयातून बाहेर आल्यावर, स्वयंपाक करण्यापूर्वी आणि जेवणापूर्वी हात धुणे या मूलभूत गोष्टी आपण जाणतो आणि पाळतो. या व्यतिरिक्त काही मुद्द्यांचा उल्लेख आवश्यक वाटतो.

a. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णास भेटण्याआधी आणि नंतर.
b. बाळांचे लंगोट बदलल्यानंतर
c. आपल्या तोंडापुढे हात धरून शिंकल्या वा खोकल्यानंतर
d. पाळीव प्राण्यांना स्पर्श केल्यानंतर
e. कचरा हाताळल्यानंतर.

जेवणापूर्वी हात धुण्याची सवय बहुतेक घरांत बहुतांश वेळा पाळली जाते. परंतु सार्वजनिक ठिकाणी मात्र बरेच लोक याचा आळस करताना दिसतात. जरा मंगल कार्यालये, उपाहारगृहे आणि प्रवासातील निरीक्षण करून पाहा. हे चित्र बिलकूल समाधानकारक नाही. बफेसाठी रांग लावण्यापूर्वी हात धुवून येणारे लोक अत्यल्प आहेत. काहींना या कृतीचा जाम आळस आहे तर काहींना त्यात कमीपणाही वाटतो ! “इथे काय चमच्यानेच तर खायचे आहे”, असा युक्तिवाद करणारेही आढळतात. पण जेवताना रोटी तोडणे आणि लिंबू पिळणे ही कामे तरी आपण हातानेच करतो, याचा त्यांना विसर पडतो.
प्रवासातील खाण्यादरम्यान तर हातांची स्वच्छंता हा विषयच अनेकांनी धाब्यावर बसवलेला दिसतो. यामध्ये जाणीवपूर्वक सुधारणा व्हायला हवी.

१०. सध्याच्या युगात आपण दिवसभर अनेकवेळा मोबाईल आणि कम्प्युटर हाताळतो. त्यामुळे मोबाईलचा पडदा आणि कम्प्युटरचा कीबोर्ड यांच्यावरही अगणित जंतू जमा होतात. या उपकरणांची योग्य ती स्व‍च्छता नियमित करावी. त्यात हलगर्जीपणा करू नये.

“हातांची नियमित स्व‍च्छता राखल्यास संसर्गजन्य रोग पसरणारच नाहीत का?” असा युक्तिवाद कधीकधी केला जातो. कुठल्याही रोगाचा १००% प्रतिबंध शक्य नाही हे बरोबर. परंतु काही मूलभूत स्वच्छता पाळल्यास रोगप्रसार रोखला जातो हे निःसंशय. म्हणूनच सामाजिक आरोग्याचे दृष्टीकोणातून हातांची स्व‍च्छता हा विषय अत्यंत महत्वाचा आहे.
…….

समाजात काही भीषण रोगांची साथ आल्यानंतर वैयक्तिक स्व‍च्छतेचे मुद्दे खूप चर्चिले जातात. कालांतराने आपल्याला या सगळ्याचा विसर पडतो. व्यवस्थित हात धुण्याची सवय ही खरे तर कायमस्वरूपीच हवी. ही साधी गोष्ट वारंवार सांगायची आणि चर्चेला घ्यायची वेळ यायला नको. दरवर्षी १५ ऑक्टोबर हा ‘जागतिक हातस्वच्छता दिवस’ म्हणून पाळला जातो. वास्तविक असा ‘दिन’ ठेवण्याची वेळ यावी हे खेदजनक आहे. सध्याच्या जागतिक साथीच्या निमित्ताने जगातील सर्वच नागरिक ही आरोग्यविषयक मूलभूत गोष्ट कायम आचरणात आणतील अशी अपेक्षा व्यक्त करतो.
*********************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

KMNo४ पेक्षा सोडियम हायपोक्लोराइट लिक्विड अधिक उपयोगी होईल असे वाटते.
----------
छान माहिती डॉक्टर

KMnO४ पेक्षा सोडियम हायपोक्लोराइट लिक्विड अधिक उपयोगी होईल असे वाटते.
----------
छान माहिती डॉक्टर

भाज्या आपण प्रथम साबणाच्या पाण्याने धुवा आणि नंतर साध्या पाण्याने.
साबण कोणताही चालेल.
याचे दोन फायदे आहेत. एक म्हणजे सध्या करोना विषाणूंपासून याने संरक्षण मिळेल आणि
दुसरे जे कायम स्वरूपी आहे ते म्हणजे आपण ज्या भाज्या अथवा फळे सालासकट खातो म्हणजे वांगी टोमॅटो भोपळी मिरची किंवा द्राक्षे सफारचंदे सारखी फळे यावर मारलेले कीटकनाशकांचे फवारे हे तेलकट असतात. ही कीटक नाशके सुद्धा साबणाच्या पाण्यात विरघळून धुतली जातात.

जंतुनाशके असलेल्या पाण्यात भाज्या किंवा फळे जास्त वेळ ठेवावी म्हणजे जंतूंचा(जिवाणू विषाणू किंवा बुरशी) याचा पूर्ण नायनाट होण्यासाठी.
त्यापेक्षा साबणाचे पाणी जास्त उपयोगी आणि स्वस्त आहे.

जालावर शोधल्यावर मिळालेली माहिती
Dry fruits and vegetables with disposable paper towels. Do not use antibacterial soaps or dish detergents to wash fruits and vegetables because soap or detergent residues can remain on the produce. ... Precut or prewashed produce sold in open bags or containers should always be washed under running water before using

http://homeorchard.ucdavis.edu/8121.pdf

कोरोनासाठी नव्या सुचना असतील तर शोधून पाहिल्यावर हे पाहिलं

https://www.livescience.com/amp/do-not-wash-fruits-vegetables-with-soap....

>>भाज्या आपण प्रथम साबणाच्या पाण्याने धुवा आणि नंतर साध्या पाण्याने.
साबण कोणताही चालेल.>>
भाज्या आणि फळे धुण्यासाठी गार पाणी वापरा, साबणाचे पाणी वापरु नका असे इथे सांगितले आहे. फळे आणि भाज्यांचा पृष्टभाग हा आपल्या ताटवाट्यांसारखा नसतो तर पोरस असतो. त्यात अडकलेला साबणाचा अंश घातक असतो आणि तो नंतर पाण्याने धुवून काढून टाकणे कठीण असते. वाहते गार पाणी आणि स्वच्छ हातांनी चोळून धुणे पुरेसे असते. बटाटे वगैरेसाठी जोडीला ब्रश वापरु शकता.
फळे व भाज्या यावरील पेस्टीसाईडस घालवण्यासाठी बेकिंग सोडा घातलेले पाणी , मिठाचे पाणी, विनेगर घातलेले पाणी वापरा असे सांगतात.

सर्वांचे आभार.

एकंदरीत विचार करता मलाही मीठ हेच योग्य व सुरक्षित वाटते.

छान माहिती.

कोलगेट कंपनी अडीच कोटी साबणवड्या जगभरात मोफत उपलब्ध करून देणार आहे, असे वाचनात आले.
सध्या साबण हा स्वच्छतेचा केंद्रबिंदु झालाय.

छान माहिती.

कोलगेट कंपनी अडीच कोटी साबणवड्या जगभरात मोफत उपलब्ध करून देणार आहे, असे वाचनात आले.
सध्या साबण हा स्वच्छतेचा केंद्रबिंदु झालाय.

कोविद१९: स्वतःसाठी प्राथमिक मार्गदर्शन

आता नेहमीच्या ऋतुबदलाने देखील सर्दी-पडसे इ. त्रास होऊ शकतो. अशा वेळेस घाबरून न जाता लक्षणांचे थोडे स्वनिरीक्षण करावे. त्यासाठी दिल्लीच्या ‘एम्स’ ने जाहीर केलेला तक्ता देत आहे:

१. कोरडा खोकला + शिंका >>> प्रदूषणाचा त्रास

२. चिकट खोकला + शिंका + नाक वाहणे >>> सामान्य सर्दी

३. वरील २ मधील सर्व + अंगदुखी + सौम्य ताप >>> ‘फ्लू’

४. कोरडा खोकला + शिंका + अंगदुखी + अशक्तपणा + मोठा ताप + श्वसनास अडथळा >>>> करोना संसर्ग.

टीप: ही सर्वसाधारण मार्गदर्शक सूत्रे आहेत. आपापल्या डॉ चा सल्ला घेणे अत्यावश्यक !

डॉक्टर कुमार उपयुक्त तक्ता, अर्थात नेहमी प्रमाणे☺️

<<< भाज्या आपण प्रथम साबणाच्या पाण्याने धुवा आणि नंतर साध्या पाण्याने.
साबण कोणताही चालेल.
याचे दोन फायदे आहेत. एक म्हणजे सध्या करोना विषाणूंपासून याने संरक्षण मिळेल आणि
दुसरे जे कायम स्वरूपी आहे ते म्हणजे आपण ज्या भाज्या अथवा फळे सालासकट खातो म्हणजे वांगी टोमॅटो भोपळी मिरची किंवा द्राक्षे सफारचंदे सारखी फळे यावर मारलेले कीटकनाशकांचे फवारे हे तेलकट असतात. ही कीटक नाशके सुद्धा साबणाच्या पाण्यात विरघळून धुतली जातात.

नवीन Submitted by सुबोध खरे on 5 April, 2020 - 23:34 >>> माझी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती आहे, तुम्ही एक डॉक्टर आहात अन त्यामुळे बरेचजण तुमचे प्रतिसाद/सल्ले गांभीर्याने घेतात अन त्याचे अनुकरण देखील करतात. तेव्हा असे काही लिहिताना कृपया जरा विचार करा.

जसजसा कोविद रुग्णांचा अनुभव वाढतो आहे तशी अजून काही लक्षणे समजत आहेत. त्यापैकी काही वैशिष्ट्यपूर्ण ही आहेत:

१. बाधित व्यक्तीस विविध पदार्थांचा वास येत नाही. हे लक्षण खूप दखलपात्र आहे. त्यावर बऱ्यापैकी अभ्यास झाला आहे.
२. जुलाब होणे

३. कित्येक रुग्णांत पोटदुखी हे पहिले लक्षण दिसले आहे.

धन्यवाद डॉक्टर
नुसत्या खोकल्याने आता पब्लिक घाबरून न जाता वरील ३ लक्षणांबाबत नीट जागरूक राहील ही अपेक्षा !

@VB
मी जे लिहिलेले आहे ते विचारपूर्वक लिहिलेले आहे. साबण सोडून कोणते द्रव्य आहे ज्याने कीटकनाशके धुतली जातील?

साबण अर्ध्या मिनिटात भाजी किंवा फळात शोषली जात असेल याचा बाऊ करत असाल तर दिवसात 5 वेळेस साबणाने हात आणि तोंड धुता तेंव्हा किती साबण आपल्या त्वचेत शोषला जाईल? याचा विचार केला आहे का?

आपण क्लीनसिंग मिल्क फेस वॉश वापरता तो पण साबण असतो. आपण वॅक्सिंग करता त्यानंतर अस्ट्रिंजंट वापरता ते त्वचेत शोषले जात नाहीत का?

आपण जी टूथपेस्ट वापरता त्यात फेस येण्यासाठी एक तर्हेचा साबणच वापरला जातो.

ऑरगॅनिक म्हणवणाऱ्या फळांवर, भाजीपाल्यावर( किंवा इतरही) लिंबोळी अर्क फवारला जातो. हा फवारताना त्यात साबण घातला जातो हे आपल्याला माहिती आहे काय?
हा साबण किती दिवस भाज्या/ फळांवर रहिला तर चालतो, त्यात शोषला गेलेला चालतो पण अर्ध्या मिनिटापेक्षा कमी साबणाच्या पाणयात बुडवलेल्या फळातून गेलेला चालणार नाही.

बढिया है

आपल्या कडे एक वृत्ती आहे की मी भय्याच्या घाणेरड्या हाताने पाणीपुरी खाईन पण औषधांचा साईड इफेक्ट मला चालणार नाही.

येथे माय बोलीवर काही लोक अजेंडा घेऊन आलेले आहेत की माझ्या कोणत्याही पोस्टला विरोधच करायचा आणि अशांना मी फाट्यावर मारतो.

तुम्ही त्यांच्या घोळात येऊ नका एवढेच माझे म्हणणे आहे .

परंतु साबण वापरण्याच्या बाबत मी ठामच आहे.

ऑरगॅनिक म्हणवणाऱ्या फळांवर, भाजीपाल्यावर( किंवा इतरही) लिंबोळी अर्क फवारला जातो. हा फवारताना त्यात साबण घातला जातो हे आपल्याला माहिती आहे काय?
हा साबण किती दिवस भाज्या/ फळांवर रहिला तर चालतो, त्यात शोषला गेलेला चालतो पण अर्ध्या मिनिटापेक्षा कमी साबणाच्या पाणयात बुडवलेल्या फळातून गेलेला चालणार नाही >> +१२३
इमल्शन बाबत अतिशय सुस्पष्ट विवेचन
-----
माझी १ शंका आहे - वरती काही ठिकाणी भाज्या इत्यादी धुण्यासाठी मिठाच्या द्रावणाचा वापर करण्यास सुचवलेले आहे तर ह्याबाबत नक्की किती सॅलेनिटीला विषाणु मृत होतात ह्याबाबत काही माहिती मिळेल तर बरे होईल. म्हणजे हां पर्याय वापरताना योग्य ती खबरदारी घेता येईल.

अज्ञानी,
WHOचा एक विस्तृत अहवाल इथे आहे :

https://apps.who.int/iris/bitstream/handle/10665/64435/WHO_FSF_FOS_98.2....

त्यानुसार भाजीपाल्याचे निर्जंतुकीकरणाचे बाबतीत जीवाणूसंदर्भात बराच अभ्यास झालेला आहे. तिथे ती उपयुक्त ठरली आहेत.

परंतु विषाणूंचे बाबतीत या प्रक्रिया कितपत उपयुक्त आहेत याबाबत साशंकता आहे.
पुरेसा अभ्यास झालेला नाही.

मिठाच्या पाण्याचा कितपत उपयोग होईल याबद्दल साशंकता वाटते कारण कॉन्सन्ट्रेटेड सलाईन हे ऑस्मॉटिक प्रेशर मुळे जिवाणू किंवा बुरशीच्या पेशीतील द्रव काढून घेते. त्यामुळे त्या पेशी वाढू शकत नाहीत.

विषाणूंची अशी पेशी नसतेच त्यामुळे त्याचा कितपत प्रभाव पडेल हा प्रश्नच आहे.

मुळात जर मिठाच्या पाण्यात जंतू मरत असते तर आपले सगळे समुद्र जंतुविरहित असायला हवे होते.

मिठाच्या पाण्यात भाज्या/ फळे फार वेळ बुडवून ठेवल्यास तयारी पाणी कमी होऊन त्या शुष्क होतील/ त्यांना सुरकुत्या येतील .

वैद्यकीय क्षेत्रात कोणतेही उपकरण निर्जंतुक करण्यासाठी किंवा हात धुण्यासाठी मिठाचे पाणी कधीही वापरले जात नाही.

निदान मी तरी निर्जंतुकीकरणासाठी कुठे वापरल्याचे ऐकले किंवा वाचले नाही.

छान माहिती व चर्चा.

या विषयावर घरात बरेच चर्वीचर्वण झाल्यावर आम्ही एक सोपा निर्णय घेतला.
ज्या भाज्या आपण शिजवून खातोय तिथे घाबरायचे नाही. नुसत्या पाण्यानेच धुवून घेतो.
कोशिंबिरीसाठी फक्त ज्या भाज्यांची साले काढून टाकता येतात, त्याच वापरतो. म्हणून टोमाटो आणतच नाही. फळांचे बाबतही तसेच ठरवले.

अहो आधीच हात धुवून धुवून दमाया झालंय , काय काय बघायचे आता Bw

@सुबोध खरे , ,तुमच्याकडून अश्याच प्रतिसादाची अपेक्षा होती. असो, मला तुमच्या सारख्याशी वाद घालायचा नाही
अन डॉ कुमारांच्या धाग्यावर तर बिलकुल नाही. त्यांचे लेख अन प्रतिसाद उत्तम, संयमित अन पटणारे असतात, अगदी आरारा यांचे सुध्दा. पण तुमचे गेल्या काही दिवसातील मायबोली वरचे प्रतिसाद बघता , किमान मला तरी माझा वेळ वाया घालवायचा नाही.

तरी, जाता जाता इतकेच सांगेन, कधीतरी चांगल्या साठी खरे बोलावे. डॉक्टर असला तरी माणूसच असतो, उगा गर्वाने माझेच कसे खरे हा वाद योग्य नाही. अन फक्त इथेच नव्हे तर सोशल मीडियावर काहीही सल्ले किंवा लेख लिहिताना, कृपया लक्षात असू द्या की आपल्याकडे डॉक्टरांना खूप मान सन्मान असतो, व त्यांनी दिलेला आरोग्यविषयी सल्ला किंवा त्यांची मते गांभीर्याने घेतात, म्हणून प्लिज खूप विचार पूर्वक लिहा.

माझा हा तुम्हाला उद्देशून शेवटचा प्रतिसाद इथेच नाहीतर संपूर्ण माबोवर ___/|\___

>>येथे माय बोलीवर काही लोक अजेंडा घेऊन आलेले आहेत की माझ्या कोणत्याही पोस्टला विरोधच करायचा आणि अशांना मी फाट्यावर मारतो.>>
डॉ. खरे, माझा कुठलाही अजेंडा नाही. इथे कुणाला ट्रोल करण्यात , सिंगल आउट करण्यात मला काडीचाही रस नाही. आम्हाला इथे एक्सटेंशनकडून ज्या सुचना येतात त्यांचे पालन करतो इतकेच. इथे साबणाचे पाणी वापरावे असे लिहिले गेले म्हणून सांगितले. ती पोस्ट कुणाचीही असती तरी मी तोच प्रतिसाद लिहीला असता. इथे मायबोलीवर अनेक सदस्य लिहित असतात. जेव्हा प्रतिसाद खटकतो, मला मिळालेल्या अधिकृत माहितीपेक्षा वेगळी माहिती इथे आली तर मी मला मिळालेली माहिती लिहिते.
राहाता राहीला प्रश्न नीम ऑइलचा, तर इथे तेही पाण्यात मिसळून फवारावे असे सांगितले जाते. पाण्यात मिसळल्यावर याचे हाफ लाईफ ४५ मिनीटे ते ४ दिवस असे असते.
मिशिगन स्टेट मधील एका डॉक्टरनी भाज्या आणि फळे स्वच्छ करण्याबाबत जो विडीओ टाकला होता त्यात सोपचा उल्लेख होता. त्यावर बरीच चर्चा झाली. मग तसे करु नका असे नव्याने सांगितले गेले. अर्थात हे USDA ने सांगितले आहे. भारतात अधिकृत सल्ला वेगळा दिला जात असल्यास मला माहिती नाही.
https://www.livescience.com/do-not-wash-fruits-vegetables-with-soap.html

.

@स्वाती 2
आपण दिलेला दुवा मी अगोदरच वाचलेला होता परंतु जर फळे किंवा भाजीपल्यावर साबणाचा अंश राहू शकतो तर तो आपल्या हातावरही राहू शकतो आणि तेच हात आपण खाण्यासाठी वापरतो तेंव्हा हा साबण आपल्या पोटात जाऊ शकतो. दिवसात इतक्या वेळेला जर आपण हात धुतले तर त्यातून जास्त साबण पोटात जाईल.
अमेरिकेत एखाद्या औषधाचा किंवा खाद्य पदार्थाचा साइड इफेक्टचा फार मोठ्या प्रमाणावर बाऊ केला जातो हे ही आपल्याला माहिती आहे.
अजेंडा आपला नाही हे मी जाणतो आणि आपण जाणता.
माझा रोख इतरांकडे होता आणि ज्यांना समजायचं आहे ते समजले आहेत.

बाकी अमेरिकेत जी कीटकनाशके फवारली जातात त्यात आणि भारतात जी आणि जशी वापरली जातात त्यात जमीन अस्मानाचा फरक आहे.

त्यामुळे भारतात साबणाचे पाणी वापरले जाण्याचा सल्ला देणे हे क्रमप्राप्त आहे.

साबण हा आपल्या टूथपेस्ट पासून ते क्लिनसिंग मिल्क पर्यंत असंख्य ठिकाणी वापरला जातो अगदी बद्धकोष्ठ या आजाराची जो एनिमा दिला जातो त्यात सुद्धा साबण वापरला जातो.

साबण पोटात गेल्याच जेवढा बाऊ केला जातो तेवढं काहीही होत नाही.

माझा रोख आपल्याकडे नव्हता गैरसमज नसावा
क्षमस्व

सोडियम बाय कार्बोनेटला (खाण्याचा सोडा) काही प्रमाणात विषाणूविरोधी गुणधर्म आहे. अन्य एका विषाणू संदर्भातील एक अभ्यास इथे:

https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/16540196/
हे तसे सुरक्षित असल्याने त्याचा विचार भाज्या धुवायला करता येईल.

डॉक्टर,अमुक देशात रुग्णांची संख्या कमी आहे कारण तिकडे तपासणीचे प्रमाण खुप कमी आहे. असे आपण वाचतो मग..
1) पण रुग्ण असतीलच किंवा होते (ज्यांची प्रतिकार शक्ति चांगली आहे) जे आपोआप बरे झाले.
2) मग (शंका अस माझ्या अल्प ज्ञानाप्रमाणे वाटते) सात- चौदा दिवसात लक्षण दिसतात ती तपासणी न करता ही दिसायला हवीत.
3) दुर्दैवाने ज्यांचे मृत्यु झाले ते नक्की कोविड-19 नेच झाले हे कसे ठरवतात. त्यांना ईतर आजार होते.
4) ही संचारबंदी उठवली आणि एकादी सुदृढ व्यक्ति कोविड-19 कॅरियला भेटली तर पुन्हा साखळी चालु होते का.

@ VB , मला कोणाचीही बाजू घ्यायची नाहीये, पण डॉ खरे खूप चुकीचे बोलत आहेत असे नाही. दोन डॉ ची मते वेगवेगळी असली तरी डॉ म्हणून त्यांचे महत्व अबाधीत रहातेच. आता तर घरी आम्ही कलिंगड व केळे ( वरची साल ) सुद्धा हलक्याश्या ( माईल्ड ) विम लिक्विड सोप मध्ये धुऊन घेतो. लगेच साध्या पाण्याने धुऊन पुसुन घेतो. अगदी आपल्या डेटॉल किंवा सेव्हलॉन वापरायचे नाहीये या ठिकाणी. भांडी धुण्याचा साबण ( जेल ) पुरेसा आहे.

डॉ खरे म्हणतायत ते खरे आहे. भारतात जंतु नाशकांचा फार वापर होतो. मीठाचे पाणी सुद्धा चांगलेच आहे.

माझी सुद्धा राजकीय मते डॉ आरारा किंवा डॉ जामोप्या यांच्या विरोधात आहेत/ असतात, पण जेव्हा डॉ म्हणून हे लोक माझे विधान ( राजकीय नव्हे ) खोडुन काढतात किंवा काढतील तेव्हा मला त्यांचा राग येणार नाही, आणी येतही नाही कारण त्यांचा डॉ म्हणून अनूभव हा केव्हाही महत्वपूर्णच असतो. तेव्हा रागवु नका. डॉ लोकांनी स्पष्ट बोललेले पेशंटच्या/ माणसांच्या हितासाठीच असते.

@ michto,
2) मग (शंका अस माझ्या अल्प ज्ञानाप्रमाणे वाटते) सात- चौदा दिवसात लक्षण दिसतात ती तपासणी न करता ही दिसायला हवीत.
>>>>

काही रुग्णांत बरेच दिवस लक्षणे दिसत नाहीत, म्हणून चाचणी आवश्यक.
तसेच ताप, खोकला, स्नायूदुखी ... इ. लक्षणे ही कुठल्याही जंतूजन्य आजाराची असू शकतात. म्हणून कोविद चाचणी सध्या आवश्यक.
........
3) दुर्दैवाने ज्यांचे मृत्यु झाले ते नक्की कोविड-19 नेच झाले हे कसे ठरवतात. त्यांना ईतर आजार होते.
>>>>>
कोविद्चे काही विशिष्ट वाईट परिणाम असे असतात:
१. विशिष्ट प्रकारच्या पांढऱ्या पेशींत वाढ
२. एक एन्झाइम व एक प्रथिन (D- dimer) यांची वाढलेली पातळी.

आता समजा त्या रुग्णास इतर दीर्घकालीन आजार आधीपासूनच आहेत. त्या आजारांत वरील २ मधील दोन मुद्दे असायचे काही कारण नाही; किंवा त्याची शक्यता खूपच कमी असेल.

अजून एक. जेव्हा दोन मोठे आजार शरीरात एकत्र रहातात, तेव्हा त्या दोघांचाही एकमेकावर अधिक वाईट परिणाम होतो. विशेषतः मधुमेहाचे बाबतीत तर हे अगदीच दिसते. त्यामुळे अशा रुग्णात मृत्यू होण्यास दोन्ही आजारांचा एकत्रित परिणाम कारणीभूत असतो.

समजा. अशा रुग्णास कोविद झालाच नसता, तर मूळच्या नियंत्रित आजाराने तो मरण्याची शक्यता धूसर होती.
(पुढे चालू..)

@ michto,

* ही संचारबंदी उठवली आणि एकादी सुदृढ व्यक्ति कोविड-19 कॅरियला भेटली तर पुन्हा साखळी चालु होते का. >>>

साखळी चालू व्हायची शक्यता खूप कमी राहते. याचे कारण म्हणजे तोपर्यंत समाजातील अनेकांत कोविद-विरोधी सामाजिक प्रतिकारशक्ती (herd immunity) निर्माण झालेली असते.

म्हणूनच ती निर्माण होईपर्यंत संचारबंदीचे महत्व !

Pages