हात, जंतू, पाणी आणि साबण

Submitted by कुमार१ on 15 March, 2020 - 22:46

‘करोना’च्या जागतिक साथीमुळे वैयक्तिक स्वच्छतेबाबत बरीच चर्चा सर्वत्र होत आहे. रोगप्रसार कमी होण्याचे दृष्टीने त्याचे महत्व नक्कीच आहे. क्षणभर आपण ही साथ बाजूला ठेवू. कुठलाही संसर्गजन्य रोगप्रसार टाळण्याचे दृष्टीने वैयक्तिक स्वच्छता ही कायम खूप महत्वाची आहे. त्यातील एकाच महत्वाच्या पैलूकडे या लेखाद्वारे लक्ष वेधत आहे आणि तो म्हणजे आपल्या हातांची स्वच्छता.

आपले हात शास्त्रीयदृष्ट्या स्वच्छ कसे करावेत यावर काही मूलभूत माहिती देत आहे. वरवर पाहता हा विषय सामान्यज्ञान किंवा शालेय पातळीवरचा वाटेल. पण वास्तव तसे नाही. काही अपवाद वगळता बहुसंख्य लोक ही क्रिया उरकून टाकल्यासारखी करतात. हात धुण्याची महत्वाची कृती ही कायम व्यवस्थित व्हावी या उद्देशाने काही सूचना करतो. आपणही आपापले अनुभव लिहा. ही चर्चा सर्वांसाठी आरोग्यदायी व्हावी ही इच्छा.
..........

१. हात धुण्यासाठीचे पाणी स्वच्छ आणि वाहते असावे. ते गार किंवा गरम याने फरक पडत नाही. फक्त हात जर तेलकट असतील तर गरम असल्याचा फायदा होतो.
२. धुण्याची क्रिया किमान २० सेकंद झाली पाहिजे. जरा आजूबाजूस निरीक्षण केल्यास असे दिसेल, की बरेच लोक हे काम ३-४ सेकंदात उरकतात, अगदी पाटी टाकल्यासारखे.

३. हात धुताना ते खरखरून घासले पाहिजेत.
४. बहुतेक लोक फक्त हाताचा तळवा वरवर धुतात. हात नीट धुताना तळहाताची खालची बाजू आणि हातांची मागची बाजू ही देखील नीट धुतली पाहिजे.

५. साबणाचा वापर : हा या प्रक्रियेतील कळीचा मुद्दा आहे. आता साबणाच्या वापराने काय फायदे होतात ते पाहू.

इथे एक मुद्दा स्पष्ट करतो. साबणाचा एक गुणधर्म म्हणजे तो surfactant असतो. आपण हातांनी विविध कामे करताना त्यांच्यावर कमी अधिक प्रमाणात मेदाचा थर जमा होतो. नुसत्या पाण्याने हात धुताना हा थर सहज निघून जात नाही. याचे कारण म्हणजे पाणी आणि मेद ही दोन एकमेकात न मिसळणारी माध्यमे आहेत. त्या दोघांच्या संपर्कात साबण सोडला की मग मात्र ‘इमल्शन’ तयार होते आणि परिणामी त्वचेवरील मेदाचा थर पाण्याबरोबर छान निघून जातो. आता हाताला लागून आलेले जीवजंतू आणि साबण यांचा संबंध पाहू. करोना आणि अन्य काही जंतू यांच्या पेशीभोवती मेदाचे आवरण असते. जेव्हा आपण साबणाने हात धुतो त्यावेळेस हे आवरण तोडले जाते. साबणाचा वापर करीत हात खसाखसा चोळले की हातावरचे काही जंतू फुटून जातात. त्वचेला साबण लावल्याने ती निसरडी होते आणि त्यामुळे तिथले जंतू पाण्याबरोबर वाहून जातात. साबणवापराचे असे हे फायदे आहेत.

६. आता कुठल्या प्रकारचा साबण वापरावा, हा पुढचा मुद्दा. साबणाचे साधारणपणे उपलब्ध असलेले दोन प्रकार म्हणजे वडी आणि द्रवसाबण. हे दोन्ही प्रकार वापरून काही संशोधन अभ्यास झालेले आहेत. त्याबद्दल आता पाहू.
आपल्याकडे वडीचा वापर खूप होतो. अनेक जण लागोपाठ एकच वडी वापरतात तेव्हा ती सतत ओली राहते. त्यामुळे तिच्यावर धुणाऱ्याच्या हातातून आलेले जंतू राहू शकतात. मात्र हे जंतू पुढील हात धुणाऱ्याला ‘हस्तांतरित’ होत नाहीत असे आढळले आहे. त्यामुळे वडीबद्दल अकारण गैरसमज नको. फक्त एक काळजी सर्वांनी घ्यावी. एखाद्याने हात धुतल्यावर ती वडी पुरेशी कोरडी व्हावी. मग दुसऱ्याने तिचा वापर करावा. आपण वडीला हात लावण्यापूर्वी जर ती बुळबुळीत दिसली तर ती आधी पाण्याखाली धुवावी आणि मगच वापरावी.

द्रवसाबणाच्या वापराने अर्थातच वडीच्या तोट्यापासून सुटका होते. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी त्याचा वापर प्राधान्याने व्हावा.

७. हात धुवायला साबण की सॅनिटायझर , हा सध्याचा बहुचर्चित मुद्दा आहे. सॅनिटायझरमध्ये दोन प्रकार असतात – अल्कोहोलयुक्त आणि विरहित. अल्कोहोलयुक्त प्रकाराला जंतुनाशक गुणधर्म आहे. त्यासाठी त्यातील अल्कोहोलचे प्रमाण कमीत कमी ६२% असणे गरजेचे आहे.

सर्वसाधारण जनतेसाठी साबणाने नीट हात धुणे हे पुरेसे आणि योग्य आहे. संसर्गजन्य रुग्णाशी जे लोक थेट संबंधित आहेत त्यांच्यासाठी सॅनिटायझरची शिफारस केली आहे. तसेच ज्या परिस्थितीत वाहते पाणी, साबण आणि हात धुण्याची जागा उपलब्ध नसतात, त्या वेळीही ते वापरावे.

८. हात धुऊन झाल्यावर ते कशाने पुसावेत? हाही एक महत्वाचा मुद्दा.

धुतलेले हात कोरडे करण्यासाठी दोन पर्याय आहेत – कापड व कागदी रुमाल. घरगुती वापरासाठी कापड योग्य वाटते. असे हात पुसायचे कापड रोज स्व‍च्छ धुवून उन्हात वाळवलेले असावे. ही काळजी बऱ्याच घरांत घेतली जात नाही.
कागदी रुमालाने हात कोरडे करण्यात अजून एक फायदा आहे. कागद त्वचेवर अगदी घासून फिरवता येतो आणि त्यामुळे पूर्ण कोरडा होतो. घासण्याच्या क्रियेने हातावरील उरलेसुरले जंतू निघून जातात. हे पाहता सार्वजनिक ठिकाणी कागदी रुमालाचा वापर योग्य वाटतो.

सारांश: हात कशानेही पुसले तरी ते अगदी कोरडे करणे महत्वाचे.

९. कोणत्या परिस्थितीत हात नीट धुणे अत्यावश्यक आहे? शौचालयातून बाहेर आल्यावर, स्वयंपाक करण्यापूर्वी आणि जेवणापूर्वी हात धुणे या मूलभूत गोष्टी आपण जाणतो आणि पाळतो. या व्यतिरिक्त काही मुद्द्यांचा उल्लेख आवश्यक वाटतो.

a. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णास भेटण्याआधी आणि नंतर.
b. बाळांचे लंगोट बदलल्यानंतर
c. आपल्या तोंडापुढे हात धरून शिंकल्या वा खोकल्यानंतर
d. पाळीव प्राण्यांना स्पर्श केल्यानंतर
e. कचरा हाताळल्यानंतर.

जेवणापूर्वी हात धुण्याची सवय बहुतेक घरांत बहुतांश वेळा पाळली जाते. परंतु सार्वजनिक ठिकाणी मात्र बरेच लोक याचा आळस करताना दिसतात. जरा मंगल कार्यालये, उपाहारगृहे आणि प्रवासातील निरीक्षण करून पाहा. हे चित्र बिलकूल समाधानकारक नाही. बफेसाठी रांग लावण्यापूर्वी हात धुवून येणारे लोक अत्यल्प आहेत. काहींना या कृतीचा जाम आळस आहे तर काहींना त्यात कमीपणाही वाटतो ! “इथे काय चमच्यानेच तर खायचे आहे”, असा युक्तिवाद करणारेही आढळतात. पण जेवताना रोटी तोडणे आणि लिंबू पिळणे ही कामे तरी आपण हातानेच करतो, याचा त्यांना विसर पडतो.
प्रवासातील खाण्यादरम्यान तर हातांची स्वच्छंता हा विषयच अनेकांनी धाब्यावर बसवलेला दिसतो. यामध्ये जाणीवपूर्वक सुधारणा व्हायला हवी.

१०. सध्याच्या युगात आपण दिवसभर अनेकवेळा मोबाईल आणि कम्प्युटर हाताळतो. त्यामुळे मोबाईलचा पडदा आणि कम्प्युटरचा कीबोर्ड यांच्यावरही अगणित जंतू जमा होतात. या उपकरणांची योग्य ती स्व‍च्छता नियमित करावी. त्यात हलगर्जीपणा करू नये.

“हातांची नियमित स्व‍च्छता राखल्यास संसर्गजन्य रोग पसरणारच नाहीत का?” असा युक्तिवाद कधीकधी केला जातो. कुठल्याही रोगाचा १००% प्रतिबंध शक्य नाही हे बरोबर. परंतु काही मूलभूत स्वच्छता पाळल्यास रोगप्रसार रोखला जातो हे निःसंशय. म्हणूनच सामाजिक आरोग्याचे दृष्टीकोणातून हातांची स्व‍च्छता हा विषय अत्यंत महत्वाचा आहे.
…….

समाजात काही भीषण रोगांची साथ आल्यानंतर वैयक्तिक स्व‍च्छतेचे मुद्दे खूप चर्चिले जातात. कालांतराने आपल्याला या सगळ्याचा विसर पडतो. व्यवस्थित हात धुण्याची सवय ही खरे तर कायमस्वरूपीच हवी. ही साधी गोष्ट वारंवार सांगायची आणि चर्चेला घ्यायची वेळ यायला नको. दरवर्षी १५ ऑक्टोबर हा ‘जागतिक हातस्वच्छता दिवस’ म्हणून पाळला जातो. वास्तविक असा ‘दिन’ ठेवण्याची वेळ यावी हे खेदजनक आहे. सध्याच्या जागतिक साथीच्या निमित्ताने जगातील सर्वच नागरिक ही आरोग्यविषयक मूलभूत गोष्ट कायम आचरणात आणतील अशी अपेक्षा व्यक्त करतो.
*********************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोविड१९ आणि रक्तद्रव उपचार:

गेल्या काही दिवसात यावर खूप चर्चा होत आहे या संबंधी काही गैरसमज देखील पसरले आहेत. म्हणून या बद्दलची काही शास्त्रीय माहिती :

१. या उपचारासाठी दात्याची निवड कशी करतात ?

असा दाता स्वतः कोविडसाठी उपचार घेऊन नुकताच बरा झालेला असतो. त्यानंतर सुमारे 14 दिवस त्याला या आजाराची कुठलीही लक्षणे नसावी लागतात. त्याची प्रयोगशाळा चाचणी नकारात्मक यावी लागते. तसेच त्याच्या रक्तातील ‘मारक antibodies’ चे प्रमाण ठराविक पातळीच्या वर असावे लागते.

२. या उपचारात प्राप्तकर्त्या रुग्णास काही धोका असतो का ?

वरवर पाहता तसा नसतो पण, एक शक्यता राहते. जेव्हा आपण सध्याच्या करोनाविषाणू विरोधी antibodies दिल्या, तर कालांतराने या विषाणूच्या अन्य प्रकारापासून संसर्ग होण्याचा धोका वाढू शकतो.

३. सध्या या उपचाराच्या अनेक रुग्णचाचण्या चालू असून सुमारे ३ महिन्यांनी त्यांचे निष्कर्ष हाती येतील.

कुमार सर,

आज हे वाचनात आले......

ICMR issues revised advisory on use of hydroxychloroquine

Trump साहेबांनी तर hydroxychloroquine बाबत धमकी वजा आदेश दिला होता March start ला.... पण नंतर काही बातमी नाही की hydroxychloroquine tratment work or not....

ICMR ची advisory must be after study......

सतीश,
धन्यवाद. तो ताजा अहवाल वाचला. कोविडचा अधिक धोका असलेल्यांपुरताच त्याचा मर्यादित वापर करावा, असे त्यांचे म्हणणे आहे.
ते औषध पूर्णपणे सुरक्षित नाही.

१. या उपचारासाठी दात्याची निवड कशी करतात ?

डॉक,
ज्याला हा आजार झालेला नाही आणी ज्याची प्रतिकारक शक्ती खुप चांगली आहे त्याला या उपचारासाठी दाता म्हणुन सामील होता येते काय?

जेम्स,
नाही.

अशा व्यक्तीचा त्यासाठी उपयोग होत नाही ज्या रुग्णास आजार झालेला असतो त्याच्या शरीरात संबंधित Ab तयार होतात. जेव्हा तो त्यातून बरा होतो, तेव्हा त्याच्या रक्तात त्या Abचे प्रमाण बऱ्यापैकी असते.
असाच दाता रक्तद्रव देण्यास उपयोगी असतो.

Arsenic album 30 या औषधाचा प्रतिबंधात्मक उपाय म्हणुन काही ठिकाणी वाटप करण्यात आल्याचे मेसेज व्हॉट्सएप वर वाचले. याबाबत काही अधिकृत माहिती आहे का?

वीरु,
संबंधित तज्ञांकडून मिळालेली माहिती अशी:

त्यांच्या केंद्रीय संशोधन परिषदेने हे औषध प्रतिबंधात्मक म्हणून सुचवले आहे.
त्याचा डोस असा:
तीन गोळ्या सकाळी उपाशीपोटी व 3 रात्री झोपण्यापूर्वी, असे तीन दिवस.
एक महिन्याने पुन्हा असाच कोर्स.

कुमार सर,
एक डॉक्टर म्हणून तुम्ही ह्या भोंदू "होमियोपॅथी औषधा"बद्दल सांगायला नको होते, असे वाटले. कृपया राग मानू नये.

https://www.deccanherald.com/national/homoeopathic-drug-arsenicum-album-...

उ बो,

"त्यांच्या केंद्रीय संशोधन परिषदेने हे औषध प्रतिबंधात्मक म्हणून सुचवले आहे " एवढीच माहिती मी प्रश्नकर्त्यास पुरवली आहे.

ज्याची इच्छा असेल त्याने विचार करावा.
हा मुद्दा इथेच थांबवूया.

डॉक्टर,
कोणतातरी राजकीय नेता किंवा हल्लि बरेच जण म्हणू लागले कोरोनाच्या(कोविड१९) तपासण्या (टेस्ट) केल्या जात नाहित.
1) त्यामुळे रुग्ण कमी सापडतात.
2) मग ज्यांना खरोखर श्वास घेण्याला त्रास होतो कींवा इतर तीव्र लक्षण आहेत ते शांत घरी बसुन राहतात आणि मरण पत्करतात का. तर नाहि. ते उपाचारा साठी जातातच.
3) ज्यांना लक्षण दिसत नाहित पण ते आपोआप बरे झाले आहेत. काहींची प्रतिकार शक्ति चांगली असल्यामुळे जुजबी औषध घेउन बरे झालेत.
4) अस असताना, मग ह्या तपासण्या करा करा हा घोषा का लावला जातोय. त्यातुन काय साध्य करायच आहे.
5) त्या साठी लागणारी सामुग्री, वेळ, खर्च, मनुष्य बळ. ह्याचा विचार केला जात नाही असे वाटते.

शाळा सुरू करायच म्हणत आहेत-
पण कशी कधी वाटत कोरोनाचा बाऊ करून ठेवला आहे सगळ्यांनी,पण प्रत्यक्षात मुलांना शाळेत पाठवावे की नाही याबद्दल काहीच निर्णय नाही घेता येत,

Michto,
चांगला प्रश्न.

या निमित्ताने प्रयोगशाळा चाचण्या प्राधान्याने कोणाच्या करायच्या याचे निकष देतो. त्यांचा प्राधान्यक्रम असा आहे :

१. न्युमोनिया गंभीर स्थितीत असणे
२. ताप + श्वसनदाहाची लक्षणे + कोविड रुग्णाशी संपर्क होणे
३. ताप + श्वसनदाहाची लक्षणे + प्रवास झालेला असणे

४. ताप + श्वसनदाहाची लक्षणे + वृद्धत्व / दीर्घकालीन मोठा आजार
५. ताप + श्वसनदाहाची लक्षणे + आरोग्यखात्यातील काम / मोठा जनसंपर्क असणे
............
६. रुग्णालयातील दीर्घकालीन रुग्णाच्या सेवेत असणारे
७. मधुमेही, उच्च रक्तदाबवाले, दीर्घकालीन श्वसन अवरोध, हृदयविकार.
८. गर्भवती आणि विशिष्ट आजारांचा धोका असलेली मुले.
..........
स्थानिक गरज व मनुष्यबळानुसार संबंधित डॉ नी या सगळ्याचा तारतम्याने विचार करून ठरवायचे असते.

आदू,

जसे टाळेबंदीचे शिथिलीकरण होत आहे, तसेच या बरोबर संभाव्य हजाराचा बाऊ करणे कमी करत गेले पाहिजे.
त्यातूनच सामूहिक प्रतिकारशक्ती वाढीस लागेल.

कुमार, तुमचा संभाव्य कारणांचा प्रतिसाद अगदी पटला.यातले 5 खरंतर असायला नको पण ते असणार हे सत्य आहे.
आधी 3 फूट अंतर सुरक्षित, मग 6 फूट, मग 20 फुटापर्यंत पण एरोसोल मधून विषाणू पसरतो अश्या लागोपाठ लागलेल्या शोधांमुळे आता 'काही केलं तरी आपल्याला एकदा कोरोना होऊन जाणार आहे' असं काहीसं वाटतं.
याच बरोबर माणशी डॉक्टर्स ची संख्या, हॉस्पिटलमध्ये बेड नसणे,पालिकेवर पडलेला ताण यामुळे किमान दुसऱ्याला इन्फेक्ट करू नये यासाठी तरी प्रत्येकाने किमान 3 फूट, आणि इतर नेहमीच्या गाईडलाईन पाळाव्यात.
आर्सेनिक आल्बम बद्दलही प्रवाद आहेतच.काहींचे म्हणणे ते सर्दी औषधाने 7 दिवसात आणि औषधाशिवाय एक आठवड्यात बरे होण्याप्रमाणे आहे.
तात्पर्य हे की व्हॉटेव्हर हेल्पस.आर्सेनिक आल्बम काय, हळद दूध काय नि दालचिनी काढे काय.कोणाच्या तरी कोंबड्याने का होईना, सूर्य उजाडुदे.कोरोना आपल्यापासून शक्य तितका काळ लांब राहूदे.ज्यांना झाला त्यांना हॉस्पिटलमध्ये बेड आणि मेडिकल लक्ष मिळुदे.त्याचा त्यांना फायदा होऊदे.
जोवर 'खात्रीशीर इलाज' म्हणून फसवणूक करून महागात विकत नाही, काही साईड इफेक्टस नाहीत तोवर काहीही चालेल.

अनु >> +११
.....
अजून एक.
बहुतेक दृश्य आणि काही छापील माध्यमांनी "कोरोना" हा चुकीचा उच्चार रूढ केला आहे .

शब्दकोशानुसार योग्य उच्चार kuh-roh-nuh असा आहे.

तसा अचूक मराठीत लिहिणे अवघड आहे. पण "को" नक्कीच नाही.

आपण सर्व 'करोना' असेच म्हणूयात ,हे आवाहन !

चर्चेतून छान माहिती मिळत आहे. अनेक धन्यवाद .
एक शंका विचारतो. कोविडला बळी पडलेल्यांमध्ये पुरुषांचे प्रमाण जास्त आहे असे पेपरात वाचले. त्यात किती तथ्य आहे ?

साद,
कोविडचे प्रमाण आणि लिंगभेद >>>>

या प्रश्नाचे उत्तर वंश आणि देशानुसार वेगवेगळे आहे. तरी काही निरीक्षणे लिहितो.

या विषाणूचा संसर्ग होण्याच्या प्रमाणात फारसा लिंगभेद नाही. पण, हा आजार झाल्यानंतर तो गंभीर होण्याचे आणि त्यातून पुढे मृत्यूंचे प्रमाण काही देशांत पुरुषांत अधिक दिसून आले आहे.

याची कारणमीमांसा तशी रोचक आहे. अद्याप यावरील संशोधन चालू आहे. अंदाजे काही निष्कर्ष असे आहेत :

१. साधारणपणे स्त्रियांमध्ये रोग प्रतिकारशक्तीची कार्यक्षमता अधिक असते. यामागे स्त्रियांच्या शरीरातील इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन या हॉर्मोन्सचा वाटा असतो. तसेच स्त्रीमध्ये दोन X क्रोमोसोम्स (XX) असल्याचाही या शक्तीला काही फायदा होतो. त्यामुळे शरीरात घुसलेल्या रोगजंतूंचा निचरा लवकर आणि चांगल्या प्रमाणात होतो.

२. बऱ्याच देशांत धूम्रपानाचे प्रमाण पुरुषांमध्ये स्त्रियांपेक्षा अधिक आहे, हाही मुद्दा विचारात घ्यावा लागतो.

३. या विषयाची अजून एक बाजू.
जागतिक महासाथीमुळे जे विपरीत मानसिक परिणाम होतात, ते मात्र स्त्रियांमध्ये अधिक तीव्र असतात.

कुमार सर,

जागतिक महासाथीमुळे जे विपरीत मानसिक परिणाम होतात, ते मात्र स्त्रियांमध्ये अधिक तीव्र असतात. ==> Almost ३ महिने होत आलेत...आपण सर्वजण करोना सथीला अनुभवतोय.....मझ्या मुलीची एक उन्हाळा सुट्टी गेली, आपण ३ महीने घरात आहोत, आनेकांना हजारो किलोमीटर चालताना पाहिले.....अन खूप काही.....

Impact of covid 19..... आज तरी आपण फक्त आंदाज बांधू शकतो....

ICMR, WHO,....... such responsible bodies must collect and analysed data without( hidden agendas) .....
अस दिसत मात्र नाही.....

करोना साथी अनुषंगाने हर्ड इम्युनिटी बाबत विशेष असं संशोधन जगात चालू आहे का?
(म्हणजे एखादे शहर,प्रांत यातील प्रत्येकाची चाचणी घेऊन बाधित पण लक्षणे नाहीत अश्यांच्या संख्येशी एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात गुणोत्तर वगैरे..)

तेजो,
सामूहिक प्रतिकारशक्तीबाबत विशेष असं संशोधन जगात चालू आहे का?
>>>

होय, असे काही अभ्यास चालू आहेत.
१. अशा अभ्यासात बाधित लोकांपैकी किती मृत्यू पावतात याचे गुणोत्तर काढले जाते. ते देशानुसार भिन्न आहे.

२. एकदा बाधित झाल्यानंतर पुन्हा तोच संसर्ग होतो का हे आजमावले जाते. त्यासाठी माकडांवर काही प्रयोग झाले आहेत.
३. बर्या झालेल्या रुग्णांत विशिष्ट प्रकारच्या अँटीबॉडीज किती प्रमाणात निर्माण झाल्यात हेही मोजले जाते.

४. एकंदरीत करोना या विषाणू जमातीने शरीरात निर्माण होणारी प्रतिकारशक्ती अल्पकालीन असते, असा सध्याचा अंदाज आहे.

५. त्यामुळेच लस शोधणे महत्त्वाचे ठरेल.

मला एक शंका आहे.
करोना विषाणू हा श्वसन संस्थेवर आघात करणारा विषाणू आहे ना? मग तो डोळ्यांवाटे कसा काय प्रवेश करू शकतो?

मग तो डोळ्यांवाटे कसा काय प्रवेश करू शकतो?>>डोळ्यात ,कानात औषध टाकले असता त्यातला कडवटपणा बऱ्याचदा घशात उतरतो ,तसच असेल हे

आताच एक फेसबूक विडिओ बघितला. ReverseFactor page वर करण कक्कर सांगत होता रक्तातल्या oxygen level चा कोवीडशी असलेला संबंध. फुफ्फुसांची oxygen शोषण्याची क्षमता कमी होते, पण CO2 बाहेर टाकण्याच्या क्षमतेत फरक पडत नाही. त्यामुळे रुग्ण ठिकठाक दिसतो. अचानक ५० % च्या खाली oxygen गेल्यावर श्वास घ्यायला त्रास सुरु होतो. पण तो पर्यंत उशिर झालेला असतो. म्हणुन करण oximeter घेण्याची आणि स्वत:ची oxygen पातळी दरदिवशी तपासावी असे सांगत होता.
MCGM वस्त्यांमधे oxygen level check करत असल्याचे माहित होते, पण ते लोकांची सर्वसाधारण प्रतिकारक्षमता तपासण्यासाठी करत अस्स्वेत असा माझा समझ होता.
ह्यत कितपत सत्य आहे? खरच असे स्वतःचे आणि घरच्यांचे oxygen level monitor करावी का? की हे देखिल अर्सेनिक अल्बुम सारखे आहे?
Please guide.

Pages