हात, जंतू, पाणी आणि साबण

Submitted by कुमार१ on 15 March, 2020 - 22:46

‘करोना’च्या जागतिक साथीमुळे वैयक्तिक स्वच्छतेबाबत बरीच चर्चा सर्वत्र होत आहे. रोगप्रसार कमी होण्याचे दृष्टीने त्याचे महत्व नक्कीच आहे. क्षणभर आपण ही साथ बाजूला ठेवू. कुठलाही संसर्गजन्य रोगप्रसार टाळण्याचे दृष्टीने वैयक्तिक स्वच्छता ही कायम खूप महत्वाची आहे. त्यातील एकाच महत्वाच्या पैलूकडे या लेखाद्वारे लक्ष वेधत आहे आणि तो म्हणजे आपल्या हातांची स्वच्छता.

आपले हात शास्त्रीयदृष्ट्या स्वच्छ कसे करावेत यावर काही मूलभूत माहिती देत आहे. वरवर पाहता हा विषय सामान्यज्ञान किंवा शालेय पातळीवरचा वाटेल. पण वास्तव तसे नाही. काही अपवाद वगळता बहुसंख्य लोक ही क्रिया उरकून टाकल्यासारखी करतात. हात धुण्याची महत्वाची कृती ही कायम व्यवस्थित व्हावी या उद्देशाने काही सूचना करतो. आपणही आपापले अनुभव लिहा. ही चर्चा सर्वांसाठी आरोग्यदायी व्हावी ही इच्छा.
..........

१. हात धुण्यासाठीचे पाणी स्वच्छ आणि वाहते असावे. ते गार किंवा गरम याने फरक पडत नाही. फक्त हात जर तेलकट असतील तर गरम असल्याचा फायदा होतो.
२. धुण्याची क्रिया किमान २० सेकंद झाली पाहिजे. जरा आजूबाजूस निरीक्षण केल्यास असे दिसेल, की बरेच लोक हे काम ३-४ सेकंदात उरकतात, अगदी पाटी टाकल्यासारखे.

३. हात धुताना ते खरखरून घासले पाहिजेत.
४. बहुतेक लोक फक्त हाताचा तळवा वरवर धुतात. हात नीट धुताना तळहाताची खालची बाजू आणि हातांची मागची बाजू ही देखील नीट धुतली पाहिजे.

५. साबणाचा वापर : हा या प्रक्रियेतील कळीचा मुद्दा आहे. आता साबणाच्या वापराने काय फायदे होतात ते पाहू.

इथे एक मुद्दा स्पष्ट करतो. साबणाचा एक गुणधर्म म्हणजे तो surfactant असतो. आपण हातांनी विविध कामे करताना त्यांच्यावर कमी अधिक प्रमाणात मेदाचा थर जमा होतो. नुसत्या पाण्याने हात धुताना हा थर सहज निघून जात नाही. याचे कारण म्हणजे पाणी आणि मेद ही दोन एकमेकात न मिसळणारी माध्यमे आहेत. त्या दोघांच्या संपर्कात साबण सोडला की मग मात्र ‘इमल्शन’ तयार होते आणि परिणामी त्वचेवरील मेदाचा थर पाण्याबरोबर छान निघून जातो. आता हाताला लागून आलेले जीवजंतू आणि साबण यांचा संबंध पाहू. करोना आणि अन्य काही जंतू यांच्या पेशीभोवती मेदाचे आवरण असते. जेव्हा आपण साबणाने हात धुतो त्यावेळेस हे आवरण तोडले जाते. साबणाचा वापर करीत हात खसाखसा चोळले की हातावरचे काही जंतू फुटून जातात. त्वचेला साबण लावल्याने ती निसरडी होते आणि त्यामुळे तिथले जंतू पाण्याबरोबर वाहून जातात. साबणवापराचे असे हे फायदे आहेत.

६. आता कुठल्या प्रकारचा साबण वापरावा, हा पुढचा मुद्दा. साबणाचे साधारणपणे उपलब्ध असलेले दोन प्रकार म्हणजे वडी आणि द्रवसाबण. हे दोन्ही प्रकार वापरून काही संशोधन अभ्यास झालेले आहेत. त्याबद्दल आता पाहू.
आपल्याकडे वडीचा वापर खूप होतो. अनेक जण लागोपाठ एकच वडी वापरतात तेव्हा ती सतत ओली राहते. त्यामुळे तिच्यावर धुणाऱ्याच्या हातातून आलेले जंतू राहू शकतात. मात्र हे जंतू पुढील हात धुणाऱ्याला ‘हस्तांतरित’ होत नाहीत असे आढळले आहे. त्यामुळे वडीबद्दल अकारण गैरसमज नको. फक्त एक काळजी सर्वांनी घ्यावी. एखाद्याने हात धुतल्यावर ती वडी पुरेशी कोरडी व्हावी. मग दुसऱ्याने तिचा वापर करावा. आपण वडीला हात लावण्यापूर्वी जर ती बुळबुळीत दिसली तर ती आधी पाण्याखाली धुवावी आणि मगच वापरावी.

द्रवसाबणाच्या वापराने अर्थातच वडीच्या तोट्यापासून सुटका होते. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी त्याचा वापर प्राधान्याने व्हावा.

७. हात धुवायला साबण की सॅनिटायझर , हा सध्याचा बहुचर्चित मुद्दा आहे. सॅनिटायझरमध्ये दोन प्रकार असतात – अल्कोहोलयुक्त आणि विरहित. अल्कोहोलयुक्त प्रकाराला जंतुनाशक गुणधर्म आहे. त्यासाठी त्यातील अल्कोहोलचे प्रमाण कमीत कमी ६२% असणे गरजेचे आहे.

सर्वसाधारण जनतेसाठी साबणाने नीट हात धुणे हे पुरेसे आणि योग्य आहे. संसर्गजन्य रुग्णाशी जे लोक थेट संबंधित आहेत त्यांच्यासाठी सॅनिटायझरची शिफारस केली आहे. तसेच ज्या परिस्थितीत वाहते पाणी, साबण आणि हात धुण्याची जागा उपलब्ध नसतात, त्या वेळीही ते वापरावे.

८. हात धुऊन झाल्यावर ते कशाने पुसावेत? हाही एक महत्वाचा मुद्दा.

धुतलेले हात कोरडे करण्यासाठी दोन पर्याय आहेत – कापड व कागदी रुमाल. घरगुती वापरासाठी कापड योग्य वाटते. असे हात पुसायचे कापड रोज स्व‍च्छ धुवून उन्हात वाळवलेले असावे. ही काळजी बऱ्याच घरांत घेतली जात नाही.
कागदी रुमालाने हात कोरडे करण्यात अजून एक फायदा आहे. कागद त्वचेवर अगदी घासून फिरवता येतो आणि त्यामुळे पूर्ण कोरडा होतो. घासण्याच्या क्रियेने हातावरील उरलेसुरले जंतू निघून जातात. हे पाहता सार्वजनिक ठिकाणी कागदी रुमालाचा वापर योग्य वाटतो.

सारांश: हात कशानेही पुसले तरी ते अगदी कोरडे करणे महत्वाचे.

९. कोणत्या परिस्थितीत हात नीट धुणे अत्यावश्यक आहे? शौचालयातून बाहेर आल्यावर, स्वयंपाक करण्यापूर्वी आणि जेवणापूर्वी हात धुणे या मूलभूत गोष्टी आपण जाणतो आणि पाळतो. या व्यतिरिक्त काही मुद्द्यांचा उल्लेख आवश्यक वाटतो.

a. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णास भेटण्याआधी आणि नंतर.
b. बाळांचे लंगोट बदलल्यानंतर
c. आपल्या तोंडापुढे हात धरून शिंकल्या वा खोकल्यानंतर
d. पाळीव प्राण्यांना स्पर्श केल्यानंतर
e. कचरा हाताळल्यानंतर.

जेवणापूर्वी हात धुण्याची सवय बहुतेक घरांत बहुतांश वेळा पाळली जाते. परंतु सार्वजनिक ठिकाणी मात्र बरेच लोक याचा आळस करताना दिसतात. जरा मंगल कार्यालये, उपाहारगृहे आणि प्रवासातील निरीक्षण करून पाहा. हे चित्र बिलकूल समाधानकारक नाही. बफेसाठी रांग लावण्यापूर्वी हात धुवून येणारे लोक अत्यल्प आहेत. काहींना या कृतीचा जाम आळस आहे तर काहींना त्यात कमीपणाही वाटतो ! “इथे काय चमच्यानेच तर खायचे आहे”, असा युक्तिवाद करणारेही आढळतात. पण जेवताना रोटी तोडणे आणि लिंबू पिळणे ही कामे तरी आपण हातानेच करतो, याचा त्यांना विसर पडतो.
प्रवासातील खाण्यादरम्यान तर हातांची स्वच्छंता हा विषयच अनेकांनी धाब्यावर बसवलेला दिसतो. यामध्ये जाणीवपूर्वक सुधारणा व्हायला हवी.

१०. सध्याच्या युगात आपण दिवसभर अनेकवेळा मोबाईल आणि कम्प्युटर हाताळतो. त्यामुळे मोबाईलचा पडदा आणि कम्प्युटरचा कीबोर्ड यांच्यावरही अगणित जंतू जमा होतात. या उपकरणांची योग्य ती स्व‍च्छता नियमित करावी. त्यात हलगर्जीपणा करू नये.

“हातांची नियमित स्व‍च्छता राखल्यास संसर्गजन्य रोग पसरणारच नाहीत का?” असा युक्तिवाद कधीकधी केला जातो. कुठल्याही रोगाचा १००% प्रतिबंध शक्य नाही हे बरोबर. परंतु काही मूलभूत स्वच्छता पाळल्यास रोगप्रसार रोखला जातो हे निःसंशय. म्हणूनच सामाजिक आरोग्याचे दृष्टीकोणातून हातांची स्व‍च्छता हा विषय अत्यंत महत्वाचा आहे.
…….

समाजात काही भीषण रोगांची साथ आल्यानंतर वैयक्तिक स्व‍च्छतेचे मुद्दे खूप चर्चिले जातात. कालांतराने आपल्याला या सगळ्याचा विसर पडतो. व्यवस्थित हात धुण्याची सवय ही खरे तर कायमस्वरूपीच हवी. ही साधी गोष्ट वारंवार सांगायची आणि चर्चेला घ्यायची वेळ यायला नको. दरवर्षी १५ ऑक्टोबर हा ‘जागतिक हातस्वच्छता दिवस’ म्हणून पाळला जातो. वास्तविक असा ‘दिन’ ठेवण्याची वेळ यावी हे खेदजनक आहे. सध्याच्या जागतिक साथीच्या निमित्ताने जगातील सर्वच नागरिक ही आरोग्यविषयक मूलभूत गोष्ट कायम आचरणात आणतील अशी अपेक्षा व्यक्त करतो.
*********************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कपडे निर्जंतुक करण्याची योग्य पद्धत कोणती?
गरम पाण्यात dettol सारखे disinfectant वापरून धुणे योग्य आहे का? त्याने कपडे निर्जंतुक होतात का?

आपण जर रुग्णालयात काम करणारी व्यक्ती नसाल, तर माझे मत असे आहे:

सध्याचा विषाणू हा कपड्यांवर टिकण्याचा संभव नाही. त्यामुळे आपले कपडे नेहमीप्रमाणेच साबणाने धुवावेत.

कुमार सर,
सध्या जे रोगी कोविद होऊन पूर्ण बरे झाले आहेत त्यांना यापुढे हा आजार पुन्हा होत नाही, हे खरे आहे का?

साद,
चांगला प्रश्न.

पण याचे उत्तर गुंतागुंतीचे आहे. जे रोगी या आजारातून बरे झाले आहेत, त्यांच्या रक्तातील विशिष्ट प्रथिनांचा (antibodies) चा अभ्यास केला जातो. ही प्रथिने दोन प्रकारची असतात :
1. Neutralising
2. Non-neutralising

यापैकी फक्त पहिल्याच प्रकारची प्रथिने त्या विषाणूने पुन्हा हल्ला केल्यास उपयुक्त ठरतात. ज्या रुग्णांत ही प्रथिने भरपूर तयार झाली असतील, त्यांची प्रतिकारशक्ती चांगली असेल.

पण ज्यांच्यात दुसऱ्या प्रकारची प्रथिने जास्त असतील, त्यांना हा फायदा होणार नाही. कारण ही प्रथिने त्या विषाणूचा (पुढच्या संसर्गात) नाश करू शकत नाहीत.

कुमार सर,
हा नियम सर्व आजारांना लागू होतो का ??

सतीश,
चांगला प्रश्न.

होय, तो मुद्दा साधारणपणे सगळ्या विषाणू संसर्गाना लागू आहे. विषाणूच्या प्रकारानुसार शरीरात तयार होणाऱ्या antibodies चेही ५ प्रकार असतात. त्यांचे गुणधर्मही वेगळे असतात. त्यातील कुठला प्रकार अधिक तयार होतो यावर पुढची प्रतिकारशक्ती अवलंबून राहते.

कुमार सर,
माहितीसाठी अनेक धन्यवाद.
पु ले शु.

कुमार सर,
Immunity system म्हणजे एक Force with multiple departments......
When any enemy(virus, bacteria...) attack, body make a separate division for that particular enemy....So when that enemy attack again our already created division fight with them.....
असच काही ना....

ह्या विषयावर तुमचा लेख वाचायला आवडेल.....

सतीश, बरोबर.
सूचनेबद्दल आभार.
सवडीने विचार करेन.

असं ही वाचलंय की टी बी ची ट्रीटमेंट घेऊन जे टी बी मुक्त झालेत त्याना कोरोना होण्याची शक्यता कमी आहे. ह्यात काही तथ्य आहे का ?

मनीमोहोर,
तुम्ही लिहिलेली माहिती ‘ऐकीव’ आहे. तसे सांगणारा अधिकृत वैद्यकीय संदर्भ नाही.
तुमच्याकडे संदर्भ आहे का ?

कोविद१९ संबंधी लस तयार झाली असून नुकतेच तिचे मानवी प्रयोग सुरु झाल्याचे आपण वाचले असेल.
या धाग्यात वर करोनाविरोधी समूह-प्रतिकारशक्तीबद्दल चर्चा झाली आहे. त्यात काही भर घालतो.

१. प्रत्यक्ष हा आजार होऊन त्यातून बरे झालेल्या व्यक्तीना देखील हा आजार पुन्हा होणार नाही याची आता तरी खात्री देता येत नाही.
२. निव्वळ नैसर्गिक विषाणू संपर्कातून समाजात कितपत समूह-प्रतिकारशक्ती निर्माण होईल, याबाबाबत साशंकता आहे.

३. मोठ्या प्रमाणात समूह-प्रतिकारशक्ती निर्माण होण्यासाठी बहुधा लसीकरण आवश्यक ठरेल, असा अंदाज आहे.

छानच हो !
तुम्हालाही आरोग्यदायी शुभेच्छा.

नेटफ्लिक्स वर नवीन documentary आली आहे. Coronavirus Explained. चांगली वाटत आहे. जमल्यास बघावी.

1) समाजातील अनेकांत कोविद-विरोधी सामाजिक प्रतिकारशक्ती (herd immunity) निर्माण झालेली असते.म्हणूनच ती निर्माण होईपर्यंत संचारबंदीचे महत्व. पण जर समुहानी एकत्र आलेच नाही तर हे कस शक्य आहे.
2) आता मुंबईचा पावसाळा आणि त्या बरोबर मलेरिया, ड्येंग्यू, काविळ इत्यादी नेहमीचे पाहूणे येणारच. त्यात संचारबंदीत वाढ करण्यात येत आहे मग हे मलेरिया, ड्येंग्यू, काविळ पेशंट आणि कोविद-19 संक्रमित होणार का.
3) अर्थात प्रशासनानी त्यावर विचार केला असणारच पण एक शंका आलि आत्ताच एव्हढी आणीबाणी मग नंतर काय होईल.

आदिश्री, सुनील,
धन्यवाद.

Michto,
चांगले मुद्दे. त्याबाबत बरीच गुंतागुंत आहे.

• पण जर समुहानी एकत्र आलेच नाही तर हे कस शक्य आहे. >
>>
बरोबर. त्यासाठी हळूहळू संचारबंदीचे शिथिलीकरण उपयुक्त ठरेल. मात्र काही तज्ञांनी कोविदचे बाबतीत याची साशंकता व्यक्त केली आहे. त्यांच्या मते मोठ्या प्रमाणात समूह-प्रतिकारशक्ती निर्माण होण्यासाठी बहुधा लसीकरण आवश्यक ठरेल.

• मलेरिया, ड्येंग्यू, काविळ पेशंट आणि कोविद-19 संक्रमित होणार का.
>>

होय, तो धोका आहेच. फक्त भारतातच नाही तर अन्य देशांतही नेहमीच्या काही आजारांशी त्याची टक्कर होणार आहे !

वयाच्या सत्तरीचे पुढील कोविदच्या रुग्णांचा विशेष अभ्यास होत आहे. त्यातून या आजाराची नेहमीपेक्षा अन्य काही (atypical) लक्षणे दिसून आली आहेत. ती अशी:

१. प्रमाणाबाहेर झोपणे, सतत निरुत्साह

२. जेवायला नकोसे वाटणे, मळमळ, उलट्या, जुलाब

३. चित्तभ्रम होणे, चक्कर येऊन पडणे, बोलणे बंद होणे.

जर अशा लोकांत आधीचा दीर्घकालीन आजार बळावला असेल, तर आताच्या कोविदमध्ये बरेचदा ताप येत नाही.

ही बघा एका हृदयरोगतज्ञाने तयार केलेली कल्पक मुखपट्टी :>>
३डि प्रिंटेड वाटतो आहे, हा जास्त वेळ वापरता येइल का?, खुप स्टीफ वाटतो आहे, चेहर्‍यावर जखम होइल का?

अग्निपंख,

ते तयार केलेले डॉ आणि त्यांच्या पत्नी असे दोघेही हृदयतद्न्य आहेत. स्वतःसाठीच त्यांनी बनविला आहे. त्यांनाच विचारावे लागेल ! Bw

व्यत्यय, धन्यवाद.

michto,
पाहिले ते वृत्त.
इकडे आड तर तिकडे विहीर , असे आहे थोडक्यात !

स्वीडनने त्यांच्याकडे लॉकडाऊन न करता मध्यममार्ग स्वीकारला आहे. तिथे प्राथमिक शाळा, हॉटेल्स वगैरे चालू ठेवण्यात आली आहेत. नागरिकांनी समंजसपणे वागून गर्दी टाळावी असे त्यांचे धोरण आहे.

https://www.euronews.com/2020/04/21/analysis-is-sweden-right-in-its-hand...

Pages